साक्षीचे आकाश..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 August, 2013 - 13:57

श्वास प्रश्वासाच्या
आरोह अवरोहाला
पाहता पहाता मी
सावध होत गेलो
मनाची बेलगाम
धाव सजग होवून
न्याहाळू लागलो
पाहतांना त्यात कधी
वाहून जावू लागलो
वाहने लक्षात येताच
पुन्हा मनापासून
वेगळे होवू लागलो
साक्षीच्या अथांग
निळ्या आकाशात
विहार करू लागलो
दृष्ट्त्वाच्या शिखरावर
सावध बसू लागलो
होता होता असे काही
शून्याच्या स्पर्शाचे
संकेत आकळू लागलो .
“अरे हेच तर मिळवायचे होते
मग आजवर टाळले का ?
मीच मला विचारले .
अन मीच उत्तर मला दिले
कारण त्यात
चुकायचे भय होते
स्वत:च स्वत:ला नित्य
सांभाळायचे होते
अन मला तर
सुरक्षित नीट पोहचायचे होते
नक्कीच्या आश्वासनाचे
तिकीट पाहिजे होते

कृष्णाने सांगितलेले कळले
बुद्धाने सांगितलेले कळले
कबीर ज्ञानेश्वर तर
तोंडपाठ झाले होते
तरीही मनाला सुप्त ते
एक आकर्षण होते
साक्षात सद्गुरू कृपेचे
लाघव हवे होते
हात धरून त्यांचा
मज चालायचे होते
जन्मोजन्मीचे संस्कार
सहज का जाणार होते

मध्यान उलटून गेली आहे
नजर जाईल तिथवर
दूर दूरवर केवळ
रस्ताच रस्ता आहे
खूप थांबलो..
खूप थबकलो..
आता धावणे भाग आहे
रस्ता तर कळला आहे
साऱ्या अपेक्षा सोडून
सारे आधार मोडून
स्वत:च्या पायावर
फक्त विश्वास ठेवून
क्षितिजाच्या अंतापर्यंत ...
आता जाणे आहे .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>तरीही मनाला सुप्त तेएक आकर्षण होतेसाक्षात सद्गुरू कृपेचेलाघव हवे होतेहात धरून त्यांचामज चालायचे होते जन्मोजन्मीचे संस्कारसहज का जाणार होते<<<<<<
खुपच सुंदर.

मस्त.

<<क्षितिजाच्या अंतापर्यंत ...
आता जाणे आहे .>>

क्षितीजाकडे धावण्याचा आपला जो वेग, तोच वेग क्षितीजाचा आपल्यापासून लांब जाण्याचा. फक्त दमणूक हातात पडते. पण हे लक्षात येऊनही

<<स्वत:च्या पायावर
फक्त विश्वास ठेवून>>

धावत राहाणे इतकेच करत राहायचे. पण आपल्या अविरत धडपडीमुळे कधीतरी त्या क्षितिजालाच आपली दया येईल व ते आपल्या पायापाशी सरकेल अशी वेडी आशा बाळगत राहून त्या आशेच्या जोरावर फक्त धावत राहायच.

जेव्हा ते क्षितिजच आपल्याकडे सरकते तोच त्या क्षितिजाचा अंत असेल ही कल्पनाही सुंदर.

मस्त कविता आहे.

<<क्षितिजाच्या अंतापर्यंत ...
आता जाणे आहे .>>

पण हा जो रस्ता कळला आहे 'क्षितिजाच्या अंतापर्यंतघेऊन जानारा' तो राज मार्ग आहे याची कुठे तरी खात्री पटली आहे.आता चुकायची किंवा भट्कायची भिती नाही.

साक्षी भाव जेवढा पुष्ट होइल तेवढे लवकर क्षितिजा जवळ जाता येइल.

नाही हो. क्षितिजाजवळ कोणालाच जाता येत नाही. आपण जितके जवळ जाण्याचे प्रयत्न करू तेवढेच ते आपल्यापासून लांब जाते. म्हणूनच तर त्याला क्षितिज म्हणतात. तेच स्वतःहून जवळ आले तरच कार्यभाग साधतो एरवी कधिच नाही. हे फक्त सत्गुरूकृपेनेच शक्य होऊ शकते. म्हणूनच परमार्थात सत्गुरूंना अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. सर्व संत सत्गुरूंची थोरवी त्यासाठी वारंवार गात असतात. अगदी ज्ञानेश्वर माऊलीपण त्याला अपवाद नाहीत.

ज्ञानेंश्वरीत त्यासाठी एक ओवी आहे. ही मायानदी आटून तिचा पैलतीर अलिकडे येतो अशा अर्थाची.

शाम ,सुरेख ..धन्यवाद..तुमच्या दोघांचा आपला असा एक स्पष्ट मार्ग असावा असे वाटते .पण अध्यात्मात काहीच नक्की नसते ..हे मात्र नक्की आहे .दोघंनाही खूप शुभेच्छा ..