घरचा आहेर

Submitted by डॉ अशोक on 6 August, 2013 - 06:23

घरचा आहेर

पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटीदरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात. इतर कारागृहे आणि खुले कारागृह यात मोठा फरक हा की खुल्या कारागृहातले कैदी शेत काम करण्यासाठी कारागृहाच्या मालकीच्या शेतात जात. त्यामुळे खुल्या कारागृहाच्या कैद्यांना बराच मोकळेपणा अनुभवता येतो.

एकदा असेच काही कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासायला आणले. आमच्या कडे प्रशिक्षणासाठी असलेल्या इंटर्ननी त्यांना तपासलं आणि तो माझ्या कडे आला अणि म्हणाला: "सर, एक प्रॉब्लेम आहे या चार कैद्यांचा", आणि त्यानं त्याचा प्रॉब्लेम सांगितला. ऐकून मीही चकित झालो. चारही कैद्यांना गुप्तरोग झाला होता. लैंगिक संबंधातून होणारा सिफिलीस नावाचा गुप्तरोग झाल्याचा प्रथमदर्शनी निदान होतं. तसं कैद्यांमधे हा रोग होणं नवीन नव्हतं. पण चार कैद्यांना, एकाच वेळी अशी लागण होणं ही गंभीर बाब होती. जेलला साप्ताहिक व्हीजीटच्या वेळी तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी यावर चर्चा करायची असं मी तेंव्हाच ठरवून टाकलं. मात्र काही करण्या अगोदर निदानाची खातरजमा काही तपासण्या करून करणं आवश्यक होतं. तेंव्हा ही तपासणी करण्यासाठी रक्ताचा नमुना औरंगाबादला पाठवावा लागे. त्याप्रमाणे रक्तनमुने पाठवले आणि त्या रोग्यांवर उपचार सुरू केले.

घरी आलो पण ही बाब मला स्वस्थ बसू देईना. मी संध्याकाळी खुल्या कारागृहात पोहोचलो. आधी निरोप दिलेला होता त्यामुळे वैद्यकिय अधिकारी आणि जेलचे अधिकारी होतेच. त्यांना मी भेटीचं कारण सांगितलं आणि त्या कैद्यांशी एकेकट्यांनं भेटून माहिती घ्यायची असं ठरवलं. आधी तर ते कैदी नीट बोलेनात. मग मी तुरुंगातल्या सर्वांना बाहेर जायला सांगितलं आणि त्या चौघांना एकत्र बोलावलं. त्यांना काय आजार झालाय, तो कसा होतो ते सांगितलं. यामुळे तुरूंग प्रशासन अडचणीत येऊ शकेल हेही त्यांना सांगितलं, इतकंच नव्हे तर त्यांना मिळालेली खुल्या कारागृहाची सवलत रद्द होवून परत मुळच्या तुरूंगात खडी फोडायला जावं लागेल हेही निदर्शनास आणून दिलं. त्या चौघांची मूळ तुरूंगातल्या चांगल्या वर्तनामुळे खुल्या कारागृहासाठी निवड झाली होती. सक्तमजूरीच्या तुरूंगाच्या तुलनेत खुलं कारागृह म्हणजे तर स्वर्गच होता आणि आता या स्वर्गातून परत त्या तुरूंगात जावून खडी फोडायची या कल्पनेनं त्या चौघांना घाम फुटला आणि त्यांना कंठही फुटला.

त्यांनी सांगितलेली हकिगत थोडक्यात अशी. खुल्या कारागृहात काही दिवस काढल्यानंतर कैद्यांना काही दिवस घरी जावून नातेवाईकांना भेटण्याची सवलत मिळते. त्यानुसार हे चौघेही नुकतेच या सवलतीचा लाभ घेवून कारागृहात परत आले होते. आता घरी जावून त्यांना "हा आजार" कसा काय झाला ते काही कळेना. तेंव्हा आणखी खोदून विचारलं तेंव्हा कळलं की तिघं आपापल्या घरी गेले होते पण तिथं त्यांचं "थंड" स्वागत झालं होतं. त्यामुळे यांची डोकी "गरम" झाली आणि मग "जीवाची मुंबई" करण्या साठी त्यांनी खरंच मुंबई गाठली होती आणि तिथून या गुप्तरोगाचा प्रसाद यांना मिळाला होता. तिघातल्या एकाला "याबाबतची मुंबई" माहिती होती आणि यामुळे त्यांनी एकत्रितच संगनमतानं मुंबई गाठली होती.

तिघांचं कारण कळलं. मुंबईतल्या रेड्लाईट एरियातून त्यांना ही लागण झाल्याचं निष्पन्न झालं, पण चौथ्याचं काय? तो या तिघांबरोबर नव्ह्ता हे त्या तिघांनी शपथेवर सांगितलं. त्याला खोदून खोदून विचारलं, पण त्याचं आपलं एकच पालूपद: "मी माझ्या घरी गेलो होतो. दुसरी कडे कुठेच नाही." आणि मग माझ्या मनात एक विचार आला, समजा हा खरं बोलत असेल तर? तर मग याला रोगाची लागण कुठून झाली हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं. मी आणखी चौकशी केली तेंव्हा कळलं की तो मुदती आधीच घरून तुरूंगात परतला होता. त्या तिघांचं घरी "थंड" स्वागत झालं म्हणून त्यांनी बाजारात जावून तो आजार विकत घेतला होता आणि या चौथ्याला मात्र या आजाराच्या रूपात "घरचा आहेर" मिळाला होता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसेवाल्यांना गुप्तरोग झाला तरी फारसं बिघडत नाही. ते वेळेवर औषधोपचार घेऊ शकतात.

पैलवाना, का लोकांची करमणूक करत बसला आहेस? गुप्तरोग या साखळीत नेहमी दोन लोक असतात. एक देणारा आणि एक घेणारा.... आता तुम्ही म्हणताय, श्रीमंताला रोग झाला तर चालते. पण त्याची वासना भागवायला एखादी गरीबच बळी पडणार ना?

--- गरीब/ श्रीमंत , स्त्री / पुरुष असा भेद न बाळगता गुप्तरोग आणि एड्स यांच्यावर उपचार करणारा..

डॉ. वेडा राघू

वेडा राघू,

>> पैलवाना, का लोकांची करमणूक करत बसला आहेस? गुप्तरोग या साखळीत नेहमी दोन लोक असतात.
>> एक देणारा आणि एक घेणारा.... आता तुम्ही म्हणताय, श्रीमंताला रोग झाला तर चालते. पण त्याची वासना
>> भागवायला एखादी गरीबच बळी पडणार ना?

अगदी बरोबर! म्हणूनच वंचित घटकांना गुप्तरोग होऊ नये. तसं पाहायला गेलं तर कोणालाच कसलाही रोग होऊ नये.

गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव रोगाविरुद्ध लढण्याच्या आर्थिक शक्तीतील तफावत दर्शवण्यासाठी (आणि तेव्हढ्याच साठी) केला आहे. एव्हढंही आपल्याला कळत नसेल तर माझ्या उद्गारांतून खुशाल स्वत:ची करमणूक करून घ्या.

आ.न.,
-गा.पै.

डॉ अशोक,

आता असं बघा की, पूर्वीच्या काळी सर्व लोक अगदी नीतीमत्ताप्रचुर होते असं काही नाहीये. अगदी महाभारतकाळी कौरवांनी भीमाला विष चारून नदीत बुडवलंच ना? शत्रूला झोपेत ठार मारू नये असा नियम असतांना लाक्षागृह जाळलंच ना? त्यावेळी तर पांडव उघड शत्रूही नव्हते.

मात्र असं असलं तरी चांगलं काय आणि वाईट काय याच्या धारणा सुस्पष्ट होत्या (किंवा असाव्यात). वंचित घटकांतील एक मोठा हिस्सा आज गुप्तरोगाला बळी पडलेला असू शकतो. ही परिस्थिती कशामुळे उत्पन्न झाली? एक म्हणजे बर्‍यावाईटातील फरक जाणण्याची क्षमता नाहीशी झाली, आणि दुसरं म्हणजे चांगलं काय ते समजलं तरी ते धरून ठेवण्याची लोकांची क्षमता नाहीशी झाली. मग या क्षमतांचं कोणी रक्षण करायला हवं होतं? समाजातल्या नीतिमान लोकांनीच ना?

आज समाजात नीतिवान माणसांना काय किंमत आहे? तुम्हाला गेले तीस वर्षांपासून पडलेला प्रश्न शेवटी इथवर येऊन ठेपतो.

माझी उकल (सोल्युशन) नीतिवान लोकांना सत्तेत बसवण्याची आहे. अर्थात हे मत तुम्हाला पटण्याची आवश्यकता नाही. परंतु उत्तर जरी पटलं नाही तरी प्रश्न पटायला हरकत नसावी.

या संदर्भात तुमची निरीक्षणे वाचायला आवडतील. तुम्हाला या बाबतीत दांडगा अनुभव आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

माझी उकल (सोल्युशन) नीतिवान लोकांना सत्तेत बसवण्याची आहे.

पैलवानमामा, नुसत्या नीतीमत्तेच्या टिमक्या वाजवून प्रश्न सुटत नसतात. गुप्त्रोग हे त्या काळापासून आहेत, ज्या काळात आधुनिक समाजव्यवस्था निर्माणही झाली नव्हती. अगदी आदिम काळापासून हे आजार आहेत.

राज्यकर्ते नीतीवान असले की रोग होत नाहीत, असे काहीसे तुमचे मत दिसते. पण त्या रोगजंतूची ताकद, त्याची मनुस्।याच्या शरीराबाहेर जगण्याची शक्ती, एखाद्या रोगजंतूचा मनुष्याव्यतीरिक्त इतर प्राण्यात / इतर देशात असलेला आढळ. तपासणीच्या सुविधा उपलब्ध असणे, तज्ञ डॉक्टर, औषधे, सामाजिक परिस्थिती, शिक्षण, लस .... असे शेकडो घटक अनुकूल असतील तरच रोग नष्ट होऊ शकतात.

गुप्त्रोग वाढले, तर तुम्ही म्हणताय राज्यकर्ते जबाबदार !

आता तेच राज्यकर्ते सत्तेवर असताना देवी रोग ( स्मॉल पॉक्स ) समूळ नष्ट झाला आणि पोलिओही त्या मार्गावर आहे. मग तुमच्या त्या अनीतीमान राज्यकर्तांचा या रोगांवर कसा काय प्रभाव पडला नाही बुवा? Proud

माझी उकल (सोल्युशन) नीतिवान लोकांना सत्तेत बसवण्याची आहे.

हे तर अगदीच हास्यास्पद आहे. म्हणजे प्रभू राम एकपत्नीव्रती होते. मान्य. पण लक्ष्मणाला आणि उर्मिलेला तरुण वयात सक्तीने ब्रह्मचर्य भोगायला लागले ना हो? मग आधुनिक काळात एखादा लक्ष्मण शूर्पणखेलाही हो म्हणून बसला तर तो अनीतीवान ठरतो का? भगवान १६००० स्त्रीया करणार . आणि अर्जुन विचारतो, युद्धात पुरुष बळी पडतात तेंव्हा बायका वाममार्गाला लागतात, अनौरस प्रजा जन्माला येते, त्याचे काय करायचे? तर त्याला भगवानान्नी उत्तर दिलेले नाही.

नीतीवान माणसाला पैसा, अन्न, वस्त्र, शरीरसुख सगळे मिळणार आणि तुरुंगात तारुण्य गेलेल्या ( भले ते शिक्षा म्हणून असेल. ) माणसाला चार दिवस बाहेर सोडले तर त्यानेही नीतीमान रहावे, ही अपेक्षा करणे चुकीचे नाही का?

नीतीच्या कल्पना समाजात तशाही पूर्वीपासून्च आहेत. त्या राबवण्याचे प्रयत्न करणारे लोक खाऊन-पिऊन-झोपून सुखी असतात आणि ज्यानी त्या पाळायच्या अशी अपेक्षा असते, ते लोक त्या पाळण्याच्या अवस्थेलाच नसतात. केशवपन, बायकाना घरातच बसवणे, ड्रेसकोडची सक्ती, पदर ढळू न देणे, स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं - तडकलं की गेलं -- असले डायलॉग ... सगळं करुनही सगळ्याच देशात आज या रोगांचं प्रमाण चिंताजनकच आहे.

मला थोडे वेगळे कारण वाटले..बाकी कैदी (मुम्बै ला गेलेले)परत येउन ह्या कैद्यासोबत काही अनैसर्गिक क्रुत्य करतात म्हणून तर ह्यालही झाला नाहीना..

तेही कारण असू शकेल. पण तेंव्हा आजाराची जागा ( अवयव) बदलते. आणि त्यातून ते समजते. या केसमध्ये ते कारण नाही, हे डॉक्टरानी गृहीत धरले आहे.

बाकी , मला वेगळ्याच कारणाने अस्वस्थ वाटले होते. ते म्हण्जे कैदी असूनसुद्धा त्या ४घांना मुम्बईला जाऊन मजा मारता आली !! येवढे पैसे कुठुन आले असतील त्यांच्याकडे? कैदी असून ऐश करायला मिळतेय त्यांना आणि त्यांची बायकापोरे बिचारी खस्ता कात असतील.

ते म्हण्जे कैदी असूनसुद्धा त्या ४घांना मुम्बईला जाऊन मजा मारता आली !! येवढे पैसे कुठुन आले असतील त्यांच्याकडे?

मुंबईला जाऊन मजा करायला फार पैसे लागत नाहीत. जरा नेट गुगलून बघा. ३०० रुपयापासून काही लाखांपर्यंत रेट दिसतील. ज्याच्या त्याच्या खिशानुसार मुंबईत सगळे मिळते. फाइव स्टार हॉटेलपासून सुमसाम बागेतील झुडपापर्यंत कुठेही सुख मिळू शकते.

कैदी असून ऐश केली

हाच व्ह्यु पटत नाही. कैदी असून.. म्हणजे काय? कैद्याने ऐष करु नये? कायद्याने त्याला तुरुंगात रहायची सजा दिली. याचा अर्थ त्याचे खाणे/ पिणे/ शारीर्क गरजा त्याने भागवायच्या नाहीत की काय?

आणि तुरुंगात काही महिने/ वर्षं काढ्ल्यावर घरी सुख नाही मिळाले म्हणून तो बाहेर गेला तर त्याला ऐष म्हणता येईल का?

वेडा राघू,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> पैलवानमामा, नुसत्या नीतीमत्तेच्या टिमक्या वाजवून प्रश्न सुटत नसतात.

अगदी बरोबर. खायला अन्न लागतं. म्हणूनच उघड्यावर पडलेल्या बाईची उपजीविका धडपणे पार पडली पाहिजे. नेमक्या याच कारणासाठी समाजातले नीतिवान लोकं शक्तिमानही झाले पाहिजेत. उघड्यावर पडलेली बाई गुप्तरोगास बळी पडायला नकोय.

२.
>> राज्यकर्ते नीतीवान असले की रोग होत नाहीत, असे काहीसे तुमचे मत दिसते.

थोडंसं बरोबर आहे. राज्यकर्ते नीतिवान असले की प्रजा आपोआप त्यांचं अनुकरण करू लागते. त्यामुळे गुप्तरोगांस (सर्व रोगांस नव्हे) आळा बसण्याची शक्यता अधिक असते. मात्र राज्यकर्तेच जर नीतिहीन असतील तर सर्वसामान्य प्रजा तुलनेने चटकन बळी पडते.

३.
>> अगदी आदिम काळापासून हे आजार आहेत.

आपण गुप्तरोगाच्या प्रादुर्भावाबद्दल बोलत आहोत. केवळ अस्तित्वाबद्दल नाही.

४.
>> गुप्त्रोग वाढले, तर तुम्ही म्हणताय राज्यकर्ते जबाबदार !

हो, हो आणि हो! प्रजेची सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचं काम राज्यकर्त्यांनी करायचं असतं. हे काम नीतिहीन राज्यकर्ते प्रभावीपणे करू शकत नाहीट. म्हणून गुप्तरोगांचा फैलाव वाढतो. (तसेच इतर संकटेही प्रजेला झेलावी लागतात.)

५.
>> आता तेच राज्यकर्ते सत्तेवर असताना देवी रोग ( स्मॉल पॉक्स ) समूळ नष्ट झाला आणि पोलिओही त्या
>> मार्गावर आहे. मग तुमच्या त्या अनीतीमान राज्यकर्तांचा या रोगांवर कसा काय प्रभाव पडला नाही बुवा?

अनैतिक वर्तनातून फैलावणार्‍या रोगांबद्दल आपण इथे चर्चा करीत आहोत.

६.
>> भगवान १६००० स्त्रीया करणार .

शक्तीप्रमाणे कार्य हाती घेणं इष्ट!

७.
>> आधुनिक काळात एखादा लक्ष्मण शूर्पणखेलाही हो म्हणून बसला तर तो अनीतीवान ठरतो का?

हो. सत्ताधारी पुरुषांची (आणि त्यांच्या कुटुंबियांची) त्यागाची तयारी असायलाच हवी. यालाच क्षात्रधर्म म्हणतात. महाराणा प्रताप हे एक प्रमुख उदाहरण आहे.

८.
>> अर्जुन विचारतो, युद्धात पुरुष बळी पडतात तेंव्हा बायका वाममार्गाला लागतात, अनौरस प्रजा जन्माला
>> येते, त्याचे काय करायचे?

म्हणूनच समाजाचं नैतिक अधिष्ठान घट्ट पाहिजे. टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपत्काली शत्रूस शरीराचा दुरूपभोग घेता येऊ नये म्हणून राजपूत स्त्रियांनी जोहारही केले आहेत. (मी जोहाराचं समर्थन करीत नाही आणि विरोधही करीत नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.) जर अब्रूवर घाला पडत नसेल तर संयमाने जीवन व्यतीत करायला हरकत नसावी. त्यातूनही विधवेस पुनर्विवाह करावासा वाटला तर स्मृतींनी (=कायद्यानुसार) सोय करून द्यायला कुणाचीच हरकत नाहीये. मात्र वाट्टेल तसे बहुपर्यायी संबध ठेवणे चुकीचे आहे.

९.
>> नीतीवान माणसाला पैसा, अन्न, वस्त्र, शरीरसुख सगळे मिळणार आणि तुरुंगात तारुण्य गेलेल्या ( भले ते
>> शिक्षा म्हणून असेल. ) माणसाला चार दिवस बाहेर सोडले तर त्यानेही नीतीमान रहावे, ही अपेक्षा करणे
>> चुकीचे नाही का?

आजिबात चुकीचं नाही. परिणाम दिसतोच आहे. नको तिकडे संग केला की निसर्ग त्याच्या नियमाने रोग देणार. मग काय बोंबलत बसायचं?

१०.
>> नीतीच्या कल्पना समाजात तशाही पूर्वीपासून्च आहेत. त्या राबवण्याचे प्रयत्न करणारे लोक
>> खाऊन-पिऊन-झोपून सुखी असतात

अगदी बरोबर निरीक्षण. नीतिच्या कल्पना समाजात राबवायच्या नसून स्वत: पाळायच्या आहेत. नेमक्या याचकरिता समाजातल्या सर्व घटकांना (विशेषत: वंचितांना) योग्य तो अन्न-वस्त्र-निवारा लाभला पाहिजे. (अवांतर : परत राज्यकर्त्यांकडे अंगुलीनिर्देश होतोय.)

११.
>> आणि ज्यानी त्या पाळायच्या अशी अपेक्षा असते, ते लोक त्या पाळण्याच्या अवस्थेलाच नसतात.

समाजातल्या प्रत्येकाने नीतिमत्ता पाळली पाहिजे. काही लोकांनी पाळायची आणि काहींना सूट असं नको. वंचित लोक नीतिमत्ता पाळायच्या अवस्थेस यावे म्हणून त्यांना योग्य तो अन्न-वस्त्र-निवारा लाभला पाहिजे. (अवांतर : परत राज्यकर्त्यांकडे अंगुलीनिर्देश होतोय.)

१२.
>> केशवपन, बायकाना घरातच बसवणे, ड्रेसकोडची सक्ती, पदर ढळू न देणे, स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं
>> भांडं - तडकलं की गेलं -- असले डायलॉग

कोण करतं हल्ली? मी इथे विशिष्ट जमातीबद्दल बोलत नाही नाहीये.

१३.
>> राज्यकर्ते नीतीवान असले की रोग होत नाहीत, असे काहीसे तुमचे मत दिसते.

तुमचा एकंदर प्रतिसाद पाहता तुमचं मत 'चढव निरोध आणि संपव एड्स' असं काहीसं दिसतं.

आ.न.,
-गा.पै.

कैद्याने ऐष करु नये? >> अरे वा!! बरोबर आहे तुमचे !! सध्या कैद्यांनी ऐश करण्याचे आणि सामान्य प्रामाणिक माणसांनी खस्ता खाण्याचेच दिवस आहेत काय करता !! माझा बापुडीचा समज असा होता कैदेतल्या माणसाला शिक्षा मिळावी.

? कायद्याने त्याला तुरुंगात रहायची सजा दिली. याचा अर्थ त्याचे खाणे/ पिणे/ शारीर्क गरजा त्याने भागवायच्या नाहीत की काय? >> खायला , प्यायला कोण नाही म्हणलेय हो. पण बाप रे, कैद्यांच्या शारीरिक गरजाही पुरवायच्या का हो ?? उद्या म्हणाल तुरुंगातही बाया पाठवा. धन्य आहे!! _/\_

मुंबईला जाऊन मजा करायला फार पैसे लागत नाहीत. >> अहो , कैद्याच्या बायकापोरांची अवस्था काय असणार? ते ४ पैसेही त्यांच्यासाठी मोलाचे असतील हो.

आणि तुरुंगात काही महिने/ वर्षं काढ्ल्यावर घरी सुख नाही मिळाले म्हणून तो बाहेर गेला तर त्याला ऐष म्हणता येईल का?>>
काय बोलावे अता यापुढे Sad
आई उपाशी राहून , वेळप्रसंगी शरीराचा सौदा करून पोरे संभाळते आणि बाप बायका पोरांना वार्‍यावर सोडून स्वतःची 'शारी रिक' भूक भागवतो. बरेय . चालू द्या.

खायला , प्यायला कोण नाही म्हणलेय हो. पण बाप रे, कैद्यांच्या शारीरिक गरजाही पुरवायच्या का हो ?? उद्या म्हणाल तुरुंगातही बाया पाठवा. धन्य आहे!! _/\_

का अर्थाचा अनर्थ करताय? कैद्याला बाई आपण पुरवायची असे मी म्हटलेले नाही. त्याने स्वतः होऊन शोधून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करुन तो गेला तर तो गुन्हा होत नाही, इतकेच मी म्हटले.

डेलिया >> १०० % अनुमोदन.
>> त्याने स्वतः होऊन शोधून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करुन तो गेला तर तो गुन्हा होत नाही, इतकेच मी म्हटले. >>
गुन्हा नसेल हो, म्हणून ही गोष्ट बरोबर ठरते काय ?

डेलीया .......
एक क्लॅरीफिकेशन....

ते म्हण्जे कैदी असूनसुद्धा त्या ४घांना मुम्बईला जाऊन मजा मारता आली !! येवढे पैसे कुठुन आले असतील त्यांच्याकडे?

खुल्या कारागृहातील कैदी तुरुंगाच्या मालकीच्या शेतावर काम करतात. त्याचे पैसे त्यांना मिळतात. शेवटी सुटका होते तेंहा आणि हे असं पॅरोलवर सोडलं तेंव्हा !

गामा पैलवान..

या संदर्भात तुमची निरीक्षणे वाचायला आवडतील. तुम्हाला या बाबतीत दांडगा अनुभव आहे.

या बाबतीत माझा अनुभव दांडगा आहे ? काय बोलताय राव !

डॉ अशोक,

>> या बाबतीत माझा अनुभव दांडगा आहे ? काय बोलताय राव !

Rofl

मला म्हणायचं होतं की सद्सद्विवेकबुद्धी नाहीशी झाल्याने जे प्रसंग घडतात (रोगाची लागण वगैरे) ते तुमच्या पेशात बरेच बघायला मिळाले असतील. Happy

आ.न.,
-गा.पै.

आपण गुप्तरोगाच्या प्रादुर्भावाबद्दल बोलत आहोत. केवळ अस्तित्वाबद्दल नाही. >> गा.पै. तुमच्याकडे आधीच्या नि आत्ताच्या समाजातील एकंदर गुप्तरोगांची लागण झालेल्या असलेल्या लोकांची आकडेवारी आहे का ? परत नीतीमत्तेच्या संकल्पना ह्या सतत बदलत्या असतात त्यामूळे प्राचीन काळामधे कोण राज्यकर्ते किती नीतीमान होते ह्याची खानेसुमारी आजच्या चष्म्यातून नहि करता येणार. तुम्ही खरच वडाची साल पिंपळाला लावत आहात.

या संदर्भात तुमची निरीक्षणे वाचायला आवडतील. तुम्हाला या बाबतीत दांडगा अनुभव आहे.
या बाबतीत माझा अनुभव दांडगा आहे ? काय बोलताय राव ! >> Lol

पैलवनांची तब्येत बरी नसते म्हणून त्यान्ना फाटा.

>>आई उपाशी राहून , वेळप्रसंगी शरीराचा सौदा करून पोरे संभाळते आणि बाप बायका पोरांना वार्‍यावर सोडून स्वतःची 'शारी रिक' भूक भागवतो. बरेय . चालू द्या.<<

या वाक्याचा अर्थ समजतोय का डेलिया?
एकाने विकत घेतले नाही तर दुसर्‍या विकणार्‍याचे पोट कसे भरेल बरे? हे असे चालते त्याला मार्केट म्हणतात.

अशोक सर काय लिहितात अन तिथून ते गापै सरकारी बावळटपणा करतात अन तुमचे वेगळेच चालू.

अवघा आनन्द आहे..

गा पै, एक आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही राजकारण्यांशी लावलेला थेट संबंध पटतो पण ही राजकारणी लोकं सुद्धा ह्याच समाजात जन्माला आली त्यामुळे त्यांच्याकडून फार वेगळी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे ते समजत नाही.
ह्याउलट राजकारण्यांना दोष न देता स्वतः समाजाच्या हिताचे एखादे कार्य (ह्या लेखाच्या संदर्भात म्हणायचे तर गरिब लोकांना लैंगिक शिक्षण देणे हे एक उदाहरण आहे) हाथी घेऊन जर पार पाडायची जवाबदारी घेतली तर कितीही सुक्ष्म असला तरी बदल होईल ह्याची खात्री नक्की असते कारण आपण स्वतः तो घडवत असतो.

इब्लीस,

>> पैलवनांची तब्येत बरी नसते म्हणून त्यान्ना फाटा.

झाली माझी तब्ब्येत बरी.

आ.न.,
-गा.पै.

वैद्यबुवा,

>> ह्याउलट राजकारण्यांना दोष न देता स्वतः समाजाच्या हिताचे एखादे कार्य (ह्या लेखाच्या संदर्भात म्हणायचे तर
>> गरिब लोकांना लैंगिक शिक्षण देणे हे एक उदाहरण आहे) हाथी घेऊन जर पार पाडायची जवाबदारी घेतली तर
>> कितीही सुक्ष्म असला तरी बदल होईल ह्याची खात्री नक्की असते कारण आपण स्वतः तो घडवत असतो.

स्वत:हून सेवाभावी कार्य चालवण्याबद्दल तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. पण भ्रष्ट आणि आस्थाहीन शासनामुळे आपण चालवलेल्या कार्यावर पाणी पडायची वेळ कधी ना कधी येतेच. अण्णा हजार्‍यांवर आली होती. म्हणूनच त्यांना जलसंधारण सोडून भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत उतरावं लागलं.

शासकीय अधिकारी, राजकारणी आणि व्यापारी या त्रिवर्गाचा फार मोठा प्रभाव उर्वरित समाजावर पडतो. जर हा अभिजन वर्ग नीतिमान नसेल तर बाकीच्यांची काय कथा! सेवाभावी संस्थांना या अभिजनांचा आर्थिक पाठिंबा जरूर मिळेल, पण प्रत्यक्ष उदाहरण पाहू जाता नीतिवान कमी आणि अनीतिवान जास्त असं दिसून येतं.

गुप्तरोगाचा फैलाव रोखण्यासाठी हा काटा (बॅलन्स) नीतिकडे झुकायला हवा.

आ.न्.,
-गा.पै.

असामी,

>> गा.पै. तुमच्याकडे आधीच्या नि आत्ताच्या समाजातील एकंदर गुप्तरोगांची लागण झालेल्या असलेल्या
>> लोकांची आकडेवारी आहे का ?

माझ्याकडे आकडेवारी नाहीये. कुणाचकडे नाहीये! Happy मलाही हवी होती. इथे डॉक्टर अशोक (बाफकर्ते) यांना विचारली होती.

शिवाय तुम्ही म्हणता तसं नीतिच्या कल्पना बदलत आलेल्या आहेत. त्यामुळे माझा युक्तिवाद नीतिवर बेतलेला दिसला तरी मुळातून सद्सद्विवेकबुद्धीवर आधारित आहे. चांगलं आणि वाईट यांत फरक करते ती सद्सद्विवेकबुद्धी. ही जागृत राखायला नैतिक आचरण असावं लागतं. (अन्यथा नीतिची गरज नाही.) सामान्य लोकांचं आचरण नीतिवान हवं असेल तर अभिजन नीतिवान असले पाहिजेत. भले नीतीच्या कल्पना वेगळ्या असतील, पण चांगलं काय आणि वाईट काय यांतला फरक कळला पाहिजे.

एक नेहमीचं उदाहरण देतो.

कोणे एके काळी चाळीसेक वर्षांपूर्वी माध्यमवर्गीय घरांत दारू निषिद्ध होती. मध्यमवर्गीय लोकं घ्यायचे, पण अगदी मर्यादित प्रमाणावर. तीही घरी नाहीच. बाहेर चोरून प्यायचे. हळूहळू दारूला प्रतिष्ठा लाभू लागली. साधारण वीसेक वर्षांपासून उंची पिणे हे मान्यत्वलक्षण (स्टेटस सिम्बॉल) होऊ घातलं. आज दारू जीवनाचा अविभाज्य अंग होऊन बसली आहे. भले आपल्यातले बहुतांश लोक सांभाळून पीत असतील, पण मुलांचा काय भरवसा द्यायचा? कुणाकडे मध्यमवर्गीयांची पिण्याची आकडेवारी आहे का? नसली तरी समस्या नाकारून चालेल का? मी पिणार नाही, किंवा अमुक इतकीच पिईन असं नैतिक बंधन हवंच ना? आणि ते मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना? जर मध्यमवर्गीयांची ही कथा, तर वंचितांचं बघायलाच नको. एकवेळ त्यांची बाहेरख्याली सवय घालवता येईल, पण मोसंबी-नारिंगी सोडवणं? फार अवघड आहे.

आ.न.,
-गा.पै.

भले नीतीच्या कल्पना वेगळ्या असतील, पण चांगलं काय आणि वाईट काय यांतला फरक कळला पाहिजे. >> जर ह्याच कल्पना कालानुपरत्वे बदलत असतील तर तुमच्या चष्म्यातून तुम्ही इतरांना कसे दोषी ठरवणार. दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी त्या समान तागडीमधे तोलाव्या लागतात. हेच इथे करता येत नाही त्यामूळे तुमच्या argument ला अर्थ नाही. असो.

असामी,

>> जर ह्याच कल्पना कालानुपरत्वे बदलत असतील तर तुमच्या चष्म्यातून तुम्ही इतरांना कसे दोषी ठरवणार

नीतिच्या कल्पना वेगळ्या आहेत म्हणून मी दोष देत नाहीये. नीति आणि अनीति यांच्यातला फरक नाहीसा झालाय. हे खरं दुखणं आहे. हा फरक पूर्वी होता. हल्ली नाही.

असो. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ६६ वर्षे झाली. त्याबद्दल आपल्याला आणि सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा!

आ.न.,
-गा.पै.

आज खूप दिवसांनी या धाग्यावर आलो. या प्रसंगावरील लेखाला (आणि अन्य काही लेखांना) जो प्रतिसाद लाभला त्यनं प्रेरित होऊन मी या लेखांचा संग्रह प्रसिद्ध केलाय. "खारीचं योगदान" त्याची लिन्क:
*
http://pothi.com/pothi/book/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%...
COVER-2.jpg

Pages