स्नबीची शेपूट

Submitted by मधुरा आपटे on 3 August, 2013 - 07:07

स्नबी नावाचा एक छोटासा गिनिपिग होता. केसाळ, अंगावर काळे छोटे ठिपके असलेला स्नबी खुपच गोड आणि गुबगुबीत होता. राजूच्या घरी स्नबी अगदी आरामात रहायचा. सकाळी उठायचा. भराभर न्याहारी करायचा, मग राजूबरोबर चांगलं दोन तास बागेत खेळायचा आणि त्यानंतर छानपैकी ताणून द्यायचा. स्नबीचा तर हा दिनक्रमच असायचा. राजूने तर स्नबीसाठी एक छानसा गुबगुबीत असा पलंगही तयार केला होता. त्यावर स्नबी चांगली दोन तीन तासाची वामकुक्षी घ्यायचा. अशा रितीने स्नबीचं आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं. त्याला कशाची म्हणजे कशाचीही चिंता नव्हती.
guinea-pig-clip-art-4.png
पण एके दिवशी मात्र काय झालं, राजू गेला होता त्याच्या आजीकडे रहायला. आता दुपारी काय करायचं, कोणाशी खेळणार आपण? या विचारात स्नबी बिचारा एकटाच बसला होता. त्याला भारी कंटाळा आला होता. आता कंटाळा कसा घालवायचा? त्याला काहीच सुचत नव्हतं. ‘आज आपण बागेच्या बाहेर गेलो तर खेळायला?’ स्नबी मनाशीच म्हणाला. कारण आत्तापर्यंत राजूने त्याला कधीच बागेच्या बाहेर खेळायला सोडलं नव्हतं ना!. त्यामुळे त्याला बागेच्या बाहेर जायची खूप उत्सुकता होती. ‘कसं असेल बाहेरच जग? तिथे पण माझे दोस्त होतील का? पण बागेच्या बाहेर गेलो आणि हरवलो तर? असं त्याने स्वतःलाच विचारलं. पण शेवटी मनाचा हिय्या करुन स्नबी हळूच बगीच्याच्या बाहेर पडला. ‘वा!... बगीच्याच्या बाहेरचं जग खरच खूप सुंदर आहे.’ स्नबी ते सौंदर्य न्याहाळत मोठ्याने म्हणाला. बगीच्याच्या बाहेरची जागा खरच खूप सुंदर होती. तिथे मोठं तळं होतं आणि त्याच्या बाजूलाच एक वडाचं मोठं झाड होतं. त्यावर एक खारुताई बसली होती. तिची छान झुपकेदार अशी मोठी शेपटी होती. आणि झाडावर बसुन ती स्वतःची शेपटी विंचरत होती. स्नबीचं एवढं मोठ्याने बोलणं ऐकुन तिने त्याला विचारलं ‘ए, कोण आहेस तु? आणि माझ्या वडाच्या झाडाखाली काय करतोयेस? ’. ‘मी स्नबी. ह्या समोरच्या बागेत रहातो मी. पण तु कोण आहेस?’ स्नबीने अगदी आश्चर्याने विचारलं. तेवढ्यात खारुताई सरसर वडाचं झाड उतरुन खाली आली.
‘मी खारुताई आहे आणि ह्या वडाच्या झाडावर माझी मोठी ढोली आहे. पण पहिले तु सांग तु कोण आहेस ते? मी तुझ्यासारख्या प्राण्याला कधीच बघितलं नाही. कोण आहेस तु? शेपूट नसलेला उंदीर की कान नसलेला ससा?’ खारुताईने हसत हसतच त्याला विचारलं.
‘खारुताई, मला खरच माहित नाही गं. मी कोण आहे ते. पण राजु मला स्नबी म्हणूनच हाक मारतो.’ स्नबीने प्रांजळपणे उत्तर दिलं.
‘पण मी स्नबी नावाच्या कुठल्याच प्राण्याला ओळखत नाही. मी ना एक काम करते. तुला नीट बघते म्हणजे आपल्याला कळेल. तु ससा आहेस की उंदीर आहेस ते.’ असं म्हणून खारुताई स्नबीचं अगदी बारकाईने निरीक्षण करायला लागली.
‘अय्या! तुला तर शेपटीच नाहीय स्नबी!’ स्नबीला शेपूटच नाही हे बघून खारुताई स्नबीकडे बघून मोठमोठ्याने हसायला लागली. त्याला चिडवायला लागली. इथे स्नबीला तर काहीच कळत नव्हतं.
‘माझी शेपूट? कशी असते ती?’ तो मनाशीच म्हणाला. खारुताईने स्वतःचं हसू दाबतच त्याला विचारलं.’ काय रे कुठे हरवली का तुझी शेपूट?’ पण बिच्चारा स्नबी! त्याला तर स्वतःची शेपूट कशी आहे हे देखील माहित नव्हतं. आणि खारुताईच्या झुपकेदार शेपटीकडे बघून तर त्याला काहीच आठवत नव्हतं.
‘खारुताई आता काय करायचं?’ स्नबीने रडतच खारुताईला विचारलं. ‘मला माहित नाही गं, माझी शेपूट कशी आहे ते.’ ‘अरे स्नबी, रडतोस कशाला? ऐक, आपण एक काम करु. आपण बाकीच्यांना विचारु त्यांनी पाहिली आहे का तुझी शेपुट. घाबरु नकोस, तुझी शेपटी तुला नक्की मिळेल.’ खारुताईच्या ह्या बोलण्याने स्नबीला जरा धीर आला. आणि मग ते दोघजणं बदक काकांकडे गेले. बदक काका आपले पंख स्वच्छ करत तळ्याकाठी बसले होते.
‘बदक काका, आम्हाला ना तुमची मदत हवीय.’ खारुताईने त्यांना सांगितलं.
‘बोल काय मदत करु मी? आणि हा तुझ्याबरोबर प्राणी कोण? मी अशा प्राण्याला कधीच बघितलं नाही इथे’ बदक काकांनी डोळे बारीक करुन स्नबीकडे पाहिलं.
‘काका, हा स्नबी आहे. समोरच्या बागेत रहातो. अहो, याची ना शेपटीच हरवलीय. आणि ह्याला आठवतच नाही आहे की त्याने ती कुठे हरवली.’
‘काका, तुम्हाला दिसली का ती कुठे?’ स्नबीने बदक काकांना विचारलं.
‘नाही मला नाही दिसली. तुम्ही बंटी कुत्र्याला का नाही विचारत? तो हरवलेली गोष्ट अगदी पटकन शोधुन देतो. तो नक्की तुम्हाला मदत करेल.’
‘खरच?’ स्नबी आणि खारुताईने एकदम विचारलं.
‘हो नक्की शोधुन देईल. चला आपण सगळेच जाऊ त्याच्याकडे.’ असं म्हणून बदक काकांनी आपलं अंग झटकलं. आणि ते तळ्याच्या पाण्यात उतरले. खारुताई आणि स्नबीला त्यांनी आपल्या पाठीवर घेतलं आणि वेगाने तळ्याच्या दुस-या टोकाला पोहत जाऊ लागले.
बंटीच्या मालकाने त्याला तळ्याच्या दुस-या टोकाला एक छोटसं घर बांधून दिलं होतं. आणि त्यात तो आरामात रहात होता. बदक काका, खारुताई आणि स्नबी सगळे बंटीच्या घरापाशी आले. बंटी दुध-भाकरी खाण्यात मग्न होता.
‘बंटीभाऊ….’ खारुताईने त्याला हाक मारली.
‘तुम्ही आज सगळेजण इकडे कसे?’ बंटीने अगदी आश्चर्याने विचारलं.
मग बदक काकांनी बंटीला सारी हकिकत सांगितली.
‘हात्तिच्या, एवढच ना! मी देतो शोधुन तुम्हाला. माझ्यासाठी काही फार कठीण काम नाही ते.’ बंटीने मोठ्या अभिमानाने सांगितलं. मग बंटीने एका फटक्यात सगळी दूध-भाकरी संपवली. त्याला शेपटी शोधायचं महत्त्वाचं काम करायचं होतं ना!
‘सांग बरं, कशी दिसते तुझी शेपुट?’ बंटीने स्नबीला विचारलं.
‘अरे बंटी, त्याला नाही आठवत! तु एक काम कर अशी छोटीशी पण लांब असलेली शेपटी घेऊन ये.’ खारुताईने बंटीला सांगितलं.
‘हा गेलो आणि हा आलो’ असं म्हणून बंटी धावतच शेपटी शोधायला गेला.
पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला, एक तास झाला…..तरी बंटी काही शेपटी घेऊन आला नव्हता. इकडे स्नबी, खारुताई काळजीत होते. तर बदक काका बंटीची वाट बघत येरझा-या घालत होते. तेवढ्यात त्यांना बंटी लांबुन येताना दिसला. सगळे खुप खुष झाले. स्नबी तर आता आपल्याला शेपुट लावल्यावर आपण कसे दिसु याच विचारात होता. पण नेमकं उलटच झालं…..बंटीला शेपूट मिळालीच नाही. आता काय करायचं? सगळे काळजीत पडले. स्नबीला शेपूट मिळाली नाही तर त्याला सगळं आयुष्य बिनाशेपटीचं काढावं लागेल. सगळे त्याला चिडवतील. लांडाभूंडा स्नबी असं म्हणतील. कोणाला काहीच सुचत नव्हतं. बदक काका तोपर्यंत तळ्यातल्या माशांनाही विचारुन आले,पण कोणालाही स्नबीची शेपूट मिळाली नाही. तेवढ्यात बंटीला एक कल्पना सुचली.
तो म्हणाला ‘ इकडून थोडं दूर एक जादुगार रहातो. तो आपल्या जादूने स्नबीची शेपूट नक्कीच परत आणेल. तुम्हाला काय वाटतं दोस्तांनो?
‘हो चालेल. त्याच्याकडेच जाऊ आपण’ बदक काका म्हणाले.
‘पण त्याला माझी शेपूट परत आणता आली नाही तर….’ स्नबीने काळजीने विचारलं. ‘मला शेपुट नाही मिळालं तर मी मग सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा ठरेन. मग मला कोणीच खेळायला घेणार नाही. राजु माझ्यावर प्रेम करणार नाही’ स्नबी तर रडायलाच लागला.
‘काळजी नको करु स्नबी. आम्ही सगळे आहोत ना! आम्ही तुझ्याशी नक्की खेळू. तुला अजिबात चिडवणार नाही.’ खारुताई स्नबीला समजवायला लागली.
बदक काकांनी स्नबीच्या पाठीवरुन हात फिरवला. आणि त्याला प्रेमाने म्हणाले ‘स्नबी, तुला जरी शेपुट नाही मिळाली तरी राजू तुझ्यावर नक्की प्रेम करेल. शेवटी तु त्याचा मित्र आहेस की नाही? आणि आपण शेपटी शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत की.’
‘जायचं ना मग जादुगाराकडे?’ तिघांनी त्याला विचारलं.
स्नबी मोठ्या आनंदाने तयार झाला. सगळे धावत-पळत जादुगाराकडे गेले. जादुगाराकडे पोचल्यावर त्यांनी त्याला सगळी गोष्ट सांगितली. शेपटी शोधण्याचा प्रयत्न कसा केला ते ही सांगितलं. सगळ्यांनी जादुगाराला स्नबीला शेपटी परत देण्याची विनंती केली. जादूगारानेही ती आनंदाने मान्य केली. त्याने स्नबीला त्याच्या जवळ बोलवलं. त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. आणि एक मंत्र म्हटला. पण..... ‘अरेच्चा! शेपूट कशी मिळाली नाही?’ जादुगार मनाशीच म्हणाला. आश्चर्याची गोष्ट होती. जादू करुनही स्नबीला शेपूट परत मिळालीच नाही. जादूगार बिच्चारा काळजीत पडला. आता काय करायचं? त्याने परत हात फिरवला. मंत्र म्हटला. पण परत तेच. स्नबीला शेपुट आलच नाही. जादूगाराने स्नबीला अगदी बारकाईने न्याहाळलं. आणि मग सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो मोठमोठ्याने हसायला लागला.
‘काय झालं?’ सगळ्यांनी कुतुहलाने जादूगाराला विचारलं.
‘अरे वेड्यांनो, स्नबीला शेपूट मिळणारच नाही!’
‘का?’ सगळ्यांनी अगदी आश्चर्याने विचारलं.
‘कारण हा गिनिपिग आहे. त्यांना शेपूट नसते. ते जन्मतः बिना शेपटाचेच असतात.’ जादुगाराने हसत हसत सगळ्यांना सांगितलं.
जादूगाराचं हे बोलणं ऐकुन बंटी, बदक काका, खारुताई आणि स्नबी मोठमोठ्याने हसु लागेल. स्नबीला खूप आनंद झाला. कारण त्याला कळलं होतं की गिनिपिगना शेपटीच नसते. आणि शेपटी नसली तरी राजू आणि त्याचे बाकी मित्र तरी त्याच्याशी खेळणार होते. मग जादूगाराने सगळ्यांनी शेपटी शोधायचे केलेले प्रयत्न बघून बक्षिस म्हणून छान छान भेटवस्तू दिल्या. आणि तेव्हापासून बंटी,बदक काका, खारुताई आणि स्नबी एकमेंकाचे पट्ट मित्र झाले. राजूबरोबर हे सगळे दोस्तं एकत्र खेळतात. तुम्हाला ते कधी दिसलेच, तर त्यांच्याशी नक्की दोस्ती करा हं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users