वेदना

Submitted by वैजयन्ती on 4 June, 2009 - 01:47

वीणाने डोळे उघडले. डोळ्यान्वर अजून गुन्गी होती.आजुबाजुच्या औषधान्च्या वासाने तिला आपण कुठे आहोत याची जाणिव झाली. गुन्गीशी झगडत तिने उठून बसण्याचा प्रयत्न केला. शेवटी थकून जाउन तिने आजुबाजूला पाहिले. बेलवर नजर गेल्यावर किन्चित वाकून तिने बेल वाजवली आणि उशीवर डोके टेकले...

खरे म्हणजे आजचा दिवस किती आनंदाचा ठरू शकला असता तिच्या आयुष्यात. आई दादांचे हसरे चेहेरे... त्यांच्या आवाजातून डोकावणारी खुषी या सगळ्यामुळे अगदी सहजपणे ती हा थकवा, ही वेदना विसरु शकली असती. वेदनांचा तो महापूर आठवून ती आत्तासुद्धा घाबरली. पाठीवरुन फिरणारा मायेचा हात तिला या वेळी सर्व सामर्थ्य देवुन गेला असता.. पण.. पण.. तसे व्हायचे नव्हते. एक सुस्कारा सोडून ओठ दाताखाली धरुन तिने डोळ्यातील पाणी परत फिरवले.

"Yes, what do you want?" दिवसपाळीची ती सौम्य चेहेर्याची नर्स तिला विचारत होती. नर्सने हातावर ठेवलेल्या हाताने तिला थोडे शांत वाटले. डोळ्यातले पाणी आवरत नर्सचे तिने आभार मानलले. "आई वडलानी सुद्धा पाठ फिरवली..." तिने नर्सला सांगण्याचा प्रयत्न केला. वीणाच्या हातावर थोपटून किंचित हसल्यासारखे करत शान्तपणे ती म्हणाली "They may have their own problems.. It is not easy to fight the society. OK, what do you want? Why did you call?" "I want to see my son... just once" डोळ्यातले पाणी मुक्तपणे वाहू देत वीणा उत्तरली "If you insist.." नर्स म्हणाली. " but, my experience is, it will be more painful to part." क्षणभर विचार करुन वीणाने मान हलवली.. " नाही.. नाही.. त्याच्या भविष्याच्या आड मी येणार नाही. फक्त एकदाच पाहूदे त्याला. नऊ महिने उरात बाळगलय मी त्याला... एकदाच त्याला स्पर्श करू दे... एकदाच... फक्त एकदाच..." वीणाच्या त्या केविलवाण्या बोलण्यावर "तुझ्याच साठी सान्गत होते. ठीक आहे" म्हणत ती नर्स निघून गेली.

पाचच मिनिटात दाराबाहेर पावले वाजली. धडधडत्या काळजाने वीणाने वर पहिले. नर्स एक चिमुकले गाठोडे घेवुन उभी होती. तिच्या हातातलं श्रमाने थकलेलं ते छकुलं शान्तपणे झोपलं होतं. नि:शब्दपणे नर्सने तिच्या हातात बाळाल ठेवलं आणि समजुतदारपणे ती बाहेर गेली.

बाळाच्या दाट जवळातुन हात फिरवताना तिच्या अन्गावर आनन्दाची लाट फुलली. बाळाला अगदी घट्ट उराशी धरून हळुवारपणे तिने त्याचे पापे घेतले. त्याच्या चेहेर्‍या वरुन हळूच ओठ फिरवले. कोवळ्या शेन्गेतील ओलसर लालचुटुक दाण्यासारखे दिसणारे त्याचे ओठ हळूच हलले.. पापण्या थरथरल्या.. ती शहारली.. कसा होता तो स्पर्श? फुलासारखा? लोण्यासारखा? फु्लपाखराच्या पन्खासारखा? मोरपिसासारखा? दाट जावळ, सरळ नाक, ठळक भुवया.. अगदी मामासारख्या... मनात येवुन ती कसनुशी झाली. याचेच आगमन जर चारचौघींसारखे आपल्या लग्नानन्तर झाले असते तर आज सगळे घर खुशीने नाचले असते.. बाळ कोणासारखा दिसतो ते ठरवण्याच्या स्पर्धा लागल्या असत्या... पण.. तिने विषादाने मान झटकली. त्याला परत एकदा जवळ अगदी जवळ घेत त्याचा चेहेरा आपल्या चेहेरर्‍याच्या अगदी जवळ आणून जावळाचा बाळगन्ध मनात साठवून घेताना मात्र तिचा बान्ध फुटला.

"नाही रे... कशी ठेवू मी तुला माझ्याजवळ? हा समाज नाही रे, तुला किंवा मला सुखाने जगु देणार नाही. आज तुला मी येथेच ठेवले तर तुला सुखाने जगायची, फुलायची थोडी तरी सन्धी आहे... माझ्या स्वार्थी मोहात गुन्तुन तुला माझ्याच जवळ ठेवले तर.. काय तुझे भविष्य असेल? समजून घेशील ना बाळा...? जगातली सर्व सुखं तुला मिळोत बाळा.. या करन्ट्या आईच्या पोटी आलास तू.. तुला पदराखाली घेउन तुझी भूक भागवायलासुद्धा ती असमर्थ आहे राजा. तुला पाठीशी घालून या दुष्ट जगापासून तुझं रक्षण खरं तर तिनेच करायला हवं, पण ती दुबळी आहे सोन्या. खूप खूप मोठा हो राजा आणि आईला क्षमा कर.. " वीणाचे विचार सैरभैर धावत होते. "बाळा, माझ्याकडे तुला मोठं करायची , समाज तुझ्याकडे बोटे दाखवेल, ते सहन करण्याची ताकद नाही. माझे आयुष्यच मला लोढणे झाले आहे.. तुझे आयुष्य मी काय फुलवणार? तुझ्या उद्याचा, विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे बाळा.. फक्त, जर तुला जमलं तर, या अभागी आईसाठी मनात एक कोपरा ठेव.
कोणत्याही क्षणी नर्स किंवा डॉक्टर येऊन बाळाला घेऊन जातील हे तिला समजत होतं, पण वेड्या मनाला उमजत नव्हत. बाळाच्या चेहेर्‍या वरून अलगद हात फिरवताना तिची नजर त्याच्या हनुवटीकडे गेली. हनुवटीवरईल खळी कडे विस्मयाने पहात तिने हळूच आपले बोट त्या खळीवर ठेवले.
............
"हनुवटीवर खळी असलेली माणसे भाग्यवान असतात आणि सर्वांची लाडकी." मांडीवरच्या वसुधाला कुरवाळत आई मावशीला सांगत होती. "बघ माझी वसु मोठी भाग्याची होईल." आई म्हणाली, बाजुलाच उभ्या असलेल्या ८/९ वर्षांच्या वीणा कडॆ पूर्णपणे दुर्लक्ष करत. आपल्याच रुपावर गेलेल्या वसुचा तिला फार अभिमान होता.
आपण का बरं आईल आवडत नाही? वसुइतके आपण गोरे नाही म्हणून? वीणा तिच्या वयाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे आईच्या वागण्याचा अर्थ शोधु लागली. हे नेहेमीचेच होते. ओढ्गस्तीच्या संसारात, लग्न झाल्या झाल्या वर्षातच पदरात आलेल्या वीणाचा आईला कायम रागच होता. हिच्यामुळे आपल्याला आयुष्यात काही हौसमौज करता आली नाही आणि त्यात रुपाने सुमार.. आपल्याला न शोभणारी अशी काहितरी चमत्कारिक अढी आईच्या मनात वीणाबद्दल होती. गोरीपान देखणी वसु देखणी म्हणून आणि पाठचा विश्वास मुलगा म्हणून तिचे लाडके होते. सामान्य रुपाची शान्त स्वभावाची वीणा कुणाच्या खिजगणतीतच नव्हती. दादाना त्यान्च्या ऑफिसच्या कामापयी मुलान्कडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. ओढ्गस्तीच्या सन्सारात कावलेल्या आईला आपल राग काढायला फक्त वीणाच मिळायची. मुम्बईच्या एका कोपर्‍यातल्या त्या लहानश्या घरात वीणा आपली आपणच वाढू लागली.
हळू हळू ती अबोल कुढी आणि घुमी होत गेली. आपण बरे आणि आपल अभ्यास बरा. अश्या वृत्तीची वीणा शाळेत मात्र शिक्षकांची आवडती होती. दहावीच्या परिक्षेत वीणा शाळेत प्रथम आली. चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन इंजिनिअर होण्याच्या तिची स्वप्नं ही स्वपनंच राहिली. आई वडिलांच्या हातात असलेली पुंजी तीन मुलांच्या शिक्षणासाठी पुरी पडण्यासारखी नाही हे समजून कोणी सांगण्याच्या आधीच तिने कॉमर्सला प्रवेश घेतला, एकिकडे काहीतरी कामे करून आई वडलान्च्या सन्साराला हातभार लावता यावा म्हणून शिकवण्यांपासून सुरु करून तिने झेपतील ती कामे करुन आई वडलान्च्या संसाराला हातभार लावत आपले शिक्षण चालूच ठेवले. B.Com. होण्या आधीच तिला आतिथि सारख्या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये चांगली नोकरी पण मिळाली. मृदु बोलणे, माझे तुझे न करता सतत काम करणे, शांत आणि सहजपणे न डगमगता निर्णय घेण्याचा तिचा स्वभाव यांनी तिला हात दिला. आतिथिमध्ये तिचा चान्गला जम बसला. तिच्या कामावर खूष असलेल्या मॅनेजमेंट्ने तिचा पगार भराभर वाढवत नेला. तिच्या नोकरीमुळे घरात थोडे आर्थिक स्थैर्य दिसू लागले. तिला मिळणार्‍या पैश्यांची घरादाराला सवय झाली. म्हणता म्हणता वीणा तिशीला आली. पाठची भावन्डे आयुष्यात स्थिरावली. वीणाच्या लग्नाचा विषय आपण होवून कधी आई दादानी काढलाच नाही. घरात येणार्‍या पैश्यांच्या सवयीने मिन्धे झालेले आई दादा "काय करणार... सुमार रूप... जिकडून तिकडून नकारघंटाच..." अश्या बहाण्यानी तिच्या लग्नाचा विषय बाजूला ढकलू लागले.
बरोबर काम करणार्‍या इश्वरसिंग मध्ये वीणा कळत नकळत गुन्तत गेली. तो विवाहित असल्याचे माहीत असूनही ती स्वत:ला आवरू शकली नाही. नुक्तीच लग्न झालेली भावंडे, मैत्रिणी.. त्यान्चे आपापल्या संसारात रमणे, जाणवणारा एकटेपणा आणि स्वत:च्या शरीराचे बंड यानी तिला कसे वहावत नेले ते तिला कळले पण नाही. वीणा भानावर आली तेव्हा खूप उशीर झालेला होता. आई दादांकडून मदतीची काही अपेक्षा करण्यातही काही अर्थ नव्हता. इश्वर तर केव्हाच हात झटकून मोकळा झाला होता. धाकट्या विश्वासने तिला या केरळातल्या हॉस्पिटलचा पत्ता कुठूनतरी शोधून काढून आणून दिला आणि तिच्याच पैश्यांनी तिकिट काढून गाडीत बसवून दिले. नोकरीला लागल्यापासून न घेतलेली रजा आता तिच्या कामी आली.
तिच्यासारख्या अनेकांना त्या हॉस्पिटल मध्ये मदत होत होती. बाळाला जन्म दिल्यावर कायदेशीर कागदपत्रांवर आईची सही घेऊन ते बाळ दत्तक देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे उपलब्ध केले जाई. मात्र, त्या बाळाला कुठे दत्तक दिले आहे या बद्दल पूर्णपणे गुप्तता बाळगली जात असे.

वीणा त्या हॉस्पिटलअमध्ये जावून पोचली. तिकडेच तिची रहाण्याची व्यवस्था होती. नाहीतरी घरात कोणाला पर्वा होती ती कुठे होती त्याची. "बाई ग, आयुष्यात फक्त चिंताच दिल्यास तू. हे सभ्य माणसाचे घर आहे. आम्हाला या समाजात उजळ माथ्याने रहायचे आहे अजून. तुझं तूच काय ते बघ. या घरात या पापाल थारा नाही" अशा शब्दात आईने आपल्याला तिच्या जबाबदारीतून मुक्त करून घेतलं. तिच्याशी संपर्क सुद्धा ठेवायची त्यान्ची तयारी नव्हती.

मनावरच्या आत्यन्तिक ताणासह तिने ते दिवस कसे बसे ढकलले. अखेर तो दिवस उजाडला. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यन्त सुखाचा आणि भीतीचा, हुरहुर वाटणारा दिवस.. पण वीणाच्या नशिबात या दिवसाचे सूख, कुटुम्बाचा आधार असे काहीच नव्हते. तिच्याचसारख्या परिस्थितीतील इतर स्त्रिया आणि नर्सेस यांच्या आधारावर तिने स्त्रीच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे दिव्य पार पाडले. बाळाचे रडणे ऐकले... "A boy! You have a son." हे डॉक्टरान्चे उद्गार ऐकले आणि नंतर तिला जाग आली ती तिच्या खोलीत औषधान्च्या वासाने.
..........
तिच्या समोर नर्स उभी होती. "देतेस ना त्याला?" विचारत. बाळ जगावरच्या पूर्ण विश्वासाने आईच्या हातात गाढ झोपला होता. अजून जगाच्या चांगुलपणावरून त्याचा विश्वास उडायचा होता. आईच्या कुशीत असताना कोण मला काय करील या खात्रीनेच जणू तो अगदी निर्धास्त होता. " कसा याचा विश्वासघात करू? नर्स, काही दिवस तरी मी पण इकडे राहू शकते. तो पर्यन्त तरी त्याला माझ्याकडे राहू दे" कळवळून वीणा म्हणाली. " ते त्याच्या किंवा तुझ्या... कोणाच्याच हिताचे नाही. तुझा निर्णय तू बदलणार आहेस का? इकडेच न ठेवता त्याला वाढवणार आहेस का? विचार कर." त्रयस्थपणे पण सौम्यपणे नर्स तिला म्हणाली.
परिस्थितीची जाणीव होवून वीणाने बाळाच्या अंगावरून मायेचा हात फिरवला. "मोठा हो.. सुखी हो... खूप खूप प्रेम, माया तुला मिळू दे." तिच्या डोळ्यातल्या पाण्याने बाळाचे दुपटे भिजत होते. "बाळा, रोज तुझ्यासाठी माझ्या मनाचा एक कोपरा काळजी करत राहील... चिन्ता करत राहील. तुझी दिसामासाने वाढणारी मूर्ती मी मनानेच पाहीन. तुला जन्म दिला खरा पण एकदाही तुझ्या डोळ्यात पाहून मला मी तुझी आई असे सांगता येणार नाही..." वीणा स्वत:शीच पुटपुटली. जणू ते समजल्यासारखेच बाळाने डोळे उघडले. त्याच्या दृष्टीला वीणाची दृष्टी मिळताच खुद्कन हसून तो परत शान्त झोपला. एव्हढ्याश्या बाळाला कहीही समजले नसेल, त्याची नजर आपल्यावर स्थिरवली असणे शक्य नाही हे माहीत असूनही वीणाला नकळत थोडे शांत वाटले. नर्सला तिने नुसती मानेनेच खूण केली. बाळाला उचलून नर्स केव्हा गेली हे डोळ्यातल्या पाण्यामुळे तिला कळले ही नाही.
सर्व कागदपत्रांवर सह्या करून रिकाम्या हाताने... रिकाम्या ओटीने वीणा परत निघाली... आई दादांच्या संसाराचा भार उचलायला.......
..........
काळोख कधी पडला? लक्षात पण नाही आलं... म्हणत मी स्टेशनवरून उठले. हल्ली असच व्हायला लागलय. आई नक्की म्हणाली असती "सूख खुपतं म्हणतात ना माणसाला." समोर असलेली माणसं, आजूबाजूला चालू असलेल्या घटना यांचं मधेच भानच जातं. ठीक आहे म्हणा झाली की ६५ वर्षं. पण समोरच्या गर्दीत जेव्हा मी कोणाला तरी शोधत चालते... गर्दीच्या रस्त्यांवर, स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरची गर्दी न्याहाळत तासन्तास बसते तेव्हा लोकाना चमत्कारिक वाटणं पण सहाजिकच आहे. पण मग लोक लहरी कलावन्ताची प्रतिभासाधना वगैरे असे स्वत:चेच गैरसमज करून घेतात. तसे आहे म्हणून ठीक आहे.

हो.. ही माझीच पहिली कथा. या कथेनेच मला सुप्रसिध्द पटकथाकार निशादेवी बनण्याचा रस्ता दाखवला. माझाच कथा लेखनाचा बत्तीस वर्षांचा काळ सहजपणे डोळ्यासमोरून सरकला. १९७६ च्या दिवाळी अंकात नवोदित लेखकांचे प्रथम पारितोषक मिळालेली ही माझी पहिली कथा... तिथून मग मी मागे वळून पाहिलच नाही. उत्तम कथा लेखिका म्हणून नाव कमावलं, पैसा सुद्धा कमावला. पटकथाकार म्हणून असलेली, घमेण्ड्खोर, माणूसघाणी अशी टिपिकल, लोकांच्या मते लहरी कलावंताची कीर्ती पण माझ्या नावाला जोडली गेली. इतर अनेक नावे पण माझ्याबरोबर जोडली गेली. काही खरी... काही खोटी.. मी ना कधी लोकांची पर्वा केली ना समाजाची. माझ्या मनाला पटेल तशीच वागले. आई नी पपा सुद्धा मला वचकून असत. दादाकडे त्याच्या वाढत्या संसाराशी ऍडजस्ट करत रहाण्यापेक्षा माझ्याकडे रहाणे त्याना सोयीचे होते, आणि मला सुद्धा ते जवळ असण्याचा फायदाच होता. मात्र, "निशु, बाळा अग लग्नाचं मनावर घे आता.... एव्ह्ढं काही वय नाही झालं तुझं" असं म्हणणार्‍या आईला मी एकदाच थंडपणे तू यात पडू नको असं सांगून बाजूला केलं होतं.
आता आई नि पपा दोघेही नाहीत. माझीसुद्धा साठी गेली आता उलटून. आता कधीतरी अगदी एकटं वाटतं. आता वाटतं हा स्वत:चच खरं करणारा लोकाना, लोकापवादाला जराही भीक न घालणारा आणि स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी घेणारा माझा स्वभाव यशाच्या चवीने असा घडत गेला. त्याचा मला काडीचाही पश्चात्ताप नाही.... पण... हाच माझा स्वभाव मुळातला असता तर एक कुंती कदाचित कुन्ती नसती झाली.. एका कर्णाला आईपाशी रहाण्याचं भाग्य लाभलं असतं. माझी चूक माझं आयुष्य जाळतेय बाळा. म्हणूनच तर मी जिकडे तिकडे तुला शोधत भटकत असते.. आज हे सर्व उघड करण्याचाही तोच हेतू आहे बाळा... जर तुला तुझी जन्मकथा थोडीशी माहिती असेल, जर तुला तुझी कुन्ती असे लिहिलेला आणि तुझ्या सामानात माझी खू्ण म्हणून दिलेला ताईत कोणी दाखवला असेल... तर एकदाच आईला भेटायला ये रे बाळा....
............

सकाळी सकाळी घणघणार्‍या फोनने डॉ. विवेक साने जागे झाले. "कोण असेल? " काहिश्या आश्चर्यानेच त्यानी फोन उचलला. नुक्तेच, १५ दिवसांपूर्वी ते इकडे रहायला आले होते. निशादेवींच्या बंगल्या शेजारचा त्यांचाच दुसरा बंगला त्यानी हॉस्पिटल साठी भाड्याने घेतला होता. तिकडे फर्निचर करण्याचे काम चालू होते. अजून पेशंट यायलाही सुरुवात झाली नव्हती आणि कोणी ओळखीचं पण नव्हतं... निशादेविंच्या घरून फोन होता. त्याना लिहिता लिहिता अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं... डॉ. पोचले तोपर्यन्त सगळा खेळ संपला होता. त्यांच्या आवडत्या लेखिका आता या जगात नव्हत्या... कुतुहलाने त्यांनी त्या लिहित असलेल्या डायरीवर नजर टाकली आणि स्वत:च्या नकळत ते वाचू लागले... त्यांचा हात त्यांच्या जुन्या लकबीप्रमाणे हनुवटीवरील खळी कुरुवाळत होता... आणि "तुझी कुंती" असे कोरलेला ताईत त्यंच्या गळ्यात मागे पुढे डुलत होता.

गुलमोहर: 

My God!!!!!!!!!!

Ultimate yaar , Ultimate!
कथेचा Flow खुपच सुन्दर आहे.

खुप सुंदर कथा! तिच ते वागणं रुचलं नाहि.. पण असहि होत असेल कुठेतरी..

वाव!!!!!!
झकास!!!! यापेक्षा काहीच लिहु शकत नाही!!!!!!

अतिशय ह्रदयस्पर्शी कथा!!! अप्रतिम !!!

Searching for search engine optimization services? Your search ends here!!! find your website on the top of search engines with our seo services...

छान!! कथा वाचुन मन सुन्न झालं.

हं....उत्तम लेखनशैली.
कर्ण बनणं कुठल्याही अभागी जीवाच्या वाट्याला येऊ नये. माझ्यालेखी कुंतीला क्षमा नाही.

अतिशय सुंदर कथा..आवडली.

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

वाह!!!! खूप आवडली कथा, पण मन सुन्न झालं.

पु.ले.शु.

========================
बस एवढंच!!

अरे, काय फ्लो आहे... सुरेख मांडणी. तसा घासला गेलेला विषय असूनही, किती सुंदर फुलवलाय!...

सुरेख कथा!

आई, तुमचं मायबोलीवर सहर्ष स्वागत... लिहित्या राहालच. छानच लिहिता आहात.

दादला अनुमोदन.
कथा आवडली.

सुजाता, किरण, भावना, कविता, डब्बो, ड्रीमगर्ल, शिवम, अश्विनि, मोकाट, अक्ष्ररी, मनिष, दाद, तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूपच छान वाटले. अगदी मनापासून धन्यवाद
भावना, खरं म्हणजे तिलाही मनापासून स्वत:चं वागणं रुचत नाही. पण तिची अधान्तरी अवस्था सर्वांपर्यन्त पोचवण्यात मी कमी पडले असे वाटते. असो, तुमच्या प्रतिक्रियेचे मनापासून आभार. तसच, अश्विनि, मला नाही वाटत कुन्तीनेही कधी स्वत:ला क्षमा केली असेल. मलाही तुमचं म्हणणं खरच पटतं. दाद, तुम्ही दिलेल्या उत्तेजनबद्दल धन्यवाद... मंदीच्या कृपेने आता पन्नाशीनंतर भरपूर वेळ हातात आला आहे. खरंच लिहायचा विचार आहे. (हे शेवटचे वाक्य जरा धमकीवजा वाटते काय? )

वैजयन्ती

भानसा, तुमचेही खूप खूप आभार.
वैजयन्ती

कथा सुंदर आहे. आवडली. पु.ले.शु.
_______________________________
"शापादपि शरादपि"

श्रद्धा आणि श्रुती, धन्यवाद ग. बरं वाटलं.
वैजयन्ती

फ्लो मस्त आहे पण मला शेवट फारच ऑब्व्हियस वाटला. IMHO

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

एका आईने दुसर्‍या आईची व्यथा सुरेख मांडली आहे.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

खुप मस्त्,वाचुन एकदम सुन्न झाले...

छान आहे कथा.. छान खुलवलीये, रंगवलीये...
पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा....
--------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

Pages