समज

Submitted by विजय देशमुख on 30 July, 2013 - 00:56

"मे आय कम इन सर"
"हा ये ये.. बस..."
तो मात्र तसाच उभा...
"अरे बस"
"नाही सर ... मी ठिक आहे.."
"अरे बस... बराच वेळ लागेल..." तो अवघडत बसला. खरं तर इतर कोणी असता तरी त्याच्यासमोर तो अवघडला नसताच. पण डीनसर.... त्यांच्याविषयी त्याला आणि सगळ्या कॉलेजलाच आदरयुक्त भिती होती. तो खाली मान घालुन बसला होता.
"काय घेणार चहा की कॉफी?"
"न.. नाही सर नको..." तो अधिकच अवघडला.
"हा ऑप्शन नाही तुला.... चहा की कॉफी..."
"च ... चहा चालेल..सर."
"बरं... " सरांनी बेल वाजवुन 'स्पेशल चहा' सांगीतला.
"पाच मिनिट लागतील, हे संपवतो, मग बोलू" सर काहीतरी टाईप करत होते. त्याला थंडगार एसीतही घाम फुटत होता. एकतर त्याने त्याच्या जवळजवळ सगळ्याच शिक्षकांशी पंगा घेतलेला... आजकाल तर तो सगळ्यांना 'असह्य' झालेला. वर्गात तो दर तासाला फार फार तर ५-१० मिनिटे असायचा... मग वर्गाबाहेर उभा. पहिलं सेमेस्टर कसं बसं गेलं. पाच पैकी चार विषय निघाले, एक लटकला. आता या सेमला त्यावरुनही टाँटिंग... मग त्याचं उभं बोलणं आणि 'तू आमच्याशी ऑर्ग्यु करतोस... हो बाहेर' म्हणत पुन्हा तेच...
काल डीनसरांनी बघितलं असणारच.
"सर..." प्युनने आवाज दिला तसं सरांनी वर बघितलं. ट्रे मधला ग्लास त्याच्यासमोर ठेवायची खूण केली.
"घे" असं म्हणुन ते पुन्हा कंप्युटरवर टाईप करायला लागले. ग्लासकडे त्याचं लक्ष गेलं तर त्यात चहाच्या ऐवजी सरबत? त्यानं स्वतःलाच हळुच चिमटा काढुन बघितला. ते सरबतच होतं. सरांनी सरबत स्वतःसाठी बोलावलं की काय असं त्याच्या मनात येउन गेलं.
"सर, पण हे सरबत आहे..."
"माहिती आहे मला... घे... छान थंड आहे..."
त्याने चुपचाप ग्लास ओठाला लावला. सर कदाचित सस्पेन्शन लेटरतर टाइप करत नाही ना, या विचाराने पुन्हा एकदा त्याला अस्वस्थ वाटलं.
"हं कसं आहे सरबत?"
"अं ... हो चांगलं आहे.." तो भानावर आला.
"सरबत पाहुन तुला आश्चर्य वाटलं का?"
"अं हो म्हणजे तुम्ही चहा सांगीतला आणि..."
"हे कॉलेज आहे... हॉटेल नाही, नाही का?" सरांनी त्याच्याकडे रोखुन बघत म्हटले. सरांना नेमकं काय म्हणायचय ते त्याला कळत नव्हतं. काल कँटिनमधली वादावादी सरांपर्यंत पोहचली की काय?
"हॉटेलमध्ये तुम्ही दिलेल्या पैशातुन जसा वेटरचा पगार होतो, तसच तुमच्या फीमधुन आमचाही, पण आम्ही म्हणजे वेटर नाही..." नक्कीच कोणीतरी पीन मारली असणार. त्याने असच काहीसं वाक्य कॅटीनमध्ये म्हटलं होतं आणि तिथे कम्युनिकेशनवाली मॅड्मही होती.त्याला कालचा प्रसंग आठवत होता... मॅड्मसोबत मोठ्या आवाजात बोललो ते... बहुदा म्हणुनच बोलावलं असावं...
"बरेचदा जीवनात असच होतं..."
"अं ..."
"म्हणजे आपण जे अपेक्षित करतो तसं होत नाही, काहीतरी नविन आपल्यासमोर येतं, मग आपली चिडचिड होते... चहाच्या ऐवजी सरबत मिळालं तर जसं वाटते तसं..."
त्याला हे गुढ बोलणं कळतच नव्हत... तो अजुनही मॅडमसोबतच्या भांडणाचाच विचार करत होता.
"पण सर माझी काहीच चुक नव्हती. त्या मॅडमनीच मला आधी सुनावलं"
"कोण मॅडम?"
"कम्युनिकेशनच्या ...."
"त्यांच काय?"
"म्हणजे त्यांनी तक्रार केली ना माझी"
"नाही... म्हणजे तू तक्रार करण्यासारखं काही केलं असतं तर केली असतीच म्हणा. पण जाऊ दे, तो विषय नाही आपला..."
"..........." तो मनातुन जरा आनंदी झाला. मॅडमने तक्रार केली नाही हे त्याला जरा विचित्र आणि आश्चर्यकारक वाटलं.
"तुला १२वीला किती % होते रे?"
"अं... ८७% सर" त्याला अजुनच आश्चर्य वाटलं. अचानक १२वी कडे सर कसे वळले...
"आणि पहिल्या सेमला?"
"सर एक विषय राहिला.."
"% किती होते?"
"६२% चार विषयात.."
"समजा तुला या सेमला आणि यापुढच्या सेमला यापेक्षा कमी पडले तर..."
"तसं नाही होणार सर..."
"कशावरुन?"
"सर मी अभ्यास करेन सर"
"मग पहिल्या सेमला का केला नाही"
"सर ते सगळे टिचर मलाच का टारगेट करतात माहिती नाही. वर्गात कितीतरी मुलं बोलतात, पण त्यांना कोणीच काही म्हणत नाही आणि मलाच नेहमी बाहेर काढतात."
"ते जाऊ दे... पण तुझा वर्गाबाहेर राहण्याने नुकसान कोणाचं होतय? त्यांचं का तुझं"
"माझं सर.. पण खरच सांगतो सर, सगळे टिचरच सुरुवात करतात आणि मग मी काही बोललो, की ते मला बाहेर काढतात."
"तुला सचिन माहिती आहे?"
"अं सचिन तेंडुलकर..."
"हो"
"हो सर... का?" त्याने का म्हटल्यावर जीभ चावली. आपण उगाच प्रश्न विचारला की काय असं त्याला वाटुन गेलं.
"मॅच चालू असताना, कित्येक बॉलर्सने त्याला अगदी शिव्या द्याव्या असे वर्तन केले आहे. मध्येच त्याच्याकडे बघुन पचकन थुंकणे असो किंवा मुद्दाम त्याला खिजवणे"
"हो सर, मला चांगलच माहीती आहे. मागच्याच आठवड्यात एक याबद्दलचा एक लेखही वाचला होता. बाकीचे खेळाडु तर खुपच चिडतात, असं काहि ऐकलं की... माझही डोकं सटकतं कधीकधी असं कोणी बोललं की...."
"आणि मग तू वाद घालतो..."
"..............पण मग करणार तरी काय सर..."
"सचिन काय करतो?"
"पण सर मी सचिन नाही"
"आणि टिचर्स बॉलर नाहीत... पण तुला पुढे जायचं असेल आणि बारावीला ८७% कॉपी करुन मिळवले होते, हे ऐकायचं नसेल तर ..."
"सर पण मी कॉपी करुन पास नाही झालो........"
"हा हा हा .... आला ना ट्रॅपमध्ये... मी डिचवलं, तु बोललास... पण समजा मी डिचवलं तू बोललाच नाहीस तर ..."
"पण सर तसं करणं म्हणजे मला भेकडपणा वाटतो"
"म्हणजे सचिन भेकड आहे असं म्हणायच आहे तुला."
"नॉट अ‍ॅट ऑल सर... तो तर ग्रेटच आहे..."
"हे ग्रेट व्हायचं असेल तर जीभेवर आणि मनावर संयम ठेवावाच लागतो"
"पण सर मग तर हे टिचर्स मला जास्त छळतील"
"हा, कदाचित ... पण तुझ्या वर्गातुन बाहेर जाण्याने तुझं नुकसान होतय, त्यांची काही सॅलरी कमी होत नाही. आणि राहिला प्रश्न तुझा, त्यांच्यासाठी तू ६० पैकी एक विद्यार्थी... तुझं नुकसान झालं तरी त्यांना फारसा फरक पडत नाही."
"मग मी काय करावं सर"
"कधीकधी आपण बरोबर असलो, तरी ते न बोलण्यात आपलं भलं असतं"
"मला नाही पटत सर"
"मग घे डीग्री ५०-६०% मिळवुन आणि बस जन्मभर नोकरीच्या शोधात. तेव्हा मात्र तुला तुझं सत्यवचनही मदत करु शकणार नाही आणि कँपस इंटरव्ह्युला एंट्री पण नाही मिळणार."
"पण म्हणुन ते बोलतात म्हणुन मी त्यांचं ऐकुन घ्यावं"
"बेटा, जेव्हा नोकरी लागेल ना तेव्हा एखाद्या मुर्ख बॉसचं म्हणणं तुच शांतपणे ऐकूनही घेशील आणि तो म्हणतो तेही करशील..विश्वास बसत नसेल तर सिनिअर्सला विचार....... १० पैकी किमान १ मी सांगतोय, तेच सांगेल......... विचार कर........... तुला तुझं फ्युचर घडवायचं आहे की बिघडवायचं. शेवटी प्रश्न तुझा आहे... मी काय किंवा कॉलेज काय एक विद्यार्थी कमी झाला म्हणुन कोणालाच फरक पडत नाही किंवा अगदी रिझल्टसुद्धा कमी होत नाही. ते नाही बदलणार आणि त्याचा त्यांना फरकही पडत नाही, तुला फरक पडेल म्हणुन तुलाच बदलायला हवय... किमान तात्पुरतातरी"
"............"
"आणि नोकरीत जर ऐकून घ्यावं लागत असेल, अगदी आपली चुक नसतानाही, मग आतापासुन त्याची प्रॅक्टिस करतोय असं समज, काय?"
"ओके सर, आय विल ट्राय..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग घे डीग्री ५०-६०% मिळवुन आणि बस जन्मभर नोकरीच्या शोधात. तेव्हा मात्र तुला तुझं सत्यवचनही मदत करु शकणार नाही आणि कँपस इंटरव्ह्युला एंट्री पण नाही मिळणार."

५०/६० टक्के मिळाले म्हणजे जन्मभर नौकरी शोधत फिरावे लागते असे काही नाही आहे... कॅम्पस इंटरव्यू नाही तर ऑफ कॅम्पस मध्ये जॉब मिळू शकतोच ... कित्येक लोक आहेत ( मी सुद्धा ) ज्यांना भारतीय शिक्षणपद्धती मुले ( ज्याच्या जितके लक्षात राहिले तो हुशार ) नाही मिळत मार्क ... पण याचा अर्थ असा नाही कि त्यांना फ्युचर नाही ... चुकीचा संदेश दिला जातोय इथे..

च्रप्स,
असे वाटत नाही की संदेश चुकीचा आहे. जर सर्वच शिक्षक या मुलाला सतत वर्गाबाहेर काढत असतील तर याचा अर्थ काहितरी त्याचे चुकत असणारच ना? डीन अनुभवाने हे जाणतात, आणि ते हे पण जाणतात
की या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारे जास्त काळ वर्गात ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांचा दृष्टीकोन जर दुषित झाला असेल तर तो बदलण्यासाठी या विद्यार्थ्याला काही काळ तरी नम्र रहाणे व्यवहार्य आहे.

५०/६० टक्के मिळाले म्हणजे जन्मभर नौकरी शोधत फिरावे लागते असे काही नाही आहे हे आपले विधान जरी बरोबर असेल तरी इथे कॉलेजच्या डीननेच अशा मुलाला भारतीय शिक्षणपद्धती कशी चुकीची आहे. यापेक्षा तु कॉलेजबाहेरच यशस्वी ठरशील वगैरे सांगणे सयुक्तिक ठरेल का?

चप्स :- ५०-६०% मिळालेल्याला जॉब मिळत नाही, असं नाही. पण जो मुलगा १२ वी ला ८७% होता, तो उगाच वर्गाबाहेर असतो. स्वअभ्यासावर तो पहिलं सेम तर पास झाला, पण विचार करा की ४ वर्ष जर तो वर्गाबाहेरच राहिला तर. शेवटी त्यांचं करिअर बिघडू नये (आणि कॉलेजचं वातावरणही) म्हणुन डीन समजवतात. तसं न शिकताही करताही लोकं यशस्वी होतात, पण म्हणुन शिक्षणच नको, असं नाही ना.
बरेचदा काही शिक्षकांचा दृष्टीकोण बदलणे डीनलाही शक्य नसते, त्यात उगाच एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जाऊ नये, ही त्याची इच्छा.

(बाय द वे, हा प्रसंग खरा आहे)

आवडले विचार आणि त्यांची मांडणी ..

अवांतर - सचिन तेंडुलकर (तसेच राहुल द्रविड देखील) हि आजच्या पिढीसमोर ठेवायला खूप छान आणि आदर्श उदाहरणे आहेत. आपल्यातीलच वाटल्याने पटकन समजावीत अशी..