एक चिऊ... गोजिरवाणी!

Submitted by बागेश्री on 30 July, 2013 - 11:48

मी तुळशीपाशी, लावता पणती एक,
अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख

कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल
हातात बाहुली आणि जाईचे फूल...

अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला,
"पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?"

तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी,
"अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी,
अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं,
तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं"

ना कळते तिजला, परि हलविते मान,
बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण,
ही तिला भरविते काय पहा हे ध्यान,
म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!"

बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी,
तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी..
मग पावडर खोटे, तिट टिळाही देते
ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते

म्हणे ऐक बाहुले, सुंदर तू ही दिसशी
जर हासता कोणी, तू ही खुदकन हसशी...

मी पाहता कौतुके, हळूच मज म्हणते ती
"कसे सगळेच हसले, बघ ना जरा हासता मी"

ती भुरकन जाते, आली तशीच उडूनी
अन् साठवते मी , आत-आत ती चिमणी,
मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे
हे तंत्र खुशीचे, आनंदाची गाणी...

अशी रोजच येते, चिऊ ही चिवचिवणारी
अन् गळ्यात पडते, "हसते का गं" म्हणूनी....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू पाहिलेल्या चिऊसारखीच गोड कविता..!!

मला एकदम "लाडकी बाहूली होती माझी एक" हेच आठवले..तश्याच वळणाची वाटतेय कविता..

छान गं!

गोड कविता.
"ती भुरकन जाते, आली तशीच उडूनी
अन् साठवते मी , आत-आत ती चिमणी,
मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे
हे तंत्र खुशीचे, आनंदाची गाणी..." >>> या ओळी सर्वात विशेष.

वाह !
ही चिमणी अगदी आत आत स्पर्शून गेली !
कायम स्मरणात रहावी अशी गोड कविता !
Happy

(एक निरीक्षण. सुचवावं की सुचवू नये असं मनात येऊनही
वृत्त किँवा मात्रांच्या संख्येकडे दुर्लक्ष करून लिहितोय. या कवितेतल्या ज्या ओळी एक गुरू किंवा दोन लघुंनी सुरू होताहेत, त्या लयीत न अडखळता वाचता येताहेत. ज्या ओळी एका लघुने सुरू होताहेत , त्या वाचायला सुरूवात करताक्षणीच लय भंगते आहे. अशा ओळी खरं तर खूप कमी आहेत या कवितेत, या कवितेची अवीट गोडी आणखी वाढवण्यासाठी त्या ओळींची सुरूवातही एका गुरूने किंवा दोन लघुंनी करावी असं मला वाटतं. हे वै म आहे. कृ ग न.)

राजीव,
अगदीच महत्त्वपूर्ण निरीक्षण... डोक्यातला ह्या कवितेचा प्रभाव जरा कमी झाला की, तू म्हणतो आहेस त्याप्रमाणे करेक्शन करून पाहीनच.

अंजली, एक्झॅक्टली.
"लाडकी बाहूली होती माझी एक..." कवितेची चाल मनात ठेऊनच ही कविता लिहीली आहे, त्याच चालीवर ही कविता म्हणून बघ, बसतेय बरोबर आणि मजाही वाटतेय Happy