माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्‍यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

मागे कधीशी पित्रू-दिन येऊन गेला. माझ्या मायबोलीने त्या बद्दल लेखनाचा एक सुंदर उपक्रम सुरू केलेला. मला लिहायच होत पण माझ्या बापाचा मुलगा फारच व्यस्त होता. इतका व्यस्त की त्याला स्वत: च्या बापाकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. लिहायच तर सोडाच त्याला बापाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता. सदा कदा बापावर डाफरत असायचा. बाप आतून दुखायचा पण बोलून दाखवायचा नाही फक्त गप पडून रहायचा. आणि मग असाच तो आषाढातला पहिला ढग आला आणिक बापाला घेऊन गेला. बापाचा मुलगा बघतच राहीला त्या ढगाकडे हताश निशब्द.

बापाचा मुलगा बेवारश्या सारखा भतकत राहीला. बापाचे मित्र सांगत राहीले बाप किती मोठ्या मनाचा होता तो. बापाचा मुलगा ऐकत राहीला. बाप म्हणे डायलीसीसच्या आजारपणात पार्ल्यावरून मिरा रोडला एकटा जायचा ट्रेनने. का तर मित्राला पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून. आणि मग ती पुस्तके परत आणायला , नवीन पुस्तके द्यायला. माझ्या बापाचा मुलगा तर एका खोलीतल वर्तमानपत्र सुद्धा बापाला दुसर्‍या खोलीत बापाला आणून द्यायचा नाय. फक्त ओरडायचा त्याच्यावर. बापाला खाण्या-पिण्याची फार आवड होती. पण एकटा कधी खायचा नाही. सर्वांसाठी खायला आणायचा. बापाचा मुलग मग त्याच्यावर चिडायचा वायफळ खर्च करतो म्हणून पण स्वतः कधी बापसाठी खायला आणायचा नाही. बापाला नाटक-सिनेमाची भारी आवड पण बापसाठी कधी चुकून कधी तिकीट घेऊन आला नाही. बाप तिकीट काढून आणायचा एक कधीच नाही दोन आकडी. सर्व नातेवाईकांना बोलावयचा फोन करुन बोलावायचा नाटकाला. घरी जाऊन तिकीट पोचती करायचा. नातेवाईक आपापसात हसायचे 'नाटकाचे वेड' म्हणून. मग माझ्या बापाचा मुलगा चिडायचा नातेवाईक हसतात म्हणून. पण माझा बाप ऐकून न ऐकल्यासारख करायचा आणि पुढच चांगल नाटक लागल की पहाटे उठून तिकीट काढायला जायचा रांगेत उभ रहायला म्हणून.

माझा बाप एकदा बापाचा मुलगा परीक्षेला जाताना घड्याळ घालायला विसरला म्हणून आंघोळ अर्धवट टाकून फक्त टोवेल गुंडाळून सोसायटीच्या गेटपर्यंत धावत आला फक्त घड्याळ द्यालला म्हणून. लोक बापाला हसले. बापाच्या मुलाला माझ्या बापाची खुप लाज वाटली. स्वतः ची वाटायला हवी होती खर तर.

माझा बाप स्वतः फारसा शिकला नाही पण त्याने माझ्या बापाच्या मुलाला खुप शिकवल. म्हणायचा माझी नौकरी आहे तो पर्यंत वाटेल तेवढा शिक घरी बसून. घरची काळजी करू नकोस. लोक बापाला सांगायचे बापाच्या मुलाला नोकरी करायला सांग म्हणून पण बाप काही बधायचा नाही. मग बापाचा मुलगा खुप शिकला, बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही.

मग आता आषाढात बाप एकदम गेला. बापाचा मुलगा बापाला जाऊन अग्नी देऊन आला. अग्नी संस्काराला अगदी मोजकी माणस होती फार तर ८-१० असतील. माझ्या बापाच्या मुलालाही मग माझ्या बरोबरीने खुप वाईट वाटल. अरे रस्त्यावरचा कुणी फाटका माणूस अगदी मार्केटातला भाजीवाला जरी गेला तरी ह्यापेक्षा अधिक माणस जमतील आणि माझ्या बापाचा लोकसंग्रह तर खुप मोठा होता. मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. पश्चातापाने कदाचित पित्रु हत्येच्या पापाच्या भितीने. तिकडे माझा बाप लाकड आणिक आगीज जळून गेला. इकडे माझ्या बापाच्या मुलाची शरीराची लाकड आणिक मनाची आग झाली पण तरीही तो जळून गेला नाही. होरपळत राहीलाय. माझ्या बापाच्या मुलाने आजकाल आयुष्य 'आंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तस भिरकावून दिलय. तो ही असाच कधीतरी मरुन जाईल पटकन.

मला कधी कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै 'आषाढस्य प्रथम दिवसे ' चा अर्थ माझ्या कडून समजून घे म्हणून.

मी (दिनांक १२/०७/२०१३)

प्रकार: 

अगदी पोचल कुठेतरी खुपल सुद्धा

पण बापाच्या मुलाने सावरायला हव आता
नाहीतर बापाला वाईट वाटत राहील तिकडे Sad

कमाल कन्फेशन ! शब्द न शब्द घायाळ होऊन लिहिलाय.
कित्येकांना असतात हे असले अपराधगंड कारण आईबापांचं ऋण फिटणंच कठीण.
ज्यांना असे आईबाप नाहीत त्यांच्यावर जीव लावून पहावा..

हृद्य !
मुलाने नव्हतं ओळखलं बापाला तरी बापाने नक्कीच ओळखलं होतं मुलाला; << बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही. >> म्हणूनच बाप हादरला होता तो अवमानामुळे नाही तर आपल्या पोराच्या वाट्याला नंतर अशी जीवघेणी हळहळ येणार या जाणीवेनेच !
<< कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै >> अहो, खूपच वेगळ्या प्रकारची असली तरी कालीदासाची 'आषाढस्य प्रथम दिवसे'देखील आत्यंतिक व्याकुळताच व्यक्त करते ना !

केदार, ही ग्रीफ रिअ‍ॅक्शन आहे.
जवळच्या नात्यातलं कुणी गेलं की अरे त्याच्यासाठी हे करायचं राहून गेलं ,ते करायचं राहून गेलं असं सारखं मनात येत रहातं आणि आपल्याला आणखीच प्रिय व्यक्तीच्या दु:खात, आठवणींत गुंतायला मदत करतं.
पण तुम्ही वडिलांसाठी नक्कीच काही चांगल्या गोष्टी केल्या असाल तर आठवून पहा.
नोकरी लागल्यावर त्यांच्यासाठी केलेली पहिली खरेदी,परदेशातून त्यांच्यासाठी आणलेली पहिली भेट्,तुम्हाला परदेशी जॉबची संधी मिळाली म्हणून एकाचवेळी अभिमानाने ओथंबलेला आणि विरहाच्या कल्पनेने बावरलेला त्यांचा चेहरा.
नक्कीच अश्या कित्येक आठवणी असतील.
आत्ता वडिलांचे स्मरण एक गरीब बिचारा बाप म्हणून न करता एक समर्थ, मुलांना घडविणारा कर्तृत्ववान बाप म्हणून करा.
तुमच्या मनाला शांती मिळेल.

Sad रुतलं माझे दोन्ही बाबा डोळ्यासमोर आले एकदम. काय केलं पेक्षा काय राहिलंची बोच डोळ्यात उतरली आणि कॉम्प्युटरची स्क्रीन दिसेनाशी झाली

तरिही साती +१

ठसठसत राहिल आता हे मनात खूप वेळ. मनाच्या कुठल्या तळातून आलंय हे ते शब्दागणिक जाणवतं आणि नकळत डोळ्यांत पाणी येतं.
तरिही... एवढे वाईट नसतो हो आपण... शेवटी माणूस असतो. माफ करून टाकायचं असतं स्वतःला.

केदार Sad

केदार Sad
स्वतःच मरण मरणे सोप असते पण दुसर्‍याच 'मरण', जगण खूप खूप कठीन.....
सांगन सोप आहे माहीत आहे पण तरीहि सावरा स्वतःला

Pages