बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी
टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड
पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!
आमच्याकडे कमी नाही,
पण आमच्याकडे टोपीच नाही
आम्हाला घालावा लागतो मुकूट
त्यातून नाही कसलीच सूट
मागशील ते तुला देतो
जादूचा झूला देतो
झुल्यात बसून फ़िरता येईल
हवं तिथं जाता येईल"...
बाहुलीला पण टोपी प्यारी
पऱ्यांचाही हट्ट भारी
बाहुली म्हणे,"विचार करते,
आधी झुल्यात बसून तर बघते!"
झुल्यात बसून निघाली भूर
पऱ्यांच्या गावातून भलतीच दूर
वाटेत सुटला वारा मध्येच
उडाली टोपी लागली ठेच
बाहुली बिचारी हिरमुसली
टोपीसाठी आसुसली
शोधून शोधून दमून गेली
तळ्याकाठी निजून गेली
रात्री देवबाप्पा आला
हळूच टोपी ठेवून गेला
टोपी मिळताच खुदकन हसली
बाहुलीच्या टोपीची गोष्टच संपली
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2010/12/blog-post.html)
छोट्टुश्या मुलांचं गोडुलं
छोट्टुश्या मुलांचं गोडुलं बड्बडगीत.....
मला फर्फार आवडल...
क्युट कविता
क्युट कविता
पजो, नेहा - धन्स!
पजो, नेहा - धन्स!

खुपच मस्त. बाहुली आणि परया
खुपच मस्त. बाहुली आणि परया मुलांचं आवडत विश्व. दोन्हि इथे आल.
अय्या ही मी नव्हती वाचली
अय्या ही मी नव्हती वाचली कित्ती गोड आहे

मी बाहुलीच्या जागी परी असा बदल करुन माझ्या मैत्रिणीच्या मुलीला ऐकवेन (तिचं नव परी आहे : ) )
परीच्या जागी काय घ्यावं बर?
वा, खूपच गोड, खूपच मस्त
वा, खूपच गोड, खूपच मस्त ......
खरंच खूप मस्तंय!
खरंच खूप मस्तंय!
आई गं... कित्ती गोड कविता
आई गं... कित्ती गोड कविता आनंदयात्री. खूप आवडली.
नचिकेत जोशी तुम्हीच का?
Pages