रताळ्याची सौदिंडियन भाजी

Submitted by नीधप on 26 June, 2013 - 03:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ मध्यम रताळी, १ मोठ्ठा कांदा
जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता - फोडणीपुरते
तेल - फोडणीपुरते
लाल तिखट, सांबार पावडर - प्रत्येकी १ टेस्पू
पाणी - १ कप
मीठ - चवीपुरते
कोथिंबीर - आपल्या आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

कांदा बारीक चिरून घ्या.
रताळी व्यवस्थित धुवून घेऊन, साल न काढता गोल गोल चकत्या कापा.

कढई गॅसवर, गॅस चालू, कढईत तेल, तेल तापले,
मोहरी-जिरे-हिंग, तडतडतड, कढीपत्ता, परता....
कांदा, परता
रताळ्याच्या चकत्या, परता
तिखट आणि सांबार मसाला वरून घाला, परता.
पाणी, खूप नको नाहीतर चिखल होईल. भाजी सुकी हवीये, चकत्या सुट्या हव्यात.
झाकण, ५ मिन मधे रताळी शिजतात.
चवीप्रमाणे मीठ घालून सारखे करून घ्या.
गॅस बंद, कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरा...

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांची एका जेवणाची भाजी.
अधिक टिपा: 

याबरोबर रस्सम, मऊसर भात आणि पापड्या/ कुरडया हे फार म्हणजे फार म्हणजे अतिच उच्च लागते... Happy

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रताळ्यांना लागलेला चिखल धुण्याचा वेळ, सगळ्या वस्तू ज्या त्या जागेवरून काढून ओट्यावर एकत्र ठेवायचा वेळ पण धरलाय गृहित त्या ४५ मिनिटात.
पण तुम्ही कमी वेळात करू शकता Happy

ते पटकन फक्त टीवीशोत असतं... त्यांच्या कांद्याची साले काढून अर्धे करून तयार असतांत, लसूण सोलून तयार असतो, लागणारी भांडी तयार... आपल्याकडे आनंदी आनंद... त्यात कामवाली आलेली नसेल तर विचारूच नका... Lol

अर्रे, सह्हीच! नक्की करून पाहणार ही भाजी... Happy

(कुठलाही पदार्थ करण्यासाठी जी पूर्वतयारी लागते, त्यासाठीचा वेळही पाककृतीच्या एकूण वेळात धरलाच जावा असं माझं नेहमीच म्हणणं असतं.)

योकु, माझ्याकडे स्वयंपाकाला बाई असणारच हा जो काही तुझा गैरसमज झालेला होता, तो मी स्वतःच दूर केला होता ना एकदा फोनवर? आं? Lol

त्यासाठीचा वेळही पाककृतीच्या एकूण वेळात धरलाच जावा असं माझं नेहमीच म्हणणं असतं<<<
है शाब्बास लले.. हाथ मिलाओ!
त्यात काय एवढं ५ मिंटात्त होईल अशी वाली रेसिपी ही फक्त काही सोपी फळे धुवून व गरज असल्यास चिरून घेणे याचीच असू शकते. किंवा मग प्याकेट उघडून गरम करून प्लेटीत घेणे.. Happy

वेगळी कृती आहे. पण समहाऊ, रताळं हा पक्का उपवासाचाच पदार्थ आहे हे ठसल्यामुळे रताळं-कांदा ह्या कॉम्बिनेशनपाशी अडखळायला होतंय! Happy

पण कच्ची केळी पटकन शिजतात? मी मेधाच्या रेस्पीने केली होती तेव्हा कच्ची केळी शिजायला खूप वेळ लागला होता. कच्च्या केळ्याची भाजी करताना साल नक्की किती खोलपर्यंत काढायचं यात भारी गोंधळ होतो माझा.

मस्त इश्टाइल्ने लिहिलेय Happy
कच्ची केळी साल काढून जशी घेता येतात तशीच, बटाट्यासारखी कूकर मध्ये उकडून सोलल्यास साल काढणे सोपे जाते..

आधीचेही फोटो पेंडीग असल्याने, मी प्रतिक्रिया दिलीच नाही, असेच समजायचे !
( या व्यक्तीकडून तरी सजावटीचे धडे मिळायला नकोत काय ? )

नी, कच्ची केळी कूकरला आधीच शिजवली तर गिचका होतात म्हणून मी प्रेशर पॅनमधे फोडणी करून नंतर एक ते दोन मिनिटे शिजवते.

रताळ्याची अशीच भाजी आमच्याकडे केली जाते पण कांदा घालत नाही आणि टहाळभर कढीपत्ता घातला जातोच. शिवाय फोडणीमधे चार पाच दाणे मेथीचे पण घातले जातात.

रताळ्याचे अगदी बारीक काप काढायचे आणि मैद्याच्या पीठात बुडवून भजी तळायची. यम्मी लागतात.

कच्ची केळी धूवून घेवून त्याची साल फक्त सोलाण्याने सोलायची. पांढरा गर दिसे पर्यंत.

मग पाण्यात टाकून ठेवायची.

अजिबात कूकरात शिजवून घ्यायची नाही, गिचका होतात. शिजतात फोडणीवर. नाहीतर चिकट गोळा होतात पाणी टाकले की.

Pages