समांतर विश्व आणि विश्व १ - ताटातूट

Submitted by यःकश्चित on 19 June, 2013 - 12:05

समांतर विश्व आणि विश्व १ : ताटातूट

==========================================================

समांतर विश्व आणि सात विश्वे - परिचय

एक क्षणभर प्राण गेल्यासारखं वाटल आणि....

... आणि मी धप्पकन कुठेतरी आदळलो. तिथला दगड पाठीला जोरात लागला. त्या दगडावर टप्पा खाऊन मी त्या कुठल्यातरी उतारावरून घरंगळू लागलो. शरीरावर जागोजागी जमिनीचे मार लागत होते. कितीतरी वेळ मी घरंगळतच होतो. एकदाच ते सारं थांबलं. मी जमिनीवर उताणा पडलो होतो. आदळून आदळून अंगभर ठणका उठला होता. अजूनही काही दिसत नव्हते. अंगभर दुखण्यामुळे पापण्याही उघडू वाटेना. अतिशय थकवा आल्यासारखा वाटत होतं. अचानक मनात गुदगुल्या झाल्याच्या भावना निर्माण झाल्या. माझ्या अंगावर कुणीतरी पडल होतं.

आणि मी खाडकन डोळे उघडले. सुझान होती ती. ती माझ्याकडे बावरलेल्या नजरेने पाहत होती. मीही अजून तसाच होतो. अचानक आपण कुठे आहोत याची तिला जाणीव झाली तशी लाजून ती बाजूला झाली. माझ्याही अंगात आता त्राण आले होते. मी उठून उभा राहिलो. आम्ही दोघेही इकडे तिकडे पाहत होतो. दूरदूरवर कोणीच दिसेना. टॉम,जॉर्ज आणि केविन कुठे गेले होते ?

आम्ही उभे होतो त्या ठिकाणी ज्या डोंगरावरून आम्ही घरंगळत आलो तो सोडला तर निसर्गातील एकही वस्तू तिथे दिसत नव्हती. झाडे नाहीत, पाणी नाही, कुठे घर वा झोपडी किंवा मानवाची तत्सम सजीवाची निशाणीदेखील नाही. फक्त आणि फक्त खडकाळ जमीन आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य.

दोघेही इकडे तिकडे फिरून पाहू लागलो. आम्ही जोरजोरात टॉम, केविन , जॉर्ज यांना हाक मारल्या. पण कुणीच 'ओ' देईना. बराच वेळच्या शोधाशोधीनंतर आम्ही पुन्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी थांबलो आणि एका मोठ्या दगडावर जरा टेकलो.

" मंदार, कुठे गेले असावेत हे तिघे ?", सुझान आपल्या बॅगमधून पाण्याची बॉटल काढत म्हणाली.

" मलाही काही कल्पना नाही. तूसुद्धा डोंगरावरून घरंगळत आलीस का ? "- मी.

" होय रे. खूप लागलं. हे बघ ना ", असे म्हणून तिने हाताचे कोपर आणि पायाचे गुडघे दाखवले. तिला खूप खरचटले होते. मग मी त्यावर डेटॉल लावून जखम पुसली. तिच्याकडून पाण्याची बॉटल घेऊन पाणी पीत म्हणालो,

" बहुधा आपण सारे या डोंगराच्या शिखरावर प्रक्षेपित झालो आणि ते तिघे डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पडले असावेत आणि आपण अलीकडच्या बाजूला. "

" हो..बहुतेक असंच झालं असावं. मग आता आपल्याला डोंगराच्या त्या बाजूला जावं लागेल ना ! "

" अर्थात. पण या डोंगराच्या बाजूने जाऊया. कारण पुन्हा हा इतका मोठा डोंगर चढणे खूप धोक्याचे ठरेल. "

" हो पण इथे पलीकडे जाण्याचा रस्ताच सापडत नाहीये. ह्या मोठमोठ्या डोंगररांगा आहेत. पण त्या बाजूने थोडा उतार दिसतो आहे. आपण तिकडून मार्ग शोधूयात. ", उजव्या बाजूला बोट दाखवीत ती बोलली.

मग तिने बॉटल बॅगमध्ये टाकली आणि आम्ही डोंगराच्या उजव्या बाजूने निघालो. जाताना बऱ्याचवेळा चढावे लागायचे. मधेच एखादा खोल खड्डा यायचा. मग जीव मुठीत धरून तो खड्डा ओलांडायचा. असे करत आम्ही निघालो होतो.

" मंदार, "

" बोल सुझान "

" आपण नेमके कुठे आलो असावेत रे ? "

" निश्चितपणे म्हणायचं तर आपण पृथ्वीवर आहोत बघ. "

" काय रे मंदार ", ती हसत म्हणाली, " एकतर आपण दुसऱ्या विश्वात आहोत आणि तू विनोद काय करतोस ! "

" अगं विनोद काय यात ! खरं तेच सांगितलं. ओके ओके. हे बघ माझ्यामते आपण ज्या विश्वात आलोय त्या विश्वात काळ तर तोच असणार जेंव्हा आपण निघालो होतो. म्हणजे २०१३. पण इथल्या मानवाची प्रगती झाली नसेल. "

" अरे पण इथे मानव तर कुठे दिसतोय ? बहुतेक मला वाटतं की या विश्वात मानवाची उत्पत्तीच झालेली नसावी. म्हणजे या विश्वातले आपण पहिले मानव आहोत. "

" अगं हसतेस काय ? मानवाची उत्पत्ती नाही म्हणजे ... ", मी गप्प बसलो.

" म्हणजे काय ? ", सुझान

" म्हणजे इथे जर डायनासोर असतील तर ! "

" बापरे... ! असलं काही बोलू नकोस रे . हात दे "

ती हात धरून त्या छोट्या टेकडावर चढली.

" आणि एखादा डायनासोर या डोंगरामागून एकदम समोर आला तर ... ", मी खट्याळपणे म्हणालो.

" आई ग " म्हणून ती एकदम बिलगलीच आणि मला कसनुसं झालं. चटकन ती बाजूलाही झाली.

" ए सुझान, मी चेष्टा करतोय ग. तू पण किती घाबरतेस. "

" हो बर बर. ते तिघे दिसतात का कुठे बघ जरा. "

" मीही तेच पाहतोय. पण काहीच दिसत नाहीये. चल त्या टेकडीवर जाऊया." मी एका टेकडीकडे बोट दाखवत म्हणालो, " ती या टेकडीपेक्षा उंच आहे. तिथून पलीकडचे जरा स्पष्ट दिसेल. "

आम्ही दोघे त्या दुसऱ्या टेकडीवर गेलो. पलीकडे आम्हाला डोंगराचा पायथा दिसला. बाकीचे तिघे तिकडे भेटतील म्हणून मोठ्या आनंदाने आम्ही तिकडे गेलो. त्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. पण तिथे कुणीच नव्हते. आम्ही पुन्हा हाक मारून बघितल्या पण प्रतिसाद मिळाला नाही. सुझान निराश होऊन शेजारच्या खडकावर बसली.

मी वळून डोंगराकडे पाहू लागलो. हा डोंगर मगाशी सारखाच दिसत होता. एक क्षणभर मनात शंका आली.

" सुझान आपण बोलत बोलत पुन्हा डोंगराच्या त्याच बाजूस तर नाही आलो ना , जिथे आपण पडलो होतो. "

" नाही रे. माझा नीट लक्ष होतं. आपण पलीकडच्या बाजूलाच आहोत. "

मी पुन्हा वळून डोंगराकडे पाहत विचार करू लागलो. सूर्य आता मावळतीला चाललेला होता.

" सुझान, इकडे ये." सुझान उठून माझ्याजवळ आली आणि मी जिथे पाहत होतो तिथे पाहू लागली.

" अरे हे काय..बहुतेक सोनं आहे. " ,सुझान.

मावळतीच्या सूर्याची तिरपी किरणे पडून एका दगडाच्या कपारीत अडकलेले पिवळे काहीतरी चमकत होते.

" बहुतेक तसच वाटतंय." आम्ही त्याचं जवळ जाऊन नीट निरीक्षण केलं. ते सोनंच होतं. ते काढून मी माझ्या बॅगमध्ये ठेवलं.

" सुझान, अंधार पडत चाललेला आहे. आपण आजची रात्र या कपारीत राहुयात. तसेही इथे कोणी मानव नाहीये आणि कुठला प्राणी असण्यची मलातरी फक्त १० टक्के शक्यता वाटते. कारण काही प्राणी निशाचरही असतात. ते १० टक्क्यातील प्राणी या कपारीत नक्कीच येणार नाहीत. शिवाय आपण इथे आल्यापासून आपल्याला एकही प्राणी दिसलेला नाहीये. प्राणीच काय आकाशात एखादा पक्षीही उडताना दिसला नाहीये. पण तरीही खबरदारी घेतलेली बरी. "

" ठीक आहे. आपण आजची रात्र इथे थांबुयात आणि सकाळ झाली की त्या तिघांना शोधायला निघुयात. ", सुझान.

" हो आणि रात्री आपण पाळीपाळीने झोपुयात म्हणजे एका झोपला असताना दुसरा रखवाली करेल. ", मी.

आम्ही तिथे कपारीशी टेकून बसलो. सुझानने लायटर काढला तसा मी तिचा हात पुन्हा बॅगमध्ये कोंबला.

" आग नको. १० टक्क्यातील एखादा प्राणी रात्रीचा प्रकाश पाहून जवळ यायचा."

मग सुझान आणि मी दोघे आळीपाळीने झोप घेतली. रात्रीचा वेळ हा फारच मंदपणे गेला. पहाटेच्या वेळेस आम्हाला दोघांनाही डुलकी लागली.

सकाळी सहाच्या सुमारास मला जाग आली. मला उकाड्याने जाग आली होती. सकाळच्या सहाला भयंकर उकाडा जाणवत होता. मी सुझानला उठवलं.

" सुझान, तुला उकडत नाहीये. हे पहा माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहताहेत. "

" अरे मंदार, इथल्या हवेत उकाडा आहेच रे. मला तर काल रात्रीही उकडत होते. "

" हो पण आताएवढ नाही. आणि हे पहा...इथली जमीन आणि दगडेही किती तापली आहेत."

एव्हाना सुझानच्याही अंगातून घामाच्या धारा येऊ लागल्या होत्या.

" हो रे मंदार, आता खूपच उकडतंय. "

" आणि तेही सकाळच्या सहा वाजता. "

" काय ? एवढ्या सकाळी इतका उकाडा ? ", ती जोरात म्हणाली.

...आणि एवढ्यात आमच्या दोघांच्या मध्ये गोटीएवढा आगीचा गोळा येऊन पडला.

क्रमशः

( पुढचा भाग वाचण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुझान वैज्ञानिकांच्या मानाने फारच बालिश वाटतेय. आणि आपला कथानायक देखिल. तेवढी एकच गोष्ट खटकली.

पण हे मा वै म

--
पु ले शु

सर्वांना धन्यवाद...

भानुप्रिया : अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे

कथेमध्ये थोडा हलके फुलकेपणा आणण्याचा तो एक छोटासा प्रयत्न आहे..

आणि वैज्ञानिक सुझानच पुढे काही करामती करेल आणि डोके लढवेल....( तुम्ही वाचालच )

पुनश्च धन्यवाद