समांतर विश्व आणि सात विश्वे

Submitted by यःकश्चित on 18 June, 2013 - 07:19

समांतर विश्व आणि सात विश्वे

==============================================

नमस्कार वाचकमित्रहो,

मी मुद्दामच तुम्हाला वाचकमित्र म्हणालो कारण मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला पटणार नाही. कारण ते खुपच अवास्तव वाटणारे सत्य आहे. होय अवास्तव वाटणारे सत्यच. पण त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे फार अवघड आहे. वास्तविक मी जेंव्हा ते प्रथम पाहिलं तेंव्हा माझाही त्यावर विश्वास बसला नाही. पण ते वास्तव होतं. तर मी तुम्हाला मित्र अशासाठी म्हणालो की एका मित्राने काहीही सांगितलेले आपण ऐकून घेतो. मग ते खरे असो वा खोटे. त्याची शहानिशा आपण करत बसत नाही. जरी केली आणि ते खोटं निघालं तरी आपण जाऊन त्याला तसं बोलत नाही. म्हणून तुम्हालाही मित्र म्हणल्यावर, तुम्हीही मी सांगेल ते ऐकाल आणि त्यावर विश्वास ठेवाल अशी अपेक्षा ठेवतो. जरी विश्वास नाही बसला तरी प्रत्येक वर्गात एक झोलर मित्र असतो ज्याचा वर्गात करमणुकीसाठी वापर केला जातो. त्याप्रमाणे मी सांगितलेल्या घटना तुम्ही करमणुकीखातर वाचाल व सोडून द्याल अशी आशा ठेवतो आणि सुरुवात करतो.

मी मंदार गोवर्धन. मी एक वैज्ञानिक असल्याने तुम्हाला काही खोटे सांगणार नाहीये. मी SATE (Society of American Techonology Experts ) नावाच्या एका कंपनीत सायंटिस्ट आहे. सेट हे एक रिसर्च सेंटर आहे. जगात लागलेल्या अनेक महत्वाच्या शोधांमध्ये या कंपनीचे मोलाचे योगदान आहे.

नुकताच बाजारात आलेल्या 3D मॉनिटरदेखील आमच्या सेटच्या SPP टेक्नोलॉजीवर आधारित आहे. SPP टेक्नोलॉजी म्हणजे स्टील फोटो पार्टीकल्स . बंद दरवाज्यातून उन्हाची तिरीप आल्यावर प्रकाश आणि धुलीकणांचा जो परिणाम साधला जातो तोच परिणाम आम्ही इथे साधलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की तिथे सूर्यप्रकाश असतो तर इथे आम्ही लाल, हिरवा आणि निळा (RGB) हे प्रकाशझोत वापरलेले आहेत. यात एक आयताकृती पाटासारखे उपकरण आहे ज्याला आम्ही सरफेस बोर्ड म्हणतो. या सरफेस बोर्डवर आम्ही १०२४ बाय ७६८ इतक्या रिझोल्यूशनचे पॉइंट्स मार्क केले आहेत आणि त्या प्रत्येक पॉइंटवर एक बारीक चीप, ३ फोटो एमीटर आणि एक पार्टीकल स्टेबलाइझर बसवला आहे जो त्या सरफेस बोर्डवरच्या एक फुटापर्यंतच्या धुलिकणांना स्टेबल करतो आणि त्यावर योग्य प्रमाणात प्रकाश टाकून ते काही वेळापुरते प्रकाशित करण्यात येतात.

याचबरोबर आणखीही काही छोटे छोटे शोध लावले आहेत. जसे की वॉटरप्रुफ आय.सी., ध्वनिरोधक पेंट इत्यादी इत्यादी. आमचा गंजरहित लोखंड यावरही शोध चालू आहेच. पण हे सारे छोटे आणि कमी महत्वाचे शोध आहेत. आमचा सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे FPU ( Fly away to Parallel Universe ).

FPU चा आणि माझा संबंध आला तो साधारणतः २ वर्षापूर्वी. मी भारतात, बेंगलोरमध्ये एका नामांकित प्रयोगशाळेत वैज्ञानिक म्हणून काम करत होतो. ती नोकरी करत करत मी घरी एक खाजगी प्रयोग चालू केला होता. आता वैज्ञानिक प्रयोग म्हणालं की चढ-उतार येणारच. कधी कधी पूर्णत्वाकडे गेल्यासारखं वाटायचं पण मध्येच अशी काही अडचण यायची की सारी उमेदच जायची. पण शास्त्रज्ञांनी नाउमेद होऊन चालत नाही. असं झाला असत तर एडिसन शंभर फिलामेंट ट्राय करत बसलाच नसता आणि आज आपण बल्ब,ट्यूबलाईट पाहूच शकलो नसतो. मग मी पुन्हा आधी पासून सुरु करायचो प्रयोग.

माझा प्रयोग अगदी साधा होता. त्रिमितीय वस्तू मला तारेमार्फत प्रसारित करायच्या होत्या. ग्राहम बेल सारखाच विचार मी करत होतो. जेंव्हा तारेमार्फत सूर प्रक्षेपित केले जायचे. तेंव्हा बेलनी असाच विचार केला की, जर तारेतून सूर जाऊ शकतात तर मग व्यंजने का जाऊ शकणार नाहीत ? आणि त्यांनी यशस्वीरीत्या दूरध्वनीचा शोध लावला. मग नंतर तारेतून बरेच काही प्रयोग झाले. आज हजारो गिगाबाईटचा डेटा फक्त हवेतून पाठवला जातो. असाच मी एकदा इमेल पाठवत होतो. तेंव्हा माझ्या डोक्यात विचार आला की जर द्विमितीय चित्रे आपण पाठवू शकतो तसे त्रिमितीय वस्तू का नाही पाठवता येणार !

आणि मग या कल्पनेला मूर्त स्वरूप आणण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरु झाली. यासाठी लागणारा मूळ विचार असा होता की एका ठिकाणी वस्तूचे अगणित बारीक कण करायचे. त्यासाठी आधी मला एक वस्तूविघटक तयार करावा लागला जो या कणांचे १०-२० मायक्रोमीटर इतके बारीक कणात रुपांतर करायचा. आणि त्याचाच एक भाऊही तयार केला जो आपल्या भावाच्या अगदी उलटे काम करायचा. पहिली अडचण आली इथे. कणांचे वस्तुत रुपांतर करताना त्यांच्या क्ष,य,झ स्थितीप्रमाणे ठेवावे लागणार होते. नाहीतर अलीकडून पाठवलेला घन तुकडा पलीकडे वर्तुळाकृती तयार झाला असता. ती अडचण वस्तूविघटक यंत्रात थोड्याश्या सुधारणेने गेली.

पण सर्वात महत्वाची गोष्ट अजून बाकी होती. माध्यम. या कणांना वाहून नेण्यासाठी काहीतरी हवे होते. सर्वप्रथम मी माध्यम म्हणून हवेचा विचार केला. पण हा काही डिजिटल डेटा नाही विद्युत-चुंबकीय लहरींवर आरूढ व्हायला. मग विचार होता लेझरचा पण पुन्हा लाईन ऑफ साईटचा प्रोब्लेम आहेच. त्याच वेळी आमच्या प्रयोगशाळेत एका नवीन धातूचा शोध लागला होता. त्याच नाव "रिप्लेनियम". याच्यावर कशाचाही परिणाम होत नव्हता. उष्णता, पाणी, थंडी, आर्द्रता.. कशाचाही परिणाम होत नव्हता. मी त्याचा वापर करायचे ठरवले. आणि एका ५० मायक्रोमीटरची पोकळी असणाऱ्या तारेला आतून रिप्लेनियमचा लेप दिला. मग ही रिप्लेनियमची तार आणि एक ४ पिन सिरीयल केबल वापरून माध्यम तयार झाले.

.. आणि जगातील पहिला रबरी चेंडू माझ्या बेडरूममधून हॉलमध्ये प्रक्षेपित झाला. मग मी माझा शोध जगासमोर आणला. पैसा प्रसिद्धी मिळालीच. पण त्या व्यतिरिक्त माझ्यासाठी महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे मला सेटमधून बोलावणे आले. त्यावेळी माझा FPU शी संबंध आला. त्यांच्या FPU साठी त्यांना अशाच एका त्रिमितीय प्रक्षेपकाची गरज होती. आणि ती मी पूर्ण केली होती.

आता तुम्हाला माहिती देतो ती FPUची. FPU म्हणजे Fly Away to Parallel Universe . ही संकल्पना मुळची टॉम वेल्डरची म्हणजे आमचा बॉस. समांतर विश्वात प्रवेश हे त्याच फार पूर्वीपासूनच स्वप्न होतं. त्याच्या पूर्ततेसाठी टॉमने जंग जंग पछाडले. समांतर विश्वाचा सखोल अभ्यास केला. त्या अभ्यासांती त्याच्या असं निदर्शनास आलं की आपण समांतर विश्वात प्रवेश करू शकतो. तसे गणिताने त्याने सिद्ध केलेही. पण त्याला तेवढ्यावर थांबायचे नव्हते. त्याला त्या जगात शिरून सत्य पडताळायचे होते. समांतर विश्व की संकल्पना जितकी आवड निर्माण करते तितकीच ती बुद्धिभेद करण्यात तरबेज आहे. समांतर विश्वाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो.

लाखो करोडो वर्षांपूर्वी एका मोठ्ठ्या स्फोटातून जेंव्हा जग निर्माण झाले तेंव्हा लांबी, रुंदी नि उंची अश्या तीन मितीत जग बनत होते, अश्या समजुतीत शास्त्रज्ञ संशोधन करत होते. पण सापेक्षता सिद्धांत आणि तत्सम शोधातून एका नव्या मितीचा जन्म झाला. ती मिती म्हणजे काळ होय. मग काळाच्या मितीचा वापर करून अनेक संशोधने झाली. अनेक सिद्धांत मांडले गेले. पण सर्व काही कागदावरच. गणिताने सर्व काही सिद्ध होते. पण त्याची सत्यता कोण पाहणार ? त्यासाठी प्रयोगही केले गेले. पण बरेच प्रयत्न फसले. या काळाच्या मितीचा सर्वात जास्त उपयोग झाला तो समांतर विश्वाच्या सिद्धांताला आणि शास्त्रज्ञ समांतर विश्वावर डोके खाजवणे सुरु झाले.

मग काळाच्या मितीचा मागोवा घेत शास्त्रज्ञ पुन्हा मागे मागे गेले. अगदी विश्वाच्या जन्मापर्यंत. आणि जन्म झाला तो समांतर विश्वाच्या कल्पनेचा. बिग बँगच्या वेळेस फक्त एक त्रिमितीय जग निर्माण झाले नाही तर अशी अगणित त्रिमितीय विश्व निर्माण झाली. या विश्वांमधील अंतर मोजण्याचे एकमेव परिमाण होते , काळ. अश्या या अगणित विश्वांमधील एका विश्वात आपण आहोत. मग समांतर विश्वाबद्दल सिद्धांत येऊ लागले. शास्त्रज्ञांच्या मते, आत्ता या ठिकाणीदेखील अगणित विश्वे असतील. जी आपण बघू शकत नाही. पण ती अस्तित्वात असतात. उदा. या विश्वातील तुम्ही हे वाचत बसलेले असाल, तर दुसऱ्या विश्वात तुम्ही अंघोळ करत असाल. किंव्हा मग तुमचे वन तुमचे आत्ताच नाव नसून दुसरेच काहीतरी असेल. काहीही असू शकते. मग शास्त्रज्ञ विचार करू लागले की आपण त्या विश्वात आपण प्रवेश करू शकतो का ? ज्या उत्तर मिळालं होय, काळाचा वापर करून.

साध्या भाषेत हि संकल्पना सांगायची झाली तर, एका कागद घ्या. त्यात दोन वर्तुळे काढा. आणि एका वर्तुळात एक टिंब द्या. आता तो टिंब दुसऱ्या वर्तुळात आपल्याला न्यायचा आहे. कसा ? नाहीच नेता येणार . कारण कागद द्विमितीय आहे आणि ती वर्तुळे नि टिंब सुद्धा. पण जर आपण तिसरी मिती ( खोली ) वापरली तर मात्र तो टिंब उचलून आपल्याला दुसऱ्या वर्तुळात टाकता येईल. अगदी तसेच आपल्या त्रिमितीय विश्वातून काळ या चौथ्या मितीचा वापर करून आपल्याला दुसऱ्या त्रिमिती विश्वात नक्कीच जाता येईल.

याच तत्वाचा वापर करून टॉम आणि त्याच्या टीमने एक यंत्र बनवले होते. गणितीय दृष्ट्या ते पूर्णतः निर्दोष होते. परंतु इथे मोठी अडचण म्हणजे माणसाचे दुसऱ्या विश्वात प्रक्षेपण कसे करणार ? या प्रश्नाला उत्तर मिळालं होतं माझ्या शोधाने. मग आमची भेट झाली. मी माझ्या शोधाचा एक प्रयोगही यशस्वीरीत्या करून दाखवला. पण अजून बर्याच सुधारणा आवश्यक होत्या. कारण त्यातून एक संपूर्ण मनुष्य पाठवायचा होता.

सुमारे दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज आम्ही ते यंत्र बनवले होते. त्यातल्या सर्व चुका काढून टाकल्या होत्या. आम्ही त्या यंत्राद्वारे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत प्रवासही केला होता. ते यंत्र बरेच मोठे होते. त्या यंत्राचा आवाका १५०० स्क्वेअर फुटच्या आसपास होता. एक संपूर्ण खोली या यंत्रासाठी वापरली होती. आणि शेजारच्या खोलीत मोठमोठ्या स्क्रीन्स लावल्या होत्या. त्यावर यंत्राची नियंत्रण व इतर माहिती दिसायची.

या यशस्वी चाचण्यांनंतर आम्ही पाच जण, मी व टॉम आणि इतर तिघेजण, जॉर्ज, केविन आणि सुझान, समांतर विश्वाच्या सफरीवर जाणार होतो. इतर तिघे टॉमच्या टीममधून आले होते. मनातून भीती होतीच पण एक उत्सुकताही होती की त्या विश्वात नेमके काय दिसेल. मी समांतर विश्वाबद्दल जे वाचला होतं त्यात असं लिहील होत की तिकडे काहीही असू शकेल. तिकडचा मानव आतापेक्षा प्रगत असेल किंवा अप्रगतही. कदाचित त्या विश्वात अजून आगीचाच शोध लागलाच नसेल, किंवा चांद्रयानाची अजून यशस्वी झेप झालीच नसेल किंवा तिकडची प्रगती हजार वर्षांनी पुढे असेल. काहीच सांगता येत नव्हत. कदाचित तिथे अजून जीवसृष्टीच अस्तित्वात आली नसेल तर ! पुन्हा एकदा पोटात भीतीचा गोळा उठला. बाकीच्यांच्या मनात काय चालले होते देव जाणे. त्यांनाही भीती वाटत असेल वा नसेलही. त्यापेक्षा विचार करणे थांबवले तर तूर्तास तरी मनस्थिती चांगली राहील.

आम्हाला योग्य त्या सूचना दिल्या गेलेल्या होत्या. आवश्यक वस्तू आम्ही जवळ बाळगलेल्या होत्या. प्रत्येकाच्या पाठीवर भली मोठी बॅग अडकवली होती. आणि प्रत्येकाजवळ एक चीप होती. अंगठ्याच्या नखाच्या आकाराची चीप होती ती, जिला एका बटन होते. ते बटन दाबताच आम्ही पुन्हा मूळ विश्वात परतणार होतो.

आम्ही पाच जण त्या यंत्राच्या एका कप्प्यात उभे होतो. तो भाग काचेचा बनला होता. बाहेरचे सारे आम्हाला स्पष्ट दिसत होते. जेनिफर तिकडे कसलीशी बटणे दाबून सेटिंग करीत होती. आता थोड्याच वेळात आम्ही दुसऱ्या विश्वात प्रयाण करणार होतो.

काचेचा दरवाजा बंद झाला. काचेवरून तांबडा पातळ द्रव ओघळत होता. हात पाय हवेत विरघळू लागले. काही ऐकू येईना. आम्हाला श्वास घेताना त्रास होऊ लागला. मग काही दिसेना.

... एक क्षणभर प्राण गेल्यासारखं वाटल आणि....

क्रमशः

( पुढचा भाग वाचण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैच्या कै भारीय हे!
आणि प्लीज क्रमशः शक्य तितक्या लवकर संपवा बरं का..नाहीतर पुढचा भाग शोधायला आम्हाला वेगळ्या विश्वात जावं लागयचं! Light 1

खुपच मस्त लिहिलय. वाचताना इतकी गढुन गेले की क्रमशः आल्यावर झप्पकन ब्रेक लागल्यासारखं झालं. पुलेशु.

काय सही लिहिलंय.. पुढच्या भागाची वाट पहायला लावू नका. गाडी वेगात चालली होती. अचानक करकचून ब्रेक लागला.

ह्या विषयावर अनेक माहितीपट युट्युबर पाहिलेले आहेत. तुमच्या कल्पनाशक्तीची झेप पहायला आणि समांतर जग अनुभवायला आवडेल.

Sorry for writing in English. Y:kashchit, it will be more convenient for the readers if you could provide a link of the next part at the end of earlier parts..