सावली !

Submitted by कवठीचाफा on 16 June, 2013 - 22:44

या कथेचा शेवटच मुळात तुमच्या कल्पनेवर सोडलाय,त्यामुळे जर आपापल्यापरीनं शेवट जोडलात तर खरंच मजा येईल.
********

अखिलेश उर्फ अखी, मुळातच एक माथेफीरू माणूस. किमान त्याचे मित्र तरी हेच म्हणायचे. वडलांचा यशस्वी व्यवसाय, अभ्यासातली गती असं सगळं असूनही त्यानं जेंव्हा त्यानं डिफेन्स सर्व्हीसमधे जायचा हट्ट धरला तेंव्हा कुणालाच त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. सगळ्या प्रक्रीया पुर्ण करून तो नेव्हल एअर आर्म्सला जॉईन झाला आणि नंतर मित्रांच्यातलाही त्याचा संपर्क कमी होत गेला. दोन-एक वर्षापुर्वी त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी धडकली तेंव्हा मात्र सगळेच हळहळले. घरी सांत्वन करण्यासाठी रिघ लागली.

आणि आज अडीच वर्षाच्या भल्यामोठ्या कालखंडानंतर अखिलेश पुन्हा मित्रांच्या गराड्यात होता, मध्यंतरीच्या काळात तो कुठे गहाळ होता ? नक्की काय घडलेलं तेंव्हा ? अनेक प्रश्नांचा भडीमार होत होता. सर्वांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेतल्यावर अखिलेशनं बोलायला सुरूवात केली.

मी नेव्हल सर्व्हीस जॉइन केली, या पलिकडे तुम्हाला काहीच माहीत नाही, कदाचित कधी कळलंही नसतं पण आज परिस्थितीनं अशी वेळ आणलीय की मला हे सांगावंच लागतंय.

नेव्ही जॉइन केल्यानंतरच्या काही काळातच माझी निवड सिक्रेट सर्व्हीससाठी झाली, अर्थात याबद्दल कुणालाच कल्पना दिली नव्हती आगदी ममी-पपांनाही. यथायोग्य प्रशिक्षण घेऊन मी नेमुन दिलेल्या कामगीरीवर रवाना झालो. ती कामगीरी काय होती, तीचं काय झालं हे इथे सांगणं प्रशस्त नाहीये आणि त्याचा माझ्या हकिकतीशी संबंधही नाहीये त्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष करू.

.. तर मी माझ्या मिशनवर असताना दुर्दैवानं माझं प्लेन अपघातग्रस्त झालं, रडारच्या टप्प्यात न येण्यासाठी फार कमी उंचीवरून उडण्याचा हा एक धोका होताच.

डोळे उघडले तेंव्हा मी सर्वस्वी अनोळखी भुभागावर होतो, मी तिथे कसा पोहोचलो, माझ्या विमानाचे अवषेश कुठे पडले याबद्दल मला काहीच कल्पना नाही. आजुबाजूला नजर फिरवतानाच डोकं काम करायला लागलं, सर्वप्रथम मी माझ्याबद्दल ओळख सांगणार्‍या कागदपत्रांची विल्हेवाट लावायची तयारी केली, कदाचित मी शत्रूप्रदेशातही असू शकेन. केवळ योगायोगानं विमान भरकटून मी इथे आलो हे कारण संयुक्तीक वाटेल इथपतच खाणाखूणा मी शिल्लक ठेवल्या. तोपर्यंततरी आजुबाजूला कुणाचाच वावर असल्याची काही चिन्हे मला दिसली नाहीत.

बराच काळ नुसता एकाच ठिकाणी घालवल्यावर मी पहाटेच्या अंधुक उजेडात आजुबाजूचा अंदाज घेण्यासाठी निघालो. जवळपास मानवी वस्ती असेल तर तिथवर किंवा किमान मोकळ्या जागी जिथून मला प्रदेशाचा थोडाफार अंदाज येऊ शकेल..

बराच वेळ झाडाझुडपातून प्रवास करत राहील्यावर कानावर समुद्राचा आवाज आला, थोडक्यात मी कुठल्यातरी समुद्राकाठच्या ठिकाणावर होतो. वेड्यासारखा वाट काढत मी समुद्रकिनार्‍यावर पोहोचलो पण आजुबाजुचा अनंत पसरलेला सागर पाहून जाग्यावरच थिजलो, दूर दूरवर कुठेही काही नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं निव्वळ पाणी आणि पाणीच. आजुबाजूला नजर टाकली तरी जमिनीला स्पर्श करत वेड्यावाकड्या वळणांनी पसरत गेलेला समुद्रच दिसत होता. मी होतो कुठे ? एखाद्या बेटावर ? पण माझ्या प्रवासाच्या वाटेत असं एकही बेट असल्याचं मला आठवेना ! मग मी खरंच आकाशात भरकटलेलो ?

हताश मनानं परत फिरून मी माझी तात्पुरती रहाण्याची सोय पहायला निघालो. समुद्रकिनारा सोडणं हे योग्य ठरलं नसतं, कारण एव्हाना माझ्या नाहीसे होण्याची खबर नक्की लागली असणार होती आणि शोध मोहीमही घेतली जाणार होतीच पण गुप्ततेनं, त्यामुळे समुद्रकिनार्‍याची जागा मला सुटकेच्या दॄष्टीनं महत्त्वाची होती, अर्थात संपुर्ण भुभाग नजरेखालून गेल्याशिवाय नेमकी जागा ठरवणं शक्य नव्हतंच.

डोक्यात विचारांच मोहोळ उठलेलं असताना आजुबाजूला होणार्‍या चोरट्या हालचाली काही क्षण माझ्या लक्षात आल्या नाहीत, पण प्रशिक्षीत मेंदूनं त्यांची नोंद घेतली आणि मी एका जागी थबकलो. माझं अचानक थांबणं कदाचित त्यांना अपेक्षीत नसावं, त्यामुळे माझ्या नजरेच्या कोनाच्या बाहेरून हालचाल करणारे गोंधळले आणि माझी नजर त्यांच्यावर पडली.

काळाकुट्ट रंग, अंगावर लज्जारक्षणापुरतं कुठल्यातरी प्राण्याचं कातडं गुंडाळलेलं, हातात चमकत असलेलं धारदार पातं, मनाला धडकी भरवणारं ध्यान होतं ते. शरीर मिळालेल्या प्रशिक्षणाला जागत स्वरक्षणाच्या तयारीला लागलं, नकळत सगळे स्नायु सैल पडायला लागले, डोळे त्याच्या हालचालीचा वेध घ्यायला लागले, पण हा खेळ काही सेकंदच, नंतर ज्या वेगात `त्या' च्या आजुबाजूला तसेच अनेकजण दिसायला लागले तेंव्हा प्रतिकार सोडून पळण्यासाठी नजर भिरभिरायला लागली. ते अशक्य होतं एव्हाना किनार्‍याच्या बाजूनं सगळीकडेच ते जमले होते डावी उजवीकडे असलेला मोकळा किनारा आणि पाठीमागे असलेला समुद्र, माझ्या सगळ्याच दिशा बंद झाल्यात जमा होत्या.

काही मिनीटं असतील, त्यांनी माझं निरीक्षण निश्चीतच आधीच केलं असणार पण मला त्यांचा अंदाज घ्यायला काही मिनीटं लागलीच. काही झालं तरी समोरच्या परिस्थितीला तोंड हे द्यायलाच लागणार होतं अन्यथा पळून पळणार कुठे ? मी त्यांचा अंदाज घ्यायचं ठरवलं आणि जवळ काही शस्त्र नसल्याची खूण म्हणून दोन्ही हात वर उचलले.

माहीत नाही ही खुण कुणी आणि कधी ठरवली असेल ते, पण सगळ्या जगभरात ताबडतोब ओळखली जाते हे खरं. माझ्याकडून धोका नसल्याची खात्री होताच सगळीकडून ते मोकळ्या वाळूत यायला लागले. एकंदरीत त्यांच्या हालचालीत काहीच आक्रमकता दिसत नव्हती, होता तो सावधपणा. मी अलगद त्यांच्या गराड्यात वेढला गेलो.

दूर.. किनार्‍यापासून बरंच दूर अंतरावर असलेल्या त्या तळ्यात मी पुन्हा एकदा स्वतःचं प्रतिबिंब न्यहाळलं. दाढीमिश्या वाढल्या असल्यानं तो चेहरा मलाही ओळखू आला नाही, एरव्ही शरीरात बाणलेल्या शिस्तीनं कित्येक महीन्यात चेहर्‍यावर दाढीची खुरटं सुध्दा वाढलेली कधी आठवत नव्हती.

गेले किती दिवस मी इथे होतो मलाच आठवत नव्हतं. सुर्याच्या उदय आणि अस्तावर ते ठरवावं म्हंटलं तरी कितीतरी काळ मी तीथल्या एका अंधार्‍या गुहेत सुर्यप्रकाशावाचून काढला होता. एव्हाना माझा जर काही शोध झालाच असेल तर तो ही नक्कीच थांबवण्यात आला असणार होता.

काळोख्या गुहेत, ढणढणत्या पलित्यांच्या वेड्यावाकड्या उजेडात राहून मला वेड लागलं नाही हेच नवल. त्या गुहेत पाउल टाकताना भीती वाटलेली, कदाचित हा आपल्या आयुष्याचा शेवट.. पण कित्येक काळ काहीच घडलं नाही. पाहूण्याची बडदास्त ठेवावी त्या प्रमाणे वेळच्यावेळी अन्न पाण्याचा पुरवठा मला होत होता, मात्र गुहेच्या बाहेर पाउल टाकायला मनाई होती.

ते नक्की कशाची खात्री करत होते देव जाणे पण तशी ती त्यांची पटली असावी एक दिवस अचानक मला त्यांनी गुहेच्या बाहेर आणलं त्या दिवसापासून मी मोकळाच होतो, मनाला येईल तिथे फिरू शकत होतो, पण ते एका ठरावीक मर्यादेत. त्यांच्यापैकी कुणाची ना कुणाची नजर माझ्यावर असायचीच, जरा जरी मी नजरेआड व्हायचा प्रयत्न केला तरी काही न बोलता एक जण उघडं पातं घेऊन समोर उभा ठाकायचा.

मला समुद्रकिनारी जायचं होतं, सुटकेचे प्रयत्न करायचे होते, कित्येकदा समोर येणार्‍याच्या हातातलं शस्त्र हिसकावून तिथून पळावं असा विचार मनात येत होता. तो कीती धोकादायक होता हे मला अजून कळायचं होतं.

सुरूवातीच्याच दिवसांच्या काळात मी त्यांच्यात वावरताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली यातला एकही जण माझ्याशीच नव्हे तर आपापसातही काही बोलत नव्हता, एक अवाक्षरही नाही. कदाचित माझ्या समोर बोलत नसतील असं वाटलेलं पण कधीच त्यांना मी एकमेकांशी बोलताना पाहीलं नाही साध्या खाणाखुणाही नाहीत, तरी त्यांचे व्यवहार सुरळीत चालत असायचे. इतकं आखीव रेखीव वागणं मी अद्याप कुठेच अनुभवलं नव्हतं. दुसरा एक चमत्कारीक अनुभव आला तो म्हणजे मला भुक लागली किंवा आणखी काही गरज भासली तर त्यांच्यातला कुणी ना कुणी समोर येऊन उभा रहायचाच, योगायोग म्हंटलं तरी तो प्रत्येकवेळी घडतो असं नाही ना !

कित्येकदा असं वाटायचं की चेहर्‍यावरच्या सुक्ष्म खाणाखूणा त्यांनी ठरवल्या असतील पण त्यांचे चेहरे कायम निर्वीकार एक सुरूकुतीही हलणार नाही,मग यांचे संवाद व्हायचे तरी कुठल्या पातळीवर ?

उत्सुकता अशी गोष्ट आहे की ती माणसाला गप्प बसू देतच नाही. मी त्यांचं बारकाईनं निरीक्षण करायला सुरूवात केली. एव्हाना आणखी एक गोष्ट लक्षात आलेली ती म्हणजे इथे वावरणारे सगळे पुरुषच होते क्वचित एखादा लहान मुलगा दिसायचा पण तो फार काळ नसायचा. ज्या अर्थी इथे लहान मुलं येत होती त्या अर्थी कुठे ना कुठे वंशवृध्दीही होत होती पण ती नजरेच्या टप्प्याआड. स्त्रियाही तिथेच असाव्यात, तिथे अवतरणारे नवतरूणही सराईतपणे वावरायचे, म्हणजे याचं प्रशिक्षण त्यांना मिळत असावं.

एका चमत्कारीक संस्कॄतीची माहीती मिळत होती ही. ज्यात स्त्री आणि पुरूष पुर्णपणे वेगवेगळ्या भागात वावरत होते न जाणो कुठल्याकारणास्तव. मी याचाही शोध घ्यायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी मी त्या प्रदेशाची मर्यादा ओलांडायच्या आत त्यांचा राखणदार समोर उभा रहायचा. नंतर नंतर तर प्रकरण आणखी अवघडा झालं मी नुसतं ठरवलं की आज आपण यांच्या रहस्याचा छडा लावायचा की दिवस दिवस त्यांचा एखादा माणूस माझ्या अवती भवती रहायचा. येस, हे लोक माईंड रिडर होते, याच कारणानं त्यांना एकमेकांशी संवाद साधायला बाह्य खुणांची गरज भासत नव्हती आणि त्यांच्यातला माझा वावर वाढल्यानं माझं मनही ते पटकन वाचायला लागले होते. अर्थात हा सगळा वन वे ट्रॅफीक होता ते माझ्या मनातलं ओळखू शकत होते पण मला मात्र काही केल्या त्यांचा अंदाज यायचा नाही. हळूहळू माझे प्रयत्न कमी व्हायला लागले.

एक दिवस घटनाच अशी घडली की मला त्या भागातल्या रहस्याचा शोध घेणं गरजेचं होऊन बसलं.

तो दिवस सगळ्यांचीच धावपळ चालू होती, कदाचित त्यांचा ठरवलेला एखादा उत्सव वगैरे असेल असं मी गृहीत धरलं. दुपारपासूनच गटागटानं त्यातले लोक सरळ सरळ समोरचा डोंगर पार करून पलीकडं जायला लागले. दोन-अडीच तासातच तो गट परत यायचा की दुसरा गट डोंगरमाथ्याकडे रवाना व्हायचा. हे सगळं संध्याकाळ उलटून गेली तरी चालूच होतं.

पौर्णीमेच्या आधीचा काळ असावा तो, रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्यांची धावपळ नजरेत भरत होती, एरव्ही इतक्या मोठ्या संख्येनं रात्रीच्यावेळी मी त्यांना बाहेर पाहीलं नव्हतं, आजुबाजूच्या गुहांमधे ते आश्रयाला जायचे, नाही म्हणायला काही जण पहारा द्यावा तसे इकडे तिकडे वावरत असायचे पण ते नेमकेच. आज मात्र रात्र उलटून गेली तरी एकहीजण गुहेकडे वळला नाही उलट मोकळ्या जंगलातल्या झाडा झुडूपांवर नजर ठेवून राहीले होते. दिसताना ते पांगलेले दिसत असले तरी क्षणात एकत्र येतील याची मला चांगलीच कल्पना होती. या सगळ्या गडबडीत मला आत पिटाळायला ते विसरले की पुढे जे होईल ते मी पहावं म्हणून मला मोकळ्यावर राहू दिलं हे मला कळत नव्हतं.

मध्यरात्र उलटून गेल्यावर ते घडलं. समोरच्या गर्द झाडीतून राक्षसी वाटतील अश्या शरीराचे कित्येकजण आपली भलीथोरली शस्त्र पाजरत सरसावले. त्यांची संख्या आणि आकारमान पहाता इथल्या लोकांच फार मोठ्या प्रमाणावर शिरकाण होणार हे नक्की होतं, समोरची टोळी झाडी पार करून मोकळ्यावर आली तरी काहीच हालचाल जाणवली नाही, मघापासून वावरणारे इथले रहिवासी आता कुठेतरी गायब झालेले. मला माझी सुरक्षीतताही तितकीच महत्त्वाची होती, मी समोर दिसेल त्या डोंगराच्या खबदाडीत शरीर घुसवून समोरच्या हालचाली निरखायला लागलो, आणि काहीतरी अविश्वसनीय घडायला लागलेलं.

समोरच्या त्या महाकाय टोळीवर मागच्या बाजूनं प्रचंड हल्ला झाला, इतका वेगवान की त्यांना कळेस्तोवर काही डझन कापल्या गेले होते, मघापासून गायब झालेली मंडळी आता नजरेच्या टप्प्यात यायला लागली. सगळं शिस्तबध्द, आणि असणारच होतं ते तसं त्यांचा नक्कीच एकमेकांशी संपर्क असणार होता. कितीही झालं तरी ताकद ही ताकदच असते काही काळ गडबडलेले हल्लेखोर आता पुन्हा आक्रमक बनत होते पण इथेच काहीतरी चुकताना जाणवत होतं. हल्लेखोर टोळीत वेगाने शिरलेल्यांचा खातमा होणार ही शक्यता गॄहीत होती पण समोर काही वेगळंच दिसत होतं. समोर दिसणारे ते महाकाय आकार अचानक वर्मी घाव बसून कोसळायला लागलेले. हा काही गनिमीकाव्याचा भाग असावा ? पण त्यासाठी तशी शस्त्रतयारी हवी आणि चालता चालता अचानक मान धडावेगळी करणारं शस्त्र असं नकळत कसं वापरता येणार ?

काही मिनीटात चित्र पालटलं हल्लेखोर बचावाच्या प्रयत्नात दिसायला लागले, समोर दिसत असलेल्यावरही शस्त्र चालवायला कचरायला लागले. शक्य तितके एकमेकांच्या जवळ सरकायला लागले पण इतकं सगळं करूनही हे चमत्कारीक शिरकाण थांबत नव्हतंच, उलट त्यांच्या आजुबाजूलाच काही आकार वावरत असल्याचा भास व्हायला लागला. इतका वेळ स्वतःच्या सुरक्षीततेच्या काळजीनं लपून बसलेला मी, पण समोरच्या एकतर्फी युध्दाचं रहस्य मला गप्प बसू देईना, मी शक्य तितक्या सावधपणे समोर सरकायला सुरूवात केली. एव्हाना भीतीनं गोठलेले हल्लेखोर किंकाळ्या मारत पळाचा प्रयत्न करायला लागलेले. मी आणखी थोडा सरकलो आणि मला पहील्यांदाच त्यांच्या घाबरण्याचं कारण लक्षात आलं.

घाबरून इतस्तत झालेल्यांपैकी एक जण माझ्याच समोर आगदी हाताच्या अंतरावर आला, मला पाहून हल्ला करण्या ऐवजी त्याच्या नजरेत दाटलेली भीती मला त्या चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसली, तेवढ्यात त्या प्रदेशाचे मालक असलेल्यांपैकी एकजण त्याच्यासमोर येऊन ठेपलाच. याच मला आश्चर्य वाटायचं कारण त्यांच्या मनोवाचनाचा मला अनुभव होताच, मात्र नंतरचा प्रकार माझ्या कल्पनेपलीकडला होता. गडबडलेल्या त्या हल्लेखोरानं हातातल्या शस्त्रानं समोरच्या व्यक्तीवर आघात केला पण तो हवेतून फिरल्यासारखा झाला, या उलट त्याच्या मागच्या बाजूनं मात्र लखलखत्या पात्यानं त्याचा वेध घेतला, माझी पुर्ण खात्री होती तिथे आम्हा तीघा व्यतीरीक्त चौथं कुणी नव्हतं पण हे घडलं, माझ्या समोर घडलं. विश्वास ठेवावा की ठेवू नये यासाठी काही वेळ देण्याच्या आतच खाली पडलेल्या त्या देहावरून शस्त्रधारी सावली बाजूला सरकली. होय सावलीचं, चंद्रप्रकाशात स्वच्छ दिसत असताना मी हे पाहीलं होतं. समोरच्या व्यक्तीची सावली सशस्त्र होती, या उलट त्याच्याकडे काहीच शस्त्र नव्हतं.

काही क्षण माझ्याकडे पाहून तो पुन्हा परतला, यावेळी मी निरखून पाहीलं आकाशात चंद्र असतानाही त्याची सावली पडत नव्हती, झपाझप चालत तो समोरच्या झाडांच्या सावल्यांत नाहीसा झाला. काही तासांचा खेळ, एकही हल्लेखोर परत गेला नसावा. डोळ्यातली झोप केव्हाच उडून गेलेली. सकाळच्या सुर्यप्रकाशात मी त्यांना हल्लेखोरांची प्रेतं ओढून नेताना पहात होतो. दृष्य साधंच असलं तरी त्यात एक विसंगती होती. ' एकाचीही सावली जमिनीवर पडलेली नव्हती'.

तो दिवस उलटला, पुन्हा तिथले व्यवहार नेहमीप्रमाणे चालू झाले. दुसर्‍या दिवसापासूनमात्र त्यांच्या सावल्या पुन्हा पुर्ववत दिसायला लागल्या. विचार करून करून डोक्याचा भुगा होत होता पण उत्तर सापडत नव्हतं. साधा व्यवहारीक नियम प्रकाशाला अडथळा आला की सावली पडते पण ती केवळ एक प्रतीमा असते तीच्यात जडत्व कसं येणार ? तीच्या हालचाली तीच्या उगमापेक्षा वेगळ्या कश्या होणार ? हा काही चमत्कार होता की, जादूटोंण्याचा काही प्रकार ? काही गुढ असेलच तर ते त्या डोंगरापलिकडे पण तिथे जाणार कसं ?

दोन दिवस मी फक्त आणि फक्त हाच विचार करत घालवले. शेवटी मनाचा निर्धार केला या मागचं गुढ शोधून काढायचंच पण कसं ? जे लोक माझं मन स्वच्छ वाचू शकतात त्यांना चकवून मी डोंगराच्या पायथ्याशीही पोहोचू शकत नव्हतो. छे, याला काहीतरी मार्ग असलाच पाहीजे, मी मनाच्या कानाकोपर्‍यातल्या ज्ञानाला चाचपडायला सुरूवात केली आणि एक शक्यता जाणवली.

लाय डिटेक्टर टेस्टला चकवण्यासाठीचं एक खास ट्रेनिंग आम्हाला दिलं गेलेलं, कदाचित त्याचा वापर व्हावा.. वेळ न दवडता मी आजुबाजूला शोध घ्यायला सुरूवात केली. काही क्षणातच हवी ती वस्तू मिळाली. तो एक अणूकुचीदार खडा होता, गारगोटीचा. हे सगळं मनात चालू असताना काही निरर्थक वाक्य मनात आणत होतो, काही जुन्या आठवत असलेल्या गाण्यांच्या ओळी, लहानपणीची बडबडगीतं. उद्देश हाच होता की मनाच्या आतल्या बाजूला चाललेले विचार स्पष्टपणे बाह्यमनात येऊ नयेत.

नकळत खाली वाकून मी तो खडा उचलून दोन बोटांच्या बेचक्यात आडवा ठेवला आणि मुठ घट्ट आवळली, वेदनेची एकच कळ मस्तकात गेली, ती सहन करत मी मला भूक लागल्याचा विचार मनात आणला, यावेळी मुठ आणखी जोरात आवळली. माझा अंदाज बरोबर निघाला कुणीच माझ्या समोर आलं नाही, आज माझ्या मनाचं वाचन त्यांना शक्य होत नव्हतं कारण वेदना ही बाह्यमनातल्या सगळ्या गोष्टीना भारी पडते. आता मला फक्त संधी शोधायची होती.

ती लवकरच मिळाली, त्या संध्याकाळी वारा जरा जास्तच वेगानं वहात असल्यानं सगळ्यांनीच लवकरच आपल्या गुहेत आश्रय घेतलेला. तीच संधी साधून मी माझ्या तपासकार्यावर निघालो. वेळ मिळेल तेंव्हा घासून घासून अणूकुचीदार केलेले लाकडाचे दोन तुकडे माझ्या कोपरांना बांधले होते, माझ्या प्रत्येक हालचालीनं ते हाताला टोचत रहाणार होते, या वेदनाच माझं कवच म्हणून काम करणार होत्या.

लपत छपत मी तो डोंगर चढायला सुरूवात केली, पलिकडे नक्की काय असेल याचा अंदाज न घेताच. पलिकडे कदाचित त्यांचीच दुसरी वस्ती असू शकत होती किंवा आणखीही काही भयंकर.. पण माझा निर्धार पक्का होता. धडपडत हातापायांना खरचटत मी एकदाचा डोंगरमाथा गाठला आणि समोर दिसणारं दृष्य बघून चकित व्हायची वेळ आली.

अत्यंत व्यवस्थित कातलेल्या दगडांच ते बांधकाम होतं, साधारण आपल्या देवळासारखंच, फरक फक्त इतकाच होता की देवळाच्या घुमटाच्या जागी काही ठरावीक कोनात असलेलं पण उघडं छत होतं. या गुहांमध्ये रहाणार्‍या माणसांकडून या असल्या बांधकामाची अपेक्षा करणं शक्य नव्हतं, मग ते नेमकं कुणी बांधलं असेल ? की काही पुरातन अवषेश होते ते ?

अत्यंत सावधपणे मी एक फेरी त्या बांधकामाभोवती मारली, मघा दूरून दिसताना न जाणवलेलं वेगळेपण म्हणजे ते पंचकोनी आकारात बनवलेलं होतं. पंचकोन, आपल्या शास्त्रात त्याचा सुष्ट आणि दुष्ट दोन्हीसाठी उपयोग होतो असं कधीतरी वाचलेलं होतं. हे नक्की काय असावं ? आत शिरण्याचा मोह आवरून मी पुन्हा परत फिरलो, अन्यथा मी न दिसल्यानं काहीतरी गोंधळ उडण्याची शक्यता होतीच.

गेल्या काही दिवसात एक गोष्ट मी हेरलेली, काही ठरावीक दिवसांनी चार ते पाच जणांचा एक गट त्या डोंगरावर जायचा. मी पुढचा प्लॅन ठरवला.

त्या दिवशी सकाळपासूनच मी गुहेबाहेर पडलो नाही, मनात आजारी असल्याची भावना प्रयत्नपुर्वक जागवली. परिणामी माझ्याकडे कुणीच लक्ष देणार नव्हतं. त्यांच्या लेखी मला किंमत काहीच नव्हती, फक्त ते मला मारू इच्छीत नसावेत किंवा त्यांना तशी गरज भासली नसावी, बाकी मी मदतीची अपेक्षा करेपर्यंत कुणीच माझ्याकडे फिरकणार नव्हतं. रात्र पडताच मी त्या डोंगरावर चढाई करून लपण्यायोग्य जागा शोधलेली आणि शांतपणे त्यांच्या येण्याची वाट पहात बसलो.

अपेक्षेप्रमाणे ते आले, निर्धास्तपणे. मी आजुबाजूला असल्याचा त्यांना अंदाजही आला नाही. एका मागोमाग एक असे ते पाचही जण त्या पंचकोनी रचनेत शिरले आणि मी माझी लपण्याची जागा सोडली.

अत्यंतीक सावधपणे मी त्या रचनेत प्रवेश केला. आता मात्र वेड लागायचं बाकी राहीलं. बाहेरून दगडाच्या असलेल्या त्या रचनेत आत मध्यभागी पंचकोनीच आकाराचं पण काही खास चमकत्या भिंतीची एक बुटकी रचना होती, मी नेमक्यावेळी तिथे आलो होतो. आत्ताच आलेल्या गटातल्या एकानं त्या रचनेत उडी मारली आणि काहीकाळ तसाच थांबला. कसली वाट पहात असावा तो ? की काही मंत्रोच्चारण वगैरे चालू असावं ? या ही शंकेचं निरसन लगेचच झालं अर्धवट उघड्या छतातल्या एका झरोक्यातून सुर्यकिरण आत झेपावले आणि पहाता पहाता तो पंचकोन झळाळून उठला. मी स्तंभीत होऊन पहात राहीलो ठरावीक काळ सुर्यकिरणं त्या पंचकोनावर स्थिरावली आणि पुन्हा एकदा सुर्याच्या आड छताचं बांधकाम आलं. त्याच क्षणी तो त्या रचनेतून उडी मारून बाहेर पडला, हा प्रकार थोड्याफार फरकानं आणखी चार वेळा घडला आणि मी हळूच पुन्हा माझ्या लपण्याच्या ठिकाणी आलो. आत गेलेले ते पाच जण केंव्हाही बाहेर येण्याची शक्यता होती.

फार वाट पहावी लागलीच नाही, ते बाहेर आले आणि इकडे तिकडे न पहाता सरळ चालायला लागले. पहाणार्‍याला त्यांच्यातला फरक नक्कीच जाणवला नसता पण मला नेमकं काय पहायचं ते ठाऊक होतं. पाचही जणांच्या सावल्या पडत नव्हत्या.

मी जे शोधत होतो ते इथंच होतं. क्षणार्धात मनात विचार चमकून गेले, हे असलं कल्पनातीत असा कॉमाफ्लॉज जर आपल्याकडे असेल तर ?

एखाद्या विचारानं डोक्यात थैमान घातलं की माणूस सगळा सारासार विचार विसरतो. एक तर हा प्रकार का घडत होता या मागचं कारण मला माहीत नव्हतं, समजा ते कळलंही असतं तरी ही इतकी मोठी दगडी वास्तू मी सोबत नेऊ शकलो नसतो, शेवटचा पर्याय एकच उरलेला मी स्वतःवर हा पयोग करून पहाणं आणि शक्य होईल तसं इथून सटकणं. एकदा देशातल्या तज्ज्ञ लोकांना हा प्रकार दाखवता आलाच तर या मागची कारणमिमांसा ते सहज शोधतील, आगदीच नाही तर सरळ सरळ या बेटावर हल्ला करून ती वास्तू तरी ताब्यात घेतील.

विचार चारी दिशेनं भरकटत असताना मी त्या चमकत्या कुंडाच्या भींतीजवळ पोहोचलेलो सुध्दा, मागचा पुढचा विचार न करता मी सरळ त्यात उडी मारली, मात्र मघापासून विचारांच्या नादात मी एक गोष्ट पार विसरून गेलेलो. माझे विचार ते लोक वाचू शकतात. अर्थात मी पुढे काय करण्याची तयारी करतोय हे कदाचित त्यांना कळलं नसेल पण आत्ता मी नेमकं काय करायला निघालोय हे त्यांना नक्की कळलं होतं. मी त्या चमकत्या कुंडात उडी मारली आणि मघाशी इथून गेलेले पाचही जण दरवाजाच्या चौकटीतून धावत आत शिरले.

.. नशीब नावाची काहीतरी चिज असते, त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचायच्या आतच सुर्याची किरणं झरोक्यातून त्या रचनेवर पडली. झगझगता उजेड, बंद पापण्यांतून एखाद्या सुईसारखा डोळ्यांना टोचणारा उजेड, शरीरातून काहीतरी बाहेर ओढल्या जात असल्याची,शरीर पिसासारखं हलकं होत असल्याची विलक्षण जाणिव. हा प्रकार कितीकाळ चालला मलाच माहीत नाही पण जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा समोर दिसले ते थिजलेले पाच जण, पुतळे झाल्यासारखे एकाच जागी खिळून राहीलेले होते.

पाच जणांच्या गराड्यात मला त्या वस्तीवर नेण्यात आलं. तीथं काय चर्चा झाली असेल हे मला कळणं कदापी शक्य नव्हतं, चर्चा.. शब्दच चुकीचा म्हणायचा हा. एकमेकांशी बोललं तर चर्चा म्हणायची ना ती, इथे सगळाच अबोल कारभार. मी माझ्या जिवाची आशा कधीच सोडून दिलेली, त्यामुळे त्यांनी मला मध्यभागी घेऊन एका निश्चीत दिशेनं चालायला सुरूवात केली तेंव्हाही मी सुटकेची धडपड केलीच नाही. शरीरातली ती हलकेपणाची भावना आणखी प्रबळ झाली.

पुन्हा एकदा तोच उधाणता समुद्र, तीच आजूबाजूला पसरलेली वाळू मनातली अनिश्चीतताही तीच, फक्त परिस्थितीत फरक असेल तर इतकाच की मी तेंव्हा जगण्याची धडपड करत होतो. आता मरण कसं येईल याचा विचार डोक्यात होता.

काहीतरी वेगळं घडत होतं, माझ्या अंगावर भाजलेल्या कंदांचा जुडगा आणि पाण्याची कातडी थैली टाकून ते तसेच निर्विकारपणे मागे फिरून गेले. कदाचित विनाकारण मनुष्यवध त्यांच्यात त्याज्य असावा, थोडक्यात मी इथे धडपड करून सुटावं किंवा मरावं अश्या स्थितीत टाकणं त्यांना योग्य वाटलं असेल.

शरीरातला हलकेपणा अजुनही जाणवत होता, सकाळच्या चढत्या उन्हात माझी सावली जमिनीवर चटके खात माझी नक्कल करत होती. थोडक्यात मी काहीच मिळवू शकलो नव्हतो तर..

आता इथून सुटका हे एकमेव लक्ष माझ्यासमोर राहीलेलं होतं. आजुबाजूला पडलेल्या झाडांचे वाळके अवशेष आणि हात ठेचकाळत रक्ताळत ओरबाडून काढलेल्या साली यांच्या सहाय्यानं कामचलावू तराफा बनवायलाही मला चार दिवस लागले. अर्थात त्याच्यावर माझी भिस्त फारशी नव्हतीच पण एक प्रयत्न म्हणून.....

उरलेली थोडीशी कंद आणि तुटपुंजा पाण्याचा साठा घेऊन मी तराफा समुद्रात लोटला. जोवर शक्य होतं तोवर प्रयत्न करत या बेटापासून दूर जाणं ही एकमेव इच्छा राहीलेली होती.

वार्‍यावादळाला तोंड देता देता दिशाहीन अवस्थेत कुठेतरी भरकटण्याचा कितवा दिवस होता कोण जाणे ? कित्येकदा या समुद्रात उडी मारून आयुष्य संपवायची इच्छा झालेली खरी, पण सावरलं स्वत:ला. अन्न संपलेलं पाणी संपलेलं कित्येकदा ग्लानी येऊन मी तराफ्यावर पडून असायचो.

असाच कधीतरी ग्लानीत असताना मला कुणीतरी उचलल्याची जाणिव झाली. ते एक संशोधन करणारं जहाज होतं. बर्‍यापैकी शुध्दीवर आल्यावर मी त्यांना आमच्या कोचीच्या बेस बद्दल सांगितलं आणि तिथे संपर्क करण्याची विनंती केली.

दुसर्‍याच दिवशी वेगवान गस्ती नौका मला त्या जहाजावरून उचलून बेसवर घेऊन गेल्या. पंधरा-वीस दिवस मी तिथल्या हॉस्पिटलमध्ये घालवले आणि चौकशी समितीला तोंड द्यायला तयार झालो.

तीथे मला पहिल्यांदा कळलं की मी चक्क दिड वर्ष बेपत्ता होतो, आणि आता अचानकच सापडलेलो. मुद्दा वादग्रस्त होता. माझ्याकडे स्पष्टीकरण मागितलं आणि मी माझी पुर्ण कहाणी सांगून टाकली. यानंतरचा आठवडा एक प्रचंड झंजावात आल्यासारखं वातावरण होतं. टेबलांवर पसरलेले नकाशे, सॅटॅलाईट्सनी पाठवलेले फोटो. खास उंचावरून टेहळणी करणार्‍या विमानांचे अहवाल. कुणाचाच माझ्या सांगण्यावर विश्वास दिसत नव्हता, आणि का असावा ? कुठलाच पुरावा असं एखादं अनोळखी बेट मी सापडलो त्या ठिकाणापासून पाचशे मैलावरच्या परीघातसुध्दा असल्याचं दाखवत नव्हता.

याचाच पुढचा संशय म्हणजे मी परकिय राष्ट्राच्या हाती लागून माझं ब्रेन वॉशिंग करून मला काही विघातक कारवाया करण्यासाठी परत पाठवण्यात आलं असावं. त्या बाजूनंही अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागलं, मन थकून जाईल इतक्या चौकशीपासून ते सोडीयम पेंटेथॉलपर्यंत. निष्पन्न काहीच नाही, बरं माझ्या सांगण्यावर विश्वास बसावा असा एकही पुरावा माझ्याकडेही नव्हताच. शरीर हलक हलक मात्र वाटत होतं पण ही सिध्द होणार्‍यातली गोष्ट नक्की नव्हती.

सरतेशेवटी सर्वमान्य निकष लावल्या गेलाच, ज्याची शक्यता मला जास्त वाटत होती. अत्यंतीक प्रतिकुल परिस्थितीत बराच काळ काढल्यानं माझ्या मानसीक आरोग्यावर परीणाम झाला असावा. थोड्याफार फरकानं सगळ्यांनाच ही गोष्ट एव्हाना पटली होती, फार वेळ न दवडता माझी रक्षा सेवेतून मुक्तता करण्यात आली, आणि आज मी इथे आहे.

अखिलेशनं सलग इतकं बोलल्यानंतर प्रथमच थोडी विश्रांती घेतली.

एव्हाना हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अखिलेशच्या शहाणपणाबद्दल शंका निर्माण झालीच होती, त्यामुळे एक जोवघेणी शांतता तीथे पसरली होती.

" माझा एकच प्रश्न आहे " महारूद्र साठेनं त्या शांततेचा भंग केला " जर तुला खरंच काही प्रमाण देता येत नसेल तर कुणी तुझ्या हकिकतीवर विश्वास ठेवावा तरी का ? आणि केवळ ही कल्पित कथा ऐकवण्यासाठी तु आम्हाला इथे का बोलावून घ्यावेस ?" थोडासा कठोर वाटला असला तरी उपस्थित सगळ्यांच्या मनातलाच प्रश्न साठेनं विचारलेला होता.

" तुझं म्हणणं खरं आहे रुद्रा, पण गेले कित्येक महीने मी या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो, आणि केवळ ज्या शक्यता माझ्या हातात लागल्या त्यांचा खरेपणा पडताळून पहाण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावलेय " अखिनं उत्तर दिलं.

" म्हणजे नेमकं काय ? "

" रुद्रा, माझ्या माहीतीप्रमाणे तु पदार्थविज्ञानशास्त्रातला एक प्रमाण शब्द आहेस, तुला प्रोफेसर अ‍ॅलन गुथ यांची फॉल्स व्हॅक्युम वाली थियरी नक्की अभ्यासात आली असेल "

" अर्थातच, विश्वनिर्मितीच्या काळात जो महास्फोट झाला तेंव्हा विश्व प्रसरण पावत गेलं आणि त्यातून आजच्या विश्वाचा जन्म झाला, पण त्याच वेळी आणखी एक घटना घडत गेली ती म्हणजे 'फॉल्स व्हॅक्युम'. अंतराळात जीथे निव्वळ पोकळी आहे, त्या पोकळीतून विश्व प्रसरण पावत असताना दोन घटकांच्या मधे तयार झालेली पोकळी. पोकळीतली पोकळी म्हणून तीला फॉल्स व्हॅक्युम म्हणतात. प्रोफेसर अ‍ॅलन यांच्या शोधात असं निष्पन्न झालंय की या प्रत्येक पोकळीत एक विश्व तयार होत गेलं जे त्याच्या सर्वात जवळच्या विश्वाशी साधर्म्य असलेलं आहे, केवळ अपघातानंच अश्या विश्वातल्या घटनांचा संपर्क नेहमीच्या जगाशी येतो..... यु मीन अखी.. "

" करेक्ट, माझं प्लेन नष्ट झालं तेंव्हा इजेक्टींग मॅकेनिझमनं नक्की काम केलं असणार पण ते नेमकं कुठल्या क्षणी ? आपण नाही सांगु शकत, कदाचित असंही घडलं असेल की प्लेनच्या स्फोटाचा आणि इजेक्शन मॅकेनीझमच्या रॉकेटचा दणका मला कदाचित कुठे भलत्या पोकळीत घेऊन गेला असेल.. "

" शक्यता नाकारता येत नाही, पण हे तू तुझ्या बचावात सांगू शकत होतास.. "

" नाही, एक तर मला त्यावेळी याबद्दल किंचीतही माहीती नव्हती आणि समांतर विश्व कल्पना आजही फारशी कुणी मनावर घेत नाही, माझा बचाव या मुद्यांवर अशक्य होता "

" चल एकवेळ हे मान्य करू की तू कुठल्यातरी भलत्याच विश्वात गेलास पण त्याचा तुझ्या कहाणीशी काय संबंध ? ती कशी सिध्द करता येणार तुला ? " मघापासून संवाद काळजीपुर्वक ऐकणार्‍या जयंतानं प्रश्न केला. आघाडीचा पत्रकार म्हणून त्याची आज ख्याती होती.

" नक्कीच जया, तुझा प्रश्नही योग्यच आहे, मलासुध्दा या प्रश्नानं बरंच छळलं पण नंतर मी जे अनुभवत आलोय त्यावरून मला स्वत:ला ते भास नसल्याची खात्री पटत गेली. " अखीनं त्याचंही समाधान केलं. आणि पुढे बोलायला सुरूवात केली.

" जसं मी आत्ताच सांगितलं, मी बरेच महीने या विचित्र अनुभवाचा अर्थ शोधण्यात घालवले त्या वेळात मला स्वत:लाच माझ्यातले बदल जाणवायला सुरूवात झाली, मी आधीही सांगितलयच की मला शरीर हलकं होत असल्याची भावना सतत जाणवत होती. सर्व्हीसमधून बाहेर पडल्यावर मी याच शोधात गुंतत गेलो आणि हळू हळू माझ्या लक्षात एक गोष्ट येत गेली. माझ्यातली हलकेपणाची भावना जसजशी वाढत गेली तसतशी माझ्या सावलीतली घनता वाढत जात होती, हे मला जाणवायचं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे आपली सावली पडते तीच्यात प्रकाशाचा अभाव असतो पण तरीही आपण सावलीतली वस्तु स्पष्ट पाहू शकतो. माझ्या सावलीबाबत ही गोष्ट कठीण होत गेली. काही काळानंतर माझ्या सावलीत आलेली कुठलीही वस्तु गर्द काळोखात लपेटून जावी तशी दिसेनाशी व्हायला लागली. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच गेलं.... "

" पण सावली म्हणजे प्रकाशाच्या प्रवासाआड आलेल्या एखाद्या वस्तुची भासमान प्रतिमा बरोबर ? मग तीला जडत्व कसं येईल ? आणि आलंच तर ती तुझ्या सोबत राहीलंच का ? " अखिलेशचं बोलणं मधेच तोडत जयंत म्हणाला.

" सावली म्हणजे भासमान प्रतीमा हे खरं पण ती द्वीमित प्रतीमा असते हे विसरलास जया, ज्या दिवशी माझ्या सावलीला पुर्णपणे जडत्व आलं त्या दिवशी माझी सावली माझ्यासोबत नव्हती."

अखिलेशच्या या विधानानं काही मिनीटं खळबळ माजली.

" अशक्य, सर्वथा अशक्य गोष्ट आहे ही, तुझ्यामते आता तुला सावली नाही ? "

" दुर्दैवानं हे खरंय " इतकं बोलून मघापासून टेबलाच्या पलिकडच्या बाजूला असलेला अखीलेश टेबलापासून दूर झाला.

आजुबाजुच्या झगझगीत प्रकाशात अखिलेश उभा होता, सर्वांच्या नजरा जमिनीकडे वळल्या अखिलेश ज्याच्या बाजुला उभा होता त्या टेबलाची सुस्पष्ट सावली त्याच्या पायाजवळ पडली होती मात्र गायब होती ती अखीलेशची सावली.

दोन -चार वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून दाखवल्यावरही कुठेच त्याची सावली पडलेली दिसली नाही. जयंत भराभर हातातल्या पॅडवर काही खरडत होता, अखीची परवानगीही न मागता त्यानं मोबाईलच्या कॅमेर्‍यातून फटाफट फोटो काढले. त्याच्यासाठी फार मोठं स्कुप होतं हे. `सावली नसलेला माणूस' उद्याचे मथळे त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते. रुद्र मात्र विचारात खोलवर बुडालेला होता.

" एक मिनीट अखी, हे म्हणजे भौतीक नियमांना आव्हान झालं, कुठल्याही पदार्थाला अडकून प्रकाश पुढे जाऊ शकत नसला की त्याची सावली ही पडणारच. "

" पण प्रकाश जर त्या वस्तूतून आरपार जात असेल तर ? "

" तर सावली पडणार नाही. मान्य, पण याचाच अर्थ ती वस्तुही आपल्याला दिसणार नाही. वस्तू दिसते म्हणजे काय ? त्या वस्तुवरचा परावर्तीत प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहोचतो जर तोच आरपार जाणार असेल तर वस्तु इथे म्हणायचं तर तू, अदृष्य होणार नाही का ? "

" बरोबर रुद्रा, पण या सगळ्यालाही एक उत्तर आहे. होलोग्रामीक इमेज अर्थात त्रिमीत प्रतिमा "

" तुला म्हणायचंय की तू एक त्रिमीत प्रतीमा आहेस ? म्हणजे हा तू नसून तुझी केवळ प्रतिमा आहे ? "

" खरयं रुद्रा, ज्या क्षणी माझ्यातलं सगळं जडत्व माझ्या सावलीकडे ट्रान्सफर झालं त्या क्षणी मी केवळ एक भासमान प्रतिमा म्हणूनच वावरतोय, हे पहा " असं म्हणून अखिलेशनं हात समोरच्या टेबलावर आपटला, आता टेबलावरचे ग्लास, पदार्थ कलंडणार या कल्पनेनं सगळे बाजूला सरकले पण.. अखिलेशचा हात टेबलातून आरपार निघून गेला.

" या सगळ्यासाठी नेमकी माझीच निवड का झाली परमेश्वर जाणे, मी पाहीलेलं सगळं खरं होतं हे नक्की. त्या लोकांच्या त्या पंचकोनी यंत्रणेत अशी काहीतरी खासीयत होती की ज्यायोगे ते स्वतःला एका त्रिमीत प्रतीमेत बदलून स्वतःच्या सावलीला घनत्व देणं शक्य झालं होतं. अर्थात त्यांना त्या सावलीवर नियंत्रण करण्यातही यश आलेलं होतंच, यासाठी कदाचित त्यांच्या मनावर लहानपणापासून काही खास संस्कार केले जात असावेत. दुदैवानं मी ज्या गोष्टीला नगण्य समजलो तीच ही मानसीक संवादाची शक्ती हेच त्याच्यामागचं रहस्य असावं. त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर स्वत:च्या संरक्षणापुरता केला, आणि स्वाभावीकच त्याच ज्ञान परक्याच्या हातात लागू दिलं नाही.

मी मात्र परिणामांचा विचार न करता त्यांच्या यंत्रणेचा वापर करून प्रतिमा निर्मिती केली, पण तीचं नियंत्रण मला जमत नसल्यानं तीच्या निर्मीतीला वेळ गेला आणि जेंव्हा तीची निर्मिती पुर्ण झाली तेंव्हा ती माझ्यापासून विलग होऊन तीच्या मार्गानं निघून गेली, नेमकी कुठे ? कदाचित तीच्या उगमस्थानाकडे किंवा या जगात कुठेही पण मला मात्र आता केवळ हे इतकंच दृष्य अस्तित्व राहीलंय. एखादे दिवशी कुठल्याही जगात त्या सावलीचा शेवट होईल आणि आपल्या या जगात कसलाही मागमुस न ठेवता मी नाहीसा झालेला असेन "

अखिलेश बोलायचा थांबला आणि सगळीकडे एक सुन्न शांतता पसरली. टर्रर्रर्रर्र, कागद फाडण्याचा एकच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. जयंता नोटबुक मधलं एक एक पान फाडून त्याचे तुकडे करत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा कल्पना मस्त आहे.

मात्र कथा तितकीशी रंगली नाही असे वाटले.

रच्याकने पॅरॅलल युनिव्हर्स आणि होलोग्राफीक इमेज वगैरे मुळे 'फ्रिंज' सिरियल्स ची आठवण झाली. ( अर्थात कथेशी त्याचा संबंध नाही )

धन्यवाद दोस्तहो,

पॅरलल युनिव्हर्सच्या अनेक थियरींपैकी दोन वापरून झाल्यात आता ???? Proud

इथे परत कथा वाचली नाही मात्र दुसरीकडचाच प्रतिसाद पुन्हा पोस्ट करतो, कारण तीच इच्छा आहे Happy
--------------------------------------------------------------------------------

एखादे दिवशी कुठल्याही जगात त्या सावलीचा शेवट होईल आणि आपल्या या जगात कसलाही मागमुस न ठेवता मी नाहीसा झालेला असेन "
>>>>>>>>>>>>
अफाट कल्पना... मजा आली.. पण इथून तुम्ही अजून पुढे कथा लिहायचे आव्हान स्विकारावे असे वाटते ..

झक्कास रे चाफ्या..............
आता 'असे' आणि 'इथे' लेखन वाढवा जरा......... इतरही चालू राहूदे पण अशा कथांसाठी तुला पर्याय नाही....... Happy

व्वा... ती थेअरि मुळातुन वाचावी लागेल. पन खर तर अश्या थेअरीज अश्या मस्त कथांमधुन जास्त समजतात Happy

काय लिहिलंय राव ! एकदम जबरदस्त!!
फार वैशिष्ट्यपूर्ण विञानकथा वाटली..
शेवटाबद्दल उत्सुकता आहे...लवकर येऊ द्या..:)

Pages