आज की नारी

Submitted by जाईजुई on 25 February, 2009 - 07:25

(मी_ना यांच्या बहुचर्चित लेखावर आधारित)

०६-जून-२००५
सहा वाजत आले अजून कॉल चालूच आहे. ह्यानंतर समरी करुन पाठवायची युकेला, मग टीमला त्यांची टास्क नेमून द्यायची आणि मग लॅपटॉप बंद करून ६:१५ ची बस गाठायची. आज बस चुकवून चालणार नाही ओव्युलेशन स्टडीसाठी जायचय त्यानंतर डॉक्टरांना भेटून घरी जायचय. रन नेहा रन!

हुश्श.. मिळाली बस बाबा. डॉक्टरांची सातची वेळ पाळता येईल.

वेळ? कसली वेळ पाळलीये आपण? आपल्या नि निखिलच्या लग्नाला चार वर्ष झाली. पण दोघांची प्रमोशन्स, ऑनसाईट्स, जॉब हॉप्स यातून वेळच झाला नाही आपल्याला बाळाचा विचार करायला. पुन्हा स्वत:च घर घेणं, सेटल होणं! हम्म! तरी काही फार उशिर नाहीये झालेला, २८ वर्षांचे तर आहोत आपण.

१०-जुलै-२००७
आज सिरम बीटा एचसीजी ची टेस्ट करायची आहे. संध्याकाळी रिझल्ट्स मिळतील. ह्यावेळी पॉझिटिव असेल का? कि पुन्हा गेल्यावेळेसारख, missed abortion? किती दिवस हे चालू आहे? दोन वर्षे ! प्रत्येक महिन्यात वाट बघायची, पुन्हा येऊन टेस्ट करायची. मला तर अनादी काळापासून हे चक्र चालू आहे असं वाटतय!

Am I a manager of a project with ever extending "go - live" date? I hope it will not turn out to be a project which never "kicked off"

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा डेट मिस्स झाली तेंव्हा वाटले, संपला आमचा बेंच पिरियड, डिलिवरीची तयारी करा, नऊ महिन्यांनी "go-live" ! पण अळवावरचं पाणी वाहूनच गेलं. कोणीही कितीही समजावलं तरी It hurts! एवढी सगळी आव्हान पुरी केलीत ना आपण ऑफिसमध्ये? करीअर, अभ्यास सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत की मग काय कमी आहे आपल्यात? की स्त्रीत्वच कमी पडतय? आपण खूप lightly घेतोय का मातृत्व?

पण आईच्या वेळी कशी सगळे काम करून आणि आहारशास्त्र वै. न पाळूनही मूलं कशी व्हायची?

१२-जुलै-२००७
नेहा.. शांत हो. एक पायरी पूर्ण झालीये, अजून गड चढायचाय. so project pregnancy kicked off... finally! ह्यावेळी नीट काळजी घ्यायची.

कुठची तरी एक गोष्ट वाचली होती - बाळ आईच्या मनात रुजण्याआधी भिती रुजते ह्या कल्पनेवर आधारित! खोटे नाहिये हे! फेब्रुवारीपर्यंत सगळ व्यवस्थित झाले पाहिजे. आता पुन्हा काही झालं तर नाही झेपणार.. शरीरापेक्षा मनाला. तना-मनाने गुंतून जाणं आणि पुन्हा पुन्हा तुटून, विखरून जाणं जमणारच नाही.

विचार पण पॉझिटिव करायला हवेत आता!

----------------------------
१७-एप्रिल-२००७

ह्या पोरीच कस होणार ? कालच कळलय दोघांना कि गर्भ नीट धरला नाहिये. ९ आठवडे झालेत. डॉक्टरांनी क्युरेशन करायला सांगीतलय पण ही ऐकत नाहिये. क्युरेशननंतर ६ महिने वाट पहावी लागेल म्हणताहेत. ही म्हणते माझ्याकडे वाट बघायला वेळच नाहिये. नाही तरी ब्लीडिंग सुरु झालच आहे आता. नॉर्मल अबॉर्शन व्हाव म्हणुन आंबे आणि पपई खातेय नेहा. डॉक्टरांनी गोळ्यापण दिल्यात.

किती समजावलं कि माझ्या वेळची गोष्ट वेगळी होती. आमच्या शरीराला किती व्यायाम होता ? नेहा पोटात होती तेंव्हा फॅक्टरीला होते मी आणि २४ वर्ष वय. ह्यांच्यासारखे बसून काम नी अरबट - चरबट खाण नव्हते आमचे, घरच सकस अन्न होत.

नोकरी आणि करीअरमध्ये बराच फरक असतो. करीअर करायचे म्हणजे झोकून द्यायला लागते ग तुम्हा आजकालच्या मुलींना! किती जवाबदार्‍या आणि वेगळी जीवनपद्धती आहे तुमची?

आई व्हायची आसपण आणि करीअर न सोडण्याची इच्छासुद्धा! कसे जमणार दोन्ही दगडांवर पाय ठेवून?

परमेश्वराला काळजी!

----------------------------
३०-जुन-२००७

धक्-धक्

----------------------------

२५-ऑगस्ट-२००७

मिळाला हो मुहुर्त आमच्या सूनबाईंना!

निखिलला मुलगा किंवा मुलगी काही होवो, आनंदच आहे त्याचा. ह्या वयात मुलं होत आहेत ह्याचच कौतुक. पण नातवंडांच्या पूर्ण वेळ जबाबदार्‍या नको वाटतात आता. आता आमची मुलं मोठी आहेत, त्यांचे संसार त्यांनी संभाळावेत. लग्न होऊन घरात आली तेंव्हाच मी स्पष्ट सांगून टाकलं होतं, तुम्हाला काय करीअर करायचय ते करा, पण स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना जन्म घाला.

पुन्हा आमच्या वेळी नसलेली बालसंगोपनाची नवी पद्धती आहे सध्या! त्यानिमित्तने उगाच वाद व्हायला नको. आम्ही जायचं आमच्या जुन्या पद्धतीने वागायला, भरवायला आणि शिस्त लावायला आणि ह्यांचा पापड मोडायचा!

आम्ही आमचं आयुष्य घालवलं चूलीसमोर, मुलांसाठी. सगळी उमेद गेली एका माणसाच्या पगारात भागवताना. घर घेणं, मुलांची शिक्षणं ह्यात कधी स्वतःच्या हौसेसाठी काही खर्चच करता आले नाहीत. सासू सासरे, मुलांच्या परिक्षा, आई वडील ह्यांच्या मध्ये कधी वेळच झाला नाही फिरायला जायला कुठे!

ह्यांच्या रीटायरमेंट्चा आलेला पैसा आहे. इतर सगळी व्यवधानं संभाळून झालीयेत. आम्हाला आमच्या आयुष्याची second inning अनुभवायची आहे.

-------------------------
२८-ऑगस्ट-२००७

Estimate at completion? Estimate to Complete?

१०-सप्टेंबर-२००७

कोंबडी पळाली कोंबडी कोंबडी.......

--------------------------

२०-ऑक्टोबर-२००७

आज निखिल यायचाय युकेहून. उद्या लगेच अ‍ॅनोमली स्कॅनला जाणार आहेत दोघे.

त्याला ऑनसाईट जाताना तिला एकटं सोडून जावं लागणार ह्याचच वाईट वाटत होतं. पुन्हा इथून तिच ऑफिसही दूर पडतं तस. गेल्या वेळच्या अनुभवामुळे दोघेही घाबरतात जरा.

निखिलने हट्टच धरला होता की मी येईपर्यंत स्कॅनसाठी थांब. बाळ अव्यंग आहे ना ते त्यालापण बघायचय.

नवरात्रीत देवीची ओटी भरलीये मी आणि तिला मागणं केलय की सगळं नीट होऊ दे. नेहाची चोर ओटी भरुन पाठवेन तिला परत.

-------------------------

२२-ऑक्टोबर-२००७

आईबरोबर देवळात गेले तेंव्हा किती प्रसन्न वाटत होतं? सजवलेली मूर्ती, साजिरी आरास, उदबत्तीचा सुगंध आणि समईसारखा शांत पण ओजस्वी असा देवीचा चेहरा.. काही बिनसूच शकत नाही, जगात काही अमंगल धडणारच नाही असा विश्वास ठेवणारी आई!

आजच्या रिपोर्टवरून तरी देवाने तिचा विश्वास सार्थ ठरवलेला दिसतोय. बाळाचे छोटे छोटे हात, धडधडणारं हृदय! whattoexpect site वरून येणार्‍या mailersवरून बाळाच्या वाढीची कल्पना येते पण डोळयांनी पाहिल्यावर वेगळच वाटत! गेल्या Training मध्ये शिकलेला फॉर्म्युला वापरला तर Estimate At Completion is matching the budget. so hopefully variance कमी असेल.

लेप्रोस्कोपी, आयव्हीएफ यातले काही न करता गर्भधारणा झाली आणि इथवर पोहोचलो. आता नॉर्मल डिलीव्हरी झाली की माझं बाळ माझ्या कुशीत!

---------------------
१६-डिसेंबर-२००७

ह्या नेहाचे ना सगळे विचार वेगळीकडेच चालतात.

आज सकाळी डोहाळेजेवणाला तिला रामायण, रामरक्षा आणि मारुती स्त्रोत्र दिलं वाचण्यासाठी की बाळावर चांगले संस्कार व्हावेत. आता संध्याकाळी म्हणाली, "अहो आई, आता रोज जमेल तसे वाचेन मी हे पण पोटात असताना रामायण वाचून आपण बाळावर गर्भसंस्कार करणार आणि बाहेर आल्यावर ते सर्वत्र महाभारत बघणार. मग गोंधळ नाही का होणार बाळाचा? आणि ज्या रामाला एका धोब्यापासून सीतेच रक्षण नाही करता आलं तो बाळाचं कस करणार?"

काय सांगायचं हिला? नशिब विचारल नाही ते की मारूतीसारखी बलदंड मुलगी झाली तर काय? वाचेन म्हणाली आहे ना त्यातच भरुन पावलं!

---------------------
१६-फेब्रुवारी-२००८

गेले १२ तास मणक्यातून ओटीपोटात सळसळत जाणारी वेदना, आता तीव्र होतेय. सहन करणं केवळ अशक्य! माझ्या संपूर्ण अस्तित्वातून काही तरी पीळवटून, सुटून वेगळं होतय.

painless delivery साठी भूलतज्ञांना बोलवा... थोडा तरी आराम मिळेल, शेवटच्या कळा द्यायला energy हवीये मला.

आई, किती वेळ रहाणार ह्या वेदना? पुन्हा पुन्हा येणार्‍या कळा?

परमेश्वरा!

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

निखिलला मुलगी झाली हो! गोड आहे, अगदी बापावर गेलीये.

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

आईSSSSSSS...... भ्याSSSSSSS........

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

सुटली माझी लेक. सगळी उस्तवार करुन, नऊ महिने पूर्ण करून, वेणा सोसून तिने तिच्या लेकीला जन्म दिलाय. जगदंबे, तुझ्या कृपेने केळं धरली माझी!

आता लेकीसाठी आणि लेकीभोवती जग फिरेल नेहाच, देण्या लेकीला माहेर, माय नांदते सासरी !

-----------------------
२०-मे-२००८

मी पार्टटाईम ऑफिसला येतेय हे बरं झालं, अन्वेषाला पण हळू हळू सवय होईल आणि गरज पडली तर घरून पण कॉल घेता येतील.

ह्या वर्षीच्या रीव्ह्यू सायकलमध्ये मला जमेत तरी धरतील नाही तर पुन्हा हे वर्ष वाया!

-----------------------
१८-सप्टेंबर-२००८

उम्म्, आई उचलून घे.... बाबा बाबा! हम्म !

-----------------------
५-जानेवारी-२००९

हे नवीन घर कुणाचे आहे? इथे खूप थंडी आहे!

बाबा कुठे आहे? बाबा, बाबा!

-----------------------
८-मार्च-२००९

सगळ किती पटकन झालं. अर्थव्यवस्थेचे डोलारे त्सुनामी आल्यासारखे वाहून गेले. भारतात येणार्‍या कामाचा ओघही कमी झाला. कंपनीने माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून इथे युरोपात पाठवलयं, भारतात काम पाठवण्याच्या कामाला गति द्यायला.

अनु निखीलला खूप miss करतेय. सारखा बाबाचा घोश चाललाय. तरी बर आई आलीये बरोबर. निक्सला मूळीच आवाडले नाहीये मी तिला इथे आणणे. पण एवढ्या लहान मूलीला सोडून येणं पण कठीण वाटतं. ह्यातन कामाची जबाबदारी आणि नात्यांचे ताण. सैरभैर व्हायला झालं होतं!

आज इथल्या दूरदर्शनवरचे महिलादिन विशेष कार्यक्रम पाहिले. आफ्रिकेतल्या स्त्रिया बघीतल्या - आपल्या मुडदुशा पोरांना थानाशी घेऊन ते जगावे ह्यासाठी निष्फळ प्रयत्न करणार्‍या! पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी कंबोडीयातल्या छोट्या छोट्या मुली प्लॅस्टीकचे कॅन वहाताना पाहिल्या. लगेच राजस्थानातल्या आणि आमच्या देशावरच्या पाण्याच्या दुर्भीक्ष्यात असेच पाणी वाहिल्याने, दुष्काळी कामांच्या निमित्ताने डोक्यावर वीटा वाहिल्याने पोरींच्या डोक्यांवर पडलेल्या चात्या आठवल्या. माबोवरही काश्मीरातल्या स्त्रियांची अवस्था वाचली.

कसले करीअर आणि बाळाचे प्रश्ण घेऊन बसतोत आपण? ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग, रिसेशन, बाळ होणं हे आपले नुसते चर्चेचे विषय. आपण आपल्या सुरक्षित कोषात राहून हे सगळे विचार करतोय. अस नाही जमल तर वैद्यकीय मदत वापरून मुलांना जन्म देऊ शकतोय कि आपण, आयव्हीएफ, लेप्रोस्कोपी, कॅल्शिअम, फॉलिक टॅब्लेट्स बरेच उपाय आहेत, अनेक तपासण्या आणि उपाय आहेत. जन्माला आलेल्या आपल्या लेकीसाठी देखिल देशोदेशीची खेळणी, कपडे, औषध आणि खाऊ आहे. पण जन्माला आल्यापासूनच अभावग्रस्त आयुष्य जगणार्‍या ह्या मुलींच काय? ज्यांना प्राथमिक शिक्षण मिळताना वांदे आहेत, आताच पिण्याच्या पाण्याचेही ओझे आहे त्यांना काय फरक पडतो आमच्या सुक्या चर्चासत्रांनी? ज्या मूलींना स्त्रीत्व कळण्यापूर्वीच खुडलयं त्यांना नोकरी कि करीअर असे प्रश्ण पडत असतील का?

बर जे अभावात आहेत किंवा ज्यांचे मानवी हक्क नाकारलेत त्यांना मिडीया, सेवाभावी संस्था कोणी ना कोणी तरी मदत करतय. आमच्या भारतातल्या सर्व साधारण नोकरी करत किंवा न करता गृहउद्योगातून संसाराच ओझे वहाणार्‍या, रोजच्या रोज कौटुंबिक हिंसेला सामोर्‍या जाणार्‍या किंवा केवळ मूलीचा गर्भ आहे म्हणून जन्माला येण्यापूर्वीच खुडलेल्या स्त्रीत्वाला कोण वाली आहेत?

कशी अशी आजची आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली, थोडे फार तरी निर्णय स्वतः घेऊ शकणारी , शानदार अपार्टमेंटमध्ये राहून व्यर्थ चिंताच जाळ स्वत:भोवती विणणारी मी? दुसर्‍या स्त्रियांच्या वेदनांबद्दल अनभिज्ञ असलेली आजची स्त्री?

समाप्त

गुलमोहर: 

सहीये. अगदी अगदी

Pages