लसूणी पालक

Submitted by मंजूडी on 4 May, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक - एक जुडी, नीट निवडून
कांदे - दोन मध्यम आकाराचे, उभे चिरून
आलं-लसूण पेस्ट - दोन चमचे
गरम मसाला पावडर - एक चमचा
पाव कप दूध
पाव कप साय किंवा दहा बारा भिजवलेले काजू किंवा दोन मोठे चमचे मिल्क पावडर
साजूक तूप - एक मोठा चमचा
दहा-बारा पाकळ्या लसूण अगदी बारीक चिरलेला
हिरवी मिरची - एक (ऐच्छिक)
मीठ, साखर, तेल

क्रमवार पाककृती: 

१. पालकाची पानं स्वच्छ धुवून निथळत ठेवा.
२. कढईत तेल नीट तापवून त्यात चिरलेले कांदे, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परता.
३. कांदा थोडा शिजला की पालकाची पाने हातानेच उभी आडवी कापून त्यात घालून व्यवस्थित परता.
४. आता कढईवर झाकण न ठेवता पालक-कांदा व्यवस्थित शिजू द्या.
५. पालक शिजला की त्यात गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आवडत असल्यास साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्या. पाच मिनीटांनी गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या.
६. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमधे वाटून घ्या. काजू घालणार असाल तर आधी भिजवलेले काजू बारीक वाटून घ्या आणि मग त्यात पालक-कांद्याचं मिश्रण घालून वाटा. साय किंवा मिल्क पावडर घालणार असाल तर पालक-कांद्याचं मिश्रण वाटल्यावर त्यातच साय/मिल्क पावडर घालून वाटा. मग थोडं थोडं दूध घालत हवी ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्सर फिरवत रहा.
७. आता भाजी तयार आहे. कढईत काढून घ्या.
८. फोडणीच्या पळीत साजूक तूप गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण घाला. मंद गॅसवर लसूण चॉकलेटी रंगाची होईपर्यंत चमच्याने ढवळत रहा. लसणीचा रंग बदलला आणि खमंग वास आला की पालकाच्या भाजीत घाला आणि नीट ढवळून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
एक जुडी पालकाची भाजी दोन मोठ्या नगांसाठी एकावेळेच्या जेवणापुरेशी होते.
अधिक टिपा: 

ही भाजी झटपट होते. कांदा, लसूण सोलून चिरणे आणि भाजी शिजणे-थंड होणे-बारीक वाटणे याव्यतिरिक्त कष्ट लागत नाही. पालक शिजला की गळतो आणि नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे, त्यामुळे ती पाने हातानेच ओबडधोबड तोडून भाजीत टाकायची. कांदाही जाडाभरडा चिरून घेतला तरी चालतो.
यात उकडलेले बटाटे घातले तर लसूणी आलू-पालक आणि पनीर घातले तर लसूणी पालक-पनीर Happy

पालक छोल्यांच्या कृतीसाठी प्राचीशी संपर्क साधा.
माहितीचा स्रोत: 
ऑफिसातील मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो कुठायत म्हटल्याशिवाय फोटो द्यायचे नाहीत ह्या वृत्तीला काय म्हणावे? >>

फोटो अपलोड न करण्याच्या कॉम्प्युटरच्या वृत्तीला जे म्हणावे तेच म्हणावे Proud

प्रयत्न जारी आहेत. Happy

अरे व्वा? मस्तच पाककृती

अवांतर - ऑफिसातील मैत्रीण हे चुकून ऑफिशियल मैत्रिण असे वाचले हा स्वभावदोष आमचा Proud

याचे विडंबन करून पाहावे काय? Uhoh

मस्तय गं.

>>>>>> फोटो कुठायत म्हटल्याशिवाय फोटो द्यायचे नाहीत ह्या वृत्तीला काय म्हणावे? >>
फोटो अपलोड न करण्याच्या कॉम्प्युटरच्या वृत्तीला जे म्हणावे तेच म्हणावे >>>>> Rofl

ख मं ग!! Happy

आत्ताच केली हि रेसिपी. आलू लसुणी पालक. बटाटा घालायचा होता म्हणुन ग्रेवी प्रकारची केली.
मस्त लागतेय.
पाव कप दुध घालायला कसेतरीच वाटले म्हणुन फक्त एक चमचा घातले आणि साय घातली थोडी.

ह्या कृतीत प्रचंड काटछाट मारुन आज पुन्यांदा पालक-पनीर-लसूणी. पनीर आणि क्रीमी पालकात लसणाची फोडणी बरी लागेल की नाही वाटलेलं आधी पण मस्त लागते एकदम. त्यामुळे आता नेहमीच थोडी भाजी वेगळी काढून आमच्यासाठी फोडणी घालते वरुन. हिरवी मिरची बारीक चिरुन घालते फोडणीत.

गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा अजिबात बदल, काटछाट न करता केलं होतं. यावेळी एका मैत्रिणीला दिलं तर तिला पण खूप आवडलं. रेसिपी फॉवर्ड केली आहे Happy

palak1.JPG

सिंडे, मस्त दिसतो आहे फोटो!

अवांतर - आपण सध्या रेस्प्यांचं बार्टर एक्स्चेंज करतोय बहुतेक. तू आंब्याची कढी आणि लसूणी पालक केल्यास, मी गेल्या आठवड्यात बटाट्याची खरपूस भाजी आणि काल पेन्सिल भाजी केली होती Wink

इतक्यात दोनदा या कृतीने भाजी केली. सर्वांना आवडली.
कालच्या पाहुण्यांना पण आवडली, पाहुणे इथे येउन लिहीणार होते , विसरलेले दिसतात Wink

नाही, नाही पाहुणे विसरले नाहीत. बिझी होते जरा. Proud

सही झाली होती भाजी. Happy अगदी सुरेख हिरवागार रंग आला होता भाजीला.