नंद-यशोदा... नव्या युगाचे!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:29

नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळाला मोठ्या विश्वासाने वसुदेव-देवकीमातेने गोकुळी धाडले आणि तिच्या ह्या विश्वासाला किंचितसाही धक्का न देता नंद यशोदेने श्रीकृष्णाचे मोठ्या मायेने पालनपोषण केले ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी कथा. काळानुसार संदर्भ बदलले. गेल्या २-३ पिढ्यांपासून आई पण बाबांच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी बाहेर जाऊ लागली. आपल्या लहानग्यांना एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे सोपवून आई वडील घराबाहेर निर्धास्त राहू लागले. जन्मदाती आई किंवा वडील नसताना मुलांचे प्रेमाने संगोपन करणारे हेच ते आधुनिक युगातील नंद यशोदा! मग ते घरातीलच आजी- आजोबा असतील, शेजारच्या काकू असतील, घरी येणारी एखादी मावशी असेल किंवा मग पाळणाघरातील ताई-दादा!

आपल्यापैकी बरेच जण आपली मुलं पाळणाघरात, आजी-आजोबांकडे, मावशी-काकांकडे सोपवून कामाला जातात. आपल्या मुलांचा दिवसभरातील बराचसा वेळ या व्यक्तींबरोबर जातो. साहजिकच त्यांच्यात आणि मुलांत आपोआपच एक भावनिक बंध तयार होतो. त्यातूनच काही कडुगोड अनुभवही येतात. नकळत आपल्यात आणि या केअरटेकर्समध्ये एक विश्वासाचे, मैत्रीचे नाते तयार होते.

आपली मुलेच नव्हे तर आपल्यापैकी कितीतरी मायबोलीकरसुद्धा अशा आजी-आजोबा, काकू-मावशी-आत्यांकडे वाढले असतील. त्यांनी भरवलेला गरम-गरम वरणभात, कधी हक्काने दिलेला धपाटा, आजारपणात घेतलेली काळजी अशा अनेक आठवणी अनेकांच्या मनात पिंगा घालत असतील.

आज मातृदिनाच्या निमित्ताने तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या ह्या 'नंद-यशोदे' बद्दलच्या ज्या मजेशीर,चांगल्या-वाईट, हळव्या आठवणी असतील त्या घ्या लिहायला! तसेच जर मुलांचे कुटुंबाबाहेरील व्यक्तींकडून/पाळणाघरांतून संगोपन होत असेल तर अशा व्यक्ती/संस्थांकडून उच्च प्रतीची सेवा मिळण्याच्या दृष्टीने काय बदल झाले पाहिजेत असे आपल्याला वाटते तेही लिहा.

लिहिताय ना मग तुमचे अनुभव आणि अपेक्षा?

daycare.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा लेक नऊ महिन्याचा असल्यापासून पाळणाघरात जातोय. मला पण मैत्रेयीसारखाच अनुभव आला. सुरुवातीला जिथे पाठवायचे तिथे एक आठवड्याचे ट्रान्झिशन सुरू होते तेव्हा मी पण जायचे त्याच्यासोबत. पण तो मला चिकटून असायचा अगदी. एक दिवस सुद्धा सुटा खेळला नाही. त्याला तिथे काम करणार्‍या कृष्णवर्णीय (नो ऑफेन्स) धिप्पाड बायांची भिती वाटायची असं मला वाटलेलं. तो सेटल झाला नव्हता त्याचं टेन्शन होतंच. त्यात दम्याचा जोरदार अटॅक आल्यामुळे त्याला आणखी थोडे दिवस घरीच ठेवायचं ठरलं. दरम्यान त्याच कंपनीच्या दुसर्‍या एका सेंटरमध्ये स्पॉट होता म्हणून तिथे पहाणी करायला गेले. तिथे गेल्या गेल्या पठ्ठ्याने एकदम कडेवरून खाली उतरून खेळायला सुरूवात केली. त्याला नक्की काय जाणवलं माहिती नाही पण अजिबात रडला नाही, स्वतःहून सगळी रूम रांगून झाली. ते बघून मी लगेच चेक देऊन स्पॉट घेऊन टाकला. तिथून पुढे पाच वर्ष तो त्या एकाच सेंटरला जात होता. तिथे इन्फंट, वॉडलर, टॉडलर, प्री स्कूल १ आणि प्री स्कूल २ असे वर्ग आहेत. वेळापत्रक, मुलांची स्वच्छता, सेफ्टी ह्या सगळ्या गोष्टी तर नीट सांभाळल्या जातातच पण मुलांना लळा लावणारा स्टाफ आहे. काही टीचर्स तर इतक्या आवडत्या झाल्या की आम्ही अजून बेबी सिटरची गरज असेल तर त्यांनाच बोलावतो. मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पेशन्स. इतक्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना रोज सांभाळायचं म्हणजे तुफान पेशन्सचं काम आहे असं मला वाटतं.

त्याची पहिलीच टीचर 'स्पेशल' एकदम स्पेशल होती. लहान होती वयाने. तिचं स्वतःचं बाळ आईकडे ठेवून जॉब करायची. ते बाळ आणि आमचा बाळ्या एकाच हॉस्पिटलमध्ये एकामागे एक जन्मलेले. त्यामुळे ती ह्याला कायम 'माय बेबी माय बेबी' म्हणत भयंकर लाड करायची. नंतर एक डेव्हिड म्हणून टीचर होता. तो योगर्टमध्ये ब्लुबेरिज घालून खायचा. त्याचं बघून ईशानपण तसंच खायला लागला. ईशान लबाड आहे, एखादे दिवशी घरून निघताना रडला तरी तिथे पोचलं की हसुन गुड मॉर्निंग म्हणायचा सगळ्यांना. त्याची प्री-स्कूल टीचर शेवटच्या दिवशी 'असं छान गुड मॉर्निंग म्हणत माझा दिवस सुरू करणारा माय बॉय ग्रॅजुएट झाला' म्हणत खूप रडली बिचारी.

तिथे आणखी एक मुलगा होता, तो पण इन्फन्ट रूममध्ये असल्यापासून ईशान सोबत होता. दोघं सोबतच डे केयरमध्ये यायला लागले, सोबतच ग्रॅजुएट झाले, दोघांचे बड्डे पण एका पाठोपाठ होते. तिथला स्टाफ लिटरली ह्यांच्या सगळ्या स्टेजेसचा साक्षीदार होता. त्या सगळ्यांना फारच वाईट वाटलं हे दोघं ग्रॅजुएट होउन शाळेत जायला लागले तेव्हा.

तो दुसरा मुलगा ईशानचा बेस्ट बडी होता. अजून आम्ही प्ले डेट्स करतो. आमची पण त्याच्या आई-बाबांशी मैत्री झाली आहे. हे एक साइड प्रॉडक्ट.

पहिल्या सेंटरला घातला तेव्हा लेक बोलत पण नव्हता तरी त्याने रडून, मला चिकटून त्याची नाराजी स्पष्ट दर्शवली होती. तो सिग्नल लक्षात घेऊन शोध सुरू ठेवला ह्याचं आता खूप बरं वाटतं. डे केयरला पाठवण्याचे काही फायदे म्हणजे त्याला त्याच्या वयोगटाच्या मुलांसोबत रोजच्या रोज खेळायला मिळालं- इथल्या वेदरमुळे आणि प्ले डेट्स इ. फॉर्मॅलिटिजमुळे आमच्या ओळखी होइपर्यंत ते कितपत शक्य झालं असतं माहिती नाही, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना (किड्स, अ‍ॅडल्ट्स) भेटायची, न बुजता संभाषण करायची सवय लागली. त्यामुळे केजी ट्रान्झिशन अजिबात अवघड गेलं नाही. इम्युन सिस्टम पण सुधारली असणारच पण त्याचा ठोस काही पुरावा नसल्याने काही लिहीत नाही Wink

छान लिहीलेत अनुभव मुलींनो.
विशेषतः तुमच्या इतक्या छोट्या मुलांच्या प्रतिक्रियांमधुन त्यांचे पाळणाघर बदललेत ते आवडले. आमची लेक आता मोठी झाली पण ज्या पहिल्यांदा आपल्या अपत्याला पा.घरात घालतील त्यांना खुप उपयुक्त आहे हे.

छान आहेत सगळ्यांचे अनुभव.

थोडं अवांतर होईल कदाचित पण,
अमेरिकेत / भारतात पाळणाघर कसे निवडावे यांच्या टीप्स पण अनुभवी आयांनी लिहाव्यात ही १ रिक्वेस्ट आहे.

सगळ्यांचे अनुभव वाचते आहे. छान लिहिलंय सर्वांनी!

माझ्या लहानपणी आई-बाबांना मला व बहिणीला सांभाळायला कोणी व्यक्ती ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हते. आईची नोकरी व वडिलांचा फिरतीचा व्यवसाय. आजी-आजोबा वर्षातले ठराविक महिने आमच्याकडे राहायला असत. पण त्याही वेळेत त्यांनी आमचे करावे अशी अपेक्षा करणे आईबाबांना चुकीचे वाटायचे. तरी आजी लाड करायचीच! त्या काळात पुण्यात खास अशी पाळणाघरे असतील तर ते आठवत नाही. पण बहुधा आम्ही राहात होतो त्या भागात नसावीतच! बहुतेक वेळा घरगुती सोयच असायची.

तर अगदी सुरुवातीची, आम्हाला सांभाळणारी केरळातली शांता मला आठवते. आम्ही कालिकतला गेलो असताना तिला पहिल्यांदा भेटलो. आमच्या एका स्नेह्यांच्या ओळखीतली ही शांता. तिला पुण्यात नोकरी करायची होती, पण राहण्या-खाण्याची सोय कशी करायची, अनोळखी शहरात स्थिरस्थावर होईपर्यंत काय असे अनेक प्रश्न तिच्यापुढे होते. होतकरू आणि गरजू होती ती. आम्ही तिचे घर बघून आलो, तिच्या घरच्यांना भेटून आलो. आईबाबांनी तिला पुण्याला आमची देखभाल करण्यासाठी आणायचे ठरविले. पुण्यात स्थिरस्थावर होईपर्यंत, तिच्या नोकरीची गाडी मार्गाला लागेपर्यंत ती आमच्याकडे राहणार होती. आणि खरेच ही मुलगी नोकरीच्या व पुण्यासारख्या शहरात सेटल व्हायच्या आसेने एक दिवस आमच्याकडे राहायला आली. तिला फक्त मल्याळम व इंग्रजी बोलता यायचे. तिचे इंग्रजीही केरळी उच्चारांचे! मग दिवसभर आमचा सर्व व्यवहार खाणाखुणांनी चालायचा. खूप मजा यायची. अनेकदा गोंधळही व्हायचा. पण शांताची एक खासियत म्हणजे कायम हसतमुख असायची ती. एका अपरिचित, मराठी कुटुंबात अचानक येऊन राहणे, आमच्या जीवनशैलीशी जुळवून घेणे तिलाही अवघड गेले असणारच! शांता जवळजवळ वर्षभर आमच्याकडे राहायला होती. नंतर तिची अन्यत्र सोय झाल्यावर व तिला नोकरी लागल्यावर मात्र तिचा व आमचा संपर्क तुटला.

माझ्या वडिलांचे नागपूरचे एक क्लाएंट होते. हे क्लाएंट स्वतः संघाचे बरेच सिनियर असे कार्यकर्ते. नागपुरात त्यांच्या नावाला बरंच वजन होतं. आणि त्यांच्या मते त्यांचा मुलगा बापाच्या अगदी विरुद्ध होता. ''अजिबात कामाचा नाही,'' इति क्लाएंट! तर हा मुलगा पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होता. काही महिने तो आमच्याकडे राहायला होता. आपल्या बोलण्याने इतरांना हसविणारा, नकला-गाणी-नाट्यगीतांची अचाट विडंबने गाऊन दाखविणारा हा वैद्याकाका आई-बाबा घरी नसायचे तेव्हा माझी व बहिणीची काळजी घ्यायचा. मला व बहिणीला दूध प्यायला लावणे, जेऊखाऊ घालणे, शाळेत पोचविणे व जनरल बेबीसिटिंग करणे हे बघायचा. आईला घरात, स्वैपाकात मदत करणे, बाजारहाट करणे ही कामेही करायचा. आणि हे सर्व करताना इतरांना हसविणे चालूच! आमचे घर म्हणजे पुण्यातले त्याचे दुसरे घरच होते जणू! वेळ मिळाला की सायकलवर टांग मारून आमच्या घरी धडकायचा. आईच्या हातातली कामे काढून घ्यायचा. आमची दोघींची कुठे ने-आण करायची असेल तर ती करायचा. आमच्या आजारपणांमध्ये आमची शुश्रुषा करायचा. आई-बाबांना कधी फिरायला जायचे असेल तर तो त्यांचा हक्काचा बेबीसीटर होता. एकदा असेच आमचे बेबीसिटिंग करताना त्याला अचानक ताराचंद का वाडिया हॉस्पिटलात काही कामासाठी जावे लागले. तर हा माणूस सरळ आम्हाला दोघींना काखोटीला मारून तिथे घेऊन गेला. आम्हाला तेथील नर्सेसच्या ताब्यात दिले आणि स्वतः कामासाठी गायब. तो परत येईपर्यंत तेथील नर्सेसची मला येणारे यच्चयावत नाच-गाणी-कविता गाऊन दाखवून मी जी काही सक्तीची करमणूक केली होती... आता आठवले की हसू येते.

मी शिशुशाळेत असताना शाळेजवळच्या वाड्यातल्या एका छोट्या घरात राहणार्‍या आजींजवळ माझी आई तिचं बाहेर काही काम असेल तर मला सोडून जायची. या आजी म्हणजे ''रुपयाएवढं कुंकू लावणार्‍या आजी''. त्यांचं नाव मला आजही माहित नाही व आठवतही नाही. कारण त्याच नावाने त्या फेमस होत्या. त्यांच्या खोलीबाहेर, अंगणात एक खाट टाकलेली असायची. त्यावर बसून, ऊन खात त्या माझ्यावर देखरेख करायच्या. मी अंगणातल्या फुला-पानांबरोबर, एका पिंजर्‍यात ठेवलेल्या सशाबरोबर आणि अंगणात इकडे-तिकडे धावणार्‍या कोंबड्यांबरोबर खेळत बसलेली असायचे. आजींच्या बाजूला एक काठी ठेवलेली असायची. वाड्यातली सोडून इतर कुणी कुत्री आली तर आजी ती काठी उगारायच्या आणि त्यांना हाकलून लावायच्या. जेवायची वेळ असेल तर मला गरमागरम वरण-भात प्रेमाने खाऊ घालायच्या. काठापदराचं धुवट असं नऊवारी लुगडं, पिकलेल्या केसांच्या बुचड्यावर खोचलेलं एखादं फूल, कपाळावर रुपयाएवढं ठसठशीत कुंकू, हातावर-कपाळावर गोंदणं, डोईभर पदर घेतलेल्या आजींचं व्यक्तिमत्त्व चटकन नजरेत भरणारं, भारदस्त असं होतं. त्यांची फक्त एकच गोष्ट मला आवडायची नाही. ती म्हणजे त्या मशेरी लावायच्या आणि अंगणातल्या एका कोपर्‍यात थुंकायच्या. पण बाकी बाबतीत त्या चांगल्या होत्या.

नंतर मी प्राथमिक शाळेत शिकत असताना माझ्या शाळेजवळच्या एका वृद्ध जोडप्याकडे आई मला व बहिणीला सोडून नोकरीवर जायची. तिथून आमची शाळा दोन मिनिटांच्या अंतरावर होती, त्यामुळे ठिकाणाच्या दृष्टीने हे फार सोयीचे होते. हे आजी-आजोबा एका वाड्यात पहिल्या मजल्यावर राहायचे. स्वच्छ, नीटनेटक्या व प्रशस्त अशा दोन खोल्यांत त्यांचा संसार होता. मी व बहीण सकाळी दूध पिऊन, केस विंचरून, आंघोळी-पांघोळी उरकून, शाळेचा युनिफॉर्म घालून सकाळी सात वाजता त्यांच्या दारात हजर असायचो! मग सात ते अकराच्या वेळेत थोडा वेळ अभ्यास, अंगणात खेळ, जेवण, दप्तर लावणे वगैरे सर्व प्रकार असायचे. आजी आम्हाला वरणभात खाऊ घालायच्या. आजोबा आरामखुर्चीत पेपर वाचत बसलेले असायचे. तसं सगळं चांगलं होतं. मला राग यायचा तो आजोबांच्या खवचट बोलण्याचा व टोमण्यांचा! आम्हाला एखादे दिवस यायला उशीर झाला की आजोबा उद्गारायचे, ''कायऽऽ, आज गजर वेळेवर झाला नाही वाटतं?? की जागरण होतं घरी?'' आमच्या हातून काही सांड-लवंड झाली तर पुन्हा तेच! आमचे अभ्यास-खेळ वगैरे सर्व बाबतीत ते कमेन्ट्स करणं सोडायचे नाहीत.
ते असं काही बोलले की मला जाम राग यायचा आणि मी लगेच त्या रात्री आईकडे माझी नापसंती व्यक्त करायचे. आईने एक-दोनदा त्यांना सांगून पाहिले की तुम्ही माझ्या मुलींशी नीट बोलत जा म्हणून! पण आजोबांचे खवचट बोलणे काही संपायचे नाही. उलट आईने असे सांगितले की त्यांची बायकोवर धुसफूस चालायची. आजी शांत होत्या. त्या त्यांचे बोलणे फार लावून घ्यायच्या नाहीत. पण मग मलाच कसेसे व्हायचे. आईने नंतर मग आम्हाला तिथे सोडणे बंदच केले.

या खेरीज आमचे घरमालक व मालकीण बाई हेही अनेकदा आमच्याकडे लक्ष देण्याचे काम करायचे.

नंतरच्या काळात आम्हाला स्वतःचे स्वतः आवरणे व शाळेत आपले आपण रस्त्याने चालत जाणे जमू लागले. आजी-आजोबांबरोबर राहायला लागल्यापासून आजी सकाळच्या वेळी जेवायला घालायची. मग त्याखेरीज कोणी वेगळी देखभाल करायची गरजच संपुष्टात आली.

सगळ्यांचे अनुभव छान आहेत. विषेश म्हणजे डेकेअर मधे पाठवावे लागत असल्याचा गिल्ट रहात नाही जर इतका छान सेटअप मिळाला की.

सिंडरेला Happy

वरच्या यादीत आणखी एका नंदबाबांचे नाव सांगायचे राहिले. माझ्या एका लांबच्या मावशीचे यजमान सरकारी नोकरीत बदली होऊन पुण्याला आले. त्यांचे ऑफिस आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर. मग आमच्याकडेच त्यांचा वर्षं - दोन वर्षं मुक्काम होता. तसे त्यांना ऑफिसचे भरपूर काम आणि दर सप्ताहांताला आपल्या घरी प्रवास या धावपळीत आमच्याकडे खूप लक्ष द्यायला जमले असे नाही. पण जेव्हा ते घरी असायचे तेव्हा आम्हाला सांभाळायचे काम आनंदाने करायचे. त्यांच्या अंगाखांद्यावर लटकत, लोंबकळत मी व बहीण मनसोक्त धुडगूस घालायचो. त्यांचे ऑफिसातले सहकारी आमचेही ''काका'' झाले. तेव्हाच्या काळात आईच्या सांगण्याप्रमाणे आमची सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बेताची होती. घरी एक मोडका रेडियो होता मनोरंजनासाठी, बस्! मग रात्री जेवणे आटोपली की आख्ख्या टिळक रोडवर आम्ही सर्वजण जणू हा रस्ता आपल्याच मालकीचा आहे, अशा थाटात हिंडत असू. ठराविक कट्टे, दुकानांच्या पायर्‍यांवर बसून रात्री उशीरापर्यंत ही मोठी मंडळी गप्पा मारत किंवा भल्या मोठ्या चर्चा करत. त्या वेळी मी आणि बहीण आजूबाजूच्या दुकानांच्या पायर्‍यांवरून उड्या मार किंवा ह्या मामा, काका लोकांकडे हट्ट कर, त्यांचा हात धरून त्यांच्याभोवती पळत पळत शिवाशिवी खेळणे असले प्रकार करत बसायचो. त्यांनी काही खाऊ आणला की त्यावर पहिला हक्क आमचा असायचा.

आई-बाबांनी या सर्व लोकांवर आमच्या बाबतीत विश्वास टाकला आणि मुख्य म्हणजे तेही त्या विश्वासाला जागले.

अकुचे अनुभव फार छान आहेत. Happy
माझी काकी जिला आम्ही ''खालची आई'' म्हणतो, ती तर आमच्या वडिलांची अन कालपरत्वे आमचीही ''आई'' झाली होती. ते काका-काकी आमच्यासाठी खरंच नव्या युगाचे नंद आणि यशोदा ठरले होते. लिहिते थोड्या वेळात, ''खालच्या आईची गोष्ट'' Happy

मी अमेरिकेत आहे. इथले डे केअर मला तरी खूपच आवडले आहे. सहसा मुलांना डे केअर मेधे ठेवायला लागते म्हणुन आया हळहळ व्यक्त करत असतात. पण माझे उलटेच आहे , मुलीला डे केअर ला जायला मिळावे म्हणुन मी नोकरी करते Happy

पण माझे उलटेच आहे , मुलीला डे केअर ला जायला मिळावे म्हणुन मी नोकरी करते >> Happy बहिणाबाईची कविता आठवली - लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते Wink Happy

अकु, तुझे अनुभव वाचून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली. त्याकाळी अंबेजोगाईला पाळणाघर तर दुर, मुल सांभाळायला पण कोणी मिळायचं नाही. आईची नोकरी आणि बाबा फक्त महिन्यातून ५-६ दिवस असायचे घरी. आईची आई वर्षातून १५-२० दिवस रहायला यायची, पण तिला मुंबई सोडून आणि तिच्या मागचे व्याप सोडून यापेक्षा जास्त दिवस रहाणं शक्य नसायचं. बाबांच्या आईचं तर तितकंही रहाणं व्हायचं नाही. मग माझी आज्जी (आईची आई) बर्‍याचदा मला महिना-दिड महिन्यासाठी मुंबईला तिच्या बरोबर घेवून जायची.

याशिवाय, मी अगदी वर्ष-सहा महिन्यांची असताना, आमच्याकडे माझा धाकटा काका शिकण्यासाठी रहात होता. विक्रमकाका, त्याचे तिथेच रुम करुन शिकायला रहाणारे मित्र - देविदास काका, प्रकाश काका वैगरे सकाळचं कॉलेज आटोपून मला सांभाळायचे. हे काका लोक नसले की आई माझं सामान बरोबर घेवून मला दवाखान्यात सोबत घेवून जायची. (आई तिथल्या सरकारी मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नोकरीला होती). काही कारणाने मला सांभाळायला कोणीच नसल्याने आई एकदा जवळपास १ आठवडा मला ऑफिसात घेवून गेली होती. त्यावेळी तिच्या डिपार्टमेंटमध्ये जाताना टिबी वॉर्ड क्रॉस करावा लागायचा. मी तिथे येतेय म्हटल्यावर आईच्या बॉसनी तिची नेमणूक काही काळ ओपिडीमधल्या टिव्ही रुममध्ये केली होती..मला इन्फेक्श्न्स होवू नयेत म्हणून.

बर्‍याचदा आईची एक नर्स मैत्रिण आशा मावशी नाइट ड्युटी घेवून आई ऑफिसात असताना मला सांभाळायची. तिचा नवरा अमर हबिब पण दौर्‍यावर, आंदोलनात नसताना मला सांभाळायचा.

एकदा तर मला सांभाळायला मिळालेल्या मावशी मला घेवून जुगार खेळायला जातात असं कळाल्याने अचानक आमच्या घरी मला सांभाळायला कोणीच नाही अशी परिस्थिती झाली होती. आईला रजा घेणे शक्य नव्हते आणि बाबांबा औरंगाबादला विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या मिटींगसाठी जायचं होतं. मी बहूतेक दिड वर्षाची असतानाची गोष्ट आहे ही. बाबा मला औरंगाबादला सोबत घेवून गेले होते. त्यावेळी काकाचे मित्र प्रकाशकाका आणि देवीदासकाका औरंगाबादला जिल्हा परिषदेच्या समोर कशासाठी तरी आंदोलन करत उपोषणाला बसले होते. तर मिटींगसाठी विद्यापीठात जाताना बाबांनी माझं गाठोडं उपोषणाच्या तंबूमध्ये सोपवलं. आख्खा दिवस मी पण त्यासगळ्यांबरोबर तिथे उपोषणाला बसले होते म्हणे. Proud

बाबांच्या चुलत चुलत बहिणी पण बर्‍याचदा १-२ महिने येवून आम्हाला सांभाळायच्या. कविता आत्या तर मला चांगलीच आठवतेय. बर्‍याचदा राहिली होती ती आमच्याकडे.

नंतर भावाच्या जन्मानंतर मात्र आम्हाला सांभाळायला सावित्रा ताई मिळाली. ही आमच्या क्वार्टरच्या मागच्याच क्वार्टरमध्ये रहात होती. तिचा भाऊ दवाखान्यात ड्रायव्हर होता बहूतेक. तीचं लग्न होईपर्यंत ती आम्हाला सांभाळणे, घर बघणे असं सगळं करायची. सावित्राताईच्या लग्नानंतर मात्र आम्हाला सांभाळायला कोणीच नव्हतं. आई ९ ला ऑफिसात जायच्या आधी आमची सगळी तयारी करून जायची. शाळेत जायच्या वेळी १०.३० वाजता शेजारच्या शिल्पाची आई किंवा दातार काकु घराला कुलूप लावून द्यायचे. आई दुपारी जेवायला घरी यायची त्यावेळी थर्मासमध्ये दोघांचं दुध, दोन डब्ब्यांमध्ये आमच्यासाठी खाऊ आणि फळं वैगरे टेबलावर ठेवून जायची. आम्ही ४ ला शाळेतून आलो की शेजारच्या काकू दार उघडून द्यायच्या. आमचं खाणं-पिणं, कपडे बदलणं झालं की आम्ही परत कुलूप लावून ग्राऊंडवर खेळायला जायचो ते मग आई आल्यावरच यायचो.

पुढे औरंगाबादला आलो, तोपर्यंत मी ६वी आणि भाऊ ३रीत होता. त्यवेळपर्यंत आम्हाला आपलं आपणं कुलूप लावून शाळेत जायला यायला लागलं होतं. Happy अर्थात बर्‍याचदा, मागच्या दाराला कुलूप आणि पुढचं दार उघडंच असंही व्हायचं म्हणा. Happy

आख्खा दिवस मी पण त्यासगळ्यांबरोबर तिथे उपोषणाला बसले होते म्हणे. >> Happy Happy

ह्या अनुभव चर्चचा/विषयाचा नक्की हेतू कळला नाही. नक्की आपले पाळणाघरचे अनुभव वा अपेक्षा इथे शेअर करून काय साध्य होणार?( प्रश्ण प्रामाणिक आहे)
कारण असाच एक अनुभव वाचून त्यावेळच्या काहींच्या प्रतिक्रिया वाचून वाटले की नुसता आपला एक वाईट अनुभव लिहिल्यावर सुद्धा काही लोकं इतका कल्लोळ घालतात वा आज त्याच विषयावर चर्चा अपेक्षित आहे वाचून आश्रर्य वाटले.
आज काहीं खूपच विरोधाभासी प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली.

असो.

नक्की आपले पाळणाघरचे अनुभव वा अपेक्षा इथे शेअर करून काय साध्य होणार?( प्रश्ण प्रामाणिक आहे) >> admin त्यांची अपेक्षा मांडतील. पण मला हा धागा आवडला कारण प्रत्येकाने मातृत्त्व अनुभवलेले असते. जन्मदाती आई होवून किंवा आईने वाढवले म्हणून हे सामान्यपणे आढळणारे दोन प्रकार. पण ह्या व्यतिरिक्त मात्तृत्वाचा अनुभव जर कुणाला आला असेल तर त्याचा गौरव/उल्लेख/चिकित्सा मातृदिनानिमित्त झाली तर योग्यच. ह्या व्यापक मातृत्त्वाच्या परिभाषेत जर कुणाला पाळणाघरात मातृत्त्वाचा अनुभव आला असेल तर चांगलय. नसला आला तर त्यासाठी इतर धागे असतील/काढतील मांडायला. पाळणाघरशिवाय इतर अनुभव काका लोक, मावश्या, आज्ज्या सगळे इथे हजेरी लावून गेलेत Happy मला आवडले हे.
राहिला प्रश्न पूर्वी झालेल्या चर्चांचा. मनुष्यांची मते 'इव्होल्व' होत असतात. त्यामुळे कधी विरोधाभास दिसला तरी ठीकच असतंय. त्यात काय मोठस? माणूस आणि त्यांची मते/भूमिका इ इ ह्यात 'फेविकोल से' नाते हवेच का ग?

छान लिहीलय सर्वानी

खरतर मी कधीच पाळणाघरात राहिले नाही
आजी आजोबा असल्याने कधी गरजच भासली नसावी आईला
मात्र पाळणाघरातल्या मुलांना संभाळण्याचा अनुभव घेतलाय

डिग्री काँलेजला असताना गोरेगाव इस्टात राहण्यार्या माझ्या मावशीने पाळणाघर सुरु केलं
सुरुवातीला आशिता आणि अंजली अशा दोनच मुली घेतल्या
याच एक कारण म्हणजे तिला मुलगी नाही आणि तिच स्वतच कुंटुंब
यातली आशिता तर अवघी सहा महिन्याची तर अंजली एक वर्षाची
मावशी अत्यंत प्रेमान करायची त्यांच
आशिताची आई आयसीआयसीत
तिला बारा तास ड्युटी
मधल्या वेळेत असताना येऊन दूध देऊन जायची

त्याच सुमारास गोरेगाव वेस्टात असण्यार्या आमच्या घराचे बांधकाम चालू झाल्याने आम्ही तात्पुरते मावशीकडे गेलो
सुरुवातीला मला काँलेजातून आल की या दोघीची कटकटच वाटायची स्पेशली रडायला लागल्यावर
काँलेजातले प्रँक्टीकल जर्नल प्रवास संपवून आल्यावर ह्या दोघीच टिपेतल रडण ऐकून डोक उठायच
त्यातली आशिता भयंकर मूडी आहे
मला जाम राग यायचा
मी एक दोनदा त्यांच्यावर ऊखडल्यावर मावशीने माझी चांगलीच कान ऊघडणी केलेली

पण नंतर काही प्रसंग असे घडले की या दोघी मला आवडू लागल्या
स्पेशली माझी यायची वेळ झाली की
त्या दोघी दरवाज्यात मला बघून पिँकीदी आली अस बोबड्या स्वरात म्हटल्या की मला बर वाटू लागायच
माझे कंपास पुस्तक ऊघडून त्यातली चित्र पाहायच्या
हळूहळू आमची गट्टी जमली
घरी जायला आवडू लागलं
कधी कधी तर मी जर्नल इनकंप्लीट ठेवायचे त्यांच्याशी खेळायच्या नादात
त्यांना भरवण खेळण आवडायला लागल
या दोघीनी माझ चिडण घालवल
दीदी होण्याचा अनुभव दिला
आणि मावशी गाल्यातल्या गाल्यात हसायची हे पाहून
खरच लहान मुलं किती बदलतात आपल्याला

आज त्या दोघी मोठ्या झाल्यात
शाळेत जातात
त्यांच क्षितीज विस्तारलय
पण अजूनही त्या मला विसरल्या नाहीत
पिँकीदी म्हणून हाक मारतात
त्यांच्या आईवडीलांशी घट्ट संबंध जुळलेत
मावशीन पण ह्या दोघीनंतर पाळणाघर बंदच केल

ऊद्या सकाळी माझ लग्न झाल्यावर माझ्या मुलांना मी कस संभाळू हे या दोघीनी शिकवलं
माया लागण म्हणजे नेमकं काय ते कळाल
थँक्स टू बोथ आँफ देम

>>>>> ह्या अनुभव चर्चचा/विषयाचा नक्की हेतू कळला नाही. नक्की आपले पाळणाघरचे अनुभव वा अपेक्षा इथे शेअर करून काय साध्य होणार?( प्रश्ण प्रामाणिक आहे) <<<<<

हे अनुभव वाचल्यावर जग ज्यावर चालतयं तो थोडाबहुत शिल्लक चान्गुलपणा / माणुसकी याच्या अस्तित्वाबद्दल वाचक आश्वस्त व्हावेत असा काहीसा हेतू असावा, समजा तसा नसेल तरी तो साध्य होतोच.
याच निमित्ताने, आपल्या पूर्वायुष्यात ज्यान्चे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष (व्यवहाराव्यतिरिक्तचे) उपकार आपल्यावर झाले आहेत, तर त्यान्ची उजळणी होणे, सिंहावलोकन होणे, आपलेच पाय जमिनीवर स्थिर रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक असते, ते ही साध्य होते.
याव्यतिरिक्त, केवळ अन केवळ, स्वार्थाव्यतिरिक्त/मला काय हवे याव्यतिरिक्त काहीच समजू न शकणारे जीव कोणी असतील, तर त्यान्ना त्यान्चा जो काही स्वार्थ साधला गेला, त्यामागिल अन्य व्यक्तिन्च्या त्यागाची/परमार्थाची ओळख व्हावी व कधी काळी त्यान्चे हातुन देखिल परमार्थ व्हावा हा हेतू देखिल साध्य होतो.
हे असे वाचले की मनुष्याचा मीपणा गळून पडण्यास मदत होते, व जन्माला घालणार्‍या आईबापाव्यतिरिक्तही आपल्या वाढीत कितीकिती जणान्चा हातभार या ना त्या निमित्ताने/कारणाने/प्रकाराने लागला आहे हे जाणवुन समाजाचे उतराई होण्याचे भान येऊ शकते हा सज्जन्नान्चा समाज बनण्याचे दृष्टीने फायदाच नव्हे काय?

(अल्पना, भन्नाट बर का!)

सर्वांचेच अनुभव छान आहेत. वाचायला आवडले. मला वैयक्तिकरीत्या मुलीला कुणाकडे ठेवणे पटत नव्हते, आजही पटत नाही. समजा, मुलीची आबाळ झाली, अथवा त्यांनी तिला वेळेवर खायला दिले नाही, मारले अथवा ती कुठे पडली तर? असे अनेक प्रश्न सतावत असतात. मात्र, आता त्या प्रश्नांवर थोडीतरी मात करायला शिकले आहे. कारण, ओव्हर प्रॉटेक्टिव्ह राहिलं तर आपल्यालाच तिच्या मागून धावत रहावं लागेल एवढी अक्कल आली आहे. Happy चांगलं पाळणाघर अथवा प्लेस्कूल मिळणं हे नशीबाचंच काम आहे.

सुनिधी दीड वर्षाची झालीतरी बोलत नव्हती, एक दोन शब्दांव्यतिरीक्त (ममा, पपा एवढंच) ती काहीच बोलायची नाही, आपण बोललेलं मात्र तिला व्यवस्थित समजायचं. डॉक्टर म्हणाले की तिला तिच्या वयाच्या मुलांमधे खेळायला सोडा म्हणजे ती बोलू लागेल. आमच्या घराच्या पाठीमागेच एक छोटंसं डेकेअर आणि प्लस्कूल होतं. तिथे तिला पाठवायला लागले. या बाई गेली वीस वर्षे हे प्लेस्कूल चालवायच्या. आमच्या शेजारी आंटीचा नातू तिथेच जायचा (आता तो नातू नोकरी करतो Happy ) त्यामुळे अनुभव अथवा काळजीचा प्रश्न नव्हता. तिथे गेल्याच्या पहिल्या दिवसापासून सुनिधी अगदी खुश होती. पहिल्या दिवशी तिला स्कूलमधून घेऊन येताना मी मारे व्हीडीओ कॅमेरा ऑन करून गेले; म्हटलं लेक आपल्याला बघून आनंदी होईल, धावत येईल वगैरे. तर आमची कन्यका मला बघून "तू बाय" (म्हणजे तू का आलीस आता? इत्यादि इत्यादि) ओरडली आणि परत खेळण्यात मश्गुल झाली. व्हीडीओमधे तर ते असलं मस्त वाटतं बघायला Happy

या प्लेस्कूलच्या सुधाआंटी मुलांना खूप छान सांभाळायच्या. गाणी गोष्टी वगैरे शिकवायच्या. पूर्ण वेळ मुलांना कंटाळा न येईल अशा पद्धतीने खेळवायच्या. त्यांच्या नर्सरीमधे खेळणी वगैरे जास्त नव्हती, पण जेवढी होती तेवढीच मुलांना व्यवस्थित खेळू द्यायच्या. सुनिधी तिथे जायला लागल्यावर बर्‍यापैकी बोलत होती. शिवाय कलर्स, शेप्स अल्फाबेट्स 'ओळखणे' हेदेखील जमत होतं. स्वतःचाच डबा उघडून खाणेदेखील जमायला लागले. त्यांनी माझ्यावर केलेले अजून एक उपकार म्हणजे पॉटी ट्रेनिंग. सुनिधीला सुरूवातीला डायपर लावून पाठवायचे. त्यांनी नको मी शिकवते म्हणून सांगितलं आणि खरोखर शिकवलं. सुधाआंटीकडे सुनिधी अजून वर्षभर जात राहिली असती तर खूप छान बाबी शिकली असती.

दुर्दैवाने आम्हाला ऑगस्टमधे मंगलोर सोडून चेन्नईला यावं लागलं. मंगलोर हे शिक्षणासाठी खरंच उत्तम शहर आहे. सुनिधी तिथे शिकली असती तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. चेन्नईमधे आल्यावर सुनिधीला सरळ इथल्या प्रीकेजीमधेच अ‍ॅडमिशन घेतली. मुख्य कारण म्हणजे ती इथे रूळावी आणि तिला इतर मुलांसोबत खेळायला मिळावं म्हणून. शिवाय भाषा शिकणे हेदेखील दुसरे कारण होतेच. इथे प्रॉपर 'कॉन्व्हेंट' शाळा असल्याने मला काही अपेक्षा फार नव्हत्या. पण तरीदेखील तिच्या टीचरने खूप छान संभाळून घेतले. भाषेचा प्रॉब्लेम असल्याने सुनिधी जे काय म्हणायची ते तिने माझ्याकडून लिहून घेतले (सूसू, भूक लागली, हे दे, ते दे असे छोटेच शब्द पण ती काय म्हणते हे टीचरला समजायचे नाही) शिवाय, इतर मुलांबरोबर खेळता खेळता बर्‍यापैकी तमिळ शिकली (आता ती माझ्यापेक्षा जास्त वाक्यं बोलू शकते तमिळमधून Happy )

या दोन चांगल्या अनुभवांमुळे आता जरा तरी मी ओव्हरप्रोटेक्टिव्ह मोडमधून बाहेर पडत आहे. Happy

सगळ्यांचे अनुभव छान आहेत.
माझी मोठी लेक वर्षभराची झाली तेव्हां मी परत कामाला जाण्याच्या दृष्टीने पाळणाघर शोधत होते. मुलीला पाळणाघरात ठेवण्याविषयी नवर्‍याचा ठाम नकार होता. (सासुबाई शिक्षिका होत्या.त्याला लहानपणी ज्या आजींकडे ठेवले होते त्या त्याला अजिबात आवडत नव्हत्या आणि आईपासुन दुर रहाणे त्याला फारच त्रासाचे गेले होते. शेवटी तो थोडा मोठा झाल्यावर त्याच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठी असलेली त्याची बहीण आणि सासुबाईंनी शाळांच्या वेळा सकाळ-दुपार करुन घेतल्या. बहिणीचे लग्न झाल्यावर काही वर्ष त्याची आणि साबांची शाळेची वेळ एक करुन घेतली. मग तो एकटा/ भावाबरोबर राहु लागला). असो. पण कसेतरी त्याच्या मनाची तयारी केली आणि लेकीसाठी पाळणाघर शोधणे सुरु झाले. फॅमिली डे केयर आणि Institutional डे केयर असे दोन प्रकार असल्याने नक्की काय करावे हे समजेना. भारतीय्/श्रीलंकन फॅमिली डे केयर मध्ये मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. तसेच त्या केयरर्स टी व्ही खुप वेळ लावुन ठेवतात किंवा फोनवर बोलतात असा बर्‍याच जणांचा अनुभव ऐकला. ऑझी फॅमिलीजमध्ये ठेवायचे तर एक-दोन ठिकाणी ती लोकं बरी वाटली नाही. एका कुटुंबात चर्चचे प्रस्थ होते. (कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. फक्त आम्हाला तसे कुटुंब नको होते.) या सगळ्यातून एका मोठ्या चेनच्या पाळणाघरात तिला ठेवू लागलो. काही दिवस ती रुळेपर्यंत नवरा तिला ती रडते म्हणुन घरीच घेऊन येतो की काय अशी धास्ती असायची. त्या पाळणाघरात एक मंगलोरची टीचर होती. तिचा नवरा मुंबईचा होता. तिने नवर्‍याकडुन थोडे थोडे मराठी शिकून घेतले. आम्ही बरेच मराठी शब्द लिहून दिले होतेच. त्याचाही उपयोग झाला. इतर ऑझी/चायनीज केयरर्सने तिची खुप काळजी घेतली आणि एकदाची ती सेटल झाली. पुढे माझा फुल टाईम जॉब सुरु झाला तेव्हा तर ५ दिवस तिकडे असायची. त्या काळात केयरर्सने केलेली मदत कधीही विसरु शकणार नाही. गंमत म्हणजे अजुन एक मराठी भाषिक मुलगी त्याच पाळणाघरात येऊ लागली. ती मुलगी आणि लेक मराठीत बोलु लागल्या. म्हणजे त्या दोघींना आपली मायबोली मराठी आहे हे कसे समजले आणि त्या कशा काय बोलु लागल्या हे खरच कोडे आहे. केयरर्सने त्यांच्या एकमेकींशी मराठी बोलण्यात कधीही आडकाठी केली नाही. यथावकाश त्या मुलीच्या आई-वडीलांशी आमची ओळख होऊन मैत्रीत सुपांतर झालं. अजुनही आम्ही भेटतो.

दुसर्‍या कन्येला फार काळ पाळणाघरात ठेवावे लागले नाही/लागत नाहीये कारण मी कमी वेळ काम करते. ती एका ठिकाणी आठवड्यातून एक दिवस जायची. मजेत असायची. पण त्यांच्या वेळा आमच्या सोयीच्या नसल्याने तिचे पाळणाघर बदलले. ही पठ्ठी खुप रडायची. जायचेच नाही मला, जुन्याच पा.घ.मध्ये सोड अशी रडारड सुरु झाली. बरं तिथला स्टाफ तर एकदम प्रोफेशनल होता. तिला विचारले तर म्हणे 'तिथली ----- मला ओरडते!' हे सगळे सेंटर मॅनेजरला सांगितले, त्या केयररला पण सांगितले. तिने तिच्या आवाजात योग्य ते बदल केले. आता चांगली रुळली आहे. त्या केयररच्या आवाजाची पट्टीच मोठी आहे हे आमच्या ठकीला समजायला वेळ लागला.

असे एकुणात चांगले अनुभव आहेत. मोठीचे पाळणाघर कधीच संपले आहे. धाकटी पण अजुन एखाद-दीड वर्षच तिथे जाईल. आमच्या दोघांचा कल एखाद्या घरी मुलांना सांभाळायला ठेवण्यापेक्षा एखाद्या मोठ्या पाळणाघरात ठेवण्याकडेच आहे. एक तर तिथे खुप पारदर्शकता असते. सगळीकडे मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने आपण आपल्या बाळाचे काय चालले आहे हे कधीही जाऊन बघु शकतो. घरगुती पाळणाघरांपेक्षा तिथे अ‍ॅक्टिव्हीटीज जास्त असतात, बाहेर खेळायला जागा पण बरीच असते. खुप मुले असल्याने मुलांनाही कंटाळा येत नाही.

या केयरर्सच्या वागण्याचे बर्‍याचदा कौतुक वाटते. त्याचे श्रेय त्यांना मिळणार्‍या ट्रेनिंगला द्यायलाच हवे. शिवाय सरकारचे 'पाळणाघरे'/early childhood development यासंदर्भात असलेले बारीक लक्ष आणि त्याप्रमाणे तयार केलेले काटेकोर कायदे यांचाही मोठा वाटा आहे.

सगळ्यांनी छान आणि मनापासून लिहिलंय....

माझी आई पाळणाघर चालवायची. त्याचे अनुभव आहेत.
तिने वय वर्ष ३ महिने ते ६ वर्ष अशी मुलं सांभाळली. त्यात तिला बाबांनी पण साथ दिली.
अगदी घरच्या मुलांसारखेच वागवायचे त्यांना. मला शाळेतून आल्यावर कधी कधी त्या मुलांचा फार त्रास वाटायचा. "काय रडतायत सारखी.... आई तू त्यांना कशाला घेतले पाळणाघरात?" असे म्हणायची. पण आईने एकदाच सांगितलं तुझ्यावर असे आई बाबा सोडून जायची वेळ येत नाही ना... तुला नाही समजणार" त्यानंतर मी कधी काही बोलले नाही.

कोणी खूप रडकं मुल असेल तर बाबा त्यांना कडेवर घेऊन फिरवून आणायचे गणपतीच्या देवळापर्यंत. घरी गिरणी होती लहान त्यात पण ही मुलं लुडबुड करायची. Happy मी पिठ काढतो, मी ब्रशने झाडतो...असे ते पिठाने माखलेले वामनावतार बघून मजा वाटायची.

मुलांना त्यांचं प्रेमाने कोण करतंय हे बरोबर कळतं त्यामुळे आज ती मुलं मोठी झालीयेत तरी कुलकर्णी काका-काकूंना विसरली नाहीयेत.
एक मुलगी तर अजूनही काही नवीन गोष्ट घेतली की आईला दाखवायला येते कितीका वाजले असेना. Happy

त्या दोघांनी काही कोर्स वगैरे नव्हता केला पण मनापासून मुलांना सांभाळायचे एवढे नक्की केले. घरचं गरम जेवण देणं, फिरवून आणणं, कधी पालकांना उशीर झाला तरी त्रागा न करणं हे सगळं करता करता मुलांशी खूप भावनिक जवळिक व्हायची दोघांची आणि पालकांना त्यांच्या बद्दलचा वाटणारा विश्वास हीच त्यांची खरी कमाई...!

>>ईवॉल्व होण्याविषयी<<
अहो, ईवॉल्व होणे चांगलेच हो(त्या माणसाचेच भले होइल). Proud त्याविषयी काही म्हणणे नाहीच.
पण इतक्या फटकन माणूस असा ईवॉल्व होवु शकतो पाहून कमाल वाटली. एका बाफवर एक लिहायचं, दुसरा बाफ दिसला की दुसरं जरा विचित्रच वाटतं पाहून. Wink
की स्वतःच कळतं व दुसर्‍याच जळतं असे तर नाही ना की बहती गंगा मे हाथ धोना प्रकार? म्हणून पडला एक प्रश्ण. Proud

सगळ्याचे प्रतिसाद छान आहेत..
आम्ही नुकतेच नवीन जागी शिफ्ट झालो आहोत... मुलगा ८ वर्षाचा आहे, त्याला टीव्ही, कंप्युटरची खुप सवय होती आधीच्या घरी, ती मोडावी म्हणुन सुरवातीला महिनाभर केबल चालु केली नाही, की जेणेकरुन त्याला खेळायची आवड लागेल, सुरवातीला तो सोसायटीमध्ये खाले खेळायला जायचा, लवकर घरी पण यायचा नाही, पण नंतर हळु हळु थोडे कमी झाले, बरोबर खेळणारी मुले थोडी मोठी आहेत, ती त्याला खेळायला घेत नाहीत, त्यामुळे रडतो. त्याच्या बरोबरीच्या मुलीपण आहेत, त्याच्यात खेळला तर मुले चिडवतात.
तरी पण त्याला खेळायला जायचे असते. सगळे खेळत असताना नुसता तिथे वावरतो... खुप वाइट वाटते, त्या मुलांना पण समजावयाचा २-३ वेळा प्रयत्न केला, पण फारसा फरक पडत नाही... काय करावे कळत नाही, तो तर कधी कधी म्हणतो आपण परत जुन्या घरी जाउ रहायला.... Sad
आम्ही दोघेही नोकरी करतो त्यामुळे त्याला जो वेळ द्यायला हवा आहे तो देता येत नाही असे वाटते आहे...
मग चिडचिड होते...
काय करावे समजत नाही...

Pages