ईशोवास्य उपनिषद् अर्थात ईशोपनिषद हे पण उपनिषदपैकी अतिशय छोटे म्हणजे १७ अथवा १८ श्लोकाचे आहे.[यजुर्वेदाची कुठली संहिता वापरता यावर अवलंबून आहे.]हे उपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेदाचा शेवटचा अध्याय आहे. हे उपनिषद यजुर्वेदाच्या मुळ संहितेचा भाग आहे त्यामुळे याला "संहीतोपानिषद" असेही म्हणतात.
या उपनिषदाचे नाव हे त्यातील पहिल्या श्लोकामुळे आले आहे :"इशावास्याम इदं सर्वम." अर्थात प्रत्येक गोष्टीत आणि चराचरात ईश्वर आहे. याला वाजसनीय उपनिषद असेही नाव आहे कारण हे यजुर्वेदाच्या वाजसनीय संहितेचा भाग आहे.ईशावास्य उपनिषदा च्या सुरवातीला शान्तिमन्त्राचा पाठ करण्याची रीत आहे.शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनीय माध्यंदिन संहिता आणि वाजसनीय कण्व संहिता यात श्लोक १ते ८ तेच आहेत फक्त कण्व संहितेत सोळावा श्लोक नाही.
हे उपनिषद वाचायला अतिशय सोपे पण समजायला तेवढेच कठीण आहे .कारण यजुर्वेद हा यज्ञ करण्याच्या कृती आणि त्यासोबत द्यायचे बळी इ.गोष्टी सांगतो ,आणि या शेवटच्या अध्यायात या सगळ्या कर्माचा फोलपणा हा हा ही सांगितला आहे .सगळे काही ईश्वराने आच्छादित आहे तेंव्हा जर ईश्वरावर श्रद्धा असेल तर ही कर्मे करा किंवा करू नका हेच हे उपनिषद सांगते आहे . या उपनिषदात “ कर्म “ या शब्दाचा अर्थ यज्ञ ,याग, बळी देणे हा आहे आणि आपण कर्म या शब्दाचा सध्या अर्थ लावतो तो नाही.या उपनिषदावर आद्य शंकराचार्यांनी जे भाष्य केले आहे त्यात आचार्यही कर्माचा या उपनिषदात तोच अर्थ सांगतात.
पहिला श्लोक सांगतो की हे जग ईश्वराने आच्छादित आहे आणि तू ही भावना केलीस तर सर्व त्याग केल्यासारखे आहे आणि कोणाच्याही धनाची अपेक्षा धरू नको.
दुसरा श्लोक सांगतो की सामान्य माणूस [यज्ञ ,होम आदि ] कर्मे करीत १०० वर्षे जगण्याची इच्छा करतो ,अशा पुरुषाला कर्म करण्यावाचून दुसरे काही नाही.
तिसरा श्लोक सांगतो की जे लोक [यज्ञ होमादी] कर्मे करतात ते आपल्या या कर्माची फळे भोगण्यासाठी त्या त्या असुर लोकाला प्राप्त होतात. या ठिकाणी शांकरभाष्य सांगते की कर्माने [यज्ञ इ.]लिप्त असलेलेले देव सुध्दा असुरच आहेत ,त्यामुळे पुण्य करून जरी आत्मा इंद्रलोकाला गेला तरी तो असुर लोकाला जातो . कारण या गोष्टीवर जोर देऊन लोक आत्म्याची हानी करतात.
चवथा श्लोक सांगतो की ते [आत्मतत्व ] जरी स्तब्ध असले तरीही ते विचारापेक्षा वेगवान असते आणि सर्व महाभूतांशी एक असते.
पाचवा श्लोक सांगतो की ते आत्मतत्व हे चळते पण तरीही अचल असते. ते अविद्वानांच्या अगदी दूर असते पण विद्वानांच्या अगदी समीप असते.
सहावा श्लोक सांगतो की [ज्ञानी ] पुरुष आत्म्यात सर्व भूते पहातो आणि सर्व भूतांमध्ये आत्मा पाहतो त्यामुळे तो कोणाची निंदा करत नाही.
सातवा श्लोक सांगतो की ज्ञानी विद्वानाला सर्व महाभूते ही आत्माच असतात अशा एकत्व पहाणाऱ्या विद्वानाला शोक कशाचा आणि मोह कशाचा ?
आठवा श्लोक हा फार महत्वाचा आहे कारण हा श्लोक निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे वर्णन करतो.तो [ईश्वर]सभोवार [चराचरात] पसरलेला आहे ,कायाविरहीत आहे ,अक्षय आहे ,शिरविरहित [स्थूल शरीर विरहीत ] आहे ,शुध्द,पापरहित आहे.सर्वद्रष्टा,सर्वज्ञ,सर्वश्रेष्ठ आहे. तो स्वयंभू ईश्वर प्रजापतीना [यज्ञाच्या सर्व देवाना ] त्यांच्या त्यांच्या इष्ट कर्तव्याचा यथातथ्य विभाग करून देतो. ईशावास्य उपनिषदात प्रथमच अशा निर्गुण ,निराकार ईश्वराची संकल्पना मांडली आहे.
नववा श्लोक सांगतो की जे अविद्येत [यज्ञ ,बळी इ.]रत असतात ते घोर अंधकारात प्रवेश करतात.पण जे [कर्म सोडून] नुसत्याच विद्येमध्ये [उपासनेमध्ये ] रत असतात ते त्याहून निबिड अशा अविद्येत [आणि पर्यायाने अंधकारात ] प्रवेश करतात.
दहावा श्लोक विशद करतो की विद्येच्या योगाने [उपासनेच्या] योगाने वेगळी फळे मिळतात आणि अविद्येच्या [कर्माच्या म्हणजे यज्ञयाग इ.इ.] याच्या योगाने वेगळीच फळे मिळतात आणि हे ज्ञान आम्हाला ज्या आचार्यांनी कर्म [यज्ञ इ.] आणि ज्ञान याचे व्याख्यान दिले त्यांच्याकडून आम्ही ऐकले आहे.
अकरावा श्लोक सांगतो की असे [दहाव्या श्लोकात विशद केल्याप्रमाणे ] आहे तर जो पुरुष हे जाणतो की विद्या [उपासना ] आणि अविद्या [यज्ञ ,बळी इ.कर्म] हे दोन्ही एकाच पुरुषाकडून एकाच वेळी करणे जास्त श्रेयस्कर आहे. असा पुरुष अविद्येच्या योगाने [यज्ञ,बळी इ.च्या फळाने ] मृत्यू पार करतो आणि विद्येच्या [उपासनेच्या ] योगाने देवत्व पावतो.
बारावा श्लोक नवव्या श्लोकातली कल्पना पुढे नेतो आणि सांगतो जे असंभूतीची [संभवन म्हणजे होणे आणि होण्याची क्रिया त्याला संभूती म्हणतात,हा शब्द प्रकृती या अर्थानेही वापरला जातो.] उपासना करतात ते घोर अंधकारात प्रवेश करतात पण जे कार्यब्रह्मात [यज्ञ ,याग ,बळी इ.] रत असतात ते त्याहून अधिक घोर अंधकारात पडतात .आता हा श्लोक समजायला फार कठीण आहे कारण शांकरभाष्य असंभूती हा शब्द माया या अर्थाने स्पष्ट करतो.
तेरावा श्लोक स्पष्ट करतो की कार्यब्रह्माच्या [यज्ञ ,बळी इ.]उपासने एक फळ मिळते आणि अव्याकृताच्या [जे रोजच्या व्यवहाराच्या संकल्पनेने व्यक्त नाही.] उपसानेने दुसरे फळ मिळते हे आम्ही ज्या आचार्यांनी आम्हाला व्याकृत आणि अव्याकृत याच्यामधला फरक आणि त्यांच्या उपासनेचे व्याख्यान सांगितले त्यांच्याकडून ऐकले आहे.
चवदावा श्लोक सांगतो की संभूती आणि असंभूती या दोन्हीची जो नर उपासना करतो तो प्रथम कार्यब्रह्माच्या उपासनेने अधर्म ,काम इ. दोषांचे उल्लंघन करून नंतर कारणब्रह्माच्या उपासनेने मोक्षास प्राप्त होतो.
पंधराव्या श्लोकात ईश्वर स्वतः सांगतो आहे की अतिशय तेजस्वी अशा भांड्यात सत्याचे मुखद्वार झाकले आहे तथापि हे पुशन सत्यधर्म असा जो मी त्याला तुझ्या सत्य आत्म्याची उपलब्धी व्हावी त्यासाठी तू ते मुख उघड .
सोळावा श्लोक हा अतिसुंदर आहे ज्यात लेखक सांगतो आही की हे सूर्य तो आपल्या अतिशय तेज आणि तापकारक किरणांना चालव,तुझे जे तापविरहित असे सुंदर रूप आहे ते मी पहावे.आणि हा जो आदिमंडलस्थ पुरुष आहे तो मीच आहे.
सतराव्या श्लोकात मृत्यूची कल्पना मांडली आहे.माझे शरीर भस्म होताना माझ्या शरीरातला जो वायू [अनिल] सर्वात्मक सुत्रात्म्याला प्राप्त होवो.त्यानंतर अग्नीत ज्याचा होम केला आहे ते शरीर भस्म होवो.अश्या वेळेला हे क्रतो माझ्या कृतकर्मांचे स्मरण कर .
शेवटचा म्हणजे १८वा श्लोक हा एक प्रार्थना आहे की हे अग्ने आम्हाला सुपथाने ने ,हे देवा तू सर्व जाणणारा आहेस आणि आमच्या वंचनात्मक पापांचा नाश कर आणि आम्ही सध्या तुला अतिशय नमस्कार करतो.
असे आहे ईशावास्य उपनिषद ,छोटेसे पण अर्थ जाणण्यास अतिशय कठीण पण निर्गुण ,निराकार एकाच ईश्वराची संकल्पना मांडणारे. हे उपनिषद वाचताना आद्य शंकराचार्याचे भाष्य फार उपयोगी आहे .कारण आचार्यांनी यातल्या कल्पना फार सुंदर स्पष्ट केल्या आहेत.अद्वैतशास्त्र हे जगन मिथ्या ठरवत असल्याने समजणे कधीकधी अशक्य होते.तसेच या उपनिषदात जे कर्म आहे ते यज्ञयाग,बळी इ. कर्मकांड आहे आणि आचार्यांनी शांकरभाष्य हे मुख्यत्वे करून या कर्मकांडाला खोदण्यासाठी आणि कर्माची व्याख्या बदलून कर्तव्य ही रूढ करण्यासाठी लिहिले आहे.आचार्यांनी त्यांच्या भाष्यात पृथक उपासनेची निंदा केली आहे आणि प्रकृतीत लीन होणे ही कर्मकांडाची शेवटची गती आहे त्यापुढे सर्वात्मभाव हे ज्ञाननिष्ठेचे परमफळ आहे . आचार्यांनी कर्मकांड खोडताना त्याचे ही फळ विचारात घेतले आहे.
ह्या उपनिषदाचा हा मला समजलेला अर्थ आहे ,मी काही महापंडित नाही त्यामुळे काही ठिकाणी अर्थ चुकीचा लागला असण्याची शक्यता आहे .सर्व लोकाना विनंती आहे की त्यांनी यात दुरुस्त्या अथवा त्याना समजलेला अर्थ लिहावा. आपण या विषयावर चर्चा करावी ही विनंती...
(संग्राहित / आधारित . साभार- श्री अजितराव पिंपळखरे , सौदी अरेबिया )
धन्यवाद श्रीसाईसच्चरितात एक
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीसाईसच्चरितात एक कथा आहे ज्यात सद्गुरु श्री साईनाथांनी ईशावास्याचे कोडे एका मोलकरीण मुलीच्याकरवी उलगडवले होते. अर्थात, ती कथाही कळायला जड गेली होती.
अश्विनीजी मला आठवते
अश्विनीजी मला आठवते त्याप्रमाणे कथा अशी आहे की,
साई-सच्चरितचे लेखक दाभोळकर हे त्यांच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीच्या मुलगीला गरिबीमुळे अतिशय जुनेर साडी नेसावी लागते.तशाही अवस्थेत ती भांडी घासताना आनंदाने गाणे गुणगुणत असते . तिची दया येवून दाभोळकर नवीन साडी घेवून देतात ,त्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी ती नवीन साडी नेसून येते आणि तेच गाणे गुणगुणते . परत तिसर्या दिवशी तेच फाटके जुनेर नेसून येते ,आणि त्याबद्दल तिला काहीच वाटत नाही.
या सर्व घडामोडींचे निरीक्षण करताना दाभोळकरना साईबाबांनी केलेले ईशावस्य उपनिषदाचे निरूपण आठवते .
त्यातून मला समजलेला अर्था खालीलप्रमाणे .... तो बरोबर की चुकीचा हे मला माहीत नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो अध्याय समजण्यास कठीण आहे.!
1. खरे साधू-संत किंवा नि: संग सत्पुरुष हे कोणत्याही अवस्थेत आनंदी /तदाकार वृत्तीने राहतात .म्हणजे त्यांना कोणी शिव्या दिल्या तरी चिडत नाहीत किंवा स्तुतिगान केले तरी त्यामुळे हुरळून जात नाहीत. त्यांना नैवेद्य म्हणून पंचपक्वान्ने दिली किंवा एखाद्या दिवशी भिक्षा मागूनही उपास घडला तरी त्यांच्या वृत्तीत फरक पडत नाही. पूर्ण निरहंकारी असल्याने नित्य-शुद्ध ,बुद्ध, परिपूर्ण ,सच्चिदानंद स्वरूपी परमात्म्याशी तदाकार झाल्याने त्यांना भौतिक जगातील मान-अपमान ,सुख-दू:ख यांची बाधा होत नाही. असा अर्थ ...
2. सामान्य मनुष्याला सत्संगाच्या प्रभावा मुळे काही दिवस सात्त्विक भाव जागृत झाल्याने आध्यात्मिक अनुभूति /आनंद याचा अनुभव येतो आणि तो प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे वळतो. पण काही दिवस गेल्यावर जगाच्या बाजारात मायिक प्रलोभनांचा विळखा पडल्यावर सामान्य मनुष्य सत्संग / अध्यात्म विसरून पुन्हा जगाच्या रहाटगाडगयात व्यस्त होवून आत्म्याचे मूळ स्वरूप विसरतो .... असा अर्थ
यातील कोणता अर्थ बरोबर आहे, की अन्य काही अर्थ आहे ? याबाबत जरूर मार्गदर्शन करावे!
स्वामी विश्वरूपानंद जी धन्यवाद . आपल्यामुळे अनेक नवीन आध्यात्मिक विषय समजत आहेत...!
प्रतिसादाबद्दल आभार
प्रतिसादाबद्दल आभार .
कात्रेजी तुम्ही सांगितलेला पहिला अर्थ अधिक बरोबर वाटतो. धन्यवाद
हे मूळ उपनिषद वर दिले असते तर
हे मूळ उपनिषद वर दिले असते तर बरे झाले असते असे वाटते.
ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥१॥
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः ।
ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥३॥
अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् ।
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥५॥
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥
यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः ।
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥७॥
स पर्यगाच्छुक्रमकायमव्रण- मस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्वयम्भू-र्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः॥८॥
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥९॥
अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०॥
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥११॥
अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्याँ रताः ॥१२॥
अन्यदेवाहुः सम्भवादन्यदाहुरसम्भवात् ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१३॥
सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह ।
विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥१४॥
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः ।
यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥१६॥
वायुरनिलममृतमथेदं भस्मांतँ शरीरम् ।
ॐ क्रतो स्मर कृतँ स्मर क्रतो स्मर कृतँ स्मर ॥१७॥
अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ॥१८॥
आभार स्वामीजी,शशांकजी, छान
आभार स्वामीजी,शशांकजी, छान माहिती.
( एक शंका - मग ते 'आत्मा वा अरे द्रष्टव्यः....'' कोणत्या उपनिषदात येतं ?)
^^^ स्वामीजी सांगतीलच.
^^^
स्वामीजी सांगतीलच. स्वामीजींनी आतापर्यंत आपल्यासाठी अजितराव पिंपळखरें, अबुधाबी यांचेकडची संग्राहीत माहीती दिली हे ही नसे थोडके. स्वामीजी आपले आणि अबुधाबीतील स्नेह्यांचे या माहीतीसाठी आभार.
स्वामीजी, समजण्यास अत्यंत
स्वामीजी,
समजण्यास अत्यंत कठीण आहे. सर्व श्रोकांचा एकत्र अर्थ लाऊन सांगणारा ज्ञानी शोधला पाहिजे.
सर्व मंडळींस सविनय नमस्कार !
सर्व मंडळींस सविनय नमस्कार !
स्वामिजी, तुम्ही जे अर्थ सांगितलेत, ते बरोबरच आहे.
एक छोटीशी गोष्ट माझ्या कडुन तुमच्या ज्ञान सागरात एक फुलाची पाकळी म्हणुन अर्पण करतो . . . .
आज्ञा असावी . . . .
सर्वप्रथम आव्हान करावे शांकरमार्गात सुचविल्या प्रमाणे . . . .
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते..
आणी आणखीन एक गोष्ट ही, कि . . . .
शेवटचे चार श्लोक अनुक्रमे १५.१६.१७.१८ हे आपल्या धर्मात मनुष्याचे अंतिम संस्कार करतांनाही उच्चारले जातात. ( हे ईथे फक्त माहिती वाटुन घेण्यासाठी ).
उपनिषद वरचं शंकराचार्यांच
उपनिषद वरचं शंकराचार्यांच भाष्य कुठे वाचायला मिळेल ? कोणी सांगेल का प्लीज