सायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल)

Submitted by आशुचँप on 12 May, 2013 - 12:47

गेल्या काही भागात दिलेल्या माहीतीचा काही जणांना तरी सायकल घ्यायला मदत झाली असेल. आता सायकल खरेदी झालीये, बरोबर एक्सेसरीज पण घेतली आहे. आता काही सायकलींगच्या आणि मेंटेनन्सच्या टीप्स....
एक सूचना - मी काही यातला तज्ञ वगैरे नाही. आंतरजालावर माहीती घेऊन आणि माझे काही अनुभव असे मिळून माबोकरांसाठी मी ही माहीती देत आहे.

सायकलमध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे चेन आणि गियर्स. आणि या दोन्ही भागांची अतिशय काळजीपूर्वक देखभाल करावी लागते. कितीही भारीतली सायकल घेतली आणि त्याची योग्य ती निगा राखली नाही तर थोडक्या काळातच त्याची वाट लागते. कशाही ताबडवल्या तरी पिढ्यान पिढ्या चालणार्या सायकलींचा जमाना आता गेला. त्याचबरोबर नविन सायकलींचा मेटेंनन्सही फार सोपा झाला आहे. बर्याच सायकलींना चेन कव्हर नसते त्यामुळे ते आधी खोला, त्याचे स्क्रू गंजलेले, मग चेन साफ करा आदी उपसव्य करावे लागत नाहीत.

मुळात आधी सायकल नीट पद्धतीने चालवली तर बरेच प्रश्न सुटतात. चेनला विनाकारण ताण न देता सायकल चालवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी

१. सायकल चालवण्यापूर्वी ती डावीकडच्या (पुढच्या) पहिल्याच गियरमध्ये असल्याची खात्री करून घ्या. मागच्या भागात दिल्याप्रमाणे पहिला गियर हा फक्त सायकलला चालना देण्यासाठी असल्याने चेनवर एकदम ताण पडत नाही आणि पायाच्या स्नायूंवरही. पाय आणि चेन दोन्ही मोशनमध्ये आल्यानंतरच दुसरा गियर टाकावा. यासाठी सिग्नलला किंवा इतरत्र थांबावे लागणार असेल तर आधीच पहिला गियर टाकून मगच सायकल थांबवावी. (अपवाद इमर्जन्सी थांबावे लागल्यास). दुसर्या आणि तिसर्या गियरमध्ये पण सायकल रेटता येते पण त्याने चेनलींक्सवर खूपच ताण येतो आणि त्याचे आयुष्यही कमी होते.

२. सायकल थांबलेली असताना कधीही गियर बदलू नका. याने डिल्युलर्स तर खराब होतातच पण चेन निसटण्याचीही दाट शक्यता असते. कायम पेडल मारत असतानाच गियर बदलावा. मित्रमंडळी किंवा इतरही आगावू लोक सायकल बघत असताना गियरशी खाटखूट करून खेळतात. त्यांना शक्य तितक्या सभ्यपणे असे करण्यापासून थांबवावे. तरीही ऐकत नसल्यास त्यावेळी योग्य ती कृती करावी.

३. अत्यंतिक चढावर अचानक गियर बदलू नका. जरी पेडल मारत असताना गियर बदलायचे असले तरी खूप चढावर पेडल अगदी दाबून मारत असताना गियर बदलू नका. चढ येण्यापूर्वी किंवा अगदी सुरुवातीलाच खालचा गियर टाकून ठेवला तर ही वेळ येत नाही.

४. कधीही पेडल उलटे फिरवू नका (रिव्हर्स पेडलींग)

५. काहींना हॉपींग करत मग सायकलवर बसायची सवय असते. त्यापेक्षा जागच्या जागी आधी पाय पलिकडे टाकून अलगद पॅडल दाबून मग लगेच सीटवर बसण्याची सवय ठेवावी.

६. एकच ब्रेक कधीही दाबू नका. विशेषत पुढचा..दोन्ही ब्रेक हळूहळू दाबावेत. यामुळे ब्रेकपॅडचे आयुष्य वाढते.

आता चालवण्याविषयी

१. सायकलच्या सीटची उंची आपल्यानुसार अँडजस्ट करून घ्यावी. याचे साधारण प्रमाण असे आहे की सीटवर बसल्यानंतर पूर्ण पॅडल मारण्यासाठी पाय गुढग्यातून ताठ झाला पाहीजे. (ताणावा न लागता). जर पूर्ण पॅडल मारल्यावर पाय एकदाही संपूर्ण ताठ होत नसेल तर सीटची उंची वाढवण्याची गरज आहे. आणि अगदी चवडा टेकत असेल तर कमी करण्याची.

थोडा वेळ दोन्ही पाय गुढग्यात वाकवून चालून पहा म्हणजे आपण सायकल किती चुकीच्या पद्धतीने चालवून पायावर ताण देतो याची जाणीव होईल. पण आपण वर्षानुवर्षे अशीच चालवल्यामुळे त्यात काही चुकीचे आहे हेच जाणवत नाही.

२. सीट उंच केल्यावर हँडलबारची उंचीही तपासून पहावी. जर सगळे वजन खांद्यावर आणि मनगटावर येत असेल तर लवकरच दोन्ही दुखायला सुरुवात होईल. बर्याच सायकलमध्ये हँडलबारही उंच करण्याची सोय असते. तसेच सीट ही जमिनीला अगदी समांतर अशीच पाहीजे. ती किंचितदेखील पुढे अगर मागे झुकलेली असेल तर चालवताना पाठीवर ताण येणार.

३. पेडल मारताना पिस्टनप्रमाणे नुसते खालीवर असे पॅडल मारताना ते शक्यतो वर्तुळाकार मारता येईल असे पहा. म्हणजे आपण कसे करतो, डावीकडचे पॅडल खाली दाबतो आणि मग लगेच उजवीकडचे. आणि त्यासाठीचा जोर मांडीच्या वरच्या स्नायूतून लावतो. त्याऐवजी डावीकडचे पॅडल दाबल्यानंतरही त्यावरचा दाब न सोडता ते जोर लाऊन वर ओढण्याची एक्शन करायची. त्याचवेळी उजवीकडचे पॅडल खाली जातच असते त्यावर थोडा दाब देऊन ते वर ओढायचे. एकंदरीत पॅडलवरचा दाब सोडायचा नाही.

याचे फायदे असे की मांड्याच्या आणि पिंढर्यांच्या वरच्या आणि खालच्या स्नायूंवर सारखाच ताण येतो. जास्त वेगाने जाण्यात मदत होते. सुरुवातीला याचे गणित जमायला जरा वेळ जातो पण एकदा जमल्यानंतर अतिशय बेस्ट प्रकार आहे. आधी आधी लक्ष देऊन हे करावे लागते मग नंतर एकदा अंगवळणी पडले की पायाचा सर्वांगसुंदर व्यायाम होतो. प्रोफेशनल सायकलपटूंना हे करणे खूप सोपे असते कारण त्यांचे शूज पॅडलला अडकवलेले असतात (क्लीट) त्यामुळे ते चटकन पॅडल मागे ओढू शकतात. आपल्याला फ्लॅट पॅडलवर थोडी कसरत करावी लागते.

४. केडन्स सांभाळणे आवश्यक आहे. केडन्स म्हणजे एक पेडल मारायला आपल्याला जितका वेळ लागतो तो. (बहुदा) बाईकचा जसा आरपीएम (रोटेशन पर मिनिट) असतो तसा. तो जितका जास्त (म्हणजे एका मिनिटात आपण कितीवेळेला पॅडल पूर्ण फिरवतो तो आकडा) तितका चांगला. विनाकारण वरचा गियर ठेऊन स्नायूंवर ताण देण्यापेक्षा वेग तितकाच ठेऊन खालच्या गियरवर पॅडलीग जोरात करणे आवश्यक आहे. पट्टीचे सायकलपटू ८०-९० केडन्स ठेवतात. आपण किमान ५०-६० चा पल्ला ठरवला तरी चालण्यासारखे आहे. यामुळे स्टॅमिना वाढतो व जास्त अंतर सायकलिंग केले तरीही फार दमछाक होत नाही. आता कितव्या गियरवर ठेवले तर स्नायूंवर पुरेसा ताण येईल आणि वेगही कमी येणार नाही हे अनुभवातूनच कळेल. आणि या केडन्ससाठीच सायकलला इतके गियर बसवलेले असतात आणि चांगल्या सायकलसाठी खर्चलेला पैसा इथे वसूल होतो.
(क्रं ३ मध्ये दिलेली पद्धत अंमलात आणली तर देखील केडन्स वाढायला मदत होते)

आता सायकलची देखभाल

१. वेळच्या वेळी हवेचे प्रेशर चेक करा. सर्वसाधारणपणे हायब्रीड सायकलला ५० ते ७५ पीएसआय इतके प्रेशर पुरेसे होते. यापेक्षा जास्त हवा भरली तर टायर अगदीच टणक होते आणि लहानसहान खडड्यांवरही जोरात हादरे बसतात. यापेक्षा कमी ठेवला तर सायकल चक्क ओढून नेल्यासारखी ताकद लावावी लागते आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे पंक्चर होण्याची शक्यता असते. (पीएसआय तपासण्यासाठी पंप आवश्यक आहे). माझ्या आत्ताच्या सायकलला दोन-तीन महिन्यातून एकदाच हवा भरून देखील चालते. (बहुदा प्रेस्टा व्हॉल्वची किमया असावी)

२. सायकलचे ब्रेकपॅड सगळ्यात आधी खराब होतात. त्यामुळे वेळच्या वेळी ते ठिकठाक असल्याची खात्री करून घ्यावी. (डिस्कब्रेक बाबत मी अनभिज्ञ आहे..)

३. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चेन. सायकलचे प्राण चेनमध्ये असतात असे म्हणल्यास वावगे ठरू नये. चेन वापरताना काय काळजी घ्यावी हे वर दिलेच आहे. पण किमान आठवडा-दोन आठवड्यातून एकदा चेन स्वच्छ करणे आवश्यक आहे.
आजकाल बर्याच सायकलना चेन कव्हर नसते त्यामुळे त्यावर धूळ, माती लवकर साठते. अर्थात पण ती साफ करायलाही तितकीच सोयीची जाते.
आधी एका स्वच्छ कोरड्या फडक्याने चेन अलगद पुसुन घ्यावी.

मग खाली रद्दी वर्तमानपत्रे पसरून ठेवावीत आणि फडक्याचा बोळा रॉकेलमध्ये बुडवून त्याने काळजीपूर्वक चेन साफ करावी. जुना टूथब्रश वापरला तर उत्तम.

(दुकांनामध्ये खास डिग्रीजरपण मिळतात पण ते खूपच महागडे असतात). रॉकेलने चेनवरचे ऑईल आणि इतर घाण साफ करून घ्यावी. चेनच्या मधला कचरा साफ करण्यासाठी इयरबड वापरावेत.
(सूचना - माहीती असल्याशिवाय गियर्स, डिल्युरल्सशी छेडछाड करू नये, त्याचे सेटिंग बिघडवू नये..)
नाहीतर Happy

संपूर्ण चेन चकाचक झाल्यानंतर ती किमान एक ६-७ तास तशीच ठेऊन द्यावी. लगेचच वापरात काढू नये.
६-७ तासानंतर छान ऑइलींग करावे. ऑईलींग करण्यासाठी दुकानात ल्युब्रिकंट्स मिळातात. (ड्राय आणि वेट अशा दोन प्रकारात) पण आपले इंजिन ऑईल स्वस्त आणि मस्त. अर्थात त्याचा तोटा असा की इंजिन ऑईल थीक असते आणि चिकट असते त्यामुळे त्यावर धूळ, कचरा जास्त लवकर साठतो.

आईल भसाभसा ओतू नये. चेनलींकवर जिथे घर्षण होते तिथेच जास्त गरज असते. हळूहळू चेन फिरवत त्यावर एक एक थेंब सोडत जावा.

ऑईलींग केल्यावर सायकल स्टँडवर घेऊन पॅडल दाबत सगळ्या गियर्सवर फिरवून पहावी. पुन्हा एकदा स्वच्छ फडक्याने चेन अलगद पुसुन जास्तीचे ऑईल काढून टाकावे.
(हे सगळे करताना सायकल चक्क उलटी ठेऊन खूप सोयीचे जाते.)

आतंरजालावरचे फोटो वापरण्याऐवजी मी स्वतच चेन साफ करतानाचे फोटो टाकण्याची इच्छा होती पण दुसर्या कोणी मला हवे तसे फोटो काढणे आणि ऑईलने लिडबिडलेले हात कॅमेराला लावणे दोन्हीही शक्य नव्हते.

४. किमान सहा महिन्यातून एकदा चांगल्या सर्विस सेंटरमध्ये नेऊन थोडे पैसे खर्च करावेत. चेनचा ताण, डिल्युलर्स, ब्रेक्स हे सगळे तज्ञ हातांनीच सेट केलेले कधीही उत्तम.
========================================================================
पुढच्या भागात शहरात, ऑफीसला जाताना काय काय खबरदारी घ्यायची, अडचणी, माझे काही अनुभव, लांब पल्ल्याचे सायकलींग, चढ चढण्यासाठीच्या टीप्स आणि अन्य माहीती. (हा बहुदा शेवटचाच भाग असेल..जर तोपर्यंत नविन काही डोक्यात आले नाही तर)

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
======================================================================

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
फ्रान्समधे असताना रोजच सायकल चालवायचो. तिथे जागोजागी वेलिब नावाच्या सार्वजनिक (shared) सायकली देखिल सुरू झाल्या आहेत.
सध्या (भारतात परतलोय) माझ्याकडे एक जुनी सायकल आहे... हिरो डेविल बहुतेक, १x5 गिअरची. चालवायला जड जाते. पाय लगेच भरून येतात. पण जास्त वापर नाही त्यामुळे नवीन सायकलीत पैसे घालावेसे वाटत नाहीत.... बघू...

याच मालिकेतच एक FAQ चा धागा काढ की, जिथे फक्त शंका आणि त्याची उत्तरं असतील. म्हणजे नंतर या सगळ्या भागातील प्रतिसाद शोधत बसायची गरज नाही.

वाचतोय, हा भाग आणि इथे टाकण्याचा वेगही आवडलाय (कितीही विनयशील असला माणूस तरी चॅम्प तो चॅम्पच :))
वरच्या सॅमच्या प्रतिसादातल्या
"याच मालिकेतच एक FAQ चा धागा काढ की, जिथे फक्त शंका आणि त्याची उत्तरं असतील. म्हणजे नंतर या सगळ्या भागातील प्रतिसाद शोधत बसायची गरज नाही." याला अनुमोदन...

चँप माहिती Happy

पुढच्या भागात आरोग्याकरता सायकलिंगचे असलेले फायदे तसेच इतर काही व्याधी (कंबरदुखी, सांधेदुखी, ब्लडप्रेशर इ.) असताना घ्यायची खबरदारी याबद्दल वाचायला आवडेल. माबोवरच्या डॉक्टरांनी त्याबद्दल माहिती दिली तर सगळ्यांना फायदा होइल.

धन्यवाद सर्वांना

सॅम - सूचना चांगली आहे...नक्कीच असे करतो...या निमित्ताने माझी माहीती पण तपासून घ्यायची संधी मिळेल..

हर्पेन - Blush

माधव - हो ही माहीती त्यांनीच दिलीच तर उत्तम....मी काय त्यातला माहीतगार नाही..उगाच काहीतरी भलतेच झाले तर

आनंद - मी अजून असे काही ऐकले नाही. पण कुठले गियर बसवणार आणि कोण बसवणार यावर सगळे अवलंबून असेल. आणि यात ब्रँडेड पीसी आणि असेबल्ड याच्याइतका फरक असेल असे आत्तातरी वाटत आहे.
थोडक्या पैशात काम होत असेल तर नक्कीच करा.

चँप,
१. पंक्चर काढायचा काहीतरी किट मिळतो ना आजकाल? तो कितपत उपयोगी आहे?
२. ट्यूबलेस टायर्स असतील तर पंक्चर कमी होते असे दुकानदार सांगतात. ते सायकलच्या बाबतीत लागू होते क?
३. मी ट्यूबलेस टायर्स ब्रॉडच बघितले आहेत. स्लीम पण असतात का?

मी जर वाटेल तसे गिअर बदलणं वगैरे करून सायकला अजिबात त्रास दिला नाही Wink नि नीट वापरली तर किती दिवसांनी ऑईलिंग/ मेंटेनन्स वगैरे लागेल करायला?

अनेक महिने पडून होती ती आधी मी धुवून मग वापरायला घेतली. आता नीट मस्त चालवता येते. गिअर्सही आता जमतात चढ-उतारात पटकन बदलायला.

आणि माझ्याकडे बाकीच्या काहीही अ‍ॅक्सेसरीज नाहीत, पण आसपास सायकली रिपेअर वगैरेंची ३-४ दुकानं आहेत. तिथे मला बर्यापैकी जुजबी काम करून मिळेल. २-३ किमीवर सायकलचं एक चांगलं शोरूमपण आहे. तिथेही काम करतात.

मग मलाही बाकीचं साहित्या घ्यावं लागेल का? (भाप्रः कारची हवा चेक करायचं गेज आहे. त्याचा सायकलला उपयोग होईल? Uhoh )

आशुचँप, सगळे धागे बघीतले. फार महत्वाची माहीती आहे.

गिअरवरून सायकलचे दोन दोन प्रकार पडतात.
१) एक गिअर असलेली - साधी
२) अनेक गिअर असलेली - गिअरवाली.

सायकल घेते वेळी स्वस्त/ महाग, देखभाल कमी/ जास्त हे भेद सोडले तर कोणती सायकल घ्यावी?

शहरातल्या रस्त्यांवर कोणती सायकल जास्त दमछाक करेल/करते? साधी की गिअरवाली?
(कारण जास्त ट्राफिकमध्ये गिअरवाली सायकलही साध्या सायकलच्याच वेगाने म्हणजेच लहान गिअरवर चालवावी लागेल. मग गिअरवाली सायकल घेवून फायदा काय?)

माधव - होय..साधारण एक सव्वाशे रुपयांत ते कीट मिळते..सावधगिरी म्हणून मी आणून ठेवले आहे आणि लांबच्या सायकलींगच्या वेळी बरोबर ठेवतो..पण अजूनतरी पंक्चर काढायची वेळी आली नाहीये सुदैवाने त्यामुळे किती उपयोगी आहे हे सांगू शकत नाही. पण एक बरोबर असलेले कधीही चांगले...

२. हो सायकलमध्येही ट्युबलेस टायर्स असल्याने पंक्चर व्हायचे प्रमाण कमी होते असे वाचण्यात आले आहे. मी तरी अजून ट्युबलेस टायर्सवाली सायकल वापरलेली नाही.

३. नाही रोडबाईक्सना पण ट्युबलेस टायर्स असतात. हचिन्सन म्हणून एक कंपनी आहे. ती हे टायर्स बनवते. भारतात किती ठिकाणी उपलब्ध आहेत माहीती नाही.

प्रज्ञा९ - सायकल कशी चालवता यापेक्षा किती चालवता यावर चेनचा मेंटेनन्स अवलंबून आहे. अगदी नीट सायकल चालवल्याने तुमचे ब्रेकपॅड, चेन स्प्रॉकेट, डिल्युलर्स हे जास्त चालतील. पण मुख्य चेन अधून मधून स्वच्छ करावीच लागेल. वापर कमी असेल तर महिना दोन महिन्यातून एकदा केले तरी चालण्यासारखे आहे.

अनेक महिने पडून होती ती आधी मी धुवून मग वापरायला घेतली. आता नीट मस्त चालवता येते. गिअर्सही आता जमतात चढ-उतारात पटकन बदलायला. छानच

मग मलाही बाकीचं साहित्या घ्यावं लागेल का?
बाकीचं म्हणजे काय काय...हेल्मेट मी नक्कीच रेकमेंड करीन...बाकी सगळे ऑप्शनल आहे...तुमच्या हौसेवर अवलंबून

कारची हवा चेक करायचं गेज आहे. त्याचा सायकलला उपयोग होईल
तुमच्या सायकलचा वॉल्व साधा असेल होईल असे वाटते. पण जर तो प्रेस्टा असेल तर मग वेगळे विकत घ्यावे लागेल.

कारण जास्त ट्राफिकमध्ये गिअरवाली सायकलही साध्या सायकलच्याच वेगाने म्हणजेच लहान गिअरवर चालवावी लागेल. मग गिअरवाली सायकल घेवून फायदा काय?
तुमचा पुन्हा एकदा थोडा गोंधळ झालेला दिसतोय. गियरवाली सायकल ही वेगाने चालवण्यासाठी नाही तर आरामदायक चालवण्यासाठी आवश्यक आहे. माझा एक सल्ला आहे दोन दिवस साध्या सायकलने रहदारीतून चालवून पहा. आणि पुढचे चार दिवस गियरवाल्या. (चार दिवस अशासाठी की गियरचा अंदाज यायला वेळ लागेल.आणि तो न येताच सायकल चालवली तर गियरवाल्या सायकलबद्दल मत बदलू शकते.)

बाकी निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे. साध्या सायकलींचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्याचा मेंटेनन्स पण कमी असतो, स्वस्तही असतात. त्यामुळे गियरच्याच सायकली चालवल्या पाहीजेत असा काही अट्टाहास नाही. मी फक्त गियरच्या सायकलचे फायदे सांगितले आहेत. आणि ते अनुभवलेही आहेत.
माझ्याकडे सगळ्यात आधी बीएसए एसएलआर होती. ती साधारण आठ वर्षे चालवल्यानंतर अँटलासची एक घेतली. दोन्ही सायकली साध्याच होत्या आणि त्याने मी शाळा कॉलेज व्यवस्थित केले आहे. पण आता त्या कितीपत चालवल्या असत्या याबाबत शंका आहे.

कारण जास्त ट्राफिकमध्ये गिअरवाली सायकलही साध्या सायकलच्याच वेगाने म्हणजेच लहान गिअरवर चालवावी लागेल. मग गिअरवाली सायकल घेवून फायदा काय?

ए दगडफोड्या, मेनरोडच्या धुमाळ पॉईंटपासून रेडक्रॉसपर्यंतच्य चढाला आशु म्हणतो तशी चालवून बघ.. गियरवाली आरामदायी ठरते की नाही ते.... !! Happy

मी १-१, २- ४,५,६ अन ३ -६,७ ने चालवुन पाहीली. आता सुरु अन बंद १-१ वरच करायचा प्रयत्न करते. पण २ -४,५,६ हेच मला जास्त सोपं पडतं. अजुनतरी चेन कधीही साफ केली नाही पण एकदोनदा तेल मात्र टाकलंय. हल्लीच एकदा तेल दिलंय.

१-१ वर येण्याची गरज नाही. रादर सुरूवात किंवा शेवटही लोअर गिअर मध्येच करावा असे काही नाही. २-४, २-५ मधूनही तुम्ही सुरूवात करू शकता. ( मी आजवर कधीही १-१ गिअर मध्ये (चढ सोडून) आणली नाही. माझी सुरूवातही नेहमीच २-५ च्या आजूबाजूला असते. त्यामुळे सोपे पडत आहे असे वाटत असल्यास २-४ ते २-७ ही रेंज सध्या ठेवा. त्यातल्यात्यात लोअर गिअरवर (इथे २-३, २-४) चालवल्यावर RPM वाढते आणि त्याच्या भविष्यात जर रोज लांब आणि फास्ट जायचे असेल खूप उपयोग होतो.

१-१ वर येण्याची गरज नाही. रादर सुरूवात किंवा शेवटही लोअर गिअर मध्येच करावा असे काही नाही.

केदार अगदी १-१ नाही पण पहिल्या गियरमध्ये सुरु केल्याचा खरंच फरक पडतो...
काही दिवस करून पहा...

बघा परत हेम म्हणतो आहे की "सिंगल ड्राईव्हची म्हणजे विदाऊट गीयर कांय?"
अरे हेम, सायकल मध्ये सिंगल ड्राईव्ह म्हणजे कमीत कमी एकतरी गिअर असतो! :=)

मी नुकतीच मुलासाठी schnell ची सायकल घेतली , चागंली वाटते आहे.. कुणाला या सायकलचा अनुभव आहे का?
मी गेली महिनाभर हीच वापरतो, छान आहे.

विशेषतः सीटी रायडींगसाठी आणि पुण्यातले पावसाळ्यातील खड्डे पाहता हीच जास्त योग्य वाटते. योग्य टायर साईज आहेत.डीस्क ब्रेक मुळे कंट्रोल चांगला आहे, वेळोवेळी सर्विसींग करा एवढच.

वर दिलेल्या -सायकल चालवताना आणि देखभाल मध्ये एक बाब राहिली आहे ती अशी
सायकल चालवताना विशेषतः उतारावर आणि वळणावर कधीही मागे वळून पाहू नका. नुकताच लाँग सायकल राईडवर आलेला एक वाईट अनुभव आहे.

Namaskar,

Khup changli mahiti. Kahi diwasai purvi google search karat astana, battery operated cycles chi mahiti milali. 15/20 km aka charge made jau shakto aani padle suddha karta yete. Ya cycle cha wapar mukhya karun maze gavi (koknat) asel aani mi asha 2 cycle ghyaycha wichar kartoy. Ya cycle wishayi aaplyala kahi mahiti aahe ka?

Pages