आईविषयी बोलू काही...

Submitted by अनुराधा म्हापणकर on 12 May, 2013 - 07:37

माझ्यासकट सर्वांच्या "आई" ला समर्पित..
========================

असं म्हणतात, परमेश्वराला सगळीकडे पोहोचता येणार नाही म्हणून त्याने "आई" निर्माण केली. तुम्हांला मला प्रत्येकालाच "आई" आहे, ती म्हणून !

आणि ती तशीच आहे .. लहानपणी होती तशीच ! "हे खा- ते खा" म्हणत चिऊ-काऊचा घास घेऊन भुणभुण करणारी .. किती वाळलास.. म्हणत उगाच पापण्या ओलावणारी.. रात्री कितीही उशीर झाला तरी ताटकळत बसणारी.. साध्या नाक ओलावणा-या सर्दीसाठी कांद्याचा काढा करणारी .. तश्शीच वेडी आई !

आई ग, तू तिथेच राहिलीस.. तीस चाळीस वर्षांपूर्वी होतीस तशीच ! पण मी मात्र तुझा तो आधाराचा पदर सोडून कधीच मोठा होऊन गेलो. कधी तुझं बोट सोडलं आणि जगाच्या रॆटरेसमधे शिरलो ते कळलंच नाही..

आई कळलंच नाही गं कधी
तुझा तो मायेचा पदर सुटला
आई कळलंच नाही गं कधी
तुझ्याशी लाडिक संवाद तुटला

आई कळलंच नाही गं कधी
तुझं बोट सोडून मी धावलो
आई कळलंच नाही गं कधी
जगण्याला असा सरावलो

आई कळलंच नाही गं कधी
जगात कसा सुखावून गेलो
आई कळलंच नाही गं कधी
कितीदा तुला दुखावून गेलो

आई कळलंच नाही गं कधी
माझं मन जेव्हा मजा लुटत होतं
आई कळलंच नाही गं कधी
तुझं मन माझ्यासाठी तुटत होतं

आई कळलंच नाही गं कधी
माझ्या आजारपणात तू रडली असशील
आई कळलंच नाही गं कधी
कधीतरी तूही आजारी पडली असशील

आई कळलंच नाही गं कधी
कसा विसर तुझा पडला
आई तुझ्यासाठी सांग ना गं
माझा घास का नाही अडला

आई तू समोर असतानाही
का गं तुला विसरुन गेलो
बेगडी या जगाचा
कुठला धागा धरुन गेलो..

पण आई कालच
ठेच जेव्हा होती लागली होती
तेव्हा "आई गं" म्हणत
तुझी आठवण मनी जागली होती

आई घे ना गं.. तुझ्या कुशीत..
तुझ्यावर प्रेम मी करतो गं
तुझ्या मायेसाठी अजूनही
मोठा झालोय तरी झुरतो ग

अनुराधा म्हापणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई कळलच नाही गं कधी ......
खरय ते ! पण ही जी अतीशय सामर्थ्यवान ओळ तुम्ही लिहीलीत ती सारखी सारखी वापरल्याने पालुपदासारखी वाटते आहे(खालील काही कडवी वगळता)
मग कविता चारोळ्यांचा एक संच अश्या स्वरूपात दिसू लागतेय
ती ओळ गाळून २-२ ओळींच्या द्विपद्या केल्यात तर परिणामकारकता कैक पटीने वाढेल असे वाटून गेले

फक्त एक मत शेअर करीत आहे बाकी काही नाही गैरसमज नसावा Happy

कविता याही स्वरूपात चिक्कारच आवडलेली आहेच !!!!

वैभव व. कु. ला अनुमोदन. अप्रतीम अर्थ .. भावुक. पण पुन्हा पुन्हा ती एकच ओळ येत राहिल्याने जरास्सा रसभंग होतोय... आई साठीची कविता म्हणजे शब्दांचा असा गहिवर येणारच. आभारी तुमच्या भावनेत आम्हाला सामिल करुन घेतल्याबद्दल.... अगदी वास्तव कविता Sad

अनुराधा,
कविता खूप- खूपच छान आहे, अगं आपण जितकं आई-आई करावं तितकं थोडं आहे, मला तरी ते ईतक्या वेळेस "आई कळलंच नाही गं कधी", असं वाचुन काहिही वेगळं वाटलं नाही . . . .उलटं वाचतांना अगदी खरंच आईशी बोलतो आहे असं वाटतं . . . .
आत्ता ह्यापेक्षा जास्त उचित शब्द मिळत नाहियेत, पण ही कविता उत्कृष्ट आहेच.

ईथे काही कवितेच्या स्पर्धेत नाही बसायचं ना ? मग लिही, आणखीन मनाला येईल तसं लिही, मलातरे हेच वाटतं.

Back to top