"डोन्ट टच मी"
९३ वर्षांचे भाई, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, अंगात असेल नसेल ती ताकद एकवटून त्या गृहस्थाला ओरडून म्हणाले.
काही माणसे नुसती पाहिली तरी संताप येतो. असे वाटते की हा माणूस खोटा वागणारा, लबाड, संधिसाधू आणि कामावर पाट्या टाकणारा असणार. कोणत्या जातकुळीचे मन घेऊन मी जगतो हे कळत नाही. विमा एजंट, ज्यांचा सार्या मानवजातीला राग येतो, त्यांचे चेहरे पाहून मला कणव येते. असे वाटते की कसे काय घर चालेल याचे आपण विमा उतरवला नाही तर. भिकारी, दारावर येणारे सेल्समन, सिग्नलला भिरभिरे वगैरे विकणारी मुले असे काहीजण पाहून असे वाटते की देवाने आपल्याला इतके दिले आहे तर थोडेसे त्याला दिले तर त्याचे काम तरी होईल. मग भले आपल्याकडे हट्टाने भिरभिरे मागणारे कोणी नसो, पण भिरभिरे विकणारा ते आपल्याला विकू इच्छितो म्हणजे कोणाचीतरी काहीतरी गरज आपण पुरवू शकतोच की? आणि कळस म्हणजे गेली पंचवीस वर्षे ज्या काही कंपन्यांमधून मी काम केले त्यांच्या उत्पादनाचे फायदे संभाव्य ग्राहकाच्या गळी उतरवणे यात मी स्वतःही वाकबगार झालो. तरीही विक्रेत्याची कायम कीवच वाटत आली.
जगात प्रत्येक क्षणी प्रत्येक माणूस सगळ्या जगाला काहीतरी विकतच असतो. निदान स्वतःला तरी विकत असतोच.
त्या माणसाला पाहिल्यावर मला संताप आला. पाच दोन च्या आसपास उंची, गबाळा वेष, चौकस डोळे, बुटका पण स्थूल देह, भिरभिरणारी नजर, उगाचच दात दाखवणारे हसणे, जरूरीपेक्षा अधिक जवळीक साधून 'माझ्यावर विश्वास ठेवाच' असा आग्रही खाक्या दाखवणे हे सगळे त्याच्यात एकवटलेले होते. मावशी आणि भाई ८ एप्रिलला कॅनडाला परतणार होते. ते तिकडचेच नागरीक आहेत. गेली सहा दशके ते दरवर्षी भारतात येतात आणि परत जातात. मात्र यावेळची ट्रीप वेगळी ठरली. मावशीला मल्टिपल मायेलोमाची सिंप्टम्स! झाला नाही तो रोग तिला, पण सगळी लक्षणे तश्शीच. तिचे वय चौर्यांऐंशी. भाई ९३ वर्षांचे. ते स्वतः डॉक्टर होते. पण प्रॅक्टिस सोडूनही पन्नासहून अधिक वर्षे लोटलेली. आता त्यांना म्हणे टीबीची लक्षणे दिसत होती. २८ मार्चच्या आसपास दीनानाथला अॅडमीट झालेले भाई ८ एप्रिलला कॅनडाला सहीसलामत परतू शकणे असंभव ठरले. तिकडे कोणीतरी व्हिसा वाढवून घेतला मेडिकल ग्राऊंड्सवर. मावशीला अधूनमधून अॅडमीट व्हावेच लागत होते. त्यातच भाईंच्या जीवावर बेतले. एकदा तर अशी वेळ आली की दोघेही दीनानाथला अॅडमीट झालेले होते पण भाईंना कळू दिले नाही की मावशी आजारी आहे म्हणून तिथे आहे. त्यांना वाटले ती त्यांना बघायला म्हणून घरून आलेली आहे. डॉक्टरांनी सांगितले जूनपर्यंत कॅनडाला जाणे 'विसरा'. अगदी याच भाषेत सांगितले. मी आपला रोज सकाळी एक चक्कर हॉस्पीटलमध्ये मारून येतो. काँप्लिकेशन्स होत आहेत, रोज चढउतार होत आहेत. परवा तर अशी वेळ आली की ते काही टिकतील असे वाटेना. त्यातच झोपल्या झोपल्याच फ्रॅक्चर झाले मांडीचे हाड. बघवत नाहीत हाल. मावशी रोज दिवस तिथे काढते आणि रात्री घरी जाऊन डोळे पुसत बसते. महिना झाला माणूस बेडरिडन आहे. रोज कालच्याहून अधिक अशक्त होत आहे. यावेळची ट्रीप म्हणूनच वेगळी ठरली. कारण.... यदाकदाचित ते बरे होऊन कॅनडाला परतू शकलेच... तर आम्हा नातेवाईकांना ते पुणे विमानतळावर दिसतील ते शेवटचे दिसतील. कित्येक दशकांची नाती एका क्षणात डोळ्यासमोर दुरावतील... कायमची. तो क्षण येऊच नये असे वाटते मनात. पण त्या दोघांनाही तिकडेच जायची ओढ आहे कारण काही झाले तरी तिकडची सगळी सवय आहे, तेथील शासन त्यांची व्यवस्थित काळजी घेईल, सगळे पैसेही मिळतील. जेथे आयुष्याची सोनेरी अशी सहा सात दशके घालवली तेथेच आयुष्याचा शेवट व्हावा असे वाटणे साहजिक आहे.
तर अश्या भाईंजवळ रोज कोण आणि किती तास बसून राहणार? बरं पैशाला काही कमी नाही. भरपूर पैसा आहे. मग सगळ्यांचे मिळून ठरले. एक माणूस चोवीस तास ठेवायचा आणि बाकीच्यांनी जमेल तेव्हा जमेल तसे येऊन बसायचे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या रूम नंबर ७०३ या डॉ. अश्विन वैद्य या पेशंटसाठी असलेल्या कक्षात 'राजू तडकासे'चा प्रवेश अशा रीतीने झाला. तो त्या दिवशी जो आला, तो अजूनही तिथेच आहे. तिथेच राहतो. तिथेच जेवतो खातो.
पहिले दोन दिवस मला चांगले आठवतात. भाई नुकतेच अॅडमीट झालेले. निदान होत नव्हते. डॉक्टर विविध टेस्ट्स करत होते. नातेवाईकांची रीघ लागलेली होती. तडकासे एका कोपर्यात मूकपणे बसून होता. भाईंना काही हवे असले असे समजले की ताडकन उठून पहिल्यांदा ते काम करायचा. विश्वास संपादन करण्यासाठी झटत होता. नातेवाईक इतक्या संख्येने असू शकतात हे त्याला माहीतच नसावे जणू. प्रत्येकाच्या तोंडाकडे बघत बसायचा. बोलणे समजून घ्यायचा प्रयत्न करत राहायचा. भाईंना हा माणूस आपल्यासाठी आहे हे समजलेले होते. बहुधा त्यांनाही तो परका असल्यामुळे नकोसा वाटला असावा. त्यामुळेच दुसर्याच दिवशी ते भडकून त्याला म्हणाले होते "डोन्ट टच मी". तडकासे घाबरून मागे सरकला होता. मग सगळ्यांनी भाईंना समजावून सांगितले. 'हे तुमच्याचसाठी इथे आहेत, तुमची मदत करणार आहेत'. परावलंबी भाईंना ती तडजोड स्वीकारावी लागली. तडकासेचे पहिले पाऊल पडले त्या विश्वात. वेळच्यावेळी औषधे देणे, काही लागल्यास सिस्टरना बोलावून आणणे अशी कामे तो करू लागला. लोक येऊन बसले तरी हलायचा नाही. त्याने हळूहळू एका पांढर्या खुर्चीवर वहिवाटीचा हक्क प्रस्थापित केला. ती खुर्ची त्याने भाईंच्या जवळ प्रतिस्थापना केल्यासारखी ठेवली आणि त्यावर स्वतःचा एक टॉवेल आणि एक पिशवी ठेवली. आता त्याचे ते सामान असलेली खुर्ची कोणीही वापरेना. तो तेथे बिनदिक्कत बसून राहू लागला. केव्हाही बघावे, तडकासेच्या डोळ्यावर झोपेचे चिन्हही नाही. वेगवेगळ्या वेळेला मी जाऊन पाहिले. त्याची एनर्जी लेव्हल समानच असायची. हळूहळू तडकासेला 'पेशंटला काय झाले आहे' हे समजायला लागले. आज एक्स रे आहे, उद्या स्कॅन आहे, परवा सोनोग्राफी आहे असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. मोठमोठे रिपोर्ट्स खालच्या मजल्यावरून सातव्या मजल्यावर आणण्याचे काम तो करू लागला. त्याला त्याचेच महत्व वाटू लागले. बसलेल्या माणसांना तो सांगू लागला. "मगाशीच मी सिटीस्कॅनचा रिपोर्ट आणला आहे'. बरं त्याला कशाला दुखवायचे असा विचार करून माणसेही, होका, होना, वगैरे रिस्पॉन्स देऊ लागली. तडकासेने आता भाईंच्या शरीराचा ताबा मिळवला होता. त्यांचे सारे काही करण्यात तो वाकबगार होऊ लागला. चार दिवसात त्याने हॉस्पीटलचे रुक्ष वातावरण, नीरस रंगाच्या भिंती, आशा नसलेला रुग्ण, नातेवाईकांचा ओघ आणि काही मेडिकल टर्म्स या सर्वाशी स्वतःला जुळवून घेतले. तडकासेचे तिथे असणे हे आता रोषास पात्र न ठरता पगारास पात्र ठरू लागले. त्याला दररोजचे पैसे दिले जात असावेत.
तडकासेने एका आठवड्यात चाचपत चाचपत वावरण्यापासून ते अधिकाराने खोलीत व बाथरूममध्ये वावरणे ही पातळी गाठली. तोवर तडकासेला भाई आणि नातेवाईकांचे पाणी जोखता आलेले होते. नातेवाईकांमधील गॉसिप समजलेले होते. कोणाला कशाची काळजी आहे हे लक्षात आलेले होते. कोणाला कोनाचा राग येतो हे कळू लागले होते. आपला फायदा नक्की कोणाकडून हे समजलेले होते. आता तडकासेचे त्या लहानश्या विश्वात दुसरे पाऊल पडले.
त्या दिवशी तडकासेने दुसरे पाऊल टाकले. मावशी घरून तेथे बसायला आली तेव्हा तो तिला म्हणाला. "ते हे हे आले होते, म्हणाले काय हाल चाललेत या माणसाचे, सुटलेला बरा". मावशीने "हो?" म्हणून नवलाने विचारले. त्यावर तडकासेची कळी खुलली. आपण काहीतरी महत्वाचे सांगितल्याचा अभिमान त्याच्या देहबोलीत प्रवेशला. मावशीने असे बोलणार्या माणसाच्या नावाने चार शिव्या पुटपुटलेल्या त्याने पाहिल्या. खरे तर तो जो कोण माणूस होता तोही खरेच बोलत होता. इतके हाल सहन करण्यापेक्षा या वयात सुटका झालेली बरी असेच कोणालाही वाटले असते. पण मुळातच ज्याच्याबद्दल राग असतो त्याने असे काही वक्तव्य केले की अधिक राग येतो इतकेच. मावशीला बातम्या पुरवणे हे तडकासेचे दुसरे पाऊल होते. या पातळीपर्यंत भाईंनी तडकासेला असहाय्यपणे आपल्या विश्वात मान्यता दिलेली होती. तासनतास हा एकच चेहरा आपल्याला या खोलीत दिसू शकतो व दिसत राहणार आहे ही परिस्थिती भाईंनी एकदाची स्वीकारलेली दिसत होती. भाई अधिकच खंगत चाललेले होते.
आता आठवड्याभरात न येऊ शकलेले असे परगावचे काही नातेवाईक येऊन ठेपू लागले. त्यातच भाईंनी अन्न सोडले. छातीत श्वास घेताना दुखू लागले. तडकासेने आत्तापर्यंत तिसरे पाऊल टाकलेले होते. मावशी, मामा असा स्टाफ परिचयाचा झाला होता त्याचा. पदरचा पैसा खर्च न करता बसल्या जागी चहा मिळू लागला होता. पेपर वगैरे येत होता. एक दिवस मी नेहमीप्रमाणे सकाळी गेलो तर टीव्ही लावलेला, त्यावर इंग्लिश भाषेतील न्यूज चॅनेल सुरू, भाई झोपलेले, तडकासे खुर्चीवर बसून दुसर्या पलंगावर पाय पसरून पुण्यनगरी हा पेपर वाचत चहा पीत आहे. मला त्या दृष्यात तसे काही वावगे वाटले नाही. माणूस करणार तरी काय चोवीस तास एकाच ठिकाणी? मला पाहून तो उठला आणि काहीश्या अदबीने एका बाजूला उभा राहिला. ही असली अदब देणारी माणसे जगात असल्यामुळे आपला इगो उगाचच फुलतो असे मला त्या क्षणी वाटल्याचे मला आत्ताही आठवले. वास्तविक तडकासे जे भाईंसाठी, भले पैसे मिळवण्यासाठी का होईना, करत होता ते पाहून मीच अदब दाखवायला पाहिजे होती. पण आम्ही मोठे ना? भाई कसे आहेत या प्रश्नावर तडकासेची कळी खुलायची. तोंडभर हासत तो सांगायचा. हे बघा एवढी पेज घेतली मगाशी. काल रात्रीसुद्धा अर्धा कप कॉफी आणि थोडी इडली खाल्ली. आता खाऊ लागले आहेत. म्हणत होते की सोडणार कधी? मी सांगितले त्यांना, अजून एखादा आठवडा राहावे लागेल. कालच डॉक्टर म्हणाले तसे!
तडकासे रुम नंबर ७०३ चा अविभाज्य भाग झाला. माहितीचा स्त्रोत झाला. हरकाम्या झाला. तसे मग त्याच्या स्वभावातील गुणदोष उफाळून येऊ लागले. चिडणार्या भाईंचे चिडणे पाहून तो हसू लागला. प्रथम एकटाच असताना हसत असावा. हळूहळू नातेवाईकांसमोरच हसू लागला. त्याचे ते पेशंटच्या अवस्थेवर हासणे क्रूर वाटून त्याला एकदोनदा झापही पडली. पण त्याचे काम लखलखीत आणि प्रामाणिक होते. माणूस चिकटून राहिला होता. कंटाळलेला नव्हता. दुपारी हॉस्पीटलच्या कँटीनला जेवायला जायचा आणि पंधरा मिनिटांत वर यायचा. प्रत्येकवेळी मावशी त्याला विचारायची, जेवायला पैसे आहेत का? तेथेच चोवीस तास काढणारा तडकासे मानेनेच नाही म्हणायचा. त्याचे ते नाही म्हणणे युगानुयुगे उपासमार सोसलेल्या माणसासारखे भासायचे. तो एकच क्षण तो हसायचा नाही. मावशी शंभर रुपये रोज देऊ लागली. तडकासेचा तिथे असण्याचा चार्ज वेगळाच, वर हे शंभर रुपये रोजचे! ते शंभर रुपये घेताना तडकासेचा चेहरा 'बरे झाले बाबा थोडे पैसे मिळाले आपल्याला' असा व्हायचा. वाईट वाटायचे. त्याच्या त्या तिथल्या टिच्चून राहण्याचे आणि गरीब होऊन पैसे हातात घेऊन खिशात ठेवण्याचे मला ज्यादिवशी पहिल्यांदा वाईट वाटले तेव्हा मी पहिल्यांदा त्याचे नाव विचारले. गंमत म्हणजे, केळकर ही कथा मी लिहिली होती त्यातील केळकरला मी दिलेले 'राजशेखर' हे नांव चक्क खोटे होते, काल्पनिक होते. मला ते कुठून सुचले होते माहीत नाही. पण तडकासेचे निरिक्षण करताना मला व्यक्तीचित्रण लिहिण्याइतके पोटेन्शिअल त्याच्यात जाणवले. आणि अशीच जाणीव आपल्याला केळकरचे निरिक्षण करतानाही झाली होती हे आठवले. केळकरला आपण 'राजशेखर' हे नांव दिल्याचे आठवत असतानाच्याच क्षणाला नेमके मी तडकासेला त्याचे नांव विचारले. आणि अक्षरशः तडकासेने त्याचे नांव 'राजशेखर' असे सांगितले. मला इतके जोरात हसू आले की ते आवरून मी ते नांव आवडल्याचा अभिनय यशस्वी करताना कितपत यशस्वी ठरलो हेच समजत नाही. अगदी तेच नांव या पात्राचे निघावे? हा कुठला योगायोग? केळकरही खरा आहे, पण त्याचे नांव राजशेखर नाही. तडकासेचे नांव मात्र खरोखर राजशेखर आहे. माझ्या हासण्याचा काहीतरी विचित्रच परिणाम झाला असावा. आपल्यासारख्या माणसाचे नांव इतके भारदस्त नसावे अशी जाणीव बहुधा तडकासेला झाली की काय कोणास ठाऊक? त्याने लगेच सुधारणा केली अन म्हणाला... "राजू... राजू तडकासे"! वाईट वाटले मला! आपल्या स्वतःच्या मनातील काही अत्यंत वेगळ्याच कारणास्तव आलेल्या हसण्यामुळे कुणाचा असा काही गैरसमज होणे आणि त्याने उगीचच स्वतःची पातळी स्वतःच खालावून दाखवणे यासारखे नियतीचे क्रौर्य नसेल. त्यादिवशी, त्याक्षणी, तडकासे माझ्या मनाचाही एक अविभाज्य भाग बनला. जितका सहज तो रूम नंबर ७०३ मध्ये मिसळून गेला तितकाच सहज तो माझ्या मनातही मिसळून गेला.
एक आपला व्यायाम म्हणून मी सात मजले चढून जात होतो रोज. एक दिवस त्याचा कंटाळा आला म्हणून लिफ्टकडे वळलो. ऑड नंबर्सची लिफ्ट बंद पडली होती. ईव्हन नंबर्सची चालू होती पण नुकतीच वर निघाली होती. शेजारील 'फक्त रुग्णांसाठी' असलेली तिसरी लिफ्ट खाली येऊन थांबली आणि त्यातून एका व्हील चेअरवरून एका रुग्णाला बाहेर आणण्यात आले. मागून सुळ्ळकन तडकासेही बाहेर आला. त्याच्या चेहर्यावर दिग्विजयाचा आनंद ओसंडत होता. या लिफ्टमध्ये मला माझ्या जनसंपर्कामुळे प्रवेश मिळाला असा काहीसा तो आनंद असावा. मला राग आला तडकासेचा. खाली यायला लिफ्ट कशाला हवी? पण मग विचार आला की सात मजले कोण उतरत बसणार? आपण एक गाढव आहोत. मीही त्या लिफ्टमध्ये घुसलो आणि लिफ्टमन मला म्हणाला. ही लिफ्ट तुमच्यासाठी नाही. माझा वाद झाला. माझा मुद्दा हा होता की तडकासे हा इसम जर यातून खाली येऊ शकतो तर तसेही वर चाललेलीच आहे त्या लिफ्टमध्ये मी का असू शकत नाही. हटून बसलो. 'ह्यांना का खाली आणलंत या लिफ्टमधून ते आधी सांगा, तोवर मी पाय बाहेर टाकणार नाही' असे म्हणू लागलो. प्रतिष्ठेचा प्रश्न करणे माझ्यासाठी किती सोपे होते. तडकासे गंभीर झाला होता. टुकूटुकू बघत राहिला लिफ्टमनकडे. शेवटी लिफ्टमन म्हणाला की अहो मला वाटले हे पेशंटबरोबरचे आहेत म्हणून मी यांना घेतले. मग मलाही जाणवले की आपण आत्ता का वाद घालावा? निव्वळ मी तडकासेपेक्षा कोणीतरी अधिक आहे हे जाणवून देण्यासाठी? बाहेर पडलो लिफ्टच्या. तडकासेला विचारले. "काय हो? खाली कुठे आलात?". तडकासे तोंडभरू हासत, खरे तर खदखदून हासत म्हणाला "फोन करायला घरी". म्हंटलं "का?" तर हासत हासत म्हणाला "बाबा मिरचीची भजी मागतायत". तो भाईंना बाबा म्हणतो. मला भाई ही व्यक्ती पूर्णपणे माहीत आहे. मिरचीच्या भज्यांचे ताट ठेवले तर एकटे संपवतील असे त्या या वयातही आहेत. मघई पान डझनावारी खातील. काहीही करू शकतात ते. मला त्यात अजिबात नवल वाटत नव्हते. तडकासेसाठी ही एक अद्भुत अनुभुती होती. त्याच्यामते त्याने केलेल्या रुग्णसेवेचा परिणाम रुग्णाने रुग्णालयात मिरचीची भजी घरून मागवण्याइतका झालेला होता. मी त्याचा तो आनंद तसाच ठेवून त्याला म्हणालो "थांबा मी कळवतो मावशीला"! मी मावशीला माझ्या फोनवरून हे कळवणार होतो की भाई भजी मागत आहेत पण ती त्यांना नको द्यायला, उगाच खोकला येईल. म्हणून मावशीला फोन लावला आणि सांगितले की अगं ते भजी मागतायत. तर ती म्हणाली हो तयार झालेली आहेत, येऊन घेऊन जातोस का? मी थिजलेलो होतो. ऐकावे ते नवलच! मी तडकासेला म्हणालो, "माझ्याबरोबर चला, भज्यांचा डबा घ्या, मी तुम्हाला येथे आणून सोडतो आणि खालच्याखाली जातो". आज भाईंना बघितले नाही तरी चालेल हा कौल माझ्या मनाने दिला कारण ज्या माणसाची तब्येत बघायची तो जर मिरचीची भजी खात असेल तर आपणच वेडे नाही का? तडकासे बरं म्हणाला. त्याच्या चेहर्यावर दोन तीन वेगवेगळे आनंद पसरलेले होते. एक म्हणजे त्याचे असे दोन रुपये वाचले, जे फोन करण्यासाठी त्याने वापरले तर असते, पण मावशीकडे 'क्लेम' करू शकला असता की नाही हे त्यालाच माहीत नव्हते कारण ती तर त्याला रोजच्या जेवणाचेच शंभर वेगळे देत होती. दुसरा आनंद म्हणजे दीनानाथ मंगेशकरच्या बाहेरचे जग अनेक दिवसांनी थोड्यावेळासाठी तरी दिसणार याचा! तिसरे म्हणजे पेशंट आता भजी खाऊ लागला हे पाहून काहीजण आपल्यावर नक्कीच स्तुतीसुमने उधळणार याचा वगैरे! त्याला त्याच मनस्थितीत ठेवून मी जवळच असलेल्या मावशीच्या घरी पोचलो तर तडकासेने मला विचारले. "इथे राहतात बाबा?". मी उडालोच. या प्राण्याला यांचे घरही अजून माहीत नाही? मग हा अवतरला कुठून?
तर असा हा तडकासे आहे.
त्या दिवसापासून तडकासेने बरेच पुढचे पाऊल उचलले त्या विश्वातले. अधिकारवाणीने तो आता डॉक्टर, नर्स, मावशी व इतर नातेवाईक यांच्याशी बोलू लागला. त्याच्या वर्तनात किंचितच प्रमाणात 'भाई इथे आहेत म्हनून मी इथे नसून' 'मी इथे आहेत म्हणून भाई इथे आहेत' अशी झाक दिसू लागली. ती झाक मला आवडली याचा अर्थ तडकासेने माझे मन जिंकलेले असावे.
दुसर्याच दिवशी विचित्र प्रकार घडला. मी सकाळी नेहमीप्रमाणे भाईंना भेटायला गेलो तर ते म्हणाले 'उजवी मांडी भयंकर दुखते आहे'. मी आमच्या नात्यातील एका डॉक्टरांना फोनवरून कळवले तर ते म्हणाले की भाई अनेक दिवस पडून असल्यामुळे त्यांच्या पायात कदाचित ब्लड क्लॉट झालेला असेल. माझी पाचावर धारण बसली. नुकताच मी एका मोठ्या ब्लड क्लॉटला औषधांच्या मदतीने विरघळवण्यात कसाबसा यशस्वी ठरलेलो असल्याने वेदनेची परमावधी म्हणजे काय ते मला जवळून माहीत होते. भाईंचे पाऊल, गुडघा काहीही जरी नुसते हालवले तरी त्या अती कृश देहातून किंकाळ्या येत होत्या. डोळ्यात पाणी आले माझ्या. मावशीला फोन करून आणि काही किरकोळ व्यवस्था लावून मी कामासाठी बाहेर पडलो. दुपारी समजले की पडल्या पडल्याच भाईंच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झालेले होते. क्लॉट नव्हता. हायसेही वाटले आणि वेगळी काळजीही वाटली. आता हा माणूस विमानात तरी बसेल की नाही असे वाटू लागले. दुसर्या दिवशी भांईचे ऑपरेशन झाले आणि लोखंडाच्या सहाय्याने फ्रॅक्चर जुळवण्यात आले. मी तब्बल दोन दिवसांनी तेथे जाऊ शकलो तर अनेक नातेवाईकांमध्ये तडकासे हासून हासून बोलत होता. मला कळेना काय झाले आहे? मी विचारले आता पाय कसा आहे? तर म्हणाला "हे काय, हा बघा कितीही हालवला तरी दुखत नाही". असे म्हणताना तडकासेने भाईंचा पाय पूर्ण उचलला होता, तोही जोरात. भाई निवांत होते. मग त्याने पाऊल वळवून दाखवले, गुडघ्यात पाय वाकवून दाखवला. तो लावत असलेली ताकद पाहून मीच हादरत होतो पण भाई शांत होते. नंतर नर्स आली अन म्हणाली की पेशंटला स्टीम द्यायची आहे. म्हणून नाकावर बसवू लागली तर भाईंनि चिडून तिचा हात झिडकारला. तडकासे हसू लागला. तडकासेच्या मते भाई हा आता एक 'स्पेसिमेन' झालेला होता. ज्यावर विविध प्रकारचे प्रयोग करण्यात तडकासे धन्यता मानत होता. नर्स गेल्यावर त्याने तो मास्क बसवून पाहिला. भाई त्याच्यावर ओरडले.
"डोन्ट टच मी"
पण त्याने काहीतरी आविर्भाव करून भाईंना मनवले आणि भाईंनाही विश्वास वाटला. तडकासेने आणखी एक लहानसा विजय मिळवला. 'ते माझ्याच हातून मास्क बसवून घेणार' हे विधान त्याने प्रत्यक्षात आणून दाखवले सगळ्या नातेवाईकांना! आता तडकासे असेल तर भाई बरे होतील अशी एक भावना उगीचच निर्माण झाली.
त्या दिवशी जो येईल त्याला तडकासे विनोद सांगितल्याच्या आविर्भावात सांगत होता. "मी मास्क बसवायला गेलो तर मला कसे म्हणतात, डोन्ट टच मी"! असे म्हणताना तो स्वतःवरच खुष होऊन भरभरून हासत होता. डोन्ट टच मी हे तीन शब्द उच्चारताना स्वतःचा उजवा हात कोपरातून वळवून एक बोट अधिकारवाणीने ऐकणार्याच्या तोंडाकडे दाखवत बोलत होता. त्याला त्या तीन इंग्लिश शब्दांचा अर्थ बहुधा समजलेला असावा. त्याचाही एक विलक्षण आनंद त्याच्या चेहर्यावर विलसत होता. नंतर तर मी बाहेर पडताना एका मामाला एका नर्सशी बोलताना पाहिले त्यात तो मामाही तिला थट्टेने म्हणत होता "डोन्ट टच मी"! बहुधा, ते 'डोन्ट टच मी' हे भाईंचे वाक्य त्या सकाळी त्या मजल्यावर सुपरहिट्ट ठरलेले असावे. ज्याच्यात्याच्या तोंडी तेच वाक्य दिसत होते. चेहरे उजळलेले होते त्या वाक्याचा उच्चार करताना.
परवा सकाळी मी गेलो होतो तर माझ्यासमोर पेशंटसाठी आलेला चहा तडकासेने हळूच एका कोपर्यात ठेवून दिला. माझ्या लक्षात आले की भाई हा चहा घेत नसणार आणि ह्यावेळचा हा चहा रोज तडकासेला तरतरी देऊन जात असणार, पण आज नेमका मी आत्ताच आल्याने त्याला भ्या वाटलेले असणार की ह्याच्यासमोर आपण कसा प्यायचा चहा! मग मीच म्हणालो, "अहो चहा आलाय ना? घ्या ना तुम्ही?"! मग लाजरे हासत हळूच चहाचा कप उचलून एका कोपर्यात उभा राहून त्याने तो चहा दोन घोटांत संपवला आणि पुन्हा समाधी लावल्यासारखा भाईंच्या शेजारी बसला.
आता भाई म्हणतात की मला मी आहे तसा घरी न्या. आम्ही सगळे त्यांना समजावून सांगतो की तुम्ही थोडेसे चालायला लागलात की नेणारच आहोत. बिचारे भाई! महिनाभर पडून आहेत. त्यातच आता त्यांच्या पोटात घातलेल्या थेट ट्यूबमधून त्यांना अन्न देण्यात येत आहे. या वयात कसले हे भोग? पण तडकासे औरच असामी! तो भाईंना म्हणतो, "घरी जायचंय ना? हे एवढं औषध घ्या". "घरी जायचंय ना? हे एवढं खाऊन घ्या"! तडकासे भाईंच्या मागणीवरून त्यांच्याच भल्यासाठी त्यांनाच ब्लॅकमेल करू शकतो. हे ट्रेनिंग कोणत्याही अटेंडंटला कोणत्याही कोर्समध्ये दिले जात नसेल. तडकासेने हे ट्रेनिंग त्याच्या स्वतःच्या जडणघडणीतून प्राप्त केलेले आहे. आठव्या मजल्यावरच्या रिहॅब सेंटरमध्ये रोज नेतो तो भाईंना! व्यायाम करून घेतो आणि पुन्हा खालच्या मजल्यावर आणतो. परवा माझ्या मामाला म्हणाला "यायचंत्य का बाबांचा व्यायाम बघायला?". कंटाळलेला मामाही निघाला रिहॅब सेंटरमध्ये. तडकासेला तोही एक विजय वाटला. आपण रोज पार पाडत असलेली भरीव कामगिरी कोणीतरी अॅकनॉलेज करत आहे याचा विजय! पण त्यात चूक काय आहे? चोवीस तास सव्वा महिना एका मरणासन्न अवस्थेतील जख्खड वृद्ध रुग्णासाठी एका खोलीत बसून राहणे कोणाला जमले असते? तडकासे त्या खोलीतील फर्निचरप्रमाणेच एक इंटिग्रल बाब असल्यासारखा तेथे टिच्चून बसलेला आहे.
दोन चार दिवसापासून तडकासे आहे तसा रंगवायचे मनात येत होते. तडकासे रंगवण्यासाठी काल्पनिकतेचा आधार घ्यायची गरजच नाही असे व्यक्तीमत्व आहे ते! आहे तसा रंगवला तरी डचमळवेल साला मनाला.
कोण असेल त्याच्या घरी? कुटुंबात? भाईंना भेटायला सव्वा महिन्यात सतराशे साठ नातेवाईक, डॉक्टर्स आणि स्टाफ येऊन गेला. तडकासेला एक साधा फोनही नाही आला कोणाचा. आता भाईंना लवकरच सोडणार आहेत म्हणे घरी. कारण रुग्णालयात करण्यासारखे उपचार आता राहिलेले नाहीत. ते घरीही बर्यापैकी बरे होऊ शकतील अश्या अवस्थेत आलेले आहेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तडकासेला अर्थातच घरीही ठेवणार आहेत म्हणे!
मग तडकासेला एक नवेच विश्व अनुभवायला मिळेल. तिथे स्थिरस्थावर होऊन त्याही विश्वात तो लहान लहान विजयांची मालिका सादर करून दाखवेल. स्वतःवरच खुष होऊन हासत राहील. त्याने भाईंचा पाय जोरात उचलला तेव्हा मी त्याच्यावर ओरडलो होतो की हळू करा जरा म्हणून. आता वाटते की कदाचित तडकासेचीच शक्ती त्या पायात स्पर्शाद्वारे गेल्याने भाईंना पायात वेदना जाणवलेल्या नसाव्यात.
मग एक दिवस येईल जेव्हा भाई कदाचित चालू लागतील. मग २१ जुलै २०१३ ची लुफ्तान्सा फ्लाईट चुकवावी लागणार नाही. मग विमानतळावर आम्ही सगळे शेवटचे एकमेकांच्या गळ्यात पडून रडू! तेव्हाही तडकासे तिथे असेल. तेव्हाही हासतच असेल. तेव्हा तर त्याला भरपूर बक्षिसीही मिळेल. ती बक्षिसीही 'बरे झाले बुवा थोडे पैसे मिळाले आपल्याला' असा दीनवाणा भाव धारण करून तो स्वीकारेल. ताई मावशी आणि भाईंचे विमान उड्डाण करेल. आम्ही घरी परतू. कदाचित कोणीतरी तडकासेला आपल्याबरोबर नेऊन वाटेत ड्रॉप करेल किंवा रिक्षेचे पैसे देईल.
पण माझ्या मनाला सतत चिकटणारा तडकासे मला नकोनकोसा होऊ लागेल. भरल्या डोळ्यांनी कित्येक दिवस मी मनातच तडकासेवर ओरडत राहीन...
"तडकासे... डोन्ट टच मी"
===================
-'बेफिकीर'!
चि बालके बेफिकीर, असं लिखाण
चि बालके बेफिकीर, असं लिखाण तुझ्या बोटणीतून उतरल्याबद्दल विधात्याचे आभार मान बाळा. तुझी एक शैली आता छानपैकी बनली आहे. ही कथा अतिशय सुंदर व्यक्तीचित्र उभं करतेय. अभिनंदन !!!
व्यक्तीचित्रण जमणं कठीण असतं
व्यक्तीचित्रण जमणं कठीण असतं
छान!
खूप सुंदर जमलंय हे
खूप सुंदर जमलंय हे व्यक्तिचित्र.
असे तडकासे अटेंडंट नेहमी पहात असल्याने एकदम कोरिलेट होता आलं.
मुले सांभाळायला ठेवलेल्य बायकांचे भावविश्वही असेच हळूहळू बदलते.
सुरूवातीस अगदी लाजून प्रत्येक गोष्ट विचारून करणार्या बायका नंतर नंतर तुम्ही काय बाळ जन्माला घालायचे काम केलेत नुसते,बाळ एवढे मोठे झालेय ते माझ्यामुळेच एवढी प्रगती एखाद्या महिन्यात करतात.
छान व्यक्तीचित्रण. सुरूवातीस
छान व्यक्तीचित्रण.
सुरूवातीस अगदी लाजून प्रत्येक गोष्ट विचारून करणार्या बायका नंतर नंतर तुम्ही काय बाळ जन्माला घालायचे काम केलेत नुसते,बाळ एवढे मोठे झालेय ते माझ्यामुळेच एवढी प्रगती एखाद्या महिन्यात करतात.>>>>>>>> साती अगदी अगदी
आपल्या स्वतःच्या मनातील काही
आपल्या स्वतःच्या मनातील काही अत्यंत वेगळ्याच कारणास्तव आलेल्या हसण्यामुळे कुणाचा असा काही गैरसमज होणे आणि त्याने उगीचच स्वतःची पातळी स्वतःच खालावून दाखवणे यासारखे नियतीचे क्रौर्य नसेल. ..>>>>>>> दुसर्याच्या मनाचा एवढा विचार करणारे फारच कमी लोक असतात त्यातलेच तुम्ही एक आहात, हे नकळत तुम्ही दाखवून दिले 'बेफिजी'...
अप्रतिम व्यक्तीचित्रण.....
>>भिकारी, दारावर येणारे
>>भिकारी, दारावर येणारे सेल्समन, सिग्नलला भिरभिरे वगैरे विकणारी मुले असे काहीजण पाहून असे वाटते की देवाने आपल्याला इतके दिले आहे तर थोडेसे त्याला दिले तर त्याचे काम तरी होईल.
+१००००००
आवडले
आवडले
भाई कसे आहेत आता ? तडकासे
भाई कसे आहेत आता ?
तडकासे आवड्ला आपल्याला !!!! पुढच्यावेळी भेटाल तर माझे हे शब्द सांगा अवश्य त्याला
खुप सरळ लिहिलय. स्वच्छ
खुप सरळ लिहिलय. स्वच्छ धूतलेल्या सुती कापडासारखं वाटलं. (म्हणजे काय असं उलगडून नाही सांगता येणार, पण ते तसं वाटलं)
लेख आवडला आणि तडकासे अजिबात
लेख आवडला आणि तडकासे अजिबात नाही आवडला
आवडलं व्यक्तिचित्रण.
आवडलं व्यक्तिचित्रण.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार मानतो.
धन्यवाद.
छान व्यक्तीचित्रण. असे काही
छान व्यक्तीचित्रण.
असे काही तडकासे पाहण्यातले आहेत....
आवडलेच हे ही व्यक्तीचित्रण.
आवडलेच हे ही व्यक्तीचित्रण.
लाजवाब लेखन
लाजवाब लेखन
काळाची नवी गरज अशी ही माणसे..
काळाची नवी गरज अशी ही माणसे.. अचूक व्यक्तिचित्रण.
छान व्यक्तीचित्रण
छान व्यक्तीचित्रण आहे.
तडकासेला कदाचित नवीन रुग्णही मिळेल. मला वाटतं, भाईना डिसचार्ज मिळाल्यावर त्याचे नाते संपूनच जाईल.
सुंदर व्यक्ती
सुंदर व्यक्ती चित्रण....
डोळ्या समोर उभी रहात होती व्यक्ती, आणि त्याचा वावर.....
लिखाण अप्रतिम आहे. या लेखाला
लिखाण अप्रतिम आहे.
या लेखाला मिळालेली खरी दाद किंवा खरा प्रतिसाद म्हणजे शूम्पी चा..
लेख आवडला आणि तडकासे अजिबात नाही आवडला >> तुम्ही उभं केलेलं व्यक्तिचित्रं हे ऑब्जेक्टिव्हली उभं केलंयत. तुम्हाला जे वाटलं/दिसलं ते तुम्ही शब्दात उतरवलंत.
पुढे तडकासे वाचकाला आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही हे तुम्ही वाचकांवर सोडलंत.
तडकासे सारख्या व्यक्ती काम कितीही बोरींग आणि मोनोटोनस असलं तरी हासतमुखाने करण्यात माहिर असतात. अगदी सफाईदार यंत्रवत.
अवांतर - माझ्या एका वृद्ध नातेवाईकांसाठी पण अशाच एक बाई होत्या.. त्या तर चक्क पेशंटची दाढीही करते असं म्हणाल्या.. अर्थात ही त्यांच्यामते त्यांच्या कामातली एक छोटीशी गोष्ट असेल. मला मात्र प्रचंड आश्चर्य वाटलं होतं ते ऐकल्यावर.
व्यक्तिचित्रण आवडले...
व्यक्तिचित्रण आवडले... भाईंना खणखणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा...
छान व्यक्तीचित्रण आहे. आवडले.
छान व्यक्तीचित्रण आहे. आवडले.
तडकासे सारख्या व्यक्ती काम
तडकासे सारख्या व्यक्ती काम कितीही बोरींग आणि मोनोटोनस असलं तरी हासतमुखाने करण्यात माहिर असतात. अगदी सफाईदार यंत्रवत.<<<<<<<<
दक्षिणा जी ......
एक पॉइण्ट लक्षात घ्या की जगात अशी माणसे आहेत अशा नाईलाजाच्या परिस्थितीत आहेत की ज्याना असे आयुष्य /काम स्वीकारावे लागले असेल
उनपर क्या बीत रही होगी ....याप्रति वाचकास अंतर्मुख करणे व त्याची काळजी नकळतपणे आपसूकच वाचकाना लावून जाणे यात बेफीजींच्या लेखणीचे एखादे व्यक्तिचित्रण उभे करण्याचे कसब आहे ..सामर्थ्य आहे
बोरिंग मोनोटोनस असे रूक्ष अनार्द्र शब्द वापरून आपण या तडकासेला कमीपणा आणताय
___________________________________________________________
चक्क पेशंटची दाढीही करते असं म्हणाल्या.. अर्थात ही त्यांच्यामते त्यांच्या कामातली एक छोटीशी गोष्ट असेल. मला मात्र प्रचंड आश्चर्य वाटलं होतं ते ऐकल्यावर.
<<<<<<
आश्चर्य व्यक्त करत बसण्या ऐवजी हे वाक्य म्हण्ताना ते म्हणणार्या त्या एका "स्त्री"च्या मनावर काय गुजरली असेल या बाबत विचार करायला हवा होतात दक्षिणाजी
____________________________
एकूण दक्षिणाजी.. तुमची प्रतिक्रिया लेखास व त्यातील सामान्यातही असामान्यत्व दाखवणार्या व्यक्तिमत्त्वास जरा गमतीने व लाईटली घेण्याचा पावित्रा उत्पन्न करू पाहत आहे
शक्य झाल्यास बदल करा किंवा प्रतिक्रियाच वगळा अशी सुचवणी
~वैवकु
वैवकु माझ्या पोस्टचा अवांतर
वैवकु
माझ्या पोस्टचा अवांतर अर्थ लावल्याबद्दल तुमचा निषेध. तुम्ही जे बोलताय त्यापेक्षा कितीतरी वेगळं माझी पोस्ट बोलतेय. त्यामुळे मी ती बदलणार नाही.
एक पॉइण्ट लक्षात घ्या की जगात अशी माणसे आहेत अशा नाईलाजाच्या परिस्थितीत आहेत की ज्याना असे आयुष्य /काम स्वीकारावे लागले असेल
उनपर क्या बीत रही होगी ....
>> जर माझी पोस्ट चूक आहे बोरिंग आणि मोनोटोनस हे अस्थायी शब्द असतील तर तुमच्या या वरच्या दोन वाक्यात इनडायरेक्टली ती गोष्ट तुम्ही मान्य केली आहे. कारण ज्यांच्यावर बीतते वगैरे म्हणजे ते काम काहीतरी बोरिंग आणि मोनोटोनस असते.
तडकासे सारख्या व्यक्ती काम कितीही बोरींग आणि मोनोटोनस असलं तरी हासतमुखाने करण्यात माहिर असतात. अगदी सफाईदार यंत्रवत >> यात मी पेशंटला पाहणं बोरिंग आणि मोनोटोनस आहे असं कुठे म्हणलय? कोणतंही बोरींग आणि मोनोटोनस म्हणलंय.
पुढे दाढी बद्दल त्या बाईंचं आश्चर्य वाटलं ते कौतुकान. किव केली नाही मी.
माझ्या प्रतिसादात थेट उच्चार नसला तरिही तडकासेंसारख्या व्यक्तीबद्दल कौतुक च व्यक्त केले आहे.
तुमच्या पोस्टसाठी हा माझा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद त्यामुळे यापुढे तुम्ही काही लिहिलंत तर मी दुर्लक्ष करेन.
धन्यवाद.
बेफिकीर, उत्तम व्यक्तिचित्रण.
बेफिकीर, उत्तम व्यक्तिचित्रण.
खिळवुन ठेवणारी कथा! अगदी
खिळवुन ठेवणारी कथा! अगदी बारकाव्यासहित 'तडकासे' उभा केलाय.
रिया +१
रिया +१
सुरेख व्यक्तिचित्रण. यात
सुरेख व्यक्तिचित्रण.
यात वेळोवेळी घडलेले प्रसंग (जसा लिफ्टबाहेरचा संवाद) सहजपणे खुलविला आहे.
मलापण तडकासेबद्दल कीवच आली.
सुंदर व्यक्ती चित्रण!! कथा
सुंदर व्यक्ती चित्रण!!
कथा आवड्ली!
अतिशय अवघड टाईपचं व्यक्तिमत्व
अतिशय अवघड टाईपचं व्यक्तिमत्व निवडलय.
वाचताना एक न पाहिलेला पण ओळखीचा चेहेराच डोळ्यांपुढे उभा रहातो.
जियो !!
काल भाईंचे दुर्दैवी निधन
काल भाईंचे दुर्दैवी निधन झाले.
ते रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी घरी आले होते तेव्हाच तडकासेने ड्युटी थांबवली होती आणि घरी एक वेगळी नर्स राहात होती.
सहज वाचक व प्रतिसाददात्यांच्या माहितीसाठी म्हणून लिहिले. बाकी काही नाही.
Pages