मेघना पेठेंच्या कविता
''सिग्रेट अशी धुमारत ,जळत जात होती आत..
फुफ्फुस जाळून , करडा धूर होऊन बाहेर पडत होती.
तो छोटासा लालचुटुक निखारा पुढे सरकता सरकताच
मागे जमत जाणारी राख
आणि राख सांडत,सांडत छोटी छोटी होत जाणारी सिग्रेट
तू, मी ही जगलो आहोत तिचा तीळ तीळ प्रवास
आपल्यातून झालेला.
धूर,राख ही काही अटळ अंशरुपं आहेत तिची
आणि तिचा अर्थ मात्र अंशरुपानंच का होईना
पण आपल्यात चिरंजीव झालेला आहे.''
सिग्रेट ओढणारी ही मुलगी कुठल्याकुठे घेऊन गेलीय त्या अनुभवाला.आजवर कोणी अशी सिग्रेट ओढलीच नसेल अशा स्तरावर. जीवनाचा असाच रसरसून अनुभव घेणार्या या प्रतिभावतीचं नाव आहे मेघना पेठे.
मेघनांची कविता, जी त्यांनी प्रवासाच्या सुरुवातीलाच मागे सोडली,ती त्यांच्या जगण्यातल्या सत्यान्वेषाचा पहिला टप्पा आहे.त्यांचा हा पहिलावहिला प्रातिभ आवेश मुक्तःछंदातच व्यक्त होणे जणू क्रमप्राप्त आहे.
मेघना छंदोबद्ध कधीच लिहीत नाहीत तसेच मुक्तःछंदाची त्यांची शैलीही एकरस अशी आहे.पूर्ण संग्रहातून एक संथ हेलकावणारे दीर्घ स्वगत वाहत आहे.
म्हणून ही कविता मला ग्रीक कोरस किंवा शेक्सपीअरच्या स्वगतांचा परिणाम साधणारी वाटते. धीरगंभीर,सखोल,क्वचित सूक्ष्म उपहासाचा आश्रय करणारी अशी शैली. कवितेतली नाट्यमयता जपणारी.
''मेघनाच्या कविता ''.. एक जुनी जीर्णशीर्ण पण कलात्मक वही आहे माझ्या हातात,मेघनाच्या ह्स्ताक्षरातल्या तीस कविता अन तिचं कवितेआधीचं मनोगत या वहीत सांडलंय.हा प्रकाशित संग्रह नसून ''व्यक्तिगत वितरणासाठी'' असल्यासारखा एक संग्रह आहे नेटका,देखणा,स्तिमित करणारा. मेघना पेठेंसारखाच.
या कवितांचा कालखंड १९७४-१९८५ असा आहे. माझ्याकडे हा बराच नंतर आला.आज खूप वर्षांनी हा हातात घेण्याचं कारण कविताप्रेमींना या प्रगल्भ लेखिकेच्या तुलनेने अप्रचलित राहिलेल्या कवितांचा परिचय करून देणे,इतकाच आहे.
मेघनांची कविता पारदर्शी ,रोखठोक,विद्ध करणारी आहे. सुरुवातीच्या कवितांमधल्या कवी-उच्चारांमध्ये किशोरवयीन निरागसताही जाणवते. कारण कविता कवयित्रीबरोबरच वाढतेय. हा संग्रह प्रकाशित करतानाच मेघना कवितेचा निरोप घेताहेत असे आज अधिक प्रकर्षाने जाणवतेय. त्यांना गद्य ललितलेखनाची क्षितिजे खुणावत आहेत.
''विकासाच्या एखाद्या टप्प्यावर कात टाकून ,झळाळत्या सोनेरी अंगाने पुढे सरकणारा साप. नेमकी हीच प्रतिमा कविता लिहून ठेवताना माझ्या डोळ्यासमोर आली आहे, येते.''
''खूप जवळच्या मित्राचा मृत्यू अटळ आहे हे उमजल्यावर काहीशा विचित्र हुरुपाने आपण मित्राशिवायही जगण्यास तयार होऊ लागतो.'कवितेसाठी आपला जन्म नाही ' हे स्वतःशीच मान्य करत असताना मला तसेच वाटते आहे..''
कविता या मुख्यत्वे भाष्य म्हणून सुचतात असे म्हणणार्या मेघनांनी प्रस्तावनेत लिहिलेली ही काही वाक्ये त्यांचा कविताविषयक दृष्टिकोन दर्शवतात. कविता ही जणू जीवनानुभवाची 'टाकलेली कात' आहे, सोनेरी ,झळाळती, पण चेतनाहीन.भूतकाळाचा अवशेष अशी. कवितेतून वर्तमान मांडत असतानाच तो वर्तमान भूतकाळात जमा होतो.कवितेच्या अवकाशात एक भाष्य होऊन शिल्लक रहातो.कविता ही एका अशा खूप जवळच्या मित्रासारखी आहे, ज्याचा मृत्यू अटळ आहे.या वियोगाची मानसिक तयारी कवयित्रीने चालवली आहे.
कवितेबद्दलचा हा पवित्रा मेघनांना कवितेपासून दूर नेतो अन आपण वाचकही एका समृद्ध काव्यानुभवाला सामोरे जाताजाताच त्याच्या अकालवियोगाची खूणगाठ मनाशी बांधून घेतो.
हा काव्यानुभव एका विकसित स्त्रीमनाचा हुंकार आहे. ही स्त्रीत्वाची जोखीम निभावणे सोपे नाही. कवयित्रीने काळाच्या पुढे राहून ती ओळखली आहे,बंडखोरीने व्यक्त केली आहे.या बंडखोरीच्या आड,आत, ती फक्त एक उत्कट व्यक्ती आहे.बंडखोरीची किंमत मोजताना एकटी पडलेली.हे एकटेपण व्यक्त होऊ शकते एखाद्या जिवाभावाच्या मित्राकडे. मित्राच्या प्रतिमेत वडील अन प्रियकर या दोन आग्रही भूमिका सरमिसळून सौम्य होतात.
''मित्रा,
आज तुझी आठवण आली आहे.
एका अपार व्यर्थतेचं फुलपाखरू होऊन आली आहे.
त्याचीच आहे सगळी बाग
ते कधी इथे भिरभिरते,कधी तिथे स्थिरावते आहे
माझ्या अंतिम हिताच्या दृष्टीने सारे मध वाळू देत आहे.
..................................................................................
मित्रा,
नंतरही मी एकटीच आहे: आधीसारखीच.
आणि तशीच भर दुपारी
ताडाच्या झाडाखाली दूध पीत आहे.
फक्तः
आज तुझी आठवण आली आहे
आणि मग खूप आठवणी येत आहेत..''
हे ताडाच्या झाडाखाली दूध पिणं, म्हणजे संकेतांना धक्का देण्यासाठी बंडखोरी करणं. पुनः ती करताना स्वत्वाची शुद्धता जपणं. हा पवित्रा मेघनाच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे.
सतत पुढे ,पुढे ,पुढच्या,उद्याच्या विचारात गुरफटलेल्या,कवितेतही गुंतून न पडणार्या या महानगरीय अस्वस्थ कवयित्रीचे लग्न लागले आहे ते 'उद्या'शीच.
''या उद्याशी लग्न लागले आहे
अन रोजच लागते.
रोज अपरिहार्यतेचे चुडे भरून
आणि नाइलाजाची हळद लावून
बोहल्यावर उभे राहायचे अन उद्याचे व्हायचे.
अनिर्बंधाच्या माहेरीचा पारिजात मला हसतो..''
पण ''अनिर्बंधाचे माहेर'' आता 'कवितेसारखेच दुरावू लागले आहे.तशी वादळे गोळा होऊ लागलीत वाढत्या वयाच्या क्षितिजावर. 'वडील' ही प्रतिमा या वयात एका मनस्वी स्त्रीसाठी खूप महत्त्वाची आहे.कारण तोपर्यंतच्या आयुष्यातले ते सर्वात उत्कट प्रेम आहे,त्या प्रेमाचा तिच्यावर प्रभाव आहे.वडिलांनी आपल्या कल्पनेप्रमाणे लाडक्या लेकीवर संस्कार केलेत,आपल्याला भावलेले अर्थ तिला दिलेत. वडिलांची प्रतिमा मेघनाच्या कवितांमध्ये जागजागी येणे अपरिहार्य आहे.एकदा ही प्रतिमा वादळांच्या संदर्भात येते-
हे वादळांनो,
असे अधीर होऊ नका वडिलांसारखे
मी वाढण्याची वाट बघताना;
वेळखाऊ असते हे जमीन शोषत जाणे..''
एका संवेदनशील युवतीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संक्रमण,तिने वयात येणं,निसर्गसिद्ध आकर्षणांना प्रतिसाद देताना अनिर्बंधाच्या माहेरी पारिजातासारख्या फुललेल्या निरागस प्रेरणांना विसरून जाणं,दुय्यम ठरवणं अन नवीनच कुणाच्या तरी वेगळ्या अपेक्षांच्या चौकटीत स्वतःला बांधून घेणं.
या संक्रमणात सगळ्यात आधी दुखावले जातात ते वडील.. त्यांनी घडवलेलं लेकीचं व्यक्तिमत्व बदलत असतं म्हणून नाही , तर ते व्यक्तिमत्व सोप्या सुखाच्या वाटा तुडवण्यासाठी स्वतःला बदलण्याचे अधिकार दुसर्याला बहाल करतं म्हणून..मेघना हे सर्व जगून त्यापलिकडे जातात.एका त्रयस्थाच्या भूमिकेतून ही प्रक्रिया नोंदवतात.
समुद्रावरच्या एका अप्रतिम कवितेत वडील समुद्राच्या प्रतिमेत मिसळून जातात..
''संध्याकाळपर्यंत
किंग लिअरसारखा
आक्रस्ताळ्या अनावर प्रक्षोभाचं मुक्त प्रदर्शन मांडणारा होता समुद्र.
विश्वासघात झाल्यासारखा.
नंतर कधीतरी खोल डोळ्यांसारखा आत गेला,
अथांग होत होत..
तू हातात हात देऊन तुझ्या सख्याच्या
पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात समुद्राच्या मर्यादा तुडवीत चालली होतीस
कधी प्रश्नच न पडल्यासारखी.
एखाद्या पाळीव पोमेरियनसारखी.मुकाट,तुरुतुरू,स्वच्छ,स्मार्ट.
आणि त्याने पाहिले तू सुखाला बळी जाताना.
म्हातार्या बापासारखा समुद्र चटकन घायाळ होतो हल्ली.
त्याच्या रुसव्याची पर्वा असण्याचे तुझे वय नाही.''
इथे समुद्राला वडिलांची प्रकट उपमा आहे.दुसर्याही एका कवितेत (कवितांना अनुक्रमणेपुरतीच शीर्षके आहेत ) अधिक गहिरा समुद्र अप्रकटपणे वडिलांचीच भूमिका निभावतो आहे..
''अस्मि अस्मि म्हणत हा समुद्र आपल्याला वेढत जातो आहे.
आणि उदास हसून म्हणतो आहे : तुझी तू;
म्हणून तू म्हणशील तसेच !''
हे स्वत;ला सतत जोखत रहाणं समंजसपणा वाढवणारं आहे.. तेच संबंधांबाबतही.प्रेम,विरह या सगळ्याच अनुभवांना प्रश्न विचारत त्यातलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करताना त्यातलं मिथक हळुहळू विरून जातं..
''हे असं अवाढव्य दालन-
लक्षवेधी असं एकच थोरलं झुंबर-छताच्या मधोमध
ते खळदिशी फुटून काचांचे सर्वदिश पसरलेले तुकडे
त्यावर नाचणारी व्याकूळ मीनाकुमारी
धनुष्य ताणून- भूतकाळ पणाला लावलेली
शुभ्र गादीवर झिरपत जाणारे रक्ताळलेले पाउलठसे
आणि डोळे: प्रश्न आणि उत्तर झालेले
कितीतरी विश्रब्ध प्रेमांना
असं संस्मरणीय पेश होता येणार नाही: घुंगराशिवायचं नाचताना.
..........................................................................................................
कधी काळी व्याकूळ हेलावलेले थरथरते झोपाळे
कुरकुरत शांत होत आहेत.
जांभयाच जांभया येत आहेत आपल्याला
कुठल्यातरी निवलेल्या,कोमट आठवणींनी.
आपण झपाझप चालू लागलो तर
त्या कधीकालीन उकळत्या रसायनांची स्फटीके
खडखडखडखड वाजतील आपल्यातच.
काळाचे हे क्रूर विभ्रम
किती बिनशर्त मान्य आहेत आपल्याला.
एखाद्या थिएटरमधून बाहेर पडावे
तसे आपणच बाहेर पडलो आहोत तरः आपल्यातून.''
मेघनांच्या कवितेतून त्यांनी प्रथमपुरुषी एकवचनासाठी केलेला 'आपण' चा लिंगनिरपेक्ष वापर लक्षणीय आहे हेही येथे सहजपणे जाणवतेय..
- अन तरीही, प्रेमाचा, विरहाचा, संबंधांचा अनुभव घेणारी ही सजग व्यक्ती आपले स्त्रीत्व, त्यातले तणाव टाळू शकत नाही. पुनः समुद्राबद्दलच (आता इथे समुद्र म्हणजे जणू पुरुषप्रधान व्यवस्थेचं प्रतीक झालाय !) बोलताना आपल्या एकेकालीन सख्याला ती सांगते,
''समुद्राने वेढलेल्या एका कोरीव शिसवी कातळावर
साध्या पापणीने समुद्र खेळवीत मी ताठ उभी असेन.
एक प्रमत्त स्त्री : जिचा निरंकुश पदर पश्चिम वार्यावर झुळझुळत आहे
आणि आपल्या प्रत्येक गात्रावर मात्र जिने अंकुश टेकला आहे
जी जाणते मीलनांची मर्यादित सुखं
आणि विरहांची अमर्याद हास्यास्पदता !
अर्थघन असे हे सुंदर शब्द लिहिताना आताही माझ्या अंगावर शहारा आला आहे.या सर्वांपलिकडे उभ्या असलेल्या मृत्यूचे सातत्याने भान राखणारी कवयित्री जीवनाचा शोध घेताना दमून जाते..
''आपण काय शोधत आहोत आणि आपण काय शोधायचे आहे
याचाही शोध लागेना युगानुयुगे
पण मृत्यूंवर मृत्यू साहूनही
श्वास उच्छ्वासातून काहीतरी ठेचकाळत राहिले आहे.
एखाद्या पूर्ण परदेश्याने आपल्याकडे पाहून ओळखीचे हसावे तसे.
आणि इच्छांच्या आठवणींनी डोळे भरून येत आहेत.''
मेघनांची कविता ही अशी आहे. जाणवत्या जाणिवेची प्रगल्भ कविता. जीवनावर प्रेम,मृत्यूबद्दल विस्मययुक्त आस्था.पण स्व-भावानुसारच ही कविता नेणिवेपर्यंत उतरत नाही. कदाचित म्हणूनच नेणिवेतून प्रकटणारे पद्याचे कमनीय आकृतीबंध तिला परके आहेत आणि कदाचित म्हणूनच एकूणच कवितेपेक्षा या प्रतिभावतीला ललितलेखनाचे आकर्षण जास्त वाटले असावे..
ते काहीही असो.मोहात पाडणारी ही कविता प्रत्येकाला/प्रत्येकीला आपली वाटावी अशी निखळ नितळ आहे.
''सकाळभर घोटाळते पायापायात कुठेकुठे मांजर
मग कुणीतरी कानाकोपर्यात आपल्यासाठी काढलेला दहीभात
लप् लप् लप् लप् गिळते.
डोळे मिटूनही मधूनच कणाभर शहारते.
तरीही लप् लप् लप् लप्...
..........................................................................................
... कधी अशाच वेळी
आठवत असेल का मांजराला : लहानपण,
आणि त्या सर्वच तारखा, जेव्हा पहिल्यांदा दुखवले होते,
पहिल्यांदा दुखावलो होतो..
पहिल्यांदा छाटले होते स्वत:ला -नंतर पालवण्याकरिता..
आणि रेषेरेषेने बदलत गेलेले चेहरे : हळुहळू बोलेनासे झालेले.
आणि मग मनात घट्ट हेतू धरून वर्षानुवर्षे साचलेल्या शांतता.''
- स्वतःच्या निबरत जाणार्या जाणिवांचेही प्रामाणिक चित्रण मांजराच्या प्रतिमेतून करणार्या या कवितेपाशी मी लेखनसीमा करते ,कवयित्रीला एक नि:शब्द सलाम करूनच.
भारती बिर्जे डिग्गीकर
सर्व माबोकरांना
सर्व माबोकरांना महाराष्ट्रदिनाच्या अनेक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र !
उत्तम लेख ओझरता वाचला आहे
उत्तम
लेख ओझरता वाचला आहे पुन्हा सविस्तर वाचेन
मेघनाजींच्या कविता तुमच्या कवितांसारख्याच श्रीमंत आहेत पण जरा शालीन घरंदाज ( नेमका शब्द आठवत नाहीये) वाटत नाहीत
सत्तरीच्या जमान्यात मी एइकले आहे की हिप्पी स्टाईल लाईफ नवी पिढी जगायची मला ही कविता तशी वाटते
मी उणे-अधिक काही बोलत अल्यास क्षमस्व

कवयित्रीला माझाही एक नि:शब्द
कवयित्रीला माझाही एक नि:शब्द सलाम .....
''या उद्याशी लग्न लागले
''या उद्याशी लग्न लागले आहे
अन रोजच लागते.
रोज अपरिहार्यतेचे चुडे भरून
आणि नाइलाजाची हळद लावून
बोहल्यावर उभे राहायचे अन उद्याचे व्हायचे.
अनिर्बंधाच्या माहेरीचा पारिजात मला हसतो..'' -----
खूप सुंदर आणि काहीशी विद्ध!
आभार
आभार वैभव,हर्पेन,सिमंतिनी..
वैभव, मर्यादा पाळणे अन ओलांडणे हे दोन पर्याय आपापली किंमत वसूल करतात ! दोन्ही खरे आहेत, प्रत्येकाने आपला निवडावा..'स्वधर्मे निधनं श्रेयः'.
हर्पेन आभार आवडत्या दहा साठी.
सिमंतिनी, >>खूप सुंदर आणि काहीशी विद्ध >>>>अगदी बरोबर.
मी मेघना पेठेंच्या मुक्त
मी मेघना पेठेंच्या मुक्त स्पिरीटचा भोक्ता - अगदी तीन धोब्यांसकट. वेगळ्या टप्प्यावरच्या कविता वाचायला मिळाल्या तुमच्यामुळे आज.
मेघना पेठेंच्या सिगारेटवरच्या कवितेवरून अमृता प्रितम यांची कविता आठवली.
एक दर्द था
जो सिगरेट की तरहा
मैने चुपचाप पिया है
सिर्फ कुछ नझ्मे है
जो सिगरेट से मैने
राख की तरहा झाडी है
छान लिहीले आहे भारती. मेघनाचे
छान लिहीले आहे भारती. मेघनाचे लेखन मला आवड्ते.
सुंदर.. मेघना पेठे, दापोली..
सुंदर.. मेघना पेठे, दापोली.. फनसु गावच्या..
<<''समुद्राने वेढलेल्या एका कोरीव शिसवी कातळावर
साध्या पापणीने समुद्र खेळवीत मी ताठ उभी असेन.
एक प्रमत्त स्त्री : जिचा निरंकुश पदर पश्चिम वार्यावर झुळझुळत आहे
आणि आपल्या प्रत्येक गात्रावर मात्र जिने अंकुश टेकला आहे
जी जाणते मीलनांची मर्यादित सुखं
आणि विरहांची अमर्याद हास्यास्पदता ! >>
सुंदर शब्द्प्रयास, भावना आणि ताकत दोन्हि व्यवस्तित मांडलेले..
सर्वांचे आभार.. टण्या, अमृता
सर्वांचे आभार.. टण्या, अमृता प्रीतम यांच्या ओळी अगदी समांतर..
रच्याकने इथे कवयित्री धूम्रपान करत आहेत की नाहीत हा अगदी वेगळाच मुद्दा आहे, ती लोकमानसात रूढ प्रतिमा ,जी 'हर फिक्रको धुएंमें उडाता चला गया ' सारख्या ओळीत येते, या दोन कवयित्रींनी आपल्या कवितेत सामाजिक संकेतांशी बंडखोरी करत पण उथळपणे नाही तर अगदी खोल मानवी अस्तिवापर्यंत,व्यथेपर्यंत पोचत वापरली आहे एवढेच महत्वाचे. या प्रतिमेव्यतिरिक्त व बंडखोरीव्यतिरिक्तही ही कविता समृद्ध आहे.
मी मेघनांचे गद्य फारसे वाचलेले नाही, त्यांच्या पद्याची जास्त चाहती आहे म्हणून कदाचित..
पोस्ट दोन वेळा पडली..
पोस्ट दोन वेळा पडली..
भारती, मेघनाबाईंचं गद्य अन
भारती, मेघनाबाईंचं गद्य अन पद्यही फारसं वाचलेलं नाही. आज तू जी ओळख करून दिलियेस... नक्की मिळवून वाचणार.
<<.....
म्हातार्या बापासारखा समुद्र चटकन घायाळ होतो हल्ली.
त्याच्या रुसव्याची पर्वा असण्याचे तुझे वय नाही.''>>
निव्वळ अप्रतिम.
नक्की दाद, त्यांचा आवाका खूप
नक्की दाद, त्यांचा आवाका खूप मोठा आहे, त्या स्वतःच्याच रिबेल प्रतिमेत जास्त अडकल्यात असं मला वाटतं
म्हातार्या बापाची प्रतिमा समजून घ्यायला एक तर बाप व्हायला पाहिजे किंवा लेक
ते नातंच वेगळं.
भारतीताई, कविता सुंदर,
भारतीताई, कविता सुंदर, त्याहूनही सुंदर तुमचे त्या कवितेतले सौंदर्य शोधून दाखवायची हातोटी.
मेघना पेठेंचं गद्यामधे एक नातिचरामि वाचलंय. त्या कविता पण करत असतील असं कधी वाटलंच नव्हतं
या लेखाबद्दल धन्यवाद.
सुंदर.. मेघना पेठे, दापोली.. फनसु गावच्या..
>>> खरंच?? मजेदार योगायोग आहे मग हा.
जबरदस्त लेख! इतकेच लिहून
जबरदस्त लेख! इतकेच लिहून थांबतो.
धन्यवाद या लेखाबद्दल, अनेक गोष्टी मिळाल्या यातून - हे मात्र लिहायलाच हवे.
<<सुंदर.. मेघना पेठे,
<<सुंदर.. मेघना पेठे, दापोली.. फनसु गावच्या..
खरंच?? मजेदार योगायोग आहे मग हा.>>
कसला योगा योग नंदिनी???
धन्स नंदिनी, बेफिकीर..
धन्स नंदिनी, बेफिकीर..
नातिचरामि बद्दल माबो वर खूपच
नातिचरामि बद्दल माबो वर खूपच चर्चा झाली आहे. बहुधा प्रतिकूलच.(जुन्या माबो वर का?) पेठेंच्या बाकी लिखाणाच्या तुलनेत ते पुस्तक डावेच आहे. 'खरे तर पेठे गद्य लेखनासाठीच ओळखल्या जाव्यात . 'आंधळ्याच्या गायी' अप्रतिम आहे आणि तेच मास्टरपीसच ठरावे. दुसरे पुस्तकही चांगलेच आहे नाव आता चट्कन आठव्त नाहीये. पेठेंची एक कविता माहीत होती 'मी नाही होणार तुझी बायको 'अशी काहीतरी. टिपिकल पेठे बंडखोरी असलेली पण अतिशय उत्तम.
पण त्यानी बरेच कविता लेखन केले आहे असे प्रथमच कळते आहे. आणि त्यांच्या गद्याच्याच तोडीचे आणि ताकदीचे.
भारतीजी आभार.
अभ्यासपूर्ण! लेख आवडला. मेघना
अभ्यासपूर्ण!
लेख आवडला.
मेघना पेठेंच्या अधिक कविता वाचायला हव्यात म्हणजे त्यावर भाष्य करण्याइतकी पातळी गाठता येईल असे वाटले.
नातिचरामीनंतर मेघनाच इतर काही
नातिचरामीनंतर मेघनाच इतर काही वाचाव अशी इच्छाच वाटली नाही
हा लेख वाचल्यानंतर इतर काही वाचून तरी बघू या निर्णयाप्रत आलेय
भारतीताई, नेहमीप्रमाणेच मस्त
भारतीताई,
नेहमीप्रमाणेच मस्त ओळख. शिवाय तुम्ही शरत्चंद्र ते मेघना ते हिंदु सगळ्यांवर उमाळ्याने लिहीता ते मला फार आवडते. लिहीत रहा.
रॉबिनहुड+१
>> तू हातात हात देऊन तुझ्या
>>
तू हातात हात देऊन तुझ्या सख्याच्या
पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात समुद्राच्या मर्यादा तुडवीत चालली होतीस
कधी प्रश्नच न पडल्यासारखी.
<<
वा!
मस्त परिचय. धन्यवाद.
संग्रह प्रकाशित नाही म्हणता म्हणजे पूर्ण वाचायला मिळणार नाही तर.
रॉबिन,विदिपा,जाई, लेखात
रॉबिन,विदिपा,जाई,
होय, 'विरुद्धांना पाहुणचार ' होतो खरा माझ्या मनात.
लेखात म्हटल्याप्रमाणे मेघनांनी गद्य लेखनावर लक्ष केंद्रित करून अगदी सुरुवातीच्या या कवितांनंतर तुरळकच कविता लिहिल्या असाव्यात..
रैना धन्स,
होय स्वाती, हा संग्रह उपलब्ध आहे का मला माहिती नाही, बहुधा नसावा,म्हणूनच कवितांचे रसग्रहणात नेहमी असतात त्यापेक्षा दीर्घ भाग टाकले..
इथे मला आवर्जून हे सांगावेसे
इथे मला आवर्जून हे सांगावेसे वाटत आहे की भारती बिर्जे यांना या कविता प्रकाशीत करायची परवानगी आहे का हे विचारल्यावर त्यांनी स्वतःहून हा लेख अप्रकाशीत केला आणि मेघना पेठेंची लेखी परवानगी घेउन मग हा लेख पुनः प्रकाशीत केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
कवितेसाठी काहीही हे
कवितेसाठी काहीही हे माननार्या भारती बिर्जे डिग्गीकर ह्यांचे कौतुक आणि अभिनंदन!
धन्स अॅडमिन, हेतू फक्त
धन्स अॅडमिन, हेतू फक्त मेघनांच्या अप्रचलित सुंदर कविता सगळ्यांसमोर आणण्याचा होता .. आपला कविपणा त्यांनी जगासमोर फारसा मांडलेला नाही.
चांगल्या कवितेचा आनंद सगळ्यांनी मिळून घ्यावा..
आभार विदिपा, खरेय
भारती बिर्जे डिग्गीकर ह्यांचे
भारती बिर्जे डिग्गीकर ह्यांचे कौतुक करावे तितके खरच कमी आहे.
भारती ह्यांचे कौतुक आणि अभिनंदन!
अॅडमिन, इथे सांगितल्याबद्दल
अॅडमिन, इथे सांगितल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.
भारतीताई, लेख सुंदर आहेच हे पुन्हा एकदा सांगते आता
बघा भारतीताई मी म्हटलं नव्हतं
बघा भारतीताई मी म्हटलं नव्हतं ...?? ......तस्सच झालं किनै ????
अॅडमिन यांचे खूप आभार

भारतीताईंचे अभिनंदन
भारतीजी, छान लेख. आणि कविता
भारतीजी,
छान लेख.
आणि कविता शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पुनः आभार कोकण्या, नंदिनी,
पुनः आभार कोकण्या, नंदिनी, वैभव, उल्हासजी,
ही ताकद मेघनाच्या कवितांची
Pages