संस्कृत भाषेतील न्याय!

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 April, 2013 - 02:08

काल फारच मजेशीर आणि अर्थपूर्ण असे इतर अनेक न्याय पुन्हा एकदा वाचनात आले.

वानगी दाखल काही ...
१, अंधगज न्याय - एकाने कानावरून सुपासारखा, दुसऱ्याने पायावरून खाम्बासारखा, तिसऱ्याने सोंडेवरून सापासारखा याप्रमाणे अनेक आंधळ्यांनी हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांवरून त्याला निरनिराळा ठरवणे आणि भांडत बसणे. (वस्तूच्या वेगवेगळ्या रूपावरून लोक तिला वेगवेगळे मानून अज्ञानी लोक भांडत बसतात!!)

२.अरण्यरोदन न्याय - व्यर्थ प्रयत्न. अरण्यात रडले तर कोण ऐकणार?

३. कफोणिगुड न्याय - वस्तू अगदी सुलभ आहे असे वाटावे आणि प्रत्यक्षात ती मिळणे अशक्यप्राय असावे अशी स्थिती. जसे, कोपराला लागलेला गूळ चाटता येईल असे वाटणे पण ते साधत नाही!

४. दग्धबीजन्याय - वस्तूतील महत्वाचा गुण नाहीसा झाला म्हणजे कार्य घडून येत नाही. जसे, भाजलेले बी रुजत नाही.

५. देहलीदीपन्याय - एका गोष्टीने दोन कामे साधणे . जसे, उंबरठ्यावर (देहली) ठेवलेला दिवा लगतच्या दोन्ही खोल्यात प्रकाश देतो.

६. नृप नापित न्याय - आपला तो बाब्या. गावातील अति सुंदर मूल शोधून आण असे राजाने नापितास (न्हाव्यास) सांगितल्यावर सर्व गाव हिंडून आपला साधारण मुलगा सर्वात सुंदर वाटून तोच राजापुढे त्याने सादर केला!

७. पंकप्रक्षालन न्याय - अनिष्ट गोष्ट मुळात होऊ न देणे बरे. जसे चिखल अंगाला लागल्यावर धुण्यापेक्षा प्रथमच लागू न दिलेला बरा.

८. विषकृमि न्याय - घाणीतल्या किड्याला घाण अंगवळणी पडते.

९. तृणजलौकान्याय - नवीन स्थान पैदा करून मग पूर्वीचे सोडावे. जसे गवतावरील सुरवंट पुढले पाय स्थिर झाल्यावर मागचे पाय उचलतो.

१०.मंडूकप्लुतीन्याय - मधले विषय सोडून एकदम दुसर्या विषयाकडे उडी मारणे!

<साभार- जयश्री खाडिलकर यांच्या लेखावर आधारित>

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे Happy 'न्याय' या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये वेगळ्या अर्थाने वापरला जातो. त्याबद्दलही काही अधिक उकलून सांगता येईल का कुणाला?

छान आहे. ह्या सर्व न्यायांकरता काही वचने / सुभाषिते असतात / असतील ना, ती पण डकवा ना इथे कोणीतरी.....

उत्तम !!
३. कफोणिगुड न्याय - कोपराला लागलेला गूळ चाटता येईल असे वाटणे पण ते साधत नाही!>>>>>
मला वाटतं वाचणार्या बहुतेकांनी हे लगेच करून बघितले असेल. मी देखील करून पाहिले.

मस्त. नियम या अर्थाने दिसते हे न्याय म्हणजे. काकतालीय न्याय हे एक ऐकलेले आहे पण काय आहे माहीत नाही.

रॉबिनहूड - नीर-क्षीर न्याय म्हणजे काय? हंसाला नीर-क्षीर-विवेक असतो असे वाचले आहे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी करू शकतो तो. हे त्यापेक्षा काही वेगळे आहे काय? Happy

शुकनलिका न्याय...पिंजर्‍यातल्या दांडीवर पोपट तोल सावरत बसतो अन असुरक्षित वाटून दांडी पायांनी घट्ट पकडून ठेवतो पडू नये म्हणून. हे त्याचे मनोबंधनच कारण त्यामुळे त्याला आपली उडून जाण्याची क्षमताच आठवत नाही..माणसाचं प्रपंचात अडकणं तसंच काहीसं.

या वर आधारीत पुलं नी काही आधुनिक न्याय शोधले आहेत . जास्त माहीतीसाठी टण्या बेडेकर यांना भेटावे.