आमची काशीयात्रा!!

Submitted by मी_आर्या on 25 April, 2013 - 07:59

नमस्कार,
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे
दु. ४.२८ची ट्रेन होती.सांगवीतल्या आमच्या घरात लगबग. त्याआधी एलबीटीमुळे आठवडाभर दुकानं बंद होती. म्हणुन आधीचा एक रविवार फक्त चपला, बुट, कपडे खरेदीसाठी मिळाला. सोमवारचा २ वाजेपर्यत वेळही खरेदीत गेला. घरातील बाकी लोक पॅकींग करत होते. २ वा. परत दुकानं बंद झाली. ३.३० ला ६ मोठ्ठाले डाग घेउन स्टेशनवर निघालो. ४ वा. धावत पळत, बॅगा ओढत स्टेशनवर पोहोच्लो. तर माबोकर शोभा आधीच येउन सामानासह हजर होती. गाडी लागलेलीच होती. पटापटा सामान गाडीत टाकुन स्थानापन्न जहालो. गाडी बरोब्बर ४.२४ला हलली. मोठ्या उत्साहाने प्रवासाला सुरुवात केली खरी, पण आमचे सीटस टॉयलेट्सच्या जवळच असल्याने लवकरच त्या वासाने आम्ही हैराण झालो. त्यात माझ्या धाकट्या भावाची बायको (तिचे वडील कल्याण येथे रेल्वेत आहे...त्यामुळे तिला रेल्वेची माहिती जास्त. आणि आमचा सहकुटुंब पहिल्यांदाच इतका लांबच्या पल्ल्याचा प्रवास) तिने सांगितले की गाडी निघण्याआधी धुतली जाते. तेवढ्यात थोपुवरुन सहज घेतलेला ट्रेन सेफ्टी नंबर आठवला. तोपर्यंत दौंडला पोहोचलो होतो. 'एक ट्राय तर करुन बघु' असा विचार करुन 'टॉयलेटस आर नॉट क्लिन" असा मेसेज टाकला. ५च मिनिटात वास येणं बंद झालं. बघितलं तर टॉयलेट क्लिनिंग झालं होतं. व्वा...सुरुवात तर मस्त झाली. हुरुप वाढला.
ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्स्प्रेस. पण बारीक सारीक स्टेशनं ही घेत होती. अगदी राहुरी, श्रीरामपुर, बेलापुर ही स्टेशनं पण घ्यायला लागली तेव्हा मात्र वैताग यायला लागला. त्यात गाडीतलं पब्लीक एकदम बेक्कार. एकेका सीटवर ४-४ लोक आडवे तिडवे झोपलेले. श्रीरामपुर जवळ येउ लागलं तसं रेल्वेतल्या पोलीसांनी डब्यात फिरुन खिडक्या दारं बंद करायला सांगितली. का तर म्हणे तिथे लोक रात्री रेल्वेवर दगडं मारतात. रात्री १० वा. मनमाडहुन बहिणीची फॅमिली आमच्यासोबत आली. मग बरोबर आणलेली शिदोरी सोडली गेली. दशम्या, खोबर्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी, तोंडलीची भाजी , शोभाकडची बटाटा भाजी असा बेत होता.
रात्री १२ वा. भुसावळला धुळेकरांची टीम आम्हाला येउन मिळाली.
आता आम्ही तब्बल १५ जण झालो.
९ एप्रिल,१३ (मंगळवार)
जाग आली तेव्हा ट्रेन मध्यप्रदेशात गव्हाच्या पिवळ्या धम्मक शेतातुन (कटनी की सतना जिल्ह्यातुन) धावत होती. नर्मदा नदी रात्री केव्हातरी पार झाली होती. दुपार होऊ लागली तसा भयंकर उकाडा सुरु झाला. आम्ही ११.३०-१२लाच जेवणं आटोपुन घेत्ली. संध्याकाळी ४.३० ला अलाहाबाद ला पोहोचलो.
अलाहाबादला पित्रे गुरुजींनी छान व्यवस्था लावुन दिली होती. स्टेशनवर आम्हाला घ्यायला २ रिक्षावाले हजर होते. काहीही त्रास न होता आमचं वर्हाड स्वामिनारायण मंदीरात येउन पोहोचलं.
DSCN5185
गुलाबी चिर्याच्या दगडात बांधलेली सुंदर,निर्मळ बिल्डींग, गोशाळा,एका बाजुला सुसज्ज स्वयंपाकघर होते. सग्ळी घरचीच मंडळी असल्याने एकच मोठा हॉल घेतला. भाडे- ८००/-
रहाण्याची व्यवस्थाही सुंदर, मुबलक पाणी, आणि बाहेर ऊन असुनही आत गारवा. यामुळे तिथलं वास्तव्य सुसह्य झालं.
रात्री पित्रे गुरुजींनी येउन तिथल्या विधींविषयी चर्चा केली. अजुनही खुप गप्पा मारल्या. तिकडे ऋतु दोनच. हिवाळा आणि उन्हाळा. दोन्ही एक्स्ट्रीम. पावसाळा नाहीच. ..गुरुजी सांगत होते. "आम्ही बातम्या वाचतोय, महाराष्ट्रातल्या. पाऊस कमी, दुष्काळ , पाणीटंचाई, भुजल पातळी इ. इ. पण इथे बघा इकडे पाऊस कमी तरी पाणीटंचाई नाहीच. गंगा, यमुना या सारख्या मोठ्या नद्यांना ऐन उन्हाळ्यातही पाणी भरपुर असते. "
मला आपल्याकडच्या प्रदुषणयुक्त पवना, मुळा, मुठा आठवल्या. श्रद्धेने का असेना पण नद्या प्रदुषणमुक्त ठेवल्या तर आपणही त्यांना लोकमाता म्हणुन शकु.
असो. तिथे मुख्यतः ३ विधी होतात.
स्नानसंकल्प
वेणीदान
श्राद्ध/ पिंडदान
पापक्षालन/ स्नानसंकल्प : कुणीही करु शकतो. रेट १०१/- (१०१ रु.त जन्मोजन्मीची पापं फेडुन घ्या. Proud
वेणीदानः फक्त जोडप्यानेच करायचा विधी रेट २०१/-
श्राद्द/ पिंडदानः घरातला कर्ता पुरुष हा विधी करतो. ५०१/-
१० एप्रिल (बुधवार):
आमच्यातल्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे विधी केले. त्या दिवशी अमावस्या असल्याने योग जुळुन आला होता, भावाने श्राद्धविधी केला. मी व मुलाने १०१ रुपयात पापं धुवुन घेतली.
वेणीदानाविषयी गुरुजींनी सांगितलेली माहिती अशी.
इथे तिघी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम आहे.यांना स्त्रीया असं कल्पुन सौभाग्यवायन दिलं जातं.पुरुष जाउन त्यांचे केस दान करतात. पण सुवासिनींचे केस हे सौभाग्यलक्षण असल्याने त्यांनी ते नवर्याला विचारुन दान करायचे असते. पुर्वी स्त्रीया सगळे केस देत असतील पण आता कालमानानुसार हे कमी झालय. या विधीमधे स्त्री नवर्याकडे केस दान करायची आज्ञा मागते. दोन जोडपी आमच्याकडे तयार होती. लग्नाला १ वर्ष पुर्ण झालेले असे विवाहीत जोडपे चालते. वेणीदान विधी करणार्या जोडप्यांचे दोनदा स्नान होते. म्हणजे एकदा घरुन निघतांना. आणि पुजा झाल्यावर संगमावरचं स्नान.
इतर विधी करणार्यांनी घरुन निघतांना स्नान नाही केले तरी चालते.
आधी वेणीमाधव मंदिरात दर्शन घेउन येण्यास सांगितले जाते.
DSCN5192
मग संकल्प, गणेशपुजा, पुण्याहवाचन. यातच गुरुजींची बायको गजरे आणुन जोडप्यातील पत्नीच्या डोक्यावर बांधते.
DSCN5229

नंतर पतीला पत्नीच्या केसांची वेणी घालावी लागते. इथे मजा येते. कित्येक म्हणजे बहुतेक सर्वच पुरुषांना केसांची वेणी घालता येत नाही. बायकोचे केस लांब असतील तर अजुन गंमत. केसांचे ३ भाग करुन उगाचच इकडे तिकडे फटकारे मारले जातात.
DSCN5244
नंतर कात्रीची पुजा करुन, वेणीच्या शेवटचे केस ३ बोटांचं अंतर घेउन कापतात. त्यांची पुन्हा पुजा आणि नंतर पुडीत बांधुन ती स्त्रीच्या पदराला बांधतात. मग त्रिवेणी संगमावर स्त्नान. यमुनेचं पात्र खुप विशाल आहे. आणि त्यात भर पांढरी रेतीचं वाळवंट ही अफाट पसरलं आहे. तिथे भुरट्यांचा सुळसुळाट आहे. गुरुजींनी ताकीद दिलेली असते...संगमावर कुणी काहीही दिलं तर घ्यायचं नाही, विकत घ्यायचं नाही, कुणी हातात नारळ देतं कुणी माळ, तर कुणी काय...आणि लगेच पैसे मागतात.
DSCN5330
गुरुजींनी सांगितलेल्या नाववाल्याकडेच जायचे. आणि नाववाला सांगेल त्याच माणसाला पैसे द्यायचे असतात. आमच्या नावाड्याने सर्वांना होडी बॅलन्स होईल असं 'वजना'नुसार बसवलं. माझा भाचा वंश (वय वर्षे ४) याला 'सौ ग्राम' (१००ग्रॅ.) हे नाव त्यानेच पाडलं. "का करें!", "ये सौ ग्रॅम को इहां नही बिठा सकते का"! अशी भाषा ऐकुन 'अमिताभ बच्चन'च्या गावाची भाषा ऐकुन मजा वाटत होती. नाववाला ५०रु. प्रत्येकी घेतो. आणि संगमावर आणुन सोडलं जातं. तिथे एक लाकडी प्लॅटफॉर्म केला आहे. नदीत ती पुडी आणि एकेक नाणं टाकुन पाण्यात उतरायचे. यमुनेचे पाणी काळे दिसते तर गंगेचे पांढरट हिरवे. सुरवातीला कंबरेपर्यंत असणारं पाणी पुढे पुढे जाल तसं कमी होत जाते. भर नदीमधे म्हणजे मध्यभागी घोट्याएवढं पाणी आहे. मनसोक्त खेळुन घेतलं की तिथेच फोटो काढुन देणारी मंडळी पण फिरत असतात. २०रु. कॉपी प्रमाणे लगेच फोटो काढुन देतात. आमची गम्मत म्हणजे आम्ही मोठ्या इष्टाईलने काढलेले संगमावर पाण्यातले फोटु तो फोटोवाला परत यमुनातिरी न भेटल्याने यमुनार्पणमस्तु झाले. Sad तशी आमची शोभा फोटोग्राफर होती.:डोमा:
DSCN5301
स्नान झाल्यावर पुन्हा प्लॅटफॉर्मवर यायचे. जसा प्रत्येक गावाला क्षेत्रपाल असतो. तसा संगमावर पण क्षेत्रपाल असतो. त्याचा तिथे मान असतो म्हणुन आपल्याला टीळा लावुन तो ११रु. दक्षिणा घेतो. स्नानानंतर परत काठावर आल्यावर तिथे जवळ असलेल्या 'झोपलेल्या मारुती'च्या (बडे हनुमानजी)दर्शनाला गेलो.
DSCN5373
जवळच अलाहाबादच्या लाल चिरेबंदी किल्ला बघण्याचा मोह वेळेअभावी आवरला. आपण गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क करतो तशीच इथे संगमाजवळच्या प्लॅटफॉर्मजवळ आणि यमुनातिरी ‘नाव पार्कींग ‘ होती. फरक एवढाच की गाडी पार्क करतांना आपण बिनधास्त करतो. तर एवढ्या नावांच्या गर्दीतुन नाव पार्क करतांना जरा कलती झाली की आम्ही रामाचा धावा करायचो. Proud पण खरच ते ही एक कौशल्य आहे.
स्नान करुन आल्यानंतर गुरुजी त्यांच्या जवळच असलेल्या मराठी माणसाकडे जेवणाची व्यवस्था करुन देउ शकतात. ७०/- रु. चा रेट आहे.पण त्यात एकच भाजी, चपाती, वरण भात, हिरवी वाटलेली चटणी आणि शेवटी भरपुर ताक इतकच.
तर अशा रितीने अलाहाबाद दर्शन पुर्ण होते. नंतर गुरुजींनीच ठरवुन दिलेली गाडी घेउन आम्ही विंध्याचलकडे प्रस्थान ठेवले.
अलाहाबाद ते विंध्याचल- अंतर ८० किमी. रोड चांगला झाला आहे. विशेष म्हणजे कुठेही टोल नाका लागला नाही की ट्रॅफीक जाम नाही.
अलाहाबाद ते विंध्याचल प्रवास तसा कंटाळवाणा. विना प्लॅस्टरची, नुसती विटांची घर, जवळजवळ प्रत्येकाच्या घरी दुध-दुभते, मधुनच दिसणारी पिवळी गव्हाची शेतं. अलाहाबाद वाराणसी रोडवरुन विंध्याचल ला जायला एक बायपास लागला. विंध्याचल रोडवर मग युपीमधली गरीबी दिसुन आली. पण गाई-म्हशी प्रत्येकाच्या घरी. किंबहुना तीच त्यांची धनसंपत्ती. तेव्हा मला 'चारा घोटाळा' आठवला. विंध्याचलला सुद्धा गंगा नदी आहे. काशीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ!
मजल दरमजल करत विंध्याचलला संध्याकाळी ६.३०ला पोहोचलो. इथे माझ्या बहिणीच्या नवर्याने दोन पंडीतजींना रहाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगितले होते.संस्थानच्या पंडीतजींनी पण मला व शोभाला जेव्हाही फोनवर बोलायचे तेव्हा "आप आओ तो सही, अरेंजमेंट हो जाएगा, कोई प्रॉब्लेम नही आयेगा इ. इ. सांगुन भलावण केली होती. विंध्याचलला दुसर्या दिवसापासुन चैत्र नवरात्र सुरु होत असल्याने जोरात तयारी सुरु होती. देवळाकडे जायच्या वाटेवरच मोठ्या यात्रेसारखे स्टॉल लागले होते. ऐन वेळेवर तिथे जाउन रहाण्याची व्यवस्था होउ शकत नसल्याचे कळले. रुम होत्या तिसर्या मजल्यावर. आमच्यात ३ पेशंटस असल्याने वरच्या मजल्यावर चालण्यासारखे नव्हते. त्यामुळे मधेच एकदा दर्शन करुन तसच वाराणसी मुक्कामी जाउ हा ही पर्याय उपलब्ध होता. त्याप्रमाणे वाराणसीच्या गुरुजींना विचारुनही झाले. बरं इकडेही दर्शन रात्री १०.३०नंतर सुरु होणार होते. दर्शनच्या रांगेत थांबुन, दर्शन इ. सग्ळं आटोपुन निघता निघता आम्हालाही १२ वाजले असते. त्यापुढे वाराणसी म्हणजे रात्री २ला आम्ही पोहोचलो असतो. पण ऐन वेळेस माझ्या मोबाईलवर एका गुरुजींचा फोन आला व ते आमची वाट बघत आहेत असे कळले तेव्हा जीव भांड्यात पडला. देवळाच्या चढावरच रुम होत्या...मनासारख्या. ७००/- मधे लेडीजसाठी दोन रुम दिल्या.पुरुष बाहेरच्या हॉलमधे. रुममधे स्वच्छता नव्हती. पण एका रात्रीपुरता प्रश्न होता. म्हणुन हो म्हटलं आणि लगेच सामान टाकुन फ्रेश होउन आम्ही आधी जेवुन घेतलं. मग दर्शनाची रांग.
WP_000570

VINDHYAVASINI-MAA-2781
रात्री १०.३०नंतर दर्शन सुरु झाले.
अगदी देवीच्या पायाला हात लावुन दर्शन झाले. रात्रीचे १२ वाजलेलेच होते. तिथेच सर्वांना नमस्कार करुन हिंदु नविन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
११ एप्रिल (गुरुवार)
सकाळी उठुन आधी बांगड्या, चुनरी इ. खरेदी आटोपुन घेतली. सकाळी ७ वा. निघायचे होते ते ९.३० वाजुन गेले. मग कुल्हडमधल्या चहाची चव चाखली. कुल्हडची आयडीया फार आवडली. प्लॅस्टीकचा कचरा होत नाही. आणी एकदम इकोफ्रेन्डली. Happy
पुन्हा एकदा सगळं सामान आवरुन गाडीत भरलं.
साधारण १०वा. वाराणसीकडे प्रस्थान!
इथुन खरा तर आमच्या काशीयात्रेचा मुख्य आणि सर्वात वाईट भाग सुरु झाला. आतापर्यंत आलेल्या सगळ्या चांगल्या अनुभवांच्या अगदी विरुद्द.
पुर्वीपासुन खुप ऐकले होते काशीबद्दल. काशीला पदोपदी लोक कसे ठकवतात. सगळीकडे कसे पैसे द्यावे लागतात. ...इ.इ. आणि ते खरेच होते, याचा अनुभव पावलापावलावर येत होता.
भर दुपारी १२.३०ला आम्ही तिथे पोहोचलो. सुर्य फुल्ल फॉर्मात होता. गाडी तिथेच सोडुन आम्ही १५लोकांचे १६ डाग घेउन जाण्यासाठी गुरुजींनी एक हमाल आणि त्याचे ४-५ सहकारी पाठवले होते. मध्यमवयीन, आणि दिसायला काडीमुडा असलेल्या मुख्य हमालाने जेव्हा स्वतःच्या अंगावर ५-६ डाग चढवुन घेतले आम्ही अचंबीत झालो. गुरुजींकडेच व्यवस्था केली होती. वाराणसीतल्या गल्ल्यांविषयी खुप ऐकले होते. तिथे पोहोचताच त्याचा प्रत्यय आला. एवढ्यांशा गल्लीमधे पण कानाकोपर्यात पचापचा थुंकलेल्या पानाच्या पिचकार्‍या आणि मधेच बसलेल्या गाई- गोर्‍हे (फक्त गाईच), शेळ, उकीरडे, निर्माल्याचा कचरा. गल्लीत स्वच्छता नाहीच पण वाड्यांमधे पण नाही. वाड्यांचे बाहेरचे ओटे तर वर्षानुवर्ष न धुतल्यासारखे धुळीने भरलेले दिसत होते.
galli1
galli
ग्रुप ग्रुपने आम्ही त्या गल्ल्यांमधुन भर दुपारी तंगडेतोड करत 'ब्रम्हाघाटा'वरील गुरुजींच्या निवासस्थानी पोहोचलो. तेव्हा सर्वांचीच चांगली दमछाक झाली होती. घरात गेल्यावर थंडगार पाणी मिळाले. एकेक ग्रुप येउन पोहोचत होता आणि आम्ही एकमेकांकडे पाहुन स्वतःच्या फजितीवर हसत होतो. हा गड उतरुन तर आलो. पण आता प्रत्येक वेळेस म्हण्जे कुठेही जायच्या वेळेस या गल्ल्यांचा भुलभुलैय्या पार करावा लागणार होता. आणि तेवढी एनर्जी त्यादिवशी तरी कुणामधेच नव्हती. म्हणुन आम्ही विश्रांती घेणेच पसंत केले.
दुपारी गुरुजींनी काशीच्या विधींची माहिती दिली. ती माहिती आणि आंतरजालावरुन घेतलेली काशीची माहिती थोडक्यात अशी:
काशी (वाराणसी): वरुणा आणि असि या दोन उपनद्यांच्या संगमावर वसलेली नगरी. संस्कृत विद्येबरोबरच अध्ययन्-अध्यापन, धर्म्-दर्शन, योग, आयुर्वेद, ज्योतिषकला यांचे केंद्र. तसेच देवळांचे, घाटांचे व गल्ल्यांचे शहर.
महादेवाच्या त्रिशुलावर काशी स्थित आहे त्यामुळे प्रलय आला तरी काशीचा विनाश होणार नाही अशी आख्यायिका आहे. वाराणशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिथले गल्ली-बोळ. काही काही गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की एकावेळी दोन माणसेसुद्धा बरोबर चालु शकणार नाहीत.
काशीत असलेली गंगा ही उत्तरवाहिनी असुन तिथले घाट मोठे व विशाल आहेत. जवळजवळ ८० घाट तिथे आहेत. यातील पुष्कळसे घाट मराठ्यांच्या (शिंदे, होळकर,भोसले, पेशवे)यांच्या अखत्यारीत होते.
उदा. राजघाटः हा अमृतराव पेशव्यांनी १८०७ मधे बांधला.
भोसले घाटः नागपुरकर भोसल्यांनी हा घाट बांधला. १७९५मधे याचे रिनोव्हेशन करुन लक्ष्मीनारायण मंदीर, यमेश्वर मंदिर, यमादित्य मंदिर बांधण्यात आले.
सिंदिया (शिंदे घाट) हा घाट १५० वर्षांपुर्वी बांधण्यात आला. असं म्हणतात की 'अग्नी'चा जन्म इथे झाला आहे. ध्यान-योग यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.

Brahma-Ghat1
आम्ही राहिलो तो ब्रम्हा घाट होता. बराचसा शांत, आणि स्वच्छ! ब्रम्हाघाटावर जवळजवळ ३०० महाराष्ट्रीयन ब्राम्हणकुटुंब रहातात.
पंचगंगा घाटावर किरणा, धुतपापा, सरस्वती, गंगा व यमुना या ५ नद्यांचा संगम आहे. तिथेच बिन्दुमाधवाचं मंदीर आहे.
मणिकर्णिका घाटः याला महाशमशान घाट म्हणतात.
manikarnika
तिथे २४ तास प्रेते जळत असतात.
मणिकर्णिका घाटाबद्द्ल मजेदार आख्यायिका आहे. असं म्हणतात की शंकराला भ्रमंतीपासुन रोखण्यासाठी पार्वतीने तिच्या कानातलं इथे लपवुन ठेवलं आणि ते शंकराला शोधायला सांगितलं. तेव्हापासुन शंकर ते शोधत तिथेच फिरत आहेत. इथे अग्नि दिलेल्या प्रेताच्या आत्म्याला शंकरजी "तु पार्वतीच्या कानातलं पाहिलं आहेस काय" असं विचारत असतात.
दशाश्वमेघ घाटः इथेच काशीविश्वेश्वर मंदीर आहे. ब्रम्हदेवाने इथे १० अश्वमेध यज्ञ केले होते असं म्हणतात.
main_gangotri_seva_samiti (फोटो- इंटरनेटवरुन साभार)
रोज सायंकाळी होणारी गंगेची विलोभनिय आरती याच घाटावर होते.
हरिश्चन्द्र घाटः हाही श्मशान घाटच आहे. सत्यवादी राजा हरिश्चंद्र याची कथा इथे घडते. महर्षी विश्वामित्रांना सर्वस्व दान केल्यावर राजा हरिश्चंद्र कल्लु नावाच्या डोमाला स्वत:ला इथेच विकतो.
मनमंदिर घाट: १७७० मधे महाराजा जयसिंग याने हा घाट बांधला.
तुलसी घाटः तुलसीदासांनी 'श्रीरामचरितमानस' याच ठिकाणी बसुन रचलं.
अस्सी घाट: झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म अस्सीघाटावर भदैनी क्षेत्रात १९/११/१८२८ साली झाला.
मुख्य काशीविश्वेश्वर मंदिरः

jyotirling- kashi vishwanath (आंतरजालावरुन साभार)

श्री काशीविश्वेश्वराचे शिवलिंग स्वयंभु आहे. वाराणसीवर अनेक परकीय आक्रमणं झाली. ११९४मधे तुर्की राजा कुतुबुद्दीन ऐबक याने, १३७६ मधे अफगाणी फिरोज शाह, १४९६मधे सिकंदर लोधी, यांनी वाराणसीमधली मंदिरे तोडायचं फर्मान दिलं. १६व्या शतकात शहेनशहा अकबराने थोडाफार या शहराचा विकास केला. आणि दोन मोठी शंकर आणी विष्णुमंदिरं बांधली. १६५६ मधे पुन्हा एकदा औरंगजेबाने इथली मंदिरं जमिनदोस्त करुन त्यावर मशिदी बांधल्या. मोगलांच्या हल्ल्याच्या वेळेस इथल्या पुजार्यांनी आधीच विचारपुर्वक निर्णय घेउन काशीविश्वेश्वर शिवलिंग जवळच असलेल्या 'ज्ञानवापी' विहिरीमधे टाकली.
dnyanvapi vihir (आंतरजालावरुन साभार)
त्यानंतर १७८०मधे इंदुरच्या महाराणी अहिल्याबाईंना दृष्टांत झाला. त्यांनी शंकराची पिंड विहिरीतुन काढुन सध्याच्या मंदिरात स्थापन केली. अशी दंतकथा आहे. नंतर इ.स्.१८३९मधे पंजाबकेसरी महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या शिखरावर सुमारे साडे बावीस मण सोन्याचा मुलामा चढवला.
kashi vishwanath mandir (आंतरजालावरुन साभार)
अन्नपुर्णा मंदिरः सध्याच्या अन्नपुर्णामंदिराची निर्मिती इ.स्.१७२५मधे थोरले बाजीराव पेशवे यांनी केली. या मंदिरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी केला जातो.
काळभैरव मंदिर: काळभैरवनाथ हा काशीनगरीचा कोतवाल आहे.
kal_bhairav_temple_wallpaper
Kaal Bhairava Temple,Varanasi1 (आंतरजालावरुन साभार)
इ.स.१७१५मधे बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचे निर्माण केले. मंगळवारी आणि रविवारी या मंदिरात गर्दी असते.
दुर्गा मंदिरः बंगालची राणी भगवतीने या मंदिराची उभारणी १८व्या शतकात केली. उत्तर भारतीय शिल्पकलेतील नागर शैलीचे हे मंदिर आहे. मंदिरात असंख्य वानर आहेत म्हणुन याला मंकी टेम्पलही म्हणतात. मंदिराच्या जवळ दुर्गाकुण्ड नावाचे पाण्याचे तळे आहे.
durga_kund_temple
कवडीदेवी: ही काशीविश्वेश्वराची बहिण. हिचे दर्शन घेतल्याशिवाय काशीयात्रा पुर्ण होत नाही असं म्हणतात. देवीला कवडी वहातात.
संकटमोचन मारुती मंदिरः
sankat mochan (इंटरनेटवरुन साभार)
संत तुलसीदासांनी मारुतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. हनुमन्ताच्या मुर्तीसमोर श्री रामसीता मंदिर आहे. मंदिरात सगळीकडे वानरसेना फिरत असते.
श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिरः सेठ रतनलाल सुरेकानी आपल्या आई भागीरथी देवी सुरेकाच्या स्मरणार्थ इ.स.१९६३मधे हे मंदिर बांधले. मंदिराच्या भिंतींवर गोस्वामी तुलसीदास यांचे 'श्रीरामचरितमानस' कोरलेले आहे.
असो. बॅक टु गुरुजींचा वाडा!
दुपारी जेवणं करुन थोडं लवंडलो. आणि लगेच संध्याकाळी ७ वाजेची गंगेची आरती सापडवायची होती.त्याआधी बाकीच्यांना काशीविश्वनाथाचं दर्शन घ्याय्चं होतं. म्हणुन घाटाच्या ३०-४० पायर्यांवरुन वयस्कर लोकांना गंगातिरी आणविले. 'बाबु' नावाचा पोरगेलासा नावाडी तयारच होता. जीव मुठीत धरुन आणि सर्व भार 'बाबु'वर सोडुन नावेत सगळे बसलो.
DSCN5439
कारण जरा नाव हलली की आमच्यातलं कुणीतरी ओरडायचं. बाबुला विचारलं तर काठावरच ४ फुट खोली आहे असं म्हणालेला म्हणुन सगळेच मनातुन चरकलेले होते. बाबुने होडी बॅलन्स व्हावी म्हणुन आधीच वजनानुसार लोक बसवले होते. भोसले घाट, पंचगंगा घाट, असे पार होता होता मणिकर्णिका घाट आला. दोन प्रेतं आधीच जळत होती. वातावरणात धुर पसरलेला. थोडा थोडा अंधार दाटु लागला होता. मणिकर्णिका घाटावर जळाउ लाकडांची चळत रचलेली होती. थोडसं घाबरतच हे अंतर पार केलं. सिंदिया घाट, ललिता घाट. ललिता घाटावर काशिविश्वनाथ मंदिराच्या लायनीत उभं रहायचं म्हणुन नावड्यासहित इतर लोक गेले. मी दोघी आज्जी, आणि आमचे जिजाजींना घेउन तिथेच थांबले. अंधार दाटलेला. पण तरीही एक बरं होतं की ललिता घाटावरची गंगाआरती ६.३०ला सुरु होते त्याची तयारी सुरु होती. दशाश्वमेघ घाटावरची मोठी आरती असते. त्यामानाने ललिताघाटावर लहान आरती होती. पण अगदी पुर्वतयारीपासुन आरती पहाता आली.
दर्शनाला गेलेले लोक आल्यानंतर फटाफट(?) नावेत बसलो. आणि दशाश्वमेघ घाटाकडे कुच केली. पण हाय रे दैवा! नावाड्याने आमची नाव बरीच अलिकडे 'पार्क' केली. का तर म्हणे आरती संपताच मोठ्या नावा इथुन जातील मग आपली नाव काढणं मुश्किल होईल.
त्यामुळे लांबुनच आरती बघुन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. इतर नावा नंतर भराभर पुढे निघुन गेल्या. आम्हाला परत ललिता घाटावर जाउन जेवायचे पार्सल आणायचे होते. म्हणुन पुन्हा ललिता घाटावर नाव पार्क करुन नावाडी पण गायब झाला. आमच्यातल्या ३ पैकी २ पुरुष जेवणाचे पार्सल आणायला घाट चढुन वर गेले. जवळ जवळ दीड तास आम्ही नावेत ठीगळसारखे बसुन राह्यलो. कारण जर्रा कुठे हलायची चोरी. अगदी कुणी खोकललं तरी नाव हलायची. आणि बाकीचे घाबरुन ओरडायचे. बरं बाजुला मणिकर्णिका घाट. तिथली प्रेतं अजुन जळत होती. रात्री गंगेवरचे वातावरण कुंद, त्यात 'तो' धुर. आमच्यातल्या पेशंट लोकांना त्रास व्हाय्ला लागला. घाटावर उतरुनही बसणार कसं? आमची ही १५ लोकांची पलटण पुन्हा नावेत बसवायलाही त्रास होणार होता.
पुन्हा आपलं ते 'जीव मुठीत' वगैरे. ९.१५ वाजता जेवणाचे पार्सल आणणारे लोक आले आणि आम्ही परत निघालो. रात्रीचं गंगेचं रुप भयावह नसलं तरी घाटावर लोक आणि नदीत नावा दिसत नसल्याने आमची सटारली होती खरं! ब्रम्हा घाटावर आल्यावर जीवाला भांड्यात पाडुन सगळे परत आपल्या रुमवर आलो.
दुसरे दिवशी सकाळी उठुन आम्हाला गंगास्नानासाठी जायचं होतं. गंगाभेट, संकल्प, अशी एक पुजा असते ती आम्ही करायचं ठरवलं.
फी: ५१/-
लागणारा वेळः १५ मिनिटे
१२ एप्रिल (शुक्रवार)
हा विधी गंगेच्या काठावरच करायचा असतो. विधी झाल्यावर पाण्यात उतरलो. भरपुर 'हर हर गंगे' करुन झाल्यावर घाटावर आलो. तिथे ही क्षेत्रपालांना ११ रु. दक्षिणा देउन टीळा लावुन घेतला. परत आल्यावर ज्यांना शिवलिंगावर अभिषेक कराय्चा होता ते गुरुजींच्या वाड्यावरच थांबले.
वाराणसीमधे घाटावरच्या प्रत्येक घरात एक तळघर असते म्हणे. आणि तिथे दगडी शिवलिंग स्थापन केलेले असते.
DSCN5427
तिथेच अभिषेक होतो.

आमच्या गुरुजींचे घर म्हणजे घरी गुलाबी दगडाचा ५ मजली चिरेबंदी वाडा. त्याचे तळघरच दोन मजली होते.. वाड्याच्या पायर्याही दमछाक होईल अशा. सर्वात खालच्या तळघरातुन थेट गंगेवरच जायला रस्ता होता. रचना जनरली उत्तरेकडे असतात तशी. मधे मोकळा पॅसेज्...वरपर्यंत. इतक्या निमुळत्या गल्ल्यांमुळे हवा, आणि उजेड यावा म्हणुन प्रत्येक घरात प्रोव्हिजन केली आहे. प्रत्येक मजल्यावर या मधल्या पॅसेजवर जाळी टाकलेली. कारण एकुणच वाराणसीमधे माकडांचा त्रास आहे. पॅसेजच्या अवती भोवती रुम्स, टॉयलेट, भिंतीतच असलेल्या पाण्याच्या टाक्या, विहिर इ.
मी आणि दोघी आज्जी, जिजाजी आमचं काशीविश्वनाथाचं दर्शन राहिलं होतं म्हणुन आम्ही सकाळी एका गाईडला बरोबर घेउन मजल दरमजल करीत बसत उठत त्या गल्ल्या पार केल्या. गाईडचा रेटः १००/-.
WP_000630
हुश्श...दमलो बुवा! गल्लीत एका ठिकाणी लस्सीवाला दिसला. कुल्हडमधली लस्सी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटली. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस तो दह्याच्या भांड्यातुन दही घ्यायचा. त्यात बाजुला असलेल्या थर्माकोल पेटीतुन बर्फ टाकायचा, साखर इ. मिक्स करुन रविने घुसळायचा. असं ६ जणांच्या लस्सीला अर्धा तास लागला.

ब्रम्हा घाट ते दशाश्वमेघ घाट अंतर साधारणतः शिवाजीनगर एस. टी. स्टँड ते लक्ष्मी रोड इतकं. पण तरी रिक्षावाल्यांनी ६ जणांचे १०० रु. घेतले. त्यात गंमत अशी की अजुन १०रु. मागुन घेतले. का तर म्हणे 'नो एंट्री'तुन घुसायचं आहे. पोलिसाला द्यावे लागतात.
आमची रिक्षा थोडी अलिकडे थांबवुन तो पळत पळत जाउन पोलिसाला देउन आला. मग रिक्षात परत येउन आम्हाला सुचना," ताकते मत रहो". आम्ही कशाला 'ताकतोय'!! तरी हळुच मी डोळ्याच्या कोपर्यातुन पाहिले. पोलिसही जणु काही त्याचं लक्षच नाहीये अशा अविर्भावात पाठ फिरवुन उभा होता. वा रे तेरी महिमा..काशी!!
काशीविश्वनाथ मंदिराचा एरिया म्हणजे आपल्या तुळशीबागेसारखा.
220px-Kashi_vishwanath_temple_street
किंबहुना त्याच्यापेक्षाही अरुंद बोळ. अगदी ऊनही खाली येणार नाही. असा परिसर. सगळीकडे ओल, चिकचिकाट. भाविक लोक बाहेरच्या दुकानातुन दुध घेउन मंदिरात जातात. दुधाच्या अभिषेकामुळे सगळीकडे निसरडे झालेले आहे. ते धुण्यासाठी मंदिराचे कर्मचारी सारखे पायर्यांवर पाणी ओतत असतात.
विश्वनाथाच्या मंदिराशेजारीच अन्नपुर्णा माता मंदिर आहे.
maa
अन्नपुर्णेची अजुन एक सोन्याची सुंदर मुर्ती पहिल्या मजल्यावर आहे. तिचं इतर वेळेस भाविकांना दर्शन नसतं. दिवाळीनंतर ३ दिवस अन्नकूट असतो. त्या तीन दिवसातच त्या मुर्तीचे दर्शन मिळते.
एवढ्या २-३ दिवसात १-२ भ्रमिष्टावस्थेतल्या विधवा स्त्रिया वगळता आम्हाला तिथे अशा स्त्रीया दिसल्या नव्हत्या. मात्र इथे मंदिराजवळ माझ्या बहिणीला मागुन आलेल्या एका तरुण विधवेने(पांढरी साडी, आणि डोक्यावर चिकन गोटा) जोरदार धडक देउन पुढे सरकली. पण नंतर बघितले तर तिथल्या पोलिसांशी 'ती' हसत खेळत बोलत होती.
दर्शन झाल्यावर गंगेचे कमंडलु, स्फटीकाच्या माळा वै. फुटकळ खरेदी केली. आणि परत वाड्यावर. तिथे बाकीच्यांचे अभिषेक ई. कार्यक्रम आटोपले होते. सायंकाळी ४ वा. काशीनगरी पहायला निघालो.
आमच्या यादीत :
संकटमोचन मंदिर
त्रिदेव मंदिर
तुलसी मानसमंदिर
कवडादेवी मंदिर
कालभैरव मंदिर
दुर्गाकुंड
ही नावं होती. दोन रिक्षा लागणारच होत्या. रिक्षावाले एवढं फिरवायचे ४००/- म्हणत होते. हो नाही करता करता ३५०/- वर गाडी निघाली.
प्राचीन संकटमोचन हनुमान मंदिरात खुप माकडं होती. काशीमधे आम्ही पाहिलेलं सर्वात सुंदर आणि आताच्या काळातलं मंदिर म्हणजे 'त्रिदेव मंदिर'. हनुमन्ताचा फक्त मुखवटा आहे. एका बाजुला राम, लक्ष्मण, सीता तर एकीकडे अंजनीदेवीचं मंदिर. तिच्या कुशीतला बाल हनुमान खुपच गोंडस होता.
त्यानंतर सत्यनारायण तुलसीमानस मंदिर, दुर्गादेवी मंदिर केले. अंधार पडु लागला होता. कवडीदेवी मंदिर शहराच्या एका बाजुला आहे. तिकडे जाऊ की नको संभ्रमात होतो. पण रिक्षावाल्याला ठरवल्याप्रमाणे गेलो. आणि एवढ्या लांब गेल्याचं समाधान वाटलं. कवडीदेवीची मंदिर लहानसं असलं तरी मुर्ती खुपच सुंदर आहे. देवीला कवड्या देउन काशीयात्रेची सांगता झाली.
इतरांचं कालभैरवाचं दर्शन राहिलं होतं म्हणुन पुन्हा सगळी पलटण कालभैरव मंदिराकडे गेली. त्यांचं दर्शन होईस्तोवर आम्ही पेटपुजा आटोपुन घेतली. आणि वाड्यावर जायला निघालो. रस्त्यात लखनवी कुर्ते, बनारसी साड्या इ. खरेदी केली. बाहेरच हादडुन रात्री १०नंतर रुमवर परत.
मग सामानाची बांधाबांध. सकाळी ११.१५ची गाडी होती. आम्हाला बरोबरच्या वयस्क लोकांना घेउन चालत त्या गल्ल्यांमधुन जायचे असल्याने ९.००च निघायचे होते.
१३ एप्रिल (शनिवार)
सकाळी उठुन चहा घेउन निघालो. रस्त्यात भाजीमंडई दिसल्यावर बरोबरच्या बायकांना 'नविन काही भाजी दिसली तर घेउ' असं मनात आल्याने थांबलो.:फिदी:
rasbhari
'रसभरी' फल या नावाची ऑरेंज कलरची बोराएवढी फळं असतात ती घेतली. स्वाद काही विशेष नाही. चेरीसारखा आंबट गोड आहे. विशेष काही वेगळ्या भाज्या, किंवा रेटमधे फरक दिसला नाही. नाही म्हणायला, आपल्याकडे मिळणारी सापासारखी पडवळ तिकडे तोंडली किंवा तत्सम थोड्या मोठ्या आकारात मिळते. दोन्ही गुरुजींकडे जेवणात आम्हाला त्याचीच भाजी होती.
काशीच्या स्टेशनवर आल्यावर बघितलं तर गाडी तासभर लेट होती. तिथुनच लंच पॅकेट्स घेतले. 'महानगरी' एक्स्प्रेस मात्र त्यातल्या त्यात बरी होती. बहुतेक सर्व महाराष्ट्रीयन पब्लीक बरं होतं. गाडी २ तास लेट झाली, तरीही येतांनाचा प्रवास इतका मात्र जाणवला नाही. रात्री जेवण येइस्तोवर अंताक्षरी खेळुन आम्ही डबा दणाणुन सोडला होता(आणि त्यातल्या त्यात उडत्या चालीच्या/ मराठी लावणी गीतांनी).
१४ एप्रिल (रविवार)
सकाळी ९वा. गाडी भुसावळला आली. ‘पुढच्या वर्षी पुन्हा आता असच ग्रुपने तिरुपती किंवा वैष्णौदेवी जायचं’ असं ठरवुन तिथे काही जणांना अलविदा केलं. आमच्या ६ जणांचं तिकीट कल्याणपर्यंत होतं. पण कल्याणहुन इतकं सामान घेउन येण्यास सोयिस्कर गाडी नसल्याने आणि गाडी लेट झाल्यावर पुढच्या कनेक्टेड (कल्याण ते पुणे) ट्रेनचं रिझर्वेशन करु शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही सकाळी ११वा.मनमाडलाच उतरलो. तिथे वहिनीचे काका स्कॉर्पिओ घेउन हजर होते. कोपरगाव च्या अलिकडे निघणारा पोहेगाव फाटा, संगमनेरजवळ नाशिक-पुणे रोडला येउन मिळतो. रस्त्याचा एक पॅच अतिशय खड्ड्यांचा आहे. इतर वेळेस रस्ता निर्मनुष्य असतो. तरीही पुणे मुक्कामी पोहोचण्यास संध्या. ६ वाजले. रेल्वेभाडे सोडुन आणि वैयक्तिक पुजाविधीचा सोडुन प्रत्येकी १५००/- खर्च रहाण्या/ खाण्यापिण्याचा आला.
अशा तर्हेने काशीयात्रेची सांगता झाली.

आमेन!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही! मनासारखी यात्रा झालेली दिसतेय. छान लिहीलस. परत एकदा वाचायचे आहे.:स्मित:

कौतुक वाटते तुझे, आईची इच्छा पुर्ण केलीस्.:स्मित: असाच छान प्रवास वारंवार होऊ दे आणी तुझ्या कडुन फोटोसहीत वृत्तांत मिळू दे.

व्वा ! मस्तच दिलास कि वृत्तांत !
काही काही फोटो मोठे असणं मस्ट आहे असं वाटतं. अलाहाबादचं स्वामीनारायण मंदीर छान असावं असं वाटतंय. फोटो खूप लहान आहे.

नवीन कुणी जाणार असेल त्याला या वृ चा उपयोग होइल.

छान लिहिलाय वृत्तांत, अगदी बारीकसारीक तपशीलासह. Happy
गेल्याच महिन्यात आमचे काशी दर्शन झाले. काशीने मात्र माझी परिक्षा पाहिली!! बनारस हिंदु युनिवर्सिटी सेंटर होते. प्रचंड मोठ्ठ कँपस, जणु वेगळ गाव.
महाकुंभ नुकताच झाला होता, अन महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर-पार्वती विवाहासाठी तोबा गर्दी. १८ तास लोक रांगेत उभे होते दर्शनासाठी. २ दिवसांनी मात्र तासाभरात दर्शन मिळाले.
अप्रतीम कचोरी, चाट आणि लस्सी!! काशीच प्रसिद्ध टमाटर चाट मात्र खायचे राहीले.

आर्या छान तपशीलात लिहिलस अगदी. Happy

फोटो मोठे हवे होते.
आज्जी लोकांच्या ईच्छा पुर्ण केलीस.
व्हेरी गुड Happy

आर्ये.......तुजप्रत कल्याणमस्तु!
छान गं ......मोठ्यांची इच्छापूर्ती केलीस. सगळं डीटेलवार लिवलंस! आणि मस्त फोटोही!

छान लिहीलेय,
मला फिरायला जायचे आहे. बघु कधी योग येतो. तुझी, शोभादेवीची यात्रा छान झाली असल्याने हा आनंद वर्षभर नक्की पुरेल.

सुरेख वर्णन. अगदी तपशिलवार आणि मुख्यतः खर्चासहित दिल्याने इतरांना (ज्यांना काशीयात्रा करायची आहे) उपयोगी पडेल.
फोटो रिसाईज करुन टाक ना नैना Happy
वेणीदान आणि गंगेची आरती परवा फॉक्स ट्रॅव्हलरवर बघितली होती.

छान व्रुत्तांत. आवडला.

बाकी स्वामिनारायण मंदीर मस्त वाटातय.

वेगवेगळे विधी इ. वाचायचा जरा कंटाळा केला. नंतर नीट वाचेन.

रेल्वेभाडे सोडुन आणि वैयक्तिक पुजाविधीचा सोडुन प्रत्येकी १५००/- खर्च रहाण्या/ खाण्यापिण्याचा आला.
>>> रु. १५००/- का रु. १५०००/-?

रेल्वेभाडे सोडुन आणि वैयक्तिक पुजाविधीचा सोडुन प्रत्येकी १५००/- खर्च रहाण्या/ खाण्यापिण्याचा आला.
>>> रु. १५००/- का रु. १५०००/-?>>>>>>>>>>>>>>>>>फ़क्त १५००/- कारण आम्ही १५-१६ जण होते. त्यामुळे रहाण्याचा व खाण्याचा खर्च विभागला गेला. Happy

रु. १५००/- का रु. १५०००/-?>>>>>>>>>>>>>आम्ही काशीला गेलो होतो. काश्मिरला नाही. Wink

आर्ये जमून आलाय वृत्तांत डीटेल्स तर सहीच ,
पाय कुठे आहेत नमस्कार करीन म्हणतो तीर्थक्षेत्रास जाऊन आलीस ना ______/\______

व्वा ! आर्या तै मस्तच
बरं झालं सविस्तर वृत्तांत दिलास ते,
कधी कोणाच जाण झालच तर त्याला आधी हा वृत्तांत वाचायला सांगेन !

Pages