चिंतामणी शानभाग दिवाणखान्यातल्या जिन्याच्या पायरीवर बसला तेवढ्यात वृंदाची आतून आरोळी आली, “मणी, अरे मंदिरात जायला उशीर नाही का होत? सगळे खोळंबले असतील नं? “
“आम्ही लगेच निघतोय. आशूला पाँटीला वेळ लागला ” मणीने तेव्हड्याच आवाजात उत्तर दिलं आणि तो आशुतोषला म्हणाला
“आशू बाळा, चला चला, साई बाबा आपली वाट बघताहेत नं?”
आशू बोबड्या स्वरात म्हणाला “मणी, आशू चला चला, बाबा वाट बघतो.”
आशू आपली नवीन चड्डी वर ओढत आणखी दोन पायऱ्या चढला आणि मणीच्या पाठीवर त्यानं धपकन उडी घेतली.
मणी ओरडला “आशू, हळू, पडशील नं रे.”
आशू म्हणाला “मणी, आशू चला चला, बाबा वाट बघतो.”
वृंदा बाहेर आली आणि म्हणाली “मी पूजेला बसते आहे, आरतीच्या अगोदर मंदिरात पोचेन. गणू थोडया वेळात नैवेद्य घेऊन निघेलच.”
मणी आशूला पाठीवर घेऊन उठला. त्यानं वृंदाला विचारलं “ माधव आणि गुरु पुढे गेले का? “
वृंदा म्हणाली “ हो केंव्हाच गेलेत, आज सर्वांचाच उपास असल्यानं त्यांनी फक्त दूध घेतलंय. मी आशूला नाश्ता भरवलाय.”
आशू मणीच्या केस नसलेल्या डोक्यावर हात फिरवायला लागला “मणी, आशू चला चला, बाबा वाट बघतो.”
मणीचा सहा फुटी देह आशूच्या वजनाने कमरेत वाकला आणि पाठीवर पोतं घेऊन लगबगीनं चालणाऱ्या हमाला सारखं तो चालू लागला “ चला चला, बाबांना भेटायला चला, भजन म्हणायला चला, आरती म्हणायला चला “
आशू म्हणाला ““मणी, आशू चला चला, बाबा वाट बघतो.” आशूच्या तोंडातली लाळ मणीच्या मानेवर पडली. मणीनं खिशातून रुमाल काढून आशूच्या हातात कोंबला “आशू बेटा, तोंड पुस, आपल्याला मोठ्यानं भजन म्हणायचं आहे नं?”
मणी आशूला घेऊन बंगल्याच्या बाहेर पडला. बंगल्यापासून मंदिर चालत पाच सात मिनिटाच्या अंतरावर होतं. अण्णांनी, म्हणजे मणीच्या वडिलांनी जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी मणीच्या नावे जमिनीचा तुकडा घेतला होता त्यावरच मणीनं साई बाबांचं मंदिर बांधलं होतं. त्यालाही बारा वर्षं झाली. मणीचा आशूला पाठीवर घेऊन मंदिरात जाण्याचा हा शिरस्ता सुध्दा बारा वर्षांचा होता, ज्याला क्वचितच खंड पडत असे. वर्षातून एकदा सर्व कुटुंब एकत्र मंगळूरला जाई तेंव्हा मणीला आणि आशूला साई मंदिरातील भजन आणि आरती चुकत असे पण तो एक आठवडा आशू अतिशय अस्वस्थ आणि रडवेला होई. मग त्याला मंगळुर मधल्या साई मंदिरात घेऊन गेल्यावर तो जरा शांत होई. आज तिथीने आशूचा वाढदिवस होता आणि राम नवमी सुध्दा. साई मंदिरात आज वार्षिक महापूजा होती आणि मंदिराचे विश्वस्त म्हणून माधव आणि गुरु आज खूपच व्यस्त होते. मणी सर्वात लहान भाऊ पण माधव, गुरु आणि मणी मधे फक्त तीन, तीन वर्षांचच अंतर होतं. मणीच्या दोन्ही मोठ्या भावांचे दोघेही मुलगे आता कौटुंबिक व्यवसायात शिरले होते. मणी आणि वृन्दाच्या पहिल्या आणि एकुलत्या अपत्यानं म्हणजे आशुतोषनं आज वयाची सतरा वर्षं पूर्ण केली.
आण्णांनी त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी परंपरेनं चालत आलेली भिक्षुकी करायला नकार देत, वडिलांशी भांडून घर आणि गाव सोडलं. आण्णा पळून पुण्याला आले. खानावळीत पोऱ्या म्हणून बरीच वर्षं काढल्यावर आजीवन अविवाहित असलेल्या आणि संघ परंपरा काटेकोरपणे पाळणाऱ्या वृद्ध मालकानी आण्णांच्या सुप्त गुणांची कदर करत खानावळीची सूत्र आण्णांच्या स्वाधीन केली. पुढच्या दहा वर्षांच्या काळात अण्णांनी सचोटीने आणि निष्ठेने खानावळ चालवली आणि अंथरुणाला खिळलेल्या मालकाची देखभाल केली. स्वताच्या बापाच्या मृत्युनंतर देखील गावाला नं परतणाऱ्या आण्णांना मालक गेल्यावर मात्र एकुलता आधार तुटल्या सारखं ढसाढसा रडू आलं. मालकांनी खानावळ त्यांच्या नावानं केल्याचं त्याना वकिलाकडून नंतर कळलं. स्थिरता आल्यावर अण्णांनी गावी असलेल्या आणि वयानं खूप मोठ्या बहिणीच्या सुचवण्यानुसार लग्न केलं आणि संसारात मग्न झाले.
माधवचा जन्म झाल्यावर आण्णांना मुलाचा बाप म्हणून स्वतःविषयी अतिशय अभिमान वाटला आणि ते सोयीस्कर रित्या त्यांच्या वडिलांच्या त्यांच्या विषयी काय भावना असाव्यात ते विसरून गेले. माधवच्या पाठोपाठ गुरुनाथ जन्मला आणि आण्णांची मान आणखी उंचावली. मुलांच्या जन्मानंतर धंद्यात अधिकच बरकत आली आणि समाजात मानाचं स्थान सुध्दा मिळालं. अतिशय गरिबीत आणि भिक्षुकी करणाऱ्या माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या आण्णांना आता त्यांचं कुटुंब एक घराण वाटू लागलं. ते अभिमानानं सांगत की शानभाग घराण्यात कसे मुलगे जास्त जन्मतात आणि पुढे सहा फुटी होतात. पण शानभाग घराण्यात अकाली टक्कल पडण्याचं प्रमाण पण खूप आहे हे सांगायला ते विसरत.
आण्णा कर्मठ होते आणि जरी ते घर सोडून पळून आले असले तरी संस्कार सोडून आले नव्हते. स्नान आणि संध्या झाल्या शिवाय कधी त्यांनी दिवसाची सुरुवात केली नाही. मालक आजारी पडल्यानंतर त्यांचं देवघर सुध्दा आण्णांच्या स्वाधीन झालं होतं. पण पूर्वी मालकांची खानावळ “भटाची खानावळ“ म्हणून ओळखली जात असे ती कालांतरानी “उडूप्याची खानावळ“ म्हणून ओळखली जाऊ लागली.
तिसरं अपत्य कन्यारत्न असावं अशी आण्णांची खूप इच्छा होती आणि विनाकारण तसं ते गृहीत धरून चालले होते. त्यांची तयारीही जय्यत होती. मुलींची नावं, होणाऱ्या कन्येसाठी सोनं नाणं, बाहुल्या आणि अनेक खेळणी या गोष्टी अतिशय उत्साहानं त्यांनी गोळा केल्या होत्या. त्याच सुमारास दूरदृष्टी म्हणून त्यांनी एक प्लॉट पण घेतला. त्यांची दोन मुलं कधी विभक्त रहातील ही कल्पना सुध्दा त्यांच्या मनाला शिवली नव्हती पण मुलगी लग्न होऊन गेल्यावर हाकेच्या अंतरावर असावी अश्या भाबड्या भविष्यातील आशेनं त्यांनी हा प्लॉट घेतला.
तिसऱ्या मुलाच्या जन्मानं त्यांची घोर निराशा झाली आणि ही गोष्ट त्यांच्या उर्वरित आयुष्यात ते अनेकदा उध्रुत करत राहिले. शेंडेफळ म्हणून चिंतामणी आईचा अतिशय लाडका होता पण आण्णांनी अकारण त्याला दुर्लक्षलं आणि त्याच्यात एक प्रकारे आण्णां विषयी बंडखोरी निर्माण झाली.
माधव आणि गुरु एकापाठोपाठ आण्णांच्या व्यवसायात सामील झाले आणि त्यांनी आयुष्यात दुसरं काहीतरी करायचा विचार मनात आणला नाही म्हणजे निदान कधी बोलून तरी दाखवला नाही. दोघांनीही एक दोन वर्षे कॉलेज मधे उनाडक्या करत घालवल्यावर ते निमुटपणे आण्णांच्या बरोबरीने होटेल सांभाळू लागले. आण्णांना त्यांच्या पुढील शिक्षणाविषयी फारशी चिंता किंवा महत्व वाटत नव्हतं पण त्यांचा तोंडी हिशोब पक्का आहे नं याची त्यांनी खात्री करून घेतली आणि त्यानंतर हॉटेलच्या नोकरांना कसं आपल्या कह्यात ठेवायचं याचं शिक्षण ते त्या दोघांना देऊ लागले.
माधव आणि गुरु मदतीला आल्यावर आण्णांची उमेद आणखी वाढली आणि काही काळातच शानभाग कुटुंब पुण्यात तीन होटेलं चालवू लागलं. आण्णांनी गावाकडचं पडीक कौलारू घर बिल्डरला देऊन मोबदल्यात त्यावर झालेल्या इमारतीत दोन मोठ्ठे फ्लँट मिळवले आणि त्यातला एक बहिणीला दिला. दरवर्षी मंगळूरला जायची शिस्त अण्णांनी मुलांना लावली आणि आपला सांस्कृतिक दुवा ते जपू लागले.
मणी बऱ्याच बाबतीत आपल्या भावांपेक्षा वेगळा होता. मणीला होटेल चालवण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. तेथे आण्णांची हुकुमत चाले आणि मणीला ते काम पण जरा कमी प्रतीचं वाटे. याचा पर्याय म्हणून असेल किंवा त्याची कॉलेजमध्ये वृंदा गोखलेशी ओळख झाली म्हणून असेल, मणीनं शिक्षणाची कास धरली.
विद्यापीठातून बाहेर पडे पर्यंत मणी आणि वृंदानं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि वृंदाच्या घरी तिला विरोध नव्हता. पण आण्णा काय म्हणतील याची त्या दोघांना काही कल्पना नव्हती. एम कॉमच्या परीक्षेचा निकाल घेऊन मणी आण्णांच्या समोर उभा राहिला आणि प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याचे सांगून आण्णांकडून कौतुकाची अपेक्षा केली पण नेहमी प्रमाणे निराशा पदरी आली. उलट आण्णांनी त्याला यापुढे होटेल मधे लक्ष घालायचा सल्ला दिला.
वृंदा दिसायला सुमार होती पण रंगानं पांढरेपणा म्हणावा इतकी गोरी होती आणि हे वैशिष्ट्य मणीला पसंत होतं. त्याव्यतिरिक्त ती आपलं वेगळेपण साडी नं घालता एकदम जीन्स आणि टाँप घालून व्यक्त करत असे. पत्रकारितेची पदवी घेऊन आणि जुजबी नोकरी धरून ती मणीच्या एम कॉम होण्याची वाट पहात थांबली होती.
हॉटेलात अव्याहत नं बसण्याची तडजोड म्हणून मणीनं संपूर्ण धंद्याचे हिशोब आणि सरकारी अधिकाऱ्यांशी धंद्याच्या संदर्भात करावे लागणारे सर्व व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि आण्णांना हायसं वाटलं. पण आण्णांच्या समाधानाला लवकरच मणीनं धक्का दिला. एका सुट्टीच्या दिवशी सर्वजण बंगल्याच्या दिवाणखान्यात बसले होते आणि आण्णा आपल्या दोन नातवंडांशी खेळत होते तेंव्हा अचानक मणी स्कूटर वरून वृंदाला घरी घेऊन आला. मणीनं असं करण्यामागे आदल्या दिवशी आण्णांनी बोलून दाखवलेला मणीच्या लग्नाचा घाट होता. आण्णांना त्यांचे मित्र आणि शहरातले रेस्टाँरंट मालक कामतांची मुलगी मणीसाठी पसंत होती आणि त्यांनी तशी बोलणी सुरु केली होती.
घरात शिरता क्षणी मणीनं फारशी प्रास्ताविक नं करता वृन्दाची ओळख त्याची भावी पत्नी म्हणूनच करून दिली. या अनपेक्षित प्रकाराने आण्णा, माधव आणि गुरु तोंडाचा आ वासून बघतच राहिले पण माधवच्या बायकोने वेळ सावरून नेली आणि ती वृंदाला आत घेऊन गेली.
वृंदा शानभाग कुटुंबात आली खरी पण ती सदैव बाकी कुटुंबाशी विसंगत म्हणूनच वावरली. लग्ना नंतर सुध्दा तिच्या पेहेरावात बदल झाला नाही तर उलट अधिकच फरक आला. घरातील आणि नात्यातील इतर स्त्रियांप्रमाणे ती कपाळावर कुंकू लावत नसे आणि मंगळसूत्र आणि बांगडया घालायला तिनं चक्क नकार दिला. तिच्या वागण्यातून कुटुंबातील व्यक्तींचा अशिक्षितपणा, साधेपण किंवा गावंढळपणा बद्दल नाराजी दिसून येई. एखाद्या परक्या माणसाला पण जाणवे की फक्त मणी साठी ती एकत्रात राहण्याची तडजोड करत आहे.
लग्ना नंतर सुध्दा मणीचा बराचसा वेळ घरी जात असे कारण त्यानं बंगल्याच्या आउट हाउस मधे आपलं ऑफिस उघडलं होतं. माधव आणि गुरूच्या मुलांना त्याच्या ऑफिस मधे जायची आणि दंगा करायची पूर्ण मुभा होती. मणीला लहान मुलं खूप आवडत. वृंदाला मात्र मणीच्या उलट मुलांचं वावडं होतं. लग्ना नंतरची दोन तीन वर्षं वृंदाच्या चालढकल करण्यात गेली पण जेंव्हा ती मुलासाठी तयार झाली तेंव्हा मूल होण्याची चिन्हं दिसेनात. त्या सुमारास मणीची आई खूप आजारी पडली आणि तिच्या आग्रहास्तव मणी आणि वृंदा शिरडीस साई दर्शनाला आले. साई बाबांच्या दर्शनाने भारावलेल्या मणीने मनोभावे नवस केला की त्यांना मूल झाल्यास शानभाग कुटुंब पुण्यात साई मंदिर बांधेल. मणी आणि वृंदा परत येई पर्यंत मणीच्या आईनं देहत्याग केला आणि आण्णा एकाकी झाले.
आशुतोषचा जन्म मणी आणि वृंदाच्या लग्नानंतर जवळजवळ पाच वर्षांनी झाला आणि घरात आणि एका मुलाची भर पडली. मणी अतिशय खुश होता. आता त्याच्या शिरडीस वाऱ्या अधिक झाल्या होत्या. केंव्हाही वेळ मिळाला की तो आशुतोषला गाडीत घालून शिरडीला जाई. वृंदा नाही आली तर गणू बरोबर असे. आशुतोषचा जन्म राम नवमीला झाला हा एक दैवी योगायोग आहे असं तो मानू लागला होता. अर्थात आशुतोष एक सिझेरिअन बेबी आहे याची वृन्दाने परत परत आठवण करून दिल्यावरही त्याच्या विश्वासाला कुठेही तडा जात नव्हता.
आशुतोष दोन वर्षांचा होईपर्यंत कुणालाच शंका आली नाही. पण तो आधार घेतल्याशिवाय पाउल टाकू शकत नाही किंवा मणीला पप्पा अन् वृंदाला मम्मी म्हणू शकत नाही याची सर्वांना चिंता वाटू लागली. आण्णांना फक्त तो “आ..” म्हणून हाक मारत असे. शानभाग कुटुंबियांच्या डॉक्टरांनी त्यांना धीर दिला “ काही, काही मुलांना वेळ लागतो शिकायला. ही एक निसर्गाची प्रक्रिया आहे, काळजी करायचं कारण नाही पण आशुतोषचे कान तपासून घेऊया.”
आशुतोषच्या तिसऱ्या वर्षां पर्यंत त्याच्यात काहीतरी गंभीर स्वरूपाची कमतरता आहे याची जाणीव सर्वांना झाली होती. ख्यातनाम बालरोगतज्ञ डॉक्टर हट्टंगडी यांनी जेंव्हा आशूला तपासलं तेंव्हा त्यांनी शंका बोलून दाखवली की आशूला सेरेब्रल पाल्सीने ग्रासलं आहे किंवा त्याला आँटीजम हा जन्मता असणारा विकार आहे. अजून लहान असल्यानं नक्की निदान करता येणं कठीण होतं. तरीही डॉक्टरनी काही उपचार सुरु केले, या आशेनं की पुढे होणाऱ्या परिणामांची तीव्रता तरी कमी करता यावी.
सर्वात अधिक धक्का आण्णांना बसला. त्याना हे समजेना की शानभाग घराण्यात असं हे कसं झालं? त्यांच्या फटकळ स्वभावानं आणि वाढत्या वयानं त्यांचं तारतम्य बिघडलं होतचं पण हा वर्मी लागलेला घाव त्याना सहन होईना. त्यांचा नातू मंदमती निघावा हे दुखः त्यांना असह्य झालं आणि एके दिवशी त्याचा उद्रेक झाला आणि मणी आणि आण्णांचा जोरदार वाद झाला.
“माझ्या नातवाच्या अश्या स्थितीला वृंदा कारणीभूत आहे. मणी तू माझं कधीही ऐकलं नाहीस. मी तुला जन्म दिला आणि या जगात आणलं पण त्याची काहीही कृतज्ञता तुझ्यात नाही. योग्य मुलीशी लग्न नं करण्याचा हा परिणाम आहे.” आण्णा म्हणाले
मणी प्रथम स्तब्ध झाला पण नंतर उसळून म्हणाला “आण्णा, मुलं कशी होतात हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. जगातला कोणताही मुर्ख, चोर, दरोडेखोर, खुनी आणि दारुडा शारीरिक क्रियेनं
एकदा नव्हे तर अनेक वेळा मुलं तयार करू शकतो. झोपडपट्टीत तर सतत पोरं उंदराची पिल्लं होतात तशी पैदा होतात. फारशी अक्कल लागत नाही का त्यामागे पितृत्वाचा उदात्त हेतू लागतो. मी तुमच्या मुळे जन्माला आलो या बद्दल अजिबात ऋणी नाही. उलट मी माझ्या वर्तणुकीने चांगला आहे म्हणून तुम्ही माझे ऋणी असायला पाहिजे. तुमचे एवढेच उपकार माझ्यावर आहेत की तुम्ही माझ्या संगोपनाची जबाबदारी टाळली नाहीत. या जगात कितीतरी बाप आपली जबाबदारी टाळतात. तुम्हाला जन्माला घालण्याची काय तर मुलगा का मुलगी हे जाणून घेण्याची देवानं पात्रता दिली नव्हती तेंव्हा “मी तुला जन्म दिला” वगैरे नाटकी वाक्यं माझ्यावर फेकू नकात. वृंदा बद्दल तर तुम्ही चकार शब्द बोलायची गरज नाही. जो माणूस स्वतःच्या बापाच्या मृत्यूनंतर सुध्दा त्याला अग्नी द्यायला गेला नाही त्यानं कोणाच्याही मातृत्वावर बोट उचलू नये. आशू हे मला देवानं दिलेलं फळ आहे आणि ते मी बिन तक्रार स्वीकार केलं आहे. तुमच्या भ्रमा प्रमाणे जर मी त्याला जन्म देण्याचं महान कार्य केलं असेल तर मी अतिशय निर्दयी माणूस असला पाहिजे आणि तुम्ही संत! त्याच्या जन्माला आणि त्याच्या स्थितीला नियती कारणीभूत आहे पण त्याच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी मी आयुष्यभर घेणार आहे आणि आशू आहे तसा मला माझ्या जिवा पलीकडे प्रिय आहे. मी आणि वृंदानं निर्णय घेतला आहे की आशू आमचं एकच अपत्य असेल आणि कोणत्याही कारणांनी त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू इच्छित नाही तेंव्हा यापुढे तुम्हीच काय पण कोणीही हा विषय पुन्हा काढायचा नाही.”
मणी तडक आशूला घेऊन शिरडीस निघून गेला आणि दोन दिवस परतला नाही. सर्वजण हवालदिल झाले. आण्णांनी तेंव्हापासून हाय खाल्ली. त्यांना स्वताच्या रागानं बोलण्याचा पश्चात्ताप होत होता.
आण्णांचा स्वभाव त्या घटने पासून बदलत गेला आणि ते खूप मवाळ झाले. काही वर्षां पूर्वी ते वारले पण जाण्याच्या काही महिने अगोदर अंथरुणाला खिळले असताना ते मणीला आणि आशूला जवळ बसवून सांगत “ मणी, तुझ्या पोटी तुझ्या आज्यानं जन्म घेतलाय. मला माहित आहे.”
मणीनं बोलल्या प्रमाणे साई बाबांचं मंदिर बांधलं. त्याच्या खर्चा साठी माधव आणि गुरूला आपला व्यवसायातील हिस्सा देऊ केला होता पण दोन्ही भावांनी त्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही. मणीला ट्रस्टचा विश्वस्त होण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. तो आपलं ऑफिस आणि आशू यांच्यातच मग्न होता आणि त्याला इतर गोष्टीसाठी अजिबात वेळ नव्हता. आता मंदिराच्या ट्रस्टचे हिशोब आणि वाढत्या व्यवसायाचे हिशोब सांभाळताना दमछाक होई. त्यानी डॉक्टर हट्टंगडी, नायक वकील याना माधव आणि गुरु बरोबर विश्वस्त म्हणून नेमलं. भाविकांनी दिलेल्या देणगीने मंदिराचं उत्पन्न जसं वाढू लागलं तसं मंदिराच्या ट्रस्टच्या स्पास्टिक सोसायटीला आणि अपंग मुलांच्या संगोपनासाठी देणग्या सुध्दा वाढू लागल्या.
मंदिर दृष्टीक्षेपात येताच आशुची चुळबुळ वाढली आणि त्याला पोचायची घाई होऊ लागली हे मणीला कळत होतं. मंदिराच्या सभाग्रहात खचाखच लोक भरले होते आणि बाहेर पण गर्दी दिसत होती. मणीनं खांद्यावरून आशूला पायऱ्यांवर उतरवलं. आशू आता खूप घाईत होता. नेहमीच्या सवयीनं तो तडक गाभाऱ्याकडे चालू लागला. उजव्या हातानं त्यानं गळकी चड्डी वर ओढली. त्याचा डावा हात तोल सांभाळण्यासाठी जोर जोरात हालत होता. पाय गुढग्यात तिरके अन् फेंगडे झाले होते पण त्यामूळे त्याची चालण्याची गती कमी झाली नव्हती. त्याचं पूर्ण लक्ष एकाग्रतेनं बाबांच्या मूर्ती कडे लागलं होतं पण त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव अजिबात बालिश नव्हते. आशूला वाट देत गर्दी दुभंगली. सर्वांना आशू परिचित होता. भाबड्या बायकांनी आशूला पाहून हात जोडले. मणी आशुच्या मागोमाग होता. मणीला आज विश्वस्त कमिटी मधे काय विषय निघणार आहे याची कल्पना होती.
आशू आपल्या नेहमीच्या चौरंगावर जाऊन बसला. त्याला त्याचे वाकडे पाय दुमडून मांडी घालता येत नसे म्हणून त्याच्या साठी बाबांच्या मूर्ती समोर एक चौरंग ठेवलेला असे. मणी आशूच्या मागे बसला आणि त्यानं गुरुजींना खूण केली. गुरुजींनी आशूच्या कपाळावर गंध लावलं. भजन सुरु होण्याच्या अपेक्षेनं आशूनं पुढे मागे डोलायला सुरुवात केली आणि त्याचा डावा हात आपोआप वर खाली होऊ लागला. पेटीवाल्याने सूर लावला आणि तबलजीने ठेका धरला. गुरुजींनी सुरुवात केली –
ओम् नमो सत्चिदानंद साई नाथाय नमो नमः !
गुरुजींच्या पाठोपाठ सर्वांनी एका सुरात भजन म्हणायला सुरुवात केली आणि मंदिराचा परिसर दुमदुमून उठला.
आरती होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. गणू नैवेद्याचं ताट घेऊन आला होता आणि वृंदा सुध्दा आरतीला होती. हॉटेल मधून मोठ्ठ्या भांड्यातून गोड बुंदी प्रसाद म्हणून आली होती. स्वयंसेवक दर्शन घेऊन जाणाऱ्या भक्तांना कागदाच्या द्रोणात बुंदीचा प्रसाद देत होते. मणी म्हणाला “ मी ट्रस्टी मीटिंग मधे जातो. आशू माझ्या बरोबर आहे.” वृंदा म्हणाली “ ठीक आहे, मी घरी जाते. मला घरी जेवणासाठी मदत करावी लागेल. आज नायकमामा आणि डॉक्टर हट्टंगडी पण आहेत असं माधवदादा म्हणाले.” मणी त्यावर काही बोलला नाही, तो आशूला हाताला धरून विश्वस्त ऑफिस मधे शिरला.
सर्वजण अगोदरच जमले होते तेव्हड्यात गुरुजी प्रसाद घेऊन आले आणि त्यांनी सर्वांना प्रसाद वाटला. माधव म्हणाला “ गुरुजी, तुम्हाला माहित आहे नं आज मठाचे स्वामी येणार आहेत ते?”
गुरुजी म्हणाले “ हो माधव. संध्याकाळच्या पूजेची यथायोग्य तयारी आहे. त्यांचं प्रवचन तासभर चालेल अशी अपेक्षा आहे, त्यानंतर पूजा आणि आरती, काय?”
गुरु म्हणाला “ मी हार आणि शाल, श्रीफळ आणायला सांगितलं आहे.”
नायक वकील म्हणाले “ आज रात्री स्वामींचा मुक्काम माझ्या घरी आहे. बर तर, आज काही अजेंडा?”
माधव वकिलांना म्हणाला “मणी आणि डॉक्टरना साधारण कल्पना आहे की आज आपण जरा एका घरगुती बाबीवर तोडगा काढणार आहोत आणि त्यासाठी तुमचं आणि डॉक्टरांचं मत आम्हाला हवं आहे “
गुरुजी म्हणाले “ मला जरा काम आहे संध्याकाळच्या प्रोग्रामचं, मी येतो.”
गुरुजींनी बाहेर गेले आणि त्यांनी आपल्या मागे दार लावून घेतलं.
आशू शांतपणे खुर्चीत आपला डावा हात आणि पाय तालात हालवत बसला होता. त्याला सर्व मंडळी परिचित होती.
माधव म्हणाला “ तुम्हाला माहित आहे की आमच्या सर्व कुटुंबियांना आशू किती प्रिय आहे. खरं तर आमचं सर्व आयुष्य आमचा व्यवसाय, मंदिर आणि आशू यांच्या भोवती फिरतं. आज आशू सतरा वर्षांचा झाला आणि त्याचं अठरावं वर्षं सुरु झालं. आता पर्यंत आशू एक बालक होता किंवा “डिफरन्शिअली अेबल्ड चाईल्ड” होता आणि आता एका वर्षात तो कायद्यानं अडल्ट होईल. गेल्या सहा महिन्यातील काही घटनांमुळे आम्ही चिंतित आहोत. येणाऱ्या संकटाची ही फक्त नांदी आहे आणि पुढे होऊ घातलेल्या प्रसंगाच्या विवंचनेत आम्ही आहोत.”
नायक वकील म्हणाले “ कसली विवंचना. कायदा सुस्पष्ट आहे. माधव, तुझ्या आणि गुरूच्या मुला एवढाच प्राँपर्टीमधे हक्क कायदा आशूला देतो. अजून तुम्हा तीन भावात वाटणी झालेली नाही तर पुढच्या पिढीचा प्रश्नच कुठं उद्भवतो?”
माधवनं आधारासाठी डॉक्टरांकडे पाहिलं. हट्टंगडी खुर्चीत पुढे सरसावले आणि म्हणाले “ वकील साहेब, बाब जरा वेगळी आहे. आशू बुद्धीनं आणि मनानं एक तीन चार वर्षांचं निरागस बालक असला तरी शरीरानं तो आता परिपक्व तरुण आहे. त्याच्यात निसर्गाच्या नियमानुसार शारीरिक वाढ आणि त्या अनुसंगानं गतिमान बदल होत आहेत. त्यामुळे अडल्ट शरीर आतील बालकाला त्याच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याला नं कळत खेचत आहे.”
आता मुद्दा वकील साहेबांच्या ध्यानात आला. ते म्हणाले “ओ, आय सी.”
गुरु म्हणाला “ उदाहरणार्थ, लहर आली तर किंवा पाण्यानं कपडे ओले झाले तर आशू कपडे काढून घर भर हिंडू लागतो. काही दिवसां पूर्वी देवळात एका मुलीला मिठी मारली आणि तिला तो सोडेना. मुलगी आणि तिची आई किंचाळायला लागल्या. त्याला काय होतंय ते त्यालाच कळत नाही.”
मणी म्हणाला “आता मी घरा बाहेर असताना काळजी घेतो. चितेची गोष्ट नाही.”
माधव म्हणाला “ मणी, आपण काल परवा घडलेल्या गोष्टीं बद्दल नाही बोलत. पुढे काय करायचं या बद्दल विचार करतोय.”
डॉक्टर म्हणाले “ सगळ्या मुलांच्या बाबतीत हा प्रश्न पडतो. मुलींच्या बाबतीत तर प्रश्न अधिक गंभीर होतो.“
माधव म्हणाला “ डॉक्टर, या वर तुम्हाला तोडगा माहित आहे. तुम्हीच का नाही बोलत?”
डॉक्टर हत्तंगडीनी खाकरून घसा साफ केला, ते म्हणाले “ हे पहा, हा शानभाग कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय असेल. वैद्यकीय तोडग्या बद्दल बोलायचं झालं तर वयात येणाऱ्या “डिफरन्शिअली अेबल्ड” किंवा “मतिमंद” मुलीच्या बाबतीत हा निर्णय लवकर घेणं खूप आवश्यक असतं. वयात आल्यावर अशा मुलींना दर महिन्यात होणाऱ्या फेर बदलाचा अर्थ कळत नाही, त्या बाबतीत घ्यावी लागणारी स्वच्छता त्याना घेता येत नाही, मुलीचं लैगिक शोषण होऊ शकतं आणि त्याचा अर्थ किंवा त्याविषयीची तक्रार त्याना करता येत नाही. त्याना गर्भ धारणा होऊ शकते. ज्या व्यक्तीला होणाऱ्या अपत्याची काळजी घेणं आणि संगोपन करणं अशक्य आहे त्याना मूल कसं होऊ देता येईल? अश्या मुलीचा प्रजोत्पादन करणारा अवयव शस्त्रक्रियेनं निकामी केला जातो.“
“पण मुलाच्या बाबतीत तसं काही घडू शकत नाही तेंव्हा त्याचा विचार कशाला करायचा?” मणी विषय बंद करायच्या दृष्टीनं मधेच बोलला
“मणी तुझं बरोबर आहे. मतिमंद मुलाच्या बाबतीतले प्रश्न मुलींपेक्षा वेगळे आहेत. मुली लैगिक दृष्टया अँक्टीव किंवा अँग्रेस्सीव होत नाहीत पण मुलं त्यांच्या हार्मोन्समुळे होतात आणि दुसऱ्याला धोका बनू शकतात किंवा सामाजिक दृष्टया लाजिरवाणे वर्तन करू शकतात.”
वकिलसाहेब म्हणाले “डॉक्टर, त्यावर उपाय काय?”
हट्टंगडी म्हणाले “स्टेरिलायझेशन, ज्यामुळे मुलाच्यात लैगिक संवेदनाच उत्पन्न होत नाही.”
मणी रागानं म्हणाला “हा सरासर अन्याय आहे. मतिमंद मुलांना आवडीचं खाणं आवडतं, त्याना त्याच्यावर प्रेम केलेलं कळतं, त्याना राग येतो, ते रडतात, त्याना हर्ष होतो. आशुच्या बाबतीत मी त्याची बाबांच्या विषयी भक्ती पहिली आहे तर त्याला शरीराच्या एका सुखा पासून का वंचित करायचं?”
वकील साहेब बोलले “मणी रागावू नकोस. निर्णय तुला घ्यायचा आहे आणि तो सुध्दा फक्त आशूच्या भल्यासाठीच. एक तर समाजाच्या आणि कायद्याच्या मर्यादेत मतिमंद मुलांना शरीरसुख म्हणजे, स्पष्टच बोलायचं झालं तर लैगिक सुख मिळणं शक्य नसतं. त्या सुखाचा अर्थ सुध्दा त्याना कळू शकत नाही. निसर्गानं लैगिक सुख हे प्रजोत्पादनासाठी एक इंसेंटीव म्हणून बहाल केलं आहे त्याचा गैरवापर करणाऱ्याला समाज आणि कायदा विकृत समजून शिक्षा करतो. जसा माणूस वयानं आणि बुद्धीनं परिपक्व होतो तसं लैगिक सुखाच्या बाबतीत जबाबदारीनं वागेल अशी अपेक्षा असते. ज्यांना ते शक्य नाही, कारण काहीही असुदे, त्याना हा आधिकार नाही.”
गुरु म्हणाला “ सर्वसाधारण म्हणजे नॉर्मल मुलांचा सुध्दा वाढत्या वयानं गोधळ उडतो.”
मणी म्हणाला “ हे पहा. एवढी घाई करून कशाला निर्णय घ्यायला हवा. एखादेवेळेस परिस्थिती निवळेल आणि सर्व ठीक होईल.”
डॉक्टर म्हणाले “मणी, दोन गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. एक तर आशू अठरा वर्षांचा झाल्यावर कायद्यानं तुला त्याच्या बाबतीत हा निर्णय घेता येणार नाही जो या वर्षी घेऊ शकतोस.
दुसरी अधिक गंभीर समस्या म्हणजे जर आशू कडून कोणाला इजा झाली तर त्याला कायदा इन्स्टिट्यूशन मधे टाकू शकतो. तेंव्हा तू आणि वृंदा यावर विचार करा.”
मणी म्हणाला “डॉक्टर, तुमचा आणि नायकमामांचा मी खूप आदर करतो. आण्णा गेल्या नंतर तुम्ही आमच्या कुटुंबाला योग्य मार्ग दर्शन करत आला आहात आणि पुढे कराल अशी अपेक्षा मी करतो. पण मला सध्या तरी तुम्हा सर्वांचं म्हणणं मान्य नाही. माझी बाबांच्या वर नितांत श्रद्धा आहे आणि तेच मला मार्ग दाखवतील. माझ्या घरातल्यांची अडचण मी समजू शकतो. त्यावर तोडगा म्हणून आजच्या शुभ मुहूर्तावर मी आणि आशू मंदिरातल्या दोन खोल्यात शिफ्ट होत आहे. गणुला पण बरोबर घेऊ. याचा अर्थ मी कुटुंबापासून दूर जातोय हा नाही. मी बंगल्यातल्या ऑफिस मधेच काम करेन, आशूला तेंव्हा घेऊन येत जाईन. वृंदा घरीच राहील आणि सर्व काही नेहमीप्रमाणे असेल. माझ्या नंतर सुध्दा आशूचं आयुष्य मंदिरात जावं ही बाबांची इच्छा असावी त्याची पूर्व तयारी म्हणून ही सवय करून घेणं भाग आहे. कोणीही काळजी करू नये. सर्व ठीक होईल बाबांवर श्रद्धा ठेवा.” एवढं बोलून डोळे पुसत आशूचा हात धरुन मणी बाहेर निघून गेला आणि सर्व जण स्तब्ध होऊन दाराकडे पहात राहिले.
------------*--------------*----------पुढिल भाग........
मणी आणि आशूला दारातून आत शिरताना पाहून वृंदानं विचारलं “तुम्ही दोघेच आलात आणि बाकी सर्वजण कुठं आहेत? येताहेत नं जेवायला?”
मणी तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जिन्यावरून बेडरूम मधे निघून गेला.
वृंदा त्याच्या पाठोपाठ गेली. "मणी, काय झालं?”
“माझा आणि आशूचा डबा भर. आम्ही दोघे मंदिरात रहायला जात आहोत आज पासून. आत्ता फक्त दोन दिवसांचे कपडे हँडबँगमधे नेत आहे. उद्या, परवा आणखी सामान नेईन. आणि हो, त्या एसी वाल्याला फोन करून मंदिरातल्या दोन्हीही खोल्यांना एसी बसवायला सांग. “
“अरे, पण झालं काय ते नीट सांगशील? माधवदादांचा फोन आला की तू रागानं बाहेर पडलास म्हणून.” वृंदा म्हणाली
“हो, पण रागानं नाही. आता कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे.” मणी म्हणाला
“कशाबद्दल कठोर निर्णय मणी?” वृंदानं विचारलं
“विभक्त होण्याबद्दल.” मणी म्हणाला
“का विभक्त? बाकी कुटुंबाचा आशूबद्दल विचार करायचा काही हक्क नाही? का बाप म्हणून फक्त तुला प्रेम आणि हक्क आहे? मणी, मला माहित आहे तुला कशाचा राग आलाय ते.” वृंदा म्हणाली
“का? मी बाप आहे आशूचा आणि फक्त मीच ठरवू शकतो त्याच्या बाबतीत.” मणी चिडून बोलला
“हो नं ! मग तू अण्णांना का आयुष्यभर विरोध करत आलास? तो माणूस निदान आपल्या मतांशी प्रामाणिक होता. असतील ते नं शिकलेले आणि जुन्या मतांचे, पण दुटप्पी तर नक्की नव्हते “ वृंदा फटकारून उद्गारली.
“पण का मी आशूवर अन्याय होऊ द्यायचा? मी नाही त्याचं संरक्षण करायचं तर कोणी गणू नं करायचं?” मणी बोलायचं म्हणून बोलला .
“अरे कसलं संरक्षण आणि कोणापासून? सगळे आशूच्या भल्याचा विचार करत आहेत. माधवदादा आणि डॉक्टर प्रथम माझ्याशी बोलले. मी आशूची आई आहे, विसरलास? गेला महिना भर यावर बोलणं चाललाय, अगदी खोलवर.” वृंदा समजावणीच्या सुरात बोलली
“आणि तुम्ही मला अंधारात ठेवलंत?” मणी म्हणाला
“ नाही मणी. तू लगेच डोक्यात राख घालून घेतोस आणि सर्वांना ठाऊक आहे की किती जीवापाड प्रेम तू आशूवर करतोस आणि तो तुझ्यावर ते. म्हणून आज डॉक्टर तुला मंदिरात बोलतो म्हणाले , घरी नको.” वृंदा म्हणाली
“ म्हणजे तुझी या प्रकाराला अगोदरच संमती आहे तर?” मणी संशयानं म्हणाला
“ हो मणी, मी एक स्वतंत्र विचाराची स्त्री आहे आणि ते तू मान्य केलं आहेस. तुला त्याचा अभिमान आहे. माधवदादा आणि गुरु सुध्दा माझ्या मतांचा सर्व कौटुंबिक बाबतीत आदर करतात. याचा अर्थ मी माझी मतं दुसऱ्यांवर लादते असं नाही. आशूच्या बाबतीत तुझा निर्णय शेवटचा असेल. पण मला ठामपणे वाटतं की डॉक्टरांचा सल्ला आपण मानवा.” वृंदा म्हणाली
“हो का? आणि आशूला आपण तिसऱ्या लिंगाच्या बरोबरीत नेऊन बसवायचं?” मणी उपहासाने म्हणाला
“नाही मणी. मी या गोष्टीकडे इतक्या विकृत नजरेनं नाही बघत. आता पहा, कित्येक वर्षांपूर्वी जेंव्हा तू आणि मी निर्णय घेतला की आणखी मूल होऊ द्यायचं नाही तेंव्हा तू नाही का एक छोटीशी शस्त्रक्रिया करून घेतलीस? माझ्यासाठी त्यामुळे तू अतिशय मोठ्ठा पुरुष झालास. एका मुलाच्या प्रेमासाठी आणि कर्तव्यासाठी केवढा मोठ्ठा त्याग तू केलास! अरे फार कमी बाप आपलं आयुष्य मुलासाठी वाहून घेतात. समाजानं मतलबी पणे फक्त मातृ आणि पितृ प्रेमाच्या कथा तयार केल्या आहेत. म्हातारपणी आधार मिळावा म्हणून लहानपणा पासून फक्त या कथा सांगितल्या जातात. पण तू एक वंदनीय उदाहरण आपल्या पुत्र प्रेमानं घालून दिलं आहेस.” वृंदा गहिवरून म्हणाली
मणी वृंदाच्या भावनांनी नरम होऊन म्हणाला “ पण ....”
“नाही मणी, आशू वर काही अन्याय नाही होत. जर आपल्याला आशूच्या जागी मुलगी असती तर निमूटपणे तिच्या वयाच्या तेराव्या वर्षी आपण हा निर्णय घेऊन टाकला असता, नाहीतर तुझी झोप पूर्ण उडाली असती. मग मुलगा आणि मुलगी असा भेदभाव का करावा? त्यात मला वाटतं की ही आशूची गरज आहे. अरे एका इंजिन चालू असलेल्या बस मधे तीन चार वर्षांच्या बालकाला स्टेरिंगवर बसवून बस मोकाट सोडून देण्यासारखं आहे. मोठ्या महापुरुषांना त्यांच्या सेक्सड्राईव्ह वर नियंत्रण नसतं तर एक बालक त्याच्या शरीराच्या उर्जेचं कसं नियंत्रण करू शकेल? जरा विचार कर?” वृंदा मणीला समजावत म्हणाली
“पण त्यामुळे आशूला काही इजा झाली तर?” मणी आता पुरता मवाळला होता
“ त्याची योग्य ती खबरदारी आपण घेऊ. लक्षात घे आपण खूप लकी आहोत की डॉक्टर हट्टंगडी आपल्या बरोबर आहेत. चल आता खाली, लहान मुला सारखं फुरंगटू नकोस. सर्वजण आले असतील जेवायला.” वृंदा मणीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली आणि मणी एका लहान मुला सारखा तिच्या मागे निघाला.
जेवणाच्या टेबलावर बराच वेळ कोणी हा विषय काढला नाही. वकील साहेब मंदिरात झालेल्या पूजेचं आणि जमा झालेल्या गर्दीचं वर्णन करत राहिले. शेवटी वृंदानेच विषयाला तोंड फोडलं “ डॉक्टर, मणी अस्वस्थ होऊन तुमच्या सर्वांच्या अगोदर घरी आला खरा पण त्याला माझ्याशी बोलण्या अगोदर काही मान्य करायचं नव्हतं.”
डॉक्टर म्हणाले “त्याचं बरोबर आहे.”
“ मणी आणि मला तुमच्या आशू बद्दलच्या सल्यात मेरीट वाटतंय पण मणीला भीती आहे की आशूला शारीरिक इजा होईल.” वृंदा म्हणाली
“अशी भीती वाटणं सहाजिक आहे पण सर्वात सुलभ आणि रिवर्सिबल उपाय म्हणजे केमिकल स्टेरिलायझेशन. या उपायात काही सेफ अँटी अँड्रोजेन औषधं इंजेक्शन द्वारे दिली जातात आणि त्यामुळे बहुतेक लैगिक इच्छा नाहीशी होते. फार काळ ही औषधं वापरली तर हाडं बळकट राहावी म्हणून जे उपाय आणि औषधं आपण देतो ती द्यावी लागतात आणि वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ही औषधं बंद केली की काही महिन्यांत शरीर जवळजवळ पूर्वव्रत कार्यक्षम होतं.” डॉक्टर म्हणाले
“आणि हा उपाय घरच्या घरी करता येतो ?” मणी साशंक सुरात बोलला
“हो अगदी सामान्य इंजेक्शन्स देण्यासारखं आहे.” डॉक्टर म्हणाले
“ठीक तर, हा उपाय काही महिने करून पाहू पण आशूला काही अपाय होताना दिसला तर प्रयोग बंद केला पाहिजे.” मणी म्हणाला
“अर्थात. पण याला प्रयोग म्हणू नकोस. मेडिकल कौन्सिलने मान्य केलेला उपाय आहे हा. आणि आपण सेकंड ओपिनिअन घेतल्या शिवाय आशूच्या बाबतीत काही करणार नाही आहोत.“ डॉक्टरनी दिलासा दिला.
“ तसं नाही डॉक्टर, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.“ मणी ओशाळून म्हणाला
सगळ्यांचे उजळलेले चेहेरे बहुतेक आशूच्या ध्यानात आले आणि तो आण्णांच्या भिंतीवरल्या हार घातलेल्या फोटोकडे बोट दाखवून सर्वांचं लक्ष वेधत होता “ आण्णा, आशू , चला चला बाबा वाट बघतो, बाबा वाट बघतो.”
------------------------------------------------समाप्त -------------------------------------------------
मनाला चटका बसेल अस आहे लिखाण.
मनाला चटका बसेल अस आहे लिखाण.
विषय अतिशय संवेदनशील आहेच,
विषय अतिशय संवेदनशील आहेच, त्यावर उत्तम कथा रचली आहे. पण शेवट फारच पटकन गुंडाळल्यासारखा वाटतोय आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये. त्यामुळे कथा अर्धवट वाटतेय. क्रमशः आहे का?
मामी +1 मलाही तसेच वाटले पण
मामी +1
मलाही तसेच वाटले
पण मला कळली नसेल असे वाटून म्हणून प्रतिसाद दिला नव्हता
क्रमशः आहे का? +
क्रमशः आहे का? + १११११११११११११११११११११११११११११११
या कथेचा शेवट काय असू शकतो ?
या कथेचा शेवट काय असू शकतो ? बहुतेक वाचकांना लिहावा लागेल अस दिसत.
(No subject)
संवेदनशील विषयाला हात
संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक ! पात्रनिर्मिती नि background नीट तयार केले आहे. पण ते तयार करण्यात जेव्हढा भाग गेला आहे त्यामानाने मूळ विषय नि त्याच्याभोवती येणार्या घटना त्यामानाने फारच संक्षिप्त किंवा तोकड्या वाटतात. कथा म्हणून नीट उतरलेली वाटली नाही.
असामी +१
असामी +१
खुप सुरेख हाताळणी. लेख आवडला
खुप सुरेख हाताळणी.
लेख आवडला अस नाही म्हणता येणार पण ईतका संवेदनशील विषय खुप उत्तम रीत्या समोर मांड्ण्यात आला आहे.
पु.ले.शु.
बाप रे!!! फार वेगळ्या
बाप रे!!! फार वेगळ्या विषयावरची प्रभावी कथा आहे. छान लिहीता तुम्ही.