लपंडाव
आज पुन्हा एकदा तिला अविची खूप आठवण येत होती. आपल्या मनातले सारे त्याला सांगून टाकावे का? ती मुलगी अजूनही त्याच्या आयुष्यात असेल का? आपल्यामुळे त्याच्या जीवनात नवीन वादळ येऊ नये.. तो असेल सुखी तिच्यासोबत.. आता त्याला पूर्वीइतकी आपली गरज वाटत असेल का..का आपली जागा तिने घेतली असेल..? तिला आता सगळे मनात साठवून ठेवणे अशक्य होऊ लागले होते.. आता रडू फुटेल की काय असे होऊन गेले होते..
हर्षा आणि अविनाश जवळजवळ १२ वर्षे एकमेकांना ओळखत होते. ती पाचवीत तर तो सहावीत असताना त्या नवीन इमारतीत ते रहायला आले होते. बाकीही चार पाच कुटुंबं तिथे नवीन होती. त्या सगळया मुलांचा एक मस्त ग्रुप जमला होता. खेळ, गप्पा,अभ्यास, छंद , सहली, सणवार ,परीक्षा, सुट्ट्या एकत्र घालवता घालवता बालपणीचा काळ सुखाचा कधी सरला कळलेच नाही. आयुष्यात आता वसंताचे आगमन होत होते. खेळापेक्षा आता गप्पांना अधिक रंग चढत होता. त्यातल्या त्यात आपला बेस्ट फ्रेंड कोण हे कळू लागले होते. आपल्या मनातली गुपितं हळूहळू एकमेकांकडे उलगडली जात होती. अविनाशला हर्षा आपली एक मस्त अशी मैत्रीण वाटायची. कधीही जावे आणि तिला आपल्या मनातले सांगावे अशी. कधी आईबरोबर झालेले भांडण असो, मित्रांची केलेली गंमत असो, कधीतरी मित्रांसोबत चोरुन ओढलेली सिगारेट असो वा एखादी आवडलेली मुलगी असो. त्याला हे सारे तिला सांगितल्याशिवाय चैन पडत नसे. तीही त्याचे असे भरभरुन बोलणे भान हरपून ऐकत असे. आणि त्याची चूक त्याला लक्षात आणून देत असे. सुरुवातीला तो चिडून निघून जात असे.. पण मग तिचेच बरोबर असल्याचे लक्षात येताच पुन्हा येऊन कबूल करत असे. त्या दोघांची सतत एवढ्यातेवढ्या कारणांवरून भांडणेही होत असत. पण ते भांडण कधीही एक दिवसापेक्षा जास्त टिकत नसे. चूक कुणाचीही असो अबोला तोडायची जबाबदारी नेहमी तिच्यावरच. तिलाही हे चांगले माहित होते की तो काही पहिल्यांदा बोलायला येणार नाही पण तिने कधीही त्याला असे का असे विचारले नाही. दिवस असे मजेत जात होते.
हर्षा सर्वांमधे अतिशय हुशार होती. पण तरीही तिचे अभ्यासातून लक्ष उडालेले अविच्या बरोबर लक्षात यायचे. मग तो चांगली तिची कानउघाडणी करायचा. हर्षा पण मग जिद्दीने परीक्षेत पहिल्या तीनात येऊन दाखवायची. सगळ्यांनी केलेल्या कौतुकापेक्षा अविने दिलेली मोठ्ठी डेअरी मिल्क ची कॅडबरीच तिला खरी शाबासकी वाटायची. पण जाता जाता अविचा शेरा असायचाच की पहिला नंबर का नाही आला? मग मात्र तिला रडू यायचे आणि मग तो तिला "ए वेडाबाई, गंमत केलेली पण कळत नाही का तुला?" असे म्हणून शांत करत असे.
आता अवि इंजिनीयरिंगला तर हर्षा बारावीला होती. तेव्हाच त्याने आपल्याला एक मुलगी आवडत असल्याचे आणि तिलाही आपण आवडत असल्याचे हर्षाला सांगितले. ती सुद्धा त्याला चिडवत असे त्या मुलीवरुन. पण हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागले होते की अवि आपल्याशिवाय एका दुसर्या मुलीला आपली मानतोय हे आपल्या मनाला कुठेतरी टोचतंय. न जाणो कधी आपल्या मनातली गोष्ट चेहर्यावर आली तर...??ती त्याच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली. कधी कधी एकटं असताना तिला खूप रडू यायचे. पण नंतर तिचे डोळे पाहून अवि तिला प्रश्न विचारून हैराण करायचा. पुन्हा १२ वीचे वर्षं आहे अभ्यास कर उगाच फालतू गोष्टीत वेळ घालवू नकोस असे दटावायचा. तशाच मनाच्या संभ्रमित अवस्थेत तिने १२ वीचा अभ्यास करुन ८४% मार्क मिळवले. आणि त्यानंतर तिच्या आई बाबांनी घर शिफ्ट करायचा निर्णय घेतला. तिने अविला हे सांगितले तेव्हा त्याने खूप आर्जवे केली की तू गेलीस तर माझे कसे होणार? पण तिला वाटले की आपल्याला तो एका नवीन अर्थाने आवडतोय हे कळून आपली मैत्रीही संपुष्टात येण्यापेक्षा आपण दूर गेलेलेच बरे. आणि हर्षा दुसरीकडे राहायला निघून गेली.
अधूनमधून त्यांचे एकमेकांना फोन होत असत. क्वचित भेटही होत असे. करताकरता २ वर्षे होऊन गेली. तरीही हर्षाच्या मनातून अविबद्दलची ती भावना बदलली नव्हती. यालाच प्रेम म्हणतात हे कळण्याची प्रगल्भता आता तिच्यात आली होती. पण तरीही आपल्या मनाचा बांध फुटून द्यायचा नाही असे तिने मनाशी पक्के ठरवले होते. आजही ती पुन्हा हाच विचार करत होती. आणि जुन्या आठवणींनी मन भरुन येत होतं.
तशातच तिला फोन आला. फोन अविचाच होता.. एवढी टेलीपथी..?? तिने फोन घेतला. अविचा नेहमीचा मन शांत करणारा समजूतदार आवाज ऐकून तिच्या घशात आवंढा आला.. तो कसाबसा दाबत ती बोलणार तेवढ्यात अविच तातडीने तुला भेटायचे आहे म्हणाला. पण जरा महत्त्वाचे बोलायचे असल्याने बाहेर भेटतेस का असे त्यने विचारले. आई बाबा कामाला गेले असल्याने घरात तीच होती फक्त. तिने त्याला घरीच बोलावले. आल्यावर थोड्या गप्पा झाल्यावर अचानक त्याने तिला विचारले." तुला काय वाटते..आपण अजूनही फक्त बेस्ट फ्रेंड आहोत? " त्याच्या या प्रश्नाने ती गोंधळली. तो पुढे म्हणाला, " अगं, ती मला आवडणारी मुलगी म्हणजे तूच होतीस. पण तेव्हा मलाच त्या गोष्टीचा नीट अर्थच कळाला नव्हता तर मी तुला काय सांगणार? तू घर सोडून निघालीस तेव्हा पण लाख वेळा मनात आले की हे सगळे सांगून तुला थांबवावे पण तू माझ्याबद्द्ल असा काही विचार करत नसशील असे मला वाटले आणि मी गप्प राहिलो एक चांगली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी." तो हे बोलत असतानाच तिचे डोळे भरून आले. पण तरीही चेहर्यवरचे हसू त्याला न बोलताच सारे काही सांगून गेले. त्याने तिला जवळ घेतले. तो म्हणाला ,"ए वेडाबाई, एवढा का त्रास करून घेतलास ? एकदा जरी बोलली असतीस..." "मग तू का नाही बोललास??"" नेहमीचे मिष्कील हसत अवि म्हणाला,"तुला माहित आहे ना.. आपल्यामधे नेहमी सुरुवात तू करायची.. पण यावेळेला तुझी वाट पाहून पाहून थकलो गं मी.." तिला अजूनच रडू कोसळले..ती "सॉरी.. सॉरी" म्हणत होती आणि तो तिला थोपटून शांत करत होता..अश्रूंनी ती मिठी चिंब झाली. मग हळूच अविने आपल्या खिशातून मोठ्ठी डेअरी मिल्क ची कॅडबरी बाहेर काढली आणि तिच्यासमोर धरली.. ती पाहताच तिला खुद्कन हसू आले. ती म्हणाली,"अवि, आपण कितीही मोठ्ठे झलो आणि आपल्यात अबोला झाला तर मला ही पेनल्टी हवीच हां.." "कबूल राणीसरकार!!" आणि ती दोघेही खळाळून हसली..
छान कथा.
छान कथा. छोटीशी आणि सुटसुटीत. आवडली.
आशु, तु
आशु, तु कथासुद्धा लिहितेस हे माहित नव्हतं...
सुंदर कथा आहे...
मला वाटते.. या कथेशी बरेच जण 'रिलेट' करु शकतील...
त्या 'डेअरी मिल्क' शी माझ्याही कॉलेजच्या वेळच्या बर्-याच आठवणी जोडलेल्या आहेत...
छोटीशिच,
छोटीशिच, छान कथा !
खूप छान
खूप छान वाटले तुमचा प्रतिसाद वाचून... अरे पण जरा सुधारणा पण सांगा की!
'डेअरी
'डेअरी मिल्क कॅडबरी'. पुढचे लिहा सुधारणा आपोआप होतील. छान व सुंदर कथा.
आशु, मस्त
आशु,
मस्त कथा.....तुझ्ह्या पुढिल लेखनाला अनेक शुभेच्छा!!!!!!!!
एकदम
एकदम आवडेश!!! माझं नाव पण आहे त्यात हा हा हा
खुप छान..... ए
खुप छान..... ए आशु, इथुन पुढे प्रत्येक कथेत मायबोलिकरांची नावे पात्रांना दे..... म्हणजे माझे पण नाव येईल..... काय अवि?