मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक डोळ्याआडची गोष्ट म्हणजे लाकडी पटर्‍या जाऊन सिमेंटच्या आल्या. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला, पण उभ्या राहणार्‍या प्रवाशांना सांधे, पाय, मणके, इत्यादिंची दुखणी सुरू झाली. >>> खरंच?? ही माहिती पहिल्यांदाच ऐकली. असा काही स्टडी झाला होता का?

ते सिमेंटचे स्लीपर्स टाकल्याने, गाड्यांची उंची वाढली पण फलाटांची तितकीच राहिली. यामुळे गाडीत चढणं त्रासाचं होऊ लागलं - विशेषतः म्हातारे, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया इ.

डब्यात चढताना होणार्‍या धक्काबुक्कीत मधल्या फटीत पडून अपघात होण्याचं प्रमाणंही लक्षणीय रित्या वाढलं. काही फलाट उंच करण्यात आले वगैरे. पण अजूनही असे अपघात होत राहतातच.

<< अस नव्हतं म्हणायच मला>> अहो, माझी खात्री आहे त्याबद्दल. [ माझी बायको नेहमी मला म्हणते, 'तुम्हाला कुठेही मस्करीत कांहीही पचकायची संवयच आहे '; त्यातलाच हा प्रकार ! :डोमा:]क्षमस्व.
<< मुंबईच्या जीवनातून रेल्वे वगळणं शक्यच नाहीये.>> मुंबईच्या रस्त्यांवरील वहातुकीच्या वाढत्या कोंडी तर हें अधिकाधीकच अशक्य करणार आहेत. मीं निवृत्तिपूर्वीं ७-८ वर्षं गर्दीला कंटाळून रेल्वेऐवजीं काँट्रॅक्ट / 'बेस्ट' बसने प्रवास करणं सुरूं केलं होतं. आतां बस प्रवासाला लागणार्‍या वेळाला कंटाळून मीं रेल्वेचाच पास काढतों !
<< मेट्रो आणि मोनोरेलच्या रुपानं. >> समुद्री मार्ग हाही पर्याय आज बरीच वर्षं संबंधितांच्या विचाराधीन आहे व तो फार अतर्क्यही नाही .

<< पाकिस्तानच्या मन्झूर इलाहीने भारताविरुद्ध एका मॅचमधे अफलातून खेळी केली तेंव्हाचा 'अमुल'चा फलक होता -" वही होता है जो मन्झूरे इलाही होता है " !! >>

चर्चगेट स्टेशनबाहेरचा पॅडेस्ट्रीयन ब्रिज हि मोक्याची जागा. अझरुद्दीनने कुठलातरी वर्ल्ड रेकॉर्ड (सहाही बॉल वर छक्का!) केला होता, त्यावर अमुलची कमेंट - "अझारो दिनोंका टेस्ट रेकॉर्ड..." Happy

मामी,

>> खरंच?? ही माहिती पहिल्यांदाच ऐकली. असा काही स्टडी झाला होता का?

असा काही अभ्यास वा सर्वेक्षण झाल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही. पण ओळखीच्या ज्या व्यक्ती रोज किमान तासाभराचा लोकल प्रवास करीत असंत त्यापैकी बर्‍याच जणांच्या बोलण्यात आलं. मला अंधुकसं आठवतं त्याप्रमाणे लोकप्रभात कुण्या डॉक्टराचा लेखही आला होता. त्यात या गोष्टीचा एक परिणामकारी घटक म्हणून उल्लेख होता.

आ.न.,
-गा.पै.

मुंबईचे काही खास इव्हेंट्स , फेस्टिव्हल्स असतात त्याची यादी करुयात
१.मुंबई मॅरॉथॉन - साधारण जानेवारी
२. काळाघोडा फेस्टीवल - फेब
३. बाणगंगा फेस्टिवल - (MTDC sponsered)
४.एलिफंटा फेस्टिव्हल - (MTDC sponsered)- एप्रिल?
५. विन्टेज कार रॅली - ????
६. माहिम उरुस
७,माऊंट मेरी /मोत माऊली जत्रा
८. ईंडिअन डर्बी - रेसकोर्स- फेब

पनवेल मध्य रेल्वेच्या मार्गावर नाही, हार्बरवर आहे.

हार्बरवर कॉटन ग्रीन स्टेशन तर पूर्ण गोलाकार, 'सी' आकारात आहे.

त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला, पण उभ्या राहणार्‍या प्रवाशांना सांधे, पाय, मणके, इत्यादिंची दुखणी सुरू झाली.>>> असं अजिबात नाही. वाढत्या गर्दीमुळे, गर्दीत उभं राहून प्रवास करायला लागल्याने दुखणी सुरू झाली असं म्हणता येईल एकवेळ.
स्लिपर्स सिमेंटचे केले त्याचबरोबर लोकलाच्या बांधणीतही बरेच बदल झाले आहे. नव्या लोकल हवेशीर, बहुतेक गाड्यांमधे सेकंड क्लासचे डब्यातही कुशन सीट आहेत. पॅसेजमधे दाराच्या बाजूला आडव्या पट्ट्या असल्यामुळे उभं राहणार्‍यांना हात वर करून कड्या पकडून लोंबकळत उभं रहायला लागत नाही.
लोकलच्या वीजपुरवठ्यात एसी-डिसी प्रकारातही बदल झाले आहेत, त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे. पण लोकलमधली गर्दीही तेवढीच वाढली आहे. कारण मुंबईत कुठलाही प्रवास लोकलइतका वेगवान नाही. काही गोंधळ झाला नाही, वरून खाली येणार्‍या सर्व लोकल-प्रवासी गाड्या वेळेनुसार धावल्या तर ठाणे-व्हिटी फास्ट ट्रेनचा प्रवास चाळीस मिनीटात होतो. सिग्नल यंत्रणेत मात्र अजून बरेच बदल आवश्यक आहेत.

पुर्वी तारीख आणि वेळ टाकण्यासाठी लोखंडी उपकरण असे. तासातासाला त्यातली वेळ हातानी बदलावी लागे. आणि ते प्रिंट न करता एनग्रेव्ह करत असते. <<< यामुळे तिकीट मास्तर आणि टीसी यांचे साटेलोटे जुळले तर कलेक्टेट तिकिटांवर दाब देऊन, घासून त्यावरचे तारीख आणि वेळेचे ठसे बुजवून असे तिकिट (बेकायदेशीर) पुन्यांदा विकण्यात येई. मग एखाद्या खमक्या आणि आपल्या कर्तव्याची नीटच चाड असलेल्या सुपरवायझरच्या तावडीत ते सापडत.

हार्बरप्रमाणे प्रधानमार्गाचे (मेनलाईन) फलाटही वक्र आहेत. <<< कॉटनग्रीन वगैरे स्टेशनामंध्ये या वक्रीपणामुळे बाहेरच्या बाजूचा रूळ एवढा चढवलेला असतो की त्यावरून ट्रेन जाताना तिचा तोल कसा जात नाही असा प्रश्न लहानपणी पडे. नंतर रोड बँकींग ही संकल्पना अभ्यासात आल्यावर उलगडा झाला.

मंजूडी,

>> पनवेल मध्य रेल्वेच्या मार्गावर नाही, हार्बरवर आहे.

मला वाटतं की दिवे-पनवेल-रोहे ही मध्य रेल्वेची शाखा आहे. तुम्ही ज्याला हार्बरवरचं पनवेल म्हणता ते लोकलगाड्यांचे टर्मिनस आहे.

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही ज्याला हार्बरवरचं पनवेल पनवेल म्हणता>>> अहो सगळं पनवेल एकच आहे हो... पनवेल जंक्शन आहे.
पनवेल - व्हिटी लोकल वाहतूक हार्बर मार्गावरून होते.
म.रे.ची दिवा पनवेल लोकलसेवा आहे. पण त्याची फ्रिक्वेन्सी बघता त्याला लोकल म्हणावं की शटल असा प्रश्न पडेल.
आता मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस ठाणे-पनवेल-कर्जत-पुणे अश्या मार्गावरून नेली जाते.

<< तुम्ही ज्याला हार्बरवरचं पनवेल म्हणता ते लोकलगाड्यांचे टर्मिनस आहे >> खरं असावं. कारण कोकण रेल्वेने पनवेलला उतरल्यावर लगतच्या वेगळ्या टर्मिनलला लोकलसाठीं जावं लागतं. [ मला असंही आठवतं कीं दिवा -पनवेल मार्गासाठी जमीन संपादनाच्या वेळीं 'एक्सप्रेस' व 'मेल' गाड्यां व्यतिरिक्त इतर सर्व 'पॅसेंजर' गाड्या मधल्या सर्व स्टेशन्सवर थांबवल्या जातील असं आश्वासन कोकण रेल्वेकडून घेण्यात आलं होतं; त्यामुळें, अगदी गोव्याहून येणारी 'पॅसेंजर' गाडी असली तरीही पनवेल- दिवा दरम्यानच्या सर्व छोट्या स्टेशनांवर थांबते. म्हणूनच, तो वेळखाऊ, कंटाळवाणा वळसा चुकवण्याकरतां बरेच 'पॅसेंजर'चे प्रवासी पनवेललाच उतरून हार्बर लोकलने मुंबईत येतात.]

पनवेल मेन स्टेशन आणि लोकल टर्मिनस दोन्ही शेजारी आहेत. परंतू आतून जोडलेले नाहीत. बाहेर येउन दुसर्या ठिकाणी जावे लागते.
हार्बर लाइन :- पनवेल - c.s.t.
पनवेल - अंधेरी (अजून गोरेगावपर्यंत जायची आहे)
ट्रांस हार्बरः पनवेल - ठाणे (या लोकल नेरूळ आणि वाशीहूनही सुटतात )

मुंबैचा बाफ आता कुठे पनवेलला पोचला. जरा बरे वाटत आहे Wink

येस पनवेलला हाच मोठा त्रास आहे. मला कोकणात ट्रेनने जायचे तर पनवेल जवळ पडते पण नेरुळवरुन हार्बर पकडुन पनवेल हार्बरला उतरुन पनवेल मेनसाठी बरीच पायपीट करावी लागते.

वक्र म्हणजे सी आकारातली स्टेशन्स म्हणत होतो मी.
हम केंदीय सूचना प्रसारण केंद्रसे बोल रहे है, हा प्रकार पण १९८५ नंतरच सुरु झाला. त्यानंतर बरीच सुसूत्रता आली. लांबच्या गाड्यांच्या डब्यांचा क्रम पण छान कळू लागला.

हार्बर लाईनच्या शेजारी, दाणा बंदर, रेती बंदर, हे बंदर, ब्रिक बंदर अशी खरीच बंदरे आहेत. तिथे तो तो माल उतरला जात असे. इतकेच नव्हे तर त्या परीसरात ज्या ऑईल मिल्स आहेत ( हिंदुस्तान लिव्हर, गोदरेज, पुर्वी टोमको वगैरे ) त्यांच्यापर्यंत रेल्वेचे रुळ आहेत. रेल्वेने आलेला माल थेट त्या कंपनीतच उतरवला जातो. ऑरेंज ऑईल ( साबणासाठी वापरतात ) राईस ब्रान ऑईल ( वनस्पतिसाठी वापरतात ) हे वॅगनमधून उतरून परत दुसर्‍या टँकरमधे भरणे जिकीरीचे असते. राईस ब्रान ऑईल तर सामान्य तपमानालाच घनरुपात असते. त्यात गरम वाफ सोडून ते प्रवाही करावे लागते.

कुर्ला स्टेशनपासून, बंतारा भवन, शिवसृष्टी, प्रियदर्शीनी, आर.सी.एफ अश्या मार्गाने थेट रिफायनरीज पर्यंत रेल्वेलाईन जाते. शिवाय पुर्वी पाण्याच्या पाईपलाइन्स शेजारूनही छोटा रेल्वे ट्रॅक होता. त्यावरुन गाडी नव्हे तर "बर्फी" मधे दाखवलीय तशी ढकलगाडी जात असे.

दिनेश, या छोट्या रुळांच्या माहितीबद्दल धन्यवाद!

चांदिवलीकडून साकीनाक्याला जाताना मध्येच एक असा बारकुळा ट्रॅक रस्त्याला तिरका छेद देत जातो. तो नेमका कुठून कुठे जातो हे आजवर कळले नाही.

@ पाटील- मुंबईचे उत्सव-
टाइम्स लिटररी फेस्टिव्हल
बँड्रा फेस्टिव्हल (मोतमावली नव्हे ) दोन्ही वर्षांती येतात, /वर्षारंभीही म्हणता येईल.
मल्हार यूथ फेस्टिव्हल- झेव्हियर कॉलेजचा आंतर महाविद्यालयीन उत्सव
मॅजेस्टिक गप्पा- पार्लेकरांचा वार्षिकोत्सव
माघी गणेशोत्सव- सिद्धीविनायक मंदिर गायनोत्सव
मामीचे (आपल्या नाहीत Happy ) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
याखेरीज मॅरॅथॉन वगैरे नित्यनैमित्तिक चालू असतातच

पाटीलांना मुद्दाम भेट द्यावी, अशी आणखी काही देवळेही आता आठवली.

१) गिरगावमधे फडके वाडी गणेश मंदिर.
२) मालाड पुर्वेला, दत्त मंदिर
३) पिकेट रोडचा मारुती
४) भोगादेवी मंदिर ( प्रभादेवीला आहे )
५) भुलेश्वर परीसरातले काळभैरव मंदीर आणि मुंबादेवी मंदिर
६) वरळी नाक्याजवळचे तिबेटी मंदिर आणि जरा पुढचे निलकंठेश्वर मंदिर
७) डॉकयार्ड रोडजवळ, बी.पी;टी रोडवरचे गणेश मंदिर, इथे पिंपळाच्या झाडात ९ गणेशमुखे तयार झाली आहेत.
८ ) दादरच्या फुलमार्केट ब्रिजवरुन सेंट्रल स्टेशनकडे जाताना, दोन स्टेशनमधल्या जागेत असणारे एक शिव मंदिर. ( तिथे जायचा रस्ता कुठून आहे ते कळत नाही. )
९) फोर्टमधल्या अग्यारी लेन मधली अग्यारी

दादर कबुतरखानाच्या उजवी कडे रस्त्याच्या मधोमध हनुमान मंदिर आहे. त्याच्या मागे पश्चिमेला डॉ. अ‍ॅन्थोनी डिसिल्व्हा हायस्कूल आहे... तर समोर पुर्वे कडे किर्तीकर मार्केटच्या मागच्या बाजुला पीर बगदादी मस्जीद आहे. हनुमान मंदिराच्या उजविकडे कबुतरखान्या समोर जैन मंदिर आहे. असा संजोग दुर्मिळच...

त्या हनुमान मंदिराच्या चौकटीवर श्रावण महिन्यात रोज नेमाने 'श्रावणी सोमवार', 'श्रावणी मंगळवार', 'श्रावणी बुधवार', 'श्रावणी गुरुवार' वगैरे फुलांनी लिहून सजवलेला भलामोठा फलक असायचा. (आताही असतो का माहीत नाही.)

पाटीलांना मुद्दाम भेट द्यावी, अशी आणखी काही देवळेही आता आठवली.>> धन्यवाद,
यातल्या काही जागा मी पाहिलेल्या आहेत

kw.jpg
धारावी कुंभारवाडा , या कंपोझिशनच्या काही भागासाठी अभिजीत च्या येका प्रकाशचित्राचा आधार घेतलाय

दादर कबुतरखानाच्या उजवी कडे रस्त्याच्या मधोमध हनुमान मंदिर आहे. >> त्याच्या पाठीमागच्या बाजुला क्रॉस आहे

डॉकयार्ड रोडजवळ, बी.पी;टी रोडवरचे गणेश मंदिर, इथे पिंपळाच्या झाडात ९ गणेशमुखे तयार झाली आहेत.<< याचसोबत डॉकयार्ड रोडजवळच्या टेकडीवरचे गावदेवी मंदिर. इथे एक छानसे उद्यान देखील विकसित केलेले आहे.

कबुतर खाना, गोल देऊळ, पोर्तुगीज चर्च हा मूळचा रस्ता असे त्या भागात जन्म झालेली माझी वहिनी सांगते.
रानडे रोड नंतर झाला.

पार्ला वेस्ट ला असलेल्या संन्यासाश्रम मध्ये श्रावणीसोमवारी लोण्याची पूजा बांधतात. हे देऊळ बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसत.

मुंबई आणि गणेशोत्सव , खूप उंचच उंच मूर्ती आणि देखावे हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच वैशिष्ट . : लहानपणी मुख्य आकर्षण असायचे ते गणेशगल्ली ( लालबाग) इथे असलेल्या गणेश मूर्ती बद्दल . तेव्हा लालबागचा राजा हा गर्दीचे मुख्य आकर्षण नसायचा तर गणेशगल्लीतला गणपती जास्त भाव खाऊन जायचा. ह्या मंडळाचे देखावे , मूर्ती पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लागायच्या . ह्या गणेशगल्ली गणेशमंडळाच्या बाजूला असलेल्या गणेशमूर्तीशाळेतून आजोबा गणपती मूर्ती घ्यायचे. माझा मामा , मावशी आम्हां साऱ्या बच्चे कंपनीला लालबाग स्पेशल गणेशोत्सव , तेथील देखावे दाखवायला घेऊन जायचे तेजूकाया , रंगारी बदक चाळ , चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव , लालबागचा राजा ( गरम खाडा/ मार्केट चा गणपती अस काहीतरी नाव होत) असे गणपती पाहत मग बस ने खेतवाडी येथे जायचो . तिथे सुद्धा प्रत्येक गल्लीत वेगवेगळे गणपती देखावे. खूप धमाल यायची .तेव्हा कुठल्याही सणाच बाजारीकारण झाल नव्हत.

Pages