Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ, तुम्ही नुसतं लिहित रहा
भाऊ, तुम्ही नुसतं लिहित रहा इथे...
'मुंबईत जाऊन सिनेमे पाहणे'
'मुंबईत जाऊन सिनेमे पाहणे' यावरून अजून एक आठवण आहे. (जराशी अवांतर आहे, पण तरी) -
मेट्रोला 'व्हेअर ईगल्स डेअर' लागला होता. साल ८४ ते ८६ दरम्यानचंच. डोंबिवलीच्या मामा-मामीनं ठरवलं, की आम्हाला दोघींना नेऊन तो सिनेमा दाखवायचा. (आठवडाभर लोकल प्रवास करून पुन्हा रविवारी डोंबिवलीहून मेट्रोपर्यंत जाण्याचा हाच तो उत्साह, ज्याचे माझ्यावर संस्कार झाले
असो.)
तेव्हा फोन-बिन काही नव्हतेच. मामा आदल्या आठवड्यात काळबादेवीच्या ऑफिसमधून डोंबि.ला जाताना वाटेत ठाण्याला उतरला, ईस्टच्या आमच्या घरी आला, रविवारचा हा प्लॅन आम्हाला त्यानं सांगितला. दुपारी जेवून आम्ही अमुक-अमुक लोकलनं निघू, ती ठाण्याला अमुक वाजता ३ नंबरवर (आताचा ४ नंबर) येईल. तुम्ही फ्रंट लेडीजला थांबा. सगळं ठरलं.
आम्ही दोघी रविवारी दुपारी वेळेत ठाण्याला तीन नंबरवर येऊन थांबलो. स्टेशनवर बर्यापैकी निवांत शुकशुकाट. ऐनवेळी घरी कुणीतरी आल्यामुळे मामा-मामीला निघायला उशीर झाला आणि त्यांची ठरलेली गाडी चुकली. पुढची फास्ट ट्रेन पकडावी लागली, कारण नाहीतर सिनेमा हुकला असता. आता ती ट्रेन ठाण्याला येणार ५ नंबरला (आताचा ६ नंबर), आम्ही ३ नंबरवर. ठाण्यात गाडी शिरत असताना मामी वेस्टच्या दारात अगदी लटकत उभी राहिली. लांबून तिनं आम्हाला पाहिलं आणि जोरजोरात हात हलवायला सुरूवात केली. आम्ही इकडे निवांत गप्पा मारत एका बाकावर बसलो होतो. येणार्या जाणार्या गाड्या पाहत होतो. कसं कोण जाणे पण माझं मामीकडे लक्ष गेलं आणि मी ताडकन उभी राहिले. मामीनं खूण केली, पटकन इकडे या. आम्ही सुटलो पळत. ३ नंबरच्या मुंबई साईडनं खाली ट्रॅकवर उतरलो, दोन्ही बाजूंना लांबवर एकही गाडी नव्हती. पळत पुढचे २ ट्रॅक्स ओलांडले. आणि ५ नंबरवर गेलो. तोपर्यंत मामी खाली उतरून ड्रायव्हरच्या केबिनजवळ गेली आणि चक्क त्याला म्हणाली - २ सेकंद थांबा हो, त्या बघा आमच्या मुली आल्याच !!
आणि आम्ही अखेर त्या गाडीत चढलो !!
लले, अजूनही आम्हाला स्टेशनात
लले, अजूनही आम्हाला स्टेशनात धावत शिरुन आताच्या १ नंबर प्लॅटफॉर्मकडे पळताना गार्डने पाहिलं तर तो टिन्टिंग करायचं किंचीत थांबतो. त्यालाही सरावाने अंदाज असतो की बायका लेडीज डब्याजवळ पोहोचल्या असतील धावत वाट काढत. ३-४ नंबर प्लॅटफॉर्मवरचे मोटरमन अशी थांबवतात जिन्यावरुन सुसाट उतरणार्या बाया पुरुषांसाठी. एस्पेशियली बायकांसाठी कारण त्त्या जिन्यावरुन उतरता उतरता केबिनच्या दारात उभ्या राहिलेल्या मोटरमनकडे एका डोळ्याने "ओवाळिते भाउराया" कटाक्ष टाकत धावत येऊन एकदाचं समोर दिसेल ते दार गाठून फिनिशिंग लाईनला (आपला भोज्ज्या हो! ) हात लावल्याच्या आनंदात श्वास टाकतात.
मंडळ रेल्वे गार्ड्स आणि मोटरमन्सचं आभारी आहे
एकदा वांद्र्याला माझी ऑफिसमधली मैत्रिण गॅपमधे रुळांवर पडली तेव्हा अश्याच लक्ष ठेवून असलेल्या गार्डने पटकन प्रसंगावधान राखून इतर बायकांच्या मदतीने तिला बाहेर काढली होती. कुणी खाली पडली आहे हे इतर बायांच्या लक्षात येऊन गार्डला सांगेपर्यंत त्याने गाडी सुरु करायला टिन्टिंग केलं असतं तर!!!
तर! मुंबई लोकल ट्रेन्स हा देखिल मुंबईचा अविभाज्य आणि महत्वाचा पैलू आहे, मुंबईची लाईफलाईन आहे.
कुणी खाली पडली आहे हे इतर
कुणी खाली पडली आहे हे इतर बायांच्या लक्षात येऊन गार्डला सांगेपर्यंत >>> हे माझ्या मामीच्या बाबतीत झालेलं आहे. फ्रंट लेडीजला चढताना तिचा पाय घसरला आणि कमरेपासून खालचा भाग प्लॅटफॉर्मच्या फटीत गेला. बायकांनी त्वरित मोटरमनला जाऊन सांगितलं, त्यामुळे गाडी हलली नाही. मामीला बाहेर काढता आलं. पण या घटनेचा तिला खूप शॉक बसला होता. नंतर अनेक दिवस हे भूत तिच्या मानगुटीवर होतं.
असो. विषयांतराबद्दल स्वारी. मुंबई-गप्पा पुढे सुरू ठेवू या.
<< मुंबई लोकल ट्रेन्स हा
<< मुंबई लोकल ट्रेन्स हा देखिल मुंबईचा अविभाज्य आणि महत्वाचा पैलू आहे,>> अगदीं खरं. व मुंबईची 'बेस्ट' बस सर्व्हीस हेंही एक सुखद आश्चर्यच !!
लले तू मुंबई सेंट्रलच्या
लले तू मुंबई सेंट्रलच्या 'मराठा मंदिर' मध्ये गेल्तीस का?>>>> व्वा! काय व्याप्ती आहे
लले
मी विचारते आता हे माधुरीताईला... आणि पुढची कथा तिच्याच शैलीत ऐकेन.
मागच्याच महिन्यात मी
मागच्याच महिन्यात मी शिवाजीपार्कला सकाळी वासुदेव पाहिला. >> वासुदेव आमच्या कडेही येतो अधुन मधुन... या आठवड्यात दोन वेळा येउन गेला.
लले, का जीव खातेयस
लले, का जीव खातेयस सगळ्यांचा?? कोणत्या तरी नावाला हो म्हण आणि हो मोकळी..
बाकी धागा मस्त चाललाय. बधवार पार्कात मासे पकडुन आणले की ते तिथेच सुकत घालतात. पार्काच्या मागेच कॉलेज असल्याने कधी चालताना रोडवर जवळाही पाहिलाय सुकताना.
मुंबईत काही ठिकाणी रोज किंवा
मुंबईत काही ठिकाणी रोज किंवा आठवड्याभरात बदलणारे मेसेज असत. मुद्दाम जाऊन वाचावे असे.
१) चर्चगेटला नाना चुडासामा यांचे घर
२) एअर इंडीया बिल्डींगजवळचा त्यांचा बोर्ड
३) दादर पोर्तुगीज चर्च वरचे सुविचार
४) माहीम चर्च जवळचे सुविचार
५) दादर टी टी वरची अमूल ची जाहीरात>>>>>>>>>>>>>>>>>
मी यातले एअर इंडीया आणि दादर टी टी वरची अमूल ची जाहीरात रोजच / नेहमीच वाचते. आणि यात अजुन एक म्हणजे पिझ्झा बाय द बे चा बोर्ड. करंट अफेअर्स वर लिहितात ते. छान असतात.
मला आवडलेले आणि विशेष लक्षात राहीलेले म्हणजे
क्रिकेट मॅच सुरु होत्या आणि भारत टीम खुप वाईट खेळली होती तेव्हा
वन्स अपॉन अ टाइम
वी प्ले क्रिकेट
मुम्ब्रा बिल्डींग पडली तेव्हा
New Builder Code
Provide Helmets and Safety gears
भाऊ, सध्या वरळीला व्हीटेस जे
भाऊ, सध्या वरळीला व्हीटेस जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला १९९० मधे लोटस नव्याने बांधले होते. बांधकाम पूर्ण झाले होते, पण ते कधीही सुरु झाले नाही. त्यावेळी बकाल असलेले वल्लभभाई पटेल स्टेडीयम आता चकाचक झालेय पण तिथे काही घडत असल्याचे दिसत नाही.
--
१९७९ ला माझ्या बहीणीच्या लग्नाचा शालू घेण्यासाठी आम्ही "कला निकेतन" ला गेलो होतो. त्या काळात तिथे साड्यांची ४/५ दुकाने होती आणि लग्नाचे शालू वगैरे घ्यायला तिथेच जावे लागे. त्यापुर्वी तिथे मशीनरींची दुकाने होती.
दादरला प्रकाश आणि धी गिरगाव पंचे डेपो हि दोनच मोठी दुकाने होती. त्या काळात त्यांना मान होता पण आता तो आब राखलेला नाही. ( ढिसाळ कारभारामूळे मी पंचे डेपोत, एका मायबोलीकरणीसाठी मोठे भांडण केले होते. ) लाजरी, मैत्रिण वगैरे फार नंतर आली. सध्या तर गोल देऊळ ते शिवाजी मंदीर, भारी साड्यांची भरपूर दुकाने आहेत.
चर्चगेटचे केसन्स पण त्यावेळी जोरात होते. त्यांच्या डिस्प्लेच्या साड्या बहुतेक रोज बदलत आणि डिस्प्लेच्या सर्व साड्या एकाच रंगाच्या असत. आर्टिकलशिपच्यावेळी सहकारी मैत्रिणीच्या आग्रहाखातर त्या दुकानासमोरून जात असू आम्ही.
वर्ल्ड ट्रेड सेंटर मधे मायसोर सिल्क साड्यांची शोरुम होती. सुंदर साड्या असत पण त्यावेळी जनरल पब्लिक तिथे जातच नसे.
पुर्वी आमच्या घरा समोर विहिर
पुर्वी आमच्या घरा समोर विहिर होती.>>>>> परळमधे विहीर????????? केव्हाची गोष्ट ही????>>>>> आमच्या गिरगावच्या घरासमोर अजुनहि आहे !
एक म्हणजे पिझ्झा बाय द बे चा
एक म्हणजे पिझ्झा बाय द बे चा बोर्ड. करंट अफेअर्स वर लिहितात ते. छान असतात.
>> ऑफिसमधे लंच टाईममधे फेरफटका मारत मारत आम्ही हा बोर्ड बघून यायचोच. पावसाळ्याच्या दिवसात मरीन ड्राईववर उसळणार्या लाटा यायच्या त्यामधे भिजायला मजा यायची.
मराठा मंदिर मधे हआहैकौ ने तीन
मराठा मंदिर मधे हआहैकौ ने तीन वर्ष तळ ठोकला होता.
लले ग्रॅ.रो.च्या पुर्वे कडिल उत्तर टोकाला मिनर्वा आणि दक्षिण टोकाला नॉव्हेल्टी सिनेमा आहे. जाउन खात्री करुन ये.
सगळेच मस्त भरभरुन लिहित आहेत. मात्र १८५४ साली सुरु झालेल्या कापड गिरणी उद्योगाबद्दल काही उल्लेख आढळला नाही. भायखाळा, काळाचौकी, लालबाग, परळ, लोअर परळ, दादर मधे वसलेल्या या गिरण समुहाला १९८२ साली संपाचे ग्रहण लागले आणि या उद्योगाला उतरती कळा लागली. १९९१ला सरकारने मिलच्या जमिनी विकण्याची परवानगी दिल्यावर २००० पर्यंत बहुतेक कापड गिरण्या पुर्णपणे बंद पडल्या. मुंबईच्या आसमंतात सोन्याचा धुर फेकणार्या त्या काळातील नावाजलेल्या काही कापड गिरण्या म्हणजे झेन्झी मील, परळची फिन्ले मील , दादरची कोहिनूर १ आणि २ नं. मील, इंडिया युनाटेड मील, लोअर परळची फोनिक्स मील, कमला मील, वरळीची मधुसुदन मील, डॉन मील, श्री राम मील, टाटा मील, खटाव मील, ज्युपिटर मील, कोहिनूर मील, सेंच्युरी मील अशी बरीच नाव आहेत. वडिल बॉम्बे डाईंग मधे मास्तर असल्याने आम्हाला बर्याच वेळा मीलची वारी घडली. स्पिनिंग डिपार्टमेंट मधला मोठमोठ्या यंत्राचा छाती दपडपून टाकणारा आवाज आजही लक्षात आहे. त्या डिपार्टमेंट काम करणार्या कामगारांच्या नशिबी आता कायमच बहिरेपण आल आहे.
मराठा मंदिर मधे हआहैकौ ने तीन
मराठा मंदिर मधे हआहैकौ ने तीन वर्ष तळ ठोकला होता.>>>>>>>>>>> आणि दिदुलेजा सुध्दा कित्येक वर्ष होता.
ललीचं थिएटर अप्सराच असणार असं
ललीचं थिएटर अप्सराच असणार असं मी डिक्लेअर करते. ग्रॅन्ट रोड ब्रिजवरून गेली असणार त्या बाजूला.
इंद्रधनुष्य, त्या संपाच्या
इंद्रधनुष्य, त्या संपाच्या कटु आठवणी लिहायला नकोश्या वाटतात. त्यापुर्वी त्या कामगारवर्गांनी केवळ मिल्स चालवल्या असे नाही तर अनेकांना रोजगार मिळवून दिला, शिवाय कामगार रंगभूमी दणक्यात चालवली.
होळी / दिवाळी ला तर वैभव होते त्या काळात.
अश्विनि के, 'ओवाळिते
अश्विनि के, 'ओवाळिते भाऊराया' कटाक्ष !
<<त्या संपाच्या कटु आठवणी
<<त्या संपाच्या कटु आठवणी लिहायला नकोश्या वाटतात.... शिवाय कामगार रंगभूमी दणक्यात चालवली. होळी / दिवाळी ला तर वैभव होते त्या काळात.... >> दिनेशदा, आदिनाथ हरवंदे यांच्या 'लालबाग' कादंबरीत त्यावेळच्या गिरणगांवाचं बरंच वास्तववादी वर्णन आहे; त्यावेळची कामगार चळवळ व रंगभूमीची 'पॅशन' याचाही बर्यापैकी मागोवा घेतलाय त्यांत. [कदाचित,या 'नॉस्टेलजिया'मुळेच या कादंबरीच्या गेल्या चार वर्षांत तीन आवृत्त्या निघाल्या असाव्यात !]
<< मुंबईत काही ठिकाणी रोज किंवा आठवड्याभरात बदलणारे मेसेज असत. मुद्दाम ....>>दिनेशदा व सस्मितजी, यातले बहुतेक फलक आजही झळकतच असतात.माहिम चर्च नजीकच्या फलकावरचा आजचा सुविचार आहे - " Honesty is an expesive policy; Don't expect it from cheap people " ! [ 'अमुल बटर'च्या जाहिरातीचे - दाभोळकर लिखीत- फलकही असेच असत. पाकिस्तानच्या मन्झूर इलाहीने भारताविरुद्ध एका मॅचमधे अफलातून खेळी केली तेंव्हाचा 'अमुल'चा फलक होता -" वही होता है जो मन्झूरे इलाही होता है " !! ].
<< पाकिस्तानच्या मन्झूर
<< पाकिस्तानच्या मन्झूर इलाहीने भारताविरुद्ध एका मॅचमधे अफलातून खेळी केली तेंव्हाचा 'अमुल'चा फलक होता -" वही होता है जो मन्झूरे इलाही होता है " !! ].
>>
क्या बात है! झझाकल्लाह!!
मुंबई ट्रेन ने ३-४ वर्षे प्.रेल्वे प्रवास केला. दररोज कोणीही न सांगता कुठलेही रीजर्वेशन नसताना त्याच जागी बसून ब्यागांवर रबर-ब्यांड लावून मेंढीकोट खेळणारे कर्मचारी, बाजूला कपाळावर गंध लावलेल्या गुज्जुभाईंकडून सुगंधी जर्द्याचा वास आणि 'चोक्कस' स्टॉक च्या टीप्स, कंगव्याने फिरवीत सुरु केलेले पंखे, मानेभोवती चौकड्यांचे रुमाल अडकवून 'हाश्श्-हुश्श' करत कागदावर बेरजा जमवणारे कारकून, स्टेशनवरचे घड्याळ बघून आपले घड्याळ सेट करणारे 'अंकल', कोपर्यात खिडकीजवळ बसून सगळ्या जगाची चिंता शेजारच्या इंजीनीअरींग च्या विद्यर्थ्यावर सोडून मस्त झोपलेले आजोबा, त्याच विद्यार्थ्याच्या पुस्तकात डोकावून पूर्वीचे दिवस आठवणारे काका, आणि कुणाच्या तरी ट्रांझिस्टर वर 'रफू चक्कर' चे हे वरचे गाणे'...
.. सारे सारे काळजात कोरले गेलेय!!
हिरा, ते उर्वशीचे झाड, नव्या
हिरा, ते उर्वशीचे झाड, नव्या रुपात टिकून आहे हे वाचून खुपच आनंद झाला.
रेल्वेमधे गेल्या २५/३० वर्षातच अनेक बदल झाले.
१) ९ डब्यांच्या गाड्या १२ डब्यांच्या झाल्या.
२) तिकिटांचा प्रकार आधी पातळ पुठ्ठ्यावर, मग कार्डपेपरवर आणि आता कंटीन्यूअस स्टेशनरीवर.
३) पुर्वी तारीख आणि वेळ टाकण्यासाठी लोखंडी उपकरण असे. तासातासाला त्यातली वेळ हातानी बदलावी लागे.
आणि ते प्रिंट न करता एनग्रेव्ह करत असते.
४) बुकिंग विंडोवर पुर्वी सुट्या नाण्यांसाठी खळखळ केली जात नसे. ( माझ्या आठवणीत ३० पैसे वगैरे तिकिट आहे. ) मग कुपन्स, सोबत कुपन्स व्हॅलिडेटींग मशीन्स आली. आता त्याहून पुढे तंत्र गेले.
५) पुर्वी पासासोबत ओळखपत्राची गरज नसे. एकेमेकांचे पास सहज वापरत असू. ( वय वगैरे बघावे लागे.)
६) पश्चिम रेल्वेवर दादर, बांद्रा, अंधेरी, बोरीवली आणि विरार एवढीच डेस्टीनेशन्स होती. आता गोरेगाव, मालाड, वसई, भाईंदर, डहाणू अशी बरीच आलीत.
७) मध्य रेल्वेवर पनवेल पर्यंत टप्प्या टप्प्याने लाईन वाढली.
८) फर्स्ट क्लासच्या डब्याच्या दरवाज्याशेजारी केवळ १ रेघ आणि बायकांच्या डब्याच्या दरवाज्याशेजारी, डोक्यावर पदर घेतलेल्या बाइचे चित्र असे. तिरप्या पट्ट्या नंतर आल्या. मालडब्यावर तीन रेघा असत. आता व्हेंडर्स असे लिहिलेले असते.
९) ते डबे जिथे येतील तिथले स्टेशनवरचे मार्किंगही नंतर आले.
१०) ३ / ३ डब्याचे एक युनिट असते. तिथली नियोजित मोटरमनची जागा पुर्वी बंदच असे. तिथे लटकत
कुणी प्रवास करु नये म्हणून खाली तिरपा पत्रा मारला असे. सध्या तिथे अपंगांची सोय असते.
११) लेडीज स्पेशल या गाड्या नंतर सुरु झाल्या.
१२) उदघोषणांत एकवाक्यता आणि खास करुन मुलिंचे आवाज १९८१ नंतर आले. पुर्वी " आनेवाली गाडीया
देरीसे आनेके कारण, जानेवाली गाडीया देरीसे जा रही है " अश्या घोषणाही दिल्या जात.
१३) पश्चिम रेल्वेवरच्या स्टेशनांची नावे गुजराथीमधे पण असत.
१४) डेस्टीनेशन्स साठी इंग्रजी अद्याक्षरांचा वापर प्रत्यक्ष गाडीवर नंतर सुरु झाला. तो अप गाड्यांवरही सुरु
झाल्याने, गाडी कुठून आली ते कळते. पण ही अद्याक्षरे अगदी युनिक आहेत ( सी फॉर कुर्ला, एन फॉर कसारा, एस फॉर कर्जत वगैरे )
१५) १९७७ पर्यंत हाताने चालवायचे इंडीकेटर होते. त्यातल्या चौकोनी दांड्या फिरवून, गाडी कुठे थांबणार नाही
ते दाखवत. त्यावरच पितळी काटे असलेले घड्याळ असायचे आणि त्याचे काटे हातानी फिरवले जात.
१६) पुर्वी गाडीच्या पुढे आता असते तशी जाळी नसे. गायी वगैरे गाडीखाली येत. आमच्या समोर राहणारे, दैनिक मराठाचे कार्यकारी संपादक, नाना गुप्ते, असेच दगावले होते. त्यानंतर त्या जाळ्या आल्या.
१७) वडाळ्याचा फ्लायओव्हर होण्यापुर्वी, राऊळी जंक्शनवर क्रॉसिंगसाठी गाड्या अडकायच्या. माटुंगा ( म.रे.) वर पण मालगाडी क्रॉसिंगसाठी एक नंबरवरची गाडी अडकायची.
१८) पुर्वी बहुतेक स्टेशनवर लेव्हल क्रॉसिंग होते. टप्प्याटप्प्याने ती बंद झाली.
१९) हार्बरच्या गाड्या पुर्वी वांद्रापर्यतच असत. नंतर ज्यादा प्लॅटफॉर्म करुन त्या अंधेरीपर्यंत नेण्यात आल्या.
२०) हार्बरवरचे सँडहर्स्ट रोड ( बहुतेक ) आणि किंग्ज सर्कल हि किंचीत गोलाकार आहेत. किंग्ज सर्कल स्टेशन सारखे निवांत स्टेशन नसेल.
२१) हार्बरवरचीच काही स्टेशन्स वर तर काही खालच्या लेव्हलवर आहेत. त्यामूळे गाडी सारखी वरखाली
जात असते.
अजून आठवतीलच बदल...
दिनेशदा लेटेस्ट रेल्वे अपडेट
दिनेशदा
लेटेस्ट रेल्वे अपडेट
आता रेल्वे पंधरा डब्याच्या झाल्यात
हार्बर गोरेगावापर्यत विस्तारतेय
पासाबरोबर ओळखपत्र कंपल्सरी
आता डहाणू ते चर्चगेट अशी लोकलही चालू झालेय
एक म्हणजे पिझ्झा बाय द बे चा
एक म्हणजे पिझ्झा बाय द बे चा बोर्ड. करंट अफेअर्स वर लिहितात ते. छान असतात.
>> ऑफिसमधे लंच टाईममधे फेरफटका मारत मारत आम्ही हा बोर्ड बघून यायचोच. पावसाळ्याच्या दिवसात मरीन ड्राईववर उसळणार्या लाटा यायच्या त्यामधे भिजायला मजा यायची
>> +१. पिझ्झा बाय द बे air india building मधे काम करत असतानाचे आमचे favorite. पावसाळ्यात मरीन ड्राईववर फिरत भिजायचे, नि नंतर air india building मधे जाऊन मस्त कॉफी नि समोसे खान Queen's necklace बघायचा. Those were the days
दिनेशदा, तुमच्या परवानगीने
दिनेशदा, तुमच्या परवानगीने -
२६) अपंग, कॅन्सर रुग्ण इ.साठी राखीव डबा आला;
२७) वांद्रे, दादरहून विरार गाड्या सुटूं लागल्या;
२८) सुरक्षा व्यवस्थेमुळे असेल, पण पाकीटमार, सांखळीचोर दुर्मिळ झाले;
२९) बहुतेक स्थानकांत गर्दीनुसार अधिक पूल बांधण्यात आले;
३०) उदघोषणा आतां बर्याच प्रमाणात अधिक स्पष्ट कळतात !!
हार्बरवरचे सँडहर्स्ट रोड (
हार्बरवरचे सँडहर्स्ट रोड ( बहुतेक ) आणि किंग्ज सर्कल हि किंचीत गोलाकार आहेत. किंग्ज सर्कल स्टेशन सारखे निवांत स्टेशन नसेल.
>> सॅंडहर्स्ट रोड नक्कीच गोलाकार आहे. डॉकयार्ड स्टेशनदेखील किंचित गोलाकारच आहे.
भाऊकाका आता पाकीट मारण्याचे
भाऊकाका आता पाकीट मारण्याचे दिवस मागे पडले
आता स्मार्टफोन्स मारले जातात
<< भाऊकाका आता पाकीट
<< भाऊकाका आता पाकीट मारण्याचे दिवस मागे पडले >> " भाउकाका, आतां तुमचे दिवस मागे पडले ", अशाच थाटांत सांगितल्यासारखं वाटलं !!
अस नव्हतं म्हणायच मला
अस नव्हतं म्हणायच मला

मुंबईच्या जीवनातून रेल्वे
मुंबईच्या जीवनातून रेल्वे वगळणं शक्यच नाहीये. आता मात्र रेल्वेला जोरदार स्पर्धक येताहेत - मेट्रो आणि मोनोरेलच्या रुपानं. आगे आगे देखिये होता है क्या!
मामे तेव्हा तू रेल्वे रेल्वे
मामे तेव्हा तू रेल्वे रेल्वे तेव्हाची आणि आताची असा एक धागा काढ
दिनेशदा, >> २०) हार्बरवरचे
दिनेशदा,
>> २०) हार्बरवरचे सँडहर्स्ट रोड ( बहुतेक ) आणि किंग्ज सर्कल हि किंचीत गोलाकार आहेत.
हार्बरप्रमाणे प्रधानमार्गाचे (मेनलाईन) फलाटही वक्र आहेत.
एक डोळ्याआडची गोष्ट म्हणजे लाकडी पटर्या जाऊन सिमेंटच्या आल्या. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला, पण उभ्या राहणार्या प्रवाशांना सांधे, पाय, मणके, इत्यादिंची दुखणी सुरू झाली.
आ.न.,
-गा.पै.
Pages