मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके उघड्यावर असलेले, धुळ, कचरा, वाळूच्या कचाट्यात सापडलेले एक्स्लरेटर कितपत वर्किंग कंडिशनमध्ये राहू शकतील याची शंकाच वाटते.

नाही गं, हे कारण नव्हते. तेव्हाच्या पब्लिकलाच सरकत्या जिन्यावरुन सरकणे जमेना, तक्रारी वाढायला लागल्या आणि मग शेवटी सरकता जिना एकाच जागी स्थिरावला.

पुणे रेल्वे स्टेशनवर आहे सरकता जिना आणि धुळ, कचरा, वाळूच्या कचाट्यातुनही चांगला धडधाकट चालतोय. हा माझ्या कायम लक्षात राहिल कारण त्यासोबत निगडीत आठवणही लै भारी आहे.

माझी लेक शाळेतर्फे मनालीला निघालेली तेव्हा आमच्यावर थेट पुलंसारखा प्रसंग ओढवला. पुणे रेल्वेस्टॅशनसमोरच्या गर्दीतुन कसेबसे प्लॅटफॉर्मवर पोचलो तर समोर जम्मुतावी उभी. गाडी समोरच आहे म्हणुन सुस्कारा सोडतोय तेवढ्यात मुलीच्या युनिफॉर्मवरुन एका पालकाने तिला ओळखले आणि 'समोरची गाडी जम्मुवरुन आलीय, जम्मुला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर ५ वरुन ५ मिनिटात सुटणार आहे' हे शुभवर्तमान आमच्या कानावर घातले. आमची जी काय धावपळ उडाली की ज्याचे नाव ते... नशिबाने सरकता जिना होता म्हणुन बचावलो, नाहीतर इतके सामान घेऊन इतक्या प्रचंड गर्दीत जिने चढणे अशक्य झाले असते. Happy आणि मग प्लॅटफॉर्म नं. ५ वर जब वी मेटमधल्या मुंबई सेंट्रलवरुन पंजाबची गाडी पकडणा-या करीनासारखी धावपळ.. Happy

विषयांतराबद्दल माफी, पण सरकत्या जिन्याची ही आठवण कधीच न विसरण्याजोगी. Happy

मुंबईतली दमट हवा वस्तू लवकर खराब करते गं. पुण्यात व्यवस्थित कोरडं आहे हवामान. आणि मुंबईसारखा धुवांधार पाऊसही नाही. त्यामुळे पुण्यात टिकतात गोष्टी.

जुहूच्या विमानवाल्या बागेत कधी जायला मिळाले की अक्षरक्षः हाती स्वर्ग लागल्याचा भास व्हायचा. >>> अगदी अगदी.

अशीच विमानं, हेलिकॉप्टर, रणगाडे असलेली बाग म्हणजे घाटकोपरची 'जय जवान गार्डन'. आख्खं बालपण तिथे हुंदडण्यात गेलंय. तिथे बागेबाहेर एक माणूस लाकडी काठीला मोठ्ठा चिकट गोळा लावून घेऊन यायचा. आणि थोडा थोडा घेऊन त्याची गाडी, सायकल वगैरे काहीतरी करून द्यायचा. बरीच मुलं ते घेऊन खात असत. आम्हाला भारी कुतुहल असे पण कधी कोणी घेऊन दिलं नाही - ते चांगलं नसतं या नावाखाली. त्याऐवजी आम्हाला बोरिंग शहाळी खावी लागायची. त्याला काय म्हणतात? साखरेचा चिकट आणि रंगित पाक असावा तो असं वाटतंय.

<< आम्ही फक्त ५० पैशात आणि नंतर १ रुपयात कितीतरी जुने चित्रपट तिथे पाहिले. >> आमच्यावेळीं सुरवातीला 'साडेदहा आणे' [साधारण ६५ पैसे ] हें स्टँडर्ड तिकीट असे 'मॉर्नींग शो' करतां !! अर्थात, 'ताज'सारख्या थियेटरांत ५आण्यांचही तिकीट असायचं पण तिथं << अधुन पाली फिरायच्या, सिटखालुन उंदीर धावायचे >> यापेक्षांही आणखी कांही 'बोनस' असायचे म्हणून परवडत नसूनही आम्ही सदा 'साडेदहा आण्यां'च्याच वरच्या वर्गात स्वतःचं नांव घातलं होतं !! Wink

गिरगांवातलं 'मॅजेस्टिक' हें नांवाप्रमाणे भव्य, दिव्य नसलं तरी छान, छोटं ,टुमदार थियेटर होतं. बहुतेक सिनेमा मराठीच असत व 'मॉर्नींग शो' मात्र दर्जेदार इंग्लीश सिनेमा. आमचं तर तें 'होम पीच'च होतं. 'मॉर्नींग शो' सकाळीं दहाचा असे पण सुरूं होणं तिकीट खिडकी बंद होण्यावरच अवलंबून असे. कुणीं नवख्याने उशीराबद्दल विचारलंच तर, ' हमारे घडीमें दस बजेंगे तबही चालू होगा सिनेमा ! ' , असं निर्विकारपणे दिलेलं उत्तर मिळायचं. [ 'हॉलीवूड'ची एक प्रथितयश नटी होती - 'लॅसी' नांवाची रुबाबदार कुत्री ! योगायोगाने, तिचा प्रमुख रोल असलेले तीनही चित्रपट आम्ही पाहिले 'मॅजेस्टिक'मधेच !! खूप नंतर इंटरनेटवर शोधताना अचानक कळलं, 'लॅसी फॅन क्लब'ही अस्तित्वात आहे !! ]
'मॅजेस्टिक' इतिहासजमा झालं, हें वेगळें सांगणे नलगे !! Sad

मोर बंगल्याच्या परिसरात मोर होते पण ते मुक्तपणे बागडणारे मोर होते का याविषयी शंका आहे. विसाव्या शतकाच्या सुमारास मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती गोकुळदास तेजपाल यांनी पारले पूर्व येथे बरीच मोठी जमीन खरेदी केली होती. तीत अगदी स्टेशनसमोरच्या भागात त्यांनी स्वतःसाठी एक भव्य राजमहालसदृश बंगला बांधला. तोच मोर बंगला. ही जागा खूपच मोठी, मोकळी आणि स्टेशनसमोर होती म्हणून बाबूराव परांजप्यांनी ती पारले कॉलेज साठी विकत मागितली होती. पण बहुतेक सौदा जमला नसावा. नंतर पारले कॉलेजसाठी अन्यत्र जागा शोधण्यात आली. मोर बंगल्याची जागा देखील विकली जाऊन तेथे अगरवाल मार्केट आणि दीनानाथ नाट्यगृह उभे राहिले
या मोर बंगल्याच्या अंगणात पाळीव मोर होते. ते मोकळे होते की पिंजर्‍यात असत याविषयी माहिती नाही..पण हे मोर पाहिलेले लोक पारल्यात अजूनही आहेत. या मोरांवरूनच या बंगल्याला मोरबंगला हे नाव पडले. या बंगल्यात श्री. गानू नावाचे एक कुटुंब पुष्कळ दिवस रहात असे. ते केअर टेकर होते की भाडेकरू याविषयी माहिती नाही.
तेजपाल यांच्या नावाने एक रस्ता पारले पूर्व इथे आहे. तेजपाल स्कीमसुद्धा प्रसिद्ध आहे.

गिरगावच्या सरकत्या जिन्यावर मी लहानपणी अगदी रोज नाहितरी आठवड्यातुन ३ वगैरे तरी जायचेच..
आणि येताना गॅसचा फुगा घेउन घरी..काय अप्रुप होत..

अंधेरीत शिफ्ट झाल्यावर देखिल बाबा पोहण शिकवायला गिरगाव चौपाटीला न्यायचे..तो किनारा सेफ आहे म्हणुन...

पार्ले-अन्धेरीच्या मधे वेस्टला, एस. व्ही. रोड वर "बिंदु बंगला" आहे. असे म्हणतात की तिथे सिने नटी बिंदू राहते. हे खरे आहे का?

गिरगाव चौपाटीला जो रस्ता मिळतो (गणपती गावी जाताना) त्या रस्त्यावर आहे तो एस्केलेटर. सुखसागरच्या जवळच. केनेडी ब्रीज आणि चौपाटीच्या मधे. गंजला पण असेल केव्हाच तो. खरंतर तिथे त्या सरकत्या जिन्याची काहीच आवश्यकता नव्हती. कुणी घाबरुन त्यावर जातही नसत. सराईतपणे खालून रस्ता क्रॉस करु शकत असताना सरकत्या जिन्यावरची कसरत कोण करणार? चिटपाखरुही त्या जिन्यावर दिसत नसे. काही दिवसच चालला तो. मला मुद्दाम जिना दाखवायला बाबांनी नेलं होतं आणि खालूनच दाखवला होता Lol

मामी, ते पुल्ड साखरेचे प्राणी सायकली वगैरे करणारा माणूस काला घोडा आर्ट फेस्टिव्हल मध्ये आला होता. पुढच्या वर्षी नक्की घे.

@ गा. पै., आपण दिलेला (पान क्र. २१) रेल वे पुलाचा फोटो पुष्कळ ठिकाणी दिसतो. तो बहुधा ठाणे-मुंबई पहिल्या रेल प्रवासासंदर्भात दिला जातो. पण बहुधा तो तसा नसावा. तो पूल हा पुण्यानजिकच्या दापोडी चा असावा. या संबंधी अधिक माहिती देणारा हा एक दुवा : (हा दुवा उपक्रम वर जातो)
http://www.mr.upakram.org/node/3532

बिंदूचा ऑफिशीयल पत्ता ताडदेवचा होता. तिच्या मालकीच्या काही निऑन साईन्स होत्या, त्याचे तिला भरपूर उत्पन्न मिळत असे.

जुहूलाच एक विमान पण कोसळले होते ना ? त्याचा अर्धा भाग रस्त्यावर होता.
एकदा एक मोठे रशियन विमान, चुकून जुहू ला उतरले होते, तिथली धावपट्टी कमी लांबीची असल्याने, मोठ्या मुष्कीलीने उडवावे लागले होते ते.

पंतनगर / घाटकोपर स्टेशन वरुन अजूनही विमानाच्या पोटावर / शेपटीवर लिहिलेले वाचता येते.

वर्ल्ड ट्रेड सेंटर ( द आर्केड ) आता गजबजलेय. पुर्वी तिथे केवळ ऑफिसची माणसेच ( सी.एम.सी. चे ऑफिस होते, स्टेट बँक होती ) असायची. त्या इमारतीच्या आतून फिरायला मस्त वाटायचे. आमची सी.ए. संस्था जवळच असल्याने, तिथे जाणे व्हायचेच. संतूर वगैरे त्या काळातच सुरू झाली ( १९८१ वगैरे ) पण आधी नीट चालत नव्हती. कुलाबा वूडस हि बाग पण तिथे आहे.

पुर्वी ताज मधे असणारे, इथिओपियन चे ऑफिस आता तिथे आहे. आत एक गार्डन रेस्टॉरंट पण झालेय.

त्या सरकत्या जिन्याशी निगडीत माझ्या आठवणी म्हणजे आईच्या काकांच्या सफारी गाडीतून गिरगावात जायचे, आईच्या दुसर्‍या काकांची ब्रँच तिकडे जवळ्पास कुठेतरी होती, तिथे जाऊन लस्सी प्यायची (तो भलामोठा ग्लास संपायचा नाही) आणि काहीतरी टिवल्याबावल्या करत बसायच्या. डझनभर मुलांचं बिनकामाचं हुंदडणं महाराष्ट्र बँकच सहन करू जाणे! तोपर्यंत सफारीवाले आजोबा त्यांची फोर्ट परीसरातली कामं करून यायचे. मग आमची वरात सरकत्या जिन्यावर पोचायची. तिथून गिरगाव चौपाटीवर जाऊन खेळून तिथलं आईस्क्रिम सॅडविच खाऊन मग घरी.
मस्त मज्जेचे दिवस होते ते. Happy

आर्टिकलशिपच्या काळात मला स्टेशनरीचे फार वेड होते. नवे नवे प्रकार घेण्यासाठी, र्‍हिदम हाऊसच्या समोरचे दुकान ( ज्या इमारतीत १०० वर्षांपूर्वी पहिला चित्रपट दाखवला गेला ती ) आणि फोर्टमधल्या अग्यारी लेन व आजूबाजूच्या गल्ल्या या खास आवडीच्या. अजूनही स्टेशनरीमधले अद्यावत ते तिथे मिळते आणि स्वस्तही पडते.

लॅमिंग्टन रोडवर आता इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत मात्र मी समाधानी नाही. पुर्वीचे अगत्य राहिले नाही. बहुतेक धंदा होलसेलचा झालाय असे वाटते. आता वाशीचा बाजार जास्त आवडतो.

०००

या लेनमधेच बहुतेक मथुरा या नावाचे हॉटेल होते. बुरा साखरेत घोळवलेले पेढे आणि लस्सी मस्त मिळायची. पुरी भाजी पण खास असायची.
माटुंगाचे संदेश आता बसून खाण्यासाठी राहिलेले नाही. पुर्वी तिथे बसून खायची सोय होती. रबडी पुरी मागवली कि सोबत बटाट्याची भाजी आणि लोणचेही मिळायचे. सिटीलाईट जवळचे शोभा अजूनही चव राखून आहे.
वसुमति धुरुंनी, चिंगलान ( डॉ. कोटणीस यांच्या पत्नी ) या नावाचे चायनीज पदार्थांचे मराठीतील पहिले पुस्तक लिहिले, त्यात त्या खास भाज्या मिळण्यासाठी सिटीलाईट मार्केटचा उल्लेख केला होता. तशा खास भाज्या तिथे अजूनही मिळतात.

सिनेमा दाखवला ती बिल्डींग म्हणजे वॉट्सन हॉटेल (esplanade mansion ), हे त्यावेळचे फाईव्ह स्टार हॉटेल व्हाईट्स ओनली होते आणि टाटाना तीथे प्रवेश नाकारला म्हणुन त्यांनी ताज हॉटेल बांधले अशी आख्याईका आहे.

मोर बंगल्याच्या परिसरात मोर होते पण ते मुक्तपणे बागडणारे मोर होते का याविषयी शंका आहे <<< ते मोर बंदिस्त नसत, मुक्तपणे बागडायचे, आई लहाणपणी तिच्या मामांकडे इकडे पार्ल्यात येत होती, तेव्हा मोर बंगल्यातले मोर पाहणे हा कार्यक्रम असायचा. मोर बहुधा जयपुर / उदयपुर हुन विकत घेतले होते.

पार्ले-अन्धेरीच्या मधे वेस्टला, एस. व्ही. रोड वर "बिंदु बंगला" आहे. असे म्हणतात की तिथे सिने नटी बिंदू राहते. हे खरे आहे का? <<
हे मी आजच पहिल्यांदा ऐकते आहे.

<<लॅमिंग्टन रोडवर आता इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत मात्र मी समाधानी नाह<< दिनेशदा, जिथें तें गजबजलेलं मार्केट आहे, त्या तुरळक वहातुकीच्या शांत गल्ल्या होत्या. तिथल्या गल्ली क्रिकेटच्या सामन्यांमुळे आम्हाला खूप आपुलकी असायची त्या गल्ल्यांची.
[ आमच्या वर्गातल्या एका शांत, अबोल असलेल्या गद्रे नांवाच्या मुलाने आपल्या तिथल्याच घरीं टेबल टेनिस खेळायला या म्हणून आम्हांला आमंत्रण दिलं होतं. सांगितलेला पत्ता तिथल्या चर्चनजीकचा व आमच्या माहितीच्या परिसराचा होता म्हणून जास्त तपशील विचारायची गरजही भासली नाही. आम्ही तिथं जावून आजुबाजूच्या घरांत , इमारतींत शोधलं; अचानक आमच्यातल्या एकाची नजर चर्चच्याच बाहेरील पाटीवर गेली - " रेव्ह. गद्रे " ! 'गद्रे' ख्रिश्चन असूं शकेल हें त्या क्षणापर्यंत आमच्या टाळक्यांतच आलं नव्हतं व त्यानेही कधीं आम्हांला तशी जाणीव होऊं दिली नव्हती ! आजही तें चर्च तसंच तिथं आहे. या छोट्या विषयांतराबद्दल क्षमस्व. ]

भाऊ, खालची दुकाने अत्याधुनिक तर वरची घरे जून्या काळातली असे तिथे अजून आहे. गेल्या संक्रांतीला वरच्या मजल्यावरची एक वयस्कर बाई मी बाल्कनीतून पतंग उडवताना बघितली होती.

गोवा हिंदू असोसएशनचे ऑफिस तिथेच होते. आणि विजयाबाईंना त्यांची "हमिदा" इथेच सापडली होती.

पुर्वीचे अगत्य म्हणजे, माझ्या मामाला ट्रांझिस्टरसाठी एक स्पेअर पार्ट हवा होता. कुठेच मिळत नव्हता. त्या रोडवर नक्की मिळेल असे आम्हाला सर्व सांगत.

शेवटी आम्ही तो न चालणारा दुर्मिळ जपानी ट्रांझिस्टर तिथे घेऊन गेलो. तिथल्या एका छोट्या दुकानदाराने तसलाच एक ट्रांझिस्टर आमच्यापुढे ठेवला आणि त्यातला हवा तो स्पेअर पार्ट काढून दिला !

गिरगाव चौपाटीवरच्या सरकत्या जिन्याबद्दल थोडेसे.

साधारण १९७९ च्या आसपास हा जिना सुरु झाला. ऑपेरा हाउसवरुन सरळ चौपाटीकडे जाताना सध्या गणपती विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका जिथे गिरगाव चौपाटीला मिळतात तिथल्या पादचारी पुलाच्या एका बाजुला हा जिना बसवण्यात आला होता. अगदी लागुन आयडीअल बार आणि कर्णरेषेत सुख-सागर हॉटेल आहे. साधारण ३ महिन्यातच बंद केला गेला. हा जिना त्यावेळी जिन्याखालीच बसवलेल्या डिझेल जनरेटरवर चालत असे. बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा रोजचा डिझेल आणि देखभाल खर्च महापालिकेस खुप जास्त वाटला. हा जिना मुळातच प्रायोगिक तत्वावरच सुरु करण्यात आला होता.

<< तसलाच एक ट्रांझिस्टर आमच्यापुढे ठेवला आणि त्यातला हवा तो स्पेअर पार्ट काढून दिला !>> दिनेशदा, वांद्र्याच्या दुकानातून मीं घेतलेल्या टीव्हीचा रिमोट मोडला; दुकानदार म्हणाला, कंपनीच्या फॅक्टरीतून मागवावा लागेल, एक महिना लागेल व किंमत निदान हजार रुपये होईलच. लॅमिंग्टन रोडच्या छोट्या दुकानात गेलो व फोनवर बोलत असलेल्या दुकानदारापुढे तो जुना रिमोट ठेवला. तसाच बोलत बोलतच त्याने मागे न बघतां मागच्या कप्प्यातून एक रिमोट काढून माझ्यासमोर ठेवला. " सौ रुपये !". फर्स्टक्लास चालतोय तो रिमोट !! अफलातून आहे तें मार्केट !!

आज मुंबईची हवा दिवसभर फार आल्हाददायक आहे. फॉर द रेकॉर्ड. हल्की पावसाळी, सुरेख गार वारे.
हिरवळीत चालण्यासारखी.

पैलवानराव,

भारत आणि इंग्लंड दोन्हीकडे ब्रिटिश राज्य असले तरी दोघांचे चलन वेगळे होते... त्यामुळे भारताचा रुपया घसरला अस्ला तर ब्रिटिश सरकार काहीतरी करत असेल ना त्याकाळी. आणि त्यांचा पाउंड तसाच मजबूत रहात असेल. तुम्ही लंडनमध्ये जरा राणीबाईला फोन करुन विचारा. Happy

<<...जरा राणीबाईला फोन करुन विचारा.>> राणीबाईला मॅडम थॅचरचं [ ग्रेट लेडी ! ]सुतक आहे सध्यां. Sad नका त्रास देऊं तिला आत्तांच !

हीरा, मोरबंगल्याविषयी वाचून मस्तच वाटले. धन्यवाद ! दीनानाथ मार्केटच्या जागी मोरबंगला होता हे माहीतच नव्हते. आम्ही मोरबंगला म्हणून कुठलातरी वेगळाच बंगला बघायचो लहानपणी. बहुतेक महंत रोडवर. महंत रोडवरच पार्लेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला शिल्पकार म्हात्रे ह्यांचा म्हात्रे बंगला होता. बंगल्याच्या आजूबाजूला बरीच जागा होती जिथे त्यांची कार्यशाळा होती. आता तो बंगला पाडून बिल्डिंग झाली आहे. त्या बंगल्याचा दिवाणखाना बघण्याचा योग एकदा आला होता तेव्हा त्यांची सुरेख शिल्पं पाहून थक्क झाले होते. शिल्पकार म्हात्रे ह्यांच्याविषयी इथे वाचता येईल.

श्रेष्ठ शिल्पकार श्रीमती पोचखणवाला यांचा बंगला वरळी सी फेसवर होता आणि त्यांनी साकार केलेले पीकॉक हे शिल्प पण हाजी आली जवळ होते. केवळ पाईप्सचा वापर करुन केलेले ते शिल्प खुपच छान होते. असणार अजून .

वरळीला, नाक्याजवळ पण एक पांढरे अमूर्त शिल्प होते आणि सध्या नाक्यावर डॉल्फीन्सचे शिल्प बघितल्यासारखे वाटतेय. प्रभादेवीला, आकार नावाचे देव्हारे विकणारे दुकान आहे त्याच्याजवळ एक मेल सेमी न्यूड शिल्प आहे. फार आक्रमक वाटते ते. त्याबद्दल पण काहीतरी खास वाचले होते.

अहो नतद्रष्ट!! मी मूळापासून हलले तुमच्या माहितीमुळे.

१९७९ च्या आसपास चालू झालेला सरकता जिना तीन महिन्यातच बंद पडला असेल तर मला कसे आठवते तिकडे गेलेल्याचे?????????
गेल्या जन्मीचे आठवण्याइतकी पुण्याई नाही आमची. Biggrin

यासंदर्भातली एक लिंक इकडे मिळाली.
आणि दुसरी लिंक इकडे मिळाली.

Pages