आधीच्या भागांची लिंक
भाग १ - http://www.maayboli.com/node/40847
भाग २ - http://www.maayboli.com/node/42011
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077
भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134
भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252
भाग ६ - http://www.maayboli.com/node/42292
पुढे..
सम्राट तिथं हे बोलून गेला खरा पण नंतर त्याला कळेना की आपल्याला काय करायचं आहे? का आपण पुन्हा त्याच नशिबाच्या फेर्यात अडकायला बघतो आहोत? खूप विचार केल्यावर त्याला एवढंच कळलं की आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपल्यासाठी फक्त हीच वाट मोकळी आहे. आपण अजूनही तिच्यात गुंतलो आहोत. ज्या क्षणी तिला पुन्हा पाहिलं आणि आक्कात्यानी ती आल्यावरच्या अवस्थेबद्दल सांगितलं तेंव्हा जे दुखलं ते मूळ रोपटं हृदयात अजून तग धरून आहे म्हणूनच. याला इलाज नाही. ती कशी वागली, तिनं आपल्या आयुष्याचं काय केलं याचा आपल्याला तिच्याविषयी काय वाटतं याच्याशी संबंध नाही. ती कशीही वागली तरी आपण असेच वागणार आहोत. इतकं कळल्यावर जरी त्याला वाईट वाटलं, स्वत:चीच दया आली तरी त्याची तडफड, काळजी थोडी कमी झाली, तो शांत झाला. आणि नंतर तर त्याला उत्सुकता पण वाटायला लागली. कित्येक वर्षांनी तो तिला असा एकांतात भेटणार होता. आता तो नवीन तारुण्याचा जोष कमी झाला होता. काही पावसाळे पाहून झाले होते. त्यामुळे थोडं स्थैर्य, गांभिर्य पण होतं. तिला मदत करण्याची इच्छा होती. तिनं त्यावेळी काहीतरी अडचणीमुळं तसं केलं होतं हे नक्की. माझी सगुणा अशी कारणाशिवाय करणार नाही. त्याला आता स्वत:च्या मनाच्या धावपळीची पण मजा वाटायला लागली. "अजूनही मी तिला माझी म्हणू शकतो. कमाल आहे माझी पण." तो विचार करत राहिला.
सगुणा तर अतिशय अस्वस्थ होती. तिला काही सुचत नव्हतं. जे कधीच बोलता येणार नाही असं वाटत होतं ते आज रात्री बोलता येणार होतं. पण मग इतकं दडपण का? माझा सम्राट अजूनही तसाच आहे. इतकं सगळं होऊनही त्याची तयारी आहे माझ्याशी बोलायची. मी माझं बोलणं संपलं की या घरात नाही रहायची. मला माहीती आहे माझं खूप चुकलं. शिवाय मला एक आशा होती की मी गेल्यावर तो सुखी होईल तसं झालंच नाही. पुन्हा वळून यायचे मार्ग असताना पण मी ते केलं नाही. आता पुन्हा परत येऊन त्रासच दिला त्याला. आता त्याला सगळं सांगितलं की मग अजून बोजा नको त्याच्या मनावर. उद्या सकाळच्या आत मी इथून गायब होईन.
बघता बघता रात्र झाली. दिवाणखान्यातले लोक पांगले. जेवताना दोघंही बोलत नव्हते. शर्वरी तिच्या खेळाच्या गमती सांगत होती पण सम्राटचं लक्ष नव्हतं. तो कामाच्या घोळात असेल पण सगुणा पण? शर्वरी हिरमुसली. आक्कात्यांनी तिला त्यांच्या लहानपणाची सागरगोट्यांची मज्जा सांगायला सुरुवात केली.
एकदाची जेवणं उरकली आणि सम्राट पुन्हा दिवाणखान्यात गेला. सगळी आवराआवर व्हायला अजून तास दीड तास लागेल. तोपर्यंत थोडं नेट सर्फ़िंग. पण लक्ष लागेना.
सगुणाही कशीबशी कामं उरकत होती. त्यातून आपल्या मानाचा थांग आक्कात्यांना लागू नये याची पूर्ण काळजी घ्यावी लागत होतीच. हल्ली त्या आपल्याला निरखत असतात असं सगुणाला उगचच जाणवायचं. सगळं आवरून नेहमीप्रमाणं त्या तिघी झोपायला गेल्या. सगुणा आल्यानंतर थोड्याच दिवसात ती शर्वरीबरोबर झोपायला लागली होती. आक्कात्यांकडं असलेल्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या होत्या आणि सगुणाकडच्या अजून शिल्लक होत्या. त्यामुळं आक्कात्या आक्कात्यांच्या खोलीत. शर्वरी आणि सगुणा शेजारीच शर्वरीच्या खोलीत. आता तिला गोष्ट सांगायची. रोज तिला झोप यायची नाही तेंव्हा वाटायचं तिच्या बरोबर कुणीतरी जागं असावं. आज आधी सगुणाला गोष्ट सुचेना मग सांगताना पण चुकायला लागली. पण आज खेळून शर्वरी दमली पण होती. तिचा डोळा लागला हे दिसताच सगुणाच्या छातीत धडधड वाढली. आक्कात्यांच्या घोरण्याचा आवाज तर नेहमीप्रमाणे पाच मिनिटात यायला लागला. आता तिला कळेना की त्या मधेच उठत वगैरे असतील आणि एक चक्कर मारत असतील तर काय? जरा दोन दिवस आधी कळलं असतं तर एक रात्र जागून हे सगळं पाहिलं असतं. काय करावं? लगेच तिच्या मनात आलं, सम्राट असताना कसली काळजी? फ़ार तर काय आक्कात्यांना कळेल. नाहीतरी त्याच्याशी नाव जोडलं गेलंच आहे की आयुष्यभराचं. फक्त त्याला त्रास नको. मग आता पुढं काय हे तिला माहित नव्हतं. कुठं जायचं हे माहीत नव्हतं. ती तिथं असेल हे सम्राटला नक्की माहीत होतं त्यामुळं ती तिथंच, तशीच विचार करत बसून राहिली. थोड्या वेळात तिला हलकी चाहूल लागली. हृदय आता उडून हातात येईल का काय असं झालं तिला. हीच हुरहूर, हीच धडधड बागेत असताना व्हायची. अजूनही तेच? देवा किती युगं असंच बसू इथं मी ?
आणि खूप वेळ गेला असं वाटल्यानंतर फक्त तिला आणि तिलाच ऐकू येईल अशी हाक आली "सगुणा"
तिनं गच्च डोळे मिटून घेतले दोन क्षण. धडधडीनं सीमा पार केली होती. आता तर हृदय पार थांबलंय असं वाटत होतं तिला. ती उठली. दाराशी आली. सम्राट तिथं उभा होता. तिला पाहिल्यावर तो फक्त चालायला लागला, दिवाणखान्याच्या दिशेनी. तिथं पोचल्यावर सगुणाच्या लक्षात आलं की या खोलीत आपण पाऊलही टाकलं नाही आधी कधी. आपण कायम मागच्या दारानी आलो. लहानपणी पण आणि आत्ता पण. आपली मजल दिवाणखान्याच्या दारापर्यंत. पण तीच का, आक्कात्या आणि राधाईसुद्धा सहसा इथं येत नसत. दिवाणखान्याच्या दारात तिचं पाऊल अडलं. सम्राटनं मागं वळून पाहिलं " ये ना. " तो नेहमीच्या आवाजात म्हणाला. केवढा मोठा वाटला त्याचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत. कुणी ऐकलं तर?
पण होतं कोण? आक्कात्या आणि शर्वरी पार मागच्या सोप्याजवळच्या खोलीत. चार नोकर आणि त्यांची छोटी मुलं त्याही पलिकडं अंगण ओलांडून वाड्याच्या मागच्या भिंतीजवळच्या खोल्यांत. इथला आवाज स्पीकरवरून पण तिथं गेला नसता.
सगुणा अजून दारात अडखळलेली.
"अगं ये ना बाई." सम्राट पुन्हा चिडेल या भितीनी ती पटकन आत आली. तो त्याच्याही नकळत हसला.
"बस. " सम्राटनं तिथं ठेवलेल्या कोचकडं इशारा केला. आणि तो समोरच्या रिक्लाईनरवर बसला.
" तिथं नको. मी इथं बसते. " ती जवळच्या एका खुर्चीवर बसायला लागली
"सगुणा, इथं समोर बस. " ठामपणे तो म्हणाला. मान खाली घालून सगुणा कोचवर अवघडून बसली.
" अगं काहीही झालं तरी लहानपणची मैत्रीण आहेस तू माझी. ते नातं तर आपण पुसून टाकत नाही ना मनात आलं की. बालमैत्रीण ही बालमैत्रीणच रहाते. नाही का? "
तो हसला. ते सगळ्या दु:खांना एकत्र दाखवणारं हसणं खचकन तिच्या मनात घुसून तिथून रक्त वाहायला लागलं.
" सम्राटबापू मी चुकले. मला माफ करा." ती हळू आवाजात म्हणाली.
" हे झालंय बोलून. आता ते का करायचं हे बोलू या, नाही का? आणि अजून दुखवायचं नसेल मला तर इतर कुणी नसताना तरी सम्राट म्हण. "
एक उसासा. माझा सम्राट. उठावं आणि सगळं जग विसरून जवळ जावं त्याच्या.
किती बदल झालाय त्याच्यात. केस थोडे उगच जरा पांढरे. खांदे अजून रुंद. किती जबाबदार दिसतो. कवळा चेहरा रापलाय पार. पण त्या सगळ्यानी जास्तच देखणा दिसायला लागलाय.
"मी.. म्हणजे त्या दिवशी.. " कुठून सुरुवात करावी तिला कळेना.
"मला का नाही सांगितलंस गं आधी लग्नाचं? शपथ सोडलीसच का मग?" सम्राटच म्हणाला.
"नाही रे. असं काहीच नव्हतं. म्हणजे माझं लग्न तोपर्यंत ठरलं पण नव्हतं. म्हणजे पोरं सांगून येत होती. मीच नको म्हणत होते. "
"म्हणजे? मग तुझे आईबाप खोटं बोलले? का? कुणी जबरदस्ती केली का त्यांच्यावर? " सम्राट पूर्ण संपला. रागाच्या भरात एवढी गोष्ट आपण शोधू शकलो नाही. आयुष्य घालवलं सगळं.
" नाही रे. तसं पण नाही. " आता सगुणा सावरली. कुठून सुरुवात करावी ते तिला कळलं.
"आपण त्या दिवशी बागेतून गेलो, मी खूप घाबरले होते. काय होईल, कुणावर संक्रांत येईल असं वाटत होतं. तू परत येईपर्यंतचे दिवस असेच घाबरत काढले मी. आत्याची फ़ार इच्छा होती तिची सून करून घ्यायची. त्यांचं नाव घरात निघत होतं सारखं पण मी सांगून टाकलं होतं का मला शिकलेला नवरा पाहिजे. त्यामुळं शिव्या देत, बडबडत का होईना पण आईबापांनी दम धरला होता. मग आई म्हणली एक दिवस, "सम्राटबापू आलेत सुट्टीला." आता कुठल्याही वेळी काहीही होऊ शकतं म्हणून मी घरातून बाहेर पडायला पण मागत नव्हते. चार दिवस जीव मुठीत होता माझा. मग एक दिवस, एकादशी होती त्या दिवशी, अचानक राधाई घरी आल्या. " सम्राटाचा चेहरा दगडाचा झाला. जीव कानात गोळा झाला. सगुणा बोलत होती. त्या काळात गेली होती. तिचं सम्राटच्या चेहर्याकडं लक्ष नव्हतं.
" माझी भीती पार आभाळाला पोचली. त्या एकट्या आल्या हे बघून मला कळलं की कायतरी घोळ आहे. आता तिथून गायब व्हावं नायतर धरणी दुभंगून त्यात गडप व्हावं असं वाटाय लागलं. पण चेहर्यावर दाखवता येत नव्हतं. अजून आशा होती कि ते सोडून दुसरं कायतरी असेल. पण असं होत नाही. त्या आल्या. बसल्या पण नाहीत. आईला सांगितलं नवर्याला बोलाव. तशी बाबा पण आला. मग त्यांना म्हणल्या, " पोरीचं लग्न ठरलंय का नाही अजून? किती दिवस पोरगी घरात ठेवलीय. " आईबाबाना काय कळंना. राधाई पोरगा सुचवायला आल्यात का काय?
मग बाबा म्हणाला, 'होय तसं एक घर सांगून आलंय. आम्हाला बी पसंत हाय. बहिनीचाच पोरगा हाय. सोताची जिमीन हाय. एक दुकान हाय गावात. काय पायजी अजून? पर सगुणा नको म्हंती. पोरगं शिकल्यालं पायजे म्हन. "
"चांगलं आहे की स्थळ. आणि आत्याचाच मुलगा असेल तर बरंच. " राधाई घाईनं म्हणाल्या.
आत्तापर्यंत शिकलेला जावई बघ म्हणणार्या राधाई आज हे बोलतात हे आईच्या लक्षात आलं नाही पण माझ्या लक्षात आलं. माझं अवसानच गेलं. चक्कर येईल का काय असं वाटायला लागलं. आई चहा पाणी विचारत होती तेवढ्यात राधाईंनी मला त्यांच्या हातातले गजरे घ्यायला जवळ बोलवलं. मी गजरे घेत होते तेंव्हा त्या अतिशय मायाळू आवाजात बोलल्या, " आपल्याला साजेसं माणूस ओळखता यायला पाहिजे आता तुला सगुणा." त्या थंड आवाजानं मी काय ते समजून गेले सम्राट.
मग आईला एकदम म्हणाल्या त्या. "चहा पाणी काय करू नको मैनाबाई. मी काय तुझी सोयरी नाही." आई गप झाली. मग मी त्यांचा कधीच न ऐकलेला आवाज ऐकला.
" आमच्या सम्राटला तुमची पोरगी पसंत पडलीय. मी आणि रावसाहेब पुढारलेले आहोत म्हणून. आमचे दुसरे कुणी सोयरे असते तर जीव घेतला असता पोराचा. तरी पण रक्त शेवटी कधीतरी सळसळतं अन आत्ता नाही तर कधी पण काय नको ते घडलं तर मग काय सांगावं? " थरकाप उडाला माझा. पार गळून मी मटकन खाली बसले.
" पोरी तू का घाबरतीस? " पुन्हा पहिला मायाळू आवाज आला.
"मैनाबाई, हणमा पोरीला घेऊन वाड्यावर या उद्या. आमच्या पोराला आणी रावसाहेबांना बोलायचंय तुमच्याशी. त्याआधी बहिणीला होय सांगून टाका. "
काय करायचं ते सांगायची गरजच नव्हती.
त्या गेल्याबरोबर आईबाबानी मला खूप वेळ मारलं. विचारलं पण नाही की माझं मत काय, मला तू आवडतोस का? "
सम्राट कळवळला. तो मधेच कधीतरी तिच्या शेजारी येऊन बसला होता ते तिला कळलंच नव्हतं. तिचा हात त्यानी हातात घेतला. " माझी बाय ती. "
" अरे त्याचं नाही मला काय वाटलं. आमच्यात असंच असतं. उलट मला बरंच वाटत होतं मार खाताना. माझ्यामुळं तुझा जीव गेला असता तर मी स्वताला नरकात सुद्धा जागा दिली नसती. आणि तिथं राधाईंसमोर त्याच्याऐवजी माझा जीव घ्या म्हणले असते तर अजूनच कायतरी भयानक झालं असतं. आईबाबानी पण मला मारून टाकलं असतं तर किती बरं झालं असतं. "
"नको गं असं बोलू. आज तरी आपण एकमेकांशी बोलतो आहोत हे काय कमी आहे? " सम्राट म्हणाला. यावर सगुणा खिन्न हसली.
" हं. मग त्यानंतर ते खूप वेळ मला जवळ बसवून रडत राहिले. मग म्हणाले आता दुसरा उपाय न्हाय गं पोरी. आत्याला होय सांगून टाकू. मी पण विचार न करता मान हलवली.
क्रमश:
अय्या कहानीमे ट्विस्ट मजा
अय्या कहानीमे ट्विस्ट
मजा यायला लागलीये
puleshu
puleshu
मस्त....
मस्त....
उत्सुकता वाढलीय. पुढचा भाग
उत्सुकता वाढलीय. पुढचा भाग लवकर टाका
सम्राट कसा रीअॅक्ट होईल याची
सम्राट कसा रीअॅक्ट होईल याची जाम उत्सुकता होती. मस्त चाललीय गोष्ट. पुढचा भाग लवकर येऊ दे.
छान लिहिता तूम्ही.
छान लिहिता तूम्ही.
वाचतेय..मस्त चालु आहे..
वाचतेय..मस्त चालु आहे..
मस्त झालाय हा ही भाग ..... (
मस्त झालाय हा ही भाग .....
( शेवट सुखांत होवू दे असं माबोदेवीला साकडं घातलयं :))
वाचतेय !! पुढील भागाच्या
वाचतेय !!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
छान चालू आहे कथा...एका दमात
छान चालू आहे कथा...एका दमात सगळे भाग वाचुन काढले. पुढचे भाग लवकर येऊ द्या
एक्सपेक्टेड..................
एक्सपेक्टेड......................
लेखनशैली आणि तो जमाना आवडेश.
पु.ले.शु.
खूप छान. शेवट गोड होउ दे असेच
खूप छान.
शेवट गोड होउ दे असेच म्हणते.
थॅन्क्स लोक. तुम्ही वाचताय
थॅन्क्स लोक. तुम्ही वाचताय म्हणूनच एवढं लिहून होतंय. नाहीतर जेन्व्हा कळलं की गोष्ट मोठी होणार बर्यापैकी तेन्व्हा काळजीच होती. तुमच्या प्रतिसादांमुळे थोडं फास्ट ही होतंय
जाई आता मला पण खूप मजा यायला लागलीय लिहायला.
शुगोल, मला पण उत्सुकता होती सम्राट कसा रिअॅक्ट होईल याची.
बिनू, मी पण (बॉलिवुड वर पली बडी आहे मी त्यामुळं. पण आता सम्राट आणि सगुणा काय ठरवतात बघू या )
तृष्णा, मला पण तो जमाना आवडतो खूप. म्हणून तर..
टाकते पुभा लौकरच.
छानच !!! सगळेच भाग एकत्रच
छानच !!! सगळेच भाग एकत्रच वाचले..
पुढचा भाग येऊ द्या लवकरच !!
एक्सपेक्टेड..................
एक्सपेक्टेड......................>>>>+१पण.... लेखन शैलि खुप आवडली.
तरी पण वाचायला खुप आवडते आहे. वाट पहात आहे पुढिल भागाची.
पुढचा भाग येऊ द्या लवकरच !!
पुढचा भाग येऊ द्या लवकरच !! पु.ले.शु. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
थँक्स शिल्पा, ऋचा, रिमझिम,
थँक्स शिल्पा, ऋचा, रिमझिम, मन्जिरी.
पुढचा भाग लिहिते आहे अजून. टाकते लौकरच.
खूप छान
खूप छान
मस्तच सुरु आहे...पुढ्चा भाग
मस्तच सुरु आहे...पुढ्चा भाग लवकर येऊ द्या पारिजाता....
अजुन किती वेळ ?
अजुन किती वेळ ?
मग पुढे ................????
मग पुढे ................????
धन्यवाद अन्ना, शोनू, अनंत,
धन्यवाद अन्ना, शोनू, अनंत, डिप्ति. शेवटचा भाग टाकला आहे. वाचा आणि सांगा कसा वाटतो.