वर्तुळाचा कोन

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 10 April, 2013 - 01:22

Sky.jpg

जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
आयुष्य सरतं याच धडपडीत
असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत
वाट तीच, आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फ़िरायचं
वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं.
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात.
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बोनसाय बनायचं,
मिरवायचं दिवाणखान्यात एक शोपीस बनून.
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.<<<

तुमच्या आजवरच्या मी वाचलेल्या कवितांपैकी सर्वाधिक बंदिस्तपणे आलेल्या (कुठेही अनावश्यक सैलपणा न आलेल्या) विचाराची व गंभीर कविता. (येथे अभिनंदन म्हणणे हे जास्त शहाणपणाचे मानले जाते म्हणून म्हणत नाही आहे). धन्यवाद.

-'बेफिकीर'!

व्वा ...!! सर्वच अप्रतीम. पण त्यातलं हे विशेष.... !! Happy

वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.

तुमच्या आजवरच्या मी वाचलेल्या कवितांपैकी सर्वाधिक बंदिस्तपणे आलेल्या (कुठेही अनावश्यक सैलपणा न आलेल्या) विचाराची व गंभीर कविता.

बेफिकीरना अनुमोदन ...

बेफिकीर, शशांक, अज्ञात........मनापासून धन्यवाद Happy

प्रत्येक कविता लिहिणारा आपल्या विशिष्ट मनस्थितीला शब्दातून उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. कधी तो अनुभव अगदी तस्साच उतरतो तर कधी तो शब्दात नीटसा पकडताच येत नाही.... हो ना..... Happy

बेफीजी म्हणाले तेच मलाही म्हणायचे होते

वर्तुळालाही कोन असतात >>>इथून वेगळे कड्वे (बहुधा याला कडवे म्हणत नसावेत ..असो) करायला हवे होते
कवितेचे २ भाग झाले असते व प्रस्तावना अन समारोप अशे वेगवेगळे व ठळकपणे समजले असते

असो
फार फार उत्तम आहे ही कविता !!

कविता आवडली:

अवांतरः
वर्तुळालाही कोन असतात बद्दल सांगावेसे वाटले.
काही non-Euclidean Geometry मध्ये वर्तुळ हा Euclidean Geometry मधला चौकोन असतो.
तेव्हा त्याला कोन असतात. मी सांगतोय ते काही फार गहन नाही.

कविता आवडली !

वरच्या ढगच्या चित्रात पॄथ्वी उलटी केली आहे काय? जगाचा नकाशा, भारताचा नकाशा बरोबर दिसतो आहे.

जीवनाचं गणित अन् मनाची भूमिती.......!
खरोखरच आपण आपल्या मनोमर्यादेने आखून घेतलेल्या आखिवरेखीव मर्यादित जाणिवांना कर्तृत्वाच्या तलवारीने तोडलंच पाहिजे.....
सुंदर

थोडक्या शब्दांत खूपच छान अभिव्यक्ती..... मस्त.

----------------------------------------------------------------------------------------------------

(ताजमहालाला वीट लावण्याचं धाडस नव्हे पण)
कोनाऐवजी 'कंगोरे' कसे वाटले असते असा एक विचार मनात येऊन गेला.

सुप्रिया, वैभव, जाई, समीर, मुक्तेश्वर, दिनेश, सुशांत, उल्हासजी .............तहे दिल से शुक्रिया Happy