प्रारब्ध- भाग ६

Submitted by पारिजाता on 5 April, 2013 - 08:57

आधीच्या भागांची लिंक

भाग १ - http://www.maayboli.com/node/40847

भाग २ - http://www.maayboli.com/node/42011

भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077

भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134

भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252

पुढे..

अशी वेळ येणं कठीण होतं. घरात सतत कुणी ना कुणी असायचं हे एक आणि आक्कात्या सहसा घरातून बाहेर पडत नसत हे दुसरं.
पण व्हायचं ते होतंच ना. एक दिवस शर्वरी शाळेत गेली होती. आक्कात्या सहसा संध्याकाळच्या देवळात जायच्या. सकाळी गजबज, गडबड. आणि पुढं दिवसात कोण पाहुणे, लोक येणार त्याप्रमाणं पहावं लागायचं. शिवाय गडीमाणसं येत रहायची कामासाठी. पण त्या दिवशी त्या सगुणाला म्हणाल्या " पूर्वी व्हायचं नाही सकाळी जाणं. आता तू आहेस. आणि तुला माहीतही झालंय सगळं. आजचा दिवस तेवढी अंगारकी आहे तर सकाळची जाऊन येते. आणि आज त्या मानानी तेवढा राबता पण नाही. "
सगुणानं मान हलवली. ती सतत कामात असायची. काही नसेल तर साफसफाई काढून बसायची. साठवणीचं काहीतरी करायची. शर्वरीच्या आवडीचे पदार्थ करून ठेवायची. आज तसंही कुणी बाहेरचं जेवायला नव्हतं. तिनं सैपाकघरातली एक दोन कामं उरकली आणि ती अंगणात आली. मागच्याच आठवड्यात तिनं गाडीवरून रोपं घेतली होती फ़ुलांची. आक्कात्यान्ना विचारून. त्यांना तिनं रोजच्याप्रमाणं स्वत: पाणी घातलं, त्यांच्यावरून हळूवार हात फ़िरवला, कळ्या शोधल्या आणि त्यांची वाढ बघून खुश झाली.
हाच कार्यक्रम पुन्हा संध्याकाळी शर्वरीबरोबर असायचा. त्या कुंड्या एक एक करून हळूच पेंट करायच्या असं पण ठरलं होतं त्यांचं. तर ती तिथून वळली आणि आत जाताना अचानक सोप्यात बाहेरून येत असलेला सम्राट समोर आला. तिची धडधड वाढली. तिला माहीत होतं की ते आत्ता तिथं एकटे आहेत. पण सम्राटला माहीत नव्हतं. "आक्कात्या" त्यानं हाक मारली.
" त्या देवळात गेल्यात." सगुणा कसंबसं म्हणाली.
"बर. आली की निरोप पाठवा बाहेर. " असं म्हणून सम्राट जायला वळला.
" सम्राट " अतिशय हळू आवाजात सगुणा म्हणाली. त्यानं ऐकलं सुद्धा नसेल. पण यापेक्षा मोठा आवाज निघालाच नाही तिच्या तोंडातून. पण तो थांबला. वळला नाही.
सगुणा गप्प झाली. हा माझीच हाक ऐकून थांबला का नक्की?
काही वेळ तसाच शांततेत गेला.
"बोल " सम्राट म्हणाला . आवाजात जरब. किती कठोर आवाज. त्याचा असा आवाज तिनं कधीच ऐकला नव्हता. इतर वेळी बोलणं व्हायचंच नाही. कामापुरतं असेल ते आपलं इतरांशी असतं तसं. आता आपण एकटे आहोत म्हणून राग बाहेर पडला? का अशी नावानी हाक मारलेली आवडली नसेल त्याला. आपलंच ऐकण्यात चुकलं असणार. असा नाही बोलत तो.
" चुकलं. सम्राट बापू. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी."
" हं " पुन्हा तोच अती कोरडेपणा. एखाद्या गरीब मजुराशी एखाद्या उद्दाम जमीनदारानं बोलावं तसा. पण तशी परिस्थिती होतीच ना.
" म्हणजे.. " ती थांबली. 'इथं नको तर कुठंतरी एकांतात' असं ती जीव जात असतानाही म्हणू शकली नसती.
" बोला. " पुन्हा म्हणाला तो. त्याच आवाजात.
ती काहीच बोलू शकली नाही. तो आवाज सहन करण्याची ताकत तिच्याकडे नव्हती . हुंदका आवरत ती आत निघून गेली.
सम्राटला राग अनावर झाला होता. नका बोलू. या बायका नको तेंव्हा तोंड चालवतात आणि पाहिजे तेंव्हा एक शब्द न बोलता निघून जातात. पण काय बोलायचं होतं तिला? आता आपला आसरा मिळाला म्हणून आभार मानायचेत? का ते पूर्वीचं सगळं आठवतंय तिला? का माझ्या आयुष्याशी भावनांशी खेळल्याबद्दल पश्चात्ताप होतोय ? का आता मला पुन्हा जाळ्यात अडकवायचा डाव असेल तिचा?
पुढच्याच क्षणाला आपण असा विचार करू शकतो याची त्याला लाज वाटली.
पण कुणी सांगावं? आपण कायम प्रत्येकाच्या मनाचा विचार करत आलो. पण तिसरंच काहीतरी होत गेलं. आता असं काही असेल तर मुळीच दाद द्यायची नाही. तो पुन्हा कामाला लागला.
सगुणा आत रडत राहिली या विचारानं की तिला कधीच सम्राटशी बोलता येणार नाही. त्याला इच्छा नाही आणि तिच्यात हिम्मत नाही.
आक्कात्या आल्या तेंव्हा तिनं डोळे पुसले. ते त्यांनी पाहिलं.
" का गं पोरी रडतेस?" त्या मायेनं म्हणाल्या. सगुणानं नुसती नाही अशी मान हलवली. तशा त्या समजल्यासारख्या म्हणाल्या
" अगं नशीब चुकत नसतं पोरी. घडायचं ते घडतं. नको ते रहातं. आपल्या इच्छा बिच्छा सगळं फ़ोल. आपण लाख म्हणतो इच्छा पुर्ण झाली. पण घडणारं आपल्याला हवं असणं हा नुस्ता योगायोग. व्हायचं ते होऊन गेलं. आता सगळं ठीक आहे ना. झालं तर. "
पण नाही. सगळं ठीक कुठं होतं? आता सगुणाला जाणवायला लागलं की सम्राट तिच्याशी अक्षरसुद्धा बोलत नाही. ती काही वाढायला आली तर नको म्हणतो. ती त्याचं काही काम करायला गेली तर "नको " म्हणतो. "नको " हा एकच शब्द तो गेल्या काही दिवसात आपल्याशी बोलला आहे. त्याच्या डोळ्यात सुद्धा तिरस्कार दिसतो. या सगळ्याचा तिला खूप त्रास व्हायला लागला. मध्ये जरा बरी दिसत होती. पुन्हा रया गेली तिची.
आक्कात्या विचारत होत्या. "बरं नाही का? डॉक्टरकडे जाऊ या का? काय होतंय? "
काय सांगणार त्यांना? एक फालतू नोकर असलेल्या बाईचं या घरच्या मालकाशी नातं आहे?
सम्राटही विचार करत राहिला. कुठल्याही दृष्टीनी आपल्याला पूर्णपणे अयोग्य असलेल्या या मुलीच्या आपण प्रेमात पडलो. तिचा नकार पचवला. गरज पडल्यावर पुन्हा दारात आली हे खपवून घेतलं. आणि आता पुन्हा कुठंतरी मनातलं काहीतरी हलवलं तिनं तर त्याचाही आपल्यावर परिणाम होतोय. तिच्यापेक्षा आपलीच चूक. बस आता या नेहमी आपल्याला दुबळं करणाऱ्या मनाला वावच द्यायचा नाही. पण सगुणामधले बदल त्यालाही दिसत होते. तिला काय होतं आहे आणि ते का होतं आहे हे कसं कुणास ठाऊक त्याला कळत होतं. हा आपल्या वागण्याचा परिणाम आहे हे माहीत होतं त्याला. एका बाजूनं तिची दया येत होती आणि दुसर्या बाजूला ठाम राहण्याचा निश्चय होता.
एक दिवस अचानक आक्कात्या त्याला म्हणाल्या " सत्यनारायण घालावा घरी असं मनात येतंय." किती दिवसांनी स्वतःच्या घरात सम्राटनी हा शब्द ऐकला. आता मधेच काय हे?
त्यानी आक्कात्याचा शब्द मोडला नव्हता आतापर्यंत. पण हे देवाबिवाचं कठीण होतं.
" आज कसं काय मनात आलं हे?" आवाजात फार नकार न दाखवता सम्राट म्हणाला.
" नाही असंच. म्हणजे जरा घर, मनं शुद्ध झालेलं बरं अधनं मधनं . " आक्कात्या म्हणाली.
हे कायतरी वेगळं होतं.
" खरं सांग आक्कात्या. काय झालंय? " सम्राट एकदम बोलून गेला.
" काय नाही बापू. असंच. "
" नाही कायतरी मनात आहे तुझ्या. "
" नाही तसं. तुमी जरा रया गेल्यासारखं दिस्ताय. बर तसं काही झालं पण नाही आणि तब्येत पण ठीकठाक आहे म्हणाल्यावर आपलं देवाचं केलेलं बरं अस्तंय. तुम्हाला कुलदेवीला चला म्हणलं तर तुमी येणार नाही."
"आत्या काय नाही गं झालं मला. यावेळी जरा दौरा दगदगीचा झाला एवढंच. तुझ्या हातचं खाऊन चार महिन्यात वळणावर येतंय सगळं. काय तू पण विचार करतीस? "
" तसं नाही पण एका घरात दोन लोक अशे सुकायला लागले तर.. " असं म्हणून ती एकदम गप्प झाली.
" कोण दोन? शर्वरी तर मस्त मजेत दिसतीय. का तुला काय झालंय? " सम्राट एकदम बोलला.
आता काय बोलावं आक्कात्याला सुचेना. सगुणाला घरच्यांच्या पंगतीला बसवण्याची चूक बोलण्यातून सुद्धा नको. तिला स्वत:ला सम्राटनं उल्लेखलं हेच खूप. ती स्वत:ची पायरी पण ओळखून होती.
" कर काय करायचं ते. मी प्रसादाला नाही म्हणणार नाही पण पूजा बिजा मला करायला लावू नको." एवढं बोलून सम्राट निघून गेला.

चार दिवसांनी संध्याकाळी सगुणा अंगणात रांगोळी काढत असताना कुणाचीतरी चाहूल लागली. तिनं वर पाहिलं तर सम्राट.
" काय होतंय तुला? " त्यानं धाडकन प्रश्न केला.
"अं.. " तिला सुचेचना. " काय?"
पुन्हा सम्राटचा पारा चढला पण राग आवरत तो म्हणाला.
" चेहरा का झालाय असा? आणि त्या दिवशी काय बोलायचं होतं? "
" अं.. इथं? नको.. " हवं तेवढं नेमकं पोचवता आलं होतं आज. त्याचा आवाजही त्यादिवशी सारखा वाटत नव्हता.
" हं.. जागी रहा आज. " एवढं बोलून कुणाला काही कळायच्या आत सम्राट निघून गेला.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users