अमेरिकेत गाड्या धुतल्या, गावात विहिरी बांधून दिल्या!
' एनआरआय ' भावंडांचा पुढील संकल्प विदर्भ-मराठवाड्याचा
म.टा.वृत्तसेवा , हर्षल मळेकर , मुंबई
राज्यभर दुष्काळाचे चटके बसत असतानाच मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील काही भागात होळीनिमित्त यंदाही पाण्याची नासाडी झाली. परंतु हजारो कोस दूर , अमेरिकेत राहणाऱ्या दोन भावंडांचे मन आपल्या मातीतील लोकांची घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण पाहून द्रवले. गाड्या धुवून , लस्सी विकून , फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करून त्यांनी निधी गोळा केला आणि राजापूर तसेच त्यांच्या मूळ गावी विहिरी बांधून दिल्या. यापुढचा त्यांचा संकल्प आहे महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये विहिरी खोदून देण्याचा.
श्री नारकर (१७) आणि संजना नारकर (१९) अशी या एनआरआय भावंडांची नावे. मूळचे राजापूर तालुक्याचे असलेले त्यांचे वडील सुनील नारकर यांचे व्यवसायानिमित्त अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे वास्तव्य. राजापूरमधील पडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या घराजवळील विहिरीचे पाणी कधीही आटत नसे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की सगळे गावकरी त्यांच्या विहिरीवर गर्दी करत. ही बाब अध्ये-मध्ये अमेरिकेतून भारतात येणाऱ्या संजनाच्या लक्षात आली. लोकांची पाण्यासाठी वणवण पाहून तिने त्यांच्यासाठी विहीर खोदून देण्याचे मनावर घेतले. त्यातून तिचा भाऊ श्री आणि तिने ' डेव्हलपमेंट ऑफ रूरल महाराष्ट्र ' ( www.dormindia.org ) ही एनजीओ स्थापन केली. २००८ मध्ये त्यांनी राजापूरमधील सोगमवाडी गावासाठी विहीर खोदून दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी , म्हणजे पडवे येथेही अशाच प्रकारे विहीर खोदायचे ठरवले. त्यासाठी पैसा उभा करण्यासाठी या भावंडांनी अमेरिकेत गाड्या धुण्यापासून ते लस्सी विकण्यापर्यंत अनेक कामे केली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी किमान १ ते जास्तीत जास्त ५ डॉलर्स देण्याचे आवाहन केले. त्यातून उभा राहिललेल्या जवळपास दोन लाख रुपयांच्या निधीतून त्यांनी पडवे गावी विहीर बांधली. या विहिरीचे उद्घाटन आज , मंगळवारी अभिनेता संजय नार्वेकर यांच्या हस्ते होत आहे आणि तिचा लाभ गावातील सुमारे १ हजार लोकसंख्येला होणार आहे.
' आम्ही काही दिवसांपूर्वीच भारतात आलो. महाराष्ट्रातील विदर्भ , मराठवाडा या भागात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे इथे आल्यावर समजले. आमच्या गावातील ही विहीर झाल्यानंतर आम्ही दुष्काळी भागातही अशाच प्रकारे विहिरी बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विहीर बांधण्यासाठी जागा शोधण्यापासून परवानग्यांपर्यंत अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. इथे फक्त पैसे असणे पुरेसे नसते. अमेरिकेत राहत असल्याने ते करून घेणे आम्हाला शक्य नाही. त्या भागातील कुणी व्यक्ती ही जबाबदारी घेत असेल तर विहिरीसाठी निधी उभारून देण्याचे काम मात्र आम्ही जोमाने करू ', असे या मुलांचे पिता सुनील नारकर यांनी सांगितले.
नारकर भावंडांचे कौतुक करावे
नारकर भावंडांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
इथल्या नेत्यांना मात्र आयपी एल आणि संजय दत्त या दोन महत्वाच्या, तातडीच्या आणि देश्व्यापी प्रश्नामुळे
दुष्काळासारख्या इतर किरकोळ बाबींकडे लक्श द्यायला वेळ कुठे आहे?
खरंच कौतुकास्पद आहे!
खरंच कौतुकास्पद आहे!
इतक्या दूर राहुनही दुष्काळाची
इतक्या दूर राहुनही दुष्काळाची झळ मनाला लागली आणि त्यासाठी कामही सुरु केले हे फारच कौतुकास्पद आहे!
खरच प्रशंसनीय आणि
खरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी.
प्रशंसनीय व आदर्श!
प्रशंसनीय व आदर्श!
मस्तच.. कौतुकास्पद (तेही
मस्तच.. कौतुकास्पद (तेही एवढ्या लहान वयात).