एका शब्दाची अंगाई

Submitted by सत्यजित on 2 April, 2013 - 02:40

"आई"

आई.... आई... आई
एका शब्दाची अंगाई

लहानपणी वाटायचं
कधी होईन मी मोठा
किती तरी असेल रुबाब
खिशामध्ये गच्च नोटा

खुप पैसे असले म्हणजे
किती किती मज्जा येईल
गोळ्या चिंचा बोरं चॉकलेटं
सारं काही घेता येईल

हट्ट सारे पुरवायचीस
कीती लाड करायचीस
शिंग अजुन छोटी आहेत
असं काहीस म्हणायचीस

तू कौतुकाने हसायचीस
कुशीत घेऊन बसायचीस
खुप मोठा हो रे राजा
कुरवाळत म्हणायचीस

कधी तरी शिंग फुटता
वाटलं मोठा झालो आता
मला सगळं कळतं बरं
काळजी करु नको आता

पंखा मध्ये बळ येता
पिल्लू घरटं सोडून उडतं
सुवर्ण कडांच्या नभांवर
त्याच तेंव्हा प्रेम जडतं

ढग म्हणजे नुसतं बाष्प
खरं काही असत नाही
इतके दुर जातो आपण
घरटं मागे दिसत नाही

तुझ्या कुशीत बघितलेली
सारी स्वप्न साकार झालीत
इतका मोठा झालो आई
शिंग कुठेशी पसार झालीत

त्या क्षणी कुशीत तुझ्या
खरं तर सगळं होत
आता जगतो आहे त्याहुन
स्वप्न ते काय वेगळ होतं

भीती वाटता आता तुझ्या
कुशीत शिरता येत नाही
आनंदात उडी मारुन
कडेवर चढता येत नाही

आई मला पुन्हा तसं
छोटं छोटं बाळ कर
आई माझे पुन्हा तसे
खरेखुरे लाड कर

बरं नसता उशापाशी
आई पुन्हा तशीच बस
घाबरुन तुला बिलगता
आई पुन्हा तशीच हस

तू हसलीस की कळायच
घाबरण्याच कारण नाही
तू घाबरलीस की म्हणायचीस
होशील तेंव्हा कळेल आई

अजुन जेंव्हा कुशीत तुझ्या
मी डोकं ठेऊन निजतो
तेंव्हा मी कुणीच नसतो
फक्त तुझ बाळ असतो

देवा मला शहाणा कर
देवा मला मोठा कर
देवा मला पुढल्या जन्मी
माझ्या आईची आई कर

आई... आई... आई
एका शब्दाची अंगाई
सार्‍या विश्वाची करुणाई
आई... आई... आई

-सत्यजित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान.माझ बालपण तुमच्या कवितेत पाहिल.
पण मी म्हणेन

देवा मला पुढल्या जन्मी
माझ्या आईलाच आई कर

आढ्याचं पाणी इतकं समजुतदार होऊन वळचणीला गेलय ना... तेच टचटचलं माझ्या डोळ्यांत.
विचार करतेय...
दुधावरल्या सायीनं ही दुधावरच धरली पाखर आहे...
सुंदर, सत्यजीत... सुंदर.

सुंदर, अप्रतीम
सत्यजीतच्या मूळ पिंडाची, निरागस कोवळी कविता. व्वा.

नि:शब्द शब्द हुंकार मनाचे
ओले किनारे, खार्‍या पाण्याचे
काळजाचा साचा उघडून वाचा
श्वास बाळाचे ध्यास मायेचे

वळाणांचा घाट वारा मोकाट
सारे सारे कांही, होते आटपाट
आलेली पहाट पावलांची वाट
आईची सय करते साय घनदाट

..........................अज्ञात

फारच छान........
आई विषयच प्रेमाचा ,मायेच्या ओलाव्याचा...
सारेच कवितेत भरपूर मिळाले

व्वा! फार अप्रतिम आहे.
सहज सोप्या शब्दात खुप मोठा अर्थ सांगणारी आणि अगदी तालबध्द म्हणता येईल अशी. सुंदर!

तिलकधारी आला आहे.

आई मला पुन्हा तसं
छोटं छोटं बाळ कर
आई माझे पुन्हा तसे
खरेखुरे लाड कर<<<

डोळे पाणावले. एका शब्दाची अंगाई! खरेच.

तिलकधारी गहिवरून निघत आहे.

Pages