नोकरीच्या निमित्ताने अनेक परदेशी माणसांच्या गाठी-भेटी घडतात पण बहुतांशी संबंध हे केवळ औपचारिक असतात. सांस्कृतिक, सामाजिक इतका फरक असतो की अवान्तर गप्पा, मैत्री होऊ शकतच नाही. त्यामुळे कितीही गोड-गोड बोलले आणि वरकरणी आपलेपणा दाखवला तरी अशा माणसांशी चिरकाल मैत्री शक्यच नसते. यात कोणाचाच दोष नसतो, अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. काही अशी भेटतात की वाटावे अरे याला मी आधी कधीतरी ओळखतच होतो. यासाठी त्याची जात, धर्म, भाषा, नागरिकत्व काही आड येत नाही. जिवाची जिवाला ओळख पटते आणि मैत्रीचा सुंदर प्रवास नव्याने किंवा पुन्हा नव्याने सुरु होतो. एका गोष्टीसाठी या परदेशी पाहुण्यांचे कौतुक वाटते, माणसाच्या निर्व्याज प्रेमाने ती भारून जातात. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिसुलभता यांना त्यांच्या जीवनात असलेल्या महत्त्वामुळे असेल की काय, तुम्ही त्यांच्यासाठी एवढेसे काही केलेत तरी त्यांना त्याचे प्रचंड अप्रूप असते. विशेषतः तुम्ही आपला रिकामा वेळ अथवा सुटीचा दिवस त्यांच्यासाठी खर्ची घातला असेल तर मग फारच. एकदा मैत्री झाली की मात्र माणसे छान खुलतात, अगदी वैयक्तिक गोष्टी बोलून दाखवण्यापर्यन्त.
जाँ फ्रांस्वा मार्शाल हा गेल्या काही वर्षांपासून गवसलेला मैतर. त्याला आम्ही 'जे एफ एम' म्हणतो.
फ्रान्समधील एका बड्या कंपनीशी कोलॅबोरशन झाले होते. नागरी हवाई वाहतुकीच्या विमांनांसाठी लागणारे तन्त्रसहाय्य आमची कंपनी या फ्रेंच कंपनीसाठी विकसीत करत होती. दर तीन चार महिन्यांनी कधी भारत तरी कधी फ्रान्समधे मीटिंग्ज होत होत्या. जे एफ एमशी नेहेमी भेट होत होती. बरेच सॉफ्ट्वेअर्स मी व जे एफ एम मिळून विमानांची प्रत्यक्ष चाचणी करून 'व्हॅलिडेट' करत होतो. सध्या तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की तसा जिवाचा वगैरे धोका फारसा नव्हता पण हवाई चाचण्यांमधे जी मूलभूत अनिश्चितता असते, तितपत धोका नक्कीच असल्याने एकमेकांबद्दल सहसंवेदना जरूर निर्माण झाली होती. करायला लागणार्या चाचण्या तशा गुंतागुंतीच्या होत्या त्यामुळे ऑफिसेतर वेळातही आम्ही बरेचदा 'ओव्हर अ ड्रिंक' भेटून रूपरेषा ठरवेत असू. त्यातून वैयक्तिक मैत्रीही वाढीस लागली होती.
एका दिल्लीतल्या मीटिंगनन्तर जे एफ एम ने मला हळूच बाजूला बोलावून जरीच्या साड्यांविषयी विचारले. त्याच्या पत्नीने नेट्वरुन माहिती काढून या भारतभेटीत त्याला अशी साडी घेउन येण्याची आज्ञा फर्मावली होती. अर्थात माझेही ज्ञान यथातथाच होते पण एके रविवारी मी व माझ्या पत्नीने जेएफएमसह दिल्ली भटकून हवी तशी साडी घेऊन दिली होती. सुक्याबरोबर ओलेही जळते तसा माझ्याही खिशाला भुर्दंड पडलाच कारण साडीच्या दुकानात जाऊन- बायको बरोबर असताना - बायकोसाठी काही विकत न घेण्याइतका बाणेदारपणा अजून माझ्या अंगी आला नव्हता.
याचा परिपाक म्हणून गेल्या फ्रान्स भेटीत जे एफ एम ने माझी प्रचंड काळजी घेतली. त्याचे स्वतःचे एक मायक्रोलाईट विमान आहे, जे त्याने किट खरेदी करून स्वतः 'असेंबल' केले आहे. फ्रेंच सरकार अशा हौशी इन्जीनीयर - वजा- वैमानिकांना प्रोत्साहन म्हणून भरघोस सुविधा पुरवते. त्यांना कोणतेही कर नसतात आणि विमानाच्या मेन्टेनंस इत्यादी मधेही बरेच सूट मिळते. एका वीकएंड्ला जे एफ एम ने आमची त्या विमानातून दीड- एक तासाची हवाई सफर ठरवून पण टाकली होती.
विमानव्यवसायाशी संबधित असल्याने मी बर्याच प्रकारच्या छोट्या-मोठ्या विमानांत बसलो आहे. एअरबस, बोईंग मधे अनेकदा चाचण्या केल्याच आहेत शिवाय बंगलोर, पाँडिचेरी आणि पटियालाच्या एअरफील्ड्स वरुन सेसना, मायक्रोलाईट अशा छोटेखानी विमानांतून उडलो देखील आहे पण परदेशाच्या धरतीवर अशी संधी प्रथमच मिळत होती. त्यातून हे केवळ प्लेझर फ्लाईंग -तेही फ्रेंच आल्प्सच्या फूटहिल्स सारख्या निसर्गरम्य भागात - असल्याने मी आणखी उत्सुकतेने वाट पाहत होतो.
सकाळी लवकर आम्ही त्याच्या हँगरकडे निघालो. अजिबात धुके नव्हते. दक्षिण फ्रान्समधील 'एगियेरे' नावाच्या एअरफील्ड्चा वापर अनेक हौशी वैमानिक करतात. जे एफ एमचे विमानही तिथेच होते. एका मनोहर पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेले निसर्गसुंदर लोकेशन पाहूनच जीव निवला.
(एगियेरे एअरफील्ड आणि जे एफ एम चे मायक्रोलाईट विमान: विमानाचे नावही JFM)
अनेक हौशी वैमानिकांची विमाने तिथे होती. मला विमानाची थोडक्यात माहिती देऊन जे एफ एम ने विमान हँगरच्या बाहेर काढले. आम्ही लवकरच रन-वे वर आलो. टेक ऑफ पूर्वीच्या चाचण्या दोघांनी मिळून पूर्ण केल्या आणि आम्ही हवेत उड्डाण केले.
उंची गाठल्यावर जमिनीवरुन मोठी दिसणारी टेकडी दिवाळीतील किल्ल्यासारखी लुटु-पुटुची वाटु लागली.
मी हरखून गेलो होतो. स्वच्छ निरभ्र हवामानात निसर्गाचा वरदहस्त असलेली ती भूमी अप्रतिम दिसत होती. एरवीही त्या सुजलाम भूमीच्या प्रेमात मी पडलो होतोच पण या हवाई सफरीत झालेल्या तिच्या आगळ्या दर्शनाने आपल्याच प्रेयसीच्या सौंदर्यातील नवीन पैलू दिसून नव्याने प्रेम जडावे तसे काहीसे झाले होते.
बराच लांबचा फेरफटका झाला. सुरक्षीत उंची गाठल्यावर काही वेळ विमान चालवूनही पाहिले. जे एफ एमबरोबर १०००० फुटांवर भरपूर गप्पा मारल्या.
दीड एक तास मनसोक्त सफर घडल्यावर विमानातील इन्धनाचा काटा खाली झुकू लागला आणि परतायची आठवण झाली. जे एफ एम ने विमानाचा मोहरा एगियेरेकडे वळवला आणि लवकरच विमानाला जमिनीवर उतरवले.
कोण कुठचा तो मित्र पण मैत्रीला जागून त्याने मला अशा अवर्णनीय अनुभवात सामील केले त्याबद्दल आमच्या मैत्रीचे आणि देवाचे आभार मानण्याशिवाय मी आणखी काय करु शकतो?
वॉव!!! मस्त!!! तुमचे एकंदर
वॉव!!! मस्त!!!
तुमचे एकंदर सारेच लिखाण मला आवडते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेया - तुझ्याबरोबरही मैत्री
अमेया - तुझ्याबरोबरही मैत्री वाढवायलाच पाहिजे की - चुकुन-माकून, कधी तरी अशी हवाई सफर घडेलच मग ......
लिखाण नेहेमीप्रमाणे एकदम टवटवीत - फोटोही मस्त ....
ते छोटुकले विमान पाहून मला एकदम - "गॉड मस्ट बी क्रेझी"तील "त्या" विमानाची आठवण झाली...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा अतीव सुंदर! दीड तास
अरे वा अतीव सुंदर! दीड तास म्हणजे भरपूर लांबलचक फेरफटका झाला म्हणायचा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
मस्त अनुभव. आणखी फोटो हवे
मस्त अनुभव. आणखी फोटो हवे होते.
मस्त अनुभव
मस्त अनुभव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
व्वा !
व्वा !
छानच !!!
छानच !!!
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेयजी, सुंदर होती तुमची हवाई
अमेयजी,
सुंदर होती तुमची हवाई सफर आणि सोबत मायबोलीकरांची सुध्दा.
मध्यंतरी एक ईमेल आली होती ज्यात मायक्रोलाईट पध्दतीच्या विमांनाची माहिती होती. म्हणे की ही विमाने आपल्या घराच्या गॅरेजमध्ये ठेवता येतात. त्याचे पंख घडी/फोल्ड करता येतात. सर्वसाधारण रस्त्यावर हे विमान कार सारखे चालते आणि साधारण मोठ्या पण रहदारी नसलेल्या रस्त्यावरुन उड्डाण करु शकते.
खरच अस काही परदेशात असत का ?
अहाहा!
अहाहा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो.
मस्त फोटो.
वा ! छान सफर घडवून आणलीत.
वा ! छान सफर घडवून आणलीत. आणखी फोटो पाहिजेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर अनुभव !
सुंदर अनुभव !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव! अनुभव, फोटो आणि
वॉव! अनुभव, फोटो आणि लिखाण(नेहेमीप्रमाणे) मस्तच!
मस्त अनुभव.
मस्त अनुभव.
भन्नाट!
भन्नाट!
धन्यवाद मंडळी नितिनचंद्रजी,
धन्यवाद मंडळी
नितिनचंद्रजी, मायक्रोलाईट विमाने छोटी असतात पण बहुधा गॅरेज वगैरेमध्ये ठेवलेली आढळत नाहीत. स्थानिक फ्लाईंग क्लब मध्ये हँगर्स असतात तिथेच पार्क होतात. शिवाय तुम्ही म्हणता तसे कार-कम-विमान अजून बहुधा प्रयोगावस्थेतच आहे, डिस्कवरीवर एका प्रोग्रॅममध्ये दाखवले होते. पण शेवटी विमान उडवणे आणि मुख्यतः तंत्रबिघाड अथवा मोसमातील खराबीमुळे आपदजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्याला प्रवाशांसह व्यवस्थित परत उतरवणे हे तसे जोखमीचे काम असल्याने ठराविक उड्डाणांचा अभ्यास पूर्ण झाल्याखेरीज परवाना मिळतच नाही.
मस्त अनुभव. शेअर केल्याबद्दल
मस्त अनुभव. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास अनुभव असेल हा...
झकास अनुभव असेल हा...
वा ! सुन्दर !!!
वा ! सुन्दर !!!
खुपच सुंदर
खुपच सुंदर
वॉव! मस्त अनुभव .. नि फोटो
वॉव! मस्त अनुभव .. नि फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त अनुभव आणखी फोटो मात्र
मस्त अनुभव आणखी फोटो मात्र हवेत :). माझ्या नजरेतून हे लेखन सुटल खर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)