आधीच्या भागांची लिंक
भाग १ - http://www.maayboli.com/node/40847
भाग २ - http://www.maayboli.com/node/42011
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077
पुढे..
रावसाहेब उठून आत निघून गेले. राधाई पण मागोमाग गेल्या. मैनाबाई आणि तिचा नवरा मुकाट्यानं सगुणाला आधार देत मागच्या दारानं निघून गेले. वेळ काळ , भवताल याचं भान विसरलेला सम्राट तिथेच बसून राहिला होता. राधाईनी पण त्याला टोकलं नाही. आयुष्याचं आधी रंगवलेलं चित्र पुसून टाकून पाटी कोरी व्हायला वेळ लागणार होताच. पण सम्राट स्वत:हून सावरणार होता. तडफड, सगळं संपल्याची जाणीव, सगुणाबरोबर घालवलेल्या स्वर्गीय क्षणांच्या आठवणी या सगळ्या गुंत्यात अडकत, बाहेर यायचा प्रयत्न करत होता तो. कधी कधी सगळं अनावर होई. एखाद्या जाळ्यात अडकलेल्या माशासारखं मन आकांत करे, निष्फळ धडपड करे बाहेर यायची आणि अजून गुंतत राही. मग थकून तो प्रयत्न सोडून देई. प्रेमभंग, हार, एकटेपण, हक्क संपणं या सगळ्यांनी तो पूर्ण हतबल झाला होता. रावसाहेब तर त्याच्याशी या विषयावर आधी आणि नंतर कधीच बोलले नाहीत. त्याला वाटत होतं पुरुष म्हणून ते त्याला समजाऊन घेतील, समजाऊन सांगतील. पण तसं झालंच नाही. त्यांना ही गोष्ट माहितीच नसावी इतके ते शांत होते. केवळ त्या लोकांसमोर ते पहिलं वाक्य बोलले होते म्हणून त्यांना माहीती होतं म्हणायचं. राधाईंनी मात्र त्याला सावरायला पूर्ण वेळ दिला. तो दिवसदिवस माडीवरच्या खोलीत असायचा. त्या वेळात त्या कुणाला तिथं जाऊ द्यायच्या नाहीत. रावसाहेबांनी पण विचारलं असणारच तो कुठं आहे. त्याच्यापर्यंत ते सगळं येऊ नये याची खबरदारी राधाई घेत.
आपण नको ती मुलगी पसंत केली तरी आपल्या आईवडलांनी आपल्याला एका शब्दानं दोष दिला नाही उलट आताही आपण हा वेडेपणा करतोय ते तो समजून घेत आहेतच याचं दडपण येऊ लागलं सम्राटला. याचाच अजून एक अर्थ होता की तो आता सगुणाच्या धक्क्यातून बाहेर येत होता.
आणि एक दिवस सम्राट रावसाहेबांसमोर जाऊन उभा राहिला. "बाबा, मला आता माझं काम सुरु करायचं आहे."
"तुला लागेल तेंव्हा माझ्याबरोबर मळ्यात यायला लाग. सगळं तुझंच आहे की" हातातल्या नोंदींमधून मान वर न करता रावसाहेब म्हणाले.
"तसं नको. मी तुमच्याकडून तर लहानपणापासून शिकत आलोच आहे. माझ्या दोन्ही कॉलेज नी पण मला खूप शिकवलं. आता ते सगळं स्वत:च्या हिमतीवर करून बघायचं आहे मला. "
" मग काय आता मला निवृत्त करून टाकतोस का काय?" रावसाहेब कौतुकानं हसत म्हणाले.
"नाही बाबा. ते आत्ता लगेच नाही. आजून तुमच्यात खूप धमक आहे. आणि मला पण अजून थोडा वेळ लागेल सगळं हातात घ्यायला. "
आता मात्र रावसाहेबांनी हातातलं काम बाजूला ठेवलं. पोराच्या मनात आहे तरी काय?
" बस की. आणि बोल. काय करायचं आहे तुला?"
" बाबा देवीच्या माळामागची आपली जमीन आहे ती करून बघायची आहे मला."
रावसाहेब हसायला लागले. पोरगं एवढं शिकून काय उपयोग नाही.
" सम्राट ती नापीक जिरायती जमीन. पुढं मागं कुणी कारखाना काढला तर नाहीतर आहे ते गोदाम कमी पडायला लागलं तर तिथं बांधायला म्हणून ठेवली. माझ्या आजोबांना इनाम मिळालेली म्हणून विकली नाही इतकंच. तिथं कष्ट म्हण्जे वेळ आणि पैशाची नासाडी. माझ्या हुशार शिकलेल्या नव्या पिढीच्या पोरानं असल्या हरणार्या लढाईचं सेनापती व्हावं हे काय मला पटत नाही. तू बाकी इतरपैकी काहीही बोल. हापूस ची बाग, डाळींब, ऊस. तुला सुरूवात करायला म्हणून माझ्या मनात ओढ्याच्या त्या बाजूचा काळाशार पट्टा आहे. तो खरा म्हण्जे तुझ्यासाठीच ठेवलाय. तुझ्या आजीला तिच्या सासर्यांनी आंदण दिला होता मी जनमलो तेंव्हा. फ़ार शकुनाचा. तू जा. माती बघ. तुझे काय आडाखे लाव आणी पाहिजे ते लाव. काय पाहिजे, किती माणसं पाहिजेत मला सांग. "
" बाबा, हा शकुनचा पट्टा तुम्हीच बघा सध्या. देवीचा माळ मोकळाच पडलाय. मला तोच पाहिजे आत्ता. "
" बरं बाबा. तुला पाहिजे तसं. " कसं का होईना आता पोरगं हाताशी आलं होतं. तारुण्यात असती खुमखुमी. काय जातील थोडे पैशे वाया. त्याचं मन पण लागेल.
पण सम्राटनी नवनवीन शिकलेल्या गोष्टी वापरून तिथं पीकं तर काढलीच पण बरोबर मार्केटींग सुद्धा करायला सुरुवात केली. सगळ्या जगाचे अंदाज असायचे त्याच्याकडं. कुठल्या गोष्टीचा आपल्या शेतीवर कसा परिणाम होईल ते सांगता येत नाही. असं म्हणत रोजच्या बातम्या , इंटरनेट वरची माहीती, कुठकुठली पुस्तकं, पार स्वीडन, स्पेन, उत्तर अमेरिकन देशातल्या शेतकऱ्यांशी संपर्क असल्या नवलाच्या गोष्टी तो करायला लागला. नफा जास्त नव्हता पण गणितं चुकत नव्हती. हळूहळू सगळा कारभार सम्राटच्या हातात कधी आला ना त्याला कळलं ना रावसाहेबांना. त्याचे कुठंकुठं असलेले मित्र रहायला यायचे. तो जायचा. कुठल्या परिषदा, धोरणं आणि बरंच काय काय. रावसाहेबांचे जुने स्नेहसंबध पण नव्या पिढीत सम्राटनी पुढं चालू ठेवले होते. गावात शब्दाला वजन आलं ते आता फक्त रावसाहेबांचा मुलगा म्हणून नाही तर त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावर.
मुली सांगून येत होत्याच. आधी त्याला विचारायला कचरणारे आईबाप हळूहळू घाई करायला लागले.
मग एक दिवस राधाईंच्या लांबच्या नात्यातली सई सांगून आली. आता सम्राटनी ठरवलं होतं की जे घडायचं ते घडून गेलं. मला एक चान्स मिळाला. आता आईबाबा म्हणतील ते. आणि खरंतर सई सगळ्यान्नाच आवडली. शिकलेली तरी प्रसन्न, मृदू. सम्राटसारख्याच संपन्न घरातली. दिसायलाही फ़ार सुंदर नसली तरी लोभस. बघता बघता लग्न झालं. शर्वरी आली. सम्राटाच्या यशाला सीमा नव्हत्या. छान जम बसला होता. शर्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्स देशाबाहेर जाऊ लागले होते. त्याबरोबर सम्राटही. वेळ पुरत नव्हता. हळूहळू सगळं आयुष्य हातात येतं असं वाटेतोवर पुन्हा नशिबानं आपलं अस्तित्व दाखवून दिलं.
एका रात्री सईनं त्याला सांगून टाकलं की ती त्याची राहिली नाही. सम्राटच्या व्यस्त कारभारामुळं ती एकटी पडत गेली आणि इंटरनेटवर स्वत:चं काम करत असताना एका दुसर्या माणसात गुंतली. का, कसं, पुढं काय वगैरे जाब विचारण्याचंही भान सम्राटला राहिलं नाही. हे सगळे आपण शोधलेले बहाणे असतात. व्हायचं ते होतंच काहीही करा. नशिबाचे खेळ.
"काय करायचं आहे तुला? तो माणूस तुला स्वीकारणार आहे का तू इथंच रहाणार आहेस?"
सई गोंधळली. खूप तमाशा होईल वगैरे तयारीनि तिनं हे बोलायला घेतलं होतं. पण काय उपयोग होता?
" नाही. मी जातेय त्याच्याकडे. "
"शर्वरी?" सम्राटनी शांतपणे विचारलं. सई शांत झाली.
" तुला हवं तसं. " सम्राट म्हणाला.
" ती इथंच बरी आहे सम्राट." सई खाली मान घालून बोलली.
" थेंक्स सई. " सम्राटनं तिला घट्ट मिठी मारली.
" नीट रहा. काही लागलं तर कळव. " सई चकित होऊन त्याच्याकडे पहात राहीली.
सई गेल्यावर मात्र सम्राटाच्या आयुष्याचा पतंग भिरभिरायला लागला. म्हणजे शेती उत्तम पण आयुष्य उदास, दिशाहीन. मित्रांनी हे ओळखून त्याला धीर द्यायला सुरुवात केली. दुसरं लग्न करावं असं सगळ्यांनी सुचवून पाहिलं पण आता ही परिक्षा घेण्याची सम्राटची हिम्मत नव्हती. जगभर फिरत होताच. आता कुठला पायबंद नव्हता. तो घालून घ्यायचाही नव्हता. राधाई होत्या तोवर शर्वरीचं नीट होत होतं. रावसाहेब गेले आणि मग थोड्या दिवसात राधाई पण. मग मात्र जमेना. पुन्हा सगळ्यांनी लग्नाचा पर्याय कसा योग्य हे सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला सम्राटनी थोडंफ़ार मान्य केलंहि पण भिती सारखी पिंगा घालायला लागली. शर्वरीला सामावून घेईल का नवीन मुलगी आली तर? त्यापेक्षा माझं नशीबच नसेल चांगलं तर उगीच कशाला अजून एक चान्स? या हो-नकोत शर्वरीला आणि घराला सांभाळायला आया, बायका ठेवून बघत, आत्ये , चुलत घरातल्या बायांच्या जिवावर सोडत, शेवटी आक्काआत्या आल्यावर सगळं नीट झालं होतं. आता लग्न करण्याची अगतिकता तात्पुरती का होईना मिटली होती. आता काही वर्षं अशी नीट गेली तेवढ्यात आज आता सगुणा पुढ्यात येऊन उभी राहिली होती. का, कशी, कसल्या परिस्थितीला शरण जाऊन?
या प्रारब्धाला म्हणावं काय, त्याच्यापुढं मांडावं काय आणि त्याच्याशी भांडावं तरी काय?
क्रमश:
मस्त होतेय कथा.पहिली
मस्त होतेय कथा.पहिली
मस्त भाग.
मस्त भाग.
छान पहीला भाग सार्वजनिक
छान पहीला भाग सार्वजनिक केल्याबद्दल धन्यवाद.
"राधाई होत्या तोवर सईचं नीट
"राधाई होत्या तोवर सईचं नीट होत होतं. " ईथे शर्वरी हवे होते ना?
कथा छान चालली आहे.
"राधाई होत्या तोवर सईचं नीट
"राधाई होत्या तोवर सईचं नीट होत होतं. " ईथे शर्वरी हवे होते ना?>>
हेच सांगायला आले होते!
कथा छान चालली आहे.
कथा छान चालली आहे.
पुढील भागांची वाट बघत आहे....
पुढील भागांची वाट बघत आहे....
mast
mast
मस्त....लवकर आणा पुढला भाग...
मस्त....लवकर आणा पुढला भाग...
तीनही भाग एकदम च
तीनही भाग एकदम च वाचले
आवडली... पुढचा भाग लवकर टाका
आभार फ्रेन्ड्स. चर्चा,
आभार फ्रेन्ड्स.
चर्चा, इन्द्रधनू चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.
लौकरच पुढचा भाग टाकते.
आज चारही भाग वाचले. कथेचा ओघ
आज चारही भाग वाचले. कथेचा ओघ खूप छान आहे. तसंच भाषाही. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
धन्यवाद शुगोल. नवीन भाग
धन्यवाद शुगोल.
नवीन भाग टाकला आहे.