परचुरे

Submitted by बेफ़िकीर on 12 March, 2013 - 02:31

"येऊ का?"

"या की? बसा. घाणेकर, जरा परचुरे आजोबांना बसायला जागा द्या ना?"

पेन्शनरांच्या सायंकालीन कट्टागप्पा समुहात बरेच दिवस बिचकून शेवटी एकदाचा परचुरे आजोबांनी पाय ठेवला आणि सादर स्वागत झाले त्यांचे! तसे त्यांना रोज फिरायला जातायेताना सगळ्यांनी पाहिलेलेच होते. पण परिचय नव्हता. मुद्दाम त्यांना थांबवून परिचय करून घेण्याची या सहा सात जणांना काहीच गरज नव्हती. यांचा ग्रूप चांगला जमलेला होता. गरज परचुरेंना होती. ते एकटेच होते. लग्न केलेले नव्हते. आता ऐंशी वय होते. हे बाकीचे सगळेजण साठ ते सत्तर वयोगटातले होते, परचुरेंपेक्षा लहानच. पण परचुरेंजवळ राहणारे पाटील काका परचुरेंना व्यवस्थित ओळखत होते. त्यांच्याच परिचयाच्या जोरावर आज परचुरेंनी ग्रूपला विचारले होते की मी तुमच्यात आलो तर चालेल का? सर्वांनी त्यांना आनंदाने सामावून घेतले.

पांढरा चुरगळलेला लेंगा, एक बंडी आणि त्यावर एक हाफ स्वेटर अश्या वेशात सुरकुतलेल्या हातापायांचे आणि चेहर्‍याचे परचुरे आजोबा बसून राहिले. सगळ्यांकडे एकवार बघत त्यांनी प्रत्येकाचे निरिक्षण केले. म्हणाले...

"मी आपला सहज आलोय हो? तुमच्या गप्पा नेहमीसारख्या चालू देत. जरा दम लागला होता आणि बरेच दिवस सगळ्यांशी ओळख व्हावी असे मनात होते म्हणून थांबलोय. व्यत्यय नका मानू मला"

"छे छे, व्यत्यय कसला?"

घाणेकरांनी हासत हासत परचुरेंना पाणी दिले. गप्पा पुन्हा सुरू झाल्या. पण आज केंद्रस्थानी परचुरे होते गप्पांच्या! बावीस वर्षांपूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या परचुरेंचे आयुष्य अगदीच साधेपणाने गेले होते. तब्येतही तशी ठीकच होती. अलीकडेच जरा दम वगैरे लागत होता चालल्यावर. पण सहसा कोणाची मदत घ्यायची नाही असा स्वभाव होता. अगदीच आवश्यक वाटले तर शेजारपाजारच्यांना काही विनंती करायचे एवढेच! बाकी दिवसातून दोन वेळा फिरायला जाणे, पूजा, वर्तमानपत्रे वाचणे आणि दूरदर्शन बघत बसून राहणे हे त्यांचे आयुष्य होते. पेन्शनमध्ये चालेल इतकेच खर्च ठेवलेले होते त्यांनी! नातेवाईक परगावी होते. परचुरेंकडे एक लँडलाईन फोन होता. तोही ते फार वापरायचे नाहीत. कामाला येणार्‍या बाईंना फारच उशीर झाला तर त्यांना एखादा कॉल करणे नाहीतर कधी गरज भासलीच तर डॉक्टरांना एखादा कॉल करणे एवढेच!

परचुरेंचा परिचय झाल्यानंतर पुन्हा सर्वांच्या नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या. परचुरे नुसते ऐकत राहिले.

दुसर्‍या दिवसापासून परचुरे तेथे थोडा वेळ बसू लागले. नुसतेच बसायचे आणि निघाले की 'चला, येतो मी' असे म्हणून हात करून निघून जायचे.

गप्पांचे विषय सहसा रस्त्यांची अवस्था, पाणीकपात, वीजकपात, सोसायटीचे प्रश्न, वाढती वाहतूक, शिक्षणाचा बाजार, नातवंडांची कौतुके असे असायचे. परचुरेंना आयुष्यात कसली तक्रारच नव्हती. रस्ता खोदला तर खोदला, थोडे बाजूने जायचे, त्यात काय, असे त्यांना मनात वाटायचे. ज्या अर्थी शासनानेच रस्ता खोदलेला आहे त्या अर्थी काहीतरी सुधारणाच करायची असणार ना, असे त्यांचे मत! दोन चार दिवस गैरसोय होईल पण काहीतरी, कोणाचीतरी महत्वाची सोय होईल. कुठेतरी पाणी जास्त येईल, कुठेतरी फोनची लाईन बसेल, काहीतरी नक्कीच चांगले घडेल.

वाहतूक वाढली तर त्याचा अर्थ वेग कमी होईल, म्हणजे अपघातही कमी होतील. आता थोडे कर्कश्श हॉर्न्स वाजतील, बाचाबाची वाढेल रस्त्यावर, पण मुळात अपघात तर कमी होतील ना?

परचुरेंचे विचार वेगळेच असायचे. वाद नकोसे असल्यामुळे आणि हे असे विचार फारसे कोणाला पटत नसल्यामुळे ते बोलायचेच नाहीत. त्यांना बोलते करावे ही तशीही कोणाची भावनिक गरजही नसायचीच.

ज्या अर्थी भारनियमन करत आहेत त्या अर्थी ते भारनियम संपल्यावर वीज पुन्हा पूर्ववत मिळणार आहे आणि एकदा भारनियमनाचे टायमिंग आणि कालावधी समजला की आपले नियोजन त्यानुसार केले की झाले. त्यात अडचण ती कसली? ज्या अर्थी शिक्षणक्षेत्रात धनदांडगे शिरले आहेत त्या अर्थी शिक्षण महत्वाचे झालेले आहे आणि त्याचा अर्थ समाज मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेणार व प्रगत होणार हे नक्की, असे वाटायचे परचुरेंना!

तक्रार का असावी आणि का करावी हे त्यांच्या लक्षात येऊ शकायचे नाही. म्हणजे तितके गंभीर त्यांना त्यात काही वाटायचेच नाही. बेसिकली सगळीकडे आधीपेक्षा अधिक सुधारणा होत आहेत हे त्यांना मान्य झालेले होते. पूर्वीपेक्षा मोड ऑफ कन्व्हेयन्स आता अधिक होते, बसेस अधिक होत्या, दुकाने अधिक होती, दूरदर्शन तर १८ तास चालू राहात होते, वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळू लागले होते, भाजीपाल्याच्या गाड्या दारात येऊ लागल्या होत्या. हे सगळे पेन्शनीत बसतही होते. गॅस सिलिंडर्स मिळत होते, लाईट बहुतांशी वेळ चालू राहात होते, फोन चालू राहात होता, नळाला पाणी येत होते. मग तक्रार काय? पण ते असे चारचौघांमध्ये बोलायचे नाहीत. उगाच कोणाला नाही पटले आपले विचार तर तो तावातावात काहीतरी बोलणार, मग आपल्याला मनात वाईट वाटणार, वर असेही वाटणार की जगाला ज्या गोष्टीची तक्रार आहे त्या गोष्टीबाबत आपली काहीच तक्रार नसणे हे मागासलेपणाचे लक्षण आहे की काय, वगैरे! त्यापेक्षा नकोच!

पण ते जातील तेथे त्यांना तक्रार चेहर्‍यावर चिकटवलेलीच माणसे दिसायची. प्रत्येक माणूस ही एक तक्रार होती. विश्व तक्रारींचे होते. एक एकटाच विनातक्रार माणूस होता जो परचुरेंना फक्त आरश्यात दिसायचा. आरश्यालाही काही तडे गेले तेव्हा त्या विनातक्रार माणसांची संख्या थोडी वाढली इतकेच, पण ते सगळे त्या आरश्यातच! आरश्याबाहेर सर्व चेहरे तक्रारींचे!

एक दिवस परचुरेंनी धाडस करून ग्रूपला विचारले.

"ऑनलाईन म्हणजे काय हो? लाईटचे बिल ऑनलाईन भरलेत तर येथे येत बसावे लागणार नाही असे म्हणाला मला तेथील क्लार्क!"

त्यावर कंप्यूटरायझेशनमुळे बँकेत आलेल्या व्ही आर एस चा लाभ घेऊन बाहेर पडलेले साठीचे वैद्य म्हणाले...

"त्यासाठी कांप्यूटर आणि नेट घ्यावे लागते काका! ते कुठे करत बसताय आता या वयात? परत ते म्हणे पासवर्ड वगैरे विसरले की वापरताच येत नाही. आणि कोणाला माहिती ते खरे असते की खोटे? नाहीतर व्हायची एखाददिवस वीज कट आपली!"

चारदोन माना हालल्या. परचुरेंनी विचारले...

"मग आहे तेच चांगले ना?"

"अहो उत्तम! हातपाय हालते राहतात, आपल्या खात्यातून आपणच पैसे काढायचे आणि मंडळाच्या खिडकीत देऊन रीतसर पावती हातात घ्यायची! हा नसता उद्योग आहे ऑनलाईन बिनलाईन"

परचुरेंना बरे वाटले. पण एक किडा शिरला त्यांच्या डोक्यात! ज्या अर्थी शासकीय कर्मचारीच म्हणतोय की बिल असे असे भरलेत तर श्रम वाचतील, त्या अर्थी ती काहीतरी सुधारणाच असणार ना? मग त्यात थोडीशी तक्रार असली तरी दम लागत असताना चालणे वाचले तर ते जास्त बेर नाही का?

त्यामुळे थोड्या वेळने धीर करून परचुरेंनी पुन्हा विचारले.

"पण सरकारच का सांगत असेल हो? की बिल असे भरा म्हणून?"

"अहो त्यांना कामं करायची नसतात. आता थेट पैसे खात्यातून खात्यात पोचले की पावती लिहीत बसायचे काम वाचले ह्यांचे! तंबाखू खायला मोकळे होणार हे! निवांत रिटायर्ड होणार आणि पेन्शन घेत कंप्यूटरचे प्रस्थ किती वाढले याची बोंब ठोकायला मोकळे होणार"

परचुरेंना काही केल्या समजेना! त्यांनी आणखीन थोडा धीर गोळा करत विचारले.

"पण एखाद्याला ऑफीसपर्यंत जाणे शक्यच झाले नाहीतर?"

"अहो पण विश्वासातला माणूस असतोच ना एखादा? तो जाणारच ना?"

परचुरेंना नेमका प्रॉब्लेम लक्षात आला. आपल्याला असे कोणी नाहीच आहे हा तो प्रॉब्लेम! प्रथमच त्यांना जाणवले की ते एकटेच होते आणि या एकटेपणामुळे पुढे बरेच प्रॉब्लेम निर्माण होऊ शकले असते. अजुन दोन वर्षांनी हात पाय थकले तर सांगणार कोणाला माझे बिल भरून ये म्हणून?

विचार करत करत परचुरे घरी आले आणि देवाला दिवा लावून मारुतीच्या मूर्तीकडे एकटक बघत विचारांत हारवले. आपल्याला कोणीच नाही ही आपली तक्रार आहे का? आज नसली तरी उद्या असेल का? मग वृद्धाश्रमात आत्तापासूनच जावे का? तिथेच पेन्शन देऊन टाकली की सगळे तयारच मिळणार. कसले बिल भरायला नको आणि काही नको. की सरळ काँप्यूटरच घ्यावा? पण तो महाग असतो. त्यात पुन्हा सगळे शिकायला लागेल. शेजारच्या जाधवांचा नातू सारखा नॅटकॅफेत जातो म्हणजे कुठे जातो? त्यालाच विचारावे.

परचुरेंनी जाधवांची बेल वाजवली आणि त्यांच्या नातवाकडून साद्यंत माहिती मिळवायचा प्रयत्न केला. दहा रुपये तासाचे दिले तर सगळी बिले एकाच ठिकाणाहून भरता येतील असे समजले. बरं, पुन्हा नेट कॅफे तर घरातून खाली उतरले की पन्नास पावलांवर होते. परचुरे पुन्हा खाली आले. नेट कॅफे उघडेच होते.

परचुरे आत गेले.

"कोण हवंय आजोबा?"

एक मुलगी काऊंटरवरून विचारत होती. अनेक लहान मुले आरडाओरडा करत कोणतीतरी ऑनलाईन गेम खेळत होती. एक दोघे नुसतेच स्क्रीनकडे बघत काहीतरी टाईप करत होते. एकाने हेडफोन कानाला लावलेला होता. वेगळेच जग होते ते! हल्लकल्लोळ चालला होता मुलांचा!

"मला फोन, लाईट वगैरेची बिलं कंप्यूटरवरून भरायची आहेत"

"ओक्के! मग नांव सांगा आणि सहा नंबरला बसा"

"सदाशिव परचुरे"

"बसा तिथे, मॉनीटर फक्त ऑन करा"

"नाही, मला काहीच येत नाही"

"आले मी"

ती चुणचुणीत मुलगी पटकन उठली. तिने स्क्रीन ऑन करून दिला. परचुरेंकडे बघत म्हणाली..

"कोणतं अकाऊंट आहे?"

"कॉसमॉस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र"

एक जण हळूच हासला, परचुरेंना ते कळलेही नाही. मुलगीही थोडीशी हासून म्हणाली...

"बँक अकाऊंट नव्हे.....इंटरनेटचे कोणते अकाऊंट आहे? याहू, रेडिफ वगैरे?"

"म्हणजे? इथे अकाऊंट काढावे लागते का?"

"हो"

"पण .. मी आत्ता काहीच कागदपत्रे आणलेली नाहीत"

"नाही नाही... नुसती मला माहिती सांगत जा"

मुलगी विचारेल ती सर्व माहिती परचुरे सांगत राहिले. जन्मदिवस, पिनकोड, आवडते गाणे, पर्यायी इमेल म्हणून त्या म्युलीने स्वतःचा इमेल आय डी टाकला. परचुरेंना म्हणाली...

"हे घ्या, हे तुमचे खाते आहे, एसपरचुरे८१@याहू.कॉम, याचा पासवर्ड मी बदलून सोपा केला आहे, आय लव्ह इन्डिया हा तुमचा पासवर्ड आहे आजोबा"

"आता काय करू?"

त्या मुलीने पाऊण तास तिथेच बसून परचुरेंना लाईट बिल आणि फोनचे बिल भरून दाखवले. दोन्ही ठिकाणचे पिन नंबर्स, पासवर्ड्स, आय डि अशी सगळी माहिती तिने त्यांना लिहून दिली आणि म्हणाली की आता तुमचे पासवर्ड्स तुम्ही बदलून तुम्हाला हवे ते दुसरे पासवर्ड्स ठेवा. मी ते पाहणार नाही. तिच्याच मदतीने परचुरेंनी पासवर्ड्स बदलले. प्रत्यक्ष परचुरे पासवर्ड टाईप करताना ती मुलगी मुद्दाम दुसरीकडे पाहात होती हेही परचुरेंनी बघितले.

परचुरेंनी विचारले.

"बिल भरल्याच्या पावत्या?"

"त्या ऑनलाईनच दिसतात आजोबा.. आता तुम्ही परत वीज मंडळाची साईट ओपन करून जर यूझर नंबर आणि पासवर्ड टाकलात ना? तर तुम्हाला स्टेटस समजेल तुमचे. तिथेच एक पावती नंबर येतो. तो मिळाला की काम झाले असे समजायचे"

"पण मग.. म्हणजे झालं बिल भरून?"

"होऽ"

त्या मुलीने हासून होकार भरला तसे परचुरे थक्कच झाले. हे काय? हे असे बिल भरता येते? मग तंगडतोड कशाला करायची? उठले ते! त्या मुलीचे अनंत आभार मानून घरी परतले आणि दार उघडून आत येऊन दार बंद करून एक लहानशी उडीच मारली. जणू एक संशोधनच केले होते त्यांनी! आता बराच त्रास वाचणार होता.

आता त्यांना छंद लागला तो कोणकोणती बिले अशी भरता येतील ते पाहायचा. लाईट, फोन ही दोन बिले भरता येत होती. कॉर्पोरेशनचा टॅक्स भरता येतो असे ती मुलगी म्हणाली होती. आता परचुरेंना त्रासच नव्हता काही. एकदा खात्यातून थोडी रक्कम आणून पेपरवाला, किराणावाला आणि दूधवाला यांना दिली की महिनाभर निवांत!

एक दिवस परचुरे सहज आपले नेट कॅफेत गेले. त्या मुलीला म्हणाले...

"ते आपण खातं उघडलं होतं त्याचं आता काय झालं असेल?"

"काही नाही? तसेच राहते ते! कोणी तुम्हाला इमेल केलेली असली तर दिसेल आणि वाचता येईल"

"छे मला कोण इमेल करणार?"

"हवं असलं तर बघून घ्या, दहा रुपये तास"

परचुरेंनी इमेल बॉक्स उघडून पाहिला. शॉकच लागला त्यांना! बावीस इमेल्स होत्या. त्यातल्या दोन इमेल्समध्ये वीज मंडळ आणि फोन मंडळाने इमेलतर्फे पावतीपण पाठवलेली होती. अत्यानंद झालेल्या परचुरेंना त्या पावत्यांची कॉपी हवी होती. त्या मुलीने प्रिंट काढून दिली. ते ती बराच वेळ हातात घेऊन वाचतच बसले. धन्य वाटले त्यांना! किती प्रामाणिक जग होते सगळे! तेवढ्यात आजूबाजूची मुले अचानक किंचाळली. घाबरून परचुरेंनी बघितले तर 'मारला, तुझा मी मारला' असे काहीतरी आवाज ऐकू आले, तेही विजयीवीराच्या थाटात! शेजारच्या पी सी वर काय चालले आहे ते परचुरे बघू लागले. काही यंत्रमानव विचित्र मार्गावरून फिरत होते. हातातल्या बंदुकांमधून गोळ्यांच्या फैरी झाडत शत्रूला मारत होते. गर्जना वाढू लागल्या. हल्ला तीव्र झाला. परचुरे थिजून पाहात राहिले. थोड्या वेळाने कोणीतरी दोघे विजयी ठरले. ते विजयोन्मादाने ओरडू लागले. हारलेल्या मुलांनी एकमेकांना नावे ठेवली. तुझ्यामुळे आपण हारलो असे ती दुसर्‍यांना सांगू लागली. हे एक अजबच जग होते. आता परचुरे स्वतःची स्क्रीन तशीच ऑन ठेवून निश्चलपणे पुढची गेम बघू लागले. तब्बल पाऊण तासांनी त्यांना स्वतःला आपोआपच ती गेम समजली. दोन टोळ्यांमधील मारामारी होती ती! एक प्रकारचे सशस्त्र युद्धच होते ते! आता परचुरेंना ते बघत बसण्याचा नादच लागला. ती मुलगी आजोबांकडे पाहात मनातच हासत होती. मुलांचे आजोबांकडे लक्षच नव्हते. अचानक एका मुलाला परचुरे घाईघाईने म्हणाले...

"अरे अरे...हा इकडून आला बघ त्याचा यंत्रमानव"

त्या मुलाचे लक्ष गेले आणि त्याने तो यंत्रमानव पटकन मारला आणि परचुरेंकडे क्षणभर वळून 'थँक्स आजोबा' म्हणत पुन्हा खेळात गुंगला. परचुरेंना स्वतः काहीतरी भरीव कामगिर्ती केल्यासारखे वाटले. जाताना त्यांनी त्या मुलीला विचारले.

"तो खेळ खेळण्यासाठी वयाचे लिमिट असते का?"

"नाही... का?"

"नाही .. काही नाही"

आपण कसे म्हणायचे की मलाही खेळायचे आहे म्हणून? परचुरेंना लाज वाटली. ते निघून जायला लागले तशी ती मुलगी म्हणाली..

"तुम्हाला खेळायचंय का आजोबा?"

"मला कोण घेणार?"

"अहो तसं नसतं... सगळे एकत्र खेळू शकतात... ए रोहित.. ह्यांना तुझे पार्टनर बनव रे?"

रोहितने किंचित रिलक्टंटलीच आजोबांना स्वतःच्या ग्रूपमध्ये घेतले तर परचुरेंनी पहिल्याच दहा मिनिटांत शत्रूपक्षाचे दोन यंत्रमानव नेम धरून यमसदनी पाठवले. एकच हल्लकल्लोळ झाला. परचुरेंचा चेहरा विलक्षण फुलला होता. आयुष्यात माशीही न मारलेल्या परचुरेंनी पुढीऑल दोन तासांत सहा यंत्रमानव निष्प्राण करून टाकले. मुले 'आजोबा इज ग्रेट' म्हणत राहिली. ग्रेट आजोबा रात्री घरी परत आले तर झोपल्यावर त्यांना स्वप्नच पडले. आपण एकटेच उरलेले आहोत आणि एकट्याने शत्रूपक्षाचे यच्चयावत यंत्रमानव एक एक करून टिपत आहोत. आपल्या नावाचा नुसता जयघोष चाललेला आहे.

दुसर्‍या दिवसापासून परचुरे नेट कॅफे उघडायची आणि मुले खेळायला यायची वाट पाहू लागले. महिन्याभरातच परचुरे दिवसातले चार चार तास यंत्रमानवांचे खून करण्यात घालवू लागले. जेवणपाण्याकडे दुर्लक्ष करून परचुरे काल्पनिक युद्धातील शूर सैनिक ठरू लागले. एक दिवस तीन बायका नेट कॅफेत आल्या आणि म्हणाल्या...

"आजोबा... तुमच्यामुळे आमची मुले शळेत जातो सांगून इथे येऊन खेळतात... नाद लावताना काही वाटले नाही आमच्या मुलांना?"

परचुरेंना काही माहीतच नव्हते की ही मुले फसवून इथे येतात. त्यांना वाटायचे की शाळाबिळा करत असतील व्यवस्थित! उदासवाणे परचुरे उठून निघून गेले. आता ते नेट कॅफेत जाणार नव्हते. पण आता घरीही बसवेना आणि फिरायलाही जाववेना! मग नुसतेच इमेल तपासत बसायचे. पण सगळ्या बल्क इमेल्स याहूच्या वगैरेच असायच्या! मग एक दिवस त्या मुलीने त्यांना फेसबूक शिकवले. आता अधिकच मजा यायला लागली. त्या मुलीच्याच फ्रेंडलिस्टमधील काहींना तिने हे आजोबा सजेस्ट केले. त्यामुळे अवघी तरुणाई आजूबाजू अशी परिस्थिती आली. कोणी फोटो टाकतंय तर कोणी कविता! कोणी स्टेटस बदलतंय तर कोणी लाईक वाढवतंय!

पुढच्या महिनाभरात परचुरेंना एकसष्ट मित्र मिळाले आणि त्यांनी सहा वेळा बदलेल्या स्वतःच्या स्टेटसवर एकंदर मिळून चौतीस लाईक्स आले. आता लाईक मिळणे हेच आयुष्य होऊ लागले. एका ठिकाणी बसून जगात कोणाशीही चॅट करणे किती आनंददायी असते हे समजू लागले. आपण ऑनलाईन असलो की आपल्या नावापुढे हिरवा लाईट दिसतो हेही त्यांना समजले. त्यावरून कोण कोण ऑनलाईन आहे हेही कळू लागले. एकदा तर गंमत म्हणून त्या मुलीनेच तिथेच बसून आजोबांशी चॅट केले, त्याची तर मजाच वाटली परचुरेंना!

काही दिवसांनी ती मुले परत यायला लागली कॅफेत! पण परचुरे त्यांच्यात खेळले नाहीत की त्यांना काही म्हणालेही नाहीत. त्यांचं त्यांचं त्यांच्यापाशी!

मुले मात्र त्यांना बोलावत राहिली. पण परचुरे कसंनुसं हासत नको नको म्हणत राहिले.

आणि एका महिन्यात सलग सहा दिवस ते नेट कॅफे बंद ठेवण्यात आलं काही कारणाने! परचुरे वेडेपिसे झाले. दुसर्‍या ठिकाणी जायचं म्हणजे परत नवीन अकाऊंट की काय असेही त्यांना एकदा वाटले. मग लक्षात आले की तसे काही नाही, नुसते ठिकाण दुसरे, याहू अकाऊंट वगैरे सगळे तेच राहते. आता लाईटचे बील भरायचा दिवस आला. तीन एक महिन्यांनी प्रथमच परचुरे चालत बिल भरायला निघाले. तीन महिने अवघडून बसायची सवय झाली होती. चालवेना! त्यात खड्डे आणि खोदकामं! आयुष्यात प्रथमच परचुरेंनी शासकीय गलथान कारभाराला शिव्या मोजल्या, मनातच! गर्दी अंगावर येत होती. हॉर्न्स सहन होत नव्हते. रस्ता क्रॉस करताना जीव जायची भीती वाटली. दोन तीन वेळा तर ते मागेच सरकले. अनेकांनी त्यांना 'ओ आजोबा, नीट चाला, मधे काय उभे राहता' असेही ओरडून सांगीतले. परचुरेंनी प्रथमच त्या माणसांकडे रागारागाने पाहिले व काहीतरी पुटपुटले. बिल भरायला रांग होती. रांग संपेचना! परचुरे घामाघुम झाले. मनातच शिव्या मोजत राहिले रांगेला आणि हळू कारभाराला! दुसरे नेट कॅफ याहीपेक्षा लांब असल्याने परचुरेंनी येथेच बिल भरू असे ठरवले होते, पण रांग सरकेना! तसे शेवटी चालत दुसर्‍या कॅफेत गेले. तिथल्या मुलाने आयडेंटिटी मागीतली. ती ह्यांनी नेलेलीच नव्हती. मग तो मशीन द्यायला नाही म्हणाला. वैतागलेले परचुरे त्याच्या नावाने शिव्या मोजत पुन्हा रांगेत आले. बिल भरून घरी आल्यावर त्यांना थकवा आला. इतका की काहीच करवेना! दवाखान्यात जावे म्हंटले तर कोणाची तरी मदत आवश्यक होती. फेसबूकवरचे एकसष्ट मित्र अन मैत्रिणी वाकुल्या दाखवत स्टेटस देत होते डोळ्यासमोर! ऑनलाईनचा हिरवा दिवा नाचत होता डोळ्यासमोर, पण अंधेरीही येत होती. पेन्शनरांचा ग्रूप सार्‍या जगाला शिव्या मोजत होता. नेट कॅफे आज पुन्हा उघडल्यासारखे दिसले. पण त्यातून शिक्षण न घेणारी सहा लहान मुले गुन्हेगार म्हणून बाहेर पडताना दिसली. चुकून वीज मंडळाला दुप्पट पैसे दिले गेल्याचा भास झाला परचुरेंना! अचानक तीन बायका आल्या आणि 'याने आमच्या मुलाला नादी लावले' असे पोलिसांना सांगून गेल्या. तडे गेलेल्या आरश्यात पाहिले तर सगळे चेहरे तक्रारींचे होते. घेरी येऊन पडलेल्या परचुरेंच्या कानात कोणीतरी जोरात ओरडत होते. 'मारा तो यंत्रमानव आजोबा आणि बिल ऑनलाईन भरत जा की?'

परचुरे आता विश्रांती घेत आहेत. मजेत आहेत. फारसे फिरत नाहीत आता. पण हातपाय हालते ठेवण्यापुरते फिरतात....

..... स्वर्गात! .... ऑफलाईन असतात ते सध्या....!

=========================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या की? बसा. घाणेकर, जरा परचुरे आजोबांना बसायला जागा द्या ना?>>>>>>>> बेफी, बर्‍याचदा विचारेन म्हणते. ह्या वाक्यात जे प्रश्नचिन्ह घातलेत ते योग्य आहेत का? तुमच्या बर्‍याच लिखाणात असं आढळतं म्हणुन विचारलं. गै. न.

आरश्यालाही काही तडे गेले तेव्हा त्या विनातक्रार माणसांची संख्या थोडी वाढली इतकेच, पण ते सगळे त्या आरश्यातच! आरश्याबाहेर सर्व चेहरे तक्रारींचे! >>> फारच आवडलं हे Happy

काहीही चालेल पण निदान म्हातारपणात तरी एकटेपण नको. देवाने ते तसे देऊच नये. मी फार जवळुन बघीतलयं ते.:अरेरे:

बेफिकीरजी तुम्ही तुमच्या आयडीशी सुसंगत लिहीत नाहीत. तुमच्या प्रत्येक लेखनातुन तुमच्या समाजशील मनाचे प्रतीबिंब उमटते. मोठे मोठे कथा लेखक जो परीणाम साधु शकत नाहीत, तो तुम्ही सहज साधुन जाता. ही अती स्तुती नाही, तर जे मनापासुन वाटले ते लिहीलेय.

टुनटुन,

>> बेफिकीरजी तुम्ही तुमच्या आयडीशी सुसंगत लिहीत नाहीत.

ते जगाबद्दल बेफिकीर नाहीत, तर स्वत:बद्दल आहेत! Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर,

आजून एक सुंदर स्वभावचित्रण. व्यक्तिचित्रण म्हणता येईल का ते माहीत नाही म्हणून स्वभावचित्रण म्हणतोय.

परचुरे हा माणूस फार भाबडा वाटतो. जगाचे टक्केटोणपे खाल्लेला वाटंत नाही. अशा लोकांना म्हातारपण म्हणजे खरोखरच दुसर्‍या बालपणासारखं असतं. हेमावैम. एक व्यक्ती म्हणून परचुरे काही वेगळेच दिसले असते असं राहूनराहून वाटतं. ही हुरहूर या लेखाची मेख आहे का...?

आ.न.,
-गा.पै.

व्यक्तिचित्रण आवडलं.

(शेवटी ते 'स्वर्गात.. ऑफलाइन' वगैरे लिहायचा मोह टाळला असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. रसभंग झाला माझातरी त्यामुळे.)

सांजसंध्या +१
८० वर्षांचे आजोबा एवढ सगळ शिकू शकतात याच कौतुक वाटलं.. लहान मुलांबरोबर गेम खेळताना जनरेशन gap आड आली नाही का? पण मग पेन्शनर ग्रुप मध्ये ते का रमले नाहीत..? असे प्रश्न पडले. पण असो.

सर्वांचा आभारी आहे.

टुनटुन Happy

गा मा साहेब,

>>>एक व्यक्ती म्हणून परचुरे काही वेगळेच दिसले असते असं राहूनराहून वाटतं. ही हुरहूर या लेखाची मेख आहे का...?<<<

मला जे अभिप्रेत होते ते असे:

म्हातारपण, एकटेपण, संगणकाचे व्यसन, भाबडेपणा, तक्रार न करण्याचा स्वभाव, आलेले अनुभव, संगणक उपलब्ध नसताना आलेली अस्वस्थता आणि संगणकामुळे आयुष्यात अचानक रंग भरला जाणे या सर्वांच्या मिश्रणातून नेमका कोणताही संदेश देऊ न इच्छिणारी ही कथा फक्त स्मरणात रेंगाळावी आणि परचुरेंमध्ये वाचकांनी किंचित प्रमाणात स्वतःला किंवा परिचयातील कोणालातरी बघावे असे काहीतरी! (माझ्यामते त्यात मी बर्‍यापैकी यशस्वी झालेलो असेन)

धन्यवाद Happy

-'बेफिकीर'!

आवडली कथा.
<<नेमका कोणताही संदेश देऊ न इच्छिणारी ही कथा >>
सहमत, बेफिकीर. इतक्या सहज मांडणीत वाचकाला अलिप्तं रहाणं कठीण आहे. पण नक्की काय आपल्याबरोबर रहातं ते कळत नाही... कथा, परचुरे आजोबा मनात रेंगाळतात हे मात्रं शंभर टक्के खरं.
मजा आली.

बेफिकीर,

>> (माझ्यामते त्यात मी बर्‍यापैकी यशस्वी झालेलो असेन)

माझं उत्तर हो आहे.

पण पडलेला प्रश्न तसाच आहे. तो तसाच राहू द्यात. सकस कथेतून प्रश्न पडावेत अशी अपेक्षा आहे. ती या बाबतीत पूर्ण झाली आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

काल वाचली. आज पुन्हा आर्वजून वाचायला आले.खूप आवडली. आज वाचताना का कोण जाणे 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'हरितात्यांची आठवण झाली.लेखनशैलीमुळे असेल.

८० वर्षांचे आजोबा एवढ सगळ शिकू शकतात याच कौतुक वाटलं.. लहान मुलांबरोबर गेम खेळताना जनरेशन gap आड आली नाही का? पण मग पेन्शनर ग्रुप मध्ये ते का रमले नाहीत..? असे प्रश्न पडले. पण असो.>>>>

माझे स्वतःचे आजोबा बरेच असेच होते. पेन्शनर ग्रुपमध्ये ते कधीच रमले नाहीत (गेले पण नाहीत). लहान मुलांबरोबर सगळ्यात जास्त रमायचे. अगदी नव्वदीतही कॉम्पुटरमध्ये वगैरे रस घ्यायचे.घरातील ढकलाढ्कलीची कामे म्हणजे गॅसचा नंबर, लाईट बिल, फोन बिल, ईस्त्रीचे कपडे अगदी बिनबोभाट व्हायची ते असेपर्यंत.

कुठ्ल्याही विषयाच्या चर्चेत (आजीच्या भाषेत लष्करच्या भाकरी) हिरिरीने बोलायचे. रेडियो हे अप्रूप असलेल्या जमान्यापासून ते आजच्या ई मेलच्या जमान्यापर्यंत सर्व बदल त्यानी तितक्याच उत्साहाने अनुभवले आणि स्वीकारले.ऑर्कुट आणि फेसबुकच्या काळात दुर्दैवाने(कि सुदैवाने?) ते नाहीत.

Pages