चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्याने आवरायचं'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.
शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?
स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !
आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.
ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :
हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.
१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.
सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.
छान धागा हार्दिक
छान धागा
हार्दिक शुभेच्छा......
.:)
शुभेच्छा......
शुभेच्छा......
माझ्या बायकोला नोकरी करायची
माझ्या बायकोला नोकरी करायची होती , पण २००८ च्या मंदीत बाहेर पडल्यामुळे जॉब मिळत नव्हता . मी तेव्हा बेंगलोरला होतो . तिथे सुमारे १ वर्ष तिच्यासाठी नोकरी शोधली . नंतर ६ महिने NIIT मध्ये आणी नंतर २ महिने एक Testing Course केला . तरीही काही जमेना (इकडे साऊथ मधे खिरापती सारखे मार्क वाटतात , इंजिनिअरींग ला ९० % ?) मग Predac करून पुण्यात C-Dac करायचे ठरले . त्यानंतर तिला नोकरीही पुण्यातच मिळाली होती . मग मी Product Company सोडून पुण्यात एका छोट्या कंपनीत आलो , आणी गेले १.५ वर्ष तिथेच आहे . बेंगलोरला जायच म्हट्ल तर designation , salary यात प्रचंड फरक मिळू शकतो . (Salary मधला फरक तर तिच्या Salary च्या २-२.५ पट आहे ) पण ती जॉब मधे खूश आहे (३ वर्षे राबल्यावर मिळालाय ) यातच खरा आनंद आहे
अर्थात घरकामात आमची मदत शून्य असल्याने (किंवा ०.००००००००००००००००१) it evens out !!!
केदार, पोस्ट आवडली.
केदार,
पोस्ट आवडली.
छान धागा ! प्रयत्न करतो !
छान धागा ! प्रयत्न करतो !
केदार, चांगली पोस्ट
केदार, चांगली पोस्ट
केदार, छान पोस्ट! आणि मस्तं
केदार, छान पोस्ट!
आणि मस्तं धागा!
केदार, पोस्ट आवडली
केदार, पोस्ट आवडली
धागा आवडला. शाब्बास केदार!
धागा आवडला.
शाब्बास केदार!
पोस्ट आवडलं केदार.
पोस्ट आवडलं केदार.
केदार, पोस्ट आवडली
केदार, पोस्ट आवडली
धागा आणि केदारची पोस्ट दोन्ही
धागा आणि केदारची पोस्ट दोन्ही आवडले.
आम्ही दोघे पती पत्नी नोकरी
आम्ही दोघे पती पत्नी नोकरी करणारे आहोत. लग्न होऊन १२ वर्षे झालीत. एक मुलगा आहे. माझी ऑफिसला निघायची वेळ ९.४५, तिची ११.०० सकाळ होताच दोघेही कामाला लागतो. ती घरे झाडुन घेते मी घड्या करतो. आताशा तिला वात असल्यामुळे मी मधे घरे सुध्दा झाडुन घेत होतो, सडा, रांगोळी सुध्दा करतो. मग चादरीच्या घड्या वगैरे झाल्या की सरळ चहापान झाले की थोडावेळ बाहेर दोघेही बंगळीवर बसतो. ती भाजी चिरत बसते, निवडायचे असेल तर दोघेही निवडतो. पेपर वेळेवर आलातर वाचन नाहीतर सर्ळ आंघोळीला रवाना होतो. आंघोळी नंतर रोजचे कपडे धुवून वाळ्त टाकतो. मग किचनचा ताबा घेतो. सरळ कुकर लावुन भाजी फोडणीला टाकतो. मग जप, पोथी आटोपतो तो पर्यंत कुकर शिट्ट्या मारत बसतो. व भाजी पण शिजते ती आंघोळीवरुन येई पर्यंत. अर्धा स्वयंपाक मीच आटपत असतो. पोथीपुराण झाले की थोडा पेपर वाचत बसतो बसतो कसता, पेपर हातात घेत नाही तर हिचे आपले अहो$$ अहो$$ चालुच असते. मग नैवेद्य काढुन दाखविला की जेवन करुन ऑफिसला पळतो. हा झाला नित्यक्रम.
शनिवारी मला सुटी असते. तिची शाळा सकाळची असते. आई जर घरी नसेल, बाहेरगांवी गेली असेल तर पुर्ण स्वयंपाकाचे काम मीच पार पाडतो. ती १.३० ला येते मग जेवण करुन निवांत पहुडाव तर हिचे आपले अहो दळण संपले निवडायचे आहे. काढुन द्या. काढुन दिल्यावर निवडायला सुध्दा हातभार लावावाच लागतो. शिवाया एकदोन आठवड्यात स्वताचे शर्ट्-पँट हे कपडे पण धुतो. सध्या तिचा आग्रहा आहे वॉशिंग मशीन घेण्याचा पण मला ते साधन नको. मी म्हटले नकोच ती अडगळ . मी कपडे धुत जाईत.
मुलाचा अभ्यास मात्र ती घेते. ती पेशाच शिक्षकी असल्याने. राहीला प्रश्न तीच्या आवडीनिवडीचा. लग्नापुर्वी ती संगीत उपांत्य विशारद होती. मी तिला ते पुर्ण करण्याबद्दल वारंवार सुचवित होतो. गेल्या २ महिन्यापासुन तीने पुन्हा क्लास लावला आहे. ती वेळही सायंकाळची आहे. मी घरी पोहोचताच ती क्लालसला रवाना होते. मग सायंकाळचे देवापुढे, तुळशीपुढे दिवे लावायचे कामही मीच करतो. (आता सवयीचा भाग झाला असल्याने लाजायचे कारण नाहीच)
मधात लायब्ररी सासन्स करायचे होते, तेही तिला करु दिले. त्यामुळे तिच्या हौसेत मी फार अडथळे आणत असेल असे मला वाटत नाही. राहीला प्रश्न सिनेमाचा तो माझा सर्वात कंटाळवाना विषय आहे. मी चित्रपट पाहायच्या ऐवजी लायब्ररी किंवा बगीच्यात बसणे पसंत करेल. पण ते चित्रपट नको असे तिला म्हणतो यावरुन कधी खटकेही उडतात. मग मुलाच्या आग्रहाखातर एखादा चित्रपट पाहतो.
बाहेर फिरण्याची (सहल) आवड दोघांनाही आहे. पण वेळ ताळमेळ जुळत नाही त्यातुनही एकमेकात वाद होतात. पण दोघेही एकमेकांचे मन शांत करण्यात यशस्वी होतो. असा सुरळीत संसार आहेच पण तरी ही (देख तेरे संसारकी क्या हालत हो गई भगवान कितना बदल गया ईन्सान :P)
केदार प्रामाणिक पोस्ट आहे
केदार प्रामाणिक पोस्ट आहे तुमची.
कुलकर्णी, बंगळी म्हणजे काय? ओटा वगैरे असे का? तुमचीही पोस्ट आवडली.
बंगळी म्हणजे जुन्या काळात
बंगळी म्हणजे जुन्या काळात घराच्या कड्याला साखळीने लटकविलेली सुबक फ्ळी पण ती बाहेर अंगणात बसवली आहे.
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
रैना , शुभांगी , भानुप्रिया ,
रैना , शुभांगी , भानुप्रिया , वरदा , साती , वैजयंती , जाई , मी नताशा , शैलजा ,
धन्यवाद
पण खर सांगायच तर यात सगळ्यात महत्वाची होती (आणी आहे) तिची जिद्द्द . जे कष्ट तिने नोकरी मिळण्यासाठी ३ वर्ष घेतले आहेत, जो त्रास सहन केलाय , तो मी अगदी जवळून पाहिलाय .तिच्यातली नोकरी करण्यासाठीची इच्छाशक्तीच इतकी प्रचंड प्रबळ होती , म्हणूनच ती हे करू शकली . आणी सगळ्यात महत्वाच म्हणजे तिने तिच्या इतरांशी वागण्यात हे कधीच जाणवू दिल नाही . त्यामुळे तिला त्याच मोल काय आहे हे मला चांगलच माहितेय . त्यामुळे त्यासाठी एवढी छोटी तडजोड करायला काहीच वाटत नाही .
केदार, पोस्ट आवडली. सर्वांना
केदार, पोस्ट आवडली.
सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
फार छान केदार... खूपच छान!
फार छान केदार... खूपच छान! अगदी मनापासून लिहिलं आहात. आत्ता संसाराच्या गरजेपुरतं दोघे मिळून मिळवत आहातच. अधिकचा पैसा काय, आज नाही उद्या मिळवता येईल. तसंही, तो कितीही मिळवला तरी कमीच वाटतो. तुमच्या दोघांचं समाधान, आनंद आणि प्रेम हे जास्त महत्त्वाचं. तुम्हा दोघांनाही मनःपुर्वक शुभेच्छा!
महिलादिनाच्या सर्वांना
महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आज माझे वडील विश्वनाथ बिर्जे यांच्याबद्दल लिहावंसं वाटतंय.. त्यांच्या वाट्याला आलेलं त्यांचं पहिलंच अपत्य,मुलगी, पायात जन्मदोष घेऊन आलेली. या अपत्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं.तिची पहिली अकरा वर्षे मोठमोठ्या सर्जरीज्,हॉस्पिटल्स,ट्रीट्मेंट्स यातच गेली.एका साध्या पण पराकोटीच्या तत्त्वनिष्ठ शिक्षकाने हे आव्हान पेललं.आपली सारी प्रमोशन्स वगैरे सोडून गिरगावातील शाळेतून आल्यावर मुलीला घेऊन कधी व्ही.टी.,कधी हाजीअली,उन्हातान्हातून,वर्षानुवर्षे,न कंटाळता.
आपल्या इतर दोन अव्यंग मुलांपेक्षा तिच्यावर जीव पाखडत,तिला सर्वार्थांनी स्वावलंबी,हुशार,सक्षम कलासक्तही करण्यात जीवन गेलं..घरातल्याही कामात सहभाग,लहानपणीच स्वतःची आई गमावलेली असल्याने स्त्रियांबद्दल परम करुणा,वाचाळ नव्हे तर क्रियाशील .
बाबा, लव्ह यू,मिस यू.. याला समानार्थी शब्द पटकन सापडत नाहीत.
मस्त धागा! मंजूडी +१००००
मस्त धागा!
मंजूडी +१००००
मस्त धागा!
मस्त धागा!
छान धागा.. केदारची पोस्ट
छान धागा..
केदारची पोस्ट आवडली.
सुरेख धागा ! घरात आम्ही दोघेच
सुरेख धागा !
घरात आम्ही दोघेच असल्यामुळे सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे तिला पुरेसा वेळ देणे. माझ्या कामाच्या अनियमीत वेळापत्रकामुळे ते फारसे शक्य होत नाही. त्यामुळे आता माझा शनीवार-रवीवार पुर्णपणे तिच्यासाठी राखीव असतो. (त्यामुळे ट्रेकींग, सायकलींग , कट्टे, गटग वगैरे गोष्टींना मुकतोय, पण तिला वेळ देवु शकतोय हे जास्त महत्वाचे आणि आनंददायी असते)
कामांच्या बाबतीत मी तसा बर्यापैकी आळशीच असल्याने माझी मदत तशी कमीच होते तिला. पण तरीही काही प्रमाणात वाटणी करुन घेतलेली आहे आम्ही. बाहेरची कामे सगळी माझ्याकडे असतात. मग यात बिले भरणं, भाजी, किराणा आणणं, कपड्यांना इस्त्री करणं यासारखी कामे येतात.
स्वयंपाकघराचा ताबा पुर्णपणे तिच्याकडे असतो. माझ्याकडे काम फक्त सकाळी उठल्यावर दाराला अडकवलेली दुधाची पिशवी आत घेणं आणि ते गरम करून ठेवणं. तसा शनीवार-रवीवार मी स्वयंपाकघरात लुडबुड करायचा प्रयत्न करतो, पण फक्त लुडबुडच. कारण मी केलेला स्वयंपाक फक्त मीच खाऊ शकेन बाकी मग मी भाज्या कापून द्यायच्या, तीने शिजवायच्या/करायच्या. कांदा कापणे, टोमॅटो ई. कामे माझ्याकडे असतात. चहा मात्र मला तिच्याच हातचा लागतो कारण आता आई सोलापूरी असते आणि दुसरीकडे ती चव मिळत नाही. आणि मी नशिबवान आहे की लग्न झाल्यापासून आई जरी जवळ नसली तरी चहाच्या, जेवणाच्या चवीत कसलाही फरक पडलेला नाही. रादर माझी पत्नी आईपेक्षाही जास्तच सुगरण आहे. अर्थात तिच्या सतत नवनवीन काहीतरी करत राहण्याच्या सवयीमुळे माझा गिनीपिग होतो खरा, पण आजपर्यंत तरी कधी मला त्याचा पश्चाताप झालेला नाही.
गेल्या वर्षी तीने तिच्या बहिणीसमवेत एक छोटासा उद्योग सुरु केला आहे. "समर्थ गृह उद्योग"
सिल्व्हर कोटेड वस्तु विकण्याचा. सुरुवातीला माझा वाटा फक्त प्राथमिक भांडवल पुरवणे इतकाच होता. पण आता त्यांचा उद्योगात बर्यापैकी जम बसलेला असल्याने मग थोड्याफार प्रमाणात मार्केटींग करणे, उद्योगाचे 'फेसबुक पेज' सतत चेक करुन तिथल्या इन्क्वायरीजना उत्तरे देणे, संपर्क साधणे. मालाची डिलीव्हरी करणे, डिस्ट्रीब्युटर कडून माल आणणे, कधी कधी ग्राहकांबरोबर निगोसिएशन्स करणे असली सटर फटर कामे मी करत असतो. (अर्थात तिच्या बहिणीचा नवराही या कामात मदत करतोच. सगळ्या खरेदी-विक्रीचा, नफ्या-तोट्याचा हिशोब ठेवणे. सगळ्या गोष्टींचे संगणकावरील डेटाबेस सतत अपडेट करत राहणे ही कामे प्रसाद(तिच्या बहिणीचा नवरा) करतो.
जरा रिक्षा फिरवून घेतो
या शिवाय त्या दोघी कुठल्या ऑर्डरसाठी, किंवा निगोसिएशन्ससाठी बाहेर गेल्या असतील किंवा जेव्हा त्यांची एक्झीबिशन्स असतात अशा वेळी तिच्या बहिणीच्या रुपालीच्या दोन मुलींना सांभाळण्याचे काम आमचे असते.
घरातील तिचा सहभाग म्हणलं तर , तसं बघायला गेलं तर सगळं तीच करते. मी फक्त लुडबुड करत असतो. अगदी सकाळच्या चहापासून ते स्वयंपाक, माझा रोजचा डबा करणे वगैरे. तीचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे माझ्या लुक्सबद्दल, माझ्या कपड्यांबद्दल ती प्रचंड जागरुक असते. माझा लग्नाआधीचा कपड्याचा चॉईस आणि आताचा चॉईस यात जबरद्स्त फरक आणि अर्थातच सुखावह फरक आहे.
खुप पुर्वी तिच्यासाठी म्हणून एक कविता केली होती. मायबोलीवर असेलही कदाचीत....
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा इथे देतोय.
कृतज्ञ
नाति चरामीचा मंत्र जपत
मी तुझा हात हातात घेतला,
आई-बाबांच्या उंबर्याची चौकट ओलांडुन...
तु माझ्या आयुष्यात आलीस आणि वर्तुळ पुर्ण झालं!
तसा मी आधीही होतोच गं...
पण एक कबुल करायलाच हवं,
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभलं...!
सदैव पॉझिटिव्ह्-निगेटिव्हच्या...
निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी,
तुझ्या येण्याने मला लौकीकाचं भान दिलं...!
तु मला काय काय दिलंस ?
याचा हिशोब करणं सोडून दिलय मी,
तसंही तारे मोजणं नाहीच जमलं मला कधी ...!
मान्य आहे मला पुर्णपणे...
अगदी तुही स्वयंभू नाहीयेस ते, पण...
तुझ्या असण्याने माझ्या असण्याला ’अस्तित्व’ दिलंय...!
खरं सांगु..., अगदी मनापासुन...
लोक भलेही तूला माझी अर्धांगी म्हणोत...
पण माझ्यासाठी मात्र तू माझं पुर्णत्व आहेस...!
मायबोलीवरील आणि एकुणातच सर्व स्त्री-शक्तीला मनापासून मानाचा मुजरा आणि अभिवादन.
विशाल
सही रे विशाल !!
सही रे विशाल !!
हाईला! विकुंनी महिलादिनासोबत
हाईला! विकुंनी महिलादिनासोबत व्हॅलेंटाईन डे पण साजरा करून घेतला
छान मनापासून लिहिले आहेस विशाल. आवडले. सायलीला प्रत्यक्ष भेटले आहे, बोलले आहे. शांत, साधंसरळ व्यक्तिमत्व आहे.
रीक्षा फिरवलीस तेही बरे झाले. मायबोलीकरांचे असे बरेच उद्योग आहेत, जे माहितीच नसतात/ कळतच नाहीत. आवश्यकता भासेल तेव्हा तुला नक्कीच फोन करेन.
खरं सांगु..., अगदी
खरं सांगु..., अगदी मनापासुन...
लोक भलेही तूला माझी अर्धांगी म्हणोत...
पण माझ्यासाठी मात्र तू माझं पुर्णत्व आहेस...!
वा!
मस्त लिहिलंय विशाल.
मुक्तेश्वर, तुम्ही खूप मदत करताय आपल्या पत्नीला. अभिनंदन. (प्रतिसादाला थोडा विनोदी बाज देण्याच्या प्रयत्नात मदतीऐवजी जबरदस्तीने काम करताय अशी शंका येते. पण ते तसे नाही याची खात्री आहे ). म्हणूनच तुमचे अभिनंदन.
खरंच, तुमच्या तिघांचे प्रतिसाद मस्त आहेत.
अरे वा. खरेच छान वस्तू आहेत.
अरे वा. खरेच छान वस्तू आहेत. पूजा थाली आवडली. आणि केदार, मुक्तेश्वर विशाल प्रतिसाद यांचे प्रतिसाद पण. चांगले विचार आहेत तुमचे. कविता पण अगदी सुरेख आहे विशाल.
सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या समस्तांस शुभेच्छा.
विकु, केदार जाधव, मुक्तेश्वर
विकु, केदार जाधव, मुक्तेश्वर कुलकर्णी तुमच्या पोस्ट मस्त आहेत.
विशाल, शक्य झालं तर मराठी उद्योजक मधे एक वेगळा धागा काढून तिथे ही माहिती लिही ना.
नमस्कार. मी आणि माझी पत्नी
नमस्कार.
मी आणि माझी पत्नी दोघेही वर्किंग आहोत. माझे काम संध्याकाळी ६ ते २ असते. मी घरुनच अमेरिकन EDT 7:30am to 3:30PM काम करतो. ती दिवसा ९-६ कामावर असते.
.
सकाळी ५ वा तिचा दिवस सुरु होतो. आम्ही दोघे, दोन मुले आणि माझे वडील घरी आहोत. त्यांचे जेवण, नाश्ता ती बनवते. मुलाना स्कुल बस मधे बसवण्यापर्यंत ती करते आणि मग ऑफीसला जाते.
मग माझा दिवस सुरु होतो. सकाळची भांडी क्लीन करतानाच मी वॉशिंग मशिन लावतो, पाणी भरुन ठेवतो, आंघोळीचे पाणी तापायला लावतो. भांडी होइपर्यंत पाणी भरले जाते आणि पाणी तापते. मग आंघोळ, पुजा इ. होइपर्यंत कपडे धुऊन तयार होतात. ते वाळत घालतो. मुलागा शाळेतुन १२ वा आणि मुलगी ३ वा येतात. काही बँकेची कामे इ असतील तर ती मला १२ च्या आत किंवा १-३ मधे संपवावी लागतात.वडीलाना आणि मुलाला जेवण वाढुन देणे नंतर ती भांडी आणि आवराआवर करणे होते. त्यानंतर दुपारी मुलीला आणल्यावर तिचे टीफीन वगैरे क्लीन करणे. तिला/मुलाला/वडीलाना दुपारी काही खायला देणे इ झाले की आरामात बसुन सी एस आय किंवा सध्या स्टार उत्स्व वर महाभारत सुरु आहे.ते पाहतो. तोपर्यंत सहा वाजलेले असतात मग वीपीएन ला कनेक्ट करुन माझे काम सुरु होते.
तोपर्यंत ती येते मग संध्याकाळचे मुलाना वाढुन देणे, स्फाई इ. ती पाहते. आणि चक्र कंटिन्युज,
आम्ही अमेरिकेला असताना आम्ही मिळुन निर्णय घेतला होता की ती घरी राहुन मुलांकडे लक्ष देइल आणि मी काम करेन.
इथे परत आल्यानंतर एक्स्पीरीअन्स मधे गॅप आल्यामुळे तिने पुण्याच्या एका इंस्टिट्युट मधुन एक रीफ्रेशर कोर्स केला , ISTQB certification केले त्यानंतर कोणाच्याशी शिफारशी किंवा ओळखीशिवाय एका कंपनीत मुलाखत दिली आणि सिलेक्टही झाली. आता तिला एक वर्ष पुर्ण झाले आहे. हे सगळे तिने स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर मिळवले. आणि हे सगळे करताना मुलांकडे किंवा कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष झाले असेही नाही. सगळ्याना सांभाळत हे यश तिने मिळवले. हे संपुर्ण तिचे आहे. तीने पुढेही CSQA, PMP certifications करावी ही माझी इच्छा आहे आणि ती त्यासाठी प्रयत्नशील आहे.
एकदा "आपले घर" असे आपण म्हटले की आपल्याला जमेल तेवढे आपण करत जावे. आपल्या घरासाठी कुठलेही काम करताना लाज वाटायला नको किंवा आपण काय ओझी उचलत आहोत ही भावनाही असता कामा नये. मी जे करतो आहे/करते आहे हे माझे नियमित कामच आहे हे एकदा पक्के मनात बसले की मग आपण जे काय करतो त्याचे श्रम जाणवत नाहीत आणि कामात मजा येते.
सगळ्या स्त्रीवर्गाला स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Pages