१.
..........भरधाव धावणार्या गाड्यांमुळे अंगावर उडणारे चिखलाचे पाणी चुकवत, पावसाच्या दिमाखदार तडाख्यापासून स्वतःला कसंबसं वाचवत, एका हाताने छत्री तर दुसर्या खांद्यावरची पर्स सांभाळत पदर गच्च लपेटून शेवटी तिने रस्ता ओलांडला...
ह्या सार्या कसरतीत तिची प्रसन्न अबोली रंगाची साडी मात्र पार गुडघ्यापर्यंत भिजली.. त्या लाडक्या साडीवर अवतरलेली चिखलाच्या थेबांची नक्षी निरखत ती बस स्टॉप वर पोहोचली...
तुरळक माणसं वगळता आज स्टॉप तसा रिकामाच. त्या पत्र्याच्या छपराखाली ती जरा विसावली, इथं उभं राहून फार पावसाचा मारा चुकत नसला तरी थेट डोक्यावर जलधारा येत नव्हत्या...
समोरचं, डावी उजवीकडचं काहीही दिसू नये, असा पावसाचा पांढुरका पट्टा सर्वत्र व्यापून उरला.. तिनं अलगदच पर्स उघडून रुमाल काढला आणि सावळ्याश्या तुकतुकीत चेहर्यावरचे, काळ्या- कुरळ्या कुंतलावरचे थेंब टिपून घेतले.
हातावरचं घड्याळ 'अजूनही साडे-पाच वाजलेलेच कसं दाखवतं आहे, साडेपाचला तर मी ऑफिस सोडलं' असं काहीसं पुटपुटत तिनं डावं मनगट, डाव्या कानाशी नेलं तेव्हा पाणी जाऊन घड्याळ थांबल्याचं तिला जाणवलं ..
'अरे देवा, आता वेळेची गणितं चुकणार सगळी' म्हणत कुणाला वेळ तरी विचारावी ह्या उद्देशानं तिनं वर पाहिलं तर काही वखवखलेल्या नजरा तिच्यावर टिकून असलेल्या.. ताबडतोब चेहरा वळवून तिनं नजर उगाच कुठेतरी गुंतवली, बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते आता.
डावीकडून आलेले लाईटचे झोत आणि कचकचून वाजलेल्या ब्रेकनिशी एक बेस्ट ची बस येऊन उभी राहिली, कंडक्टर कनवाळू असावा, ह्या पावसात बस वरची पाटी दिसायची नाही स्टॉपवरील लोकांना असं काहीसं वाटून 'चर्चगेट, चर्चगेट' असा घोगरा आवाज पावसाच्या घनघोर आवाजाला चिरत विरला.
.. 'ही देखील आपली बस नाही' म्हणत, पुढे टाकलेलं पाऊल मागे घेत, ती होती त्या जागी स्थिरावली आणि वखवखलेल्या नजरांना मात्र नाईलाजानं प्रस्थान करावं लागलं...!
तिनं सुटकेचा नि:श्वास टाकला, पण आता बसस्टॉप पूर्वीपे़क्षाही भयाण भासू लागला, सांजेने आपली वळकटी कधीच काळ्या ढगांमागे गुंडाळून ठेवल्याने अंधार दाटणं स्वाभाविक होतं!
छपरावरच्या पागोळ्यातून गळून खाली लयीत आपटणार्या संततधारेकडे पहात तिची नजर शून्यात गेली...
'हे असं एकटं, इथं उभं राहण्याची, फिरण्याची सवय नाहीये का?
नोकरी करत असल्यापासून एकटीनं येणं- जाणं, मुंबईचा बेभान पावसाळा सारं काही सवयीचं आहे, मग आज वेगळं का वाटावं सगळं! मघाच्या त्या नजरा तर जणू जीवनाचाच एक वेगळा न करता येणारा भाग, त्यावर विचार करावा असं आता काहीच नाही..
बस येईल बहुधा आता, नाहीतर येणारही नाही, मग नाक्यापर्यंत पायी जाऊन रिक्षा किंवा टॅक्सी, पण पावसाने जरातरी उघडावं.. आज स्वयंपाक नकोच जरा, नाहीतरी घरी कुणी नाही... काहीबाही खाऊन लवंडावं लवकर! दिवसभराची दमणूक झाल्याच्यानंतर....'
... हवेच्या जोरदार झोताबरोबर पावसाच्या तुषारांचा शिडकावा चेहर्यावर होताच विचारांची साखळी तुटली.. आता मिट्ट अंधारलं होतं!
तिला मगाचपासून उजवीकडे दूरवर एक प्रकाशझोत दिसत होता.. तो स्थिर असल्याने, एखादी कार तिथे उभी असावी हे तिनं ताडलं. तो झोत आता अगदी जवळ आला... 'ही एखादी टॅक्सी असेल तर किती बरं' अशा विचारानिशी ती अपे़क्षेने त्या गाडीकडे टक लावून होती.. ती गाडी स्टॉपजवळ येऊन थांबली.. पावसाच्या रणधुमाळीत ती एखाद्याची कार आहे की टॅक्सी हे तिला समजेना.. पण ती गाडी थांबून पाच मिनिटे झाली तरी हालचाल काही दिसेना...
तशी ती अस्वस्थ झाली .. आपण आपले छत्री उघडून चालते व्हावे, नाक्यावर जावे उद्देशाने ती सावरली, पदर नीट लपेटून घेतला, खांद्याला अडकवलेली पर्स काखेत गच्च धरली, छत्री उघडणार इतक्यात, त्या गाडीतून मोठ्या काळ्या छत्रीतून एक सावली पुढे आली.. खूप पुढे... अगदी त्या स्टॉपच्या समोरून तिच्या दिशेने पुढे.... तिच्या जवळ... येत गेली...
आता तिच्या सर्व हालचाली थंडावल्या होत्या... त्या व्यक्तीला जवळून पाहताच, बुद्धीला ओळख पटली होती ... पण मनाला पटत नव्हतं... त्या व्यक्तीनं 'आपण ओळखीचेच आहोत' असे सुहास्य धारण केलं होतं, त्या हास्यामुळे ती अजून गडबडली होती, मन- बुद्धी- भावना कशाची कशाला सांगड नव्हती, खरे की खोटे ह्याचे भान येण्याआतच तिची शुद्ध हरपली...
"अल्पा, अल्पा....." अशा पुसट, अंधुक हाका ऐकत ती जाणिवे- नेणिवेच्या पलीकडे गेली.
------------------------------------------------------------------------------------
२.
चेहर्यावर हलक्या गरम हवेचा झोत त्यामुळे आलेली ऊब... पापण्या हळुवार उघडल्या गेल्या..
अगदी निश्चिंतपणे डोळ्यासमोरचा अंधार कमी कमी होत गेला... समोर आडव्या काचेला बांधलेलं छोटं खेळणं मंद लयीत डुलत होतं... कानावर खूप आवडीचं कुठलंतरी गाणं पडत होतं... कुठलातरी मंद गंध व्यापून उरला होता..
आपल्याला पूर्णपणे जाग येण्यापूर्वीचे काही क्षण... मेंदूने आपल्या शरीरावर संपूर्ण ताबा मिळवण्याआधीचे ते क्षण....निर्व्याज!
....त्या क्षणांत आपण जिवंत आहोत इतकंच जाणवतं. कर्तव्य, जबाबदार्या, नाती- आपण कोण, कोणाचे कोण, आपलं कोण, चिंता, विवंचना कशा-कशाची म्हणून आठवण नसते.. किंबहुना स्थळाचं काळाचंही भान नसलेले ते शुद्ध क्षण....!
.. अंगावरच्या साडीची ओल जाणवताच परिस्थितीचं भान येत गेलं..
मघाचा सुनसान बसस्टॉप, बंद पडलेलं मनगटावरचं घड्याळ, पावसाचा धुमाकूळ, न मिळणारी बस, एक जवळ येणारा झोत..... एक सावली .. आणि अवि!... अवि?? अवि???
हो अविच!
झटकन सावरण्याच्या प्रयत्नात सीट्बेल्ट ने जखडल्याचं जाणवलं... गाडी अविच चालवत होता.... हे सारं विश्वास ठेवण्यापलीकडचं होतं..
पावसाच्या गारठ्यामुळे त्या बंद गाडीत हिटर लावलेला होता, गरम हवेच्या त्या झोतासोबत मोगर्याचा सुगंध दरवळत होता, रफीची गाणी सुरू होती अन शेजारी, माझ्या शेजारी तेच ओळखीचं हास्य होतं, आश्वासक...खरंच शेजारी अवि होता!! !
"अल्पा, अगदी बेशुद्ध होण्याइतका वाईट दिसतोय का मी आता? " आणि स्वतःशीच हसला तो... दिलखुलास..! हे ही ओळखीचंच होतं ना? मधली आठ वर्ष कुठे आहेत? इतका सहज कसा वागतोय हा?
"मी ह्या गाडीत कशी?"
प्रश्नाला उत्तर म्हणून, पुन्हा तेच हसणं...?
"मी, तुझ्या ह्या गाडीत कशी आले आहे, अविनाश?"
"बापरे, संपूर्ण नाव उच्चारलंस? अजूनही रागातच आहेस?"
काय चाललंय... मी दीर्घ श्वास घेतला.. हे सगळं आता एखाद्या स्वप्नात पाहिल्यासारखं वाटत होतं, तसंही अवि परतून आल्याची लाख स्वप्नं पाहून झाली होती, तुटण्यासाठीच! हे कदाचित त्यातलंच एक असावं... पण त्या स्वप्नांची दखल घेणंच बंद केलंय आपण आता, तेव्हा हा खरंच आला किंवा न आला तर मी शुद्ध हरवण्याइतकं चमत्कारिक का आहे?
"अल्पा, स्वप्नात नाहीस तू, चिमटा घेऊ का एक? बरं इकड्च्या बाजूने उजवीकडे, आत वळल्या नंतरचीच सोसायटी ना?"
ह्याला माझं घर माहिती आहे? माझा फ्लॅट? आम्ही सोसायटीजवळ आलोय म्हणजे मी किती वेळ शुद्धीवर नव्हते? अजून काय माहिती असणार ह्याला? माझ्यासोबत कोण आहेत, किंबहुना मी कुठे काम करते, माझा स्टॉपही माहितीच असावा, उगीच का तो तिथे आला होता? पण कसं?
मी सुन्न झाले... सुन्न सुन्न झाले... आधीच मला ह्याला समोर पाहून काही सुचलं नव्हतं, मुळात, हे स्वप्न की सत्य ह्यातच मी अडकले होते त्यात हे असे धक्यांवर धक्के!!
"तू उतरतेस?"
"अं...?"
"तुझा फ्लॅट ना हा वरती... दुसरा मजला.. ?"
"....."
"तू बोल तर काही, बरं, फ्लॅट दाखवतेस? कॉफी ऑफर करणार?"
"कॉफी?"
"येस, कॉफी? खरं तर तुझ्याशी खूप काही बोलायचंय.. साचलेलं... सांगायचंय, विचारायचंय, तसंही असं भिजलं की वाफाळलेली कॉफी आवडते ना, तुला?"
आता परिस्थितीशी पूर्णतः सांगड घातली होती मी.. कॉफी? संभाषण, संवाद... किंबहुना अविनाश - कितीसा अर्थ उरला आहे ह्या शब्दांना...
"नो मोअर, अविनाश... बाय"
माझ्यातला संताप, उद्वेग ह्या सार्यांची कटुता ह्या शब्दांत उतरल्याचं मलाच जाणवून गेलं.. गाडीच्या बंद होणार्या दरवाजासह मी स्वतःला पुरतं सावरलं होतं... पावसाची तमा न बाळगता मी सोसायटीच्या गेटकडे निघाले..
"अगं पण.... ऐक तर....
अल्पा, अल्पा वेट......."
पाठ आणि मन, दोन्ही वळले की अशा हाका ऐकायला येतात कुठे?
-----------------------------------------------------------------
३.
...कुठल्याश्या तिरमिरीत दोन्ही जिने चढून, फ्लॅट उघडून ती घरात शिरली....
फ्लॅटचा दरवाजा धाडकन् आपटत, थेट आतल्या खोलीत जात पलंगावर तिनं अंग टाकलं....
सगळं शांतच तर होतं...... जागच्या जागीच तर होतं!
हा पलंग, डाव्या हाताचा टेबल, त्यावरचा टेलिफोन, रचून ठेवलेली पुस्तकांची चवड, समोरच्या भिंतीवरचं पेंटीग, उजव्या हाताचं स्वयंपाकघर, सकाळी घाईत निघताना बंद केलेला गॅस, त्यावरचं चहाचं पातेलं, बाकी स्वच्छ भांडी... बाहेरच्या खोलीतला सोफा, त्यावरची निळी अभ्रे, मधोमध बसका गोल टेबल, त्यावरची फुलदाणी, त्यातली रातराणी, एक टेपरेकॉरडर, त्यात आवडीच्या गाण्यांची कॅसेट... ... मोठ्या खिडकीला निळेशार पडदे....
सगळं तसंच आहे... सकाळी निघताना सोडून गेलेलं सगळं, तसंच आहे.....स्तब्ध आहे... मग हा कोलाहल कुठला? की उलथापालथ कुठली? हा विचारांचा कोलाहल..? इतका गजबजाट?
नकोसा प्रसंग आलाच तर कसं वागावं हे सगळं ठरवून, ठरवलेल्या गोष्टीची पारायणे करूनही तो प्रसंग उभा ठाकलाच तर आपण असं गांगरतो...? ठरवून ठेवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणताना असा कसा ताळमेळ हरवतो, मनाचा, बुद्धीशी?
आला अवि... येऊ देत.
आला आणि अगदी ओळखीचा असल्यागत वागला... वागू देत.
का नाही अलिप्त राहता येत, नकोसे प्रसंग घडताना, त्या प्रसंगांपासून?
"आपण" असे रेंगाळतोच कसे तिथे, त्या प्रसंगाचा भाग बनून राहतोच कसे?
अवि ओळखीचा "होता...!!"
अवि भूतकाळ होता, अवि भूतकाळाच आहे.
जसा मत विचारात न घेता निघून गेला होता, तसाच परतही आला.
ह्या गोष्टीचं स्वरूप इतकंच. स्वतःला त्रास करून घेण्यातला फोलपणा स्पष्ट जाणवत असूनही, इतकं का अस्वस्थ व्हावं..
तिच्या मनात विचारांची उलथापालथ होतच राहिली, आणि डोळा लागला.... ग्लानी आली....
-----------------------------------------------------------------
ही ग्लानीच आहे, की आठ वर्षे मागे आलो आहोत आपण... हे काय घर सजलंय... घर कसलं वाडा आहे आपला.. चिखलठाण्यातला मोट्ठा वाडा... !!! किती फुलांनी सजावट झाली आहे... रोषणाईदेखील आहे... गेले काही दिवस वाड्याला जाग आहे.. टक्क अगदी..
आई किती गोड दिसतेय... सारखी तिची लगबग... थोडी म्हणून स्वस्थता नाही...बाबा काहीसे चिंतेत आहेत...
पण अर्धवट जाग आहे बहुधा..... मघाशी नाही का खूप चिडलेल्या आपण वर आलो... आपल्या मुंबईच्या फ्लॅटमधे आलो.. जरा ओलेत्याच आपल्या पलंगावर पडून आहोत बहुधा.. मग हात पाय का हलवता येत नाहीत.... झोप की जाग... मधेच कुठेतरी आहोत... हलकं वाटतंय... चिंता खाली खाली खोल कुठेतरी जाऊन पडते आहे... बरं वाटतंय फार....
आईच्या हातावर मेहंदी छान वाटते ना... सगळे नेहमीसारखे मिळून जेवायला बसलोय... पण आज आपण नेहमीचे चौघे नाही आहोत... किती तरी नातेवाईक आले आहेत.... तिचे मेहंदीचे जेवायला वाढणारे हात फार छान दिसत आहेत.... तिच्या किणाकिणत्या बांगड्यांचा निनाद तर आवडतो किती आपल्याला.. ओळखीचा आवाज तो... आपली मेहंदीही रंगली आहे किती!
बाबा अचानक का चिंतातूर झालेत... माझ्या लग्नाचा ह्यांनी धसका घेतला आहे का फार... पण सगळं तर व्यवस्थित पार पडतंय... प्रेमविवाह असला तरी घरातल्या सगळ्यांची मनधरणी करूनच लग्न आहे हे... बाबांचा पत्रिकेवर फार विश्वास... कुठली तरी आकडेमोड करत बसतात... व्यथित होतात... त्यांच ज्योतिष शास्त्रातलं ज्ञान नकोसं वाटतं मग आम्हांला... आताही जेवतानाचा घासही हातातच आहे... माझ्या मागे कुणावर तरी स्थिरावली आहे नजर त्यांची.... कोण आले आहे?
माझ्या सासरकडचे इथे कसे काय... उद्या कार्यालयात सगळ्यांची भेट होणारच आहे ना... शिवाय मोठं श्रीमंत घराणं त्यांचं... गोष्टी नेटक्या... ठरल्या तशा.. मान-पान हवे असतात किती... मग आज असे हे निरोपही न देता इथे कसे....
अविही आला असेल का, त्याला भेटण्याची हुरहूर कशी व्यापून राहिली आहे गेले काही दिवस... तब्बल २२ दिवस झालेत आम्ही न भेटून, न बोलून... आता म्हणे भेट लग्नातच...
हे काय सांगत आहेत सासरे माझे...
असा कसा अवि गेला...
परदेशी निघून?
तेच त्याचं बिझनेसचं खूळ... म्हणून निघूनच गेला? उद्या लग्न आहे...
मी इतकी अनभिज्ञ..
मला एका शब्दाने सांगावस वाटलं नाही ह्याला? थेट विश्वासघातच जवळचा वाटला? की हिम्मत कम्मी पडली ह्याची.... की नातंच कमी पडलं.... चार वर्ष एकमेकांना समजून नाहीच घेतलं म्हणजे... काय केलं मग... नात्याने मान का टाकली...
"हे लग्न मोडलं आहे" ह्या शब्दांचा अर्थ मला कुणी सांगता का समजावून......
_______________________________________
४.
कुणीतरी गदगदून हलवतंय असं वाटलं... जरा आजूबाजूच्या परिस्थीतचं भान आल्यावर कळलं की कर्कश्शपणे टेबलावरचा फोन वाजतोय...मी कशीबशी धडपडत उठले आणि फोन उचलणार तेवढ्यात तो कट झाला... कधीपासूनचा वाजत होता, कुणास ठाऊक...
भूतकाळातल्या घटना मनावर रेंगाळताना कधीतरी खरंच डोळा लागला आणि अशी ही जाग आली ...
गादीवर उठून बसले, जरा उशी उभी करून पलंगाच्या काठाला टेकून... मनावर ताण जाणवत होताच... आठ वर्षांपूर्वी घडून गेलेल्या ह्या घटनांचा पगडा आपल्या मनावर आहेच अजूनही, ह्याचं जरा वाईटही वाटतं आहे!
आपण ह्या आठ वर्षांत ख्ररं तर स्वतःला किती सावरलंय... आपला वर्तमान आपल्याला आनंदी ठेवण्यास समर्थ आहे, भविष्याच्या ठोस संकल्पना आहेत.... भूतकाळाला सोबत राखून जगणं नकोय, असं मन पक्कं तयार झालं असल्यानेच बहुधा, अचानक आलेला अवि मला त्रास देऊन गेला. आश्चर्य हे वाटलं की माझ्या शरीरावरचा तोल मेंदूने गमावला, मूर्च्छा आली.. इतकी कमकुवत मी नक्कीच नाही ... मला भूक असह्य झाली असणार, हे काय, गेले कित्येक तास मी काहीही खाल्लं नाही वा पाणीही प्यायले नाही... अंगावरचे कपडेही तेच...
पुरे हे... म्हणत उठले.. बाथरूममधला गिझर लावला... तोवर पायावर पाणी घेऊन थेट स्वयंपाकघराकडे वळाले... भर रात्री दोन वाजता स्वयंपाक... माझे मलाच हसू आले... गेल्या कित्येक तासात 'मी माझी', आता झाले!
ग्लासभर पाणी पोटात रिचवलं... फार बरं वाटलं....
मुगाच्या डाळीची खिचडी!
झटपट...आणि हलकी फुलकी! .. ठरलं...
बाहेरच्या खोलीतल्या टेपरेकॉर्डरमधली कॅसेट सुरू केली..."पिया हो, पिया हो पिया कुछ बोल दो......." सुंदर संगीताने मन प्रसन्न झालं...
साजूक तुपावर जिर्याच्या फोडणीचा सुवास पसरला...सामुग्री टाकली... आता शिट्ट्या होऊ देत...
तोवर छान फ्रेश झाले.. फार मोठ्या मानसिक उलथापालथी नंतर असं एखादं गाणं, गरम पाण्याचं स्नान आपल्या चित्तवृत्तींवर सुखाचा ताबा मिळवून देतोच...
अहाहा,
सुमेघला आवडेल अशी खिचडी झाली आहे... मघाशी त्याचाच फोन होता का? पण असा रात्री अपरात्री फोन करणार्यातला तो नाही..
की, अविनाशला माझा नंबरही मिळाला आहे??
असू देत... ज्या कुणाचा असेल...त्याला इच्छा असेल तर पुन्हा
हा काय वाजलाच......!!!!!!!
"हेल्लो"
"अल्पा......"
"हां! कोण.... आई???"
"हो बेटा... झोपली नाहीस? आवाज तर तू जागी असल्यासारखाच येतो आहे, काय गं ठीक ना?"
"मी ठीक, तू इतक्या रात्री कसा फोन केला आहेस? बाबा बरे आहेत ना? त्यांना माहिती आहे तू माझ्याशी बोलते आहेस ते?"
"नाही. त्यांना डोळा लागला आहे, गेले दोन दिवसात ब्लडप्रेशरने त्रास दिला आहे ह्यांना, बरीच धावपळ झाली, आज निवांत आहेत, तुझी फार आठवण आली मला अल्पा, न रहावून फोन केला, मला आज फार अस्वस्थ वाटत होतं...उगाच तुझ्याकडे मन लागून राहिलं दिवसभर... आताही जाग आली, तुझीच आठवण आली.. सगळं ठीक ना तिकडे, तुझी तब्बेत वगैरे? "
"आई, मला जरा काही मानसिक ताण असेल तरी ते तुला कसं गं जाणवतं तिकडे?...
अवि परतून आलाय, आई..."
"काय?????"
"हो, उलट उद्या सकाळी मीच तुला फोन करून विचारणार होते, की अविने तुझ्याकडून माझा मुंबईचा पत्ता मिळवला आहे का ते.. तर तुझाच फोन आलाय"
"काय ठरवलंस अपू"
ही अशी हाक म्हणजे हिला चिंता लागलीच समजायची...
"काय ठरवायचंय आई?"
"सुमेघला कळालं आहे का, अविबद्दल?"
"आई गं, हे सगळं काल संध्याकाळी झालं आहे... त्यात मी घरी आले आणि मला जो डोळा लागला ते थेट फोन वाजल्यानेच जाग आली, काहीही खाल्लं नव्हतं मी, ऑफिसच्या कामांमध्ये गुरफटल्यामुळे, हे बघ आत्ता कुठे मुगाची खिचडी खाते आहे... . त्यात काल ऑफिस सुट्ल्यानंतर पावसाची रीघ, हे अविचं प्रकरण.. ताण झाला.. सुमेघ बरोबर गेले दोन दिवस माझं बोलणं देखील नाही...थोड्यावेळापूर्वीही तुझाच फोन होता का?"
"माझा? नाही, मी आता केला, आणि तू लगेचच उचललास ना... "
"हो, बरं"
"बाई माझी, काय ठरवलंस, एक सांगू अल्पा, आलाय ना अवि परत, आता तरी संसाराला सुरूवात करा"
"तू बरी आहेस ना, आई? कुठला संसार, आणि का? तुला माझे सगळे निर्णय व्यवस्थित माहिती असताना हा असा सल्ला तू द्यावास? उद्याच मी सुमेघला भेटण्याचा प्रयत्न करेन, माझ्या हालचालींचा वेग आता मी वाढवायला हवा"
"अपू, किती ताणतेस गोष्टी, कुणाचं म्हणून ऐकत नाहीस... तुला संसाराला लागल्याचं पहाणं स्वप्न होतं ह्यांचं... तू तिरसट का वागतेस... का असे सगळे एकांगी निर्णय तुझे?"
"आई, मी निर्णय बदलला, तर बाबा माझ्याशी बोलतील?? याल तुम्ही दोघे माझ्याकडे रहायला, तो पडत आलेला वाडा सोडून?"
"बाळा, तुझा संसार थाटला जाणार असेल तर आम्ही तुझ्याकडे कसे येऊ, बाबा बोलायला लागतील तुझ्याशी.... मी समजावेन.. तू संसाराला लागावीस हाच हट्ट आहे त्यांचा"
"आणि त्याच हट्टापायी, मी खूप गमावलंय आई! मला सांग आज असा बाबांना त्रास झाला कोण आहे तुझ्या सोबतीला.. एकटीच धावलीस.. वाईट वाटतं मला"
"ते जाऊ देत, आम्ही घेतो आहोत आमच्या तब्बेतीची काळजी, तू जप स्वतःला... नोकरी सोडण्याचं काय झालं?"
"आई, आताच हे सगळं बोलायचं आहे का, मी दमले गं आज फार... खूप वेडा वाकडा दिवस गेला माझा. मला नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नाहीच, पण असं तडका- फडकी नाही करता येणार हे सगळं... आधी पुढची सगळी तयारी हवी, माझ्या नव्या बिझनेस मधे जरा जम बसायला हवा, मगच पाहू, ह्या सगळ्यात सुमेघची खूप मदत होते आहे आई... "
"तसा तो आहे धडपड्या, पण त्याच्या हाती काही ठोस नाही, तोवर तुमचं भविष्य अधांतरीच असणार आहे, तुझे निर्णय त्याच्या भविष्यावर अवलंबून.... अपू.. कधी सुटेल हा गुंता सगळा?"
"आई, एक ऐक.. बाबांच्या तब्बेतीमुळे, तुझी फार धावपळ झाली आहे... तेव्हा आता निवांत झोप... चिंता करायला आम्ही आहोत ना...मी येईन लवकरच तुला भेटायला..."
"खरंच?"
"हो"
"बरं, झोप तूही.... अविनाशचं काय ते ठरव... फक्त त्याचा त्रास करून घेऊ नकोस... त्याला म्हणावं झाली तेवढी फरपट पुरे"
"क्षणात म्हणतेस त्याच्याबरोबर संसार थाट, क्षणात असं.... असो... तू झोप... बाबा उठतील"
"हो... काळजी घे बाळा"
उष्ट्या ताटावरून घासणीचा हात फिरवून, टेपमधली कॅसेट बदलून मी झोपायला निघाले... मंद आवाजात मुकेशची गाणी घरात व्यापून राहिली...
माझ्यापासून दिवसाला मी वेगळं करण्याच्या प्रयत्नात पडून राहिले....घरभर काळोख केला होता... कानावर आवडीची गाणी पडत असताना अशा घनगर्द काळोखाकडे बघत रहायला मला आवडतंच नेहमी...
मिट्ट काळोखाकडे एकटक पाहिलं की नजरच हरवते... दिवसा उजेडी त्रस्त करणारे प्रश्न काळोखाशी मात्र सलगी करतात.... आपल्या चिंतांना वलयंच नसतात की ह्या काळोखात ती लुप्तं होतात, समजत नाही!!
मग सारी ध्येयं अगदी परिघात आल्यागत वाटतात.. ध्येय समजूतदार होतात, की परीघ रुंदावतो? सारं सोपं आणि आपल्या आवाक्यात असल्याचा भास, डोळ्यांची झापडं लाऊन जातो.... निद्रेच्या उबदार कुशीत आपल्याला आणि आपल्या प्रश्नांना सोपवून.....
दुसर्या दिवशीची सूर्याची किरणं मात्र निजलेल्या प्रश्नचिन्हांना टक्क जागी करून जातात...!!!
_______________________________________________________
काल रात्री आईचा फोन येण्यापूर्वी भर रात्री दोन वाजता कुणाचा फोन होता?
येत्या काही दिवसात राजीनामा द्यावाच का? हाती घेतलेल्या नव्या प्रोजेक्ट्चं काय?
आपल्या रेक्झिनच्या बॅग्ज बनवण्याचा व्यवसाय जोम धरतोय, रेग्झिन महागण्याआधी स्टॉक करण्यासाठी बोलावलेले वेंडर्स अव्वाच्या सव्वा दाम मागतील का?
सुमेघने माझ्या पेपर्सवर काम सुरू केलं असेल एव्हाना......?
------------------------------------------------------------------------------------
५.
इन मिन चार तासांची अपुरी झोप... त्यात वेळेत ऑफिस गाठण्याची घाई.... मनातले सारे प्रश्न झटकून ती तयारीला लागली.... 'डबा नकोच आज' असा निष्कर्ष सोयीचा होता... भराभर आवरून ती तिच्या खोलीत आली...
कपाटातून फिक्या जांभळ्या रंगाचा, त्यावर पांढर्या फुलांची, वेलींची नक्षी असलेला पंजाबी ड्रेस तिने काढला... पावसाळयातल्या दिवसांत असे रंग तिच्या गव्हाळ कांतीला आणखी सुशोभित करणारे.... कुरूळ्या केसांना ढीलासा क्लीप लावून, टपोर्या डोळ्यांत काजळाची रेघ ओढून, पर्स उचलून, पायात सँडल्स सरकावल्या.. घरावर एकवार नजर टाकून तिने मुख्य दरवाजा ओढून घेतला.... लॅच लागल्याची खात्री झाली... धडधडत जिने उतरून जाताना "आता घराची भेट बारा तासानंतर.." असं नेहमीचं वाक्य पुटपुटत रिक्षेच्या शोधात निघाली.....
--------------------------------------------------------------------------
"मिस देसाई, मिस्टर रामनाथन इज काँलिंग यू इन हिज केबिन...."
ऑफिसमधे पाय टाकताच तिच्या सहकारी मित्राने दिलेला निरोप... हातातली पर्स तशीच टेबलवर ठेऊन ती आत गेली...
"सर...."
"ओह येस, कम कम मिस देसाई... वान्ट टू डिसकस समथिंग... प्लीज हॅव अ सीट"
"येस सर... टेल मी प्लीज..."
"तुम तो जानती हो, अपनी कंपनी में नया मॅनेजमेंट टेक ओव्हर कर रहा है, अॅडमीन डिपार्टमेंट मर्ज होगा, तुम चिफ अॅडमीन हो, रिसपॉन्सिबिलीटी बढेगी, बिझनेस एक्स्पान्शन इज नॉट इजी मिस देसाई"
"आय नो, सर"
"तुम्हारा प्रोफाईल अब ऑर टफ होगा, शायद लेट सिटींग भी करना पडे. लेकीन इस मर्जींग से कुछ पुराने लोग खुश नही है... वोह जाना चाहते है इस कंपनी को छोडकर... उसमे आपके टीम के कुछ लोग भी जा रहे है..."
"माय टीम मेंबर्स? दिस इज अ न्यूज टू मी..."
"हां, यह कल शाम की बात है, एक इनफॉर्मल पार्टी थी.. वहा इनफॉर्मली समजा"
"ओह ओके... व्हॉट यू वाँट मी टू से?"
"नथिंग मच.... आय वाँट यू टू साईन धिस बाँड"
"बाँड?? क्या है?
"तुम्हारा सॅलरी हाईक, ऑर कंपनी के साथ दो साल का बाँड, धिस ऑफर इज टेम्टिंग आय मस्ट से, दे आर गिविंग यू गुड हाईक"
"ओह..! बट सर, आय नीड टाईम..."
"व्हाय नॉट, टेल मी टूमॉरॉ"
"ओके, थँक यू.... मे आय टेक यूर लिव्ह?"
"येस प्लीज, गुड डे मिस देसाई"
"गुड डे सर..."
___________________________________________
बाँड....!
दोन वर्षांची कमिटमेंट.... जबाबदारी वाढणार... माझ्या रॅग्झिन बॅग्जच्या व्यवसायाकडे मला बघायला वेळ कसा मिळेल... मी इकडे राजीनामा देण्याचा विचार करतेय, तिथे दोन वर्षे स्वतःला कसं अडकवून घेऊ? माझे सहकारी आधीच कंपनी सोडण्याच्या बेतात आहेत, म्हणजे नवे कोणी येईपर्यंत मला तिपटीने काम पडेल... हातात घेतलेली कामं संपवून मीच नोकरी सोडणार, तर हे असं... उद्याच रामनाथांना, 'मी देखील लवकरच राजीनामा देते आहे', असं सांगून टाकावं का? .... पण, ह्या कंपनीमध्ये, सोडून जाणारा म्हणजे अपराधी असं वागवतात... मानसिक ताण वाढेल उगाच, पुन्हा मी जाऊ नये म्हणून आणही काही डिस्कश्न्स.. मला ते नकोच आहे!! त्यात मला सुमेघला पैसे द्यायचे आहेत, आईकडे पाठवायचेत, रेग्झिन स्टॉक घेऊन ठेवायचा आहे... सेव्हिंग पुरेशी असली तरीही अजून किमान तीन ते चार महिने पगार हवाच...
बाँड करणं शक्य नाही, फटकन नोकरी सोडणंही शक्य नाही....
जाऊ दे... उद्याचं उद्या पाहू....!!
कधी कधी, निर्णयाचा क्षण टोलावून पुढे ढकलला, की बरं वाटतं! त्या क्षणाला कधी ना कधी सामोरं जावं लागेल ही जाणीवही बाजूला सारली जाते, जाणूनबुजून!!
--------------------------------------------------------------------------
"हेलो, अल्पा हिअर"
"........."
"हूज स्पिकींग, अल्पा हिअर?"
सकाळी ऑफिसला आल्यापासून ती कामात गुंतली होती, बाँड चे विचार बाजूला सारून, प्रत्येकाचे फोन कॉल्स घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होती, ते करताना, समोर कंम्प्यूटर वर डेटा अपलोड करत होती.... ह्या हाती घेतलेल्या कामामध्ये प्रत्येक कस्टमर बरोबर चांगले व्यवहार प्रस्थापित करणं त्यासाठी टीमला हवे ते मार्गदर्शन करणं ह नकळत तिच्या कामाचा भाग बनून गेला होता..
"हॅलो, कोण बोलत आहे, मी अल्पा.... हॅलो..."
"....."
"काही बोलाल का? हॅलो"
"अल्पा.......मी, मी बोलतो आहे!"
"अ वि ना श.....?"
"हो, फोन डिसकनेक्ट करू नकोस... प्लीज"
"हं, बोल, तुला माझ्या ऑफिसचा नंबर मिळाला आहे तर, मी कामात आहे फार, जे काही असेल ते बोल आणि संपव"
"अल्पा, थोडावेळासाठी भेट, मला माहिती आहे मी चुकलो आहे, मला फक्त तुला भेटायचं आहे, संवाद साधायचा आहे"
"त्याची गरज नाही, अविनाश. आणखी काही बोलणार आहेस की ठेवू फोन?"
"अल्पा, इतकी रुथलेस नको होऊस.... फक्त अर्धा तास हवा तुझा"
"माझ्या इच्छेविरूद्ध आता मी कुठलीही गोष्ट करत नाही मिस्टर करमरकर! आणि पुन्हा इथे फोन न केलेला बरा...."
पुन्हा कामाच्या व्यापात स्वतःला गाडून घेतलं तिने.... आताशा तिला हे फार छान जमू लागलं होतं! नकोश्या आठवणींना, विचारांना वळसा देऊन वाहत रहाणं ती शिकली होती... थांबणं तिला मंजूर नव्हतं... अडणं तिला मंजूर नव्हतं.... वाहत रहाणं.... वाहत राहणं.....
तिच्या मेंदूला उसंत नव्हती, काम आणि काम ह्यात ती मग्न होती... भराभर हातावेगळी कामं करताना, पुन्हा फोन वाजलाच..
"हॅलो, अल्पा हिअर"
"गधडे, आहेस कुठे????"
"कोण....... शमा?"
"तुला शिव्या घालण्याची बाकी कुणाला काय हिम्मत? कालपासून फोन करते आहे... मला कमाल वाटते अल्पा, रात्री दोनलाही तुझा फोन व्यस्त... दिवसाही व्यस्त.... अविनाशला 'हो' तर म्हणाली नाहीस ना??"
"शमा... आर यू किडिंग? रात्री दोन वाजता तो तुझा फोन होता? आणि तू आजच अचानक अविनाशचा विषय कसा काढलास, माझ्या आईसोबत बोलणं झालंय का?"
"अल्पा मॅम, नाही, माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही.... अविनाशबद्दलच सांगायला रात्री दोन वाजता फोन करत होते.... पहिल्यांदा पूर्ण बेल वाजली, आणि तू उचलला नाहीस, मग पुन्हा फोन करते आहे तर तुझा व्यस्त... कितीतरी वेळ... मग मलाच डोळा लागला, काल माझी शिफ्ट होती उशीराची...दमले होते, झोपले मी"
"अच्छा, तर तो फोन तुझा होता...! आणि काय गं शिफ्ट, हे काय प्रकरण? अन् दोन वाजता फोन? का शमा?"
"तुला तुझ्या घरी सोडून अविनाशसाहेब ह्या पामरास भेटले.... मी शिफ्टसाठी निघाले होते, तर हे आमच्या फ्लॅटखाली उभे... तुझी अपाँईंटमेंट घेण्यासाठी मला मसका... "
"बरं, अविनाश ने तुलाही गाठलंय तर, मी कुठे राहते, तू कुठे राहतेस, माझं ऑफिस, माझा बस स्टॉप... बरीच माहिती जमवली आहे त्याने... सोड... पण शिफ्ट काय प्रकार आहे शमा, कधी बोलली नाहीस?"
"अमेरिकेच्या क्लायंटबरोबर फोनकॉल असल्याने आम्ही निवडक लोकं काही तास ऑफिसमध्ये होतो, म्हणून शिफ्ट शब्द वापरला, रोज नसतं असं काही, माझ्या प्रोफाईलशी निगडीत काही असेल, तरच मला जावं लागतं... महिन्यात तीन चार कॉल्स असतात आणि सोबत मुलीही असतात, सहकारी चांगले आहेत, चिंता नसावी...!! तर सांगत हे होते की, ऑफिसला जाण्याआधीच अविनाश भेटला, तुझी भेट हवीये वगैरे म्हणाला, त्याला कटवला मी आणि ऑफिस गाठलं, पण त्या अमेरिकन क्लायंट्सच्या कॉल्समुळे ऑफिसमधून तुला फोन नाही करू शकले... दोन वाजता फ्लॅटवर परतले, मग तुम्हाला फोन केला तर आधी तुम्ही उचलला नाहीत... नंतर बिझी फोन.... कुणाशी बोलत होतीस तू?"
"आईचा फोन होता"
"दोन वाजता? धन्य आहेत काकू, आणि धन्य ती अल्पा..... ते जाऊ दे, आज मी सुटी टाकली आहे, मला भेट... अनेक गोष्टी सांगयच्या आहेत... अविनाशसाहेबांबद्दल"
"अविनाश? त्या व्यक्तीबद्दल बोलण्यासारखं काय आहे? तू मला नुसतं भेट... हा अप्रिय विषय डोक्यात घेऊन नको"
"अल्पा, डोकं शांत ठेव, ऐक, इतक्या अनेक वर्षांत मी आजवर कधी अविनाश बद्दल तुझ्याशी बोलले आहे?"
"नाही!"
"मग आज जेव्हा मी तुला तडकाफडकी बोलवत आहे, त्यात काही तथ्य असेल?"
"हो, असेलच....! भेटते.
शमा, काही वेळ आधीच, त्याचा फोन येऊन गेला आहे, त्याला मला भेटायचं आहे, काही सांगायचं आहे....."
"गुड. मग भेट एकदा, हे बघ अल्पा, तू नाही म्हणणार, तो पुनःपुन्हा फोन करणार, तुला गाठणार, मला गाठणार, एकदाचे भेट ना, अती त्रास झाला तर सरळ पोलिस गाठायचा"
"पाहू या"
"अल्पा, एक काम कर, अर्धा दिवस सुटी टाक, बाहेर जेवायला जाऊ, तिथून पुढे कुठेतरी... थोडी रिलॅक्स होशील...."
"डनडील शमा... नाहीतरी डोकं दुखतंय आता.... मी दोन वाजता भेटते... आपल्या नेहमीच्या रेस्तराँ मध्ये"
"ओक्के मॅम... कम सून"
घड्याळात पाहिलं तर एक वाजत आला होता... थोडं डेटा फिडींग झालं की ती निघणार होती... त्याआधी रामनाथांना कल्पना द्यावी म्हणून ती त्यांच्या केबिनकडे वळाली....
"मे आय कम इन सर"
"येस मिस देसाई"
"सर, आय एम नॉट किपींग वेल, वुड लाईक टू लिव अर्ली फॉर अ डे"
"नो प्रोब्लेम... तुम चाहो तो मेरा ड्रायव्हर तुम्हे घर तक ड्रॉप कर देगा"
"नही सर, ऑटो से चली जाऊंगी.. कल मिलते है"
"हां, कल तुम बाँड के बारे में कन्फर्म कर दो... अच्छा रहेगा तुम्हारे भविष्य के लिए भी"
"शुअर सर, सोचकर बताती हू कल.."
"या.. हॅव अ गुड टाईम, टेक केअर"
"थँक यू सर"
तिला हायसं वाटलं.... कामाच्या दिवशी सुटी घेऊन जरा स्वतःला वेळ देणं ह्या कल्पनेतच सुख आहे.... त्याच विचाराने स्वतःशी हसली ती.... पटापट कामं करून टॅक्सी किंवा रिक्षा घेऊन ती शमाला भेटणार होती...
शमा ह्या व्यक्तीतच जादू आहे... सतत कुठला उत्साह तिच्यातून सळसळत असतो... तिला भेटून आलं की मन प्रसन्न होतं.... आज अविनाश नामक भूतकाळ चर्चिण्यासाठी आपण जातो आहोत, इतकंच खटकत होतं... बाकी आपल्या लाडक्या मैत्रिणीला बर्याच दिवसांनतर असे निवांत भेटतो आहोत हा आनंद चेहर्यावर दिसत होताच...!
जागेवर येऊन पुन्हा कामात डोकं घातलं, आणखी वीस मिनीट, मग कामापुरता आजचा दिवस संपला......!!
फोन खणाणलाच...
"हॅलो, अल्पा हिअर..."
"अल्पा, प्लीज...... अर्धा तास, अर्धाच तास भेट म.."
"अविनाश, रात्री साडेआठ, माझ्या सोसायटीच्या बाहेर 'आस्वाद रेस्तराँ' बाय"
----------------------------------------------------------------------------
६.
"टॅक्सी......"
ती पटकन आत शिरली, चर्चगेटमधल्याच एका रेस्तराँचा पत्ता सांगून निवांत रेलून बसली....
हवेवर भुरभूरणारे आपले केस सावरत ती विचार करत बसली होती.... अपूर्ण झोप, जरा विचारांची सैरभैरता तिला अस्वस्थ करणारी होती... शमाशी भेटून जरा स्वस्थता लाभेल असंही वाटत होतं....
कालपासून घडून गेलेल्या गोष्टींचा हिशोब जुळवत होती ती...
उशीरा सुटलेलं ऑफिस, बंद पडलेलं घड्याळ, अविचं भेटणं, शुद्ध हरवणं, रात्री शमाचा आणि आईचा फोन, आज सकाळीच बाँड बद्दलची बातमी, त्यात अवि नामक व्यक्तीला भेट्ण्याचा तिढा....
रेस्तराँ आल्याने बिलाचे पैसे चुकते करून ती उतरली....
आत आल्या आल्याच अगदी सवयीने तिने उजव्या हाताला वळून पाहिले... मागून तिसर्या टेबलवरून एका प्रसन्न हास्याने तिला हात केला... तिचं मळभ गळून पडलं....
"हॅल्लो, शमा..... कशी आहेस"
"कित्ती उशीर मॅम, कॉफी पिऊन झाली माझी"
"सॉरी गं, कामं आटोपून निघताना थोडं मागे पुढे झालंय, बरं आधी ऑर्डर देऊयात का, मस्त भूक लागली
आहे"
"ओह येस, प्लीज डू दी ऑनर्स"
व्यवस्थित ऑर्डर देऊन झाल्यावर दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, शमाला कधी एकदा अविच्या मुद्द्यावर येऊ असं झालं होतं, तर अल्पाला, तो विषय नकोच होता.... पण अल्पालाही जाणीव होतीच, की ज्या गोष्टीसाठी शमाने मुद्दाम इथे बोलावलं आहे, तो विषय टळणार नाहीच..
"अपू, काल अवि काय म्हणाला?"
हे असं थेट मुद्द्याला, थेट हात घालणं शमाच करू जाणे
"अं...! काय, कुठे? मी बोलू कुठे दिलं... मी का बोलू देऊ ,किंवा ऐकून तरी घेऊ"
"काल तुला घरी सोडून मला गाठलं त्याने, तू त्याला त्याची बाजू मांडू द्यावीस असा धोशा लावला आहे त्यानं"
"पण शमा, ह्या माणसाला माझे सगळे कोंटॅक्ट नंबर्स, ऑफिसचा घराचा पत्ता, तुझा पत्ता... मिळालाच कसा... मला ह्याचंच जास्त आश्चर्य आहे, त्यानं सुमेघला न गाठलं म्हणजे मिळवली"
"का...? गाठू देत की सुमेघलाही... घाबरायचं काय आहे त्यात?"
"सुमेघ मागचा पुढचा विचार न करता फटकावेलच अविनाशला, त्याची भिती आहे, बाकी काही नाही, सुमेघचा राग आहे त्याच्यावर किती, तुला माहिती आहे ना ते..."
"येस माहिती आहे.
'अविनाश.....!!' मला आज तुला बरंच काही सांगायचंय अल्पा. रादर, हीच ती वेळ आहे जेव्हा तुला सगळं सांगितलं गेलंच पाहिजे, जेणेकरून तू निर्णय घेताना चुकू नयेस"
"शमा, तू जर अविनाशची बाजू मांडायला, त्याची तरफदारी करून, लग्नाच्या ऐन वेळी मला इथे टाकून तो का परागंदा झाला, त्याची कारणे काय... हे सगळं सांगणार असशील, तर मला अजिबात रस नाही, त्यापे़क्षा फ्लॅटवर जाऊन आराम करेन मी."
"ऐक. मी अविनाशबद्दलच बोलणार आहे. तुला सगळं ऐकावंच लागेल. आणि त्याची बाजू मांडण्यात मला स्वारस्य नाहीच. फक्त, काही गोष्टी ज्या तुझ्यापर्यंत कधी पोहोचल्या नाहीत, मी कधी सांगितल्या नाहीत, कारण तू अविनाशला बेदखल करून टाकलं होतंस तुझ्या आयुष्यातून, पण जेव्हा स्वारी परतून आली आहे, तेव्हा तू त्याला भेटण्या आधी, मला तुला सारं सांगायचंय....."
"शमा, मी आज रात्री साडेआठला आस्वाद मध्ये भेटते आहे त्याला, मला कधी त्याला जाब विचारण्याची संधी मिळाली नाही... पण त्याला मी एक संधी देणार आहे... कबुलीजवाब ऐकणार आहे"
त्यानंतर दोन तास अनेक गोष्टी अल्पाला नव्याने कळाल्या.... चेहर्यावरची रेषही न हलू देता अल्पा ऐकत राहिली.... ज्या व्यक्तीला तिने आयुष्यातून संपूर्णपणे वजा केलं होतं, त्याच्या बद्दलच्या कुठल्याच गोष्टींनी कुठलाच परिणाम तिच्यावर होणार नव्हता...
आपल्याला भविष्यात काय साधायचंय ह्याची गणितं पक्की असली की, भूतकाळातले फसलेले हिशोब त्रास देत नाहीत, ह्याची सर्वार्थाने अनुभूती घेत, शमाने दिलेलं एन्व्हलॉप स्वतःच्या पर्स मधे ठेवत तिनं रेस्तराँ सोडलं.... इथेच उशीर झाल्याने, इतर कुठे जाण्यापेक्षा, दोघींनीही घरी जायचं ठरवलं... घरी जाऊन जरा आराम, आणि फ्रेश होऊन अविनाशची औपचारिक भेट, इतकाच तिचा प्लॅन होता.
-------------------------------------------------------------------------
सायंकाळच्या ७ च्या गजराने जाग आली!
पलंगावरच जरा रेंगाळल्यावर, आवरायला घेतलं, आधी अद्रक घालून गरमागरम चहा!
अविनाशला भेटायला जायचं असलं तरी, मनात फार हुरहूर वगैरे वाटतच नव्हती, खरंच भूतकाळ असा सपशेल पुसता येऊ शकतो, ही जाणीव मात्र आनंददायी होती, माझी पर्वा न करणार्याची पर्वा करण्याचा अर्थाअर्थी आता काहीही संबंध नव्हताच. त्यामुळेच आज शमा भले काही सांगत होती, मला फरक पडण्याचा प्रश्न नव्हताच... एके काळी अविनाश जगण्याचा अविभाज्य भाग होता, आता तो परतला असूनही आमच्या दोघांच्या दरम्यान मला काहीही जाणवत नाही, संदर्भ बदलले आहेत, गरजाही आणि रस्तेही..!
दुपारचं जेवण बरंच झाल्याने, भुकेचा लवलेशही नव्हता, शमाला भेटून आल्यानंतर जी झोप लागली, ती थेट सात वाजताच जाग आली...... देवासमोर दिवा लावून, उदबत्ती लावून नतमस्तक झाले, "मला कठिण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, सर्वाना सुखी ठेव" हे नेहमीचे बोल बोलून गुलाबी साडी नेसायला घेतली.... छान झोप होऊन मन प्रसन्न असले, की असे रंग मनाला आणखी टवटवीत करतात...
आरशात पाहून घेतलं, माझं मलाच प्रसन्न वाटलं, बरोबर आठ वाजून वीस मिनीटे होत आली होती, आठ पंचवीस ला निघावे, सोसायटीबाहेर पडले की दोन मिनीटावर 'आस्वाद' आहे, साडेआठला तिकडे हजर...
तोवर, उद्याला करण्याचे दोन महत्त्वाचे काम नोंदवहीत लिहावेत म्हणून, टेबलावरील फोनसमोरची डायरी उघडली-
पहिली नोंद म्हणजे, मिस्टर रामनाथांना फोन करायचा आहे, शार्प सकाळी आठ वाजता आणि दुसरा फोन सुमेघला...!!
दुसरी नोंद म्हणजे, दोन दिवसांनी, शाह ट्रेडर्स सोबत मिटींग, लेदर डील फायनल व्हायलाच हवी, माझे डिझाईन्स शेअर करण्यासाठी माझं कमिशन मी आकारण्याचा मुद्दा, चर्चिला गेलाच पाहिजे!
टेबलवरचा फोन खणाणला...
घड्याळात आठ पंचवीस!
हा फोन उचलला, की मला उशीर होईल..
कुठल्याच मिटींगची वेळ टाळलेली मला चालत नाही.. वेळेचे पक्के आपण..
आईचा फोन असेल तर, बाबांच्या तब्बेत्तीचा वगैरे..
निमिषभरात सगळे उलट पालट विचार डोक्यात येऊनही गेले, रिसिव्हर कानाला लावला..
"हॅलो"
"अल्पा, अगं आहेस कुठे? ऑफिसमध्ये फोन केला होता, तुला बरं नाही म्हणून लवकर गेलीस असं कळालं, दुपारी घरी फोन केला, तर नुसताच वाजतोय, आताही किती बेल वाजल्यावर उचललास... काय झालंय?"
"सुमेघ! जरा हळू, एका दमात किती प्रश्न? बरं नव्हतं म्हणजे, जरा डोकं दुखत होतं, आणि शमालाही भेटायला गेले होते, बाहेरच जेवलो आज, म्हणून दुपारी घरी नव्हते, तुला उद्या सकाळी फोन करणारच होते"
"ओके, पण मी काळजीत पडलो होतो, आता तू फोन उचलला नसतास तर येऊन थडकणार होतो, बरं ऐक, उद्याची सुटी टाक! शाह ट्रेडर्स चे सर्वेसर्वा श्री हेमंत शाह आपल्याला भेटणार आहेत"
"सुमेघ, एक ऐक, त्यांना दोन दिवसनंतर बोलाव, आणि आता मी बाहेर पडते आहे, एक मिटींग आहे... तुला उद्या बोलते, आणि शक्यतो तू मोकळा रहा उद्याच्या दिवस, मी उद्यापासून तीन दिवसांची रजा घेणार आहे"
"काय?? आता, मिटींग? आणि तीन दिवसाची रजा? राजिनामा देण्याचं पक्कं झालंही?"
"नाही नाही. घोळ करू नकोस. तुला सविस्तर समजावेन, शाहजींना दोन दिवसांनी बोलाव, आजपासून तिसर्या दिवशी, मग बोलूयात त्यांच्याशी"
"अल्पा, तुझं खरंच काय सुरू आहे, मला समजत नाही आहे, शाह बाहेरगावी जाणार आहेत, मी कशीबशी उद्याची अपाँईंटमेंट घेतली होती. आता मी त्यांना उद्याच भेटेन. जिथे तू निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, ते मुद्दे पुढच्या मिटींगला पाहू. ठेवतो फोन, उशीरा बाहेर पडते आहेस, लवकर परत ये, सकाळी फोनची वाट पाहतो..."
"किती समजूतदार आहेस सुमेघ, थँक्स! जाते मी आता, उद्या बोलते, मी सोसायटीच्या आसपासच आहे, काळजी करू नकोस... उद्या सकाळी बोलूयात... बाय"
आठ पस्तीस!!
पर्स मधला एन्वलॉप नीट तपासून तिने घर सोडलं... लॅच लागला!
______________________________________
अल्पा अजून कशी आली नाही, वेळेची तिच्या इतकी पक्की कुणीच नाही, आठ पंचेचाळीस होत आलेत...
ही काय... गुलाबी साडी!! आजही हाच रंग आवडतो हिला... ही तशीच आहे... जशी होती! बदललो आपण... खूप बदललो... सगळ्यांना मनस्ताप दिला... एक निर्णय, आणि सगळे पासे पलटले.. स्वार्थाचा विचार केला आणि अनेक आयुष्यांशी खेळलो.. क्षमाच मागायची आहे, चूक दुरूस्त करायची आहे, तिच्या मनाविरुद्ध आली आहे आज ती... तिला पश्चाताप होणार नाही, इतकी काळजी घेईन.
मधली आठ वर्ष गळून पडावीत आणि धावत जाऊन तिला मिठीत घ्यावंसं वाटतंय, पण तिच्या चेहर्यावरचा तो प्रचंड आत्मविश्वास, डोळ्यातले करारी भाव कुठलंसं अंतर राखून आहेत... मला माफ करेल का अल्पा, माझा प्रस्ताव मंजूर करेल? का करणार नाही? एके काळी प्रेम केलंय तिने आपल्यावर... आजही एकटीच आहे, त्या प्रेमासाठीच ना?
"हाय मिस्टर करमरकर, हाऊ आर यू, सॉरी फॉर बिईंग लेट"
विशिष्ट अंतर राखून, अदबीनं उभ्या अल्पाला पाहून आपण, शेकहँडसाठी हात पुढं केला, तो नाकारत ती खूर्चीत बसलीही...
"अल्पा!"
"...."
"काय घेणार? चहा, कॉफी, स्नॅक्स"
"मला काही नको आहे. अविनाश, मी इथे, तू वारंवार केलेल्या फोनकॉल्स मुळे आले आहे, तू कशासाठी बोलावलंस, तुझ्या मनात काय आहे, मला काहीही ठाऊक नाही, आपल्या ह्या भेटीत मला अजिबात स्वारस्य नाही, पण आपल्या दाराशी एखादा वारंवार येतो, तेव्हा त्याच्या तोंडावर दार लावण्याआधी, त्याचा मानस जाणून घ्यावा, इतक्याच हेतूने मी इथे आले आहे, तेव्हा पाहूणचारात वेळ न दवडता जे काही बोलायचे ते थेट बोल.. आणि मला मोकळं कर"
मी अल्पाला खूप दुखावलं होतं, पण त्या वाराची तीव्रता अनेक वर्ष जाऊनही अशी असेल ह्याची मला जाणीव नव्हती...
"ओके अल्पा, लेट्स गेट स्ट्रेट!"
अल्पा,
मी तुला सोडून गेलो, भर लग्नाच्या मंडपात, एकटीला सोडून त्याबद्दल तुला तक्रार असेलच, आज... तुझ्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं द्यायला मी आलो आहे, मी चुकलोच होतो, पण त्या मागे काही कारणं होती, ती सांगायला आलो आहे... तू विचार मला जाब, आज मी बांधील आहे, केलेल्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी उचलायला तयार आहे"
"कसले प्रश्न, अविनाश? कसला जाब? आठ वर्षे पुढे निघून आले आहे मी, पूर्णतः! तेव्हाच समोर असतास तर विचारायला प्रश्न होते तरी, आता ना त्या भावना आहेत ना कुठले प्रश्न, आणि कुठलाच जाब विचारायचा नाही आहे मला, आधीच स्पष्ट केलंय, ह्या भेटीत मला स्वारस्य नाही. ह्याउपर तुला काही बोलायचे असल्यास तू बोलू शकतोस, अन्यथा आपण निघूयात, आणि आपला कुठलाही संबंध इथून पुढेही नसावा, इतके बघूयात"
"अल्पा, मी तुझा गुन्हेगार आहे, आज मागे वळून पाहिलं तर वाटतं... चार वर्षे जिच्यावर मी प्रेम केलं, त्या व्यक्ती सोबत लग्न करण्याचं स्वप्न साकारताना, माझ्या बुद्धीनं माझ्याशी का असा खेळ केला? अल्पा, माझं बिझनेसचं खूळ तुला ठाऊक होतं... माझी महत्त्वाकांक्षा तू जाणून होतीस... माझ्या वडिलांचा प्रचंड मोठा बिझनेस आहे, मुंबईमधल्या मोठ्या हॉटेल लाईन्स चे ते मालक आहेत... असं असूनही करमरकरांचा मुलगा ह्यापेक्षा, अविनाश म्हणून मला माझं स्थान हवं होतं, वडिलांना परदेशातून असे काँट्रॅक्ट मिळू शकण्याची शक्यता निर्माण झाली होती... एक मोठी हॉटेल लाईन डबघाईला आल्यानं आपलं सगळं काही विक्रीला काढून बसली होती, ह्या टेंडर मध्ये आम्ही लीड करत होतो.... अशावेळीच आपलं लग्न ठरत होतं! भारताबाहेर असं काँट्रॅक्ट मिळाल्यास मी तिकडे जाऊन खूप काही मिळवू शकलो असतो.. बाबा भारताबाहेर पडू शकणार नव्हते, इथला व्याप मोठा होता, तिकडे सारं काही सांभाळण्यासाठी माझ्याशिवाय कुणी नसणार होतं आणि हीच संधी होती मला, स्वत:ला काही सिद्ध करण्याची... ज्या अनेक गोष्टी बाबा इथे करू शकले नव्हते, मी स्वतंत्ररित्या ते घडवू शकणार होतो, माझी ओळख प्रस्थापित करू शकणार होतो...."
"हे सगळं मी जाणून होते, अविनाश"
"हो अल्पा, म्हणूनच वारंवार मी तुला विनंती करत होतो, लग्न करून आपण विदेशी जाऊया, किंवा काही वर्षांनंतर लग्न करूया, ह्यातला कुठलाच पर्याय, तुझ्या घरच्या लोकांना मान्य नव्हता. तुलाही!! त्यात,
मी मोठ्या घरातल्या कुण्या मुलीशी लग्न करावं, त्यातूनही बिझनेस डील्स होतील, असं माझ्या बाबांना वाटायचं, पण अल्पा, मी तुझाच होतो... बाबांना मी तुझ्यात पुरेपूर गुंतलो आहे, हे पटल्याववर त्यांनी परवानगी दिली होती, ह्याच अटीवर, की मी लग्न करून तुला घेऊन तिकडे जावं... अन्यथा ते मला त्यांच्या कामात हस्तक्षेप करूच देणार नव्हते, आजन्म एक बिझनेस टायकून होण्याचं माझं स्वप्न पूर्णतः तुझ्या निर्णायावर येऊन थांबलं होतं.... तुला परोपरीनं समजावून सांगत होतो... पण भारताबाहेर येण्याची तुझी तयारी नव्हतीच"
"आजही नाही आहे अविनाश! आई बाबाना इथे एकटं सोडून जाऊ शकत नाही मी"
"पण, तू आजही त्यांच्याबरोबर कुठे आहेस अल्पा? काही वेळा, आपण आपल्याला हव्या असणार्या गोष्टींना इतके बिलगून राहतो, की तडजोडीची तयारीच नसते, त्या क्षणाला केला गेला अट्टहास मात्र, आयुष्याची पुढची गणितं बिघडवून टाकतो..... माझंही तेच झालं! आणि तुझंही!
तू ज्या कारणासाठी भारत सोडणार नव्हतीस, आज ते कारण असाध्यच आहे... आणि मी ज्या कारणासाठी लग्न, तुला सोडून गेलो, ते साधूनही मी असमाधानीच आहे!"
त्यात लग्नाआधीचे काही वीस एक दिवस आपल्यात संवाद नव्हता, आणि ह्याच गोष्टीने मला तुझ्यापासून काही काळासाठी दूर आणि माझ्या महत्त्वाकांक्षेच्या जवळ नेलं... लग्नाच्या एक आठवड्याआधी, आम्ही टेंडर जिंकल्याचं कळालं आणि माझ्यातल्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली, स्वस्थ बसणं अशक्य होतं... तू भारताबाहेर येणार नव्हतीस... आणि मला ही चालून आलेली स्वप्नपूर्तीची संधी दवडायचीच नव्हती... तुला समजावून सांगण महाकठिण होतं...
पण कुठे ना कुठे हा विश्वास मनात होता, की तू मला समजून घेशील, माझ्यासाठी थांबशील, मी परतून येईन ही खात्री मनाशी ठेवशील... मी तिकडे गेलो की, काही वर्षांत बस्तान बसवून परत येईन, तिकडे कुणी विश्वासू लोकांना तो कारभार सोपवून मग भारतातून लक्ष देईन, तेव्हा लग्न करू असं काहीसं वाटून लग्नाच्या आदल्याच दिवशी, तुला काहीच न कळवता मी निघून गेलो...
प्रेम आणि महत्त्वाकांक्षा, ह्यात महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली अल्पा, आणि त्या एका क्षणाच्या मोहाने आपण दुरावलो... त्यानंतर तुझ्याशी संपर्क साधण्यासाठीची हिंमत माझ्यात नव्हतीच, स्वतला मी गाढून घेतलं नव्या कामात... तू वाट पाहशीलच माझी, ही खात्री मनाशी बाळगत.... अल्पा, तुला मी विसरलो नव्हतो, विसरलेला नाही, तुझ्यात आधी जितका गुंतलेला होतो, तितका आजही आहे. तिकडे गेल्यावर दोन वर्षांनी तुला संपर्क करू पाहिला, पण तू उभं केलं नाहीस... तुझा राग सहाजिक होता... आणि मला तुला दाखवायला तोंड नव्हतं... मी जरी माझ्या स्वप्नपूर्तीला महत्व देऊन निघून गेलो होतो, तरी तुला विश्वासात न घेता, असं वागायला नको होतं, ही अक्कल फार उशीराने आली... मी तुला फार दुखावलंय... खूप हिम्मत करून तुझ्या समोर बसून बोलतो आहे...
पण एक कबूल करेन, तुझ्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, प्रेम तुझ्यावरच होतं, आहे. चुकलो आहे मी, तुझं नाजूक भावविश्व अगदी पायदळी घातलं... माफीच्या लायकीचाही गुन्हा नाही माझा... पण अल्पा, मला तुझी साथ हवी आही, तुझ्याशिवाय अपूर्ण असलेलं आयुष्य पूर्णत्वाला नेऊ देत... मी भारतातच राहिन इथून पुढे... तुझ्या आयुष्यातून मी बेदखल असल्याची जाणीवही भयंकर आहे... तुझ्या नजरेत माझ्याबद्दलची घॄणा पहावतही नाही मला... अल्पा... प्लीज मला मोठ्या मनाने माफ कर, मला चूक सुधारण्याची शेवटची संधी दे, दु:ख म्हणून तुझ्याकडे फिरकणार नाही ह्याची काळजी घेण्याइतपत लायकीचा झालो आहे मी आता...."
"अविनाश, पुरे झालं. इतकंच की तुला आणखीही काही सांगायचं आहे?"
"इतकंच अल्पा....! मला माझी चूक कबुल करायची होती, माफी मागायची होती, केलेली चूक सुधारायची आहे...त्यासाठी पुन्हा एकदा, तुझ्याच निर्णयावर माझी भिस्त आहे... तुझ्याशिवाय खूप मानसिक त्रासातून गेलो आहे अल्पा, शेवटी ह्या निर्णयावर आलो आहे, तूच आयुष्याची गरज आहेस, मला होकार दे अल्पा, इतकी वर्षे तू ही थांबली आहेस... तुझ्या मनात खरंच माझ्याबद्दल पुसटसंही प्रेम नसावं का, हा प्रश्न आजकाल भंडावतो.. "
"आणखी काही बोलणार आहेस? आणखी काही कबुलीजवाब?"
"नाही... सारं सांगून झालंय, तू काही बोलावंस, माझ्यावर चिडावस, संताप व्यक्त करावास असंही वाटतय"
"आणखी काही?"
"अल्पा, आता तू बोल... मी शांत आहे. गेली आठ वर्ष तुझ्यापुढे मी मांडून टाकलीत... आता तुझाच निर्णय"
"कसला निर्णय हवा तुला अविनाश??
इतक्या सर्व आठ वर्षाच्या कथेत, चुकून एकदा जरी, तुझं लग्न झालेलं आहे, आणि तुला चार वर्षांच मूल आहे, बोलून गेला असतास, तर एक मित्र म्हणून तुला आयुष्यात स्थान देऊ शकले असते......"
माझ्या पुढ्यात माझ्याच लग्नाच्या फोटोंचा एन्वलॉप फेकून, ती चालती झाली......
-----------------------------------------------------------------------------------
७.
जगणं सुरू असतं,
अनेक नाती साकारत जातत... काही काळाच्या ओघातही तग धरतात, काही नाही. त्या प्रत्येकातून आपण घडतो, कधी आपटतो, कधी सावरतो.... कच खाल्लेल्या नात्यांची लक्तरे सोबत राखायला प्रत्येकाला जमेलच असं नाही.
'अविनाश' नावाचं नातं, त्या नात्याला बिलगून असणार्या भावना मी कधीच मागे सोडल्यात. माझ्या वर्तमानात त्या भावनांचा लवलेशही नाही, तेव्हा आज हा अचानक माझ्या पुढ्यात बसून सहजीवनाचं आर्जव करतोय, याला माझ्यालेखी महत्त्वही नगण्यच आहे. आज तो अविवाहीत म्हणून सामोरा आला असता तरीही मला आता जे वाटतं आहे, तेच वाटलं असतं, हे ही खरं आहे. नातं ज्या विश्वासावर साकारावं तो पायाच अस्तित्त्वात नसताना असं कुठलंही नातं आणि त्या ओघाने भोगावे लागणारे परिणाम, ह्यांना सामोरं जाण्याची माझी तयारी नाही..
शिवाय आता, ह्या घडीला अविनाश पेक्षा अनेक मह्त्त्वाच्या गोष्टी माझ्यासमोर आहेत, तेव्हा माझ्यापुरतं हे प्रकरण, इथेच संपत आहे!
----------------------------------------------------------------------------------------
तिला तिच्या विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं ते ही कळालं नाही. एका दिवसात एका पाठोपाठ अनेक गोष्टी घडून गेल्या होत्या. विचारांनी शीण आलाच होता... सगळ्या गोष्टींना नगण्य महत्त्व असल्याचं ती वारंवार स्वतःला बजावत असली जरी, तरी नकोश्या प्रसंगाचा ताण मानवी मनावर येतोच येतो. चेहर्यावर गार पाण्याचे हबके मारून झाल्यावर समोरच्या आरश्यामधे स्वतःला न्याहाळताना, कुठलासा आत्मविश्वास तरळला, ओल्या झालेल्या केसांच्या बटा तिने कानामागे घातल्या जणू हा दिवसच मागे लोटलाय...
घरतल्या नेहमीच्या कपड्यांत येताच तिला खूप हायसं वाटलं... आणि वळालीच ती आवडीची गाणी लावण्यासाठी..
आता दूध तापवण्यासाठी स्वयंपाकघर गाठलं... ते तापेपर्यंत टेबलावरची नोंदवही पुन्हा नजरेखालून घातली, सकाळी पाच चा गजर लावून, उद्या प्रवासात घालण्यासाठी सुटसूटीतसा पंजाबी ड्रेस काढून ठेवला... पॅकींग सकाळीच उठून करावी असं स्वतःशी ठरवत, प्रवासात नेण्यासाठीची बॅग काढून वर ठेवली.
गरमागरम ग्लासभर दूध रिचवून, तिने खोलीतला लाईट बंद केला....
"आज कल में ढल गया, दिन हुआ तमाम.... तू भी सो जा........." रफी मंद स्वरात कितीतरी वेळ गुणगूणत राहिला.....
-----------------------------------------------------------------------------------------------
"हॅलो, मिस्टर रामनाथन, अल्पा हिअर, सॉरी टू बॉदर यू अर्ली मॉर्निंग"
"नो नो मिस देसाई, नो प्रॉब्लेम, प्लीज गो अहेड"
"सर, तीन दिन की छुट्टी लेना चाहती हू, मेरे घर जाना है"
"इज एव्हरीथिंग ऑलराईट देअर?"
"येस सर, कुछ अर्जंट बातें करनी है, जो मै फोन पर नही कर सकती मा-पिताजीसे, इसलिये जा रही हूं"
"आय डोन्ट माईंट अप्रुविंग यूअर पी. एल., बट यू हॅवंट येट टोल्ड मी अबाऊट दी बाँड, मिस देसाई"
"मे आय बाय टाईम फॉर दिज थ्री डेज, प्लीज! मिस्टर रामनाथन?"
"या! ओके. बट आय एम नॉट शुअर इफ वी मीट अफ्टर थ्री डेज, देन"
"मतलब?"
"मतलब, ये, के मेरी पोस्टींग अपने दिल्ली ऑफीस हुई है, तीन दिन के बाद मै निकलने वाला हू... बट नो वरीज, अगर मेरा जाना डिले होता है, हम मिलेंगे, हॅव अ गूड टाईम मिस देसाई!"
"थँक यू सर, विश टू सी यू, वन्स आय अम बॅक, गुड डे सर!"
-------------------------------------------------------------------------
"गुड मॉर्निंग, सुमेघ, कसा आहेस?"
"हाय अल्पा, मी बरा आहे, काल कशी झाली मिटींग, केव्हा आलीस घरी?"
"मिटींग ठीक होती, बरं ऐक, मी हे सांगायला फोन केला आहे, की मी चिखलठाण्याला निघते आहे, दहा च्या बसने, येतोस?"
"घरी निघालीस? अचानक? आई बाबांना कळवलं आहेस? बाबा तुला "ये" म्हणाले?"
"नाही. कुणालाही कळवलेलं नाही, बाबा ये कसे म्हणतील? तू ओळखतोस ना त्यांना! थडकणार आहे जाऊन, लेक आहे शेवटी, तोंडावर दार तर लावून घेणार नाहीत ना?"
"अल्पा, सगळं निवळतंय ना हळूहळू, का घाई करते आहेस?"
"खरं आहे सुमेघ, पण मला जायचंय. मला त्यांना भेटावसं वाटतं रे खूप. माझ्या जीवनात सगळं काही छान जुळून येणार आहे, त्यांचा आशीर्वाद नको का घ्यायला, एकदा मनातलं सगळं बोलणार आहे त्यांच्याशी, परोपरीनं मला काय वाटतं ते सांगून बघेन, उद्या, मीच मला संधी दिली नाही असं वाटून घ्यायचं नाही मला.... ते सोड, येतोस?"
"अल्पा!! तुला माहिती आहे, मला नोकरी लागल्याशिवाय मी त्यांच्यासमोर येण्यात काहीही अर्थ नाही, तू ये जाऊन, जपून जा. नाहीतरी आज शहांबरोबर मिटींग आहे, मी तिकडे बघतो. तू आलीस की कळव"
"ओके. शहांबरोबर व्यवस्थित बोलणी कर, मला कळव मी आल्यावर ते काय म्हणत आहेत ते. बाय, भेटूच"
--------------------------------------------------------------------------------------------
बसचा वेग वाढला तसा, डोक्यांत विचारही उलटे सुलटे फेर घरू लागले....
आज नक्की किती वर्षे झालीत आपण घर सोडून? ताळमेळ लागत नाही.
बाबांचा अनेक वर्षांचा राग, आपण काढायला गेलोच नाहीत... आई ने कधी अंतर दिले नाही. कशा ना कशा प्रकारे माझ्याशी बोलती राहिली, वेळोवेळी वाड्याची आणि बाबांची ढासळती प्रकृती कळवत राहिली. बाबांशी आधी बोलण्याचा प्रयत्न केला आपणही... पण "तू लग्न करणार असशील, तरच माझ्याशी बोल" इतकाच अट्टहास, संवादाची हीच अट!
आज शांत मनाने मागच्या सात-आठ वर्षांचा विचार केला तर, कोण चूक कोण बरोबर पे़क्षा परिस्थीतीने घडत आणि घडवत गेलो, सगळेच, हेच जाणवत आहे. प्रत्येकाला मात्र "माझ्या मनासारखं" करून हवं होतं, म्हणून चार जणं, चार दिशेला. मधे आई अडकली, सगळ्यांची मनं सांधत राहिली.
बाबांचं ही तसं कुठे चुकलं आहे?
घरात, ते म्हणतील ती पूर्व आणि बाहेर तलाठी म्हणून मिळणारा मान- सन्मान! त्यांचा शब्द खाली पडलेला त्यांनीच कधी अनुभवलेला नाही. त्यांच्या लहाणपणापासूनच एक हुशार मुलगा, कर्तव्यदक्ष अशीच त्यांची प्रतिमा! असं सगळं असताना, आपण त्यांच्या मतांच्या विरोधात जाऊन अविनाश बद्दल त्यांच मन वळवलं, लग्नाला होकार मिळवला. त्यांच्या ज्योतिष विद्येलाही क्षणभर बाजूला सारत त्यांनी जेव्हा होकार दिलाच, तेव्हा "माझं सुख" ह्यापलीकडे त्यांना तरी काय वेगळं अपेक्षित असावं?
आणि मी कुठे चुकते आहे?
अविनाश तडका फडकी, लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी निघून गेला, इकडे घरात लग्नासाठी म्हणून जमलेल्या नातेवाईकांचे एक नाही अनेक सूर... प्रत्येकाचं वेगळं मत! अशा वेळी, प्रत्येकाला, 'मीच समजूतदार, आणि जगण्याचा अपरिमीत अनुभव असलेला' वाटू लागतं...
............ नुसते सल्ले!
करमकरकरांवर केस करा.मुलीची बेअब्रू करतात.
आता हिच्याची कोण कसं लग्न करणार.
ऐनवेळी तो गेला, म्हणजे नेमकं काय झालं असावं?.
तरी आम्ही म्हणत होतो प्रेमविवाहाची थेरं नकोत म्हणून, पण आमचं कोण ऐकतंय.
किती स्थळं चालून आली होती. मी ते अमूक- तमूक सुचवलेलं स्थळ! किती रुपवान गुणवान होता मुलगा, नसता असा टाकून गेला हिला, आताही वेळ गेली नाही त्यांनी पसंती दिलीच होती
उद्याचाच मुहूर्त गाठा. आपल्या गावात योग्य कुणी नाही का? असा विदेशी कुणी बघण्यापेक्षा, काय झालं शेवटी?
नाही नको, त्या पोरीला सावरू द्या जरा. तिलाही धक्का बसला आहे
नवं नातं लगेचच साकारून कुणाच्या तरी गळ्यांत वरमाळ घालावी, ही बाबांची गळ मला पटली नाही. मला ते शक्य नव्हतं!
बाबांना ठरलेला मुहूर्त आणि गावातला स्वतःचा आब, दोन्ही तडका फडकी राखायचा होता, आणि मला माझ "असणं" राखायचं होतं!!!!
अविनाशच्या जाण्याने मी हादरले होते. पूर्णतः! चार वर्ष ज्या व्यक्तीला मी माझं सर्वस्व मानून जगत होते, जो अगदी उद्या माझ्या आयुष्याच्या साथीदार होणार होता, तो पळून गेला, थेट भारताबाहेर. जाब कुणाला विचारावा? आपलेच दात, आपलेच ओठ? प्रेमाची याचना मी करणार नव्हते. आणि जाब विचारण्याच्या लायकीच आमचं नातं उरलं नव्हतं, जया पद्धतीने तो निघून गेला होता!
नैराश्य किती काळवंडणारं असतं, ते अनुभवलं मी.
तेव्हाही आईने आणि आत्याने मला त्यांच्या मागे घालून नातेवाईकांना गप्प बसवलं!
पण सावरले.
निर्णय माझा होता, त्या निर्णयाचे हे विपरीत परिणाम, मीच भोगणार होते.
एका अविनाशच्या जाण्याने, मला माझ्या जवळच्या कुटुंबीयांचं खरं रूप स्पष्टपणे दिसलं होतं!!
प्रसंग तुमची माणसं कोणती हे फार सहज दाखवून देतात! माझं सर्वस्व ज्याला समजत होते, तो आयत्या प्रसंगाला निघून गेला, आज त्याच्या जाण्याची कारणं मला समजलीत, पण त्यामुळे, तेव्हा झालेल्या भावविश्वाच्या, वेळेच्या, मानहानीच्या नुकसानाची भरपाई तर होत नाही ना.
त्या प्रसंगानंतर, बाबांनी मात्र "माझं लग्न" हा त्यांच्या जीविताचा प्रश्न केला.
दररोज दोन-तिन स्थळं, ह्या वेगाने मुलांच्या पत्रिका घरी आणण्याचा अर्थ, संदर्भ मला उमगत नव्हता. सार्यांची परिणती म्हणजे माझं ते घर सोडणं! मुंबईला येणं! लग्न न करण्याचा निर्णय.
आणि आजही, बाबांचं "लग्न कर, मग संवाद साध" हाच हेका.
आश्चर्य वाटतं मला, "लग्न" हेच आयुष्य, असं गणित कसं? जगतानाचा एक घटक, अशी व्याख्या का नाही.
नाही होऊ शकलं माझं लग्न, त्या व्यक्तीशी, ज्यांत माझी खूप मोठी भावनिक गुंतवणूक होती, प्रेम होतं, संसार त्याच्याच सोबत थाटावा अशी इच्छा होती, म्हणून काय झालं?
सहजीवन हवंहवंसं असतंच, पण ते नाही मिळालं, तर एक मनुष्य जगूच शकत नाही, हे मला कधीच पटत नाही.
सोबत मलाही हवी आहे जगताना, ती मी मिळवणारही आहे. पण तो माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न नाही. आज मी कमावते आहे, मित्र मैत्रिणींची सोबत आहे, थोडक्यात मी स्वतंत्र आणि खुशाल जगते आहे, आणि हेच माझं उद्दीष्ट आहे!
................................गाडी बीस मिनीट रुकेगा, किसीको खाना खानेका है तो खा लो जल्दी.....................................
ती पटकन खाली उतरली, कधी कधी विचारमंथनानेही हायसं वाटतं! तोच तजेला तिच्या चेहर्यावर दिसत होता, हवेने भुरभूरलेले केस सावरत, तिनं कॅन्टीन मधे पाऊल टाकलं! गरमागरम जेवण पोटात गेल्यावर तिला हुशारी आली.... चेहर्यावर पाण्याचे हबके मारून, ती पुन्हा जागेवर येऊन बसली...
....................आ गये क्या सब लोग? गिन लेता हू..... हां ठीक है, चल भई ड्राईव्हर, जल्दी मार गाडी..............................
प्रश्न, "आयुष्यात फक्त दगाच होतो, त्यामुळे कुणावर्च विश्वास ठेवायचा नाही" वगैरे नव्हताच कधी. पण आता विचारांना दिशा मिळाली आहे. जगताना करण्यासारखं खूप काही आहे, त्यात बिझनेसमधे जम बसतो आहे, सुमेघ माझ्या सोबत आहे. हे सगळं एकदा आई- बाबांना जाऊन सांगणार आहे....
त्यांना माझ्यासोबत मुंबईला येण्यास विनवणार आहे, माझं आहे तरी कोण त्यांच्याशिवाय? खूप वर्ष असं एकटं जगते आहे, आई बाबा सोबत असतील तर त्यांच्या तब्बेतीची चिंता नको, त्यांच्या सोबतीचा आनंद मिळेल.... पाहू मला किती जमतंय त्यांना समजावणं... तो वाडा विकावा आणि चिखलठाणं सोडावं, हाच एक उद्देश आहे भेटीचा. तडका- फडकी कदाचित होणारही नाही सगळं, पण माझा मानस मला त्यांना सांगायचाच आहे.
त्यांच्या म्हातारपणी, 'ते माझी जबाबदारी आहेत' ह्याची मला जाणिव आहे, हे त्यांना सांगायचंय मला.
शेवटी माझ्या बाबांचीच मी लेक! त्यांना घेऊन येईनच.
------------------------------------------------------------------------------------------------
"अल्पा....... अपू, माझं लेकरू!! किती रोडावली आहेस तू. काहीच न सांगता आलीस?"
आईच्या साश्रू मिठीने गेल्या काही वर्षांत मी किती गोष्टींना मुकले आहे, हे जाणवून दिलं!
बाबा अर्थातच बोलले नाहीत, पण माझ्या येण्याने त्यांच्या डोळ्यांत मला नाराजी दिसली नाही, ह्यातच सारं आलं!
मी यायला उशीरच केला, हेच वाटलं!
पण, गेल्या काही वर्षांनी मला जो आत्मविश्वास मिळवून दिला होता, त्यासाठी मी दिलेला इतका वेळ सार्थच होता, असंही वाटलं!
आईच्या सहवासात एक दिवस भुरर्कन उडाला, ती आनंदली होती. बाबांना तब्बीतीच्या बर्याच तक्रारी दिसत होत्या.... रात्री जेवताना मी जो उद्देश घेऊन आले, त्याबाबत मनमोकळं बोलले... कळकळीनं 'मला ते दोघे, मुंबईला येऊन रहायला हवे आहेत' हे सांगितलं. त्याही पुढे, मला भविष्यात काय करायचं आहे ते सांगितलं...बाबांचा होकार नकार काहीही नव्हता.
"आम्ही तिथे आलो, तर तू राजिनामा देणार?" आई.
"नाही आई, तुम्ही आल्यास मला नोकरी करता येईल, उलट"
"लग्न करणार नाहीसच म्हणजे" बाबा
".........."
"असो, सुमेघ कसा आहे? कधी येईल तो?" बाबा
"तो बरा आहे, नोकरीशिवाय येणार नाही म्हणातो"
"किती मानी आहे हे पोर" आई
"त्याला इतका राग आहे, अजूनही, माझा?" बाबा
"बाबा, तो खूप बदलला आहे, मेहनत करतो आहे फार, तुम्हाला तो जसा हवा आहे, तसा स्वतःला घडवतो आहे. माझी अगदी सावली बनून असतो तिकडे. पण..."
"पण?"
"पण, मनातून खूप कष्टी आहे तो. बाबा, त्याला लहानपणापासूनच तो ह्या घराचा दत्तकपुत्र आहे, हे सांगितलं असतं, तर त्याला असा जीवघेणा धक्का बसलाच नसता, तो फार दुखावला आहे"
पुढच्या चर्चेला ह्या रात्री तरी काही अर्थच नव्हता... सगळेच शांत झालो.
___________________________________________________________
क्रमशः
बागी पटपट... आता मस्त रंगत
बागी पटपट... आता मस्त रंगत येतेय वाचायला... उत्कंठा जास्त ताणू नको... आणि पुन्हा मागच्या भागांचं पारायणही करायला लावू नको... हा भाग विसरायच्या आत पुढचा भाग टाक... शाणी गो बाय माझी
कधी होणारेय ही पुर्ण
कधी होणारेय ही पुर्ण
बागेश्री ताई, कथानक छान आहे
बागेश्री ताई,
कथानक छान आहे तुम्ही लिहितायही छान. उत्सुकता वाढते आहे, पण आता थोडी लांबण लागतीये असं वाटतय. ६ व्या भागात आता काहीतरी जास्त घडेल अशी आशा आहे. लवकर पोस्टा.
पु.ले.शु.
मस्त
मस्त
मस्त ..
मस्त ..
मस्त चाललीय कथा. भागही पटापट
मस्त चाललीय कथा. भागही पटापट येतायत.
ऑल द बेस्ट!
वाह ! मस्त चालली आहे गोष्ट
वाह ! मस्त चालली आहे गोष्ट ..... लवकर येउ देत भाग !
राग कधी होणारेय ही
राग
कधी होणारेय ही पुर्ण
राग
>>
अगं गुंतागुंत आहे... सोडवायला वेळ लागणारच ना
क्रमश:
क्रमश:
चांगली वाटतेय कथा. पण कथा
चांगली वाटतेय कथा.
पण कथा लिहितेयस की कविता? असा प्रश्न पडतो उपमा/ उत्प्रेक्षा अलंकाराचा ठायी ठायी वापर टाळावा असे मला वाटते. कथाबीज चांगले आहे. दम खाऊन सावकाश कथेला पुढे ने. तुझ्याकडे शब्द आहेत, त्यांचा योग्य वापर कर. कथेतील ठळक प्रसंगांवर उड्या मारायची घाई नको.
हा रविवारचा "महाएपिसोड" एक
हा रविवारचा "महाएपिसोड" एक तासाचा... :स्मितः
वाचत आहे .असेच मोठेठे भाग
वाचत आहे .असेच मोठेठे भाग टाकावेत ही नम्र विनंती .
कोण आहे हा अविनाश ?
आता अविनाश च्या भेटीत काय होणार ?
अल्पा अविनाशला माफ करणार ? त्यांचे प्रेमसंबंध परत जुळणार ? अल्पा अवि बरोबर निघुन जाणार ?
पाहुयात गुंतागुंतच्या पुढील भागात ...
Mast suru ahe.. slow n
Mast suru ahe.. slow n steady..
. Pu. bha.pra.
आभारी आहे दोस्तहो.. चौकट
आभारी आहे दोस्तहो..
चौकट राजा, मी जरा घाईने कंक्लूजिव्ह भाग टाकले तर पात्रांचीच गुंतागुंत होईल...
त्यामुळे जाणूनबुजून प्लॉट जरा हळूवार उलगडते आहे, तरी रटाळ वाटल्यास कळवा, मला स्वतःला रटाळ कथा वाचायला जमत नाहीत, तेव्हा वाचकांना वाचताना बोरींग वाटू नये असाच कल आहे.
मंजूडी
यू पाँईंट इज व्हेरी वेल टेकन... थँक यू
बागेश्री, पाचव्या भागामधे
बागेश्री, पाचव्या भागामधे मधेच प्रथम पुरूषी निवेदन आणि मधेच तृतीय पुरूषी एकवचन का वापरलं गेलं आहे? त्याने कथा वाचताना थोडातरी जर्क बसतोय असं माझं मत. शक्य झालं तर पूर्ण कथा प्रथम पुरूषी एकवचनामधेच लिही. कारण, त्यामधे तुला तिची मानसिक आंदोलनं नीट पकडता येत आहेत, असं मला वाटतं.
पुढचा भाग लवकर लिहिणे.
बागेश्री, मस्त लिहिते
बागेश्री, मस्त लिहिते आहेस..पहिल्या भागात अल्पाच्या शुद्ध हरपण्याच्या प्रकाराला तिनेच महत्व दिल्यासारखे वाटत नाहीय अर्थात त्याचाही काही सिग्निफिकन्स असेल.. उत्सुकता वाढलीय.
नंदिनी, यू राईट! ती बोलताना
नंदिनी, यू राईट!
ती बोलताना आंदोलनं सहज व्यक्त करता येतात, म्हणूनच तिच्यावर कॅमेरा असताना आजुबाजूचा प्रसंग रंगवत कथा पुढे नेण्याचा फॉर्म येथे शेवट्पर्यंत ठेवणार आहे, जर्की न होईल ह्याची काळजी पुढे घेईन... लिहीताना पण टफ पडतं पण संपूर्ण कथा वाचताना नंतर मजा येईल असंही वाटतंय.... लेट्स सी.. हाऊ इट गोज
भारती, तुम्हीही वाचताय, सहीच
बागेश्री, तुझी कथालेखनाची
बागेश्री, तुझी कथालेखनाची प्रोसेस नक्की कशी चालू आहे ते जाणून घ्यायला आवडेल. मला ते तिच्यावर कॅमेरा अस्ताना वगैरे समजलं नाही म्हणून. इथेच न लिहिता कथालेखन चर्चा आणि संवाद बीबीवर लिही प्लीज.
भाग ६ पोस्ट केलाय..
भाग ६ पोस्ट केलाय..
सह्ही!
सह्ही!
मस्तच !!
मस्तच !!
मस्तच .. .नेहेमी प्रमाणे
मस्तच .. .नेहेमी प्रमाणे
<सगळे पासे पलटले.> कि फासे?
<सगळे पासे पलटले.> कि फासे?
मस्तच!!!
मस्तच!!!
छान आहे हा ही भाग... काही
छान आहे हा ही भाग... काही वाक्ये त्याच्या अंगाने लिहली गेलीत ते बघ जरा,
>>उशीरा सुटलेलं ऑफिस, बंद पडलेलं घड्याळ, अविचं भेटणं, शुद्ध हरवणं, रात्री शमाचा आणि आईचा फोन, आज सकाळीच बाँड बद्दलची बातमी, त्यात अवि नामक व्यक्तीला भेट्ण्याचा तिढा....>>>
या वाक्यांबद्दल धन्यवाद.. नाहीतर पुन्हा सगळं वाचावं लागलं असतं
मस्त! लवकर लिही गं ..
मस्त! लवकर लिही गं ..
हा भाग मस्त!
हा भाग मस्त!
मस्त!!!
मस्त!!!
मस्त.. उत्सुकता वाढते आहे.
मस्त.. उत्सुकता वाढते आहे. दोन प्रमुख पात्रांच्या नजरेतून प्रसंग लिहिण्याची तुमची स्टाईल आवडली. एक दोन सुचना कराव्याशा वाटतात..
अजून जरा स्पीड येऊद्यात. शमा बरोबरचा प्रसंग वाचताना कंटाळा आला कारण परत एकदा आधीचच रामायण होतं.. नंतरचाही प्रसंग थेट सुमेधच्या फोनने सुरु केला असता तरी चाललं असतं (हे मा वै म. टिका करायचा हेतू नाही )
पु.ले.शु.
वाह ! हा भाग ही छान होता
वाह !
हा भाग ही छान होता
आपल्याला भविष्यात काय साधायचंय ह्याची गणितं पक्की असली की, भूतकाळातले फसलेले हिशोब त्रास देत नाहीत, >>>> हे वाक्य पटले नाही पण आवडले !!
( शिवाय प्रत्येक भागात बोलणारा/री " मी " कधी अल्पा आहे तर कधी अविनाश हे समजायला जरा कठिण वाटलं )
"कसला निर्णय हवा तुला अविनाश??"
>>> हाच प्रश्न मलाही पडला ...अन पुढच्याच वाक्यातील बाऊंन्सरवर चाट पटलो ... नीच माणुस आहे का हा अविनाश ???
क्युरियॉसिटी रायसिंग ......
असो
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!
Pages