महाराष्ट्रीय मंडळ - मल्लखांब प्रात्यक्षिके

Submitted by हर्पेन on 2 March, 2013 - 12:19

सर्वसाधारणपणे पुण्याची ओळख ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून असली तरी त्याच पुण्यात खेळासंदर्भातल्या अनेकानेक उत्तम संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळ (ममं) ही त्यापैकीच एक अग्रगण्य संस्था.

आपल्या मातीतला मल्लखांब हा खेळ तिथे अजूनही शिकवला जातो. सध्या माझा मुलगा तिथे हा खेळ शिकायला जातो आहे. त्यामुळे मंडळाच्या वार्षीक कार्यक्रमाचा भागांतर्गत झालेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थित रहायचा योग आला होता. त्या वेळी काढलेली ही प्रकाशचित्रे.

Mallakhamb 1.JPGMallakhamb 2.JPGMallakhamb 3.JPGMallakhamb 4.JPGMallakhamb 5.JPGMallakhamb 6.JPGMallakhamb 7.JPGMallakhamb 8.JPG

रच्याकने - मी स्वतःदेखील माझ्या लहानपणी महाराष्ट्रीय मंडळ मधे ज्याला आम्ही नुसतेच मंडळ म्हणायचो, सर्वसाधारण गटामधे खेळायला जायचो. या सर्वसाधारण गटात कुठलाही एक खेळप्रकार न शिकवता, कवायत, सुर्यनमस्कार, लेझीम तसेच लंगडी-खोखो सारखी इतरही अनेक खेळ असा कार्यक्रम असायचा.

आमचे मंडळ म्हणजे बॅड्मिंटन, व्हॉलीबॉल, हँड्बॉल, ज्युदो, मल्लखांब (नेहेमीचा व दोरीवरचा), जिमनॅस्टीक तसेच कुस्ती (आखाडा), तालीम, पोहोणे (टँक छोटाच आहे, पण विहीर आहे) अशा अनेकविध खेळांकरता खेळण्याची व/ प्रशिक्षणाची सुविधा एकाच मध्यवर्ती ठिकाणी मिळण्याची एक सुंदर जागा आहे. माझ्या आठवणी प्रमाणे १९८२च्या एशियाड मधे भारताच्या मुलींच्या जिमनॅस्टीक संघात एकूण सहा पैकी दोन मुली मंडळातल्या होत्या. एशीयाड मधल्या महाराष्ट्राच्या लेझीम चमूत देखील मंडळातले अनेक जण होते. मंडळातल्या मुली लेझमीच्या दांड्यास दोन्ही बाजूस आग लावून, लेझीम खेळण्याचे प्रात्यक्षीक देत असत.

मंडळाच्या वार्षीक कार्यक्रमाचा भाग म्हणून होणारी नाटके व जिलबी खाण्याच्या चढाओढीने नवनवीन विक्रम स्थापीत करत संपन्न होणारे जेवण ही पण एक खासीयत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन,

अरे वा, पुण्यात असं काही भरपूर बघायला मिळतं. नाहीतर सांस्कृतिक उपराजधानीत बघा (म्हणजे ठाण्यात हो!) शिंचं मोकळं मैदानही नाही!

तुमचं आणि तुमच्या मुलाचं अभिनंदन! आपले देशी व्यायामप्रकार आपणच उचलून धरले पाहिजेत.

बाकी, ममं या संक्षिप्तरूपावरून खाण्याची आठवण झाली. Lol तीस शेवटल्या परिच्छेदात यथोचित रीतीने प्रतिनिधित्व मिळाल्यासारखे वाटते! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद गापै. - अहो ठाण्यात देखिल आहेत की क्रीडासंकूल, सरस्वती हायस्कूलचे आहे, स्टेडीयम आहे....
हो पण अर्थात पुणे ते पुणेच....:)

माझी शाळा - शाळेत असताना दर १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच्या कार्यक्रमांमध्ये मल्लखांबाची प्रात्याक्षिके व लेझीम बघायला मिळायचे.

इथे संध्याकाळी ground वर मी पण जायचे रोज. मजा यायची. परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
त्या जिम्नेस्टिक group मधे माझी मावस बहीण होती.

मस्त !!!

एकदम भूतकाळात घेऊन गेलात की!
मंडळ, भालूकाका, संध्याकाळचे खेळ, कुठे पडलं/लागलं की त्या शाळेशेजारच्या ऑफिसमधे जाऊन लावलेलं -हायहुई करायला लावणारं आयोडिन, उन्हाळी पोहण्याचे वर्ग आणि त्या विहिरीची वाटणारी भीती, पाऊस पडत असला की मोठ्या हॉलमधे जमून भालूकाका नमस्कार घालायला लावायचे आणि कसलेकसले खेळ घ्यायचे ते, दर वर्षीची नाटकं आणि जेवण, आणि संध्याकाळी घरी परतायच्या आधी 'आनंदकंद ऐसा' ही प्रार्थना....... Happy

सर्व प्रतिसादकांचे आभार!

प्राजक्ता - अगं पहिल्या दोन फोटोंमधे मल्लखांबाच्या पार वर बसलेल्या दादाच्या खांद्यावर बसलाय ना हात डोक्यावर जोडून, तो - अद्वैत आहे.

वरदा - मी काय आणिक आपल्याला भूतकाळात घेऊन जाणार? जरा अर्वाचिन काळातच आणलंय.... Happy

छान पिरॅमिडस केलेत.
हा मल्लखांब प्रकार मला खुप आवडतो. आमच्या शाळेत श्री सुहास पाठारे शिकवत असत, पण त्यावेळी माझे वय वाढल्याने शिकता आले नाही. ( ती खंत आजही आहे. ) दोरीचा मल्लखांब, टांगता मल्लखांब असेही प्रकार असायचे.

हो दिनेशदा, मला देखील वाढल्या वयामुळे (मी मंडळात पाचवीत असताना जायला लागलो) हा खेळ शिकता आला नाही Sad ,
आणि हो मंडळातपण दोरीचा आणि टांगता मल्लखांब शिकवतात.

छान!!!

हर्पेन, फक्त कल्पना येण्यासाठी,
निराधार मल्लखांब असा असतो,

niradhar mallakhamb.png

प्रात्यक्षिक करणार्‍याचं वजन आणि मल्लखांबाचा अक्ष सांभाळत मल्लखांब कलू न देता प्रात्यक्षिकं करणं किंवा करताना पाहणंही रोमांचकारी असतं. Happy

आणि बाटलीवरचा मल्लखांब म्हणजे काचेच्या बाटल्यांवर मल्लखांबाची लाकडी चौकट ठेवून त्यावर प्रात्यक्षिकं करतात.

मंजूडी - निराधार मल्लखांब - बाप रे! अशक्य, कल्पनातीत या गटातला आहे. हा कसा माहीत झाला आणि कुठे बघायला मिळेल?

आणि हे समजावून सांगण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद!

हा कसा माहीत झाला >>> बालपणीच, प्रत्यक्ष केल्याने! Proud

'निराधार मल्लखांब' या खेळाच्या स्पर्धा होत नसत, केवळ प्रात्यक्षिकं होत असत. हा खेळ शिकवणारे आणि त्याचा प्रसार करणारे 'बाणे गुरुजी' नावाचे एक थोर शिक्षक होते, ते आता हयात नाहीत. परंतु त्यांनी शिकवून तयार केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी ना कोणी तरी असेलच. महाराष्ट्र मंडळातच चौकशी करा, माहिती मिळेल.