मनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा- नंदा प्रधान
“झालं पूर्ण वाचून?” आईने विचारलं.
“नाही.पहिली तीन-चार प्रकरणं वाचली, आवडलं मला खरंच!...पण पूर्णच नाही होत वाचून, का कोण जाणे?” मी किंचित रडवेल्या सुरात म्हणाले.
सातवीत असताना हे दोन-तीन वेळा झालं. पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ मी लायब्ररीतून आणून परत केलं होतं. भरल्या पोटी बळेबळेच पानावर बसवल्यावर पोळीचे चार घास तोडून पान बाजूला सारावं तसं. दर वेळी मी नारायण, हरितात्या, नामू परीट आणि गटणे वाचायचे. त्यानंतरची दोन पानं वाचून गाडी अडकायची आणि पुस्तक अर्धवट रहायचं. आणि ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरं हातात घेणं सवयीला मानवणारं नव्हतं!
चौथीत असताना आईने वाचून दाखवलेला ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधला ‘नारायण’ तेव्हाही डोळ्यात पाणी आणायचा. हरितात्यांची वाक्य एव्हाना रोजच्या बोलण्यात विराजमान झाली होती. ‘नामू परिटासारखा आमच्या राजूने इस्त्रीला दिलेला यूनिफॉर्म लाटला तर?’ अशी त्याच पुस्तकातून उसनी घेतलेली भीती वाटायची. तो सखाराम गटणे वाचल्या वाचल्या तो माझ्या वर्गातल्या कोणासारखा आहे हे जाणवलं होतं...पण ही पाचवी व्यक्तिरेखा आड येत होती. नंदा प्रधान. दोन पानं झाली तरी या व्यक्तीच्या बाबतीत काही ‘घडत’ का नाही? नंदा प्रधान मला ‘झेपत’ का नाही? असा माझा त्रागा व्हायला लागला होता.
शेवटी निर्धाराने सगळ्या वल्लींना पुन्हा माझ्या दिमतीला बोलावून घेतलं, आणि पुढची व्यक्तिचित्र वाचायची म्हणून का होईना, नंदा प्रधान हे प्रकरण निपटायचं ठरवलं. वाचलं! आता ‘गंपू’, ‘चितळे मास्तर’, ‘पेस्तन काका’ यांना भेटायची परवानगी मी स्वतःला बहाल करू शकत होते! ही बाकी मंडळी कायम सगळ्यांच्या चर्चेत असतात. शाळेत नाटकाचा प्रवेश, उतार्याचं वाचन, कथाकथन अशा या ना त्या निमित्ताने ती सतत भेटत रहातात. पण नंदाबद्दल कधीच कोणी बोललं नाही. मीही पुन्हा कोणाजवळ विषय काढला नाही, कारण मी नंदा वाचला नव्हता, मी नंदा पार पाडला होता!
मला ‘आपल्या जगातला’ वाटावा असा नव्हता नंदा... त्याचे निळे डोळे, रुबाबदार चर्या, कुरळे केस हे वर्णन तेवढं मला गोष्टीतून ‘शिकवलेल्या’ राजकुमारांचं वाटायचं! तोवर वाचलेल्या पुस्तकांमधली अमुक एक गोष्ट आवडली नाही असं माझं मलाच कधी जाणवलं नव्हतं. त्यामुळे बाकी वल्लींच्या पंगतीत बसायचा मान नंदाला का मिळाला तर मग मला तो का नाही आवडला? तो विक्षिप्त का वाटतो? आणि मुळात मला तो ‘उमजत’ का नाही? असे प्रश्न रुंजी घालायला लागले. नावडीची कारणं शोधायच्या नादात नंदाबद्दलचं वाक्य न् वाक्य पिंजून काढलं...आणि त्याच प्रयत्नात त्याची हलकीशी सावली हातात पकडावी अशा अंतरावर दिसायला लागली. मग हळुहळू नंदा सापडत गेला...
नंदा प्रधान. त्याचा देखणेपणा, अबोलपणा आणि ऐट सगळ्यात आधी जाणवतात. मग त्याच्या वागण्यातली सहजता आणि भुरळ पाडणारी काहीशी जादू! त्याचं ते तुटक, स्वतःशीच बोलल्यागत बोलणं... त्याच्याशी बोलता बोलता काळीज चिरत जाणार्या गोष्टी उलगडत जात होत्या. नंदाला घर नव्हतं. त्याच्या आईने दुसरा घरोबा केला होता, दारुच्या आहारी जाऊन वडिलांनी प्राण सोडले होते. आईने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन झाले. त्याचं अर्धवट आणि अधांतरी बालपण कुठल्याशा आयांच्या सानिध्यात गेलं होतं. आणि कुठल्यातरी कर्मधर्मसंयोगाने त्याची ‘पुरुषोत्तम’शी मैत्री झाली होती.
ह्या गोष्टीतला पुरुषोत्तम म्हणजे खरं तर कुठलाही सामान्य माणूस. कोणीतरी आखून दिलेल्या चौकटीत जगायची सवय असलेला. नंदाने दुसर्या महायुद्धाच्या काळात युरोपमध्ये रहाणं, तिथे लग्न करणं, तो सगळा वृत्तांत अलिप्तपणे सांगणं ह्या पुरुषोत्तमच्या दृष्टीने कधी भयाण आणि कधी नुसत्या जगावेगळ्या गोष्टी होत्या...पण त्यावर कधी त्याने मत दिलं नाही की judgement बाळगलं नाही. तो नंदाचं फक्त ऐकत गेला! नंदाच्या मागोमाग इंदू वेलणकरकडे तिचं अभिनंदन करायला, त्याच्या मागोमाग मोरेटोमधे जेवायला, त्याच्या शानदार गाडीतून मुंबईच्या आलिशान भागात, आणि त्याच्या चमत्कारीक बोलण्यातून त्याच्याच जगात असा तो फक्त जात राहिला. नंदाच्या अस्तित्त्वाने कठपुतळी झाल्यासारखा!
बाराव्या वर्षी नंदा माझ्या भोवती नव्हता. त्या शब्दांचं मूर्त रूप मी आजवर पाहिलं नव्हतं. त्याच्याबद्दलच्या प्रत्येक ओळीत त्याला समजून घ्यावं लागत होतं, त्याच्या विक्षिप्तपणाला सूट द्यावी लागत होती, आणि सातवीत असताना मला ते शक्य होत नव्हतं. तेव्हा माझे सगळे मित्र-मैत्रिणी माझ्या‘सारखे’ होते. चार जणींनी गुलाबी हेअरबॅंड आणले म्हणून मलाही तसाच हवा असं वाटण्याचे दिवस होते. चकचकीत शाईपेनांनी लिहिणार्या वर्गात शेजारच्या रांगेतला एकच मुलगा टोपण नसलेल्या बॉलपेनाने लिहितो म्हणून तो विचित्र वाटायचा. त्यामुळे आपल्या लहानशा परिघाबाहेरच्या कल्पना आणि चौकटीबाहेरच्या व्यक्तीही छान असू शकतात हे कळत नव्हतं!
...पण एक गोष्ट नक्की! नंदा माझ्यात कुठेतरी ‘save’ झाला होता. कुठल्यातरी पुरचुंडीत त्याला घेऊन फिरत होते मी. पुढच्या दोन वर्षातच ठाण्याहून लंडनला गेल्यावर एका रात्रीत माझं जग अजस्त्र होणार होतं. खर्याखुर्या जगातली माझ्या‘सारखी’ नसलेली पण तितकीच खरीखुरी माणसं भेटणार होती. त्यांच्यातलं प्रेम आणि चांगुलपणा टिपायला मला पुरुषोत्तम होऊन नंदा नावाच्या वेगळेपणाचं बोट धरायला लागणार होतं.
“व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र विशेष नामं नसून सामान्य नामं आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ती व्यक्ती असतेच.” असं एकदा पु.ल. म्हणाले होते. नंदाच्या बाबतीत हे खरं असणं शक्यच नाही ही माझी ठाम समजूत होती. इतक्या अजब गोष्टी एकाच माणसाच्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात एकत्र घडून यायला नियती आणि स्टॅटिस्टिक्स ह्या दोन्हींचे फासे किती विचित्र पडायला लागतील! पण नंदा हे खरंच सामान्य नाम का आहे हे आत्ता आत्ता जाणवायला लागलंय. आपल्यासमोर येणारी आपल्यासारखी नसलेली, आणि तरीही कुठल्याशा गूढ धाग्याने आपल्याशी कायमची बांधली गेलेली कोणीही व्यक्ती!
असे कितीतरी नंदा या ना त्या रुपात भेटत राहिले. स्वत:च्या बाबांच्या दुसर्या लग्नाला भेटवस्तू घेऊन आईबरोबर जाणारी जेसिका म्हणजे नंदा आहे. ‘आजी-आजोबांच्या ख्रिश्चॅनिटीवर माझा विश्वास नाही’ असं म्हणणारा डॅनिअल म्हणजे नंदा आहे. आईशी पटत नाही म्हणून सोळाव्या वर्षी घर सोडून जाणारी, पण mother’s day च्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत आईला कार्ड पोहोचलंच पाहिजे म्हणून खटाटोप करणारी स्टेफनी म्हणजे नंदा आहे. घरून हमखास विरोध होईल म्हणून एकोणीसाव्या वर्षी लग्न करणारे शायान आणि सोफिया म्हणजे नंदा आहेत. एरवी कोणाशीही सहज जुळवून घेणारी, पण ‘मला माश्याचा वासही चालणार नाही’ म्हणून हॉस्टेलमधे एक वेगळा फ्रिज मागून घेणारी रेवती म्हणजे नंदा आहे...आणि पहाटे दोन वाजता तडक उठून नदीवर फिरायला जाणारी माझ्यातली मी म्हणजेसुद्धा नंदाच आहे! एका अर्थी आम्ही सगळेच एकमेकांचे नंदा होतो!
पुस्तकातल्या वल्लींमधला नंदा वेगळा वाटतो कारण बाकीच्या वल्लींसारखा तो आपल्या परिघात आपोआप येत नाही! त्याला आपल्या परिघात घ्यावं लागतं. त्याच्या जगावेगळ्या जडणघडणीला आपल्या मनात जागा द्यावी लागते. “जगात काहीच नाही रे” किंवा “जन्म आणि मृत्यूच्या मधे अडथळा म्हणून येत रहातं ते जगणं!” ही नंदा प्रधानाच्या तोंडची वाक्य समजण्याची ताकद मात्र अजूनही आली नाहीये माझ्यात! पुलंनी ज्यांच्या अस्तित्त्वाला शब्द दिले अशा असंख्य पात्रांशी मी स्वतःला सहज जोडू शकले. “हे अगदी अस्संच होतं ना?”, किंवा “शप्पथ, आपले शेजारी म्हणजे सेऽऽम ‘ते चौकोनी कुटुंब’ आहे!” असं पट्कन वाटतं. म्हणून ती पात्र लगेच माझी होतात. आवडतात. आणि नंदा? ज्या वेगळेपणामुळे तो सुरुवातीला आवडायचा नाही, त्याच वेगळेपणामुळे आता बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतो. त्याच्याबद्दल मत बाळगायचं नसतं, त्याच्याकडून अपेक्षा ठेवायची नसते, किंवा त्याच्या वागण्याची कारणं शोधायची नसतात. त्याचं फक्त ऐकायचं असतं आणि स्वीकारायचं असतं!
पुलंच्या निरीक्षण शक्तीला, भाषेला, आणि त्यांनी दिलेल्या ‘नंदा प्रधान’ नावाच्या दृष्टीला सतत नव्याने मुजरा करावासा वाटतो. नंदाशी माझी ओळख होऊन आज अकरा वर्ष झाली, आणि त्या अकरा वर्षात त्याच्याबद्दल अगदी ठामपणे म्हणावी अशी एकच गोष्ट माझ्याकडे आहे... नंदा मला कितीही आवडला तरी तो कधीच पूर्ण ‘समजणार’ नाही... कारण न समजणार्या प्रत्येकाला मी नंदा मानत जायला लागले आहे...
-Arnika
(No subject)
भारी लिहीलंय्..आवड्लं
भारी लिहीलंय्..आवड्लं
सुंदर लेख, ती प्रत्येक वल्ली
सुंदर लेख, ती प्रत्येक वल्ली आपल्याला आपल्या भोवताली आढळली असल्यासारखे वाटते, तरी पुर्ण समजली असे वाटतच नाही.
मस्त लिहलंय!!!
मस्त लिहलंय!!!
नंदा प्रधान ही व्यक्तीरेखा
नंदा प्रधान ही व्यक्तीरेखा कळायला आपल्या अनुभवांची व्याप्ती वाढावी लागते हे खरेच!
अर्थात असे नंदा आजूबाजूला दिसू/भेटू लागतात तेव्हा त्यांना स्विकारायला सोपे जाण्याचे कारण म्हणजे नंदा प्रधानाशी आपली आधीपासूनची ओळख.
मस्त लिहीले आहे. आवडले. नंदा
मस्त लिहीले आहे. आवडले.
नंदा मला नेहमी "कवी (पु.ल.) कल्पना" च वाटत आलाय. चौघीजणी मधली बेथही तशीच. अशी माणसे खरच असतात असे वाटतच नाही.
अर्निका,खूप दिवसांनी एका
अर्निका,खूप दिवसांनी एका 'व्यक्ती'ची आठवण दिलीत. तीही किती समर्पक शब्दात !
नंदा तर वेगळा आहेच, त्याला चितारताना पुलंचाही वेगळाच स्वर लागलाय. विनोदाचा फारसा घाट घातलेला नाही किंवा साचेबंद कारुण्याचाही. पुलंमधला कवी जागलाय एक जगावेगळी प्रेमकथा ,तिच्याआतली कविता लिहिताना.रंगून वाचताना तर त्यातले प्रसंग सिनेमातल्या सारखे 'दिसतात'..
अरे वा, माझ्या आवडत्या
अरे वा, माझ्या आवडत्या व्यक्तिरेखेबद्दल लिहीलय
आवडल एकदम
Arnika, संयोजकांच्या आवाहनाला
Arnika, संयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लेख लिहिल्याबद्दल आपल्याला आमच्यातर्फे एक छोटीशी भेट
अर्निका, लेख आवडला. नंदा
अर्निका, लेख आवडला. नंदा प्रधान ही माझीही आवडती कॅरॅक्टर.
आवडलं.
आवडलं.
छान.
छान.
लेख खुप आवडला .. अगदी मस्त
लेख खुप आवडला .. अगदी मस्त लिहीलंय ..
>>नंदा मला कितीही आवडला तरी
>>नंदा मला कितीही आवडला तरी तो कधीच पूर्ण ‘समजणार’ नाही... कारण न समजणार्या प्रत्येकाला मी नंदा मानत जायला लागले आहे...
well said... आवडला लेख....
सुरेखच लिहिलय अर्निका. खूप
सुरेखच लिहिलय अर्निका. खूप आवडलं.
नंदा नव्याने उलगडला. तुमची
नंदा नव्याने उलगडला. तुमची लेखनशैली सुरेख आहे.
भरपूर लिहा या शुभेच्छा!
छान लिहिलंय अर्निका
छान लिहिलंय अर्निका
मस्त लिहीले आहे!
मस्त लिहीले आहे!
मस्त लिहिलं आहेस अर्निका,
मस्त लिहिलं आहेस अर्निका, अगदी मनापासून!
अर्निका, खुप आवडलं. लेखनशैली
अर्निका, खुप आवडलं. लेखनशैली नेहमी सारखीच सुरेख..
खूप छान.
खूप छान.
हे राहिलं होतं वाचायचं. सुरेख लिहिलं आहे.
खरंच, काय सुंदर लिहिलं आहे.
खरंच, काय सुंदर लिहिलं आहे.
आपल्या रोजच्या, ठराविक चौकटीच्या पलीकडचा माणूसही 'चांगला' असू शकतो, आपला मित्र होऊ शकतो हे कळलं की नंदा प्रधान खरा वाटायला लागतो. बरोबर आहे. असा विचार कधी केला नव्हता
आज पुलंची जन्मशताब्दी. पुलं आणि सुनीताबाईंंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!