पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्याच पायर्या असतात असं मला कायम वाटतं. अगदी सुरुवातीला शालेय वयात पुलं म्हणजे नुसती धमाल, जागच्याजागी उड्या मारायला लावेल असा विनोद आणि शुद्ध, निखळ मनोरंजन यापेक्षा जास्त काही जाणवलं नव्हतं. पण हे जे काही होतं तेच इतकं भरुन आणि भारुन टाकणारं होतं की त्याची झिंग अजूनही थोडी आहेच. मित्रांशी वाद रंगलेला असतो आणि मधेच एकदम कोणीतरी म्हणतो; 'बाबारे तुझं जग निराळं आणि माझं निराळं', आणि कसलाही संदर्भ देण्याची गरज न लागता ठसका लागेपर्यंत हसू मात्र येते, हे पुलंचा हँगओव्हर न उतरल्याचेच लक्षण! मुळात असा संदर्भ झटक्यात समजणारा तो मित्र अशीही व्याख्या करायला हरकत नाही.
विनोदाच्या या धुंदीत शाळकरी वयात तरी व्यक्ती आणि वल्लीमधल्या काही व्यक्तिरेखा समजल्याच नव्हत्या. आपल्या आजूबाजूला वावरणारे 'दोन उस्ताद' दिसले नव्हते की जनार्दन नारो शिंगणापूरकरचे दु:खही टोचले नव्हते. आज हे लेखन किंवा अगदी नारायण, हरितात्यासारखे 'व्यवच्छेदक' पुलं पुन्हा वाचताना आधी न कळलेला एखादा नवाच पैलू दिसतो. पण त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा मात्र मी तेंव्हा 'यात काय मजा नाही' म्हणून एका पानातच सोडली ती म्हणजे 'लखू रिसबूड'. आज मात्र पुलंनी रंगवलेल्या सगळ्या गोतावळ्यातील सर्वात अस्सल माणूस हाच आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. अगदी नंदा प्रधानपेक्षाही हा माणूस जास्त खरा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करुणही.
लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. तो आदिम, पुरातन आहे. लखू खरेतर एक व्यक्ती नाहीच ती एक प्रवृत्ती आहे, एक अॅटीट्यूड, एक सिस्टीम. जगातील सर्व शारिर सुखांची हाव असलेला माणूस. कशालाच सर्व शक्तीनिशी भिडायला घाबरणारा. सतत न्यूनगंडाने पछाडलेला आणि त्यावर मात करण्यासाठी भाडोत्री विचारांची फौज गोळा करणारा. त्याला काहीच पूर्ण कळतं नाही, आवडत नाही, पचत नाही. कुठल्याच विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव नाही. त्याला कसलाही सखोल अभ्यास नको आहे. स्वतंत्र, मूलभूत आणि निखळ विचार त्याला जमू शकतो पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट त्याला नको आहेत. प्रत्येक ग्रेटनेसवर थुंकण्याची त्याला आवड आहे. त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी.
पुलंनी ही व्यक्तिरेखा कधी आणि कोणाच्या संदर्भाने लिहिली ते माहिती नाही पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. ज्याला टागोर 'पटत नाही' असा सुरेश बोचके, 'गोदूची वाट' साऱखे प्रयोग, अगदी धोंडो भिकाजी जोशीही याचेच एक स्वरुप आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी खर्या पुलंच्या मनातली अशा प्रवृत्तींविषयीची आत्यंतिक चीड सोयिस्करपणे दुर्लक्षली, त्यात मी ही एक होतो.
याच भ्रमात आयुष्य गेलेही असते, काय सांगावे सुखाचेही झाले असते, पण सुदैवाने तसे झाले नाही. पदवीच्या दुसर्या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो. आधी बर्यापैकी असलेले वाचनही बंद पडत चाललेले किंवा उगाच चर्चेत नावं भिरकावण्यापुरते. अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. या रिअॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.पाच पैशाचेही काम न करता आलेला फुकटचा सिनिक आव गळून पडला. आपल्याला खरचं काय कळतं? काय समजतं? काय आवडतं? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कठोर आत्मपरिक्षणाला सुरुवात झाली जे अजूनही चालू आहे. ही दिशाहीनतेची जाणिव झाली नसती तर आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता.
आज आयुष्यात फार काही भरीव केले आहे किंवा फार काही ज्ञान झाले आहे असे म्हणण्याचा फालतूपणा करणार नाही पण निदान उथळपणाला बांध बसला हे खरेच. समोरच्यामधला भंपकपणा पटकन जाणवायला लागला पण एका पातळीपर्यंत तो सहन करण्याची वृत्तीही आली. सर्वात महत्त्वाचे त्त्वा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हे मान्य करण्याचा प्रांजळपणा आणि असे केवळ मान्य करण्याने फार काही ग्रेट साध्य झालेले नसते ही अक्कल नक्कीच आली आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, शाम मनोहरांच्या 'कळ' मधला 'अंधारात बसलेला मठ्ठ काळा बैल' वाचत होतो. प्रचंड आवडले ते. आसपासची अशी अनेक माणसे आठवली. आपणही असेच पोकळ झालो असतो, पण पुलंनी वाचवलं हे मनात आलं आणि त्यांच्या लखू रिसबूडला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिले.
- आगाऊ
*
*
सुंदर लिहिलय.
सुंदर लिहिलय.
छान च लेख. अजुन जास्त लिहु
छान च लेख. अजुन जास्त लिहु शकतोस तु.
<पदवीच्या दुसर्या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो<> करेक्ट विश्लेषण केलेस त्या दिवसातील तुझे.
अभिनंदन!
>>या रिअॅलिटी चेकसाठी मी
>>या रिअॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.
अगदी अगदी!
बाकी लेख- ऊत्कृष्टच! ईतक्या मोजक्या शब्दात ईतकं काही आशयघन लिहीणं कसं काय जमतं बा?
'लखू रिसबूड' तुझा लेख वाचल्यावर अधिक जवळचा वाटतोय..
आवडलं
आवडलं
अप्रतिम.... अतिशय प्रामाणिक
अप्रतिम....
अतिशय प्रामाणिक लेखन ! आवडलंच
सुरेख लिहिलंय ईतक्या मोजक्या
सुरेख लिहिलंय
ईतक्या मोजक्या शब्दात ईतकं काही आशयघन लिहीणं कसं काय जमतं बा? >>>>+१
छान रे आगावा!! रिअॅलिटी चेक
छान रे आगावा!! रिअॅलिटी चेक आवडला.. बहोत खूब!!!
सुंदर.
सुंदर.
सुंदर! अगदी मनातल्याला
सुंदर! अगदी मनातल्याला शब्दरूप दिलंस.
सुंदर ! फार आवडलं.
सुंदर ! फार आवडलं.
जबरीच. लखूबद्दल आणखी तपशील
जबरीच. लखूबद्दल आणखी तपशील आवडले असते.
छान लिहिलय
छान लिहिलय
जबरदस्त! खूप आवडलं.
जबरदस्त! खूप आवडलं.
छान लिहिलयं , पण अर्धवट
छान लिहिलयं , पण अर्धवट सोडल्यासारखं का वाटतयं मला ?
काय जबरी लिहीले आहेस आगाउ!
काय जबरी लिहीले आहेस आगाउ! एकदम आवडले.
पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्याच पायर्या असतात असं मला कायम वाटतं. >>> १००% सहमत!
आगाऊ, संयोजकांच्या आवाहनाला
आगाऊ, संयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लेख लिहिल्याबद्दल, आपल्याला आमच्यातर्फे एक छोटी भेटः
थोडक्यात मस्तच लिहिलंय.....
थोडक्यात मस्तच लिहिलंय..... आवडलं.
प्रतिभावान लेखकाने रेखाटलेली व्यक्तिरेखा वाचकाच्या जीवनाला इतकी मार्गदर्शक ठरू शकते हे त्या लेखकाचं यश तर आहेच; पण त्याहीपेक्षा वाचकाची क्षमता अधिक महत्वाची आहे असे वैम.
थोडक्यात पण सुंदर लिहिलय.
थोडक्यात पण सुंदर लिहिलय.
सुरेख. लखू रिसबूडच्या
सुरेख. लखू रिसबूडच्या निमित्ताने स्वतःकडे बघण्याची तटस्थ वृत्ती आली किंवा आहे याची जाणीव झाली याबाबतचं हे चिंतन खूप भावलं.
नेमकं लिहीलंय!! आवडलं .
नेमकं लिहीलंय!!
आवडलं .
अफलातून लिहिलय रे ! "पण
अफलातून लिहिलय रे ! "पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. " ह्यासाठी प्रचंड टाळ्या.
अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. >> पुलंच्या बर्याच व्यक्तिरेखा वाचताना हि जाणीव येत राहते रे. आपण जीवापाड प्रेम केलय ह्या माणसाच्या लिखाणावर म्हणून असे होते कि अजून काय हे देवच जाणे.
सुरेख लिहिलंय !
सुरेख लिहिलंय !
अतिषय प्रामाणिक
अतिषय प्रामाणिक
आगाऊ, सुमार दर्जाचे लोक
आगाऊ,
सुमार दर्जाचे लोक सर्वत्र आहेत. विशेषत: पत्रकारिता क्षेत्रात तर त्यांचा धुमाकूळ विचारायलाच नको. या पार्श्वभूमीवर आपला प्रामाणिकपण आवडला. पुलंची मराठी जगतावर असलेली ऋणं अशीच निदर्शनास आणून द्या. अधिक वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
छान लिहिलं आहे.. शब्दमर्यादा
छान लिहिलं आहे..
शब्दमर्यादा वगैरे होती का या 'मनमोकळं' ला? अजून वाचायला आवडलं असतं ल.रि. बद्दल
"पण 'मिडीऑकर' या शब्दालाच
"पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. >> अगदी !
तुझा लेख छान झालाय.
आपण जीवापाड प्रेम केलय ह्या माणसाच्या लिखाणावर म्हणून असे होते कि अजून काय हे देवच जाणे. >>> असाम्या, कदाचित, ती माणसे प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला दिसत असतात म्हणून.
आगावा, मी माझ्या बॅचमेटसना या
आगावा, मी माझ्या बॅचमेटसना या लेखाची लिंक ई-मेलनं पाठवली होती. त्यांच्यापैकी एकाचा हा प्रतिसाद (त्यानं इथं पेस्ट करण्याची विनंती केली आहे.)
---------------------------------
लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. .....त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी. >>>
२०० % अनुमोदन. पुलंनी अनेक व्यक्तिरेखा आपल्या लेखणीच्या माध्यमातून जिवंत केल्या. प्रत्येक वल्ली तशी जबरदस्तच आहे परंतु बर्याच व्यक्तींच्या आयुष्यात एक सतत घडणारे द्वंद्व आहे. त्यामुळे त्या जरी खूप आकर्षक वाटत असल्या तरी सत्यापासून कणभर दूर आहेत. या सर्व वल्लींमध्ये लखू रिसबूड आणि तो ...या दोनच आरशातील आपल्या प्रतिबिंबात अधून मधून डोकावणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. काही प्रमाणात नाथा कामत , परोपकारी गंपू, नारायण, बापू काणे ...या आपल्या आजूबाजूला मुबलकपणे आढळतात. नंदा प्रधान ही मात्र परीकथेतून आलेली आणि दुखः देखील ग्लॅमरस करून टाकणारी नियोगी व्यक्तिरेखा आहे.
पण लखू हा टिपिकल लोअर मिडल क्लास मधील आणि सतत अप्पर क्लासशी मनोमन आपली बरोबरी करून त्यामधून निर्माण होणारें दुखः सुखवीत बसणारा माणूस आहे. सर्वात जबरदस्त निरीक्षण म्हणजे "लखू वरदापेक्षा तिच्या आई कडे अधिक जास्त चोरून बघत असे " आणि लखूला " प्लीज बी सीटेड मिस्टर रिसबूड " असे म्हणून वरदा जेंव्हा आपल्या भावाला " राघवेन्द्रा तुझा मित्र आला " असे इंग्लिश मध्ये सांगत असे, ते ऐकून लखू दुसर्या दिवशी लायब्ररी मधून इंग्लिश स्पिकिंग ची पुस्तके आणत असे ....जबरदस्त व्यक्ती निरीक्षण . ( याचाच एक धागा सखाराम गटणे मध्ये देखील आहे -अशी मुले पुढे जावून , श्रीमंताची नुसतीच गोरी म्हणून सुंदर अश्या मुलीच्या प्रेमात पडतात )
याच भ्रमात आयुष्य गेलेही असते...आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता. >>>
त्रिवार सत्य त्रिवार सत्य ....
मी देखील ही व्यक्तिरेखा आपल्या मध्यमवर्गीय मनोवृत्तीशी तंतोतंत मेळ खात असून देखील त्याच मिडीओकर वृत्तीतून तिला नाकारत आलो होतो, टाळत होतो. आरशात पाहत होतो पण आपल्या मनाशीही कबूल करायला घाबरत होतो. या लिंकच्या निमित्ताने जखमेवरची खपली परत निघाली . दु:ख वाहते झाले.
नंदा प्रधान, तो आणि नाथा कामत यामध्येही काहीतरी गुंतले आहे. तसे ते सर्वच वल्लीमध्ये गुंतले आहे, पण हे जरा जास्त जवळचे एव्हडेच.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
सुरेख लिहिलंय योग +१११
सुरेख लिहिलंय
योग +१११
Pages