आज मराठी माणसं सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहेत. येनेकेनप्रकारेण आपल्या मराठी भाषेशी, संस्कृतीशी नाळ जोडून आहेत. आपल्याजवळचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीलाही देणे, ही एक अमूल्य भावना असते. याच भावनेने 'आपली मराठी भाषा' आपल्या पुढच्या पिढीनेही शिकावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाने पुढाकार घेऊन अमेरिकेत बर्याच मराठी शाळांना प्रोत्साहन दिले आहे. उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलीस विभागात जानेवारी २०१०पासून मराठी शाळा सुरू झाली. मला या विभागातल्याच एका मराठी शाळेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. सेरिटोज शाळेच्या शिक्षकांशी मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून ख़ास आपल्या मायबोलीकरांसाठी मारलेल्या ह्या दिलखुलास गप्पा.
परदेशात मराठी शाळा ही कल्पना कशी सुचली?
बहुतेक सगळ्या मराठी मंडळांमध्ये आपली संस्कृती जपण्यासाठी कुठला ना कुठला उपक्रम अस्तित्वात होताच. याआधीही मराठी शिकवण्याचे प्रयत्न भारताबाहेर बर्याच ठिकाणी झालेले आहेत, पण बहुतांशी ते प्रयत्न फारसे संघटित नव्हते. साधारण दहाएक वर्षांपूर्वी लॉस एंजेलीस भागात काही गटांनी मराठी शाळा चालवायचा प्रयत्न केला होता, पण त्यात औपचारिक असे काही नव्हते. त्यामुळे शिक्षकांच्या अभावामुळे किंवा जशी त्यांची मुले मोठी होत गेली तसे ते वर्ग बंद पडले. माझ्या माहितीप्रमाणे सर्वप्रथम कॅनडास्थित सुनंदा टूमणे यांनी भारती विद्यापिठाशी संलग्न अशा मराठी शाळेचा प्रयत्न यशस्वीरीत्या राबविला. बृहन्महाराष्ट्र मंडळाने याची दखल घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला आणि या उपक्रमाची सुरूवात झाली.
शाळा उभारणीच्या काळात बर्याच अडचणी आल्या असतील . उदा., अशा शाळेसाठी परवानगी मिळवणे, भांडवल उभारणी, अभ्यासक्रम निश्चित करणे, पालकांचा प्रतिसाद इत्यादी. तुम्हांला सगळ्यांत मोठा अडसर काय वाटला?
जागेचा तर प्रश्न होताच. लोक खूप दुरून येतात, तेव्हा सगळ्यांना सोईची, जवळ पडेल अशी जागा असणे आवश्यक होते. म्हणूनच लॉस एंजेलीससारख्या मोठया शहरात तीन ठिकाणी शाळा चालू करायच्या होत्या आणि विशेष म्हणजे आज तीनही ठिकाणी शाळा छान चालू आहेत. मुख्य मुद्दा होता तो पालकांना या शाळेचे महत्त्व पटवून देण्याचा. या शाळेची गरज का आहे, मुलांना या शाळेचा काय फायदा होणार आहे, हे पालकांना जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत ते स्वतःहून पुढे येणार नाहीत किंवा मुलांना शाळेत घालणार नाहीत. त्याचबरोबर ह्या उपक्रमामध्ये सातत्य असणेही तेवढेच जरुरीचे आहे. अजूनही आम्ही या दृष्टीने प्रयत्न करतच आहोत. आमची शाळा दर रविवारी आठवड्यातून एकदा भरते. त्यामुळे होतं काय की मुलांचे इतर उपक्रम, पालकांच्या काही सामाजिक जबाबदार्या, आठवड्याच्या सुट्टीतील कामे या सगळ्यांतून शाळेला वेळ देणे अवघड होते. आम्ही नेहमी पालकांना सांगतो की, शाळेचा वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार तुमचे वेळापत्रक आखा.
शाळेची उद्दीष्टे काय आहेत? एकूण रूपरेषा कशी असते? मुलांचा अभ्यास आणि वर्ग कसे आखले आहेत? ही शाळा कुठल्या विशिष्ट अभ्यासक्रमाशी संलग्न आहे का?
आधी सांगितल्याप्रमाणे शाळा बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाशी निगडीत आहे आणि शाळेचा अभ्यासक्रम भारती विद्यापीठाने आखून दिलेला आहे. मुलांच्या तीन पातळींवर परीक्षा असतात. मुलांना परीक्षेला बसविणे अनिवार्य नाही. मुलं फक्त शिकायला पण शाळेत येऊ शकतात. आमचा प्राथमिक उद्देश मुलांना मराठीतून संवाद साधता यावा, त्यांचा शब्दसंग्रह वाढावा, हा आहे. त्याच अनुषंगाने आम्ही मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवतो. परीक्षेतही ६०% भर हा बोलणे आणि शब्दसंग्रह यांवर तर ४०% लिहिणे आणि वाचन यांवर आहे. परीक्षेसाठी ठरावीक असा वयोगट नाही .मुलांच्या क्षमतेनुसार त्यांचे वर्ग ठरवले जातात.
तुम्हांला याआधी शाळेत शिकवण्याचा अनुभव होता का? शाळेत शिकवतांना काही वैयक्तिक अडचणी आल्या का?
आमच्यापैकी एकदोघांना जरा मोठ्या मुलांना शिकवण्याचा थोडाफार अनुभव होता, पण शाळकरी मुलांना शिकवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरुवातीला शिक्षकांची बरीच वानवा होती, मग आम्हीच पुढाकार घेऊन जसे आमच्या मुलांना शिकवू, तसेच या शाळेत शिकवायला सुरूवात केली. आमच्यापरीने शक्य तेवढ्या प्रकारे शाळेला योगदान देऊन शाळा चालू ठेवावी असे वाटले.
मी माझ्या मुलीला शाळेत घेऊन यायचो, पण घर बरेच लांब असल्याने इथेच २ तास शाळेत थांबून मदत करायला सुरूवात केली. मग लक्षात आले की, आपण जेवढे सहज मराठी बोलतो, तेवढेच ह्या मुलांना मराठी शिकवणे अवघड आहे. विशेषत: बोलताना आपण सहज काहीतरी बोलून जातो, पण व्याकरणाच्या दृष्टीने ते बरोबरच असेल असे नाही. मुलांना हे व्याकरण शिकवताना अगदी लक्षपूर्वक शिकवावे लागते. मला तर असे वाटते की, त्यांना शिकवताना मी आजही बरेच काही शिकत असतो. मीच काय, आम्ही सगळेच, आजही बरेच काही शिकत असतो.
शाळेत शिकवताना मुलांना मराठी भाषा आवडावी म्हणून तुम्हांला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का?
विशेष प्रयत्न तर आवश्यकच आहेत. आमचे तसे प्रयत्न असतातच आणि अधिकाधिक तसे करण्याचा आमचा मानस असतो. हा तसा अवघड प्रश्न आहे. काय आहे, की मुलांचा मूलभूत प्रश्न असतो की, मराठी का शिकायची? इथे मराठीचा वापर ना शाळेत, ना व्यवहारात. त्यांना मी असे सांगतो की, तुम्हांला छानछान पुस्तके वाचता येतील, तुम्हांला तुमच्या आईबाबा, आजीआजोबांशी वा भारतातील इतर नातलगांशी छान बोलता येईल. शाळेत येणारी जवळपास सगळीच मुले वर्षादोनवर्षांआड भारतवारी करतातच. मुलांना गोडी वाटावी म्हणून त्यांच्या आवडीची गाणी, कविता म्हणतो. तसे आताचे तरुण पालकही याबाबतीत बरेच सजग झालेत. मुलांना बर्याचदा छान डीवीडी, नाटके उपलब्ध करून देत असतात.
आधी इथे मराठी लोक बरेच कमी होते. मुलांच्या शाळेत एखाद्-दुसरा मराठी मित्र असायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. विशेषत: जेव्हा इथे मराठी शाळेत सगळे मित्र एकत्र जमतात, आजूबाजूला सगळे मराठी बोलत असतात ते ऐकून, बघून मुलांना बरे वाटते. आता हेच बघा ना, आपल्या शाळेत आता जवळपास तीस मुले आहेत आणि आपण सगळे एकमेकांशी मराठीत बोलू शकतो, हे त्यांना आता समजले आहे.
शाळेत शिकवताना पालकांचा सहभाग किती आणि कशाप्रकारचा असतो?
आम्ही सुरुवातीपासूनच पालकांना सहभागी होण्यासाठी उत्तेजन देतोय. पालकांचा सहभाग जेवढा जास्त तेवढेच त्यांना ह्या उपक्रमाचे फायदे कळतील, काय अडचणी आहेत आणि त्यावर तोडगा काय, हे चांगल्याप्रकारे हाताळता येईल. हळूहळू पालकांचा सहभाग वाढतोय. आता मराठी मंडळांत संक्रांत, दिवाळीनिमित्त मुलांचे कार्यक्रम करायला पालकांची मदत होते. दिवाळी वा अ्शा कुठल्या सणानिमित्त शाळेत काही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकांची मदत मोलाची असते. अर्थात, आम्हांला अजून जास्त पालकांना सहभागी करून घ्यायचे आहे. शाळेत दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करवून घेणे, घरात शक्य तेव्हा मराठीत संवाद साधणे, हे वाढायला हवे आहे. हे सगळे करण्याकरता शिक्षक आणि पालक दोघांमध्ये संवाद असणे आवश्यकच आहे.
शाळेबद्दल एखादी हृदयस्पर्शी आठवण वा खास असा प्रसंग सांगता येईल का?
जेव्हा सुरुवातीला मुलं शाळेत येतात तेव्हा त्यांच्या आईबाबांनी पाठवलेले असते. छोटी मुले पटकन रुळतात, इथे छान गाणी, गोष्टी ऐकायला त्यांना फार आवडते. पण ज़रा मोठ्या मुलांना सुरुवातीला फारसे आवडत नाही. हळूहळू मग ती मुलं मित्र जमवतात, जरा वाचायला, बोलायला जमले की मग त्यांना सवय होते आणि आवडायला लागते. मुलांना शाळा आवडायला लागली की आम्हांलाही बरे वाटते.
भारताबाहेर राहून मुलांना मराठी साहित्याची, मराठी संस्कृतीची, परंपरेची ओळख व्हावी, असे काही उपक्रम शाळा राबवते का?
आम्ही खास मुलांसाठी म्हणून भारतातून पुस्तके मागवली आहेत. मुलांना अक्षरओळख झाली की ती त्यांना वाचून दाखवतो. खरे तर त्यांना हाताळायलाही द्यायची असतात, पण त्यातली बरीचशी पुस्तके गहाळ होत आहेत. आता आणखी नवीन पुस्तके मागवण्याचा विचार आहे. यावर्षी आम्ही शाळेत आकाशकंदील बनवून दिवाळी साजरी केली. दसर्याला पाटीपूजा केली आणि एकमेकांना आपट्याची पाने दिली, संक्रांतीच्या सणाची गोष्ट सांगितली. असेच काही दर सणाला करण्याचा प्रयत्न असतो. मुलांनाही हे सगळे करताना फार मजा आली.
यापूर्वीही आम्ही सगळ्या सणांची माहिती द्यायचो, पण आता पालकांचा सहभाग जसा वाढतोय तसे कंदील बनवणे वगैरे उपक्रम करता येत आहेत. हा एक खूप छान बदल आहे.
आज आपली मराठी जनता जगभर विखुरली आहे. भारताबाहेर असणार्या इतर मराठी मंडळांना वा समूहास अशी शाळा काढायची इच्छा असल्यास आवर्जून सांगावे असे काही?
बरेचदा असा पुढाकार घ्यायला अडचणी असतात, प्रतिसाद कसा मिळेल, याची खात्री नसते. पण आपल्यासारखेच अजूनही इतरजण असतात. सुरुवात केल्यावर अडचणींतून मार्ग निघतो. बरेचदा सुरुवात केली नाहीये, म्हणून कोणी नसते, नाहीतर कोणी नाही म्हणून सुरुवात नसते. त्यामुले आधी सुरुवात करा.
'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' हे अगदी खरे आहे. संघटित प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी मिळून अडचणींवर मात करणे सोपे जाते.
लॉस एंजेलीस विभागाच्या मराठी शाळेत सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधा - http://mmla.org/mmla/MarathiShala
सेरिटोज मराठी शाळा चमूचे खास आभार -
१. भूषण गाडगीळ
२. अमित भावे
३. अभय हणमसागर
४. मनोज पाटील
५. केदार इंगळे
*
*
चांगला उपक्रम. सेरिटोज नाव का
चांगला उपक्रम. सेरिटोज नाव का आहे शाळेचं ?
आमच्या राज्यात पण आहे एक मराठी शाळा. गुरुकुल बहुतेक.
ऊतम ऊपक्रम
ऊतम ऊपक्रम
सरिटोस शाळेचं नाव नाही ,
सरिटोस शाळेचं नाव नाही , शहराचं नाव आहे.
लॉस अँजलिस परिसरात इतरही ठिकाणी आहेत शाळेच्या शाखा ( जसे सिमी व्हॅली ,अरवाइन) म्हणुन शाळेला शाखे नुसार संबोधतात.
संयोजक, करेक्ट मी इफ अॅम राँग !
हो, डीजे तसंच आहे ते. आमच्या
हो, डीजे तसंच आहे ते.
आमच्या नातेवाईंकांचा मुलगा जातो सिमीव्हॅली शाळेत . मस्त उपक्रम आहे!
छान माहिती. या दर रविवारच्या
छान माहिती. या दर रविवारच्या मराठी शाळेबद्दल मागे रविवार-लोकसत्तामधे वाचलं होतं.
मुलाखत कुणी घेतली आहे?
प्रास्ताविकातील 'मला या विभागातल्याच एका मराठी शाळेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. ' या वाक्यातील 'मला' म्हणजे कोण?
छान ऊपक्रम! अभिनंदन व
छान ऊपक्रम! अभिनंदन व शुभेच्छा!
>>'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' हे अगदी खरे आहे. संघटित प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी मिळून अडचणींवर मात करणे सोपे जाते.
+१००.
छान उपक्रम
छान उपक्रम
सगळ्यांनी मिळून अडचणींवर मात
सगळ्यांनी मिळून अडचणींवर मात करणे सोपे जाते. >> +१
फार छान वाटले शाळेबाबत वाचून. भरभरुन शुभेच्छा.
कमालीचे अन खरेखुरे मराठी
कमालीचे अन खरेखुरे मराठी प्रेम.अभिनंदन अन शुभेच्छा.
छान ऊपक्रम! अभिनंदन व
छान ऊपक्रम! अभिनंदन व शुभेच्छा!
फार छान वाटले शाळेबाबत वाचून.
फार छान वाटले शाळेबाबत वाचून. भरभरुन शुभेच्छा.>> +१११
छान ऊपक्रम ! अभिनंदन आणि खुप
छान ऊपक्रम ! अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा!
छान उपक्रम.
छान उपक्रम.