एक पंचतारांकित पतंग - कायपो छे ! (Movie Review - Kai Po Che!)

Submitted by रसप on 26 February, 2013 - 00:46

पतंग....
हा असा खेळ/ करमणूक/ कला (नक्की काय असतं पतंग उडवणं ? हा प्रश्न मला कधीचा पडलेला आहे.....) आहे की एकदा त्यात रमलेला माणूस तहान-भूक, काळ-वेळ, शत्रू-मित्र सगळं विसरूनच जातो. संक्रांतीला, खासकरून गुजरातेत, पतंगांनी भरून गेलेलं आभाळ पाहाणं, हा एक अद्भुत अनुभव! आबालवृद्ध गच्ची, माड्या गाठून दिवसभर पतंग उडवतात. लहान-मोठे, शेपटी असलेले/ नसलेले, जाड-पातळ, स्वस्त-महाग..... आणि निरनिराळ्या रंगांचेही.... जसं, भगवा-हिरवा ? अमुक रंगाचा पतंग माझा, तमुक रंगाचा तुझा.... दोस्ती गेली तेल लावत, मला तुझा पतंग कापायचाय आणि ओरडायचंय.... 'कायपो छे !!' [(तुझा पतंग) कापला रे !! (बस बोंबलंत आता !)] अशी ईर्ष्या मी पाहिली आहे, अनुभवली आहे.
पतंगांची ही चढाओढ आपण खरं तर सगळीकडेच पाहात, करत असतो ना? शाळेत, कॉलेजात, नोकरीत, व्यवसायात.. आणि नात्यांतही ! मनात आपल्याच नकळत एक सुप्त इच्छा असते, आपलाच पतंग उंच असावा अशी... आणि जवळपास येणाऱ्याचा मांजा कापून 'कायपो छे!!' ओरडायची !

'कायपो छे' ची कहाणी २०००-०१ मधली. आयुष्यातली बहुतांश चढाओढ (शिक्षणाची!) गुण्यागोविंदाने पार करून, जबाबदारीची जाणीव होऊ लागण्याच्या वयात आलेले तिघे जिगरी मित्र - इशान/ ईश (सुशांतसिंग राजपूत), गोविंद/ गोवी (राजकुमार यादव) आणि ओम्कार/ ओमी (अमित सध). इशान जिल्हा पातळीपर्यंत क्रिकेट खेळलेला असतो. पण बेभरवश्याच्या स्वभावामुळे पुढे काही करत नाही आणि नाकर्ता म्हणवला जात असतो. किंबहुना, कमी-अधिक प्रमाणात तिघंही, आयुष्यात 'लूजर्स'च ! इशान शीघ्रकोपी, तर गोविंद शांत. आणि ओम्कार दोघांचा मध्य ! तिघे मिळून, खेळाच्या वस्तूंचे दुकान आणि स्पोर्ट्स अकादमी सुरू करायचं ठरवतात. त्यासाठी लागणारे पैसे, नाईलाजाने, ओमीच्या राजकारणी मामाकडून घेतात. दुकान, अकादमी सुरळित चालू असते. ईशानच्या टॅलेण्ट हंटला 'अली हाश्मी' हा अल्पवयीन मुलगा सापडतो. तडाखेबंद फलंदाज!

पुढे, एका मोठ्ठ्या दुकानासाठी पैसे घालणं, मग भूकंपात सगळं काही गमावणं, त्यातूनही पुन्हा उभं राहाणं आणि अखेरीस गोध्रा हत्याकांड व धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर ईश-गोवी-ओमी ची दोस्ती वेगवेगळ्या ओढाताणींना अनुभवते. ह्याहून अधिक कहाणी सांगणं कदाचित बरोबर नसेल. पण त्यांचे वाद, भांडणं, पुन्हा एकत्र येणं, एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असणं, बदलते राजकीय व सामाजिक वातावरण हा सगळा प्रवास अतिशय अप्रतिम मांडण्यात आला आहे.
दोस्तीवर 'य' सिनेमे झाले आहेत. राजकीय/ सामाजिक भाष्य करणारे 'क्ष' सिनेमे झाले आहेत. पण व्यक्तिरेखांचे सामान्यत्व ग्राह्य धरून, ते टिकवून, संयतपणे नाजूक विषय कसा मांडावा, तर 'कायपो छे' सारखा. (माझ्या गुजराथी मित्राने सांगितलं की मूळ शब्द 'काय पो छे' असा नसून 'कायपो छे' असा आहे.) कुठेही अवास्तव रंजकता, उदात्तीकरण नाही. पांचटपणा, चावटपणा नाही, शिवराळपणा नाही. एका संवादात जेव्हा ओमी 'झाटभर' हा असभ्य शब्द वापरतो, तेव्हा त्याने शिवी दिल्याचं आपल्याला जरा वेळाने जाणवतं, इतकं ते ओघवतं आहे.

वाचवलेले-साठवलेले पैसे ईशान परस्पर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी देतो, त्यानंतर क्वचितच बिथरणारा गोवी थयथयाट करतो तो प्रसंग आणि शेवटाकडची काही दृश्यं मनात घर करून राहातात. 'शेवट' इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स. तो ताण सहन न होऊन माझ्या समोर ४-५ जण चित्रपटगृहातून शेवटाआधीच बाहेर निघून गेले !

kai_po_che.jpg

एकही अभिनेता/ अभिनेत्री परिचयाची नाही. पण पहिल्या काही मिनिटातच सगळी पात्रं आपलीशी वाटतात. त्यांच्याशी आपली नाळ जुळते. शितावरून भाताची परीक्षा होते, तसं पहिल्या काही मिनिटातच आपण जे काही पाहाणार आहोत, ते दर्जेदार असणार आहे, हे समजूनच येतं ! तिघा प्रमुख अभिनेत्यांपैकी कुणी सगळ्यात चांगलं काम केलंय, हे ठरवणं निव्वळ अशक्य ! तिघंही आपापली छाप सोडतात. मनाला स्पर्श करतात. चित्रपटाच्या पोस्टरवरूनही त्या तिघांच्या व्यक्तिरेखा समजून येतात, ह्यावरूनच त्यांचं सादरीकरण किती ताकदीचं आहे/ करवून घेतलं आहे, हे समजावं !

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधूर आहे. पण त्याकडे विशेष लक्ष जात नाही, इतकी ताकद पडद्यावरील नाट्यात, व्यक्तिरेखांत व त्या साकारणाऱ्या कलाकारांत आहे. तरी, मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलाला कुणी तरी टपली मारून छळावं, तसं चित्रपटात रमलेल्या प्रेक्षकाला, कहाणीत जागा असताना वाजणाऱ्या गाण्यानेही छळावं, असं संगीत देण्याची चढाओढ आजकाल दिसते, तसं तरी जाणवलं नाही. गुड जॉब डन !

चेतन भगत ह्यांच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' ह्या पुस्तकावर आधारलेली ही कहाणी. पण मूळ कहाणीत काही मोक्याच्या ठिकाणी महत्वाचे बदल केले गेले आहेत. पटकथा अगदी बांधीव आहे. अजिबात फुटकळ गप्पांना स्थान नाही !

एकंदरीत, शोधूनही काही वावगं न सापडावं असा चित्रपट हिंदीत बनला आहे, हे मी सानंदाश्रू नयनाने म्हणत आहे ! आत्ताच्या आत्ता, ताबडतोब, मिळेल त्या शोचं तिकिट काढून बघावा असा हा 'कायपो छे' कुणीही चुकवू नये, असं मनापासून वाटतं.

हॅट्स ऑफ अभिषेक कपूर ! (होप युवर सिस्टर लर्न्स अ लेसन फ्रॉम यू !! 'कायपो छे !!' Wink )

रेटिंग - * * * * * (इट कान्ट गेट बेटर दॅन धिस !)

http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-kai-po-che_26.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे.
हो, हर्पेन , ते दोघे कजिन्स आहेत.
>> हॅट्स ऑफ अभिषेक कपूर ! (होप युवर सिस्टर लर्न्स अ लेसन फ्रॉम यू !! 'कायपो छे !!' >> त्याची बहिण काही शिकण्याच्या पलिकडे गेली आहे ..:फिदी:

छान लिहिलयस. वेळ काढुन बघणार.

तरी, मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलाला कुणी तरी टपली मारून छळावं, तसं चित्रपटात रमलेल्या प्रेक्षकाला, कहाणीत जागा असताना वाजणाऱ्या गाण्यानेही छळावं, >>>+१ हल्ली बर्‍याचदा असंच संगीत असंत. Happy

अभिषेक कपूरची बहीण कोण?

एकता कपूर. सख्खी नव्हे. चुलत. अभिषेक कपूर अभिनेता म्हनून जितका बेकार होता तितकाच चांगला दिग्दर्शक झालाय.

गुगलुन पाहिला कोणे अभिषेक कपूर . Happy मी शाळेत असताना एक मुवी आला होता - त्याचा - ट्विंकल खन्ना सोबत. गाण पण अंधुकसं आठवयतय Happy

छान परीक्षण. मलाही प्रचंड आवडला हा चित्रपट. काही दोष असतीलही पण पहिल्यांदा बघताना त्याबद्दल विचार करू न देता पूर्ण एंगेज करतो चित्रपट. जबरी आहे. जरूर पाहा.

जो खराब अभिनेता असतो तो चांगला दिग्दर्शक बनतो.. Happy चुकीची वाट तर सुरुवातीला सगळेच धरतात.. Happy

हो रसप. आणि
जबसे है सिखा दिलने धडकना
करते है तुमसे प्यार हम
तेरे लिये ही तो आते रहेहे
दुनियामे बार बार हम

हे ते गाणं. हीट होत तेव्हा.

अतिशय छान चित्रपट!! शम्भर टक्के वसूल...
फक्त एकच तक्रार आहे. रेटिन्ग 'U' आहे म्हणून ९ वर्षाच्या माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो. पण गोविन्द आणि विद्या चा रोमान्स पाहून डोक्याला हात लावायची वेळ आली. तसेच शेवटी दाखवलेली मारामारी सुद्धा not acceptable for 'U' rating.
बाकी मस्त अनुभव...

मला अजिबातचं नाही. पुस्तक वाचुन जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्या १०% सुद्धा पुर्ण नाही झाल्या आणि पुस्तकात नेमके जे पंचेस होते ते चित्रपटात गायब आहेत.

ऑफिस बंक मारुन पाहिला, पश्चाताप झाला.

शेवट' इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स. तो ताण सहन न होऊन माझ्या समोर ४-५ जण चित्रपटगृहातून शेवटाआधीच बाहेर निघून गेले !
>>
अरे बाप्रे! Sad
या एकाच वाक्यामुळे मी हा सिनेमा पहावा की नाही याचा विचार करतेय.. मला चित्रपट, पुस्तक इत्यादीतले ताण अजिबात सहन होत नाहीते..संपुर्ण सिनेमाभर काहीही होवो पण शेवट अगदी गोडगोड झालेला असला तरच तो सिनेमा पाहून रात्री शांत झोपू शकते.
मी पुस्तक वाचलय (जे मला आवडलं नव्हतं) त्यामुळे स्टोरी इज नॉट न्यू फॉर मी
काय करावं या विचारात
रणजीत, खरचं अगदीच असच आहे का? अजिबात अतिशयोक्ती नाहीये का त्या वाक्यात? नसेल तर मी नाही पाहू शकणार Sad
आधीच सांगून ठेव

शेवट' इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स. तो ताण सहन न होऊन माझ्या समोर ४-५ जण चित्रपटगृहातून शेवटाआधीच बाहेर निघून गेले !
>> काहीही काय? मग गँग्स ऑफ वासेपूरला काय म्हणायचं??
मी सहसा त्रासदायक सिनेमे बघत नाही पण हा अजिबात तसा वाटला नाही. १-२ खून (तेही बुलेटने) बघता येत नसेल तर वेगळी गोष्ट. रिया, बिनधास्त बघ. मस्त सिनेमा आहे. पुस्तक पुर्ण वाचवलं नव्हतं पण सिनेमा १०० पट जास्त चांगला बनवलाय.
अमित त्रिवेदीचं संगीत अप्रतिम. सुशांतसिंग राजपुत अने राजकुमार यादव मस्त. अम्रिता पुरी क्युट वाटली.
बाकी परिक्षण छान लिहिलेय.

पुस्तक वाचले होते त्यामुळे चित्रपटात इन्वॉल्वच होता आले नाही. पुस्तकातले बरेचसे भाग वगळले आहे. चित्रपट चांगला आहे. पण गोवीची लवस्टोरी ओढुन ताणून बनवल्यासारखी वाटते. मला तरी ती पुस्तकात तशी वाटली नव्हती.

हो, हर्पेन , ते दोघे कजिन्स आहेत.
>> हॅट्स ऑफ अभिषेक कपूर ! (होप युवर सिस्टर लर्न्स अ लेसन फ्रॉम यू !! 'कायपो छे !!' >> त्याची बहिण काही शिकण्याच्या पलिकडे गेली आहे ..
<<<
असं कसं , या मुव्हीत सुध्दा एकता क्रेडीट थोडं तरी घेणार , शेवटी सुशान्तसिंग राजपूत ( कै पोछे चा इशान)उर्फ 'पवित्र रिश्ताचा मानव 'हे केकताचच फाइंड आहे ना :).
स्मॉल स्क्रीन च्या एका पकाउ सिरियल मधून एंट्री मारली असली तरी सुशान्त ला प्रचंड फॅन फॉन क्लब आहे ऑलरेडी केक्तामुळे!

मी काल पाहिला, चांगला आहे.
मला ईशान अलीला ऑफ साइड, लेग साइड, गली वगैरे फळ्यावर समजावून सांगतो तो शॉट फार आवडला.

इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स >> असं काही नाहिये माझ्या मते.

आणि पुस्तक वाचलय म्हणुन पिक्चर चुकवू नये. उलट चेतन भगतची पुस्तकं टिपिकल बॉलिवूड मुव्ही बनतील अशीच आहेत असे मला वाटते.

मला ईशान अलीला ऑफ साइड, लेग साइड, गली वगैरे फळ्यावर समजावून सांगतो तो शॉट फार आवडला.>>> मलाही.

वरती ऋष्याने लिहील्याप्रमाणे मलाही यू रेटिंग बरोबर वाटत नाही, किमान त्या दोघांच्या शॉट मुळे.

भारत-ऑस्ट्रेलिया च्या मॅच मधले सीन्स "ऑथेण्टिक" आहेत Happy

आणि पुस्तक वाचलय म्हणुन पिक्चर चुकवू नये. उलट चेतन भगतची पुस्तकं टिपिकल बॉलिवूड मुव्ही बनतील अशीच आहेत असे मला वाटते.
<<<
अगदी !
मी २ स्टेट्स वाचताना तर सिनेमाच इमॅजिन करत होते :).
कधी येतोय वाट पहातेय!

हल्लीच्या अतिक्रिकेट्च्या जमान्यात मी तर मॅचचे स्कोअर बघणेही सोडून दिले आहे. फारसा रस वाटत नाही आणि मला क्रिकेट्मधल्या टेक्निकल गोष्टीही काही फार कळत नाहीत पण इशानचं कॅरॅक्टर पाहून मला वाटले हे पण फार इंटरेस्टींग आहे राव जरा माहीती करून घ्यायला पाहिजे. Happy
सो हा माझ्यासाठी नक्कीच प्लसपॉईंट आहे.

नंतर तो अली च्या घरी जातो तेथे त्याने भिंतीवर लिहून ठेवलेल्या फिल्डिंग पोझिशन्स, त्यांचे अचाट स्पेलिंग्स वगैरे मस्त आहे ("Strat drive" आणि इतरही असेच काहीतरी मजेदार आहे Happy ). दिग्दर्शकाने तेथे कॅमेरा जरा रेंगाळू द्यायला हवा होता. बर्‍याच जणांच्या नजरेतून सुटेल ते.

are there 2 different versions of this movie? The one i saw didnt have too much of violence or any explicit scenes between govind n vidya.. Or maybe i didnt realize bcz i didnt hv kids with me n also bcz i was totally engrossed in the movie. Happy

शेवट खूप हिंसक/ भडक आहे अश्यातला भाग नाही. पण तो जसजसा जवळ येत जातो, तसतसं फार 'डिस्टर्ब्ड' वाटायला लागतं.

Pages