आवाहन (कविता पाठवा) : कै. सुचेता जोशी स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा...

Submitted by अ. अ. जोशी on 20 February, 2013 - 23:45

नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.

दरवर्षी ही स्पर्धा पार पडल्यानंतर मी मायबोलीवर स्पर्धा कशी झाली याबद्दल सांगत असे. मात्र, मागील वर्षी काहींनी ही माहिती स्पर्धेच्यावेळी सांगावी असे सुचविले होते. त्याप्रमाणे आवाहन करीत आहे.

या स्पर्धेत शक्यतोवर नियमित मायबोलीवर अथवा जालावर लिखाण करणार्‍यांनी भाग घेऊ नये ही विनंती. मात्र सूचना जरूर कराव्यात. आपल्याला माहित असणार्‍या आणि भाग घेण्याची इच्छा असणार्‍या कवींना आपण ही माहिती जरूर सांगू शकतो.

स्पर्धेत भाग घेणार्‍यांसाठी :
१) स्पर्धेसाठी "माणुसकी" या विषयावर आधारीत १ कविता आणि दुसरी इतर कोणत्याही विषयावर आधारीत कविता, अशा दोन स्वरचित कविता पाठवाव्यात.
२) दिनांक २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत कविता नमूद केलेल्या पत्यावर पोचाव्यात.
३) काव्यलेखनाच्या गुणांकनाप्रमाणे पहिल्या जास्तीत जास्त २० कवींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येते. या कवींनी स्वतःची कविता सादर करायची असते. निवडलेली कविता दुसर्‍याकडून वाचू दिली जात नाही.
४) मोठी बक्षिसे देण्यासाठी आम्ही कोणताही फंड गोळा करायचा नाही असे ठरविले आहे. त्यामुळे केवळ स्मृतीचिन्हाच्या स्वरूपातच सन्मानित करण्यात येते.
५) कवींमध्ये एकप्रकारे काव्यमैत्री व्हावी हा उद्देश स्पर्धेमागचा आहे.
६) क्रमांक काढताना जात, धर्म, संप्रदाय, वय, शिक्षण, इ. काव्यात्मकता सोडून कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही.
७) कविता पाठविणार्‍या कवींनी स्वतःचीही काव्यक्षेत्राबद्दलची माहितीही पाठवावी.
८) काव्यस्पर्धेची अंतिम फेरी पुण्यातच होते. (मानधन, खर्च वगैरे आपण देत नाही.)

कविता पाठविण्यासाठी पत्ता:- वर नमूद केलेल्या तारखेपर्यंत कविता पाठवाव्या. अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र.
ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

या स्पर्धेची अंतिम फेरी/काव्य सादरीकरण या वर्षी साधारणपणे १५ मार्चनंतर एखाद्या शनिवारी/रविवारी होईल. नक्की झाल्यावर कळवेनच.

कळावे,
आपला
अ. अ. जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा एक गुणी उपक्रम आहे. अजय जोशींनी त्यांच्या मातु:श्रींच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या उपक्रमात अनेक नवीन कवी आपली कविता पाठवतात. त्या कवितेचे मूल्यमापन करून त्यातील निवडक कविता सादरीकरणासाठी कवींना आमंत्रीत केले जाते. काव्यसादरीकरण, काव्यमूल्य अश्या निकषांवर परिक्षक गुण देतात व तीन विजेते जाहीर केले जातात.

या वेळच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा! उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेनच.

धन्यवाद

या स्पर्धेत शक्यतोवर नियमित मायबोलीवर अथवा जालावर लिखाण करणार्‍यांनी भाग घेऊ नये ही विनंती. मात्र सूचना जरूर कराव्यात. आपल्याला माहित असणार्‍या आणि भाग घेण्याची इच्छा असणार्‍या कवींना आपण ही माहिती जरूर सांगू शकतो.

Sad

मलाही भाग घ्यायचा होता.

असो...

स्पर्धेसाठी उपस्थित रहाण्याचा नक्की प्रयत्न करेन.

या स्पर्धेत शक्यतोवर नियमित मायबोलीवर अथवा जालावर लिखाण करणार्‍यांनी भाग घेऊ नये ही विनंती. मात्र सूचना जरूर कराव्यात. आपल्याला माहित असणार्‍या आणि भाग घेण्याची इच्छा असणार्‍या कवींना आपण ही माहिती जरूर सांगू शकतो.>>>>

का बरं?

कैलास,
>>> मलाही भाग घ्यायचा होता. <<<

तुम्ही येणार असलात तर तुमचा सहभाग असेलच. पण, स्पर्धेत नको. कारण, आपण एकत्रितपणे मुशायरे केले आहेत म्हणून. धन्यवाद..!

अमेय२८०८०७
आमच्या स्पर्धेत भाग घेणारे हे फारसे नियमित लेखन करणारे नसतात असा अनुभव आहे. अर्थात तुम्हाला भाग घ्यायचा असल्यास नक्कीच घेऊ शकता. मी "शक्यतोवर" असा शब्दप्रयोग केला आहे. गैरसमज नसावा. ज्यांना कविता पाठवायच्या असतील ते जरूर पाठवू शकतात. त्यांचे स्वागतच आहे.
धन्यवाद..!