मलाच माझे असणे आता जाचत आहे

Submitted by राजीव मासरूळकर on 20 February, 2013 - 02:08

मलाच माझे असणे आता जाचत आहे
(मृत्यूशय्येवरील म्हाताऱ्‍याचे मनोगत)

मलाच माझे असणे आता जाचत आहे
उसवुन गेली वाकळ पुन्हा टाचत आहे

मनात असते नेहमी भिती मोहरण्याची
निर्माल्याचा कचरा नुसता साचत आहे

डोळ्यांमधले रंगच गेले हरवुन माझ्या
कारण देवा भगवद्गीता वाचत आहे

आसपासची अतीभयावह मरणशांतता
स्मशान झाले जीवन मृत्यू याचत आहे

धूसरसा तू यमदेवच . . . कि विठूमाऊली ?
तुला पाहुनी अणुरेणू मम नाचत आहे !

(जाताना का वळून मागे पाहतोय मी
देह एकटा अजूनही . . . . <?> हे बोचत आहे !)

- राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बोचत आहे' मध्ये अलामत भंग होत असल्याने आणि विषयही एकच असल्याने कविता विभागात टाकली आहे .

अलामत नसती भंगली तरी कविता म्हणायला काय हरकत आहे? गझल असो वा कविता, त्यातील काव्य मनाला किती भिडते ते पहायचे. तुमचे काव्य सुंदर आहे. भगवद्गीता वाचताना डोळ्यांमधले रंग का हरवले हे नीटसे समजले नाही. बाकी सर्व छान
काव्य आवडले
शेवटच्या द्विपदीमधील विचार खूप आवडला

गझलुमियां ,
>अलामत नसती भंगली तर . . . सहमत .
>तुमचे काव्य सुंदर आहे . . . मनापासून आभार .
>डोळ्यांमधले रंग का हरवले . . . कृपया , इथे भगवद्गीतेचा अवमान वगैरे मनात आणू नये . यात अर्थांचे अनेक पदर आहेत . रंग हरवून जाण्याचेही तसेच. खरे तर या द्विपदीचा अर्थ वाचकसापेक्ष आणि आंतरीक नेणीवेत जाणवणारा आणि अस्वस्थ करणारा आहे . आयुष्यभरातील संदर्भ आणि गीतेतील तत्वज्ञान यांची व्यामिश्रता त्यात जाणवावी. तसेच अनेक इतर पर्यायी विचारही .

शेवटची द्विपदी आवडली त्यासाठीसुद्धा हार्दिक आभार !

"धुसरसा तू कोण रे बाबा ? यमदेवच का ?
तुला पाहुनी अणुरेणू मम नाचत आहे !" >>>> हा सर्वात विशेष वाटला.

"सुटका व्हावी" हा भाव संपूर्ण गझलेतून चांगला व्यक्त झालाय.
काही ठिकाणी मात्रांची गडबड जाणवली.

धुसरसा तू कोण रे बाबा ? यमदेवच का ?
तुला पाहुनी अणुरेणू मम नाचत आहे !" >>>>शेर म्हणून सर्वात बडल झाला आहे हा
मक्त्यातही बोचत आहे मुळे नाही मजा आली

बाकी शेर मस्त आहेत

malaach maze asaNe aataa jaachat ahe...

>>> wwa... Attishay sahaj misaraa...

मलाच माझे असणे आता जाचत आहे
उसवुन गेली वाकळ पुन्हा टाचत आहे

शेर आवडला.

आसपासची अतीभयावह मरणशांतता

ही ओळही छान.

धूसरसा तू यमदेवच . . . कि विठूमाऊली ?>>>मनापासून सांगतो ....अजूनच फडतूस हास्यास्पद आहे हे

माझी परीक्षा पाहताय की काय मासरूळकर ? विठ्ठलाचा उल्लेख शेरात अंतःकरणापासून आलाय की उगाचच 'असावा आपला...बरा असतो' म्हणून ....की खोड काढायची म्हणून आणला गेलाय हे समजते मला ............................

तुमच्या ह्या शेरापेक्षा कितीतरी बरा असा देवसरांचा एक शेर होता बहुधा असाच होता की...

हा रोमरोम झाला बघण्यास त्यास डोळा
साक्षात वाटले की ......तो पांडुरंग होता

असो प्रयत्न करीत रहा.... प्रयत्नांती परमेश्वर...मी ही तेच करत असतो .. Happy

(जाताना का वळून मागे पाहतोय मी
देह एकटा अजूनही . . . . <?> हे बोचत आहे !)
व्वा..!

उसवुन गेली वाकळ पुन्हा टाचत आहे<<< इथे "पुन्हा" चा उच्चार "पुन्न्हा" असा घ्यावा लागत आहे. ते बरोबर नाही. त्यामुळे १ मात्रेचा बदल करावा.
यातील "उसवुन" शब्दामुळे कदाचित हा शेर काहींना चांगला वाटेल. पण पहिली ओळ आणि "टाचत" मुळे जरा विचार करतोय.

पुलेशु.

वैवकु,
तुमची परीक्षा पाहण्याचा किंवा तुम्हाला दुखावण्याचाही विचार नव्हता. तुम्ही म्हणता तसाच विठ्ठलाचा विचार तितकासा आतून आलेला नाही हे मात्र खरंच. खोड काढणं वगैरे मात्र मनातही नव्हतं. या शेरात सहजता नाही हे आणि 'बोचत आहे' हे ही बोचत आहे.
हार्दिक आभार .

रसप आणि अ.अ.,
आमच्याकडील भाषेत 'पुन्हा'चे लगा आणि गागा दोन्ही रूपं प्रचलित आहेत. त्यातूनच हा घोळ झाला आहे. उच्चार करावा लागत आहे कि वाचताना आपोआप होत आहे ?
उच्चार आपोआप दीर्घ होत असेल तर घोळ नाही असे माझे मत आहे, कारण उर्दू किंवा मराठी गझलेतही प्रत्यक्ष उच्चारांना महत्व आहे.
दोघांनाही धन्यवाद.

आमच्याकडील भाषेत 'पुन्हा'चे लगा आणि गागा दोन्ही रूपं प्रचलित आहेत. >>>सहमत

माझ्याही एका शेराबाबत जितू मला असेच म्हणाला होता त्यातही मी पुन्हा हा शब्द असाच वापरला होता

पुन्हा चे मूळ पुनः असे आहे वाचताना पुन् +अहा(हा) अशीही फोड करून वाचतात
पुन्हा देखील तसेच.... पुन् + हा(गागा)

पुन् + न्हा चुकीचे आहे

पुण्याचे काम ............पुण्ण्याचे काम ... या इथे मात्र मी कन्फ्यूज होतो ते साहजिकही आहेच पण 'पुन्हा' मध्ये तसे काही घोळाचे काम नाही आहे

आता वरच्या ओळीतच मध्ये हा शब्द मध् + ये असा आपण फोडतो (गागा) लगा साठी 'मधे' करतो Happy

पुणे आणि पुण्य यांचे 'पुण्याचे' करताना मला वाटतं , त्याचा अर्थ स्थलवाचक नामासारखा असताना पु ऱ्‍हस्व समजावा आणि भाववाचक असताना दीर्घ . अर्थात उच्चारही अर्थानुसारच होईल. पण गझलेत स्थलवाचक 'पुण्याचे' येण्याची शक्यता नगण्यच.

त्याचा अर्थ स्थलवाचक नामासारखा असताना पु ऱ्‍हस्व समजावा आणि भाववाचक असताना दीर्घ .>>>

म्हणजे असे का ....."पूण्य" ..........................
काहीतरीच आहे हे ...........अहो तिथे स्थलवाचक -भाववाचकाचा काय संबंध मासरूळकर? अणि र्‍ह्स्व दीर्घाचा तरी ...???
"ण्" सिंगल की डब्बल ते सांगा !!!

आतापर्यंतच्या लेखनपद्धतीनुसार तर ण् दोन्ही ठिकाणी सिंगलच राहणार.
मी उच्चाराबद्दल लिहिलं , लेखनाबद्दल नाही. मराठी लेखनपद्धतीत असे बोटावर मोजण्याइतके दोष आहेतच .
हा दोष बऱ्‍याच दिवसांपासून लक्षात आहे . कालौघात असे दोष दूर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवरच येऊन पडते . अर्थात आपण व्याकरणकार नसलो तरीही .

मनात असते नेहमी भिती मोहरण्याची
निर्माल्याचा कचरा नुसता साचत आहे

आसपासची अतीभयावह मरणशांतता
स्मशान झाले जीवन मृत्यू याचत आहे.........हे शेर खूपच आवडले !!

मनात माझ्या रंगांचा गोंधळ दाटत आहे !
पावसातल्या त्या इंद्रधनूची वाट पाहत आहे !!

*** राजीव जी खूपच छान ***