तारेने जोडलेली गर्दी

Submitted by अनंत ढवळे on 10 February, 2013 - 14:26

मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही
एक गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते

एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस

माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे

ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून
माझ्या सभोवती वस्तूंचे एक जाळे पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत

ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत

माझे जीवन
या गर्दीसाठी एक मनोरंजन आहे
ही गर्दी बघत असते माझ्या प्रतिमा
ऐकत असते माझा आवाज
न्याहाळत असते
माझी प्रत्येक हालचाल

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..

अनंत ढवळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. अप्रतिम कविता.
गर्दी वलयाच्या अर्थानेही घेता यावी.
किंवा विचारांची गर्दीही असावी.

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..

एक वेगळीच अनुभूती देऊन गेली कविता.

माझे जीवन
या गर्दीसाठी एक मनोरंजन आहे
ही गर्दी बघत असते माझ्या प्रतिमा
ऐकत असते माझा आवाज
न्याहाळत असते
माझी प्रत्येक हालचाल

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..

व्वा!!

अप्रतिम.

आपण ज्याचा भाग आहोत त्या परीस्थितीचा आपल्यावर किती पगडा असतो हे अधोरेखित करणारी कविता.

आपण ज्याचा भाग आहोत त्या परीस्थितीचा आपल्यावर किती पगडा असतो हे अधोरेखित करणारी कविता.

बहुतेक विजयला कविता माझ्यापेक्षा जास्त चांगली समजली असावी असे वाटले.

अनंत, तुझे इन्टरप्रिटेशन समजून घ्यायला आवडेल.