नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांना सह्याद्रीने एक अचाट वैशिष्ट्य प्रदान केलं आहे.यातला कोणताही किल्ला चढून वर आलो की " हा किल्लाच राक्षसी होता का आपणच दिवसेंदिवस खच्ची होत चाललोय " हा प्रश्न ट्रेकरच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही !!! रवळ्या-जवळयाला जाताना आरामात गेलो असलो तरी येतानाची सरळ पठारावरची का होईना पण तंगडतोड सगळ्यांनाच नकोशी झाली होती.त्यात पुन्हा मार्कंडयाने उरलासुरला जीवही संपवला होता.पण मार्कंडयाच्या रंगनाथ बाबा आश्रमाने असा काही श्रमपरिहार केला की सकाळी उठल्यावर आजच पहिला दिवस आहे असं प्रत्येकाला वाटून गेलं!!! हा आश्रम म्हणजे शब्दश: आपण बी.आर.चोप्रांच्या महाभारत सिरिअल मध्ये बघितला आहे ना सेम अगदी तस्साच आहे.सगळीकडे एक सुखद शांतता,पक्ष्यांचा कान तृप्त करून टाकणारा आवाज,आश्रमाच्या आतून येणारे मंत्रांचे पवित्र स्वर आणि संपूर्ण आसमंतावर पसरलेली एक सुंदर अनुभूती..वर्णन करायला शब्दच कमी पडावेत !!! तसं मार्कंडयाच्या पठारावर अजून तीन - चार आश्रम आहेत.पण या आश्रमाची सर कशालाच नाही.सकाळी ५.३० ला दिपक ने अलार्म कॉल दिला तेव्हा "सकाळ का होते" असा एक सूडविचार प्रत्येकाच्याच मनाला त्या झोपेतही शिवून गेला.त्या जीवघेण्या गारठ्यात आश्रमाच्या बाहेर येणं सोडाच पण पांघरूणाच्या बाहेर साधा हातही काढायची इच्छा होत नव्हती.शेवटी बक-याला खाटकाने जबरदस्तीने ओढून न्यावं तसं " बाकीचे उठायला सुरुवात झालीये..आता नाही उठलो तर खरंच कत्तल होईल" या विचाराने मला त्या पांघरूणाच्या बाहेर अक्षरश: ढकललं !!!
आश्रमात दिपकने बाकीच्या सिन्सीअर मंडळींना बरोबर घेऊन चहाची तयारी आधीच सुरु केली होती. त्यांच्याच कृपेने सूर्यनारायण रवळ्याच्या मागून प्रकटायच्या आधीच आमच्या हातात वाफाळता चहा आलेला होता. आश्रमाच्या थोडासा बाहेर एक मस्त मोकळी जागा आहे तिथल्या एका सिंहासनावर बसून(मी बसलेल्या त्या दगडाला हेच नाव योग्य आहे !!! काय कम्फर्ट होता म्हणून सांगू !!!) रवळ्याच्या मागून त्या सकाळी मी जी काही सप्तरंगांची उधळण पहिली आहेत त्याला तोड नाही !!!! खरंच यार..जगावं तर हे सगळं डोळ्यात साठवून घेण्यासाठी !!! केशरी रंगाने पूर्णपणे रंगलेलं ते अथांग आकाश...सोनेरी किरणांनी उजळलेला मार्कंडयाचा बालेकिल्ला...ते धोडपचं लोभसवाणं रूप...आणि काही क्षणातच सातमाळयाच्या त्या बुलंद शिखरांना साक्षीस ठेऊन समोर आलेलं ते गोलाकार सूर्यबिंब !!!! काय जादू होती त्या वातावरणात माहित नाही...पण उपस्थितांना नक्कीच वेड लागलं असणार !!! त्या देखाव्याचे असंख्य फोटो काढून मी आश्रमात परतलो तेव्हा बाकीच्या लोकांनी आवरायला सुरुवात केली होती. मार्कंडया आल्या वाटेने उतरून गाडीतून सप्तश्रुंगला जाण्याचा ऐन वेळी घेतलेला (जरा कडवट पण त्याक्षणी योग्य) निर्णय ऐकून भ्रमनिरास झालेल्या पागरूट काका,सागर बोरकर,साटम काका व राहुल कांबळेने मार्कंडया ते सप्तश्रुंग चालत जाण्याची धाडसी तयारी दर्शवत आम्हाला भलामोठा ठेंगा दाखवून चालायला देखील सुरुवात केली. आता आम्ही १२ च लोक उरलो होतो.आज मार्कंडया उतरून पुढे गाडीनेच सप्तश्रुंगला जाऊन पुढे रामसेज हा आकाराने अगदीच लहान किल्ला बघायचा असल्याने पब्लिक निवांत होतं. मग जरा जोक्स,किस्से याचबरोबर भविष्यात आकार घेणारे नवीन संसार (अर्थात जोड्या लावा प्रोग्रॅम) वगैरे विनासायास पार पडत होतं. आदल्या दिवशीची भारंभार खिचडी उरल्याने " आता हाच आपला नाश्ता " अशी घोषणा दिपकने केल्यावर इतर लोकांनी आश्रमाच्या आत बाकीचं आवरण्यासाठी हळूच काढता पाय घेतला !!! मग ट्रेकच्या त्या पेटंट पदार्थाशी इमान राखत दिपकने अजून २-३ पोरांना पटवून त्यातल्या ब-याचश्या खिचडीचा फडशा पडला आणि " आमचा नाश्ता झाला आहे.ज्यांनी केला नाही त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही " अशी पुणेरी घोषणा करून उपस्थितांच्या "पोटावर पाय दिला" !!! सर्व सोपस्कार उरकून आणि अर्थातच आश्रमवासियांचे मन:पूर्वक आभार मानून टोळीने मार्कंडयाची माची सोडली आणि ५ मिनिटातच ग्रुप फोटोसाठी झक्कास जागा शोधली (अरे हो की...हा प्रकार राहिलाच होता !!) .मार्कंडयावर रामकुंड नावाचे पाण्याचे एक कुंड असून त्याच्या मागेच मार्कंडयाचा भलाथोरला आणि सरळसोट उभ्या कातळकड्याचा बालेकिल्ला उभा आहे. सकाळच्या कोवळ्या आणि फोटोग्राफीसाठी एकदम आयडीयल अशा लाईटने काम सोप्प करून टाकलं होतं. मग काय...तिथे अगदी यथोचीत (म्हणजे प्रत्येकाच्या प्रकाशचित्रयंत्राची पुरेपूर हौस भागवून) फोटोसेशन झाल्यानंतर मोर्चा मुळणबारीकडे वळाला आणि अर्ध्या तासात आम्ही खाली पोचलो.डायवर बहुदा रात्रीच्या प्रहारातच असावेत.कारण तो वणी येथे गाडी घेऊन झोपायला गेल्याने आम्ही फोन टाकल्यावर " आयला सकाळ झाली का ?? " असलं निरागसतेने रसरसलेलं बेमालूम उत्तर ऐकू आलं आणि आमची किमान पाउण तासांची निश्चिंती झाली !!!!
सूर्योदयाची सुरुवात..रवळ्या किल्ला...
सूर्योदयाच्या वेळचं धोडपचं लोभसवाणं रूप...
मार्कंडयावर आलेला सूर्याचा पहिला किरण....
आश्रमाचा बाहेरील व्हरांडा...काय स्वच्छता आहे बघा.....
आश्रमाचा आतील भाग..याला म्हणतात ट्रेकमध्ये मिळालेलं Deluxe Accommodation ....काय झोप लागली असेल विचार करा !!!!
आश्रमाजवळून दिसणारा मार्कंडयाचा बालेकिल्ला..
रामकुंडापासून दिसणारा मार्कंडयाचा बालेकिल्ला...बुलंद..अभेद्य...बेलाग....
सप्तश्रुंग...आमचं आजचं पहिलं लक्ष्य....
मार्कंडया उतरून आम्ही मुळणबारीत आलो तेव्हा १० वाजले होते.डायवरचा अजूनही पत्ता नव्हता.त्याला ३रा फोन गेल्यावर अर्ध्या तासाने स्वारी हजर झाली!!!! शेवटी आम्ही ती खिंड उतरून वणीत पोचलो तेव्हा फोन आला की चालत निघालेली चौकडी सप्तश्रुंगवर कधीच दाखल झाली असून "तुम्ही अजून तिथेच? " हा आश्चर्य कम disguise ने भरलेला कॉम्प्लिमेण्टरि प्रश्नही मागाहून येउन धडकला !!!! बाय द वे मगाशी खिंडीत असताना आमच्या ग्रुपातील माननीय सौ.स्मिताताई शिंदे यांनी एक सजग गृहिणी काय असते याचा अफलातून नमुनाच दाखवला.त्यांनी त्यांच्या पिट्टूवजा पोतडीतून एक एक खाद्यपदार्थ बाहेर काढायला सुरुवात केल्यावर यांनी नक्की कोणत्या दुकानावर जबरी दरोडा घातला आहे असे भाव उपस्थितांच्या चेहे-यावर प्रकट झाले होते !!!! ही हादडेगिरी पार सप्तश्रुंग येईपर्यंत सुरु राहिली आणि आमचा नाश्त्याचा प्रश्न चकटफू मध्ये सुटला !!!! वणी - बाबापूर रस्त्यापासून सप्तश्रुंग- मार्कंडया-रवळ्या-जवळया या चारही किल्ल्यांचं अगदी Panoramic फॉर्म मध्ये दर्शन होतं.खरं तर सप्तशृंगी देवीला म्हणताना जरी आपण वणीची देवी म्हणत असलो तरी सप्तश्रुंगगडाच्या मुख्य मंदिरापासून वणी गाव सुमारे ३०-३२ कि.मी एवढया लांब अंतरावर आहे.गडाच्या सगळ्यात जवळचे गाव नांदुरी असल्याने ब-याच ठिकाणी "नांदुरीगड" अशी पाटी लिहिलेली दिसते आणि practically तेच योग्य आहे.सुरतचा फाटा सोडून उजवीकडे नांदुरीकडे वळताना लगेचच उजव्या हाताला तीन चार शुध्द शाकाहारी हॉटेल्स असून सप्तश्रुंग जवळचं त्यातल्या त्यात उत्तम चवीचं जेवण इथेच मिळतं.कळवणचा रस्ता सोडून आपण उजवीकडे सप्तश्रुंगच्या दिशेने वळालो की देवीच्या डोंगराचा ८ कि.मी चा लांबलचक घाट सुरु होतो.पावसाळ्यात इथे आलात तर परत जावंसं वाटणारच नाही हे मात्र नक्की !!! डायवराच्या कृपेने आम्ही पाउण एक तासात तो घाट चढून सप्तश्रुंग गावाच्या जवळ पोचलो आणि अचानक तीन चार माणसं गाडीसमोर आडवीच आली.आमच्या डायवराने पण किस चक्की का आटा खाल्ला होता काय माहित...त्याने त्या लोकांना न जुमानता डायरेक्ट त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांच्या ****** (तुम्हाला जो अर्थ घ्यायचाय तो घेऊ शकता !!!!!).."साले ******..दर टायमाला अशी **** ***** असतात..एकदा रस्त्यात आडवं क्येलं ना की दुनियादारी लक्षात येईल ****** ना " डायवर उवाच !!!!! आपण महाराष्ट्रातल्या एका पवित्र तीर्थक्षेत्राला आलो आहोत याची तमा न बाळगता त्याने शिव्या देण्यात जो काही मनमोकळेपणा दाखवला ते पाहून माझ्या डोळ्यांच्या कडा खरोखरंच ओलावल्या !!!!..मनाचा सच्चेपणा असावा तर असा !!! शेवटी डायवरपंतांनीच पुरवलेली माहिती म्हणजे,हे आडवे येणारे लोक स्थानिक दुकानदार असून येणा-या जाणा-या प्रत्येक गाडीला आपल्याच पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क करण्याची जबरदस्ती करतात.अर्थात भरमसाठ चार्ज उकळून.वर आमच्याच दुकानातून देवीसाठी खण नारळ घ्या वगैरे ग्रामीण लेव्हल मार्केटिंग होतंच असतं !!!! खरंच जीवावर उदार होऊन धंदा करायची हि रीत अजबच आहे (त्यांची ही धंद्याप्रती निष्ठा बघून पुन्हा माझे डोळे पाणावले !!!).शेवटी डायवराने एक मस्त आणि अर्थातच फुकटातली जागा बघून तिथे आपल्या रथाची प्रतिष्ठापना केली.गाडीतील आमच्या काही श्रद्धाळू भक्तांनी "आम्ही अंघोळ केली नाही..आम्ही दर्शन घेणार नाही " असा "मी शेंगा खाल्या नाहीत......" च्या ष्टाईल मध्ये पावित्रा घेतल्यावर त्यांची आपल्यावरची नितांत श्रद्धा बघून साक्षात देवीनेच त्यांना वरून हात जोडले असावेत !!! मग आम्ही उर्वरित सदस्य तासाभरात दर्शन घेऊन परतलो.मंदिरातून मार्कंडयाच्या बेलाग पहाडाचं सुरेख दर्शन होतं.सुदैवाने गर्दी तशी फार नसल्याने व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही परतलो तेव्हा १२ वाजले होते.आमची मार्कंडयावरून चालत आलेली चौकडीही आम्हाला येउन मिळाली तेव्हा त्यांच्या विजयी मुद्रेवर आनंदाशिवाय "आम्ही चालत आलो ...तेही तुमच्या कितीतरी तास आधी ...कसले लेकाचे ट्रेकर्स तुम्ही...छ्या !!!" असले काहीतरी भाव होते.आता पोटात खड्डा सोडा..आख्खी दरीच तयार झाली असल्याने आधी पोटोबा नंतर रामदर्शन म्हणजेच रामसेजकडे निघायचं असं ठरलं.मगाशी सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचताच ते प्युअर व्हेज आहे याचं दु:ख अनावर झालेल्या काही कुक्कुटमांसप्रेमींनी शेजारच्या "कोकण तडका" का असल्या काहीतरी नावाच्या हॉटेल कडे चोरून पावलं वळवताच दिपकने लीडरच्या जबाबदारीने त्यांचे लगाम खेचून त्यांना आमच्यात आणून सोडलं !!!! जेवण ओके होतं.रामसेज हा किल्ला चढायला अगदीच किरकोळ आहे याचं प्रदीर्घ डिस्कशन सकाळीच झाल्यामुळे सगळ्यांनी जेवणावर मनसोक्तपणे आडवा हात मारला (भोजनोत्तर खाल्ल्या मिठाला जागलेल्या काही मंडळींनी "एवढं काही खास नव्हतं जेवण...नॉट बॅड...!!!! अशी टिप्पणी मालकाच्याच समोर केल्याने बिचा-याचा चेहेरा खर्रकन उतरला !!!!). आता आमचं दिवसातलं आणि ट्रेकचंही शेवटचं ठिकाण होतं किल्ले रामसेज !!!!!
रवळ्या - जवळया..बाबापूर गावातून
सप्तश्रुंग (डावीकडचा) आणि मार्कंडया (उजवीकडे)...बाबापूर गावातून..
आशेवाडीतून दिसणारा रामसेज..
"मूर्ती लहान पण कीर्ती महान" असं म्हणतात ते काय उगाच नाही !!! वरचा रामसेजचा फोटो हा पायथ्यापासून काढला आहे हे वाचून हा किल्ला "नाशिक" जिल्ह्यात कसा काय आला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे !!! नाशिक जिल्यातील बाकीच्या किल्ल्यांची उंची अन अभेद्यपणा बघता रामसेज त्यांच्यापुढे काहीच नाही असं वाटू शकतं.पण औरंगजेबासारख्या महापराक्रमी सम्राटाला ज्याने तब्बल सहा वर्ष स्वतःच्या डोंगराचा एक इंचही काबीज करून दिला नाही त्या किल्ल्याची महती शब्दात वर्णन करणं खरंच अवघड आहे.नांदुरीहून पुन्हा नाशिकला येताना दिंडोरी नंतर ढेकांबे फाटा आहे.आमच्या गाडीत फुडच्या शीटावर बसलेल्या राहुलने ढेकांबे फाटयावर "काय हो...आशेवाडीला कसं जायचं " असा सवाल करताच "हिथून शिद्दे जा अन मग किन्नर मारा !!!!" असं उत्तर आलं !! नक्की कोणाला मारायचंय असा विचार करत असतानाच डायवरेश्वर मदतीला धावून आले आणि "किन्नर मारा" म्हणजे "डावीकडे वळा" असा त्याचा अर्थ निघाला (किन्नर उर्फ ट्रकचा क्लिनर..हा कायम ट्रकमध्ये डावीकडे बसत असल्याने त्याची बाजू म्हणजे किन्नर बाजू...आणि डायवर बाजू म्हणजे उजवी बाजू !!!!!).अर्ध्या तासात आम्ही रामसेजच्या पायथ्याला येउन दाखल झालो तेव्हा ३.३० वाजले होते.सूर्यास्ताच्या आत नाशिक सोडायचा निर्विवाद पण केल्याने मेम्बरांनी धावतच २० मिनिटात (फ़ुल्ल जेवून सुद्धा !!) रामसेज माथा गाठला.रामसेज वर एक आख्खा ब्लॉग लिहिता येईल एवढं ऐतिहासिक आणि भौगोलिक मटेरीअल आपल्याकडे उपलब्ध आहे.रामसेजचा अति म्हणजे अतिशय सोपा चढ,मळलेली आणि काही ठिकाणी घडवलेली पायवाट,किल्ल्याचे लोकेशन आणि वरती प्रचंड प्रमाणात असलेले अवशेष हे दुर्गप्रेमींसाठी एक खूप मोठं आकर्षण आहे.पण वर सांगितलेल्या पहिल्या दोन गोष्टींचा लाभ सामान्यजनही घेत असल्याने रामसेजचा पिकनिक स्पॉट झाला आहे.त्यामुळे किल्ल्यावर किल्ला बघणा-यांबरोबर अनेक भविष्यकालीन जोडपीही येऊ लागली आहेत (यातला एक अतिभन्नाट किस्सा मी शेवटी सांगणार आहे !!!).असो.रामसेजच्या शेवटच्या टप्प्यात कातळपोटात एक गुहा खोदली असून आतमध्ये एक शिवलिंग आहे.पुढे किल्ल्याकडे जाताना रामाचे एक मंदिर असून मुक्कामाला यकदम बेस्ट !!! मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर देवनागरी लिपीतला एक शिलालेख कोरला असून मंदिरा शेजारीच पाण्याचं टाकं आहे.किल्ल्याच्या पहिल्या भग्न दरवाजातून आपण आत आलो की डावी-उजवीकडे विस्तीर्ण पसरलेला किल्ला असून उजवीकडे बालेकिल्ल्यावर मुख्य अवशेष आहेत.त्यात एक अतिशय सुंदर,कोरीव आणि धडधाकट असा महादरवाजा ,पाण्याची बर्रीच टाकी,एक उघड्यावरील शिवलिंग व नंदी,भवानी देवीचे एक मंदिर व दीपमाळ,एक भन्नाट चोर दरवाजा व बांधकामाची काही जोती असून आपण आलो त्याच्या डावीकडे किल्ल्याची माची असून त्याच्यावर झेंडा लावायला नुकताच बसवलेला एक पोल आणि पाण्याचे एक कोरडे टाके आहे.थोडक्यात संपूर्ण किल्ला बघायला किमान दीड ते दोन तास हवेतच. आता शिखरवेधाची हौस मनमुराद फिटल्यावर सगळ्यांना गृहवेध लागले होते.
(मी मगाशी उल्लेख केलेला भन्नाट किस्सा पुढीलप्रमाणे - आमची शेवटची टोळी खाली उतरत असताना एक मुलगा त्या माचीच्या अगदी टोकाच्या कडयावर उभा राहून त्याच्या (न झालेल्या) प्रेयसीला सांगत होता "आत्ताच्या आत्ता हो म्हन...नायतर उडीच टाकतो बघ इतुन खाली !!!! माझी शपत हाये तुला..तुज्या घरचा लफडा मी सांभाळून घेईन....पाप लागंल तुला माझा जीव गेला तर...म्हण हो लवकर"....त्या मुलीचा चेहेरा आम्ही पहिला नाही !!!!!!).किल्ल्यांवर घडणा-या या प्रकारांवर उपाय शोधायला हवा !!!
रामसेज उतरून आम्ही खाली आलो तेव्हा घराच्या ओढीबरोबरच एक अनामिक हुरहूर लागली होती.दोन दिवसाची ती सोबत संपूच नये असं वाटत असतं.फेसबुक मुळे जग जरी जवळ आलं असलं तरी एकत्र भेटून केलेल्या कल्ल्याची सर त्याला थोडीच येणार आहे !!! शिखरवेधच्या सर्वच सदस्यांनी जगदीश नसतानाही समर्थपणे आघाडी सांभाळली आणि ट्रेकमध्ये ख-या अर्थाने धुव्वा केला. !!! Hat's off !!! नाशिक CBS ला संध्याकाळी गाडीतून उतरलो तेव्हा सगळ्यांचे नाव पत्ते न विसरता घेतले आणि फक्त बाय करण्यासाठी हात हलवला..त्या निरोपातच पुढच्या ट्रेकला नक्की भेटण्याचं आश्वासन दडलेलं होतं !!!!!
रामसेजचा भक्कम महादरवाजा
रामसेजच्या कातळात खोदलेल्या पाय-या
रामसेजवरची पाण्याची जोडटाकी
चोर दरवाजा..किल्ले रामसेज..
देवनागरी लिपीतील शिलालेख..रामसेज किल्ला
रामसेजची माची..यात शेवटी दिसणा-या पोलच्या थोडं अलीकडे पाण्याचं कोरडं टाकं आहे...
ट्रेकमधला शेवटचा सूर्यास्त....नाशिक महामार्ग...
उदंड करावे दुर्गाटन....!!!!!
अफलातून भटकंती... पुट्रेशु
अफलातून भटकंती... पुट्रेशु
मस्तच फोटो. अजुन वाचलं
मस्तच फोटो.
अजुन वाचलं नाहिये वर्णन. सावकाश वाचेन.
अफलातून, भन्नाट..
अफलातून, भन्नाट..
स्वालिड भटकंती... फोटोज तर १
स्वालिड भटकंती... फोटोज तर १ नंबर
मस्त भटकंती. हाही भाग आवडला
मस्त भटकंती.
हाही भाग आवडला
हाही भाग आवडला >>> +१
हाही भाग आवडला >>> +१
जबरी लिहीलेयस रे.... वर्णन
जबरी लिहीलेयस रे....
वर्णन वाचून सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहीले...
सकाळी थंडीत उठण्याचा प्रसंग, ड्रायवरनी अंगावर गाडी घालण्याचा आणि तो रामसेजवरचा जोडप्याचा तर कहर होता....हहपुवा
फोटो अजून पाहिजे होते....
नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांना सह्याद्रीने एक अचाट वैशिष्ट्य प्रदान केलं आहे.यातला कोणताही किल्ला चढून वर आलो की " हा किल्लाच राक्षसी होता का आपणच दिवसेंदिवस खच्ची होत चाललोय " हा प्रश्न ट्रेकरच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही + १००००००
जबरी लिहीलेय.. मस्त फोटो.
जबरी लिहीलेय.. मस्त फोटो.
सह्याद्री ....... अतिशय
सह्याद्री ....... अतिशय धन्यवाद आशेवाडी बद्द्ल माहिती देण्याबाबत ..
आसेवाडी नाही तर आशेवाडी आहे .. कारण माझ मुळ गाव आहे हे ... आणि ढकांबे आहे ते ...
अरे १६/२० वर्षां purvi रामशेज इतक फेमस नव्ह्त .. राम नवमी ला मोठी जत्रा भरते इथे ..
रामशेज जवळचे रडार असणार्या किल्ल्या बद्दल माहिती असल्यास द्या न ...
तुमच्या कडे ऐतिहासिक भौगोलिक अधिक माहिती असल्यास क्रु. मला द्या ..
इतका अभिमान वाट्तो माझ्या गावचा किल्ला आता सर्वांअर्यन्त ओहोचतो आहे ...
आशेवाडी आधी १० मि. चमार लेणी
आशेवाडी आधी १० मि. चमार लेणी सुध्हा फेमस आहेत ...
अप्रतिम वर्णन व प्रचि.
अप्रतिम वर्णन व प्रचि. अभिनंदन.
खरं तर सप्तशृंगी देवीला म्हणताना जरी आपण वणीची देवी म्हणत असलो तरी सप्तश्रुंगगडाच्या मुख्य मंदिरापासून वणी गाव सुमारे ३०-३२ कि.मी एवढया लांब अंतरावर आहे.गडाच्या सगळ्यात जवळचे गाव नांदुरी असल्याने ब-याच ठिकाणी "नांदुरीगड" अशी पाटी लिहिलेली दिसते आणि practically तेच योग्य आहे.
ओंक्या, (शिखरवेधवाले म्हणोत तेव्हा म्हणोत आम्ही तुला लगेच या नांवाने हाकारायला सुरुवात करतो.. )
तू गाडीरस्त्याने गेलास म्हणून.. चुकीचे विधान केले आहेस... असं नाहीये.
वणी गांवातून ३ किमी. वर चंडीकापूर म्हणून वस्ती आहे. तिथून पुढे २ किमी. वर सप्तश्रुंगगडाच्या सोंडेला आपण भिडतो. मुख्य कड्यामध्ये जवळपास ३६० पायर्या खोदून काढलेल्या आहेत. या पायर्यांचे काम १७६८ मध्ये केल्याचा उल्लेख तिथे असलेल्या शिलालेखात आहे. पायर्या चढून माथ्यावर आल्यावर गणेशमंदिर आहे. इथून सप्तश्रुंग गडाचा खरा भौगोलिक आवाका दिसतो. वणीहून नांदुरीला जातांना सप्तश्रुंगलाच मोठा वळसा मारावा लागतो. या रस्त्यावरुन त्या खोदलेल्या पायर्यांची नागमोडी रेष लांबून दिसते. तुम्ही जर सप्तश्रुंगाहून गाडीने न उतरता या पायवाटेने वणीत उतरला असता तर तुझे मत वेगळे झाले असते. आणि या पायर्यांच्या प्रकरणाचे नांव आहे वणीची प्रसिद्ध 'रडतोंडी वाट'.
त्यामुळे ही वणीचीच देवी आहे. वणी गांवातही गडाकडे जाणार्या वाटेवर देवी मंदिर आहे. गडावर बोललेला नवस या मंदिरात फेडला तरी चालतो. नांदुरीहून जाणारा गाडी रस्ता आत्ता २५-३० वर्षांपूर्वी झाला असेल, पण त्यापूर्वी मुख्य मार्ग हा वणीतूनच होता. नांदुरीतुनही एक पायवाट वर चढते. अजुनही आहे पण ती मुख्य नव्हे.
इति!
बाकी मी तुझ्या लेखनाचा पंखा आहेच. लोकसत्तामधले तुझे लेख मी आवर्जून वाचत असतो. आमच्या दगड्या, आशुचँप यांच्यासारख्या मानाच्या खुसखुशीत वर्णनकारांच्या पंगतीत तुला बसवण्यात येत आहे. (आया च्या रिक्त झालेल्या जागेसाठी त्याच्याच तोडीचा हवा होता)
.. तेव्हा आता न थांबता पोतडीतून लॉग्ज बाहेर पडू देत. पहिल्याच ठोशात अपेक्षा वाढवल्या आहेत. पुढील धाग्याची वाट पहात आहोत.
रामशेज जवळचे रडार असणार्या
रामशेज जवळचे रडार असणार्या किल्ल्या बद्दल माहिती असल्यास द्या न ...
गौरी, रडार असलेला तो बोरगड आणि बाजूला देहेर आहे. पण याची माहिती कुणाला असली तरी इथे न दिलेली बरी कारण हा हवाईदलाच्या ताब्यात असलेला संवेदनशील भाग आहे. त्यामुळे आपणही काही नियम पाळायला हवेत.
उर्ध्वउल्लेखित सर्व अट्टल
उर्ध्वउल्लेखित सर्व अट्टल भटक्या मायबोलीकरांचे मनापासून धन्यवाद !!!
@ हेम,
येस...तू म्हणलास ते अगदी बरोबर..जनरली लोक गाडीनेच सप्तश्रुंगला जातात.हा लेख वाचून पहिल्यांदा कोणी जात असल्यास वणी पासून मुख्य डोंगर गाडी रस्त्याने सुद्धा सुमारे ३२ कि.मी. कसा काय असा गोंधळ होऊ नये म्हणून तसे म्हणले आहे.पण तुझी माहिती अत्यंत उपयुक्त !!!
आणि घरच्या नावाने हाक मारायला सुरुवात करून मायबोली वर ख-या अर्थाने स्वागत झाले आहे...धन्यवाद म्हणणार नाही
सह्याद्रीमित्र
ओंकारा.. असेच लेख पोस्टत जा
ओंकारा.. असेच लेख पोस्टत जा रे नियमितपणे..
हेम.. तू दिलेल्या माहितीबद्दल खूप आभार्स.. आता प्रत्यक्षात जाणे होईल तेव्हा तुला फोनेनच म्हणा.. आम्ही (मी व माझा मित्र) तीन-चार वर्षापुर्वी गेले होतो.. त्यावेळी नांदुरमार्गे पायवाटेबद्दल ऐकले होते.. पण दुर्दैवाने त्याचा तपशील सांगणारे तुझ्यासारख्या स्नेहींची ओळख नव्हती.. आम्ही त्यावेळी गडाला प्रदक्षिणा मारली होती.. आता नक्की तीच प्रदक्षिणा होती का हे ठाउक नाही.. तुला लिंक पाठवतो.. मग सांग मला..
मस्त, खुसखुशीत लेखन... <<(आया
मस्त, खुसखुशीत लेखन...
<<(आया च्या रिक्त झालेल्या जागेसाठी त्याच्याच तोडीचा हवा होता)>>>
हेम, आया आता आयुष्यातल्या सगळ्या अवघड ट्रेकवर आहे
चाबुक रे ..
चाबुक रे ..
मस्त.. मायबोलीला आणखी एक
मस्त.. मायबोलीला आणखी एक भटक्या मिळाला, ज्याला चांगले लिहिताही येते आणि फोटोही चांगले काढता येतात !