नाशिक जिल्ह्यात ट्रेक करायचे तर सह्याद्रीच्या विविध डोंगररांगा समोर येतात... सिलबरी-डोलबरी डोंगररांग, त्र्यंबक-अंजनेरी डोंगररांग, अजंठा-सातमाळा रांग.. प्रत्येक डोंगररांगेने आपापली दिशा निवडून बस्तान बसवलेले.. प्रत्येक रांगेचे शिखर आभाळाला भिडलेले नि विस्तार बघावा तर अगदी दिमाखदार ! अशाच रांगामधील एक आडवी पसरलेली डोंगररांग 'चांदवड रेंज' म्हणून ओळखली जाते.. खरेतर 'सातमाळा' रांगेचाच हा टोकाकडचा भाग गणला जातो... 'सुरगणा' ह्या तालुक्यापासून सुरु झालेली ही रांग 'चांदवड' या तालुक्यात येउन संपते.. पुढे हीच रांग मनमाडजवळील अंकाईपर्यंत विस्तारत जाते..
या 'चांदवड' परिसरातील ट्रेक करण्यासाठीच आम्ही नाशिकचे एसटी स्थानक भरपहाटे गाठले होते... अगदी 'तिन तिगाडा काम बिगाडा' या म्हणीला टक्कर देण्यासाठीच म्हणून की काय मायबोलीवरचे 'गिरीविहार' (गिरी), रोहीत एक मावळा (रो.मा) व अस्मादीक 'यो रॉक्स' असे त्रिकुट आपापल्या पाठीवर दोन दिवसांचे ओझे घेउन जमलेले.. निमित्त ईद व प्रजासत्ताकदिनाची सुटटी लागून आलेला विकेंड ! रो.मा व माझा कामासाठी रविवार आवडता असल्याने 'शुक्र-शनि'वार असा आगळावेगळा विकेंड निवडला होता.. अर्थात गिरीला एका सुटटीचे बलिदान द्यावे लागले ते वेगळे.. असो.. आमचे 'चांदवड'लाच जायचे ठरले ते मुंबई-नाशिक प्रवासातच ! कारण 'धोडपचा किल्ला' अधुनमधून चाळवत होता.. पण ती रांग 'नंतर सविस्तर' करत चांदवडवरच शिक्कामोर्तब केले !... शेवटी काही झाले तरी सातमाळा रांगेला भेट देणे मात्र नक्की होते...हाय काय नाय काय..
चांदवड रेंज म्हणजे चांदवड, इंद्राई, कोळधेर व राजधेर या चार किल्ल्यांची चौकट ! यापैंकी चांदवड किल्ल्यावर जायचे तर प्रस्तरारोहण करणे आवश्यक म्हणून आधीच वगळलेला तर हातात एकूण दिवस बघता 'कोळधेर' ह्या किल्ल्याचा पण प्लॅन रद्द.. तिथेही टॉप गाठायचा तर प्रस्तरारोहण आवश्यक... तसेही इंद्राई व राजधेर हे दोन प्रमुख किल्ले.. या चौकटीमध्ये इंद्राईची उंची सर्वात जास्त - ४४९० फूट तर 'राजधेर' - ३५५५ फूट उंचीच्या आसपास.. तेव्हा ह्या दोन किल्ल्यांनाच पसंती देण्यात आली..
पहाटेचे साडेतीन वाजले असतील पण एसटीस्थानकात फिरताना थंडी काही जाणवली नाही.. अवतीभवती मात्र स्वेटर्,कानटोपी, शाल असे थंडीप्रतिबंधक वेष धारण केलेला पब्लिक दिसत होता... 'श्या.. काहीच थंडी नाही' करत आम्ही मात्र अभिमानाने मिरवत होतो.. पण एक कटींग झालीच.. पहाटे पाच -साडेपाचशिवाय चांदवडला जाणारी बस नाही असे कळले नि रो.मा ने फलाटावरच ट्रेकसंसार मांडला..
पहुडणार तोच एक एसटी आली.. गिरी जातो काय.. नि 'अगदी चांदवड नाही पण गावाबाहेर पाच मिनीटावर नाशिक-आग्रा हायवेला सोडतो' असे एसटीचे मास्तर म्हणतात काय नि आम्ही जाउन बसतो काय.. आता मात्र दिडेकतासाच्या प्रवासात एसटीने स्वतःबरोबर आम्हाला पण चांगलेच गोरठवले.. हायवेला उतरलोच ते कुडकुडत ! जल्ला नाशिक शहरात नाय पण इथे थंडीने आम्हाला चांगलेच कोंडीत पकडले.. साहाजिकच सॅकमधून थंडीप्रतिबंधक वस्तूंना अगदी तातडीने बाहेर काढण्यात आले नि तिथेच नाक्यावरच्या टपरीवर चहाची राउंड झाली.. पुढे हायवेपासून अगदी पाचेक मिनीटांवर असणार्या चांदवड गावाकडे पहाटेच्या अंधारातच परेड सुरु केली.. त्या थंडीने गारठलेल्या अंधारात आमच्यामागून अजुन एक व्यक्ती चालत येताना दिसली.. विचारपुस केली तर म्हणे बुलढाणा जिल्ह्याचा.. इथे MTNL चे काम करण्यासाठी आलाय... नि त्या व्यक्तीने लगेच एक भयंकर प्रश्ण विचारला.. 'इकडे कबरीस्तान कुठेय ?? ' गिरीने त्याला चांगलेच फटकारले.. जल्ला वेळ, काळ, थंडी काय आहे की नाय..
टपरीवरच चौकशी केल्यावर कळले होते सकाळी नऊ शिवाय राजधेरवाडीकडे जाणारी एसटी नाही..तसंपण सकाळी आठ साडेआठ शिवाय काही वाहन मिळणार नाही.. ! म्हटले बोंबला ! उगीच इथे कुडकुडत भजन करावे लागणार.. चांदवडच्या एसटीस्टँडवर पण सन्नाटाशिवाय कोणी दिसेना.. ! म्हणून स्टँडमध्ये शिरलोच नाही.. अजुन कुठे चौकशी करेपर्यंत गिरीने रस्त्याच्या कडेलाच एका दुकानासमोरची चांगली जागा बघून 'एसटी गेली तेल लावत' म्हणून ताणून दिले.. मग रो.मा तरी कसला ऐकतोय..
मी आपला थंडीशी लुडबूड करत कोण गाडीवाला भेटतोय का बघत बसलो.. नाशिकसाठी गाडी लावणार्या एका 'वडाप' वाल्याकडून कळले.. रुपये दिडशेच्या भावात रिक्षा वा गाडी करता येइल.. पण आठ नंतरच.. मी अगदीच त्याचा पाठपुरावा करु लागलो म्हणून त्याने दुसर्या एका गाडीवाल्याला फोन केला नि येइल तासभरात असे आश्वासन दिले.. पण असल्या थंडीत उगीच झोपमोड झालेला कोणी प्रामाणिकपणे उठेल काय.. त्याचा परिणाम सकाळी सातसाडेपर्यंत चांगले उजाडले तरी आम्ही इथेच ताटकळत राहीलो.. दोन तास फुकट !! ज्या गाडीवाल्याचा नंबर मिळाला होता पण त्याला फोन करुन आमचा मोबाईल थकला.. पण प्रतिसाद नाहीच.. एकदा प्रार्तविधीला गेला म्हणे तर एकदा म्हणे कुठे राजधेरवाडीलाच आहात का... या फोनाफोनीत तिथे भेटलेल्या एका रथसारथीला विचारले तर काय अगदी अतिसोज्वळतेचा भाव आणून म्हणाला 'सकाळची वेळ आहे.. तुम्ही पहिलेच.. उगीच जास्त नाही सांगणार.. पाचशे रुपये द्या !' 'घंटा' आम्ही मनातल्या मनात.. जल्ला मुंबई-नाशिक-मुंबईचे भाडे मागत होता !!
पुन्हा एक चहाचा राउंड.. शेवटी एक रिक्षावाला दोनशे रुपयाच्या बोलीवर तयार झाला.. जल्ला बसणारे आम्ही तिघेच पण आमच्यापेक्षा आमच्या सॅक व मॅटलोकांनी जास्त जागा अडवली सो कोंबल्यासारखेच बसलो.. फायदा एकच थंड वार्यापासून संरक्षण !
चांदवड गाव.. या गावाबद्दल ऐकले नव्हतेच.. पण किल्ल्यांच्या माहितीच्या शोधात हे नाव पुढे आले.. मुंबई-आग्राच्या NH3 या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वसलेल्या ह्या गावाला ऐतिहासिक महत्त्व लाभले ते अहिल्याबाई होळकर (बाजीराव पेशव्यांचे सरदार व माळवा प्रांताचे जहांगिरदार असणार्या 'मल्हारराव होळकर' यांच्या सून) यांनी बांधलेला रंगमहल नावाचा वाडा व रेणुकामातेचे मंदीर या दोन गोष्टींसाठी.. 'रंगमहाल' गावात असल्यामुळे परतीच्या प्रवासात बघू म्हणत आम्ही हायवेलाच लागणार्या त्या रेणुकामातेच्या मंदीराकडे वळालो.. आता जिर्णोद्धार झाला असला तरी मंदीरासमोर उभी असणारी दिपमाळ व मंदीराचे किल्लेसदृश असणारे प्रवेशद्वार त्या काळाची आठवण करून देते.. ह्या मंदीराचा गाभारा म्हणजे डोंगरातील गुहाच आहे.. ह्याच मंदीराला खेटून चांदवड किल्ला दिमाखात उभा दिसला.. ह्या किल्ल्याच्या डोंगराला लागूनच एका टेकाडावरती 'चंद्रेश्वर'चे शुभ्र पांढर्या रंगाचे मंदीर बांधलेले दिसते.. इथला परिसर पावसात अगदी खुलतो तेव्हा जमल्यास पावसात येउ म्हणतच अगदी प्रसन्न मुद्रा असणार्या रेणुकामातेचे यथेच्छ दर्शन घेतले नि राजधेरवाडीकडे निघालो..
मंदीराचे प्रवेशद्वार
- -
- -
मंदीरातील माहितीफलक
या मंदीराच्या पुढे हायवेच्या डावीकडे फाटा फुटतो.. वाटेत इच्छापुर्ती गणेशमंदीर दिसले.. पुढे अंदाजे ८-१० किमी अंतर असल्याचे कळले.. चांगलेच उजाडले होते तरीसुद्धा सभोवताल पांढर्या अंधुक धुक्यात गुरफटलेला होता.. असेच दोन तीन डोंगरांना वळसा देत देत 'वेडबरी' व अशी काही छोटी खेडी यांना मागे टाकत अगदी शेवटाला राजधेरवाडीला(राजदेहेरवाडी) पोहोचलो.. रिक्षातून उतरलो नि समोर टेकाडावर 'राजधेर' विसावलेला दिसला.. तर डावीकडे इंद्राई किल्ला खुणावत होता.. या दोन्ही किल्ल्यांशी आज एका दिवसातच दोन हात करायचे होते.. राजधेर करुन इंद्राईवर रात्रीचा मुक्काम करण्याचा बेत ठरला कारण पिण्यायुक्त पाणी इंद्राईवर उपलब्ध असे वाचले होते.. तेव्हा विलंब न लावता तिथेच असलेल्या शाळेच्या थोडे पुढे जाउन उजवीकडून डोंगरावर चढाई सुरु केली..
इंद्राई किल्ल्याला पाठमोरे राहून संपुर्ण मोकळा असलेल्या डोंगरावरुन चढाई सुरु झाली.. सोप्पी चढण... वाट समजण्यासाठी दिशादर्शक म्हणून अधुनमधून पांढरा चुना मारलेला दिसतो.. पण जिथे जंगल नाही वा दाट झाडी नाही तिथे वाट हरवण्यासारखे काही नाही.. सुरवातीचे पहिले चढण पार करुन वरती आलो नि गिरीची गॉगलसाठी सॅकमध्ये शोधाशोध सुरु झाली.. ट्रेकसाठी नविन घेतलेला गॉगल ट्रेकमध्ये वापरण्याआधीच हरवला तर काय करावे ह्या कोडयाचे उत्तर गिरीविहारच सांगू शकेल... बॅड लक ! वाटेत अधुनमधून काही कोरलेल्या तर काही दगडी पायर्या लागल्या नि हे पार करताच आता राजधेर नाकासमोर दिसू लागला..
राजधेरचा सर्वात वरचा भाग तर अगदी डोंगराने मुकूट परिधान केल्यासारखा दिसत होता.. हा मुकूट म्हणजे आडवी पसरलेली कातळ भिंतच.. या भिंतीलाच एक भगदाड पाडून गुहा बनवली आहे व तिथूनच वरती प्रवेश करण्यासाठी मार्ग आहे.. पण या भिंतीलाच पार करण्याचे दिव्यकाम तिथे उभारलेल्या अंदाजे चाळीस फूटीच्या लोखंडी शिडीमुळेच पार पाडता येते..!!
हेच ते भगदाड..
आता वाट अगदी सरळ सोंडेवरुन जात असल्याने आम्ही अगदी जोमाने चालू लागलो.. सभोवतालचा परिसर न्याहाळण्यासाठी वातावरण एकदम बेक्कार होते.. खरे तर थंडीमध्ये ट्रेक करायचे तर ही प्रमुख अडचण बनते.. सगळे धुसर दिसत होते.. अगदी इंद्राई किल्ला पण धुक्यात लुप्त होत चालला होता.. याच पटट्यात येणारा कोळधेर किल्ला तर फारच अस्पष्ट दिसत होता.. तर मागे 'जातेगाव'च्या डोंगरांची उंची राजधेर डोंगराच्या खाली गेलेली..
'जातेगाव'चा डोंगर
ग्रुप फोटोला साक्षीदार राजधेर
राजधेरची जी भिंत दिसते तिच्या अगदी जवळून जाणारी सोप्पी वाट आहे.. पण सर्वात पुढे असताना माझे लक्ष त्या वाटेकडे काही गेले नाही नि आम्ही खालुन जाणारी वाट पकडली जी अगदी शिडीच्या खाली असणार्या काटेरी जंगलात आणून सोडते.. झाले आम्हाला अगदी त्या काटेरी झाडांशी झटापटी करुन शिडी गाठावी लागली.. आता कुठे ट्रेक करतोय याची जाणिव झाली.. पण रोमा व गिरी यांनी आणलेल्या मॅटची मात्र लक्तरे निघाली.. ‘तरी तुला सांगत होतो वरतून वाट आहे’ इति रोमा पुटपुटतच बसला.. कारण अर्ध्याबाह्याचा टीशर्ट परिधान केल्याने या साहेबांनाच काटयांनी चांगले ओरबडून काढले होते…!
शिडीच्या दिशेने आम्ही कूच करतोय हे पाहताच त्या डोंगरावरील वानरांचा कळप शिडीवरून भराभर उतरु लागला.. अगदी आम्ही पोहोचेस्तोवर त्यांनी मार्ग खुला करुन ठेवला होता म्हणा.. शिडीजवळ पोहोचलो नि बस्स.. याचसाठी केला होता राजधेरचा ट्रेक.. चाळीस फुटांची, मध्यभागी वाकवलेली ही शिडी नसती तर अवघड प्रस्तरारोहण करुन जाण्याशिवाय पर्यायच नाही..याचे कारण एकच... ब्रिटीशांनी सुरुंग लावून पायर्या उडवलेल्याच्या खुणा अजुनही तितक्याच ठळकपणे दिसतात.. आम्ही एकेक करुन शिडीने चढुन गेलो नि गुहेत पोचलो (शिडीच्या खालून सहा-सात पायर्यानंतर दोन पायर्या तुटलेल्या असून त्याजागी लाकूड बांधलेय तिथे थोडी काळजी घ्यावी)..
शिडीने चढतानाच ह्या गुहेच्या तोंडाजवळ बाहेरुन एक फ़ारसी शिलालेख आढळतो.. गुहेत पोहोचलो नि आम्ही कमालीचे खूष झालो.. अगदी हडसरप्रमाणेच इथे वरती जाण्यासाठी पायर्या कोरलेल्या होत्या ज्या खालुन इथवर येताना थांगपत्ताच लागू देत नाहीत.. पायर्या चढताना डाविकडे एक लेण्यांची व एक साधी अश्या दोन गुहा लागतात.. पुढे ढासळलेली तटंबदी व पुर्णतः उध्वस्त प्रवेशद्वार पाहून आम्ही वरती माथ्यावर आलो…
- - -
आमच्या भाषेत आमचा ट्रेक इथेच फ़ुलटू वसूल झाला होता… एका झाडाखाली सावलीत क्षणभर विश्रांती करुन पोटाला 'सटर फटर' खाद्याचा आधार दिला नि भर उनात माथा फ़िरायला घेतला.. पण सभोवताल मात्र अजुनही तस्साच धुरक्यामुळे फिक्का फिक्का !
खालुन जेव्हा राजधेरचा माथा पाहिला तेव्हा वाटलेही नव्हते इतका मोठा घेरा असेल… वरती आल्यावर दोन दगडी खांब उभे केलेत त्यांच्या डावीकडे वळले कि एके ठिकाणी कबर लागते तर उजवीकडे कातळाच्या भुगर्भातच जवळपास दहाफुटी खोदलेली दोन खोल्यांची मस्त गुहा आहे.. सध्या तिथे कुण्या बाबाचे वास्तव्य अहे.. त्या बाबाने तर राहत्या गुहेचा भाग अगदी राहण्याची खोलीच वाटावी असा उत्तमरित्या ठेवला आहे.. उतरण्यासाठी लाकडी शिडी, झोपण्यासाठी खाट नि साफसफाई करुन नीटनेटकी ठेवली आहे.. तो भेटला असता तर नक्कीच आनंद झाला असता..
इथेच पुढे घुमटाकार कमान असणारे सुके टाके व अजुन एक खोदीव गुहा आहे.. इकडे सध्या माकडांचे साम्राज्य आढळून आले.. याच रेषेत सरळ पुढे गेले की बर्यापैंकी मोठा तलाव लागतो. त्याकाळात बांधून काढला असावा कारण एका बाजूस पडकी भिंत दिसते तर एका बाजूस या तलावात येण्यासाठी कोरलेल्या पायर्या दिसल्या... येथील पाणी मात्र पिण्यास अयोग्य वाटले.. ज्या वाटेने तलावापर्यंत पोहोचतो तीच वाट पुढे तलावाच्या काठाबाजूने जात अगदी काठाला खेटून असलेल्या महादेवाच्या छोटया मंदीरापर्यंत आणून सोडते.. हे मंदीर तर कातळालाच खोदून बनवलेले, सहजासहजी नजरेस न पडणारे..
- - -
तलावाच्या जवळून दिसणारा राजधेरवरील परिसर
- - -
तो गुहेतला बाबा नि आम्ही उडीबाबा !
पुढे आणखीन काही विशेष नसल्याचे वाचले असल्याने इथूनच माघारी फिरलो नि पुन्हा त्या दोन खांबापाशी आलो.. या खांबाच्या उजवीकडच्या भागात नि:स्तब्धपणे एकाकी पडलेला एक छोटा वाडा आहे.. सुबक बांधकाम व अजुनही सुस्थितीत असा... ह्या वाडयाला सजीवत्व प्राप्त व्हावे व त्याकाळचा अनुभव त्याच्याच शब्दात ऐकावा असे मनात चटकन येउन गेले..
विचारमंथन करण्यास जास्त वेळ नव्हता.. एव्हाना गिरीचा 'चला रे लवकर, उतरणार कधी व इंद्राई गाठणार कधी' चा नारा सुरुच झाला होता.. खरेतर ह्या डोंगरावरचा 'राजधेर' हा मुकूट बघताना दिडेकतास कधी लोटला ते कळलेच नाही तेव्हा लगेच उतरायला घेतले.. उतरताना मात्र या पायर्या अगदी खालची दरी दाखवत होता.. राजधेरच्या ह्याच भागामुळे बहुदा ह्या ट्रेकची गणना कठीन श्रेणीत होत असावी.. पुर्वी शिडी नव्हती पण आता शिडीमुळे फारसे अवघड असे काही उरले नाही..
- - -
गुहेतून दिसणारा समोरील इंद्राईचा किल्ला
शिडी उतरून खाली उतरलो नि आता मात्र कातळभिंतीला बिलगून जाणार्या वाटेने परतीला निघालो.. इथेदेखील पाण्याचे टाके आहे.. पण गुरढोरांचा यथेच्छ वावरामुळे उरलेसुरलेले पाणी दुषित.. इथे पिण्याची पाण्याची मारामार आहे.. असो.. वाटले होते लवकरात लवकर आरामात खाली राजधेरवाडीला पोहोचू पण सुर्यनारायणच्या मनात काय होते कुणास ठाउक.. अगदी प्रखर किरणांचा मारा सुरु केला.. तसेही वेळ त्या प्रखरतेला साजेशी.. शिवाय चोहोबाजूला ओसाड असल्याकारणाने शितल छायेची आस धरणे वेडेपणाचे ठरले असते.. तेव्हा उनात करपणे अटळ होते.. उतरण्यासाठी काहीच अवघड अशी वाट नव्हती तेव्हा एकमेकांशी न बोलता मान खाली घालून जमेल तशे धडाधड उतरत होतो.. उतरण्यासाठी केवळ एक तासाचा अवधी घेत दुपारच्या तीन साडेतीनच्या सुमारास पायथ्याची शाळा गाठली.. पण पुर्णतः निष्प्रभ झालो होतो.. कुणी रेफ्रिजेटर आणून ठेवावा व त्यात स्वतःलाच बंद करुन घ्यावे इतकी वाईट परिस्थिती झाली होती.. तिथे खेळणार्या दोन पोरांनीच त्या शाळेतल्या नळावर पाण्याच्या बाटल्या भरुन देण्याचे मोठे काम केले.. नाहीतर तेदेखील करणे जीवावर आले होते...
त्या पोरांशी थोडावेळ गप्पा मारत क्षणभर विश्रांती घेतली नि पुढल्या मोहीमेला चालू पडलो.. सुर्यास्त होण्याआधी इंद्राईच्या गुहेत पोहोचण्याचे उद्दीष्ट होते.. पण नुकताच बसलेला उनाचा तडाखा आणि समोर अवाढव्य पसरलेल्या इंद्रागिरीचा विस्तार बघता आता पुढची वाटचाल खूपच खडतर वाटत होती.. तेथील गावकर्यांशी चौकशी केल्यावर कळले की गावात आलेल्या डांबरी रस्त्यानेच मागे एक दोन मैल चाल करुन पुढच्या खेडयातून जायला वाट आहे.. पण ती वाट इथूनसुद्धा दिसत असल्याने आम्ही शेतमळ्यांमधून शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.. ते दोनेक मैलाची भर उनातली चाल वाचवणे पण आता आम्हाला मोलाचे ठरले होते.. शेवटी प्रयत्न सफल झाला.. एका आजीने तुम्हाला त्रास तर नाही ना होणार अशी काळजी व्यक्त करत आम्हाला शेतमळ्यांमधून जाणारी वाट दाखवली..
(इंद्राईचे टोक अगदी मागे दिसतेय)
शेतमळ्यांमधून जाणारी वाट केव्हाही सुखावह ! आतापर्यंत कधीच या वाटेने निराश केले नाही वा त्रास दिला नाही.. इथे तर द्राक्षांचे मळे दुरवर दिसत होते तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचलेली.. आम्ही भ्रराभर शेतमळ्यांच्या आखीव रेषेवरून चालू लागलो.. सुरवातीला कांद्याची शेती लागली.. मग द्राक्षाचा मळा लागला पण द्राक्षच नव्ह्ती.. पण पुढे अजुन एक मळा लागला तिथे मात्र निराशा झाली नाही.. द्राक्षांचे लटकणारे घोस बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले नि सरळ बिनधास्तपणे हात घातला.. तितक्यात तिथला रखवालदार आला तेव्हा त्यालाच जरा द्राक्षाचा एखादा चांगला घड काढून देण्याची विनंती केली.. पण त्या माणसाने 'अतिथी देवो भवः' नुसार आम्हाला प्रत्येकाला एक असे चांगले तीन घड दिले.. आमच्यासाठी तर सोने पे सुहागा !
तशीच द्राक्षे हातात घेउन तोंडात टाकत आम्ही पुढची वाटचाल सुरु ठेवली.. गावकर्यांनी दाखवलेल्या वाटेला जाउन मिळेस्तोवरच दम निघाला.. ! राजधेरवरुन उतरताना लागलेल्या उकाडयाचे आता परिणाम मात्र दिसू लागले.. रो.मा ला कधी नाही ते पायात क्रँप येउ लागले.. आम्हा तिघांची पाठ व मान भरुन आल्यासारखी झाली होती.. मागे वळून पाहिले तर अवघ्या दोन तासात राजधेरच्या मुकूटावरुन इथपर्यंत केलेली पायपीट आम्हालाच अविश्वसनीय वाटत होती..
वाटचालीमध्ये ब्रेक्स वाढले नि सरळ बसकणच मारत होतो.. हवेचा झोत अधुनमधून नावाला येत होता तेव्हा जीव थोडाफार शांत बनत होता.. ब्रेक म्हणून बसले की झोपून द्यावेसे वाटत होते.. अशा परिस्थितीत दृष्टीपथात असणारा इंद्राई किल्ला मात्र नक्की कुठल्या मार्गाने चढून जायचा याबद्दल साशंक होतो.. वाडीतल्या गावकर्यांनी तर या वाटेने असे जायचे.. मग डोंगराच्या अमुक तमुक शीरेवरुन वरती जाल इति इति सांगितले होते.. पण प्रत्यक्षात इथे गोंधळ उडाला.. आम्ही पकडलेली वाट आडव्या पसरलेल्या इंद्राईच्या पश्चिमेकडे घेउन गेली.. तिथून भारीतले निसरडया वाटेचे वळसे घेउन पुन्हा पुर्वेकडे घेउन जाउ लागली.. इंद्राई किल्ल्याच्या दिशेने मात्र काही जात नव्हती.. त्यातही इंद्राई किल्ल्यावरच्या राजधेर किल्ल्याकडे तोंड करुन असणार्या गुहा पण दिसल्या.. पण वाटेच्या मनात काहीतरी वेगळेच.. आधी इंद्राई किल्ला डावीकडे.. मग पुर्वेकडे जाताना तोच उजवीकडे... जल्ला आमच्या वाटेला काही भिडत नव्हता..
आम्हाला पण आता थारा काही होत नव्हता.. कधी एकदाचे वरती पोहोचतोय असे झाले होते.. आता सातत्याने घडयाळाकडे लक्ष जात होते.. अंधार पडायच्याआधी गुहा गाठणे गरजेचे होते.. अन्यथा कठीण परिस्थिती उद्भवणार होती.. आम्ही त्या वाटेने काटेरी झुडूपांचे जंगल, ओबडधोबड खडक यांना मागे सोडून एका पठारावर आलो.. आणि वर जाणारी वाट दिसते का ते शोधू लागलो... !
क्रमश :
'चांदवड'च्या मुलखात :भाग २: 'इंद्राई' ची नवलाई
चांदवड'च्या मुलखात :अंतिम भाग: "रंगमहाल"
कडक रे ट्रेक.... च्यायला त्या
कडक रे ट्रेक....
च्यायला त्या शिडीचा आणि भगदाडाचा फोटो पाहूनच ट्रेक करावासा वाटू लागला आहे...खतरी फोटो काढलायस....
रच्याकने जर तुम्ही राजधेरला मुक्काम करणार नव्हता तर मग एवढी अवजड ओझी का घेऊन गेला...खालीच एखाद्या घरी विनंती विशेष करून ठेउन द्यायच्या ना सॅक्स...एक सॅकमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि च्याउ म्याऊ आणि बाकी मौल्यवान सामान घेऊन जायचे.
Savistar nantar lihito. Lekh
Savistar nantar lihito. Lekh n fotoz 1 no. English History cha para lekhachi link todtoy. Udav tyala.
Ashu ne barobbar pakadalay tula.
मस्त रे !!
मस्त रे !!
भन्नाट
भन्नाट
यो सुंदर लेख, वाचुन वाटतेय की
यो सुंदर लेख, वाचुन वाटतेय की परत ट्रेक सुरु केला....
एवढी अवजड ओझी का घेऊन गेला>>>>> आशु खरच, हे आमच्या लक्षात नाही आल...
जबरी जबरी जबरी... माकडानी
जबरी जबरी जबरी...
माकडानी त्रास नाही दिला ते एक बरय.. :
या खांबाच्या उजवीकडच्या भागात
या खांबाच्या उजवीकडच्या भागात नि:स्तब्धपणे एकाकी पडलेला एक छोटा वाडा आहे.. सुबक बांधकाम व अजुनही सुस्थितीत असा... >>>> कोणी केले असेल हे एवढ्या उंचीवरील हे बांधकाम ????
सर्व लेख व फोटु मस्तच ... कुठली कुठली ठिकाणं शोधून काढाल आणि जाल तिथे - धन्य आहे तुम्हा सर्वांची ...
____/\_____
भन्नाट, जबरी ट्रेक... राजधेर
भन्नाट, जबरी ट्रेक...
राजधेर आणि इंद्राई मधिल अंतर किती होते... फोटो मधे तरी बरच अंतर दिसतयं आणि ते ही उन्हातून कापायचे म्हणजे
आशु +१
राजधेर आणि इंद्राई मधिल अंतर
राजधेर आणि इंद्राई मधिल अंतर किती होते>>>> असेल जवळपास ३-४ किलोमीटर....
अगदी हडसरप्रमाणेच इथे वरती
अगदी हडसरप्रमाणेच इथे वरती जाण्यासाठी पायर्या कोरलेल्या होत्या..>>>> यो मला ह्या पायर्या हडसर पेक्षा अलंगशी (रॉकपॅच नंतर्च्या गुहेवरील पायर्या) मिळत्या जुळत्या वाटल्या....
मस्त ट्रेक चालू आहे तुमचा
मस्त ट्रेक चालू आहे तुमचा
भारीच ! जाम दमवलय ट्रेकने
भारीच ! जाम दमवलय ट्रेकने ह्या , द्राक्ष मात्र अम्रुता प्रमाणे लाभली म्हणायच....... त्या वेळेला त्याची किंमत भटकेच जाणोत.... प्र.ची. लेख आवडले.
यो we did this trek in 2005
यो
we did this trek in 2005 ie Rajdher, Koldher, Indrai, Hatti , Dhodap, Eikharia in 3 days. it was very nice to go around in this area. i ll put photo's very soon. that time i dont have digital cam but photos are available. if you see my profile photo it was taken on Indrai only. nice photos. thanks for updat its remind me my 3 days trek in BAGLAN.
अगदी वेगळा गड निवडलात. मस्तच
अगदी वेगळा गड निवडलात. मस्तच प्रचि, आणि वर्णन !
अवांतर : द्राक्षाचे घड नेहमी धुवूनच खावेत
मस्त फोटो आणि वृतांत.
मस्त फोटो आणि वृतांत.
धन्यवाद.. जल्ला चँपा..
धन्यवाद..
जल्ला चँपा.. लक्षातच नाही आलेरे.. ! म्हणून सांगतो आमच्यासंगे ट्रेक कर रे कधीतरी..
हेम.. उडवले रे.. ते इतिहासाबद्दल माहित असेल तर टॉर्च मार.. नि तुझ्याकडील सविस्तर प्रतिसादाचे स्वागतच
नीउ.. अनुभव वाचायला आवडेल..
दिनेशदा.. द्राक्षांबद्दलच्या प्रतिसाद अगदी अपेक्षित.. पण धुऊन घेण्याचा कंटाळा करत फक्त पुसूनच खाल्ली.. !!
इंद्रा.. अंतर फारसे नाहीये.. हा राजधेरचा टॉप ते इंद्राईचा टॉप म्हणशील तर बरेच आहे..
(शिडीच्या खालून सहा-सात
(शिडीच्या खालून सहा-सात पायर्यानंतर दोन पायर्या तुटलेल्या असून त्याजागी लाकूड बांधलेय तिथे थोडी काळजी घ्यावी)..
गिरी.. मस्त
गिरी.. मस्त
यो आधी सांगितले असतेस तर
यो आधी सांगितले असतेस तर चांदवड मध्येच काही तरी सोय करुन दिली असती की...सासुरवाडीचं आजोळ आहे चांदवडला..
राजधेरची शिडी आठेक
राजधेरची शिडी आठेक वर्षांपुर्वी बसवली गेली. त्याआधी ते ५०-६० फुटांचे प्रस्तरारोहण केल्याशिवाय पर्याय नव्हता. शिडी वरच्या मौनी बाबाने गांवकर्यांच्या मदतीने बनवून घेऊन बसवली आहे, त्यामुळेच आपल्यासारख्या सामान्यांना राजधेरसारखा सुंदर दुर्ग पदरात पाडून घेता येतो. प्रस्तरारोहणासाठी दोर ओवायला पायरीकडे भोक आहे. शिडीने जरी प्रकरण सोपं झालं असलं तरी मध्यावर आल्यावर हलणारी शिडी थरारक अनुभव देऊन जाते, त्यासाठी तरी प्रत्येकाने राजधेर करायलाच हवा.
उत्तर टोकाकडे गेल्यावर तटाचे अवशेष आहेत. तिथे डावीकडच्या टोकाकडे आणखी एक वर येण्यासाठी मार्ग आहे पण तोही अवघड श्रेणीचे कातळारोहण करणार्यासाठीच.
इ.स. १८१८ मध्ये चांदवड दुर्ग इंग्रजांनी घेतल्यावरही राजधेरने सहजी हार मानली नाही. प्रखर झुंज देऊन गड इंग्रजांच्या हाती पडला तेव्हा गडावर जवळपास ५० हजाराची रक्कम त्यांना मिळाली. याचवेळी प्रवेशद्वाराच्या पायर्या त्यांनी सुरुंग लावून नष्ट केल्या.
लेख आणि सुंदर प्रचिंसाठी तुला त्रिवार मुजरा!!
मस्त फोटो आणि वृतांत.
मस्त फोटो आणि वृतांत.
राजधेर ची शिडी चढताना दिसणार्
राजधेर ची शिडी चढताना दिसणार् या
फारशी शिलालेखाचा फोटो टाकू शकाल का?
व्वा मस्त लिव्हलय यो ...
व्वा मस्त लिव्हलय यो ... चाबुक
परत एकदा रपेट झाली.
शिडीने जरी प्रकरण सोपं झालं असलं तरी मध्यावर आल्यावर हलणारी शिडी थरारक अनुभव देऊन जाते, त्यासाठी तरी प्रत्येकाने राजधेर करायलाच हवा. >> अन अजुन एक .. हेम त्या शिडिला मध्ये थोडा बेंड आहे.तिथे खरी मजा येते.
हाच तो फारशी शिलालेख..
करा लेको.. चैन करा...
करा लेको.. चैन करा...
खा रोज मटार उसळ...खा रोज
खा रोज मटार उसळ...खा रोज शिक्रण...
हा घे झ्ब्बु
हा घे झ्ब्बु
हिम्या.. अरेरे.. आधी माहित
हिम्या.. अरेरे.. आधी माहित असते तर.. पुन्हा कधी जाणे होईल तर तुला संपर्क करेनच..
हेम.. मस्त माहिती.. नि खरच "आपल्यासारख्या सामान्यांना राजधेरसारखा सुंदर दुर्ग पदरात पाडून घेता येतो. " या वाक्याला +१०० !!
आया.. चँप सांगतोय ते ऐकायचे काम कर.. आम्ही चैन करतो..
neeu.. झब्बू ??
ग्रेट!
ग्रेट!
हायला... कसले भन्नाट भन्नाट
हायला... कसले भन्नाट भन्नाट ट्रेक करताय राव तुम्ही लोकं... लै ज़ळतोय मी तुमच्यावर ... करायचे आहेत अशा ट्रेक्सची यादी वाढतच चाल्ली आहे .. लवकरच भारत वारी करावी लागेल असं दिसतय
जबरी ट्रेक आणि तितकेच जबरी फोटो
फोटो upload HOT NAHI YE NEED
फोटो upload HOT NAHI YE NEED HELP
Pages