निवेदन - १०० दिवसांची शाळा - मेळघाटात स्वयंसेवक हवेत.

Submitted by हर्पेन on 22 November, 2012 - 06:45

'मैत्री शाळा १०० दिवसांची - मुलांच्याच गावी' (मेळघाट २०१२ – २०१३)
स्वयंसेवक हवेत.

नमस्कार!

गेल्या १५ वर्षांपासून पुणेस्थित 'मैत्री' नावाची एक संस्था, प्रामुख्याने, मेळघाटात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यु टाळण्यासाठी व इतर भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. (अधिक माहितीसाठी भेट द्या - www.maitripune.net) तेथे पावसाळ्यात होणारे बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते, त्याकरता, आखून घेतलेल्या कार्य़क्षेत्रामधे 'शुन्य बालमृत्यु' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, धडक मोहीमा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे हे काम करण्यात येत आहे.

'मैत्री'ला नेहेमीच ह्या सर्व कामामधील प्रत्य़क्ष लोकसहभाग हा जास्त मोलाचा वाटत आलेला आहे.
हे काम आपल्या-तुपल्या सारख्या सर्वसामान्य (इथे सर्वसामान्य हा शब्द, ज्यांचे शिक्षण / ज्यांचा पेशा समाजसेवा ह्या विषयातला नसून इतर काहीतरी आहे, अशा हिशोबाने योजला आहे.) लोकांना कार्यकर्ते म्हणून सामील करवून घेऊन करण्यात येते.

ह्या दरम्यान (गेल्या १५ वर्षात) असेही जाणवले की तात्कालिक वैद्यकीय मदतीबरोबरच एकंदरीत स्थानिक 'कोरकू' समाजामधल्या लोकांमधे शिक्षणाबाबत जागृती घडवून आणली तर 'कुपोषण' ह्या समस्येच्या मुळावरच घाव घातल्यासारखे होईल.

ह्या विचारधारेतलाच एक भाग म्हणून, गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०११ ते मार्च २०१२ या काळात मेळघाटातील शाळाबाह्य ४० मुलांकरता 'मैत्री' ने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. मी, हर्षद पेंडसे, गेल्यावर्षी स्वतः स्वखर्चाने ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो व त्यामुळेच हे निवेदन सादर करत आहे.

या शाळेला स्वयंसेवक आणि देणगीदारांचा व अर्थातच मेळघाटातील मुला-पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध कारणांमुळे शाळा सुटलेल्या अथवा शाळेत जावू न शकलेल्या ४० मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याच्या 'मैत्री'च्या उद्देशाला नक्कीच यश मिळाले. आज ही मुले वेगवेगळ्या आश्रम शाळेत पुन्हा दाखल होवून शिकू लागली आहेत. चांगले मार्गदर्शन मिळाले तर आपण शिकू शकतो हा विश्वास त्यांना व त्यांच्या पालकांनाही मिळाला आहे. या शाळेच्या निमित्ताने मेळघाटात 'शिक्षण विषयक काहीतरी भरीव व चिरस्थायी अशा कामाचा' संकल्प 'मैत्री' ने सोडला. 'सरकारी शाळांना समांतर अशी व्यवस्था निर्माण न करता मेळघाटातील मुले उत्तम रीतीने कशी शिकू शकतील' हा विचार समोर ठेवून यावर्षीच्या व पुढील वर्षांच्या प्रकल्पांचा/उपक्रमांचा विचार केला आहे.

कसे असेल या उपक्रमाचे स्वरूप?

डिसेंबर ते मार्च या काळात १०० दिवस आपण गावात जावून शाळांना मदत करणार आहोत.

प्रत्येक शाळेत २ स्वयंसेवक एक आठवडा जातील व काम करतील. पुढच्या आठवड्यात नवीन स्वयंसेवक जातील आणि अशा रीतीने १०० दिवस स्वयंसेवक गावात असतील.

शिक्षक असेल तेव्हा शिक्षकाच्या बरोबर व नसेल तेव्हा स्वतंत्रपणे शाळेतच हे स्वयंसेवक मुलांना भाषा, गणित, विज्ञान व आरोग्य हे विषय शिकवतील. तसेच गाणी, गप्पा, गोष्टी, चित्रकला, हस्तकला, प्रयोग व मैदानी खेळ सुद्धा घेतील.

८ ते १२ वयोगटासाठी आवश्यक असलेली भाषा व गणित विषयांच्या क्षमता मुलांमध्ये याव्या हे शिकवण्याचे प्रमुख उद्दिष्ट असेल. इतर सर्व गोष्टी याच्याशी पूरक अशा घेतल्या जातील.

'स्वयंसेवक शिक्षक' चिलाटी येथे मैत्रीच्या केंद्रावर राहतील व दररोज चालत ठरलेल्या गावी जातील.

'स्वयंसेवक शिक्षकांनी' काय शिकवायचे याचा आराखडा त्यांना पुण्यामधून दिला जाईल, त्याचे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल व त्याकरता लागणारी साधने पण दिली जातील.

आराखडा डिसें २०१२ ते मार्च २०१३

एकूण गावे - ३ (प्रत्येक गावात १ शाळा)

कालावधी - ७ डिसेंबर २०१२ ते १५ मार्च २०१३ (१४ आठवडे/ १०० दिवस)

लागणारे एकूण स्वयंसेवक - ८४ (प्रत्येक आठवड्याकरता ६ )

एकूण मुले - ६० (प्रत्येक शाळेत २० याप्रमाणे)

स्वयंसेवक वेळापत्रक :

Batch No Batch Period Start from Pune Return from Melghat

1 7-Dec to 16-Dec 07-12-2012 16-12-2012

2 14-Dec to 23-Dec 14-12-2012 23-12-2012

3 21-Dec to 30-Dec 21-12-2012 30-12-2012

4 28-Dec to 7-Jan 28-12-2012 06-01-2013

5 4-Jan to 13-Jan 04-01-2013 13-01-2013

6 11-Jan to 20-Jan 11-01-2013 20-01-2013

7 18-Jan to 27-Jan 18-01-2013 27-01-2013

8 25-Jan to 3-Feb 25-01-2013 03-02-2013

9 1-Feb to 10-Feb 01-02-2013 10-02-2013

10 8-Feb to 17-Feb 08-02-2013 17-02-2013

11 15-Feb to 24-Feb 15-02-2013 24-02-2013

12 22-Feb to 3-Mar 22-02-2013 03-03-2013

13 1-Mar to 10-Mar 01-03-2013 10-03-2013

14 8-Mar to 17-Mar 08-03-2013 17-03-2013

तुम्ही कशा प्रकारे सहभागी होवू शकता?

१० दिवस मेळघाटात प्रत्यक्ष शिकवण्याकरता जावून
मेळघाटात जाण्याकरता स्वयंसेवक मिळवून देवून
या उपक्रमासाठी आर्थिक/ वस्तुरूपाने मदत करून (एकूण अपेक्षित निधी - अंदाजे रु. २ लाख)
या उपक्रमासाठी वस्तुरूपाने मदत करून
बालवाडीच्या मुलांसाठी गोष्टीची पुस्तके
ओरिगामी, चित्रकला, हस्तकला याचे साहित्य
मुलांच्या वैयक्तिक आरोग्याकरता साहित्य ( ब्रश , पेस्ट, साबण, तेल)
विज्ञानाकरता प्रयोग साधने व उपकरणे
पुण्यामधील कामामध्ये सहभागी होवून
उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून

संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ (वैशाली, मधू, लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१

MAITRI : 32, ‘Kalyan’, Nataraj Society, Karvenagar, Pune 411052.
Phone: +91-20-25443134, Office: +91-20-25450882
Email : maitri1997@gmail.com www.maitripune.net
Regn. No.: E 2898/PUNE.

७ डिसेंबर पासून मेळघाटात सुरु असलेल्या '१०० दिवसांच्या शाळेचे आज २२ जानेवारी म्हणजे ४५ दिवस झाले, जवळजवळ अर्धा टप्पा.

१ फेब्रुवारीच्या आठवड्यासाठी अजून कोणीच स्वयंसेवक मिळालेले नाहीयेत. ८ फेब्रुवारीच्या आठवड्यामध्ये पण २ जण नक्की आहेत पण आणखी ३/४ जण हवे आहेत. त्यामुळे माबोकरांनो आपणा पैकी कोणाला जाणे शक्य असेल तर जरूर विचार करावा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेळापत्रकाचे फॉरमॅटींग नीट कसे करावे या बाबत मार्गदर्शन करा किंवा विपू मधून अधिक माहिती मागवा. वर्ड्-शीट पाठवण्यात येईल. धन्यवाद!

अप्रतिम, धन्यवाद! कोणत्याही प्रकारची मदत स्वागतार्हच आहे! पण स्वतः जाणे एकदम चांगले; जाणार असशील तर 'मैत्री'च्या कार्यालयात फोन कर. तसेच तुझी विपू बघ.

निवांत पाटील, मी तुमचा प्रतिसाद उशीरा म्हणजे आत्ता बघितल्याने आता उत्तर देतोय, संस्थेचे क्रमांक दिलेले आहेत त्यामुळे फोनवर मी नसेन.... पण संस्थेतील मंडळी सर्वकाही व्यवस्थित सांगतील.

या वर्षीच्या साहित्य चपराक या दिवाळी अंकात प्रज्ञा शिदोरे (नाव चुकले असल्यास क्षमस्व) यांचा याच विषयावर लेख आला आहे. तुमची आठवण झाली. सर्व मित्र मंडळीत लेख फिरवला आहे.

हर्पेन, उपक्रमासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा !

अगदी याच नावाचा उपक्रम ज्ञानप्रबोधिनी, पुणे मधल्या 'प्रचिती' ग्रुपने चालु केला होता. ही १०० दिवसांची शाळा 'पडसरे' नावाच्या आदिवासी वस्तीत ( महागावजवळ, अष्टविनायक -पाली रोडवर) दरवर्षी भरायची. मी २ वर्षं प्रत्येकी एक आठवडा गेले होते. पालीच्या दादासाहेब लिमयेंनी यासाठी त्यांचं मोठंसं घर दिलं होतं. हे डे बोर्डिंग स्कुल होतं. सकाळी ७ वाजता नाश्त्यापासुन ते रात्री जेवण आणि प्रार्थना होइपर्यंत मुलं इथे असायची. ज्यांना शक्य होतं ती मुलं इथेच झोपायची, बाकी त्यांच्या आदिवासी पाड्यावर परत जायची. दिवसभर त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त वैयक्तिक स्वच्छता, सामान्यज्ञान, करमणुक, खेळ वगैरे शिकवलं जायचं. फार सुंदर अनुभव होता.

२०१२ मधे शक्य नाही, पण मार्चपर्यंत शाळा असल्याने मला २०१३ मधे फेब्-मार्चमधे जायला जमेल & आवडेल. तो पर्यंत पुस्तकं, वह्या, औषधं, किंवा इतर काही छोटी मोठी मदत हवी असेल तर मी वैयक्तिक आणि शिवाय ऑफिसमधल्या CSR कडुनही मिळवु शकते.

हर्पेन....

"मैत्री" संकल्पना आणि कार्य यांच्या संदर्भात यापूर्वीही वाचले होते, मित्रांमध्ये चर्चेचा विषयही होता. आपण आणि आपले स्नेही करीत असलेल्या या कार्याची महती अवर्णनीय अशीच आहे. प्रकृतीच्या काही कारणास्तव मी 'मेळघाट' कुपोषण्/शाळा प्रकल्प कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास [निदान यंदातरी] तब्येतीकडून तितकासा सक्षम नसल्याने तुमच्या कार्यास अल्पशी आर्थिक मदत करू शकतो.....[आर्थिक मदतीबद्दल तुम्ही वर धाग्यात उल्लेख केला आहे म्हणून लिहिले आहे, गैरसमज नसावा]

~ "मैत्री" साठी रक्कम कुठे आणि कशी जमा करता येईल याचे मार्गदर्शन तुम्ही इथेच दिले तर तशी मदत करू इच्छिणार्‍यांना ते सोयीचे पडेल.

[काहीसे अवांतर : श्री.निवांत पाटील या सदस्याने 'दहा दिवस देऊ शकतो....' असे वर जाहीर केले आहे. निवांतराव या कोल्हापूरच्या तरुणाला मी व्यक्तीशः ओळखतो. इंग्रजीत ज्याला 'हायली क्वालिफाईड' म्हटले जाते अशा गटातील ही व्यक्ती असून एका नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 'प्रोफेसर' पदावर कार्यरत आहे. अमेरिकेतही त्यानी शिक्षणदानाचे कार्य केले असून विज्ञान विषयातील पीएच.डी. ही त्यानी मिळविली आहे. इतके सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा मेळघाट परिसर 'शिक्षण जागृती' कार्यक्रमासाठी खूप उपयोग होईल.....'मैत्री टीम'ने निवांतरावाचे ते देत असलेले १० दिवस जरूर घ्यावेत. ]

अशोक पाटील

मुग्धानंद - हो प्रज्ञा शिदोरे, (नाव बरोबर आहे) देखिल मैत्रीच्या कार्यकर्त्यांपैकीच आहे. आणि सर्व मित्र मंडळीत लेख फिरवल्याबद्दल धन्यवाद.

मनीमाऊ - हो, ही संकल्पना तशी जूनीच आहे, याआधी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी देखिल अशा प्रकारच्या शाळा भरवल्या गेल्या होत्या (मला वाटते, ज्ञानप्रबोधिनीकडूनच बहुदा) त्यांना साखरशाळा असेही म्हटले जाई.
आपले व आपण देऊ करत असलेल्या मदतीचे स्वागतच आहे, धन्यवाद. आपल्याशी कसा संपर्क साधावा ते कळवावे.

अशोक. - "मैत्री" साठी रक्कम कुठे आणि कशी जमा करता येईल यासंदर्भातील पोस्ट लवकरच (संध्याकाळी) इथेच टाकतो. आर्थिक मदतसुद्धा तितकीच महत्वाची. श्री. निवांत पाटील यांच्याशी कसा संपर्क साधता येईल ते कळले तर बरे...इथे नविन पोस्ट पडल्या की आपोआप कळायची सोय नाहीये हे कळून चुकले आहे. Happy वि पू मधे टाकावे काय?

अशोककाका, मैत्री साठी देश्-विदेशातून पैसे कुठे व कसे जमा करता येऊ शकतात ते खालील दुव्यावर गेलो असता कळू शकेल.

http://www.maitripune.net/PlusYou_contribute.html

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी की 'मैत्री'स केलेली आर्थिक मदत / देणगी ही आयकरात सूट मिळण्यासाठी पात्र ठरू शकते.

हर्पेन....

~ "नोंद घ्यावी की 'मैत्री'स केलेली आर्थिक मदत / देणगी ही आयकरात सूट मिळण्यासाठी पात्र ठरू शकते....."

एक पूरक माहिती म्हणून वरील प्रकटन ठीक आहे, पण 'मैत्री' चे काम आणि त्यामागील भावना जाणून घेतल्यानंतर देणगी देणार्‍या तसेच इच्छिणार्‍यांना "आयकर सूट" मिळाली वा ना मिळाली....यात काही फरक पडत नाही.

[व्यक्तिगत पातळीवर लिहायचे झाल्यास मी स्वतः कधीही अशा पावत्या इन्कमटॅक्स रीलिफ कॅलक्युलेशनसाठी सादर केलेल्या नाहीत.]

अशोक पाटील

मामा काय राव तुम्ही Happy

हर्पेन, संपर्क झाला आहे. त्यांना १ तारखेला मी माझ्या तारखा कळवतो म्हणुन सांगितले आहे. गेले २-३ दिवस अतिशय व्यस्त असल्यामुळे इथे लिहता आले नाही.

अरेच्या निवांता....

~ इथे मी तुझी हलगी वाजवतोय....साता समुद्रापल्याडच्या तुझ्या कामगिरीबद्दल आणि उलट तूच मला डोळे मोठे करून दाखवतोयस की !!!!

जगात काय कुणाचे चांगले सांगू नये, असे विल्होबा शेक्सपीअर, लंडनवाले सांगून गेले आहेत ते खरेच म्हणायचे.

वेल....मात्र "मेळघाट' हजेरी जमीवच तू. वैयक्तिकरित्या मला खूप आनंद होईल.

हर्पेन, ७ डिसेंबर तारीख फायनल. आज फोन करतो कसं जायचं डिटेल्स साठी. पण १६ तारखेपर्यंत तेथे थांबता येइल का याबद्दल शंका आहे. लेट्स सी.

यू आर अ नाईस फेलो....निवांता.

जरूर जा. हर्षद आणि त्यांची टीम सर्वार्थाने डीव्होटेड आहे त्यांच्या कार्याप्रती. यू वोण्ट फील एलिअन ओव्हर देअर....दॅट्स शुअर.

"मैत्री" संदर्भातील बुकलेट्स वाचायला मिळाली का ? नसतील तर हर्पेनकडून मेलद्वारे नक्की मागव....खूप प्रभावी माहिती आहे त्यांच्या कार्याबद्दल.

अशोक पाटील

हर्पेन, १-२ वर्षानी या शाळेत शिकवायला नक्की जाईन.
सध्या आमची बाळी खूपच लहान आहे-फक्त पाच महिन्यांची. म्हणून इच्छा असूनही जाऊ शकणार नाही.

बाकी जमण्यासारखे जे आहे ते तिथल्या जयू यांना फोन करून कळवून केलेले आहे आणि श्री.पेंडसे आणि श्री श्री श्री मायबोली यांचाही रेफरंस आवर्जून दिला आहे. Happy

आपल्या मायबोलीच्या फेसबूकावरच्या पानावर हे निवेदन प्रकाशित केले गेले होते त्याठिकाणी त्याला २००हून अधिक लोकांनी आपापल्या पानावर शेअर केल्याची नोंद दिसते आहे.

माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधणार्‍या, तसेच इथे आपल्या संकेतस्थळावर असलेल्या मायबोलीकरांचे व तिथे फेसबुक वर असलेल्या सर्व (ज्ञात-अज्ञात) हितचिंतकांचे आभार.

मायबोलीच्या नावाने चांगभले! Happy

७ डिसेंबर पासून मेळघाटात सुरु असलेल्या '१०० दिवसांच्या शाळेचे आज २२ जानेवारी म्हणजे ४५ दिवस झाले, जवळजवळ अर्धा टप्पा.

१ फेब्रुवारीच्या आठवड्यासाठी अजून कोणीच स्वयंसेवक मिळालेले नाहीयेत. ८ फेब्रुवारीच्या आठवड्यामध्ये पण २ जण नक्की आहेत पण आणखी ३/४ जण हवे आहेत. त्यामुळे माबोकरांनो आपणा पैकी कोणाला जाणे शक्य असेल तर जरूर विचार करावा.

संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ (वैशाली, मधू, लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१