मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात. पहिल्याने केलेल्या खुर्च्या पाहून खुष होतात आणि सगळ्या खुर्च्या लगोलग विकत घेऊन टाकतात. नंतर बेटाच्या दुसर्या बाजुला जातात आणि तिथे असलेलं शिल्प पाहून निश:ब्द होतात. पुढे अनेक जण ते शिल्प पहायला येऊ लागतात आणि त्या बेटाला शिल्पकाराचं म्हणजे दुसर्या मित्राचं नाव दिलं जातं. गोष्टीचं तात्पर्य काय तर अगदी गरज असेल तेव्हाच आणि तेव्हड्याच खुर्च्या बनवाव्या पण त्यात अडकून न पडता निरंतर टिकणारं शिल्प बनवायचा ध्यास घ्यावा. ही गोष्ट अगदी लक्षात राहिली आणि ती सांगणार्या प्रमुख पाहुण्या विजया मेहताही! त्या आधी विजया मेहतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता. पुढे 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्या काही अभिनेत्री, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ह्यांनी विजया बाईंचं नाव आदराने घेऊन, त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं. थोड्याच दिवसात विजया बाईंच आत्मचरित्र 'झिम्मा' प्रकाशित होणार अशी बातमी आली आणि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या ते घेऊन वाचायचं हे ठरवून टाकलं.
'झिम्मा - आठवणींचा गोफ' अश्या शीर्षकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना बाई आधी वाचकांना शुभेच्छा देतात!!! तर शेवटी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच, प्रेक्षक आणि त्या स्वतः अश्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरे आणि संस्थांची संचालकपदे अश्या बर्याच गोष्टी. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मोठच काम. पण नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या बाजात सांगितलेल्या घटना उत्सुकता कायम ठेवतात. हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता चार टप्प्यांमध्ये लिहिलं आहे. ह्यातलं 'विजया मेहता' हे त्यांचं आजचं रुप. आणि म्हणून बाकीच्या तिघींबद्दल तृतीय पुरुषी एकवचनात लिहिलं आहे. स्वतःच्या गतरुपांकडे असं त्रयस्थ नजरेने पहाणं मला फार आवडलं.
विजया बाईंच्या बालपणीच्या म्हणजे बेबीच्या गोष्टी सुरस आहेत. जयवंत परिवाराच्या मोठ्या कुटुंबकबिल्याची आणि बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्तींची वर्णनं येतात. भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं आपल्या डोळ्यासमोर त्या जागा उभ्या करतात. पुढे पुढे नाटकांच्या नेपथ्यांबद्दलचीही अशी वर्णनं वाचून न कळत आपण तो रंगमंच डोळ्यासमोर बघायला लागतो आणि बाईंनी वर्णन केलेले प्रवेश रंगमंचावर कसे घडत असतील ह्याची कल्पना करायला लागतो.
विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ. बाई म्हणतात संपूर्ण भारतात ह्या काळात सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या, जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या, नवनवे कलाकार उदयाला येत होते आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट होती. ह्या सगळ्याचच छोटखानी रूप म्हणजे भुलाबाई इंस्टिट्युट. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या आणि त्यांना घडवण्यात ह्या इमारतीचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे चित्रपट माध्यमात काम करायला लागल्यावर 'वास्तू बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात.' असं बाईंचं ठाम मत पडलं त्याची सुरुवातही कदाचित भुलाबाई इंस्टिट्युट पासुन झाली असावी.
विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास पुढील भागात उलगडतो. सुरुवातीच्या काळात पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका 'रंगायन'ने केल्या. बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची तसेच प्रशासकाची जडणघडण ह्या भागांमध्ये पहायला मिळते. दिग्दर्शनाची विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाबतचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेले काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत. वयाने आणि अनुभवाने तुलनेने तरूण दिग्दर्शिकेने पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसाख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेले पाहून बाईंच्या ठाम विचारांचे आणि धैर्याचे कौतूक वाटते.
भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटके भारतात तसेच जर्मनीत केली. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मित्र जोडले. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावे आपले माहेरच वाटू लागली. ह्या सगळ्या प्रकल्पांदरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत. शांकुतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नवर्याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी नाट्यप्रशिक्षण घेतले. तिथले अनुभव, तिथे पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत.
रंगायन बंद पडल्यानंतर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं परंतु ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता 'लोकमान्य' रंगभुमी म्हणायचं ठरवलं. ह्या लोकमान्य रंगभूमीवर बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक अजोड नाटकं दिली. इतके वेगवेगळे विषय! ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल. प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींदरम्यान लागलेल्या ठेचांबद्दल बाईंनी अगदी विस्ताराने लिहिलेलं आहे. पुस्तकामधला लोकमान्य रंगभूमीबद्दलचा हा भाग मला सर्वात जास्त आवडला. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो.
पुढे दूरर्शनकरता काही कार्यक्रमांवर तसचं काही चित्रपटांवर बाईंनी काम केलं. त्यांच्याच काही नाटकांचं रुपांतर चित्रपटांमध्ये केलं. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये कसे बदल केले, कुठला भाग माध्यम बदलामुळे जास्त खुलला, कुठला भाग नीट झाला नाही ह्यांबद्दलची माहिती पण छान आहे. ह्या माध्यमांमध्ये तुलना जरूर केली आहे पण आमचं जुनं तेच सोनं असा सुर कुठेही जाणवला नाही.
पुस्तकातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? असा प्रश्न पडतो. एव्हड्या मोठ्या कारकिर्दीत बाईंना अनेक जण भेटले. भेटलेल्या मंडळीबरोबर आलेले चांगले अनुभव लिहिलेले आहेतच पण खटकलेल्या गोष्टी उदा. तेंडूलकरांबरोबर तुटलेली युती, भक्ती बर्वेंचा खटकलेला अभिनय, नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद, वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग इ. कुठलीही सनसनाटी निर्माण न करता पुस्तकात नमुद केलेल्या आहेत. स्वतःच्या चुकाही कबूल करण्यात बाईंना काहीही कमीपणा वाटलेला नाही, एव्हडच काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे. मी आधी वाचलेल्या चरित्र/आत्मचरित्रांच्या तुलनेत वैयक्तिक आयुष्याबद्दल जरा कमी लिहिलय का काय असं वाटलं पण कला/व्यवसाय ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं असताना, वैयक्तिक आयुष्याबद्दल कोण कशाला सांगेल असंही वाटलं.
पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का?
सध्या काही कलाकार मंडळी जुनी नाटकं नव्या संचात परत रंगभुमीवर आणण्याचे उपक्रम करत आहेत. बाईंची तसेच इतरही गाजलेली नाटकं मिळतील तितकी पाहून घ्यायची असं हे पुस्तक वाचल्यावर ठरवलं आहे. त्यावेळच्या प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळायची ती अनुभूती नाहीसुद्धा मिळणार कदाचीत, पण मिळतं आहे तितकं तरी बघुन घ्यायचं ठरवलय!
------------------------------------------------------------------------------------------------------------------
'झिम्मा' नुकतच वाचून संपवलं. बाईंच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की त्याबद्दलच्या पुस्तकाचं परिक्षण/ परिचय/रसग्रहण माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पुस्तक वाचून संपल्यावर जे मनात आलं ते लिहिलय. मायबोलीवरचे अनेक जण सध्या 'झिम्मा' वाचत आहे. त्यांनाही पुस्तक वाचल्यावर काय वाटलं हे वाचायला नक्की आवडेल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक मायबोली खरेदीवर उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Zimma.html
स्वाती, सुरेख लिहिलंयस
स्वाती, सुरेख लिहिलंयस
रसग्रहणात्मक पोस्ट आहे तुझी !!
सगळ्यांनीच खूप छान लिहील आहे.
सगळ्यांनीच खूप छान लिहील आहे. पुस्तक वाचणारच
हो स्वाती. लमाणबद्दल पटलं.
हो स्वाती. लमाणबद्दल पटलं. आता लागूंचं 'रुपवेध' येतं आहे ते वाचायची उत्सुकता आहे खूप.
तुझी 'झिम्मा' बद्दलची पोस्ट सुरेख आहे.
मुळात हे पुस्तक वाचत असताना
मुळात हे पुस्तक वाचत असताना बाईंच्या कामाविषयी असणारी प्रचंड उत्स्कुकता होती..... रंगभुमी शी असलेले त्यांचे नाते, त्यांनी केलेले कार्य ह्याविषयी जाणुन घ्यायचे होते, ते साध्य झाले.......
आपण एका विद्यापिठाला मुकलो आहोत अशी एक भावना सतत डोक्यात असायची, पण ह्या पुस्तकाने ते विद्यापिठ अनुभवायला मिळाले.....
पुस्तकाच्या भाषेमुळे तर असे वाटले की मी ते पुस्तक वाचत नाहि आहे तर स्वतः बाईंसमोर बसुन त्या सगळ्या गोष्टि अनुभवतो आहे
खुप मस्त परिक्षण... कालच विकत
खुप मस्त परिक्षण... कालच विकत घेतले. आता वाचते....
विजया बाईं बद्दल जे वलय आहे ते खुपच मोठे आहे... बाईंचं व्यक्तिमत्व पण एकदम भारदस्त.... एन.सी.पी.ए. मधे मी सर्व्हीस टॅक्स ची कंसल्टंट होते, त्या वेळेस पहिल्यांदा जेंव्हा गेले तेंव्हाच बाईंना भेटायची उत्सुकता मनात घेवुन. त्यांची पहिली भेट मी विसरुच शकत नाही. त्यांचा प्रेमळ चेहेरा, माझ्या आडनावावरुन त्यांनी आधी इंग्लीश मधेच बोलणं काढलं.. पण मी मराठी आहे म्हंटल्यावर आश्चर्य चकीत झालेला चेहेरा, त्यांनी आस्थेने केलेली माझी चौकशी... छे.. विसरताच येत नाही... खुपच भारावले होते मी त्यांना भेटुन!!! मग नंतर त्या दिसायच्या. माझं त्यांच्या शी काहीच काम नसायचं ( त्या क्रीयेटिव्ह डायरेक्टर आहेत. हे एक मानद पद आहे). माझा सगळा विषय रुक्ष आणि तिथल्या वातावरणाशी एकदम फटकुन असणारा. पण कामासाठी एकदोनदा भेट झाली तरी खुप आस्थेने चौकशी करायच्या... एक वेगळाच आब त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे... खुपच ग्रेसफुल बाई...
एन.सी.पी.ए बद्दल त्यांनी फारसं लिहिलं नसावं ह्याचं कारण कदाचित तिथलं घाणेरडं राजकारण असावं.... त्यांच्या क्रीयेटिव्हीटि वरच्या बंधनांची कल्पना नाही आणि ते माहित असण्या येवढ्या परिस्थीतीत मी नाही... पण अनेक चांगल्या उद्योगांना जो राजकारण व इगो चा फटका बसतो ते कारण असु शकत... आर्थात हा माझा अंदाज...
वाचते आहे. खुप दिवसांनी
वाचते आहे. खुप दिवसांनी काहीतरी चांगलं, वाचत रहावं असं हाती लागलयं!
तसं वाचायला लेटच झालाय.. पण
तसं वाचायला लेटच झालाय.. पण अखेर आणलं लायब्ररीतून मंगळवारी.
गेले दोन तीन महिने बाईंना प्रत्यक्ष अनुभवत होते. त्यामुळे झिम्मा वाचताना जामच मजा आली.
बाईंचा आवाज, बोलण्याची लकब, बोलण्याचा रिदम हे सगळं ते वाचताना कानात ऐकू येत होतं.
म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगत असतात आणि मग गोष्टी अॅड करतात त्या पुस्तकात तेव्हा तिथे लिहिलं नसलं तरी 'आणि बाबी...' अशी एक नवीन सुरूवात मला आपोआप ऐकू येत होती.
आपण काय जिनियस व्यक्तीला अनुभवले हे परत परत जाणवून काटा येत होता अंगावर. आणि आपण थोड्या उशीरा जन्माला आलो याचा विषादही..
काही बाबतीतली बाईंची मते, प्रतिक्रिया वाचून मला पण हेच्च वाटलं होतं की याबद्दल असं वाटलं. आणि मी अत्यंत उगाच माझीच कॉलर ताठ करून घेतली.
नाटक उभं रहाण्याच्या प्रक्रियांच्या संदर्भाने जे तपशील त्यांनी दिलेत त्यातून बरंच काही मिळालं मला. बाईंबद्दल आणि नाटकाबद्दलही.
भूमिकेची बॉडी इमेज हे प्रकरण अतिशयच पटले.
अभिनयाचे जे अॅण्टी प्रकरण त्यांनी वेळोवेळी विषद केलेय. ते मी ज्या थोड्याश्याच तालमींना हजर होते त्यातल्या एका तालमीत त्यांनी खूप सुंदर एक्स्प्लेन केले होते. करूनही दाखवले होते.
आता भेटतील तेव्हा विचारायचे म्हणून प्रश्नही जमा झालेत.
आपण ज्यांना वयोवृद्ध, लिजंड वगैरे बनल्यावरच बघतो (म्हणजे प्रत्यक्ष अनुभव..) त्या लोकांचे घडणे वाचणे हे फार भन्नाट असते.
त्यांच्या सहकार्यांबद्दलही.. मेन म्हणजे भास्करजी. त्यांच्या दिग्दर्शनाखाली केलेले एक नांदिकारचे नाटक, संदीपचे आधीचे एक प्रोजेक्ट आणि मग श्वास या तिन्ही कारणाने भास्करजींशी खूप छान मैत्र निर्माण झाले होते. त्या एका व्यक्तिमत्वाच्या मी गेले कैक वर्ष प्रेमात आहे. दर भेटीनंतर नव्याने. ते भास्करजी त्यांच्या कामाच्या पद्धतीतून परत एकदा समजले. आणि परत प्रकर्षाने त्यांची उणीव जाणवली.
दिग्दर्शक हे काय कडबोळं असायला हवं याची अजून एक जंत्री बनली डोक्यात.
बाईंच्या चंद्राला हात लावायलाच उडी मारायची या तत्वाने मला परत एकदा पक्का टेकू दिला.
लायब्ररीतून आणून वाचलं असलं तरी आता कॉपी घेऊन मग त्यावर बाईंची सही घेऊन कलेक्शनमधे ठेवणारे.
एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची
एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? <<<
खूप निगेटिव्ह गोष्टीही घडलेल्या आहेत. ज्या बर्यापैकी क्लेशदायकही आहेत. आणि त्या सांगून काय उपयोग होणार होता?
सुतोवाच तर केलंय त्यांनी की आर्थिक गणित सांभाळताना बरीच नाराजी ओढवून घेतली.
मी वाचल आहे हे पुस्तक .
मी वाचल आहे हे पुस्तक . आवडल
कुठेही आक्रसाताळेपणा / दोषारोप / मी मी करण नाही .
बाईंच्या कारकिर्दीसारखच संयत अनुभव देणारं पुस्तक !
खूप रंगलाय बाईंचा झिम्मा!
खूप रंगलाय बाईंचा झिम्मा!
बाईंचं एकही नाटक पाहिलेलं नसताना देखील पुस्तकातलं एकही पान - पानंच का? वाक्यदेखील - कंटाळवाणं झालं नाही. ज्याचा वाचकाला प्रत्यक्ष अनुभव नाही त्याबद्दल वाचकाला इतकं सखोल वाचायला लावणं - आणि ते पण त्याला कंटाळा येऊ न देता - हे येर्यागबाळ्याचे काम नक्कीच नाही. त्या करता लेखक सिद्धहस्त असावा लागतो किंवा तो ज्या क्षेत्राबद्दल लिहितोय त्यातला दर्दी जाणकार तरी. या पुस्तकावरून तरी बाई ग्रेट लेखिका वगैरे वाटल्या नाहीत पण त्यांना मिळालेली बाई ही उपाधी सार्थ ठरवणारे त्यांचे कर्तृत्व इतके अफाट आहे की पुस्तक वाचताना awe या इंग्रजी शब्दाचा अर्थ पक्का समजतो.
'महाभारत' बद्दल अधीक विस्ताराने यायला हवे होते असे वाटले. कारण त्यातली पात्रे, त्यातला आशय बहुतेक भारतीयांना ठाऊक असतो. ती पात्रे बाईंनी कशी सादर केली हे जर आले असते तर बाईंची शैली अधीक चांगली समजून घेता आली असती. तीच गोष्ट दूरदर्शन आणि सिनेमांची. बाईंची कला मी या दोन माध्यमांतूनच अनुभवली आहे. त्यामुळे त्यामागचे त्यांचे विचार / भूमीका जाणून घेण्याची आस होती. पण बाईंचे पहिले प्रेम नाटक असल्याने दूरदर्शन आणि सिनेमाला अगदी साईड रोल दिलाय बाईंनी.
पण पुस्तकाने खूप समृद्ध केले - कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकवले. हे नक्की.
Pages