आशीर्वाद

Submitted by विजय देशमुख on 15 January, 2013 - 05:57

घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
खरं तर कॅप्टन मला नेहमी एकेरी हाक मारतात. पण कधी त्यांचा गप्पा मारायचा मूड झाला की ते एकदम मला “विजयराव” किंवा “देशमुखसाहेब” वगैरे संबोधायचे. त्यात गप्पा करणे म्हणजे कुठल्यातरी विषयावर चर्चा करणे, हे आता मला अनुभवावरून कळले होते. कॅप्टन शिर्के सैन्यातून स्वेच्छेने निवृत्त झाले आणि मराठी मुलांना सैन्यात दाखल होण्यास मदत करण्यासाठी ‘सैनिक’ नावाची संस्था चालवत होते. त्यामाध्यमातुन अनेक मराठी मुलं सैन्यात दाखल झाली होती .
त्यांनी मला बसायची खूण केली अन नोकराला चहा आणायला सांगितला. अर्थात त्यासोबत तो पोहे, समोसे, कचोरी, गुलाबजामुन वगैरे आणणार आणि चहाच्या नावावर माझ डिनरच होणार हे मला अनुभवातून कळलं होतं. तसंही आज फारसं काम नव्हतं त्यामुळे रिलॅक्स बसायचं अन गप्पा मारायच्या हे ठरवून टाकलं.
“काय विजयराव, काय म्हणते तुमची कंपनी?”
“मजेत. मस्त चाललंय.”
“मग आता पुढचा काय विचार आहे?” कॅप्टन सहज बोलत आहेत, मला जरा आश्चर्य वाटले. कारण ते फारसं इकडच-तिकडंच बोलत नसत .
“हां, आता Expansion करण्याचा विचार आहे”, मी माझं पुढचं स्वप्न सांगितलं. कॅप्टन मला त्यासाठी टिप्स देतील ह्याची मला पूर्ण खात्री होती.
“व्वा विजयराव! खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे”, कॅप्टन, समोरचं संत्रं उचलून घेत म्हणाले. आता मात्र मला भिती वाटू लागली होती. कॅप्टन माझं कौतुक करत आहे, याचा अर्थ आजचं टार्गेट मीच तर नाही ना?
“थॅंक्यू कॅप्टन, तुमचे आशीर्वाद आहेत”, मी एकदम मनातलं बोलून गेलो.

खरंच गेल्या ४-५ वर्षात कॅप्टनचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. “विजयराव, तुम्ही आधी इंजिनीअरिंग केलंत आणि मग एमबीए बरोबर नं?”
“हो” मला अजूनही कॅप्टन शिर्केंच्या विषयाचा अंदाज येत नव्हता. कदाचित ते शिक्षणावर बोलतील असं वाटत होतं.
“आणि त्यासाठी अनेकांचे तुम्हाला आशीर्वाद मिळाले आहेत”.
“हो, निश्चितच”.
“घ्या, गुलाबजाम घ्या”, शिर्केंनी बाऊल पुढे केला. मी काट्याने एक गुलाबजाम घेतला आणि तोंडात टाकला.
“विजय, तुला माहिती आहे का, की मोठमोठी संस्थानं, राज्य, किंवा राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, वर्षानुवर्षे नुसतीच टिकतात पण लोकप्रियतेच्या शिखरावर टिकून राहत नाहीत, किंवा अल्पजीवी ठरतात, त्याचं काय कारण आहे?”
गुलाबजाम माझ्या घशातच अडकला. माझ्या शिक्षणाचा अन पक्ष, राजे-संस्थानं वगैरे न टिकण्याचा काय संबंध?
“किंवा असं म्हण की जितका एखादा पक्ष किंवा कंपनी एखादा व्यक्ती खूप लोकप्रिय करतो, त्याला अधिक उंचीवर नेणे किंवा किमान लोकप्रियता टिकवणे त्याच्या मुलाला किंवा मुलीला किंवा इतर कोणत्या वारसदाराला जमत नाही, याचं कारण काय असेल?” मी आता चाटच पडलो होतो. हे माझ्या कधी डोक्यातच आलं नाही. किंबहुना असा मी कधी विचारच केला नव्हता. पण तरीही माझं शिक्षण आणि याचा काय संबंध? शिर्के उगाच काहीतरी हवापाण्याच्या गोष्टी करणारे नव्हते.

“विजय, तुला काही कल्पना नाही?”
“नाही, म्हणजे मला ह्याचा आणि माझ्या शिक्षणाचा संबंध काय, हे कळले नाही”.
“जवळचा आहे”, कॅप्टन मोघम म्हणाले.
“कसा?” मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
“रिलॅक्स! हळूहळू येईल लक्षात. पण त्याआधी वारसदाराचा मुद्दा”.
“हा, म्हणजे इतिहासातील उदाहरणं बघितली तर १-२ सोडले, तर सगळेच वारसदार कमावलेली संपत्ती/ सत्ता बुडवणारेच निघाले”.
“नाही नाही, तुम्ही चुकताहेत देशमुख साहेब”.
“म्हणजे?” मी जरा गोंधळलो.
“म्हणजे वारसदार चांगले आणि तितकेच कर्तृत्ववान होऊ शकले असते, किंबहुना होते”.
“मग अडचण कोणती होती?”
“हम्म.... काहींच्या बाबतीत अतिलाड तर काहींच्या बाबतीत स्वतः कर्तृत्ववान व्यक्ती”.
“ह्या! असं कसं होईल?” मी एकदम त्यांचं म्हणणं उडवून लावलं.
“विजयराव, इथेच तर गडबड होते. म्हणून तर मी मघाशी तुमच्या शिक्षणाविषयी विचारलं” .
“म्हणजे मी हे शिकलोय पण .....”.
“एक्झॅक्टली ! पण आता आठवत नसेल ना?”
“अं हो... म्हणजे नाही आठवत आहे...” मी सरळ शस्त्र खाली टाकले. काही चालीतच सरळ चेकमेट व्हावं तसं मला वाटत होतं.
“हरकत नाही”, शिर्केंनी माझा चेहरा वाचला असावा.
“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की वडील कर्तृत्ववान असल्यामुळे मुलाला किंवा मुलीला वावच मिळाला नाही.”
“सॉर्ट ऑफ. म्हणजे बरेचदा हे नकळतही होत असावं. म्हणजे असं बघा, की एकतर कर्तृत्ववान व्यक्ती कर्तबगारी गाजवण्याच्या नादात म्हणा किंवा मिळालेलं वैभव टिकवण्यात इतके गर्क होतात, की आपला वारसदार कोण असेल आणि त्याला कसं ट्रेनिंग द्यावं याचा एकतर विचारच करत नसावे किंवा केला तरी तसा विशेष वेळ देत नसावे”.
“होऊ शकतं”, मी उगाच सावधगिरीने म्हणालो. खरंतर मला अद्यापही नेमकं शिर्केंना काय म्हणायचंय तेच कळत नव्हतं. ते बरेचदा ‘गनिमी कावा’ वापरायचे. म्हणजे एकदा का एखादा मुद्दा समोराच्याकडून स्पष्ट करून घेतला की ते पुढे तोच धागा वापरून समोरच्याला चर्चेत हरवायचे. त्यामुळे मी मोघम उत्तरं देत होत. हा ही एक गनिमी कावाच, त्यांच्याकडूनच शिकलेला. पण ते बहुदा त्यांच्या लक्षात आलं नसावं, ते पुढे बोलतच होते.

“मला तरी वाटतं, की कधी कधी ही मोठी माणसं स्वतःचं कर्तृत्व झाकले जाईल की काय, या भीतीने, अगदी पोटच्या मुलाला किंवा मुलीला पुढेच येऊ देत नाही.”
“असं कसं होईल?”
“म्हणजे आता बघ, बरीच राजकारणी मंडळी ‘नवीन रक्ताला वाव मिळाला पाहिजे’ असं म्हणतात, पण म्हणून कोणीच सक्रिय राजकारणातून निवृत्त होत नाही”. माझ्या डोळ्यांसमोरून अनेक उदाहरणं सरकून गेली. कॅप्टनचं मत अगदी बरोबर होतं.
“त्यामुळे काय होतं की त्यांच्या मुला-मुलींना कर्तृत्व गाजवायला संधीच मिळत नाही, आणि जेव्हा मिळते, तेव्हा बरेचदा ते काहीतरी असं करतात ज्याने त्यांना आपण बापापेक्षा मोठे आहोत हे दाखवता येईल. अन इतके वर्ष मनात दाबून ठेवलेला राग/ चीड त्या निर्णयातून निघते. मग बाप तर बापच असतो, तो स्वतःचा हेका सोडत नाही. तोही त्याच्याच मुला/मुलीला दाबून कसं टाकता येईल याचाच विचार करतात, अन मग अशीही वेळ येते, की स्वतःच्याच बापाविरुद्ध मुलगा/ मुलगी उभी राहते. जुन्या काळात, लढाया झाल्या, राजकारणात पक्ष बदलतात”.
“हा खरंय!”, माझ्या डोळ्यांसमोरून अगदी ‘सलिम-अकबर’ पासून आजच्या अनेक जोड्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.
“मला मात्र एक गंमत वाटते.”
“कसली?”
“त्यामानाने भारताच्या जवळ असणाऱ्या बहमनी , तुर्की, मुघल सत्तेने भारतावर आक्रमण केले, बऱ्याच काळ राज्यही केले, पण जे ब्रिटिश करू शकले, ते इतर फारसे कोणी करू शकले नाही, अगदी मूळ भारतीय राजेसुद्धा, १-२ अपवाद वगळता”.
“खरंय, ब्रिटिशांनी एक प्रकारची सिस्टम वापरली”.
“exactly!”, कॅप्टन एकदम खूश झाले. “सिस्टम, ज्याच्या नावाने आपण रोज खडे फोडत असतो, मात्र जीच्यामुळे ब्रिटिश भारतात टिकू शकले. खरंच आश्चर्य आहे ना?”
“म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की सिस्टम खूप महत्त्वाची आहे.” मी त्यांचा आजचा मुद्दा पकडला याचा मला आनंद वाटत होता.
“अगदी”, कॅप्टनना मला मुद्दा लक्षात आलाय हे बघून आनंद झाला होता , तर मी आजचं ‘टार्गेट’ नाही याचा मला.
“पण मग, माझं शिक्षण यात कुठे आलंय?” मी पुन्हा त्यांना आठवण करून दिली.
“त्याकडे येतो मी, but you need to wait for sometime”, माझ्या पोटात गोळा आला. आज सगळं खाल्लेलं पचणार नाही तर.
“तर सिस्टम, आज अधिक जास्त महत्त्वाची झाली आहे, आणि आपण त्याच्या अगदी उलट वागतो”.
“ते कसं काय? मी तर सिस्टम नेहमी फॉलो करतो”, मला मराठी शब्द सुचेना.
“मला नाही वाटत” शिर्के आता जोशात आले होते.
“असं कशावरून वाटते तुम्हाला?”, मी बाइक बाहेर बरोबर रस्त्याच्या बाजूलाच ठेवली आहे न, हे आठवलं. अगदी कोणीच रस्ता ओलांडणारं नसेल तरी नियम पाळणारे आणि सिग्नल हिरवा झाल्याशिवाय गाडी पुढे न जाणारे, कॅप्टन शिर्के पार शिस्तीत मुरलेले होते, हे मला चांगलंच ठाऊक होतं.
“आता तुमची स्वत:ची कंपनी आहे”.
“हो आणि मी टॅक्सपण भरतो, वेळेवर”, मी उगाच घाई केली असं मला वाटलं पण माझ्या ओठातून शब्द निघून गेले.
“त्याबद्दल मला खात्री आहे”, उगाच त्यांनी मिशीवरून दोन बोटं फिरवली.
“मग?” मी आता पुरता परेशान झालो होतो, कॅप्टनना नेमकं काय म्हणायचंय, हे अजूनही मला कळलं नव्हतं. किंवा ते कळूनही माझ्या ध्यानात येत नव्हतं.
“तुम्ही आता आय. एस. ओ. (ISO Certification for Quality & Standards ) साठी सुद्धा प्रयत्न करत आहात ना?”
“हो”, एखाद्या अपराध्याने बोलावं तसं मी म्हणालो. खरं तर मला नेमका मुद्दा काय ते न कळल्याचं ते दु:ख होतं.
“मग त्यासाठी तुम्हाला कंपनीत कोणत्या गोष्टी करायच्या हे चांगलंच माहिती असेल?”
“अर्थात! मी त्यावर बरीच पुस्तके आणि मटेरिअल वाचलीत आणि एमबीएला मी शिकलोय”.
अरे! हा इथे संबंध आला तर माझ्या शिक्षणाचा.. मीच आश्चर्यचकीत झालो.
“हूं, मग काय शिकलात त्यांतून ?”
“हा, म्हणजे कंपनीचं काम, त्याचं डॉक्युमेंटेशन, त्यासाठी कंपनीत उपलब्ध कराव्या लागणाऱ्या सुविधा, वगैरे..”.
“बस्स? इतकंच शिकलात ?”
“……………...” मला एकदम अपमानास्पद वाटलं की नेमकं शिर्केंना काय म्हणायचं आहे तेही मला कळू नये.
“तुम्हाला कंपनीत प्रत्येकाने कोणतं काम कसं करावं, याचे मॅन्युअल, आणि आतापर्यंत काय केलंय त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावे लागले असतील न?”
“हो, तोही डॉक्युमेंट्सचा भाग आहे”, मी उगाच चिडलो होतो.
“मग त्यांतून काय शिकले तुम्ही?”,
“म्हणजे ? तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? आयएसओ, राजकारणी, माझं शिक्षण, राजे-राजवाडे.... नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला?” मी सरळ विचारलं. त्यावर शिर्के मोठ्याने हसले. “अहो विजयराव, चिडू नका हो. मी तुम्हाला काय माहिती आहे ते बघत होतो. बरं जाऊ द्या. तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो. आम्हाला एकदा मछलीपट्टणमला नेलं होतं. तिथे मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं होतं. त्यावेळी त्या मॅनेजमेंट गुरुने बरंच काही सांगितलं होतं. त्याने नंतर आम्हाला एक प्रश्न विचारला, की उत्तम व्यवस्थापक कसा ओळखावा? तुला काय वाटते?”
“म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगता येतील, जसं...”
“नाही, एका वाक्यात उत्तर हवंय”
“हम्म, काय सांगितलं त्याने” मी अनुभवानुसार त्यांनाच उत्तर सांगायला म्हटलं.
“तो म्हणाला, असा व्यक्ती जो अशी सिस्टम (System) तयार करतो, की तो व्यक्तिशः उपस्थित असो वा नसो, कामे तशीच होतात जशी व्हायला हवीत. जसं आर्मीत दिलेलं काम चोखपणे पार पाडली जातात, मग ते काम बघणारा कोणी असो किंवा नसो.”
“व्वा! क्या बात है. पण कॅप्टन हे म्हणायला सोपं आहे, पण करायला फार कठीण आहे.”
“हो, पण अशक्य नाही”.
“हां पण काही गोष्टी असतात ज्या माझ्या कंपनीत मलाच कराव्या लागतात”.
“तुला दत्ताजी माहिती आहे? किंवा तानाजी?”
“आता ते कुठून आले मध्येच.... कॅप्टन तुम्ही म्हणजे ना.....”
“इतिहास आठवतो का, दत्ताजी शिंदे म्हण किंवा तानाजी मालुसरे.... ते पडल्यावर मराठी सैन्याने काय केले? पळापळ... बरोबर...”.
“हो पण ... “ दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकाचवेळी शिर्के का बरं बोलत आहे ते कळेना, पण त्यांनी मला थांबायची खूण केली, काट्याने टरबुजाचा एक तुकडा घेतला.
“म्हणजे समजा कोणी सरदार पडला तरी लढत राहण्याचं प्रशिक्षण किंवा तशी कार्यपद्धती विकसित केली गेली नव्हती, बरोबर?”
“हम्म... पण नंतर शेलारमामाने सगळे मावळे फिरवले अन लढाई जिंकलीच ना?” मी माझा मुद्दा रेटला.
“हो, पण पुढे ती कार्यपद्धती झाली नाही ना. म्हणजे युद्धाचा कंट्रोल केवळ एकाच व्यक्तीकडे होता, अन तो पडला, की सैन्य पळून जात होतं. धनी पडला असं म्हणायची त्यावेळी पद्धत होती.”
“हो पण अशावेळी लढाईचं सूत्र दुसऱ्या कोणाकडे देणार ना? आणि लढण्यासाठी आणि कुटुंबासाठी पैसा देणारा धनीच गेल्यावर ते तरी काय करणार?”
“बऱ्याचशा पक्षांच, कंपन्यांचं, असच होतं. धनी गेला की झालं. इतकंच काय, सचिन (तेंडुलकर) गेला की त्याच्या मागे पटापट बाद होणारे फलंदाज हे चित्र नवीन नाही”.
“हो पण म्हणून प्रत्येकजण सचिन किंवा तानाजी होऊ शकत नाही ना?” मला आता चर्चेत मजा येऊ लागली होती.
“हो. तुर्तास सचिनला बाजूला ठेवू, पण तुला आठवतं, महाराजांनी अफझलखानाला भेटायला जाण्यापूर्वी सगळ्यांना काय सांगितलं होतं?”, पुन्हा शिर्के इतिहासात शिरले होते.
“हो, मी जिवंत येईन वा न येईन, पण ज्याला जी कामगिरी दिलीय, ती चोख बजावायची. त्यात अजिबात हलगर्जी नको”.
हा प्रसंग अगदी आपल्यासमोर घडतोय असं वाटायला लागेल असं कॅप्टन शिर्केंनी मला कित्येकदा सांगितलं होतं. प्रत्येकवेळी अंगावर रोमांच उभे राहायचे. पण मला त्यांनी जास्त बोलू दिल नाही.
“हेच .... ज्याला जी कामगिरी दिलीय, ती चोख पार पाडायची...मी असो वा नसो...... उत्तम व्यवस्थापक... कळलं”. आता मला हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं की शिर्केंचा आजचा विषय ‘उत्तम व्यवस्थापक’ आहे. व्वा ! आज मला मेजवानीच आहे, मी मनात खूश झालो.
“तुला माहिती आहे का, पहिला बाजीराव पेशवा, याचं युद्धतंत्र शिकण्यासाठी इंग्रजांनी काय केलं होतं? “
“काय?”
“एका चित्रकाराला पाठवलं अन मराठी सैन्य प्रत्येक युद्धात कसं लढतं याचे चित्र काढायला लावले. त्यावरुन त्यांनी मराठ्यांची युद्ध कार्यपद्धती समजून घेतली. आणि हेच त्यांनी टिपू सुलतान आणि तत्कालिक चांगल्या चांगल्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत केलं अन शेवटी सगळ्यांना हरवून या देशावर १५० वर्ष राज्य केलं. चांगली कार्यपद्धती महत्त्वाची असते.”
“हो ना! म्हणून तर लोकं आजकाल सिस्टमला दोष देतात ना.”
“ते ही चुकीचंच आहे”. शिर्के एकदम सहज म्हणाले, मला वाटलं की त्यांनी माझं म्हणणं बरोबर ऐकलं नसावं मी पुन्हा एकदा माझं मत सांगितलं तर शिर्के म्हणाले,
“विजयराव, अहो आपण सिस्टम आधी समजून घेतली पाहिजे. सिस्टम बनवणाऱ्यांनीसुद्धा विचार करूनच बनवली असेल ना? उगाच एक दोन उदाहरणातून आपण काहीतरी विचार करतो आणि मग सिस्टमला दोष देतो. असो, तो आपला आजचा विषय नाही. मला एक सांगा चांगली सिस्टम बनवण्यासाठी तुम्ही काय करता?”
“काय कॅप्टन, मी काही आमदार किंवा खासदार थोडीच आहे, नियम अन कायदे बनवायला” मी हसत हसत म्हटलं. “हं ! पण मी त्याविषयी बोलतच नाही आहे. मी विचारतोय तुम्ही मिळवलेलं ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही स्वतःची कार्यपद्धती विकसित केलीय का?”
“हा हा हा .... कॅप्टन, माझं अजून लग्नसुद्धा झालं नाही. पुढच्या पिढीला अजून वेळ आहे.”
“हा हा हा ..... अरे माझं म्हणणं ती पिढी नाही. “
“मग?” मी जरा गोंधळलो.
“तू इंजिनिअर झाला, नंतर एमबीए केलंस, त्या ज्ञानाचा वापर करून स्वत:ची कंपनी स्थापन केली, पण समाजाला त्याचा काय फायदा?”
“माझ्या कंपनीत २६ लोकांचा स्टाफ आहे”.
“ते नोकरी करतात. तू त्यांच्याकडून काम करून घेतो आणि पगार देतो.”
“मग तुम्हाला काय म्हणायचं आहे?”
“तू जे ज्ञान मिळवलं, त्यासाठी अनेक चांगल्या लोकांची मदत झाली असेलच”.
“हो हो, ते तर आहेच.”
“मग तू इतरांना मदत करणे अपेक्षित आहे, नाही का?”
“हो ते मी करतोच आहे”.
“मला नाही वाटत की ते पुरेसं आहे”.
“म्हणजे?”
“आजचं जीवन खूप वेगवान झालंय. कदाचित तुला ज्यावेळी मदत करायला वेळ असेल त्यावेळी ज्याला मदत हवी तो नेमका व्यस्त असेल”.
“हम्म... पण त्यासाठी मी जबाबदार आहे का? ज्याला गरज असेल त्याने समोरच्याच्या वेळा पाळायला हव्या न?”
“बस्स... इथेच गडबड आहे”.”.....”.
“मदत करावी ती सर्वांना, तू मदत करतो हे लोकांना कसे कळेल? त्यांना नेमकी जी मदत हवीय, ती तू करू शकतो की नाही यासाठी त्यांनी हेलपाटे का मारावे?”
“पण ....” मला काय बोलावे ते सुचले नाही.
“यामुळे आपले भारतीय लोकं मागे राहतात, कारण जगभरात बरचसं ज्ञान इंग्रजीत अन आमची इंग्रजीची बोंब.”
“मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे?”
“लिहा..... लिहिते व्हा” स्वतः कॅप्टन शिर्केंनी स्वतःची वेबसाइट डिझाइन केली होती आणि त्यावर ते मार्गदर्शन करणारे लेख लिहायचे.”
“पण लिहायला वेळ कुठे आहे?” मी उगाच अडचण मांडली.
“अरे वा, फेसबुकवर बरंच काही लिहिता, मग ब्लॉगवर लिहा की” कॅप्टनने पटकन माझी नस पकडली.
“हो पण मराठीत लिहिणे...” मी उगाचच झंजट नको म्हणून कहिनाकाही कारण काढत होतो.
“अहो गूगल महाराज आहेत की” कॅप्टनने मला एकदम क्लीन बोल्डच केलं.
“हो पण मी एक साधा माणूस, मी काय लिहिणार?” मी एक नवीन अडचण उपस्थित केली.
“अहो तुमचे अनुभव लिहा की, कदाचित त्यांतूनच तुम्हाला तुमच्या भविष्याच्या दिशा मिळतील आणि इतरांनाही फायदा होईल.
“हो पण माझे अनुभव कोण वाचणार?” मी कसही करून हे टाळण्याचा प्रयत्न करत होतो.
“का नाही वाचणार? अहो आजकाल मराठीत तांत्रिक गोष्टी लिहिणारे बोटावर मोजण्याइतके आहेत, त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांचे मार्गदर्शन फार आवश्यक झाले आहे.”
“हा, पण तरीही, लिहिणे म्हणजे.....”
“मग व्हिडिओ ब्लॉग करा, ते अधिक सोपं अन चांगलं. तुमच्याकडे तसंही चांगला वेबकॅम आहेच.”
“पण मला अजूनही पटत नाहीय हे”.
“दुसऱ्याला मदत करणे पटत नाही?”.
“नाही ते तर पटलंय मला, पण ब्लॉगच्या माध्यमातून खरंच फायदा होईल?”
“त्याचा विचार तुम्ही करूच नका. तुम्ही तुमचं ज्ञान वाटायला सुरू करा, बघा आपोआप लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही प्रत्यक्ष हजर नसतानाही तुमचा त्यांना त्यांच्या जीवनात किती फायदा झाला ते. अहो लोकांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञान हवंय पण मराठीतून, कारण २-३ तासाच्या गोष्टीसाठी इंग्रजी शिकणे म्हणजे द्राविडी प्राणायाम होईल. अजूनही लोकं कंप्युटर विकत घेणे टाळतात. कारण काय, तर बिघडला तर काय करायचं ह्याची प्राथमिक माहितीसुद्धा मराठीत नाही. मग काय, लुबाडणे सुरू होते. तुम्ही जर हि माहिती जरी दिली, किंवा साधे साधे सॉफ्टवेअरबद्दल मराठीत व्हिडिओ उपलब्ध केले तरी लोकं तुम्हाला धन्यवाद देतील. अर्थात तुम्ही मॅनेजमेंटबद्दलही सांगू शकता, इलेक्ट्रॉनिक्सबद्दल, तुमच्या आवडत्या विषयाबद्दल. फक्त तुमचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचणे गरजेचे आहे.”
“हम्म !” मी थोडा विचार करू लागलो.
“अर्थात, असली मदत कदाचित तुम्हाला कोणी केली नसेल, केलेली मदत दुसऱ्या स्वरूपात असेल, पण ती मदत नसती तर तुम्ही इथपर्यंत पोहचू शकले असते का? आज एकास एक नव्हे तर एकास अनेक प्रमाणात मदत हवीय. कोणास ठाऊक, तुमच्या एका व्हिडिओने एखाद्याचे आयुष्यच बदलून जाईल”.
मला एकदम माझ्याच आयुष्यात मला मदत करणाऱ्यांचे चेहरे डोळ्यांसमोरून तरळून गेले. खरंच हे लोकं माझ्या आयुष्यात आले नसते तर? पण याचा आणि सुरुवातीला कॅप्टन म्हणाले होते त्या “वारसदाराचा” काय संबंध.
“आपण स्वतःजवळचे ज्ञान पुढच्या पिढीला दिले असते आणि पुढच्या पिढीला स्वतःचे कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली असती, तर कित्येक साम्राज्य, पक्ष, सामाजिक संघटना, कंपन्या बुडण्यापासून वाचले असते. पण आपण दुसरी फळी निर्माणच होऊ दिली नाही आणि मग कित्येक वर्ष इंग्रजांशी महात्मा गांधी एकटेच लढत राहिले, पण राजकीय नेतृत्वाच्या अनेक फळ्या तयार झाल्या नाही किंवा होऊ दिल्या नाही. अकबराने एकट्यानेच कित्येक वर्षे राज्य केले. स्वातंत्रोत्तर काळात कित्येक कंपन्या, साखर कारखाने, कापड गिरण्या आणि कापूस कारखाने निर्माण झाले, अन मग नष्टही झाले. थोडक्यात ज्ञान पुढच्या पिढीला न मिळाल्याने किंवा ती मिळूनही संधी न दिल्याने आजही आपली सिस्टम व्यक्तीकेंद्रितच राहिली आहे. म्हणायला लोकशाही असली तरी, अजूनही आपल्याला ‘साहेब नाही, उद्या या’ हे ऐकावं लागतं अन आपण ज्ञान नसल्यामुळे एकतर ‘उद्या’ च्या भरवशावर परततो, किंवा पैसे देऊन काम करवून घेतो. आणि सिस्टमला शिव्या घालतो”.
“बापरे, मीतर हा विचारच केला नव्हता”.
“एकदा सुरुवात करा, आपोआप विचार सुचत जातील, लोकं जोडली जातील, मग सिस्टममध्येसुद्धा बदल घडेल. त्यासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरच येण्याची गरज नाही”.
कॅप्टन बाहेर मावळत्या सूर्याकडे पाहत होते.
“एकदा का तुम्हाला तुमच्यापेक्षाही सरस, उत्तम नेता, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापक बनवायची धून असेल, तर समाजात बदल घडायला फारसा वेळ लागणार नाही, म्हणून म्हणतो. लिहिते व्हा...”
मला आज खरंच एक नवीन आविष्कार झाल्याचा आनंद होत होता. अगदीच काही-नाही तरी डिजीटल इलेक्टॉनिक्सचे माझे काही Award मिळालेले Presentations जरी मी ब्लॉगवर टाकले तरी अनेकांना त्याचा फायदा होईल, हे मला जाणवलं. उद्यापासून, नव्हे आजच, कॅप्टन शिर्केंच्या आशीर्वादाने, आशीर्वादरूपी ब्लॉगच्या माध्यमातून ज्ञान देण्यास सुरुवात करायची असे मी ठरवले अन शेवटचा एक गुलाबजाम घेऊन तोंड गोड केले.

पूर्वप्रसिद्धी :- मराठी मंडळ कोरिया दिवाळी अंक २०१३.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय देशमुख,

प्रचंड विचारात टाकणारा लेख. मी तुमचा चाहता झालोय!

जाताजाता : ब्रिटीश सिस्टीम म्हणतात तिला ब्रिटीश राज्यकर्त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आधार होता. पहिल्या एलिझाबेथची कारकीर्द ४४ वर्षांची (इ.स. १५५८ ते इ.स. १६०३) होती. तिच्या काळात इंग्लंड एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. मात्र सिस्टिमची बोंबाबोंब होती. तिच्या पश्चात इंग्लंड आणि स्कॉटलंड एकत्र येऊन एकराज झाले ते इ.स. १६०४ साली. यातून पुढे इ.स. १७०७ साली ब्रिटन जन्माला आले. आपण जिचे गोडवे गातो ती ब्रिटीश सिस्टीम फार नंतर म्हणजे पहिल्या व्हिक्टोरिया राणीच्या कार्यकाळात (इ,स. १८३७ ते इ.स. १९०१) अस्तित्वात आली. तिच्या ६३+ वर्षांच्या स्थैर्याचा चांगलाच उपयोग झाला. ब्रिटनच्या सध्याच्या राणीचा (दुसरी एलिझाबेथ) कालखंडही प्रदीर्घ आहे. इ.स. १९५२ ते आजतागायत.

याउलट कर्तृत्ववान भारतीय राजे/लढवय्ये अतिशय अल्पायुषी ठरले. शिवाजीमहाराज ५० वर्षेच जगले. संभाजी महाराज ३१, थोरले बाजीराव ४०, थोरले माधवराव २९. काय करणार, नियतीचा खेळ.

आ.न.,
-गा.पै.

ब्रिटीशांपूर्वीचे भारतीय राजे वगैरे एका सामंती व्यवस्थेचा हिस्सा होते.
ब्रिटीशांची भांडवलशाहीची व्यवस्था सरंजामदारी व्यवस्थेपेक्षा जास्त प्रगत होती त्यांचा पराभव हा एका जुन्या व्यवस्थेचा पराभव होता.
कुठलीही सिस्टीम परिपूर्ण नसते त्यात बदल ही वेळोवेळी घडत जातात जर तसे घडले नाही तर तिचे समूळ उच्चाटन होतेच,
जसे फक्त पूर्णपणे व्यवस्थेला दोष देणे चुकीचे तसेच कधी कधी व्यक्तीं कडे बोट दाखवून व्यवस्थेच्या दोषांना झाकण्याचे ही प्रयत्न होतात तेही चूकच.

असो.
गंभीर मुद्दा मांडणारे लेखन आवडले.
पुढील लेखनाची प्रतिक्षा, अजुन येउ द्या.

गामा पैलवान आणी जयनीत,

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

याउलट कर्तृत्ववान भारतीय राजे/लढवय्ये अतिशय अल्पायुषी ठरले. शिवाजीमहाराज ५० वर्षेच जगले. संभाजी महाराज ३१, थोरले बाजीराव ४०, थोरले माधवराव २९. काय करणार, नियतीचा खेळ. हे अगदी मनातलं बोललात. त्यासोबत सगळ्याच गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागल्या, म्हणजे युद्ध, प्रशासन, नविन लोकांची भरती वगैरे.... जर शिवाजी महाराजांना किंवा पहिल्या बाजिरावाला अधिक आयुष्य लाभलं असतं तर भारताचा नकाशा वेगळाच राहिला असता. असो.

सगळ्यांचे धन्यवाद. सध्या लेखनाची गती कमी झालिय खरी, पण लिहितोय थोडं थोडं.

धन्यवाद

छान लिहलय....
कोणत्याही सिस्टममुळे एक चाकोरी तयार होते......... आणि एकदा का ही चाकोरी तयार झाली की मग नविन मार्ग शोधायला याच सिस्टमक्डुन विरोध व्हायाला लागतो......... असंही होतं कधीतरी.........